नैसर्गिक चमत्कार
नैसर्गिक चमत्कार
मायरा आणि विहान.. दानिशची दोन गोंडस मुलं.. त्याची अर्धांगिनी विदिशा लहानग्या विहानच्या जन्मानंतर त्यांना सोडून गेली.. त्या इवल्याशा जीवाला आणि अडीच वर्षाच्या मायराला दानिश नॅनीच्या सहाय्याने एकटाच सांभाळायचा.. आई-बाबा दोघांचं प्रेम देण्याचा प्रयत्न करायचा.. एका मोठ्या आंतरराष्ट्रीय कंपनीचं सी.ई.ओ. पद आणि दोन पोरक्या चिवचिवत्या जीवांमधे दमून जायचा.. मग कधीतरी चिडचिड व्हायची.. पण मग मुलं घाबरायची.. हळूहळू गुंता वाढायला लागला होता.
ही परिस्थिती हेरून विदिशाच्या वडिलांनी दानिशला थोडे दिवस रहायला बोलावलं.. मग दोन मुलं आणि नॅनी ईव्हा यांना घेऊन लंडनहून दानिश भारतात दाखल झाला.. लग्नानंतर पहिल्यांदाच पुण्याला आला होता.. जुन्या आठवणींच्या गाठोड्याची गाठ सुटली.. मुलंही आजी-आजोबांबरोबर रमली.. विनाआईचे ते कोमल जीव मायेच्या स्पर्शात चिंब निथळले.. बदल मिळाल्याने सगळ्यांनाच ताजंतवानं तरतरीत वाटायला लागलं होतं..
दानिशला आधीच खूप काम असायचं.. त्यात आता कंपनीच्या चेअरमनचं नवीन येऊ घातलेल्या कोरोनाने अकाली निधन झाल्याने जास्तीचा भार दानिशवर पडत होता.. तो कंपनीच्या कामात आकंठ बुडून गेला.. मग आजी-आजोबांनी मुलांची सगळी जबाबदारी उचलली.. नॅनी हाताशी होतीच.. तीही लाघवी स्वभावाची..
आजोबा चिमुकल्यांना रोज घराबाहेर स्वतः फुलवलेल्या बागेत घेऊन जायचे.. झाडं-फुलं दाखवायचे.. गप्पा मारायचे.. मुलंही कुतुहलाने प्रश्न विचारायची.. आजीही मुलांना देवपूजेत सामील करून घ्यायची आणि खूप बोलायची.. मग मुलंही मोकळेपणाने बडबड करायची.. बागेतली फुलं आणि मुलं, फुलायला लागली होती.. बहरायला लागली होती.. त्यांच्यात खूप विकास जाणवत होता.. छोटी कळी उमलण्यापासून फळं धरेपर्यंत सगळं मुलं आजोबांबरोबर बघायची.. त्यांना गंमत वाटायची.. त्यामुळे दानिशही निर्धास्त होता..
एक दिवस सगळीकडे लाॅकडाऊन घोषित झाला.. हळूहळू संपूर्ण जग ठप्प होत होतं.. दानिश आणि मुलंही इथे अडकून पडले.. दानिशचं काम आणि मुलांच्या शाळा सगळं ऑनलाईन चालू झालं.. मुलं आणि आजी-आजोबा असं छान समीकरण तयार झालं.. मुलं सगळं स्वतःचं स्वतः करायला शिकली.. बागेत जाणं चालूच होतं.. त्यांचा हट्टीपणा, चिडचिड आणि एकटेपणा दूर झाल्याने दोघं खूष होती.. निसर्गाच्या आणि प्रेमाच्या माणसांच्या सान्निध्यात खुलली.. दानिश मुलांच्या प्रगतीवर खूश होता.. आजी-आजोबांच्याही विदिशाच्या जाण्याच्या दुःखावर मुलांच्या असण्याने खपली धरली..
मुलांच्या संगोपनाचा; विदिशाच्या नसण्याच्या दुःखाचा आणि सगळ्यांचा एकत्र राहण्याचा प्रश्न निसर्गानेच किती सहजपणे सोडवला होता.. चमत्कारच एक..