सई कुलकर्णी

Romance Tragedy Inspirational

3  

सई कुलकर्णी

Romance Tragedy Inspirational

मंथन

मंथन

5 mins
284


मंथन ही एक अशी कथा आहे ज्यात पात्रांचं आयुष्य घुसळून निघतं.. संथपणे पण सतत.. उलथापालथी चालूच राहतात.. त्या घुसळण्याला अर्थ प्राप्त आहे.. कारण कथेतील प्रत्येक पात्र कुठल्या - न् - कुठल्या मंथनातून जातय, त्याचे परिणाम भोगतय आणि त्यांच्या आयुष्यावर त्याचे पडसाद उमटत आहेत.. प्रस्तावना इथेच थांबवते.. कथेत विस्तार होणारच आहे.. कथेतील सर्व पात्रं काल्पनिक आहेत.. त्यांचा खऱ्या आयुष्यात ताळमेळ सापडल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.. यात कुणालाही दुखावण्याचा अजिबात हेतू नाही.. धर्म, जाती, प्रांत, भाषा या कुठल्याही वादात या कथेला अडकवू नये ही विनंती.. तुम्हाला कथा आवडेल अशी आशा करते आणि आपले आशिर्वाद पाठीशी असूदे अशी नम्र विनंती करते..


     निहीरा कॅबमधून उतरली आणि समोरचं दृश्य बघून दोन सेकंद स्तब्ध झाली.. एकदम माईल्ड कॉफी रंगाचा टुमदार बंगला.. बंगल्याभोवती फुलवलेली मनमोहक बाग आणि त्यात लावलेली विविध प्रकारची झाडं.. मोठा आणि छोटा झोपाळा.. पाहुण्यांसाठी छोटेखानी कॉफी टेबल.. बंगल्याला वीज आणि उष्णता पुरवणारी सोलार सिस्टीम.. आणि या सगळ्या सौंदर्याला खुलवणारे आकाशी रंगावर विखुरलेले ढगांचे कापूस.. अत्यंत मनमोहक देखावा.. ती हिलरोडच्या पॉश परिसरात उभी होती.. तिला एकदम प्रसन्न वाटलं.. बंगल्याच्या वास्तूत एक प्रकारची पॉझिटिव्ह एनर्जी होती.. ती गेटमधून चालत मेन डोअरपर्यंत आली.. तिचा चमू मागून आला.. दारावरची बेल वाजवणार इतक्यात किचनच्या खिडकीतून आवाज आला, "दरवाजा उघडाच आहे.. ढकलून आत या.."


      ती व्हरांड्यात आली तसा लगेच स्वागताला मायकल पुढे आला.. प्रसन्न तरी शांत चेहरा, फिक्कट गुलाबी रंगाचा पोलो टी-शर्ट, शुभ्र सफेद ट्राउजर, केसांचा नीटनेटका भांग, वय सांगणारे थोडे पांढरे केस.. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भरपूर पॉझिटिव्ह एनर्जी.. त्याने निहीराला स्मितहास्य देत शेकहँड केलं आणि आत येण्याची विनंती केली..


      ते दोघं आत आले.. सोनेरी नक्षीकाम केलेल्या पांढर्‍याशुभ्र सोफ्यावर बसले.. निहीरा म्हणाली, "मायकल, बाहेरून तुमचं घर खूप छान आहेच. पण आतूनही अगदी नजर लागेल इतकं सुंदर दिसतंय.." मायकल फक्त हसला आणि थॅंक्स म्हणाला.. एकमेकांची औपचारिक ओळख आणि थोड्याफार जुजबी गप्पांनंतर त्याने निहीराला कॉफी दिली.. कॉफी मस्त झाली होती.. निहीराला एकदम तरतरीत वाटलं.. निहीरा म्हणाली, "काम झाल्यावर मला तुमचं घर बघायला आवडेल.." मायकल म्हणाला,"ओह शुअर.. व्हाय नॉट.." मग तिने विषयालाच हात घातला, "आपण सुरू करूयात?" मायकल हसला आणि कॉफीचे कप ठेवायला उठला.. निहीरासोबत आलेल्या कॅमेरामन आशयने कॅमेरा सुरू केला आणि मुलाखतीला प्रारंभ झाला..


      मायकल रॉड्रिग्ज.. अत्यंत उच्चविद्याविभूषित, एका स्वबळावर उभारलेल्या आणि वर्षाकाठी अब्जावधींची उलाढाल करणार्‍या मीडिया कंपनीचा मालक, अत्यंत लॅव्हिश लाईफस्टाईल जगणारी कष्टकरी, विश्वासू व्यक्ती, गर्व - लोभ - अहंकार - मत्सर यांच्या वाऱ्यालाही उभा नसणारा माणुसकी जगणारा "माणूस".. अनेक वर्षांपासून जर्मनीत राहून मागील वर्षी कायमचा भारतात रहायला आला होता.. अत्यंत निःस्वार्थीपणे स्वतःची कंपनी प्रोफेशनल हातांत सुपूर्द करून तो निवृत्त झाला होता.. काही खाजगी कारणास्तव सर्व मोहपाशांतून मुक्त झाला होता.. आणि आता विशिष्ट उद्देशासाठी "कडलर" झाला होता..


     कडलिंग ही औपचारिकरित्या एक कॉन्सेप्ट म्हणून भारतात अजून रुजली नव्हती.. कडलिंग हा एक एकटेपणा दूर करण्याचा तसा नवीन प्रकार आहे.. आपली आई, बहीण, आजी यांना मिठी मारली की आपला एकटेपणा दूर झाल्याचं जाणवतं.. तसंच सगळ्यांच्या नशीबात कुटुंबसुख असतच असं नाही.. किंबहुना पाश्चात्य देशात जिथे लोकसंख्या कमी असते, मोकळं कल्चर असतं, एकटं रहाणं प्रिफर केलं जातं तिथे लोक पैसे मोजून कडलिंग करून एकटेपणा दूर करतात.. ती एक प्रकारची थेरपी असते.. कडलर्स तुम्हाला मायेने जवळ घेतात, तुमचं म्हणणं ऐकून घेतात, तुम्हाला एकटं नसल्याचा दिलासा देतात, तुम्हाला थोपटतात.. थोडक्यात तुमचं कुणीतरी आहे, तुम्ही एकटे नाही असं आश्वासन देऊन नैराश्यातून बाहेर काढतात.. निहीरा एका अग्रगण्य फॅशन मॅगझिनची चीफ एडिटर होती.. मायकलचे बरेचसे क्लायंट्स फॅशन जगताशी जोडलेले असल्याने निहीरा त्याची मुलाखत घ्यायला आली होती..


"सर्वप्रथम मला विचारायचय की तुम्ही कडलिंगच का निवडलत?" निहीराच्या पहिल्या थेट प्रश्नाने मायकल उडालाच.. तिच्या चेहर्‍यावर कडलिंग बद्दल एक अविश्वास होता.. पण त्याला अशा शंकांची सवय होती..


"माझ्याकडे खूप प्रकारची लोकं येतात.. काही खूप म्हातारी ज्यांच्या आयुष्यात कुणीच आपलं उरलं नाहीये.. काही खूप श्रीमंत, ज्यांनी पैशांशिवाय दुसरं काहीच कमावलं नाहीये.. काही जण आजारी असतात, ज्यांच्याकडे प्रार्थना करायला किंवा दिलासा द्यायला आपलं कुणीच नाहीये.. काही तिशी पस्तिशीतली तरूण मंडळी ज्यांना इतक्यात लग्न करायचं नाहीये पण जवळीक अनुभवायची आहे.. वगैरे वगैरे.. काही जण या प्रोफेशनलकडे गलिच्छ नजरेने बघतात.. काहींना हे पैशाचे चाळे किंवा उच्च सोसायटीतील चरित्रहीनता वाटते.. पण मी एक माणूस म्हणून त्यांना थोडी मदत केली तर कुठे बिघडलं?" हे ऐकून निहीरा अगदी कन्व्हिन्स्ड झाली नव्हती..

"मग अश्या लोकांसाठी काऊन्सिलिंग आहे.. सायकॅट्रिस्ट्स आहेत.." निहीरा


"मी एकाकीपणाकडून लोक डिप्रेशन मधे जाणार नाहीत यासाठीच काम करतो.. कधीकधी माणूस डिप्रेशनअंती आत्महत्या करण्याचा धोका संभवतो.. आणि माझा एवढाच प्रामाणिक प्रयत्न असतो की मी त्यांना थोडी धीर, थोडा दिलासा, थोडी आशा, थोडी माया, थोडी उमेद देऊ शकेन.. म्हणजे या सगळ्या थोड्या गोष्टी मिळून त्यांना जगायला भरपूर उर्मी मिळेल.." मायकल अत्यंत शांतपणे म्हणाला.. आता मात्र निहीरा निःशब्द झाली होती..


      जवळपास दोन तासांनी मुलाखत संपली.. आता निहीराला मायकलचं घर बघायचं होतं.. मग त्यांनी दिवाणखान्यातूनच सुरूवात केली.. इतकं सुंदर आणि दुर्मिळ वस्तूंचं कलेक्शन निहीरा पहिल्यांदाच बघत होती.. दुर्मिळ आर्ट, पुस्तकं, कटलरी आणि बरच काही.. घरात राहणाऱ्या माणसांचं मन त्या घरात प्रतिबिंबित होतं असं म्हणतात.. तसच मायकलचं निर्मळ मन त्याच्या घरात उतरलं होतं.. एका भिंतीवर खूप फोटोफ्रेम्स लावल्या होत्या.. मायकल एक एक करून निहीराला फोटोतल्या माणसांची ओळख करून देऊ लागला.. एका फोटोवर निहीराची नजर स्थिरावली..

मायकल म्हणाला, "माझी पत्नी आणि मुलगा"..

"तुमच्या बायकोला तुम्ही सगळं सांगता का?" निहीराने विचारलं खरं पण तिला लगेच पश्चाताप झाला..

"सगळंच" बायकोच्या फोटोकडे बघत अत्यंत शांतपणे मायकलने उत्तर दिलं..

"त्या कुठे आहेत?" निहीरा

"माझ्या मुलाजवळ, बॅकहोम" मायकलने उत्तर दिलं तशी निहीरा हसली..

"मग इथे नाही येत?" निहीरा

"जमत नाही" मायकल


निहीरा बराच वेळ ते फोटोज न्याहाळत राहिली.. ॲना खूपच सुंदर आहे आणि रॉबिन म्हणजे छोटा मायकल या स्वतःच्याच विचारावर दोन सेकंद हसली.. मायकल खरच खूप नशीबवान आहे.. त्याच्याजवळ इतकी स्वीट फॅमिली आहे.. मायकलही स्वतःच्या उत्तरावर बराच वेळ हसत होता.. पण डोळ्यांना झरण्यापासून परावृत्त करत होता.. मनातल्या मनातच.. निहीराच्या नजरेतून ते सुटलं.. डोळ्यातले भाव लपवायचा मायकलचा प्रयत्न यशस्वी झाला होता.. किती सफाईदारपणे त्याने उत्तरं दिली होती.. त्याचं त्यालाच आश्चर्य वाटत होतं.. काय लपवत होता तो? जे निहीराला कळलं नव्हतं.. वाचत रहा.. पुढे कळेलच.


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance