Turn the Page, Turn the Life | A Writer’s Battle for Survival | Help Her Win
Turn the Page, Turn the Life | A Writer’s Battle for Survival | Help Her Win

URMILA DEVEN

Drama

3.2  

URMILA DEVEN

Drama

लफडं ....द स्टोरी

लफडं ....द स्टोरी

12 mins
2.4K


"अग जरा दूर हो तिच्यापासून वांझ हाय ती बाय."


गावची पाटलीण आपल्या सुनेला सांगत होती. सुनबाई पदर सावरत काहीतरी घाणेरडं हाताला लागू नये, असं वागत रस्त्यातून बाजूलाच झाली.

वांझ हा शब्द ऐकताच मनांतल्या भावना दुखल्या मालूच्या आणि ती देवाला फुलं न वाहताच निघून आली.


रड रड रडली आणि तिच्या पोटात जरा कळ आली, लगेच लक्षात आलं तिच्या, आणि हाही महिना लाल झाला म्हणून ती ओक्साबोक्शी परत रडत होती. गेल्या वीस दिवसापासून वेशीवरच्या रायजा बाईने सांगितल्याप्रमाणे रोज पिवळे फुलं वाहत होती गावच्या देवीला. आणि आज तिने वाहिले नव्हते तोच कळा येवून पाळी आलेली. या विचारानेही त्रस्त झाली होती, "माह्या नाशिबानंच काय केलं कोणाचं कोण जाने माय? सारे देव पुजून झाले आता कोनचाच देव काही धावून येत नाही माह्यासाठी. पाटलीण बाईच्या पोराचं आताच तर लगन झालं! नाय..? आणि ती पोटुशी बिन हाय! मले का रे देवा बारा वर्षापासून वनवास देतं रे देवा......? आता तरी पाव. लोकं माले वांझ म्हणतत. नाही सहन होत रे माले."


जीवाचा आकांत करून मालू रडत होती, आज ती जेवलीही नव्हती. दिवसभर कुठंतरी बघत बसली होती. संध्याकाळ झाली होती. पक्षी किलबिल करत होते, सहज डोकावलं तर शेजारणीची शेळी अंगणातील झेंडूची पानं खात होती. तिथच कोंबड्या बाहेर टाकलेली डाळ खात होत्या. सकाळपासून घरातून बाहेर न निघाल्याने अंगणात कचरा झाला होता. अंगणातल्या चिंचेच्या झाडाची पानं पडली होती, क्षणभर त्या चिंचेच्या झाडाकडे बघत म्हणाली, "माह्या आंगणात हायस तू, पण कवा माले खावाची इच्छा होयल? गावातल्या नवीन नवीन नवऱ्या घेवून जातात पण म्या तुले नुसती पाणी टाकत रायतो..."


विचारातच होती तर गाईचं हंबरणं कानावर पडलं आणि लगेच भानावर आली, "ओव माय, माह्या चायनाले तर चारांच टाकला नाय ओ, बिचारी दोन जीवाची ओरडून राहिली कवाची."


जशी उठली तसंच तिच्या पोटात परत जोरात कळ आली, जरा पोटाला हात लावत बाहेर आली, शेजारणीच्या घराकडे बघत जरा हळू आवाजात ओरडली, "हुर्रू हुर्रू, काय माय हिच्या कोंबड्या माह्या घरचे दाने खाऊन चंगल्या टूम होततं आणि अन्डे ते खाते!"


मग विचारात पडत म्हणाली, "बर हाय बाई कोंबडीच्या जातीचं, रोज अंडा देते. पिलं सांभळून होत नाय तिले आणि मी कावं अशी?"


