त्याची गोष्ट
त्याची गोष्ट


आज त्या घटनेला वीस वर्षापेक्षा जास्त काळ लोटला आहे, पण ती घटना हृदयाच्या एका कप्प्यात आठवण म्हणून बंदिस्त आहे...
मी गणित विषयाचा प्राध्यापक.बांद्रयाला माझा गणित विषयाचा आठवी -नववी- दहावीचा कोचिंग क्लास होता. एकदा दहावीची बॅच चालू असताना एक पालक मला भेटायला आल्याचं माझ्या रिसेपशनिस्टने मला सांगितले.बॅच संपवून मी त्यांना भेटायला आलो.त्या पालकांसोबत त्यांचा एक ८-९ वर्षाचा मुलगा होता .माझं त्याच्याकडे लक्ष वेधलं गेलं.त्याच्या बोलक्या डोळ्यात जणू जगाप्रती असणारी प्रेमळ दृष्टी सामावली होती.
"सर, तुमच्याकडे कोणत्या वर्गाचे क्लास चालतात? " त्याच्या आईने मला विचारलं.
"मी आठवी आणि त्या पुढच्या वर्गाचेच कलासेस घेतो." मी उत्तर दिले तेव्हा त्यांच्या मुलाच्या वर्गासाठी मी क्लास घेत नाही म्हणून त्यांच्या चेहऱ्यावर थोडीशी नाराजी दाटली.
"आमचा हा मुलगा आरव तिसरीला आहे, त्याला तुमच्या क्लासमध्ये शिकायला घ्या ना.हवं तर त्याला मोठ्या मुलांसोबत बसवा. "त्याचे वडील लगेच पुढे म्हणाले.
"या वर्गाचा मी क्लास घेतच नाही, माझ्याकडे आठवीच्या वर्गापासूनच क्लासेस असतात .आणि त्याला मोठ्या मुलांबरोबर बसवून त्याच्याकडे नीट लक्षही देता येणार नाही." मी.
" सर, तुम्ही प्लीज त्याला शिकवा ना...खरं तर त्याला शाळेतून काढलं आहे आम्ही...त्याचा थोडासा प्रॉब्लेम आहे, तो एके ठिकाणी सलग बसू किंवा तग धरू शकत नाही. .." त्याच्या वडिलांच्या या बोलण्याचा नीटसा अर्थ मला कळाला नाही.
"पण तरीही..." मी काही बोलणार इतक्यात त्या मुलानेच,आरवने ओळख-देख नसताना माझा हात धरला....त्याच्या स्पर्शाने मला आपलंसं केलं.माझ्या बोलण्याला,शंकांना काहीही न बोलता त्या स्पर्शाने स्थगिती दिली. मी त्याच्याकडे बघितले तर प्रेमाने भरलेले त्याचे डोळे माझ्याकडे पाहत होते.
'याला सलग एके ठिकाणी बसता येत नाही? हे कुठल्या व्यंगाशी निगडित आहे का?' माझ्या मनातला हा प्रश्न मी नंतर वेळ येईल तेव्हा त्याच्या पालकांना विचारायचं ठरवलं. आरवला मी क्लासमध्ये शिकवायला तयार झालो.
दुसऱ्या दिवशी आरव क्लासला त्याच्या जुन्या शाळेचा युनिफॉर्म घालून आला आणि मला त्या गोष्टीची गम्मत वाटली.त्याला मी नववीच्या मुलांसोबत बसवलं आणि काही सोपी गणितं सोडवण्यासाठी दिली.त्याने ती लगेच सोडवली.नंतर मी त्याला जी छोटी- मोठी गणितं शिकवू लागलो, ते तो लक्षपूर्वक सोडवू लागला.मला समाधान वाटले.
तो नियमित क्लासला येऊ लागला.त्याच्या कितीतरी गोष्टींचं मला कौतुक वाटू लागलं. वय लहान असूनही तो क्लासमध्ये शांतपणे बसायचा.गणितं एकाग्रपणे सोडवायचा.नवीन काहीतरी शिकवत असताना डोळे मोठे करून एकटक बघत ऐकायचा.
सलग आठ-नऊ दिवस तो क्लासला आला आणि मग एकदा त्याच्या वडिलांनी त्याच्या जवळ एक चिट्ठी दिलेली त्याने मला दाखवली, "महत्वाच्या कामामुळे आरव पुढचे दोन दिवस क्लासला येऊ शकणार नाही." मी त्याची नोंद घेतली आणि नंतर दोन दिवस आरव आला नाही.नंतर तो आला आणि परत आठ दिवसांनी त्याच्या वडिलांची तशीच चिट्ठी आली. असे दर आठ दिवसाला होत राहिले..दर आठ दिवसानंतर तो दोन दिवस क्लासला यायचा नाही,म्हणून मी एकदा दोन दिवस गैरहजर राहण्याची चिट्ठी आणल्यावरआरवलाच कलासमध्ये याबद्दल विचारले... तेव्हा तो म्हणाला,
"सर,अधून-मधून मला KEM हॉस्पिटल ला नेतात ना..तिथे माझं पूर्ण रक्त बदलतात.मग नंतर मला खूप थकवा येतो.म्हणून मला क्लासला येता येत नाही." क्षण-दोन क्षण मला काहीच कळलं नाही, आणि नंतर माझं हृदय धडधडू लागले...तो निरागसपणे सांगत होता, आपल्याला कोणता आजार झाला आहे हे त्याला काहीच माहित नव्हते..मला मात्र त्याच्या बोलण्याने आजाराबद्दल अंदाज आला.
त्या दिवशी त्याचे वडील त्याला न्यायला येतील तेव्हा त्यांना मला सविस्तर विचारायचं होतं,परंतु ते आले तेव्हा मी नेमका दुसऱ्या वर्गावर शिकवत असल्याने ते बाहेर बसलेल्या आरवला घेऊन गेले आणि गडबडीत मीही रेसेपशनिस्टला 'त्याचे वडील आल्यावर मला वर्गावर येऊन सांग' हे सांगितले नव्हते.
पुढच्या दोन दिवसांनंतर तो क्लासवर येईलच म्हणून मी त्याचे घर शोधायची तसदी घेतली नाही,त्यावेळी मोबाईलची सुविधाही नव्हती.मात्र यावेळी दोन दिवसाचे ८ दिवस झाले तरी तो आला नाही,त्यामुळे मला बैचेन वाटू लागले. क्लासवर शिकवताना सारखा तो समोर दिसू लागला. गणितं सोडवतानाचा त्याचा चपळपणा आठवू लागला..नक्की त्याला कुठला आजार आहे याबद्दलही व्यवस्थित समजले नव्हते.
इतके दिवस झाले तरी तो आला नाही म्हणून शेवटी काहीही करून त्याचे घर शोधून तिकडेच जाण्याचा मी विचार करू लागलो,मात्र काही दिवसातच त्याचे आई-वडील क्लासवर मला भेटायला आले.त्यांच्याबरोबर आरव नव्हता. माझ्या श्वासाची गती रुंदावली.त्यांच्या समोर गेल्यावर मला काहीच विचारायचे धाडस होत नव्हते.त्याची आईच स्वतःहून म्हणाली,
" सर,आता आरव कधीच क्लासला येऊ शकणार नाही...." चेहऱ्यावर निर्विकार भाव. तिच्या या म्हणण्याचा नेमका अर्थ काय?
"सर, त्याला ब्लड कॅन्सर झाला होता, शाळेत त्याला सलग बसता येत नव्हते.म्हणून काही काळ विश्रांतीसाठी त्याला शाळेतून काढून टाकावे लागले. पण खरं तर त्याला शिकण्याची खूप हौस होती.म्हणून मग काही काळ एखादा क्लास लावायचे आम्ही ठरवले आणि तुमच्याकडे आलो.इकडे आल्यावर तो इथे रुळून जायचा. त्याचा त्रास काही काळ विसरून जायचा. झालं ते पचवणं अजूनही जड जातंय. पण तुमच्यामुळे त्याचे शेवटचे दिवस त्याच्या मनासारखे गेले.शेवटच्या दिवसातली शिकण्याची हौस पूर्ण झाली." अश्रू थोपवता थोपवता त्याचे वडील अक्षरशः दोन्ही हात जोडून खाली बसले.त्याची आई मला त्या मानाने खंबीर दिसत होती,
तिच्याही डोळ्यात माझ्याबद्दल कृतज्ञता होती.
...त्याच्या वडिलांना आधार देता देता, हसता खेळता आरव मला डोळ्यासमोर दिसू लागला आणि अश्रूंनी आपली वाट माझ्या डोळ्यातून मोकळी केली....
माझ्या छोट्याश्या कृतीने आरवचे शेवटचे दिवस समाधानात गेले, याचा मला सार्थ आनंद वाटतो.आज इतक्या वर्षांनंतरही जीवनाच्या रहाटगाडयात जेव्हा आरवची क्लासमधील एक एक गोष्ट आठवते,तेव्हा मला दगदगीतून विसावा मिळतो, मी डोळे नकळत मिटतो...मग अश्रूही गालावर आनंदाने ओघळलेले असतात...