मायेचा स्पर्श
मायेचा स्पर्श
सुजाताचा निर्णय तिच्या घरच्यांना आणि जवळच्या बऱ्याच नातेवाईकांनाही पटला नव्हता.सर्वात जास्त तिचे सासू-सासरे तिच्यावर नाराज झाले होते. सुजाता आणि संदीपचा मुलगा आयुष, आता दोन वर्षाचा झाला होता,त्यांनी आता दुसऱ्या अपत्याच्या तयारीला लागले पाहिजे ,अशी सुजाताच्या सासू-सासऱ्यांची अपेक्षा होती, पण सुजाताने आपला निर्णय सांगून जणू त्यांचे हे स्वप्नच उधळून लावले. तिला आता नवीन अपत्याला जन्म द्यायचा नव्हता,त्याऐवजी एका अनाथ मुलीला दत्तक घ्यायचे होते. 'जे बालक अजून अस्तित्वातच नाही,अशा नवीन जीवाला जन्म देण्यापेक्षा, जे बालक अनाथ, एकटं, निराधार आहे, त्या जीवाला दत्तक घेऊन तिला त्याचा आधार बनायचं होतं.या निर्णयावर ती ठाम होती. खरं तर तिने संदीपला हा निर्णय लग्न होण्याआधीच सांगितला होता. त्यानं तो कबूलही केला होता.तेव्हा तिने संदीपला मूल दत्तक घेणं का महत्वाचं आहे, हे समजावून सांगितलंच होतं,पण आता आपल्या आई-वडिलांची नाराजी आणि विरोध पाहून तो कोंडीत सापडला होता.
एकदा सूजाता घरी नसताना तिचे सासू-सासरे संदीपला समजावीत होते. "हे बघ संदीप,उगच वाद होऊ नयेत म्हणून मी सुजाता घरी नसताना हा विषय काढतेय. मूल दत्तक घेण्याचा विचार काही पटला नाही.तूच तिला नीट समजावून सांग. शेवटी आपलं ते आपलं आणि परकं ते परकं.' संदीपची आई अस्वस्थपणे म्हणाली.
"तुमच्यात काही दोष असता, तुम्हाला स्वत:चं मूल होऊ शकत नसतं तर गोष्ट वेगळी होती.पण तसंही काही नाही. शिवाय तुम्हाला ऑलरेडी स्वतःचं एक मूल आहे, आणि आता जर दुसरं मूल दत्तक घेतलं ,तर नकळत त्या दोघांमध्ये भेदभाव नाही का होणार? तूला कळतंय ना, मला काय म्हणायचंय..."संदीपचे वडील तार्किकपणे आपलं मत मांडत होते.
"बाबा,खरं सांगायचं तर माझी आता द्विधा मनस्थिती झाली आहे. लग्नाआधी जेव्हा सुजातानं मूल दत्तक घेण्याचं सामाजिक महत्व सांगितलं, याकडं आपण आधुनिक पिढीनं लोकसंख्या नियंत्रित ठेवण्याचा एक उपाय म्हणून बघितलं पाहिजे आणि याची सुरुवात आपण स्वतःपासूनच करायला हवी हेही सांगितलं तेव्हा ते मला पटलंही होतं. तिच्या 'हो' मध्ये मी 'हो' मिसळलं,पण आता ती वेळ समोर आल्यावर काय करायचं समजेनासं झालंय. सुजाता अगदीच ठाम आहे या निर्णयावर.. आणि एक मूल स्वतःचं आहेच. म्हणून हा निर्णय अगदी टोकाचा आहे,असं तिला वाटत नाही." संदीपनं आपली बाजू मांडली .
"हे बघ,एकतर तुम्ही दोघांनी हा निर्णय परस्पर घेतला, तेव्हा आम्हाला काही सांगितलं नाही. नाहीतर तेव्हाच आम्ही विरोध केला असता,मग भलेही लग्न मोडलं असतं तरी... "आईचं हे अगदी टोकाला जाऊन बोलणं लक्षात येताच संदीप तिचं वाक्य तोडत म्हणाला ,"आई,शांत हो.. या विषयामुळे आधीच आपल्या घरातलं वातावरण बिघडलंय .नकळत आपल्यात एक अबोला निर्माण झाला आहे.. सुजाता घरी असताना एकदा आपण सगळे मिळून चर्चा करू आणि काहीतरी मार्ग काढू. मग तर झालं?"
**************************************
संदीप,सुजाता, संदीपचे आई-वडील दिवाणखान्यात बसले होते. कितीतरी वेळ कोणी काहीच बोलले नाही. मग संदीपच्या वडिलांनी पुढाकार घेतला.
"हे बघ सुजाता,तुझं ते बाकी समाजकार्य वगैरे सगळं ठीक आहे, पण तुझा हा निर्णय चुकीचा आहे."
"एका निराधार जीवाला आधार देणं,यात काय चुकीचं आहे बाबा?आपण रस्त्यावरची बेवारस मुलं बघून हळहळतो ,अशाच एका अनाथ मुलीला दत्तक घेणं यात काय वाईट आहे?उलट या निर्णयाचं सर्वानी स्वागत करायला हवं." सुजाता शांतपणे म्हणाली.
"हे सगळं तत्वज्ञान ऐकायला चांगलं वाटतं,पण प्रत्यक्षात हे इतकं साधं नव्हे. शिवाय लोक काय म्हणतील, याचाही विचार करायला हवा. मुलाला जन्म देण्याऐवजी अशी बेवारस मुलं दत्तक घेणं म्हणजे दारातील पीडा घरात आणण्यासारखं आहे.चांगली नसतात असली मुलं. "सुजाताच्या सासूने आपला संताप व्यक्त केला.
"यात त्या बिचाऱ्या मुलांचा काय दोष आई?कोणीतरी जन्म देऊन त्यांना अक्षरक्ष: टाकून देतात. कोवळ्या मुलांना काय समज असते?.. आणि आई-बाप होणं म्हणजे फक्त मुलांना जन्म देणं इतकंच मर्यादित नसतं.मी लग्नाआधीपासून सामाजिक कार्य करतेय. त्याच कार्याचा भाग म्हणून अनेकवेळा मी अनाथाश्रमांना भेटी दिल्या आहेत. अशा अनाथ मुलांना पाहून गहिवरुन येते. त्या मुलांना हक्काचे आई-बाबा हवे असतात. . अगदी निरागस असतात ती मुलं, त्यांचं ते निरागस घाबरलेपण मी माझ्या नजरेनं टिपलंय. एकीकडं गर्भश्रीमंतांची मुलं जेवणात हवं ते नाही मिळालं म्हणून त्रास देतात,पण तिथं?बिचारी मुलं मिळेल ते निमूटपणे खातात,आनंदाने.पोट भरल्यानंतरचं खरं समाधान हे त्यांच्या चेहऱ्यावर बघावं. त्यांच्याकडे काही ऐषोराम नाही,कार्टून बघायला T.V नाही, मिरवायला फॅशनेबल कपडे नाहीत..तरी ती समाधानी असतात....आईच्या मायेपासून मात्र वंचित असतात. कधी रात्री ढगांच्या गडगडाटाचा आवाज आला की आपला दोन वर्षाचा आयुष्य झोपेत मला बिलगतो. ती मुलं कुणाला बिलगत असतील?झोपेत दचकून उठली तर त्यांना कोण आधार देत असेल? वेळ जात नसल्यावर, एकटं एकटं वाटत असल्यावर त्यांची कशी करमणूक होत असेल? त्यांना कोण गोष्टी सांगत असेल?" सुजाताच्या डोळ्यात अश्रू दाटले होते. ती पुढे बोलू लागली,
"एकदा मी तिथल्या मुलाला उचलून घेतले,तर इतर मुले मला पण घ्या म्हणून मागे लागली.त्यांना मायेचा स्पर्श खूप हवाहवासा वाटतो. आता दत्तक घेताना फक्त एका मुलीला दत्तक घेणं म्हणजे बाकीच्यांवर अन्याय केल्यासारखे वाटते कधीकधी ...पण तरी एका जीवाला खूप सारी सुखं देऊ याचा आनंद जास्त आहे. आमचा निर्णय पक्का आहे आई-बाबा,पण आमच्या या निर्णयात आम्हाला तुम्हीही हवे आहात.घर तोडून आम्हाला काहीही करायचं नाही. संदीपची थोडी कोंडी झाली होती,पण कालच आमचं बोलणं झालं तेव्हा पुन्हा तोही ठाम झालाय."
"हा निर्णय आता आमच्या दोघांचा आहे. सुजातानं माझ्यावर कुठलंही मत लादलं नाही, मी स्वतःहून या निर्णयात सहभागी आहे. अजून एक, आयुष आणि दत्तक मुलीमध्ये आम्ही कुठलाही भेदभाव करणार नाही." संदीपही भावनिक झाला होता.
अजूनही संदीपच्या आई-वडिलांना हे पूर्णपणे मान्य नाही, हे त्यांचा चेहराच सांगत होता. पण आता संदीप आणि सुजाता दोघंही ठाम आहेत म्हटल्यावर,त्यांनाही हा निर्णय मान्य करावा लागेल, अशीच परिस्थिती निर्माण झाली होती.
तसंही प्रत्येक टप्प्यावर संयमी बनून पटवून द्यायला सुजाता होतीच..