Preeti Sawant

Drama Tragedy Inspirational

3  

Preeti Sawant

Drama Tragedy Inspirational

बंदिवान मी या संसारी (अंतिम भाग )

बंदिवान मी या संसारी (अंतिम भाग )

3 mins
276


लवी संध्याकाळी ४ वाजता तिच्या ट्युशनला निघून गेली. लताच्या शेजारी सीमा राहायची. तिची मुलगी लवीपेक्षा एका वर्षाने मोठी होती. लवी आणि सीमाची मुलगी काया ह्या एकत्र बसने जात असत.


सीमाला लताची रोजची धावपळ माहीत होती म्हणून तीच रोज लवीला शाळेच्या बसमध्ये बसवत असे आणि दुपारी आणायला ही जात असे. ट्युशनला सुद्धा तीच सोडत असे आणि आणत असे. काया सुद्धा लवी जात असलेल्या ट्युशन मध्ये जात होती.


सीमामुळे लताला थोडा तरी निवांत वेळ मिळत असे. सीमाला जर कधी वेळ नसला तर लता दोघींना शाळेच्या बसमध्ये बसवून मग दुपारी घरी आणत असे.


संध्याकाळचा चहा आटपून लता रात्रीच्या जेवणाला लागली. रवी रोज रात्री ८ वाजता कामावरून येत असे. त्याला घरी आल्यावर गरमागरम जेवण जेवायची सवय होती. ही सवय त्याच्या आईनेच त्याला लावलेली म्हणा. पण नवऱ्याच्या प्रेमापोटी लताला ती पूढे चालू ठेवावी लागली.


त्यामुळे लताला जास्त माहेरी जाता येत नसे. ती फक्त रक्षाबंधन दिवशी वर्षातून एकदाच माहेरी जात असे. दिवाळसणाला सुद्धा तिला माहेरी जायला परवानगी नव्हती. त्यामुळे दर दिवाळसणाला तिच्या माहेरची माणसे तिच्या घरी येत असत. तितकाच काय तो तिला चेंज मिळत असे.


तसे पण ती रवी शिवाय कुठेही फिरायला जात नसे. तिच्या मैत्रिणी तिला नेहमी बोलवत असत पण तिला घरच्या रामरगाड्यात कुठेही जायची उसंत नव्हती.


भाजी आणि बाकीचे किरणामाल सासू सासरेच भरायचे. त्यामुळे त्यासाठी सुद्धा तिला बाहेर जायची गरज नव्हती. ती म्हणजे घर एके घर. तिचा सगळा वेळ घरातले सगळे करण्यातच निघून जायचा.


कधीतरी विकेंडला लवी साठी म्हणून रवी, लता आणि लवी मॉलमध्ये किंवा सिनेमा बघायला जात असत. पण ते पण फार क्वचितच. ते ही रात्री दहाच्या आधी त्यांना घरी परतावे लागे. कारण दहाच्या आत घरात हा त्या घराचा नियम होता.


असो, लता कधी कधी व्हाट्सएपवर तिच्या मैत्रिणींचे मुक्तहस्तपणे जगणारे फोटोज बघायची. तेव्हा तिलाही असेच स्वच्छंदपणे बागडायचे मन करायचे.

तिला फिरायची खूप हौस होती. पण रवीच्या एकट्याच्या पगारात काय काय होणार. मग जिथे रवी नेईल तिथे फिरायला जाऊन ती खुश होत असे.


कधी कधी तिला वाटे. बस झालं हे सगळं. सगळे सोडून कुठेतरी मी निघूनच जाते. शेवटी आपण एकटे या जगात येतो आणि एकटेच या जगातून जातो. पण जेव्हा लवीचा चेहरा तिच्या डोळ्यांसमोर येई. तेव्हा तो विचारही पुसला जाई.


कारण नाव ठेवण्यासारखं असं काहीही नव्हत तिच्या संसारात. सासरे प्रेमळ होते. ते लताला तिच्या सासूची नजर चुकवून थोडीफार कामात मदत करीत असत. सासू थोडी कडक होती. पण शेवटी तिला घरावर तिची पकड मजबूत ठेवायची होती म्हणून तिची थोडी भीती सगळ्यांना असावी म्हणून ती असे वागत असे. पण यामध्ये मरण लताचे होई. सगळे करूनही तिला एखाद्या थोडक्या चुकीसाठी किंवा कधी कधी उगाचच बोलणी खावी लागत आणि नवऱ्याच्या प्रेमामुळे ती उलट उत्तर सुद्धा करत नसे. त्यामुळे कधी कधी ती बरोबर असूनही ती चुकीची ठरत असे. त्यामुळे तिची आतल्याआत घुसमट होत असे.


लताचा नवरा तिच्यावर खूप प्रेम करायचा. पण आई-वडिलांना खुश ठेवण्याच्या नादात तो कधी कधी लताला दुखवत असे. लताच्या मताचा तिच्या सासरी आदर नव्हता. ना ती घरात काही तिच्या आवडीची नवीन वस्तू आणू शकत होती ना घरामध्ये बदल करू शकत होती.

त्यामुळे ती तिच्या संसारी बंदिवान झाली होती.


लतासारख्या जगणाऱ्या अशा कित्येक स्त्रिया असतील. घुसमट ही होतच असते. पण जर नवरा प्रेम करणारा असेल. काय हवं काय नको ते बघणारा असेल तर ह्या स्त्रिया त्याच्यासाठी सगळं काही त्यागायला तयार होतात. अगदी स्वतःची स्वप्ने सुद्धा. चेहऱ्यावर खोटं हसू आणत ते जीवनभर त्यांचा संसार करतात.


ह्या अदृश्य बेड्या त्यांना हवं तर त्या तोडू ही शकतात. पण त्यांना तसं जगण्याची सवय झालेली असते. त्यामुळे मनात असून सुद्धा त्या त्यांचे जीवन जगतात.


~समाप्त~


(ही कथा कशी वाटली हे कॉमेंट्सद्वारे नक्की कळवा. ही कथा आवडल्यास तिला जास्तीतजास्त शेअर करा. धन्यवाद)

©preetisawantdalvi



Rate this content
Log in