वॉटर बॉटल
वॉटर बॉटल


अगदी शाळेत असल्यापासूनचं मिताला नवीन वस्तूंचे फार आकर्षण होते. ती लहान असताना दरवर्षी तिला शाळा सुरू झाल्यावर नवीन स्कूल बॅग, नवीन वॉटर बॉटल, नवीन टिफिन लागत असे. जर तिला हे सर्व नाही घेऊन दिले तर ती तिच्या बाबावर नाराज होत असे. आईविना पोर ती. त्यामुळे तिचा बाबा तिचे सगळे हट्ट पुरवत असे. हो, मिताची आई ती ५ वर्षांची असताना कॅन्सर या आजाराने हे जग सोडून गेली.
तिच्या बाबाला सगळ्या नातेवाईकांनी समजविले की, “तू दुसरे लग्न कर. मिता अजून खूप लहान आहे आणि तिला आईची गरज आहे.” पण मिताच्या बाबाला हे मान्य नव्हते. त्यामुळे त्या दिवसापासून तोच मिताची आई आणि बाबा दोन्ही झाला होता. एकटी मुलगी असल्यामुळे मिता थोडी लाडावलेली होती. पण तरीही तिच्या बाबाने तिला योग्य ते संस्कार देण्याचा प्रयत्न केला होता.
आज तिच्या कॉलेजचा पहिला दिवस होता. त्यामुळे नेहमीप्रमाणे मिताच्या बाबाने तिला नवीन वॉटर बॉटल आणि टिफिन घेऊन दिला. मिता हे पाहून खूप खुश झाली. तिला वॉटर बॉटल खूपच आवडली. काही दिवसातच ती तिची फेवरेट बॉटल बनली.
एके दिवशी काय झाले तर, कॉलेजमधून घरी येताना एक गोष्ट घडली. मिता ट्रेनची वाट बघत थांबली असताना तिला एक १०-११ वर्षांची मुलगी प्लॅटफॉर्मवर बसलेली आढळली. मळकट व फाटलेले फ्रॉक, तसेच कित्येक दिवस आंघोळ केली नसेल तसा चेहरा, विस्कटलेले पण त्यातही जमेल तशी वेणी घातलेले केस. एकदंरीत तिचा पेहराव असा होता. तिच्या हातात कसलीतरी पिशवी होती. तेवढ्यात ट्रेन आली. मिता ट्रेनमध्ये चढली. त्याबरोबर ती मुलगीदेखील त्याच ट्रेनमध्ये चढली. दुपारची वेळ असल्यामुळे ट्रेनमध्ये गर्दी कमी होती. ती मुलगी क्लिप विक्रेती होती. ती ओरडून तिचे क्लिप्स विकण्याचे काम करत होती. एका बाईने तिच्याकडून काही क्लिप्स घेतले. ती मुलगी त्या बाईकडून पैसे घेत असताना तिची नजर मितावर गेली. मिता तिच्या नवीन वॉटर बॉटलमधून पाणी पीत होती. कदाचित त्या मुलीच्या घशालासुद्धा कोरड पडली होती. तिने लागलीच मिताकडे पाणी मागितले. मिताच्या वॉटर बॉटलमध्ये अजूनही बर्यापैकी पाणी शिल्लक होते. मिताला काय करू हे सुचत नव्हतं. पण तिला त्या लहान मुलीची दयापण आली. मग तिने अजून काही विचार न करता त्या मुलीला पाणी पिण्यासाठी तिची नवीन वॉटर बॉटल दिली.
ती मुलगी बाटलीला तोंड न लावता पाणी पिण्याचा प्रयत्न करत होती, पण तिला ते काही केल्या जमत नव्हते. मग मिताने तिला तोंड लावून पाणी पिण्यास सांगितले आणि ही बॉटल तुलाच ठेव म्हणजे हवे तेव्हा तुला ह्या बॉटलमध्ये पाणी भरून पिता येईल हेदेखील ती म्हणाली. ती मुलगी काहीतरी मोठं मिळाले ह्या आनंदाने खूप खुश झाली. मिताला थोडे वाईट नक्की वाटले पण तरीही कोणालातरी मदत केल्याचे समाधान आज तिच्या चेहऱ्यावर होते.
तिने घरी आल्यावर तिच्या बाबाला आज घडलेली सगळी हकीकत सांगितली. तिच्या बाबाला मिताचा खूप अभिमान वाटला. तसेच आईविना मुलगी वाढवूनपण तिच्यावर योग्य संस्कार झाले ह्याचेही कौतुक वाटले.
दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे मिता कॉलेजला गेली. तर त्या दिवशी येताना ती सेम मुलगी तिच्या ट्रेनमध्ये होती. त्या मुलीने मिताकडे बघून स्माईल केले आणि तिच्या हातात पेपरमध्ये गुंडाळलेले एक पाकीट दिले व ती मुलगी म्हणाली, “ताई, तुम्ही कोणताही विचार न करता मला पाणी देवून माझी तहान भागवलीत आणि ही इतकी महाग पाण्याची बाटली ही दिलीत. पण मी ही बाटली फुकट कशी घेऊ. म्हणून तुम्हाला माझ्याकडून एक छोटीशी भेट. प्लीज नाही म्हणू नका” असे म्हणून ती मुलगी दुसऱ्या स्टेशनला उतरून गेली.
मिताने ते पाकीट उघडून पहिले तर त्यामध्ये वेगवेगळ्या रंगाचे ४ क्लिप्स होते. मिता मंद हसली आणि याच विचारात ती घरी आली आणि पाहते तर काय तिच्या बाबाने अगदी सेम तशीच वॉटर बॉटल मितासाठी आणली होती.