कंठ जरा अजूनच दाटला होता मालूचा तर अजून गाईचा हंबरडा सुरु झाला आणि चाऱ्याचं टोपलं घेवून चायना गाईकडे ती निघाली, तिला बघताच चायना मिरवल्यागत करत होती, मालूने तिला चारा टाकला आणि तिला हाताने सावरत म्हणाली, "पायजो माय तुही माह्यापासून दूर होशील? दोन जीवाची तू... तुलेही माहा बाट लागलं. गावातल्या बायका तसंच बोलत्यात, लय वाईट वाटते व मले. मले वांझ म्हणत व सार गाव...माही त सावली बिन सहन नाय करत पोटुश्या बाया." आणि परत रडायला लागली.


गावातल्या डॉक्टरने सर्व तपासणी करून तिला सांगितलं होतं कि तिच्यात काहीच दोष नाही म्हणून मग तेव्हापासून ती देवाला पुजायची. सासू तिला म्हणायची की, तुला कुठलाच देव पावणार नाही पण सासूचं म्हणनं तिला वाईट वाटायचं. दोन वर्षाआधी अशीच मालू तिच्या खोलीत रडत होती. पाळी सुरु झाल्यामुळे आणि नवरा वामन आणि आईत भांडण सुरु होतं. आणि त्याच रात्री सासूबाई अचानक देवाघरी निघून गेल्या. तेव्हापासून मालूला कुणी सांभाळायलाही नव्हतं. आज तिला सासूची खूप आठवण येत होती, का कुणास ठाऊक सासूबाई नेहमी त्या गावाच्या पलीकडल्या अनाथ आश्रमात मुलांना खेळताना बघण्यासाठी रोज जात असत आणि मालूला त्याचंही वाईट वाटायचं की आपण त्यांना नातू नाही देवू शकत. पण, स्वतःला समजवायची की कुणा कुणाला उशिर होतो आणि याच आशेने आज तिला बारा वर्ष झाली होती. मनात एक सल होती की सासू नातवाचं तोंड बघू शकली नाही.


रात्री सात वाजता वामन घरी आला, दारू पिवून होताच, दिवसभर विकून उरलेली वांगी आल्या आल्या घरात फेकली आणि खाटीवर पसरला. मालू गुमान ती फेकलेली वांगी उचलायला बसली तोच तिची गोरीशी पाठ त्याला दिसली आणि तो मालुच्या मागे लागला, त्या दारूच्या आणि घामाच्या वासात मालू आणखीनच कासावीस झाली. आणि ओरडली, "दूर व्हा नाही जमत मले, हात नका लावू मले, व्हा बाजूलं."


तिने असं म्हणताच वामन परत तिला ओढू लागला, "काय वं? तुयं हमेशाचंच हाय.. मले काही फरक पडत नाय.... " आणि त्याने तिचा पदर ओढला.


"अवो, नाही म्हणतात डॉक्टर, काय ते इन्फेक्शन का काय ते होते म्हणे. मग पोरं होत नाय!"


"ये चल मले ज्ञान नको देवू.. नाही पाहिजे माले पोरं बिर.. नुसती कट कट साली.. घरभर कल्ला!"


आणि परत तिला बोचून बोलला, "तू बंज्जर जमीन आहेस वं! तुही काही कूस उजळायची नाय. ये मले तुहा काय त फायदा होवू दे, बंज्जर साली, जबान चालवते! खानच बंद करीन तुय वालं."


आणि त्याने तिचं काहीच ऐकलं नाही, ओढलं तिला आणि पार पदर रक्ताळून टाकला. क्षणात घोरायला लागला, मालूने स्वतःला सावरलं आणि झोपेची वाट बघत पडून राहिली.


सकळी उठताही येत नव्हतं तिला. वेदना असह्य होत होत्या, पण काम करावं लागणार होतं. पहाटेच जावून चौकातल्या विहिरीतून दोन गुंड पाणी आणलं पिण्यासाठी, कारण जरा जरी तिला उशीर झाला आणि विहिरीवर बायका असल्या तर ती दूर उभी राहून तिचा नंबर येईपर्यंत वाट बघायची पण कुणी तिला मधात घुसू देत नव्हतं. आणि गावात त्याच विहीरीचं पाणी पिण्यासाठी गोड होतं. परत आज सासूची आठवण झाली तिला. सासू असती तर आपण तिच्या खोलीत गुमान झोपलो असतो आणि या नाराधमापासून वाचलो असतो या विचाराने कंठ फुटत होता तिचा.


