Pratibha Tarabadkar

Drama Inspirational

5.0  

Pratibha Tarabadkar

Drama Inspirational

पॅकेज

पॅकेज

8 mins
987


सकाळची वेळ होती. साधना सराईतपणे पोळीवरुन लाटणे फिरवित होती. मधूनच तव्यावरची पोळी उलटत होती.

'आई तुझा फोन', श्वेताने साधनाच्या कानाला फोन लावला. 'घाईच्या वेळी कोणाचा फोन'? हॅलो' साधना त्रासिकपणे उद्गारली. पण लगेचच तिच्या चेहऱ्यावरील भाव झरझर बदलले. 'विभा तू?'तव्यावरील पोळी न उलटविताच ती सिंकमध्ये हात धुवू लागली. पोळीचा करपलेल्या वास आला आणि श्वेताने पटकन गॅस बंद केला आणि त्यावरील पोळी उतरवली. 'आई एवढी एक्साईट का बरं झाली', श्वेताची उत्सुकता तिला स्वस्थ बसू देईना. साधनाचे फोनवरील बोलणे संपल्यावर


श्वेताने प्रश्नार्थक नजरेने आईकडे पाहिले. 'अगं माझी बालमैत्रीण विभा! नववीपर्यंत आम्ही एकाच बाकावर बसायचो. पण तिच्या वडिलांची बदली

दिल्लीला झाली. सुरुवातीला आमचा पत्रव्यवहार चाले. तेव्हा फोनचा एवढा सुळसुळाट नव्हता ना! पण मग हळूहळू संपर्क तुटला तो तुटलाच. कोणा नातेवाईकांच्या लग्नाला आलीय मुंबईत. तिने माझा नंबर कसा शोधला कुणास ठाऊक!'

साधना स्वतःशीच खुदूखुदू हसली. 'एव्हढी मज्जा करत असू माहितीये, एकदा हिंदीच्या बाई इतक्या रटाळ शिकवत होत्या म्हणून आम्ही गुपचूप फुल्ली गोळा खेळत होतो पण बाईंनी बरोब्बर पकडलं. मग काय अख्खा पीरीयड वर्गाबाहेर उभ्या. पण तिथेही गप्पा मारणं सोडलं नाही.'

'फुल्ली गोळा म्हणजे सर्कल अँड क्रॉस?',

'तेच ते ग! मराठीत त्याला फुल्ली गोळा म्हणतात.

'आपली आईसुद्धा लहानपणी आपल्यासारखीच गंमतीजमती करायची हे ऐकून श्वेताला मजा वाटली.

'आज डबा मिळणार आहे की नाही वेळेवर?'श्वेताचे बाबा स्वयंपाकघरात डोकावले तशी भानावर येत साधना चटचट डबा भरु लागली. तिची प्रसन्न

मुद्रा, चपळतेने होणाऱ्या हालचाली निरखताना श्वेताच्या मनात आईविषयी अपार प्रेम दाटून आले.

'My Mom is the Best Mom in the World'तिला वाटले.


विभा येण्याची वेळ झाली तसे सर्व पदार्थ साधनाने नीट मांडून ठेवले. तोंड धुवून हलकासा पावडरचा पफ तोंडावर फिरवून केस पिनेत अडकविले आणि कॉटनचा सैलसर पंजाबी ड्रेस चढवून साधना विभाच्या स्वागतासाठी तयार झाली. बेल वाजली अन् अधीरतेने साधनाने दार उघडले. दोघी मैत्रिणी

दारातच उराउरी भेटल्या. विभा चिवचिवत घरात शिरली आणि श्वेता डोळे विस्फारून तिच्याकडे बघतच राहिली. विभाची ती डौलदार मूर्ती,चेहेऱ्याभोवती महिरपीसारखे रुळणारे केस, मोतिया रंगाच्या साडीवर स्लीव्हलेस ब्लाऊज अन् गळ्यात नाजूकसा मोत्याचा सर‌, तिच्या रुबाबदार व्यक्तिमत्वाला उठाव देणारे नाजूक घड्याळ. सारे कसे मनमोहक!


विभा आणि साधनाच्या गप्पा रंगल्या. विभा कुठल्याशा परदेशी बॅंकेत कामाला होती. नवरा पंजाबी बिझनेसमन होता तर एकुलता एक मुलगा अमेरिकेत शिकत होता. मध्येच तिने श्वेता आणि यशशी गप्पा मारल्या. त्यांच्या शिक्षणाची चौकशी केली. साधनाने केलेल्या पदार्थांची वाखाणणी करत त्यांचा फडशा पाडला अन् त्या सर्वांना दिल्लीला येण्याचे आमंत्रण देऊन भुर्रकन गेलीसुद्धा! श्वेता तिच्या व्यक्तिमत्वाने मंत्रमुग्ध झाल्यासारखी खिळून राहिली.

'विभामावशी पहिल्यापासून अशीच होती का ग?'

'अशी म्हणजे कशी?'साधनाने

कपबशा, प्लेट्स उचलत विचारले. 'अशी म्हणजे स्मार्ट, फॅशनेबल?'

'छे ग, आमच्यासारखीच होती, चारचौघींसारखी. पण दिल्लीच्या वातावरणाने, परदेशी बॅंकेत काम करण्याने बदलली असेल कदाचित!'

'आई,तू का नाही नोकरी केलीस कधी?'  

'अगं करत होते मी सुद्धा नोकरी पण तुझा जन्म झाला आणि तुला कुठे ठेवावी असा प्रश्न आला. पाळणाघराची सोय नव्हती आणि दोन्ही कडच्या आजी-आजोबांना शक्य नव्हते मग सोडावी लागली नोकरी.'

'तुला कधी वाईट नाही वाटले त्याबद्दल?'

सुरुवातीला वाटायचं वाईट नोकरी सोडावी लागली म्हणून, पण मग यश झाला आणि मग तुमच्या शाळा, अभ्यास यातच इतकी बिझी झाले ना! आणि खरं सांगू का श्वेता,जी गोष्ट स्विकारली आहे त्यातच आनंद मानण्यात शहाणपणा असतो. उगाच जी गोष्ट घडली नाही त्यासाठी कुढण्यात काय ‌अर्थ आहे?'

'पण तुझ्या नोकरी न करण्यामुळे तू विभामावशीपुढे किती काकूबाई वाटत होतीस!'

'प्रत्येक माणसाचं व्यक्तिमत्त्व निराळं असतं श्वेता! कधीही एकाची तुलना दुसऱ्याबरोबर करु नये. तुझ्या आईत जे गुण आहेत ते कदाचित

विभामावशीमध्ये नसतील आणि लक्षात ठेव श्वेता, माणसाच्या दुःखाचे मूळ हे दुसऱ्याशी केलेल्या तुलनेत असतं.'


आतापर्यंत मायलेकींचा संवाद ऐकत असलेले श्वेताचे बाबा म्हणाले. श्वेता निरुत्तर झाली. पण विभामावशीचा विषय तिच्या मनातून गेला नव्हता हे दोन दिवसातच उघड झाले. साधनाने बाहेर जाण्यासाठी पंजाबी ड्रेस बदलला अन् श्वेताने लगेच नाक मुरडले. 'आई,जरा लिपस्टिक लाव, केस मोकळे सोड, हाय हिल्सच्या चपला घाल!'

'आणि असा नट्टापट्टा करून भाजीला जाऊ? लायब्ररीत पुस्तकं बदलायला जाऊ?' साधनाने आश्चर्याने विचारले.

'हो,तू हाऊसवाईफ ना,तू अशीच राहणार!' श्वेता कुत्सितपणे म्हणाली आणि साधना थक्क झाली.

'अगं आपल्या शेजारच्या चितळेवहिनी आणि सावंतवहिनीसुद्धा जातात नोकरीला. त्या

तरी अशा कधी नटूनथटून जाताना पाहिलंस का?'

'विभामावशीची सर कोणालाच नाही!' श्वेता पुटपुटली पण साधनाला ते ऐकू गेलेच.

'अगं विभाची गोष्ट वेगळी आहे', चिडीला येत साधना म्हणाली.

'तिचे ऑफिस आहे घरापासून दहा मिनिटांवर, घरात स्वयंपाकाला बाई, एकुलता एक मुलगा लांब अमेरिकेत, नवरा त्याच्या बिझनेसच्या व्यापात!मग तिला नीट नेटके रहाण्यात काय प्रॉब्लेम आहे?'


श्वेताने नाराजीने मान हलवली. तिला आईचे बोलणे पटले नाही. श्वेतामधील झालेला बदल पाहून साधना अस्वस्थ झाली होती. कुठून विभा तिला भेटायला आली असेही एकदा वाटून गेले पण मग तिलाच तिच्या विचारांची लाज वाटली. साधना परिस्थितीवश नोकरी करु शकली नाही म्हणजे ती टाकाऊ झाली? साधनाला त्या विचाराने वैफल्य आल्यासारखे वाटले. आज रविवार म्हणून साधनाने स्पेशल बेत केला होता. यश आणि त्याचे बाबा मनापासून जेवत होते. श्वेता मात्र अन्न चिवडत बसली होती. 'श्वेता, अगं जेव ना नीट', पुऱ्या तळता तळता साधना म्हणाली. 'बाबा, आज आई जर विभामावशीसारखी नोकरी करत असती तर आपण दर रविवारी हॉटेलमध्ये जेवलो असतो, सुटीत परदेशी गेलो असतो ना' 

'ए ताई, गप ना, सारखी नोकरी नोकरी करत आईच्या मागे काय लागतेस? माझा मित्र आहे ना राज, त्याला टायफॉइड झाला होता पण त्याच्या आई-बाबांना एवढे काम होते ऑफिसमध्ये की सुट्टी घेता येईना मग आम्हीच त्याच्याजवळ आळीपाळीने बसत होतो. आपल्या घरी कधी वेळ आलीय का

अशी?'

'तू गप रे आईच्या चमच्या, दिवसभर क्रिकेट खेळत असतो आणि बकासुरासारखा खात असतो.'

'श्वेता,' बाबांचा दरडावणीचा सूर ऐकून श्वेता गप्प झाली पण जेवणाचा बेरंग झाला तो झालाच!

'हे बघ श्वेता,' बाबा समजावणीच्या सुरात म्हणाले, 'कोणतीही गोष्ट चांगली अथवा वाईट नसते तर त्या गोष्टीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन ते ठरवीत असतो. तू नोकरीचे फक्त फायदे पाहिलेस आणि यशने फक्त तोटे. पण प्रत्येक गोष्ट चांगले वाईट, फायदे तोटे यांचे मिश्रण असते हे लक्षात ठेव आणि विभामावशी आणि आई यांची तुलना करणं सोडून दे. '

 

साधना आणि विभाची व्हाट्सअपच्या मेसेजेसची देवाणघेवाण, कधी जोक्स तर कधी शाळेतील आठवणींची उजळणी असे. विभा अधूनमधून तिचे फोटोही पाठवित असे. एखाद्या समारंभात अंगभर दागिने ल्यालेली तर कधी परदेशातील एखाद्या प्रेक्षणीय स्थळाला भेट देताना. हसरी, प्रसन्न विभा!

शाळेला कसलीतरी सुट्टी होती म्हणून आज सकाळपासून यश क्रिकेट खेळायला जो गेला तो जेवायच्या वेळेलाच उगवला. मळलेले कपडे, घामाने निथळलेले अंग आणि उन्हातून आल्याने लालभडक झालेला चेहरा.

'आधी अंघोळ करून ये यश. मगच जेवायला मिळेल', साधना ओरडली.

'काही काळवेळ आहे की नाही?' 'बघ ना, अभ्यास करायचा सोडून हुंदडतोय नुसता',श्वेताने री ओढली. 'ए ताई,गप ना,तू तुझ्या अभ्यासाची काळजी कर. उगाच माझं डोकं नको खाऊ',भुकेजलेला, दमलेला यश उसळला.

'हो,करतेच आहे मी अभ्यास, श्वेता ठसक्यात म्हणाली. 'मला विभामावशीसारखं बनायचंय. आईसारखं हाऊसवाईफ नाही. '

घरात एकदम शांतता पसरली. आपण काहीतरी चुकीचं बोललोय हे लक्षात येऊन श्वेता गोरीमोरी झाली. पण आता वेळ निघून गेली होती. साधनाचा चेहरा उतरला. तिचे जेवायला वाढणारे हात थांबले व ती अश्रूंना थोपवत मुकाटपणे बेडरूममध्ये गेली व तिने आतून कडी लावून घेतली. डायनिंग

टेबलावरील पाण्याचा ग्लास उचलून श्वेताच्या बाबांनी पाण्याचा घोट घेतला आणि श्वेताकडे रोखून पाहिले. श्वेताच्या पोटात गोळा आला. '

'श्वेता, तू विभामावशीला किती ओळखतेस?'

'त्या दिवशी आपल्याकडे आली होती तेवढीच.' श्वेता चाचरत म्हणाली.

'तेवढ्यावरुन तू इतकी इंप्रेस झालीस की ध्यानीमनी तुला विभामावशी दिसू लागली? ज्या आईने तुला वाढविण्यासाठी खस्ता काढल्या तीच आई तुला

केवळ एक हाऊसवाईफ म्हणून तुच्छ वाटू लागली?'

'पण बाबा', श्वेता आपले म्हणणे पुढे रेटू लागली, 'विभामावशीला परदेशी बॅंकेत नोकरी आहे गलेलठ्ठ पगाराची, शिवाय परदेशी जात असते सारखी... 'बस्स! एवढीच माहिती आहे तुला तिची? श्वेता, माणसाच्या जीवनाचे अनेक पैलू असतात पण जगाला मात्र त्यातील फारच थोडे पैलू दिसत असतात. बहुतेकजण त्यांचे ऐश्वर्य, भपका, त्यांच्या आयुष्यातील सुखाचे क्षण असे निवडक प्रसंग जगासमोर प्रदर्शन करण्यासाठी ठेवत असतात आणि आपण त्यालाच त्यांचे आयुष्य समजतो. मुळात प्रत्येकाच्या आयुष्याचा प्रवास वेगवेगळा असतो. हल्लीच्या शब्दात सांगायचे तर प्रत्येकाच्या जीवनाचे 'पॅकेज' निरनिराळे असते. एकाच्या आयुष्याचे पॅकेज हे दुसऱ्या व्यक्तीच्या आयुष्याच्या पॅकेजसारखे असूच शकत नाही. हर एक व्यक्तीची आर्थिक परिस्थिती, बुद्धिमत्ता, तब्येत, आयुर्मान हे भिन्नभिन्न असते. त्यामुळे त्यांच्या आयुष्याशी तुलना करावयास जाऊ नये.


बाबांच्या समजावण्याचा प्रयत्न श्वेताच्या किती पचनी पडला कोणास ठाऊक! साधनाला अलीकडे श्वेताचा राग येऊ लागला होता. विभा दोन तासांसाठी भेटायला काय आली, श्वेता तिच्यावर इतकी भाळली की आजवरचे माझे कष्ट, माझे घराला वाहून घेणे तिला कवडीमोलाचे वाटू लागले?

 साधनाने श्वेताशी बोलणे कमी केले. दोघींमध्ये संवाद उरला नाही. श्वेताला अर्थातच त्याची फिकीर वाटत नव्हती. मात्र साधनाला श्वेताचे तिच्याभोवती चिवचिव करणे, कॉलेजमधून आल्यावर गंमतीजमती सांगणे आठवून उदास वाटे. रात्री यशचे टाइमटेबल भरणे चालू होते. सकाळी लवकर भाजीपोळीचा डबा सर्वांना लागतो म्हणून साधना गवारीच्या शेंगा मोडत बसली होती. आणि अचानक तिचा मोबाईल वाजला. रात्रीच्या वेळी कोणाचा फोन? साधनाने

अस्वस्थतेने फोन घेतला.

'अरे देवा, काय सांगतेस?' साधना ओरडलीच. 'कधी?काय झालं होतं नक्की?'

साधनाच्या अविर्भावावरुन नक्की काहीतरी घडले आहे हे लक्षात येऊन तिघेही साधनाजवळ गोळा झाले. मोबाईल बंद करून साधना बसून राहिली. निश्चल,निःस्तब्ध. हळूहळू ती भानावर आली आणि कसंबसं बोलली,

'विभा गेली'.

'काय?'तिघंही एका सुरात ओरडले. डोळ्यात आलेलं पाणी पुसत साधना म्हणाली, 'ब्लड कॅन्सर झाला होता तिला. तीन महिन्यांपूर्वी डिटेक्ट झाला. भरपूर उपचारही केले पण तो वेगाने शरीरात पसरला होता. त्यामुळे उपचारांना तिचे शरीर प्रतिसाद देत नव्हते. '

'तुला याची काहीच कल्पना नव्हती?'

'नाही अजिबात नाही. हल्लीच्या फोटोंमध्ये ती खूपच बारीक दिसत होती. त्यावरुन मी तिची थट्टाही केली होती की काय गं, दीक्षित डायट करतेस का? तर उत्तरादाखल तिने नुसती स्मायली पाठवली होती. पण कधी शंकाही आली नाही की असं काहीतरी असेल म्हणून' साधनाचा कंठ दाटून आला. तिला पुढे काही बोलवेना.

श्वेता मनातून हादरुन गेली होती. विभामावशीला असा काही आजार होईल आणि ती या जगातूनच निघून जाईल हे सत्य तिला पार हादरवून

टाकणारे होते. तिने उभारलेल्या विभामावशीबद्दलच्या काल्पनिक जगात अशा दुःखद घटनेला स्थानच नव्हते मुळी! साधना यांत्रिकपणे कामे उरकत होती. विभाच्या इतक्या अकल्पित जाण्याने ती अस्वस्थ झाली होती. नियतीचा खेळ खरंच किती अगम्य आहे! श्वेताचे बाबा म्हणतात त्याप्रमाणे प्रत्येक माणसाच्या आयुष्याचे पॅकेज वेगवेगळे असते. एकासारखा दुसरा माणूस असूच शकत नाही. प्रत्येकाची सुखदुःखे, शारीरिक प्रकृती, आर्थिक परिस्थिती वेगवेगळी. मग कोणाशी तुलना करायचीच कशाला? साधना आपल्या विचारात गुंग असतानाच बेल वाजली. श्वेता आली होती. घरात आल्याआल्या तिने आईला घट्ट मिठी मारली आणि ती स्फुंदू लागली.

'श्वेता, अगं काय झालं?' साधनाने काळजीने विचारले. 'कॉलेजमध्ये काही झालं का? येताना कोणी त्रास दिला का?'

श्वेताने नकारार्थी मान हलवली. 'आई,तू माझ्यावर रागावलीस का?'

'कशाबद्दल?'

'मी तुझ्याशी खूप वाईट वागले ना? आई, मी परत कध्धीच अशी वागणार नाही. मला तू हवी आहेस. मला सोडून तू जाणार नाहीस ना?'श्वेताने आईला घट्ट धरून ठेवले. साधना तिच्या केसांवरून हात फिरवू लागली.

तिच्या मनात एकच वाक्य फिरत होते. 'प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याचे पॅकेज वेगवेगळे असते.


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama