केतकी
केतकी


केतकी रंगाने सावळी पण आकर्षक व्यक्तिमत्व असलेली तरुणी होती. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून एम.ए राज्यशास्त्र विषय घेवून पद्वुत्तर झाली होती. पुण्यात होस्टेलला राहणारी केतकी एम.ए.चे पेपर देवून घरी संगमनेरला आली होती. एम.पी.एस.सी ची परीक्षा देवून अधिकारी होण्याची तिची इच्छा होती. तशी ती तयारीला लागली. तिच्या घरी मात्र वातावरण फारसे अनुकूल नव्हते. पण केतकीने तिच्या आईवडिलांना समजावून सांगितले होते त्यामुळे दादा आणि माई पण समाधानी होते ती दिवसातून आठ तास अभ्यासाला दयायची. उरलेल्या वेळात आईला मदत करायची. परीक्षा जवळ आली तशी तिने अभ्यासाची गती वाढवली. प्रिलीम ती पास झाली आता मेन्स बाकी होती. मेन्सला एक महिना बाकी होता तसा घरात तिच्या लग्नाचा विषय सुरु झाला. केतकीला माहित होते की आता दादा आणि माईला विरोध करून चालणार नाही. दोन चार स्थळ आले पण तिला पसंत पडले नाही. एक प्राध्यापक असलेल्या मुलाच स्थळ आल पण ते खेडयातल होत. मुलगा पुण्याला विदयापीठात प्राध्यापक होता. दादा आणि माईला वाटले याच्यापेक्षा चांगले स्थळ केतकीला मिळणार नाही. केतकीला त्यांनी सगळी कल्पना दिली. एकत्र कुटुंब शिवाय खेड गाव फक्त मुलाला चांगली नोकरी आणि तो पुण्यासारख्या शहरात राहणारा एव्हडया जमेच्या बाजू. केतकीनेही होकार दिला. लग्न दोन महिन्यांनी करायचे ठरले. केतकी परत मेन्स परीक्षेच्या तयारीला लागली आणि ती परीक्षाही ती पास झाली. पुढे इंटरव्ह्यू होता. लग्न ८ मार्चला होत. अधिकारी पदाची सून मिळणार म्हणून तिच्या सासरचे माणसही खुश होते.
लग्नाची तारीख उजाडली दादा आणि माईनी अतिशय थाटामाटात संगमनेरला केतकीच लग्न केल. लग्न होवून केतकी खेडयात आली. सुरवातीला काही दिवस तिला तिथे रहाव लागणार होते. लग्नानंतर आठच दिवसात तिचा इंटरव्ह्यू होता तशी केतकी तिचे मिस्टर प्रसादबरोबर पुण्यात आली. तिच्या इंटरव्ह्यूचा दिवस उजाडला. ती आणि प्रसाद ११ वाजता बरोबर पोहोचले. तिची अशा प्रकारच्या इंटरव्ह्यूची पहिलीच वेळ होती म्हणून ती थोडी घाबरलेली होती पण प्रसादने तिला धीर दिला. तिला बोलावण्यात आल. “मे आय कम इन” म्हणून ती आत गेली समोर सगळी दिग्गज मंडळी होती पहिलाच प्रश्न तिला विचारण्यात आला की तुम्ही हे क्षेत्र का निवडले केतकीने विचार करून उत्तर दिले. तिच्यावर प्रश्नाचा भडीमार होत राहिला ती पण सफाईदारपणे उत्तर देत राहिली.
केतकीने विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तर चोख दिली. इंटरव्ह्यू घेणाऱ्या मुख्य अधिकाऱ्यांनी केतकीला आठ दिवसात कळवू असे सांगितले.केतकी आभार मानून बाहेर आली. इंटरव्ह्यू उत्तम झाल्याने तिच्या चेहऱ्यावर समाधान होत. केतकी व प्रसाद घरी गेले. खेडयातल वातावरण वेगळ होते. केतकी तिला जमेल तस काम करीत होती. आठ दिवसाच्या आत तिला पुण्यात चीफ ऑफिसर म्हणून रुजू होण्यास सांगण्यात आले. केतकी पुन्हा प्रसाद बरोबर पुण्यात आली. नवीन जॉब म्हणजे एक आव्हान होते. सकाळी सर्व आवरून ती ऑफिसला जायची. अनेक अधिकारी भेटायला यायचे तिला जे योग्य वाटेल तिथेच ती सह्या करायची.
एक दिवस तिचे जेठ अनाधिकृत बांधकामाच्या कागदपत्रावर सह्या घेण्यासाठी आले. तिने सह्या करण्यास नकार दिला. तशी त्यांची नस तडकली. तिच्या सासर्यांना कळल्यानंतर ते केतकीच्या ऑफिसमध्ये येवून तावातावाने बोलू लागले. केतकीने त्यांना शांततेने समजावून सांगितले. सुनेने केलेला अपमान त्यांना सहन झाला नाही. घरात तक्रारी चालू झाल्या एक दिवस प्रसाद तिच्या ऑफिसमध्ये गेला. तिची मिटिंग चालू होती. प्रसादने दारावरच्या शिपायाला हटकले. पण त्याने आत जाऊ देण्यास नकार दिला. प्रसाद चिडला तसाच रागाने तो आत गेला व रागाच्या भरात त्याने सगळ्या मोठया अधिकाऱ्यांसमोर केतकीच्या गालावर जोरात लगावली. केतकी तिच्या कामात मग्न होती पण झालेला प्रकार तिला रुचला नाही तिने संतापातच प्रसादला गेट आउट केल. दात ओठ खातच तो बाहेर निघाला. तो निघून गेल्यावर केतकी बराच वेळ पश्चाताप करत राहिली. पुण्यात तिला राहण्यासाठी एक मोठा बंगलाही मिळाला होता. तिने प्रसादलाही तिथे राहण्यास सांगितले पण त्याने ते ऐकले नाही. झालेल्या प्रकारानंतर केतकी आणि प्रसाद मधील वाद वाढतच गेले. केतकीच्या सासरच्या लोकांनी आगीत तेल ओतण्याच काम केल शेवटी त्यांचा घटस्फोट झाला पण त्या दरम्यान केतकी प्रेग्नंट राहिली.
दोन वर्षात केतकीची नगरला बदली झाली. छोटया अनयला घेवून ती नगरला आली. अनयला तिने पाळणाघरात टाकले. तिची काम करण्याची पद्धत आणि कडक शिस्त यामुळे ती लवकरच लोकप्रिय झाली. तिच्या कामाची एक शिस्त होती त्यामुळे बेकायदेशीर कामांना तिने पायबंद घातला. अनय देखील आता शाळेत जाऊ लागला होता. केतकीच्या आई नगरला तिच्यासोबत राहू लागली. इकडे प्रसादच्या वडिलांनी प्रसादचे दुसरे लग्न करून दिले. नवल असे होते की केतकी सारखी मोठी अधिकारी मुलगी आपली सून होणार असा जो अभिमान प्रसादच्या आईवडिलांना होता तो जास्त काळ टिकला नाही. केतकीने स्वतःचा संसार एकटयानेच करायचे ठरवले.
अनय सीबीएससी शाळेत शिकत होता. एक दिवस स्कूल बस आली नाही म्हणून केतकी अनयला शाळेत सोडण्यास निघाली त्याला तिने शाळेत सोडले आणि परत येताना एका वळणावर मागून एका ट्रकने जोरात स्कुटीला धडक दिली. केतकी स्कुटीवरून रस्त्यावर फेकली गेली जोरात पडल्याने डोक्याला जबर मार लागला होता. रक्त वाहत होते. केतकीला रस्त्यावर पडलेली पाहून गर्दी जमली. केतकीने क्षणभर डोळे उघडले आणि ती म्हणाली “अनय, अनय” पण काही मिनिटातच तिने डोळे मिटले. जागेवरच तिने प्राण सोडले. जमलेले लोक हळहळ करू लागले. तिला दवाखान्यात हलवण्यात आले. पोस्टमारटम करून डॉक्टरांनी तिच प्रेत तिच्या लहान भावाच्या ताब्यात दिल. ज्या लहान भावाला तिला सांभाळायच होत त्याच्या हातात लाडक्या बहिणीच प्रेत होते. केतकीच प्रेत स्मशानात आल. अनयच्या हाताने केतकीला अग्निडाग दिला तेव्हा जमलेल्या महिलांच्या डोळ्यात अश्रू होते.