सई कुलकर्णी

Romance Inspirational Others

3  

सई कुलकर्णी

Romance Inspirational Others

मंथन - भाग ३

मंथन - भाग ३

4 mins
257


     घर बघता बघता निहीरा आणि मायकल मागच्या अंगणात आले.. तिथे मायकलने त्याच्या कडलिंग सेशन्ससाठी खास व्यवस्था केली होती.. स्पेशल रूम्स बांधल्या होत्या.. त्यांना रूफटॉपपासून बेसपर्यंत अखंड काचेच्या खिडक्या लावल्या होत्या, जेणेकरून भरपूर सूर्यप्रकाश येईल; मोठे फ्लॉवलपॉट्स; सुंदर मेणबत्त्या; विविधरंगी लाईट्स; सुगंधी तेलाच्या बाटल्या आणि बरच काही ठेवलं होतं..

"एक विचारू?" निहीरा

"जरूर" हसतच मायकल म्हणाला

"तुमची क्लायंट जर स्री असेल आणि सेशन्सच्या मधेच आकर्षण निर्माण झालं तर कसं सांभाळता?"

" तर अजिबात विचलित न होता मी ते क्षण जाऊ देतो.. हे नैसर्गिक आहे.. फक्त मनावर ताबा ठेवणं महत्त्वाचं असतं.. शेवटी मी एक प्रोफेशनल आहे.. तुला एखादं सेशन करायला आवडेल का?"

"मी?" निहीरा चकित झाली..

मायकल फक्त हसला आणि म्हणाला, "तू शेवटचं कधी एखाद्या आपल्या माणसाच्या मांडीत डोकं ठेऊन रडली होतीस?"

"हा काय प्रश्न आहे? मी स्वतंत्र राहते.. मला गरज वाटत नाही" निहीरा

"ते तुझ्या अंतर्मनाला ठरवू देत" मायकल

"पण मी तर इथे मुलाखत घ्यायला आले होते.. मला या सेशनची गरज वाटत नाही.." निहीरा

"मुलाखत संपून तर ३ तास झालेत.. अजून तू इथे काय करते आहेस.." तशी निहीरा निरूत्तरही झाली आणि खजीलही.. मायकलने निहीराचा मोबाईल मागितला आणि म्हणाला "सेशनमधे मला व्यत्यय अजिबात आवडत नाही".. थोड्याशा आश्चर्याने निहीराने तो मायकलकडे सुपूर्द केला..


     मग मायकलने सगळी तयारी केली आणि तिला बसायला सांगितलं.. मायकल अत्यंत सभ्य आणि शांतपणे सगळं हाताळत होता.. मायकल निहीराच्या बाजूलाच बसला.. "असं खांद्याला खांदा लावून बसण्यालाही कंपॅनियनशिप म्हणतात आणि हे खूप महत्त्वपूर्ण असतं".. निहीरा हसली कारण तिला सगळं गमतीशीर वाटत होतं.. थोड्या वेळात निहीरा आडवी झाली आणि वरचं मोकळं आकाश बघून तिला खूप बरं वाटलं.. मायकलने विचारलं "करूया सुरू?" निहीराने मानेनेच हो म्हटलं तसं त्यांचं सेशन सुरू झालं.. मायकलने अत्यंत मायेने, आपुलकीने आपलं काम सुरू केलं..


     शांत बसलेली निहीरा अचानक गदागदा हलू लागली, ओक्साबोक्शी रडू लागली.. मायकल तिच्या डोक्यावर थोपटत होता.. जरा रडण्याचा जोर ओसरल्यावर निहीरा बोलू लागली, "मी बाबाशी १५ वर्ष बोललेच नाही.. त्याच्या आणि आईच्या भांडणानंतर तो माझ्या मनातूनच उतरला.. आईच्या सांगण्यावरून पण मी कधी त्याला भेटायला गेले नाही की साधा फोन पण केला नाही.. उलट तो यायचा तेव्हा मुद्दाम आधीच कुठेतरी निघून जायचे आणि रात्रीच परत यायचे.. मागच्या महिन्यात बाबा गेला.. आणि मला माझी चूक कळली.. पण तोपर्यंत उशीर झाला होता.. त्याला बरेच काही सांगायचे राहून गेले आणि हे शल्य मला कायम टोचत राहील.. खरं तर बाबा माझा हिरो होता.. माझा आयडल.. मला सेम त्याच्यासारखंच बनायचं होतं.. हुशार, कर्तबगार, स्वावलंबी.. पण बाबा आम्हाला सोडून गेला आणि मी बदलले.."


