STORYMIRROR

Pratibha Tarabadkar

Abstract

4  

Pratibha Tarabadkar

Abstract

वेगे वेगे धावू

वेगे वेगे धावू

3 mins
11

 रस्त्यावर वाहने सिग्नलच्या इशाऱ्याची वाट पहात फुरफुरत उभी होती.आमची महाकाय व्होल्व्हो बस सुद्धा वहानांच्या गर्दीत सिग्नल कधी हिरवा होतोय याची प्रतीक्षा करत होती.मी पहिल्याच dसीटवर बसल्याने सारे दृश्य समोरच्या काचेतून दिसत होते.एकदाचा सिग्नलने आगे बढो चा इशारा दिला आणि आमची बस सुरू झाली आणि तेव्हढ्यात....माझे काळीज लक्कन हलले. एक दुचाकीस्वार सर्रकन आमच्या त्या विशालकाय बस समोरुन पसार झाला. 'आई गं,' मी न राहवून किंचाळले.ड्रायव्हरने ते माझे चुटपुटणे बरोबर टिपले. 'आम्हाला हे रोजचंच आहे मावशी! अशावेळी त्या माणसाला वाचवताना आमचं काळीज बंद पडतंय की काय असं वाटतं! बरं या लोकांना काही झालं की मार मात्र आम्हाला खावा लागतो.या मोठ्या बसवाल्यांना लै माज आलाय म्हणून! म्हंजे शेळी जाते जीवानिशी आन खाणारा म्हणतो वातड अशी आमची गत असतेय.एव्हढी काय घाई असते यांना कुणास ठाऊक!' ड्रायव्हरच्या बोलण्यावर मी विचार करू लागले.'खरंच,आपला जीव धोक्यात घालून यांना कुठे जायचं असतं?इतकी कसली निकड असते यांना की थोडा वेळ सुद्धा थांबू शकत नाहीत? अशा वागण्याचे परिणाम कळत नाहीत का?जर बसच्या चाकाखाली आला तर चेंदामेंदा होण्यापलीकडे काय होणार?' आमच्या एका नातेवाईकांकडे जाण्यासाठी लिफ्टची वाट पहात उभे होतो.वरून लिफ्ट खाली येत होती आणि ती जमिनीच्या एक फूट अंतरावर असतांनाच लिफ्टचे दार उघडून एक मध्यमवयीन स्त्रीने धाडकन खाली उडी टाकली आणि आपली इस्त्रीला टाकण्याचे कपडे असलेली पिशवी हलवत आमच्या समोरुन निघून गेली.आम्ही आ वासून तिच्याकडे बघतच राहिलो.केव्हढी मोठी जोखीम पत्करली होती तिने!समजा उडी चुकली असती आणि लिफ्ट व जमिनीच्या मध्ये तिचा पाय अडकला असता तर? एक दोन सेकंद वाचवून ती देशासाठी लढत आपले प्राण पणाला लावत होती का?की जणू काही जीवावर उदार होऊन कोणाला तरी वाचवण्यासाठी तिची धडपड चालली होती?सगळंच आकलनाच्या पलिकडचं! वेग कमी असावा म्हणून मुद्दाम रस्त्यांवर स्पीड ब्रेकर लावलेले असतात पण त्यावरूनही मुले आपली दुचाकी वेगाने पळवत असतात.समजा ती दुचाकी स्पीड ब्रेकर वर उलटली आणि तो तरुण मुलगा डोक्यावर पडला तर..?मी अशी काळजी व्यक्त केली की माझी काकू भडकते.'त्यांना काही का होईना,आमची हाडं मोडू नका म्हणजे झालं!' एका दुचाकीस्वाराने वेगाने येऊन तिला धडक मारल्यावर सहा महिने बिचारीला बिछान्यावर काढावे लागल्याने तिचा त्रागा पटतो. एका रेल्वेस्टेशनवर तर मी अभूतपूर्व दृश्य पाहिले.माणसं गाडीतून उतरून गाडी समोरून क्रॉस करून जात होती.स्टेशनवर रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी पूल बांधला आहे पण तेव्हढा वेळ आहे कुणाकडे?गाडीचा मोटरमन बिचारा सारखा भोंगा वाजवत होता पण तिथूनच क्रॉस करायची लोकांची धडपड सुरू होती.समजा एखादा गाडीखाली आला आणि प्राण गमावून बसला तर? किंवा अपघातात एखादा अवयव निकामी झाला तर? इतक्या क्षुल्लक कारणामुळे किती मोठी किंमत चुकवावी लागेल?मग काय करतील? या प्रश्नाचे उत्तर मला लवकरच मिळाले. माझ्या मैत्रिणीकडे बसले असताना तिच्याकडे एक चाळीशीतील स्त्री आली.शांपू,साबण विकायला.नाकी डोळी नीटस, चांगल्या घरातील वाटत होती.पण तिचा एक हात अर्ध्या दंडापासून कृत्रिमपणे लोंबकाळत होता.कणव येऊन मैत्रिणीबरोबरच मी सुद्धा तिच्याकडून खरेदी केली.पैसे देताना न राहवून तिला विचारले,'अपघात झाला होता का?' 'नाही.मलाच चरबी होती.' 'काय?'मी बुचकळ्यात पडले. 'आई बाबा नेहमी सांगत, रुळावरून जाऊ नकोस पण मलाच मस्ती ना, त्यांचं ऐकलं नाही आणि अशी परिस्थिती नशीबात आली.चांगली लग्न करून सुखाचा संसार करायचा सोडून दारोदार फिरतेय.'सुस्कारा सोडत ती उठली आणि पुढच्या दारी गेली. आयुष्याला गती हवी पण अशी अविचारी घाई? अशा वागण्याने आपणच आपला जीव धोक्यात घालतोय हे यांना कधी कळणार? 


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract