संस्कार भाग -१०
संस्कार भाग -१०


सरुने लगबगीने माईंचे दार वाजवले.तिच्या चेहऱ्यावर आनंद मावत नव्हता.माईंनी दार उघडले.
'माई अवो दादांना भेटल्यापासून ज्ञाना..न्हाई ज्ञानेश्वर सारखा अभ्यास करतोय.मला दादांसारखं खूप खूप शिकायचंय, मोठ्ठं व्हायचंय असं म्हनतोय.'
माई हसल्या.आपल्या मुलाचं कौतुक ऐकायला कुणाला आवडत नाही?मग ते लहान असो की मोठं!
'माई काय करू आज? नाश्ता केला न्हवं?'
'अगं जरा शिवण काढलंय जरा.खूप दिवसात काही शिवलं नाही मग वर्षाला म्हटलं थोडी कापडं आणून दे.छोटी झबली टोपडी शिवून तयार ठेवते.तो जगन्नाथ आहे ना फॅक्टरीमधला,त्याची बायको गरोदर आहे.तिला देता येतील.कोरी कापडं आणली की दुपटी पण शिवता येतील.'माईंचा उत्साह बोलण्यात उतरला होता.
'माई,दादा वैनींना एक तरी लेकरु हवं होतं नाही?त्यानं घराची शोभा वाढते ',सरु नकळत म्हणून गेली खरी पण माई रागावल्या तर या विचाराने धास्तावली.
'हं, माईंनी सुस्कारा सोडला.'खूप प्रयत्न केले पण नाही यश मिळालं.माणसाला सगळ्याच गोष्टी कशा बरं मिळतील?सगळंच जर मिळालं तर माणूस स्वतःलाच देव नाही का समजणार?जगी सर्व सुखी असा कोण आहे असं साक्षात समर्थ रामदास स्वामींनी म्हटलं आहे.प्रत्येक माणसाच्या आयुष्यात काही तरी अपूर्णता असते.तुझ्या दादा वैनींच्या आयुष्यात ही कमी आहे.ठीक आहे.चालायचंच'.
माई शिवणाच्या मशीनवर बसल्या आणि दोरा ओवू लागल्या.
'माई, तुम्ही हे इतकं जुनं मशीन का बरं ठेवलंय? तुमच्या कडे इतके पैसे आहेत मग विकत पण आणू शकता झबली टोपडी!'
'सरुबाई, हे नुसतं जुनं मशीन नाहीये,ते एकेकाळी माझ्या घराला आधार देत होतं.मग मी कशी बरं टाकून देईन त्याला?'
'घराला आधार म्हंजी?'
'अगं जरी मी शाळेत नोकरी करत होते तरी पगार तुटपुंजा होता माझा.घराचं भाडं, हुशार विद्यार्थी म्हणून सुभाषच्या शाळेची फी जरी माफ असली तरी इतर खर्च,रोजचा खाण्यापिण्याचा खर्च यात सारा पगार संपून जायचा.मग सुट्टीच्या दिवशी मी जवळपासच्या लोकांचे कपडे शिवून देत असे.त्यातून मला थोडीफार कमाई होत असे.बहुतेक लोक प्रामाणिक होते पण काही फसवणूक पण करत असत.आज देऊ उद्या देऊ म्हणून बुडवतही असत.'
'आसं कशाला कोणाला फसवायचं?'सरु अभावितपणे म्हणाली.
'हो पण त
े सगळं समोरच घडत असल्याने सुभाषला या अनुभवांचा बिझनेस मध्ये उपयोग झाला.कुठलाही अनुभव मग तो चांगला असो वा वाईट, आपल्याला शिकवण देत असतो.'
'माई, तुमचं हे घर भाड्याचं आहे का?'
'छे गं,कुणी सांगितलं तुला?'माईंनी आश्चर्याने विचारले.
'तुम्हीच म्हणालात घराचं भाडं भरावं लागतं म्हणून?'
'अगं ते पूर्वीच्या घराबद्दल बोलत होते मी!अगदी छोट्या दोन खोल्या होत्या आमच्या.शेजारी दारुडे, जुगारी, गुन्हेगारी करणारे रहात होते.फक्त आम्ही आणि शेजारच्या घरात माधवकाका आणि रमाकाकू एव्हढीच साधी माणसं होतो.केवळ त्या देवमाणसांमुळे आम्ही ते दिवस निभावून नेले.सतत बाहेर माणसांचा कालवा चालू असायचा.पण या वातावरणातही सुभाष एकाग्र चित्ताने अभ्यास करत असे.बाहेर बिघडण्यासाठी खूप प्रलोभनं होती पण तो बधला नाही.काका काकू त्याच्याकडे बारीक लक्ष ठेवून असत.त्याच्या वागण्यात थोडाफार बदलही त्यांच्या लक्षात येत असे.त्यामुळेच इतक्या खराब वस्तीत राहूनही सुभाष कधी आपल्या ध्येयापासून ढळला नाही.'
माईंचं शिवण बघता बघता संपत आलं.एक सुबक झबलं त्यांनी शिवलं होतं.
'माई, मला शिकवाल शिवण?'
'हो का नाही?पण मी जातीवंत शिक्षिका आहे हे विसरू नकोस.चुकलं की रागावणार!त्याची तयारी ठेव म्हणजे झालं!'माई हसत हसत म्हणाल्या.
'चालेल',सरु म्हणाली आणि तिची शिवणाची शिकवणी कडक शिक्षिका माईंकडे सुरू झाली.
उमेश आज अगदी खुशीत होता.आनंदाच्या भरात चक्क शीळ घालत होता.
'काओ,आज इतक्या खुशीत?'शोभानं टोकलं.
'अगं शोभे,आज आपल्या म्हाडाच्या घराचा नंबर लागलाय.आपल्याला तिकडं रहायला जायचं आता.तुझ्या हॉस्पिटलजवळ आहे ना ती बिल्डिंग,तिथं जायचं.ब्लॉक आहे.घरात सगळं आहे, टॉयलेट वगैरे!'
'या बया, काय सांगता काय,लैच भारी झालंय की मग!'दोघेजण स्वप्नरंजनात गुंतले.सरु त्यांचं बोलणं ऐकून अस्वस्थ झाली.बापरे आता काय करायचं?हे दोघे निघून गेले की आपण कुठे रहाणार?
शोभीचं लक्ष सरुकडे गेलं.तिचा उतरलेला चेहरा पाहून ती म्हणाली,'सरुबाई, काय बी काळजी करू नका.आपण सर्वेजणं एकत्रच राहू.आता तर घर बी मोठं हाय.'
जरी सरुने वरुन दाखवलं नाही तरी तिला त्या दोघांच्या सारखं सारखं मागे फिरणं बरं वाटेना.