निंबाची काडी तोडली आणि दात घासत चूल पेटवत होती तोच तिला रात्रीचं स्वप्न आठवलं, स्वप्नात सासूने तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि काहीच बोलल्या नाही. सूर्याचे किरण अंगावर पडले तशी ती स्वप्नाच्या अर्थाने मनात आनंदली, सासूचा आशीर्वाद असा स्वप्नाचा अर्थ घेत ती परत नवीन आशेने विचार करू लागली.


पाळीचे दिवस संपले होते. वाटत होतं, बारा वर्षाचा वनवास पुरा आता, या महिन्यात बारा वर्ष पूर्ण होईल लग्नाला. का कुणास ठावूक तिला मनातच वाटत गेलं की या महिन्यात ती नक्की पोटुशी राहील, रस्त्यावर खेळणारी मुलं बघून मनातच मुलाची कल्पना करत त्या मुलांचा मागे धावायची. बाजारात मुलांचे कपडे बघायची, सुंदर सुंदर टोप्यांना आणि मोज्यांना हात लावायची. ओल्या मातीचा वास घेवून बघायची. एखादी पोटुशी बाई रस्त्याने दिसली की मागून जावून तिच्या पाऊल खुणांवर पाय ठेवत चालायची... या आशेने की तीहि लवकर अशी कमरेला हात लावत चालावी म्हणून. आणि या जीवघेण्या वेदनेतून कायम बाहेर पडणार, ती वांझ नाही हे तिला सिद्ध करायला मिळणार या आशेने सुखावली होती. स्वतःला मालू प्रेग्नन्ट समजायला लागली होती.


लोकांच्या सांगा सांगी आणि तिला आता हेही कळत होतं की काहीच दिवस असतात, जेव्हा गर्भ राहू शकतो मग आता तिला वामनची ओढ ताड काहीच वाटत नव्हती. शरीराला दुखत असलं आणि मनाला बोचत असलं तरी हवंच असायचं, बाळाच्या इच्छेने सर्व सहन होत होतं. प्रत्येक वेळेस तिच्या मनात आशा असायची.


मी वांझ नाहीच ही धास्ती तिची कमी होत होती. घरात दुडूदुडू चालणारं बाळ स्वप्नात येत असायचं, मग मनात स्वप्नाचा महाल उभा करत विचारातच म्हणायची, "म्या वांझ नायच, रायल हा महिना मले, मग पायते म्या, सारे माह्याशी मानाने बोलत्याल. सातव्या महिन्याले म्या साऱ्यायले बोलवीन माह्या घरी, चल बाई, आतापासनंच कामाला लागते व माय. माह्या काही नवरा कामाचा नाय, काय बी करायचा नाय, अव माय, पाटलीण बाई बोलवलं मले तिच्या नातवाच्या बारशाले.. किती मज्जा येयल.. माहे सारे अरमान पुरे होयल आता." आणि ताडकन उठून कामाला लागायची.


त्या दिवशी ती आनंदाने अंगणातल्या चिंचेच्या झाडाकडे बघत कोवळ्या हिरव्या चिंचा मोजत होती. बादलीभर विहिरीतून पाणी काढलं आणि चेहऱ्यावर झोकलं, तारावरच्या लुगड्याच्या फडक्याने चेहरा पुसला. घरात जावून स्वतःचं तयार होण्याचं बोचकं आणि आरसा घेवून अंगणात आली आणि तिथेच कंगव्याने केस विंचरात आनंदात बसली.


वामन आज लवकर आला, तिला असं बघत म्हणाला, "काय वं, कोणाले पायतंस, येवढा नट्टा पट्टा करून राहिली.. काय लफडं चालू हाय का वं? नाही म्हटलं रोज अशी मरगडल्या वाणी रायतस न.. आज तुले काय वं झालं? चल चाय टाक माह्यासाठी आली मोठी पावडर लाली लावणारी!"


मालू उठली, आज तिला स्वतःचा आनंद घालवायचा नव्हता, नवरा असाच असतो हेच समीकरण ती बघून होती. मग गुमान वेणीला रबर बांधत आत गेली, चुलीवर आधीच भात मांडला होता, निवे बाहेर काढले आणि चहाचं पाणी ठेवलं, जवळच्या डब्यातून चम्मचभर पत्ती टाकली, आता साखर टाकणार होतीच तर, तोच चेहरा पुसत असलेल्या वामनला चुलीवर भाताचा गंज आणि शेजारी जेवनाचं ताट दिसलं, "कोण आलं होतं व घरात माह्या मागून, कोणाले माह्या कमाईचं जेवाले घातलस ताजं ताजं."


मालूने चहा गाडला आणि कप-बशी घेवून उभी होती तोच वामनने चहाचा कप खाली आपटला, चहा गरम होता आणि मालुच्या पायावर पडला, भाजलं तिला, साडी वर केली बघण्यासाठी तर वामनच लक्ष तिच्या पायातल्या एका तोरडी वर पडलं..


"तोरडी कुठं ह्या व तुही?"


आणि तो इकडे तिकडे बघू लागला तोच त्याला तोरडी पलंगावर पडलेली दिसली. दुपारी मनातल्या विचारांना जगताना मालू घर साफ करत होती, पलंगावर उभी झालेली तेव्हा ती तिथे पडली होती.


आता वामनने चुलीतली काडी उचलली आणि मालूला मारणं सुरु केलं.


आव, नका मारू.. असं म्हणत ती स्वतःला वाचवू लागली तोच कुणीतरी धावून आल्यासारखं बाहेरून आवाज आला, "आरे वामन, चालत नाही कारे, आज डाव खेळायचा हाय ना, सगळे जमले त्या वडाखाली, तुह्या घरचा टोर्च घेवून ये. मी ग्लास घेवून निघतोच."

वामनचा मित्र फाटकातून ओरडत होता, आणि वामनने काडी फेकली.


"आरे आलो, कापड बदलत होतो."


आणि मग मालूचे केस पकडत म्हणाला, "ये भवाने, लफडं कराचं नाय, आणि असलं तर निघाचं घरातून, तसंय तू काय कामाची नाय माह्या.. बंज्जर साली, जाय टोर्च शोध मले जायचं हाय, रात चाले बघतो तुले."


आणि तो टांगलेल्या शर्टातून पैसे काढून मोजू लागला. वामन घरात धिंगाणा करून निघून गेला होता. आणि मालू स्वतःला जपत घर साफ करत होती.  

वामन तिच्यापेक्षा वयाने दहा वर्ष मोठा, गावात हिरोगिरी करतच मोठा झाला, ह्या पोरीला टाप, तिला छेड काढ, हेच सुरु असायचं त्याचं. घरी १० एक्कर शेती मग वडिलांच्या मेहनतीच्या कृपेने लक्ष्मी नांदत होती घरात. एकटा एक आईच्या लाडाने वाया गेलेला. गावात रखु नावाची बाई नवीन राहायला आलेली, सुंदर, देखणी होती आणि वामनने तिला पार प्रेमात पाडलं होतं. तिच्या घरच्या फेऱ्या करायचा. लागलीच तिच्या नवऱ्याची जवळच्याच जिल्हा परिषदेच्या शाळेत बदली झाली, मग नवरा घरी यायला वेळ होत होता आणि आला तरी तो खूप थकलेला असायचा. रखुची शरीरिक मागणी तो पूर्ण करू शकत नव्हता. त्याने बऱ्याचदा रखुला म्हटलं की, बदलीच्या गावी राहायला जावू म्हणून पण रखु अडकली होती वामनमध्ये.