     मायकल काहीच बोलला नाही.. फक्त तिला थोपटत राहिला, डोक्यावरून हात फिरवत राहिला आणि ती बोलत राहिली, रडत राहिली.. खूप रडून रडून निहीराला कधी झोप लागली तिलाच कळलं नाही.. ती उठली तेव्हा मायकल तिच्या बाजूला नव्हता.. तिला झोपून दोन तास झाले असावेत.. तिला आता खूप बरं वाटत होतं.. आभाळ बरसून गेलं होतं.. निरभ्र झालं होतं.. स्वच्छ सूर्यप्रकाश पडला होता.. ती बाहेर आली तसा मायकल तिच्याकडे बघून हसला.. निहीरा मायकलला धन्यवाद कसं म्हणावं याचा विचार करत होती आणि मायकलने ते ओळखलं होतं.. तो म्हणाला, "निहीरा हे आपलं सेशन तुझ्यात सकारात्मक बदल आणेल.. खात्री आहे मला.." निहीराला हे ऐकून खूप बरं वाटलं..


     थोड्या वेळाने निहीराची निघायची वेळ झाली.. तिने कॅब बुक केली होती.. निहीराने मायकलचे मनापासून आभार मानले.. अर्ध्या तासात कॅब आली.. निहीरा आणि चमू कॅबमधे बसले आणि मायकलला विचारलं "तुम्हाला कुठल्या गोष्टीने या क्षेत्रात आणलं?" मायकल परत हसला आणि फक्त तिच्या हातावर थोपटलं.. म्हणाला, "काळजी घे".. त्याला टाटा करून निहीरा निघाली.. कॅब दृष्टिआड होईपर्यंत मायकल हात हलवत राहिला.. अचानक त्याच्या मनात एक रिक्त भावना उफाळून आली.. आपोआपच त्याची पावलं त्या छोट्या फाटकाकडे वळली.. तो लाकडी फाटक उघडून आत गेला.. एक एक पांढरे संगमरवरी दगड मागे टाकत टाकत एका ठिकाणी येऊन थांबला आणि उभा राहिला.. हताश, हतबल, रिक्त. तिथे नाव कोरलं होतं - ॲना रॉड्रिग्ज आणि रॉबिन रॉड्रिग्ज.. मायकलने त्या नावांवरून हात फिरवला.. फुलं ठेवली.. त्याच्या डोळ्यांत पाणी तरळलं.. ते त्याने पटकन बोटाने पुसलं..


    ॲना त्याची पत्नी आणि रॉबिन मुलगा.. ॲना जर्मनीत मायकलला भेटली, त्यांची मैत्री झाली, लग्न झालं.. मायकल त्याच्या कंपनीच्या दौर्‍यांवर असताना दोघं अपघातात देवाघरी गेले.. मायकल कायमचा एकटा झाला.. त्याने काहीही करण्याची उमेद गमावली होती.. त्याने स्वतःची कंपनी विकली आणि ती प्रोफेशनल हातांत सुपूर्द केली.. कारण आता त्याच्या आयुष्यातल्या महत्त्वपूर्ण दोन व्यक्ती नव्हत्या..


   पण मायकल नुसता स्वतःच्या नैराश्यातून प्रयत्नपूर्वक बाहेरच नाही पडला तर स्वतःच्या एकटेपणावरून धडा घेत त्याने दुसर्‍यांना मदत करायची ठरवली.. त्यातूनच त्याने कडलिंगचा मार्ग निवडला होता.. आज त्याने निहीराच्या आयुष्यात आनंद निर्माण केला होता.. बर्‍याचश्या लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल आणला होता आणि आणणार होता.. त्याने मनोमनच ॲनाचे आभार मानले.. कारण ती नसूनही सतत त्याच्यासोबत होती.. ती हयात असताना ती किती महत्वाची आहे आणि तिच्यावर आपलं किती प्रेम आहे हे तिला सांगायचे राहूनच गेले.. पण तिचं प्रेम तर सोबत होतं.. तीच त्याची शक्ती होती.. ती आणि रॉबिन जिथे कुठे होते, तिथे मायकलला त्यांना आनंदी बघायचं होतं.. तो त्यांना परत तर आणू शकत नव्हता.. काही गोष्टींना फक्त काळ हेच उत्तर असतं.. मायकलच्या दुःखालाही काळ हेच उत्तर होतं.. शेवटी माणसाला काळासमोर नतमस्तक व्हावच लागतं.. "कालाय तस्मै नमः" म्हणावंच लागतं..


...निहीरा मायकलच्या या सत्यापासून फार काळ अनभिज्ञ राहू शकत नाही.. तिच्या मुलाखतीनंतर आर्टिकल लिहीण्यासाठी ती जेव्हा मायकलबद्दल गुगल सर्च करते तेव्हा तिला त्याच्या बायको आणि मुलाबद्दल एका जर्मन मासिकात माहिती मिळते.. तिला हळहळ वाटते.. पण त्याहूनही कितीतरी पटीने मायकलचा अभिमाना वाटतो.. मायकल स्वतःचं दुःख कुरवाळत न बसता इतरांच्या आयुष्यात इंद्रधनुष्य फुलवायचा आटोकाट प्रयत्न करतोय ही बाब निहीराला खूप भावते.. तिचा मायकलबद्दलचा आदर द्विगुणित होतो.. भविष्यात मायकल पुन्हा कधीतरी काही महत्त्वाच्या कारणाने निहीराच्या आयुष्याला स्पर्शून जातो.. कधी आणि कसं? वाचत रहा.. कळेलच.


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance