साहित्य संमेलन
साहित्य संमेलन
माझ्या एका मैत्रिणीने नाशिकचा एक पत्ता आणून दिला आणि सांगितले, तू या पत्त्यावर साहित्य संमेलनासाठी कविता पाठव.पत्त्यामध्ये कुठलातरी मळा वगैरे लिहिलं होतं.मला शंका आली आणि मी माझ्या नाशिकस्थित आतेभावाकडून तो पत्ता खरा आहे ना याची खात्री करून घेतली आणि एका फुलस्केपवर माझी 'कधीतरी' नावाची कविता लिहून फक्त मोबाईल नंबर लिहून पोस्टाने पाठवली आणि विसरून गेले. थोड्या दिवसांनी मला बाजारात असताना फोन आला,तुमची कविता साहित्य संमेलनासाठी निवडली गेली आहे. मला वाटलं, कोणीतरी आपली चेष्टा करत आहे म्हणून मी चक्क धुडकावून लावले पण त्या बिचाऱ्याने माझे कवितेचे शीर्षक वाचून दाखवले. 'अगंबाई,खरंच की काय!' मला भर बाजारात छानशी गिरकी घ्यावीशी वाटली.कधी एकदा घरी येऊन ती बातमी सांगते असं झालं! 'नाशिक?मग ठीक आहे, जायला हरकत नाही!' मी, श्री.ताराबादकर आणि माझा धाकटा भाऊ आम्ही तिघेही नाशिकच्या साहित्य संमेलनासाठी निघालो. संपूर्ण नाशिक साहित्य संमेलनमय झाले होते.जिकडेतिकडे निरनिराळे फलक,बसेसवर जाहिरात, संमेलनासाठी बाहेरगावाहून येणारे साहित्यप्रेमी.... बापरे,आपली कविता सादर करायला आलोय खरं पण आपल्याला जमेल का? मूळच्या लाजाळू स्वभावाने डोके वर काढले! 'आपण घरी तुझी प्रॅक्टिस घेऊ,'आतेभावाने तोडगा काढला.समोर माणसांकडे बघूच नकोस,कागदाकडे बघ म्हणजे भीती वाटणार नाही,'सूचनांचा भडिमार चालला होता.नशीब,पाठ करून सादर करायची नव्हती नाहीतर ऐनवेळी आठवली नाही तर.....? साहित्य नगरीत जाण्याची वेळ जवळ आली आणि छातीत धडधडू लागले.बाहेर पडलो आणि बघतो तर काय, प्रत्येक कोपऱ्यावर बस थांबत होती.नाशिक परिवहनच्या अनेक बसेस सोडण्यात आल्या होत्या,खास साहित्यनगरीत जाण्यासाठी.आणि त्याही मोफत!नाशिककर मंडळीही उत्साहाने सहभागी होण्यासाठी रांगेत उभी होती.साहित्यसंमेलनाची धुरा खांद्यावर घेऊन माननीय श्री.छगन भुजबळ यांनी त्या अलोट गर्दीची चोख व्यवस्था ठेवली होती. भुजबळ नॉलेज सिटी या त्यांच्या स्वतःच्या विद्यानगरीचे साहित्य संमेलनात रुपांतर केले होते.सजावट केलेला प्रशस्त आणि देखणा परिसर, शिस्तबद्ध स्वयंसेवक,पाहुण्यांना अदबीने मदत करण्यास सज्ज असलेले नाशिककर.... बघून माझ्या मनावरचा ताण काही प्रमाणात कमी झाला. कविकट्ट्यावर रसिक श्रोत्यांनी एकच गर्दी केली होती.आपली कविता सादर करण्यासाठी अगदी दिल्ली, कलकत्ता, इंदूर येथून कवी आले होते.हजारो कवितांमधून आपली कविता निवडली गेली याचा निखळ आनंद साऱ्या कवींच्या चेहऱ्यावर दिसून येत होता.त्या कवींच्या मांदियाळीत मी पण जाऊन बसले.अनेक कवी येऊन आपली कविता सादर करून जात होते.आता लवकरच आपला नंबर लागणार या कल्पनेने मनात धडकी भरली पण गंमत म्हणजे जेव्हा माझे नाव पुकारले गेले तेव्हा ती मनाची अस्वस्थता गायब झाली! मी आयत्या वेळी अगदी सहजतेने माझी कविता सादर केली.टाळ्यांवरून कळले,आपली कविता श्रोत्यांना भावली आहे.आता माझ्यातील आत्मविश्वास जागृत झाला.मीपण इतरांसारखी धीटपणे स्टेजवर उभी राहू शकते तर! माझी कविता सादर झाल्यानंतर आम्ही आता मोकळेपणाने गर्दीत फिरू लागलो.विद्यानगरीत अफाट जनसागर उसळला होता तरी अचूक नियोजनामुळे कुठेही धक्काबुक्की,गडबड गोंधळ उडाला नव्हता.नाशिककरांना ती एक पर्वणीच होती जणू!मोफत भोजनाची व्यवस्था केली होती, फुगे, खेळणी, आकाश पाळणा यामुळे लहान मुले आनंदाने बागडत होती.ते अभूतपूर्व दृश्य मी कधीही विसरणार नाही. आनंदाने घरी आलो आणि साहित्य संमेलनात भ्रष्टाचार, आयोजकांनी पैसे बुडवले अशा बातम्यांनी वृत्तपत्रांचे रकानेच्या रकाने भरलेले पाहून दुःख वाटले.इतके सुंदर आयोजन केले तरी बिचाऱ्या आयोजकांवर केलेली चिखलफेक पाहिली आणि वाटलं, प्रत्यक्ष अनुभव घेतल्यामुळे कळलं, नुसत्या बातम्यांवर किती विश्वास ठेवायचा ते! असो.मी हे साहित्य संमेलन माझ्या मनातील मखमली कुपीत कायम जपून ठेवले आहे! (एका उपक्रमासाठी लिहीलेला लेख) प्रतिभा ताराबादकर