रखु आणि वामन दिवसभर रखुच्या घरी राहायचे आणि मज्जा करायचे. रखु वामनमध्ये एवढी गुंतली की तिला आता तिच्या नवऱ्याला सोडायचं होतं. पण भीतीपोटी ती वामनसोबत पळून गेली. गावात त्यांच्या लफड्याची भारी चर्चा होती. पण दोन वर्षाने घरी परतली, तिने नवऱ्याची माफी मागितली आणि सांगितलं की वामनने पळवून नेलं होतं. तिचा नवरा साधा भोळा मास्तर मग विरघडला आणि बायकोला नमला, वामनला शिवीगाळ करत बायकोला मिठीत घेतलं. रखु दोन वर्षभर वामनशी शरीरिक संबंध ठेवूनही ती पोटुशी झाली नव्हती. जे तिला हवं होतं त्याच्याकडून प्रेमाची निशाणी ते तिला मिळालं नव्हतं. आणि... गोष्ट तिच्या लक्षात आली. वामनवर तिने नको नकोशे आरोप केल्याने तोही चिडला आणि लफडं संपलं. रखुचा नवरा तिला घेवून बदलीच्या गावी निघून गेला आणि सहा महिन्यात रखु पोटुशी राहिली. ही गोष्ट वामनच्या आईला कळली होती. पण त्यांनाही खात्री नव्हतीच. आणि वामनला त्याच्या मर्दानगीवर खूप गर्व होता.


मालू गावातल्या गरीब घरची मुलगी होती आणि तिच्या वडिलांना पैसे देवून सासूने मुलाचं लग्न लावून दिलं होतं की, तो सुधारेल, पण सुधारणा दिसत नव्हती आणि मालूची कुसही भरत नव्हती. सुनेकडून अपेक्षा होती सासूला पण मनातल्या मनात खंत वाढत होती.


त्यांची, त्या दिवशी मुलासोबत झालेल्या बाचाबाचीत मनाने हाय खाल्ली होती त्यांच्या आणि  मनातल्या मनात युद्धाने शेवटी मरण आलं होतं.

आठवडा झाला होता पाळीची तारीख जावून, मालू रोज एक एक दिवस वाढतोय म्हणून खूप खुश होती. आता तिला भारी भारी आणि गरगरही वाटायला लागलं होतं. जेमतेम दहा दिवस वर झाले होते. आणि तिला चिंचा खाण्याची इच्छा झाली, अंगणात बसून मनसोक्त चिंचा खाल्ल्या आणि मग आम्ल वाढल्यामुळे उलट्याही झाल्या. उलट्या झाल्यामुळे ती अधिकच आनंदाने फुलून गेली, मनोमन पक्क झालंच होत तिच्या, पोटाला हात लावत दुपारी बोलत बसायची, "तुह्या चाहुलीने वांझपण पुसलं माय, आता तू न मी मजेत राहू, तुया बाबा बिन सुधरलं आता, त्याले बीन लडा लागलंच ना, आता लवकरच जायल मी गावाच्या सरकारी दवाखान्यात, तुया बाबाशी बोलयचं बिन हाय, पण आठ दिस झालेत तुहे बाबा घरला आले नाय, तालुक्यात गेले ना गहू विकाया, लय गहू झाला यंदा ...ओव माय तुह्याच पायगुण होय रे .. आता समदा ठीक होयल."


आणि ती स्वतःला सावरत उठली, पोटात जरा कळ आलेली, मग वाकतच घरात गेली, आता मालू बऱ्यापैकी राहायची. स्वतःला खूप जपायची, दिवस वाढत होते आणि कंबरेचा त्रास वाढत होता पण मालू खुश होती. स्तन ताठ व्हायला लागली होती मग आणखीनच आनंदाने फुलली होती. पंधरा दिवस वर झालेले आणि मालूचं शरीर जड झाल्यासारखं झालं होतं. अधूनमधून पोटात कडा यायच्या आणि प्रत्येक कडा मालूला बाळाची चाहूल देऊन जायची. 


इकडे, वामन तालुक्याच्या ठिकाणी गावाच्या ठेकेदारा सोबत दारूत मस्त होता. त्या दिवशी बाजारात उभा होता तोच समोरून रखु दिसली, कडेवर मुलगा आणि हात धरून एक मुलगी होती, हा जरा नशेत होता, तिच्याजवळ नशेतच गेला आणि म्हणाला, "अय, फुलराणी, विसरली का मले, चल ना आज तुले मज्जा देतो, नवरा नाय दिसत वाटते मग तर बरच हाय. तसाही येळपट हाय तो. ठेव तुहे पोर हिथ, चल त्या गोडामामदी."


रखु जरा अवघडली, एकटीच मुलांना घेवून बाजारात आली होती, क्षणभर समजलं नाही तिला. नंतर तो तिच्या अगदीच जवळ गेला आणि तिला ओढू लागला...


आता रखु ओरडली, "ये मुर्द्या, हे असलं बायकोवर दाखव, पोरं जन्माला घाल आधी मग सांग मज्जा मला. आला मोठा!"


त्याला जोराने धक्का देत ती निघून गेली. तिच्या धक्क्याने पडलेला वामन भूतकाळात शिरला, रखुच्या आरोपानंतर त्याने शहरात जावून स्वतःची तपासणी करून घेतली होती. आणि त्याला तो डॉक्टर आठवला ज्याने त्याला म्हटलेलं की, तू हवी तेवढी मज्जा कर पण बापपण तुझ्या वाटेला नाही. आणि तेव्हापासून त्या रिपोर्टला खोटं ठरवण्यासाठी वामनने काही बायकांना आणि मुलींना नादी लावून सोडलं होतं. प्रत्येक वेळेस बाया कोरड्या सुटायच्या मग लफडं उघडीस येत नव्हतं. एवढ्या मोठ्या लफडेबाजाच एक भल मोठ लफडं त्याच्या आज मनातून बाहेर आलं होतं. पडलेला तो कसा बसा उठला आणि घराकडे निघाला. आज राहून राहून आई आठवत होती.


आज मालूला वीस दिवस वर झाले होते आणि ती मनाने खूप खुश होती, दररोज वामनची वाट बघायची, आज ती परत सुंदर तयार झाली होती, म्हणाली, "आज हे आले का दवाखान्यात न्यायाले सांगतो, बातमी सांग्ल्यावर लय खुश व्हायले पाहिजे आता." स्वतःला आरश्यात नेहाळत होतीच तर वामन घरात शिरला, "काय व, कोणासाठी नट्टा पट्टा करतस, पाणी आन माह्यासाठी."


मालू लागलीच धावत गेली आणि पाणी घेवून सोमर उभी राहिली, उजव्या पायाचं बोट ती डाव्या पायाने दाबत म्हणाली, "आव, आता घरी दारू पिवून येत जावू नका बऱ. गर्भावर काय तो परिणाम होते म्हणे!"


तेवढ्यात तिला परत गरगरल्यासारखं झालं, पाय खेचल्यासारखे झाले, समोर अंधारी आली आणि ती खाली पडली, जरा मनातून सुखावत होतीच पण काळजीही होती तिला.


तिचे शब्द आणि तिला बघून वामन एकदम उठला, "ये भवाने, काय नवीन लफडं, तुले काही पोरं बिर होणार नाही माह्याकडून, कुठ गेलतीस? तोंड काळ कराले? का... "


आणि तो परत थांबून अजून जोराने बोलला, "वाटलाच मले, गरम गरम जेवाले घालतस आपल्या याराले.... "


आत त्याने तिचे केस धरलेत, "सांग कोणाचं हाय ते? माह्या माथे मारचं नाय.. निग माह्या घरातून...."


ओढत तिला घराच्या बाहेर काढलं त्याने. समोर चिंचाच झाड होतं अगदी त्याच्या खाली पडली मालू.


वामन परत ओरडून रागात म्हाणाला, "माले पोर होवूच शकत नाय... म्हणूनच एवढी लफडी केलीत पण कुठलंच लफडं बाहेर आलं नाय.. बायकांची जात साली.. पोर होत नाय म्हणून सोडून दिलं तिनं माले!" आणि मग छाती ठोकू लागला, "माले सोडलं.. नपुंसक म्हणते माले.. ..ते माय बी माले नपुंसक म्हणत वर गेली.."


"ये भवाने, तुले तं सोडतच नाय माय.... तू निग माह्या घरातून... हे लफडं माह्या घरात नाय पायजेत."


मालू खूप घाबरली होती, तिलाही काही कळत नव्हतं, भीतीने पोटात गोळा आला आणि धारा लागल्या.... कधी त्या वाहून साडीतून बाहेर आल्या आणि तिचा कलंक मिटवून गेल्या.. आज ती लाल झाली होती पण वांझ पण मनातून मिटलं होतं तिचं... खूप ओरडून ओरडून नंतर हसली, चिंचेच्या झाडाला बिलगली, जोराने हलवून चिंचा पाडल्या आणि मनसोक्त खाल्ल्या.


खरं तर मालू कधीच पोटुशी नव्हती, तिच्या नेहमीच्या आई होण्याच्या स्वप्नाने तिला ते सगळे आभास होत होते आणि योगा योग असा की तिची पाळी या महिन्यात लांबली होती. मग गावरान मालू काय समजणार? ती तर बाळाच्या आशेने स्युडोप्रेग्नन्सीने ग्रासली होती.


पण आज तिला कळलं होतं आणि त्या स्वप्नाचा अर्थ गवसला होता. मोठा सुस्कारा देत ती उठली आणि वामनकडे वळली, "वांझ मी नाय..... तू हाय.. बंज्जर साला... नापीक... थू तुह्यावर.. तू निग ह्या घरातून... घराची सफाई केली म्या, आईच्या खोलीची बिन केली.. माह्या सासूने हे घर आन शेत माह्या नावावर लिवून ठेवलं हाय... तू निग आणि तुय लफडे पण घेवून जाय.. आजपासून तुया माया काई बिन संबंध नाय. अन ऐक, अतापरोत म्या कोनालेबी गरम गरम जेवाले घातलं नाय पण आता घालीन... तू लफडं म्हणतस ना.... म्या त्या लफड्याले जिंदगी करून दावीन... चल निग... " आणि तिने त्याला ओढत घरच्या बाहेर काढलं आणि दार लावून दिलं.


आज तिचा कलंक मिटला होता.... मी वांझ नाय असं म्हणत ती घरात एकटीच आनंदी होतं होती. आज तिच्या मनातला मयूर नाचत होता.  

समाप्त...


स्युडोप्रेग्नन्सी - हा एक मानसिक प्रेग्नन्सीचा प्रकार आहे जो त्या स्त्रीमध्ये दिसतो जिला काहीही करून प्रेग्नन्ट व्हायचं असतं. कथेची नायिका मालू या मानसिक आजाराने त्रस्त होती. म्हणून ती वामनचा अत्याचार सहन करायची.... पुरुष वांझ असला तरी तो हे सहज स्वीकारत नाही याचं उदाहरण होता वामन. स्युडोप्रेग्नन्सीने ग्रासलेली स्त्री प्रत्येक क्षणाला बाळाच्या आगमनाची वाट बघते. आणि मग सर्व शारीरिक लक्षण हे गर्भ आहे असेच असतात. तसं मेडिकल सायन्सच्या मते पाळीचे आणि गर्भ असण्याची लक्षण सारखीच असतात पण आई होण्याच्या आतुरतेने या प्रकारात स्त्री स्वतःला प्रेग्नन्ट समजते. होणारी प्रत्येक हालचाल ती बाळाशी जोडते....


Rate this content
Log in

More marathi story from URMILA DEVEN

Similar marathi story from Drama