वॉलपेपर
वॉलपेपर
"निमा, वैशाली काकूंना फोन केलास का? आणि चंदर दादा आणि वहिनीला?" पाहुण्यांची यादी तपासत सुमेर म्हणाला.
"हो. मी केला." निमा उत्तरली.
"अजून कोणाला बोलवायचे राहिले तर नाही ना? तू एकदा ही यादी पाहून घे. मग आई-बाबांना पण यादी दाखवतो." सुमेर म्हणाला.
"हो बघते." असे म्हणत निमा यादीतील नावे वाचते आणि एक-दोन नावे त्यामध्ये अजून लिहिते आणि नावांची यादी सुमेरच्या हातात देत म्हणते, "सुमेर, मी पार्लरमध्ये जाऊन येते, येईन एक-दोन तासांत.”
“ओहो, पार्लर काही खर नाही बाईसाहेबांचे”, असे म्हणत सुमेर तिला जवळ ओढतो. पण निमा त्याला ढकलून पळतच खोली बाहेर निघते.
आज सुमेर आणि निनाच्या लग्नाचा पाचवा वाढदिवस आणि त्याचबरोबर त्यांच्या नवीन घराचा गृहप्रवेश सुद्धा आजच. निनाने अगदी मनापासून त्यांचे नवीन घर सजवलय.
सुमेर आणि निना ह्या दोघांचे पाच वर्षांपूर्वी अरेंज मॅरेज झाले होते. ज्यावेळी ह्या दोघांचे लग्न ठरले अगदी त्याच वेळेला सुमेरचे नशीब बदलले आणि त्याला त्याच्या नोकरीत प्रमोशन मिळाले होते.
हा निनाचा पायगुणचं तर होता!! असो.
तर झाले असे की, त्यावेळेला सुमेर त्याच्या फॅमिलीबरोबर वन-रूम किचनच्या चाळीतल्या छोट्या घरात राहायचा. त्या चाळीतल्या छोटीश्या खोलीत सुमेर, सुमेरचे आई-बाबा आणि त्याचा छोटा भाऊ राजीव राहायचे आणि आता लग्नानंतर निनासुद्धा त्या घरात राहायला लागली.
राजीवला ही समजत होते की, त्याच्या राहण्याने दादा-वहिनीला एकांत मिळणे कठीण होते.
म्हणून सुमेरचे लग्न झाल्यावर काही महिन्यातच त्याने त्याचे बस्तान पुण्याला हलविले आणि तो तिथेच हॉस्टेलवर राहायला लागला. सणा-सुदीला एखादं दिवशी तो घरी येत असे.
तो छोटा मोठा पार्ट-टाइम जॉब करून त्याचे पुढचे शिक्षण पूर्ण करत होता. तसे पण सुमेरची मदत त्याला होतीच म्हणा.
सुमेर आणि निना गेली पाच वर्षे रोज किचनमध्ये झोपत असतं. तीचं आता त्यांची बेडरूम होती. तिथेच त्या दोघांनी त्यांच्या भावी आयुष्याची स्वप्ने रंगवली होती आणि आज त्या दोघांच्या मेहनतीने ती पूर्ण पण होतं होती.
त्या मेहनतीचे फळ म्हणजे आज सुमेरने पॅराडाइस अपार्टमेंट मध्ये दोन खोल्यांची प्रशस्त जागा घेतली होती.
ह्या पाच वर्षात खूप काही बदलले होते. राजीवला चांगली नोकरी मिळून त्याने पुण्यातचं सेट्ल व्हायचे ठरविले होते. त्याने पुण्यात स्वत:साठी तात्पुरते भाड्याने घरसुद्धा घेतले होते.
तसेच त्यांचे चाळीतले घर आई-बाबा असे पर्यंत भाड्याने द्यायचे असे सगळ्यांचे एकमत झाले होते. अर्थात, आई-बाबा सुमेरकडे राहणार होते.
आज घरात संध्याकाळच्या पार्टीची लगबग होती. हळूहळू पाहुणे यायला सुरुवात झाली होती. घरातले सगळेजण तयार होऊन निनाची वाट पाहत होते. इतक्यात, निना पार्लरमधून तयार होऊन आली. सुमेर तर तिला पाहताच राहिला. त्याला त्यांच्या लग्नाचा दिवस आठवला. इतका साज-शिंगार तिने त्याच दिवशी केला होता. लग्नाची पाच वर्षे सरकन त्याच्या डोळ्यासमोरून गेली आणि सुमेरचे डोळे पाणावले.
निनाने खुणेनेच “काय झाले?” असे सुमेरला विचारले व त्याने “काही नाही” असे खुणेनेच तिला उत्तर दिले.
सगळा कार्यक्रम ठरल्या वेळेप्रमाणे आटपला. सगळ्यांना सुमेर आणि निनाचा हेवा वाटत होता. सुमेरचे आई-वडील आज दोघांची तारीफ करताना आणि ऐकताना धन्य झाले होते. आज खऱ्या अर्थाने निनाने तिच्या स्वत:च्या घरात गृहप्रवेश केला होता. तिला खरंच भरून पावले होते.
निनाला निसर्गचित्र फार आवडायचे म्हणून तिने तिच्या खोलीत निसर्गचित्राचा वॉलपेपर लावला होता. अगदी बेडरूममध्ये शिरल्यावर समोरच दिसायचा तो. त्यामुळे कधी कधी असा भास होई की, त्या भिंतीपलिकडे ही एखादे नवीन जग असेल. कधी कधी ती त्या निसर्गसौंदर्यात इतकी हरवून जायची की, मग तिला वाटे की, खरचं अशी जागा कुठे असेल का?
ती नेहमी याबद्दल सुमेरला सांगत असे. असेच काही महीने गेले. नवीन घरात सगळेजण स्थिर स्थावर झाले. लग्नानंतर सुमेर आणि निना एकटे असे कुठेच फिरायला गेलेचं नव्हते. कुठे गेलेच तर कुटुंबाबरोबर. नाहीतर मित्र-मैत्रिणींबरोबर एखाद्या सहलीला. निनाने ही कधी सुमेरकडे एकटे कुठे लांब फिरायला जाण्याचा हट्ट नाही केला.
पण आता मात्र सुमेरला निनाला खूप सुखात ठेवायचा होते. कारण त्याने बघितले होते, इतक्या वर्षात निनाने किती काटकसरीने संसार केला होता.
सुमेरने आई-बाबांना काही दिवसांसाठी निनाला मुंबई बाहेर फिरायला घेऊन जाण्याची कल्पना सांगितली. त्यांना ही ती आवडली. पण सुमेरला निनाला सरप्राइज द्यायचे होते म्हणून हा विषय कोणीही घरात बोलायचा नाही असे ठरले.
रात्री झोपताना सुमेर निनाला म्हणाला, “निना तुला ८-१० दिवसांची सुट्टी काढता येईल का ऑफिसमधून? आपण जरा कुठेतरी फिरायला गेलो असतो.”
“बापरे, चक्क ८-१० दिवस? इतके कुठे आपण जाणार आहोत.” निना म्हणाली.
“अगं विचार करतोय गावी जाऊया आणि मग जमले तर पुढे कोकणात फिरून येऊया. काही दिवस गोव्याला ही राहुया तेवढाच चेंज.” सुमेर म्हणाला.
“ठीक आहे. बघते मिळते का?” असे म्हणून निना झोपी गेली.
दुसऱ्या दिवशी निनाने ऑफिसमध्ये सुट्टीसाठी अर्ज दिला. काही दिवसात तिची सुट्टी मंजूर झाली.
आज निना ऑफिसमधून लवकर घरी आली. कारण दुसऱ्या दिवशी पहाटेची ट्रेन होती. व्यवस्थित पॅकिंग करायला वेळ मिळावा म्हणून ती आज जरा लवकर घरी आली होती.
पण घरी येऊन पाहते तर काय? सुमेरने सर्व बॅगा आधीच भरून ठेवल्या होत्या. निनाला खूपच आश्चर्य वाटले.
निनाला फक्त सुमेरबरोबर निघायचे होते. रात्री लवकर जेवण उरकून ती दोघे झोपली. सकाळी ठरल्या वेळेप्रमाणे दोघेही आई-बाबांचा निरोप घेऊन प्रवासाला निघाली. सुमेर आधीच खाली उतरला होता. निनाला वाटले रिक्शा आणायला गेला असेल. ती पण त्याच्या पाठोपाठ बिल्डिंगखाली उतरली. तर समोर टॅक्सी उभी होती. सामान जास्त असल्यामुळे टॅक्सी आणली असे सुमेरने निनाला सांगितले.
मग दोघेही टॅक्सीमध्ये बसले. काही वेळात निनाच्या लक्षात आले की, स्टेशन तर पाठीच राहिले. मग आपण जातोय कुठे? सुमेरने निनाला गप्प केले आणि काही वेळात टॅक्सी विमानतळावर थांबली.
निना पार गोंधळून गेली होती. सुमेरने तिला शांत राहायला सांगितले. मग चेकिंग वगैरे सगळे झाल्यावर ते वेटिंग लॉबी मध्ये बसले. इतक्यात श्रीनगर फ्लाइटची घोषणा झाली. ती मुंबई-दिल्ली-श्रीनगर अशी फ्लाइट होती.
“श्रीनगर!!” निना पुटपुटली.
सुमेर मंद हसला आणि म्हणाला, “हो, आपण श्रीनगरला जातोय म्हणजेच काश्मीरला.”
निनाला विश्वास बसत नव्हता.
तिचा पहिला विमान प्रवास आणि तो पण काश्मीरला!!
खरे सरप्राईज तर पुढे होते!!
निनाचा विमानप्रवास खूप मजेत गेला. सगळीकडे सफेद ढगांची चादर अंथरली होती. ते दृश्य पाहून निना भारावून गेली. काही तासात ती दोघं श्रीनगरला पोहोचली. पण ती व्हाया फ्लाइट असल्यामुळे त्यांना पोहचेपर्यंत संध्याकाळ झाली. सुमेरने प्रवास कंपनीकडून पॅकेज घेतल्यामुळे त्यांना न्यायला गाडी आली होती आणि त्याचं गाडीने आता ७-८ दिवस ती दोघं प्रवास करणार होती.
गाडी काही तासातचं हॉटेलवर येऊन पोहोचली. प्रवासाने दोघे इतकी दमली होती की, जेवून ती दोघं झोपी गेली. सकाळी सुमेर लवकर उठला. निना अजूनही झोपून होती.
आज कितीतरी दिवसांनी ती इतकी शांत झोपली होती. सुमेरे तिच्या निरागस चेहऱ्याकडे पाहतच राहिला. तेवढ्यात निनाला जाग आली. सुमेरने तिला गच्च मिठीत घेतले आणि त्याने तिचे डोळे बंद केले आणि तो तिला रूमच्या बाल्कनीत घेऊन आला.
मग त्याने तिचे डोळे उघडले. काही क्षणभर समोरचे दृश्य पाहून निनाला तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. तिने डोळे चोळले आणि पुन्हा पाहिले. तिच्या आनंदाला पारावर नव्हता. तिच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. तिने सुमेरला गच्च मिठी मारली.
“थॅंक यू” हा शब्द ही त्या क्षणासाठी खूप छोटा होता.
अहो, कारण पण तसंच होतं ना!! ते समोरचे दृश्य पाहून अजूनही निनाला तिच्या बेडरूम मधला “वॉलपेपर” पाहत असल्याचा भास जो होत होता.
समाप्त