पुन्हा भेटशील ना!
पुन्हा भेटशील ना!
श्रेयस घाईघाईने निघाला होता त्याला एका मोठ्या कंपनीत मुलाखती घेण्यासाठी विशेष अतिथी म्हणून बोलावण्यात आले होते. तो तिथे पोहोचला पण त्याला त्या कंपनीचे नाव आठवत नव्हते त्याने एक कॉल केला तेव्हा समोरून आवाज आला “यस प्लीज” श्रेयस ने ओळखल समोरून कोणीतरी मुलगी बोलत असावी. त्याने सांगितलं “मिस प्लीज, मला तुमच्या कंपनीच नाव सांगता का”. “अहो आश्यर्यच आहे, तुम्हाला आमच्या कंपनीच नाव माहिती नाही म्हणजे”. श्रेयस म्हणाला “प्लीज गैरसमज करू नका, मी या लोकेशन पर्यंत पोहोचलो आहे पण मला नाव नाही आठवत हो”. “ओके वेलकम इन पूर्वी फार्माज”. मुंबई सारख्या शहरात अशा हजारो कंपन्या आणि ही कंपनी तर सोळाव्या मजल्यावर ती पण ठाण्याला. श्रेयस लिफ्ट मधून एकदाचा तिथपर्यंत पोहोचला. गेट पाशीच तो थबकला अतिशय चकचकीत अशा कंपनीत तो आला होता. श्रेयस तिथे आल्याचे कळताच दहा बारा मुलींचा एक घोळका धावतच त्याच्या जवळ आला त्यातल्या एकीने बुके देवून श्रेयसच स्वागत केल तर बाकीच्यांनी हातात हात देवून वेलकम केल.
एकीने सांगितलं, “सर प्लीज बसा ना आमचे देशपांडे साहेब येतीलच आता”. तेव्हढ्यात सुटाबुटात निळ्या रंगाचा गॉगल घातलेला एक तरुण तिथे आला आणि थेट केबिन मध्ये गेला एक तरुणी तिथे आली आणि श्रेयसला म्हणाली, “देशपांडे साहेबांनी तुम्हाला आत बोलवलं”. श्रेयस उठला आणि केबिन मध्ये गेला तेव्हा साहेब म्हणाले “वेलकम श्रेयस,प्लीज या”. गरमगरम कॉफीचा आस्वाद घेत श्रेयस म्हणाला, “साहेब काय सुंदर आहे हो तुमची कंपनी”, साहेब म्हणाले, “याच सर्व श्रेय आहे आमच्या स्टाफला”. थोड्याच वेळात शेजारच्या केबिन मध्ये मुलाखतीला सुरवात झाली. जवळ जवळ पाचशे तरूण तरुणी मुलाखतीला आले होते. श्रेयस एकेकाला सहज प्रश्न विचारून अडकवत होता अनेक जण पुस्तकांचा अभ्यास करून आले होते आणि म्हणून त्यांना श्रेयसच्या प्रश्नांचे उत्तर देता येत नव्हते. श्रेयसच आता गोंधळला होता एव्हढ्या रेपूटेड कंपनीत तो मुलाखतीसाठी आला पण अजून योग्य उमेदवार सापडत नव्हता १२ वाजेपासून मुलाखती सुरु झाल्या आता तीन वाजले होते मध्ये लंच ब्रेक होणार होता. पण तेवढ्यात केबिन च्या दरवाजावर नॉक करीत एक तरुणी म्हणाली, “मे आय कम इन सर”, श्रेयस म्हणाला, “यस प्लीज”. तिने समोर ठेवलेली फाईल उघडून तो वाचू लागला त्यावर तीच नाव होत श्रावणी कुलकर्णी. श्रेयसने फाईल बाजूला ठेवली आणि तो म्हणाला, “यस मिस श्रावणी कमीत कमी शब्दात तुमची ओळख करून द्या”. नंतरच्या काही मिनिटात श्रेयसच्या कानावर जे शब्द पडत होते ते एकूण श्रेयस अक्षरशा मंत्रमुग्ध झाला होता. भानावर येवून तो म्हणाला, “ओके मिस श्रावणी, तुमचा प्रोफाईल तर छानच आहे पण तुम्हाला का वाटत की हा जॉब तुम्हाला मिळावा”. श्रावणीच्या डोळ्यात पाणी होत श्रेयसच्या नजरेतून ते सुटल नाही तो म्हणाला, “सॉरी मिस तुम्हाला दुखावण्याचा माझा उद्देश नव्हता”. तेव्हढ्यात श्रावणी पोटतिडकीने म्हणाली, “सर मला माझ्या गरीबीच प्रदर्शन नाही करायचं येते मी”. श्रेयस जवळ उत्तर नव्हत. श्रावणी केव्हाच केबिनच्या बाहेर पडली होती. श्रेयसच्या डोळ्यासमोर श्रावणीचा चेहरा होता हसरा निरागस रेखीव आणि आकर्षक. उंच बांध्याची गोऱ्या वर्णाची काहीशा घाऱ्या डोळ्यांची श्रावणी गुलाबी रंगाच्या साडीत अधिकच खुलून दिसत होती.
लंच ब्रेक झाला श्रेयस देशपांडे साहेबांबरोबर लंच साठी गेला. अर्ध्या तासानंतर ते परत आले. देशपांडे साहेबांनी श्रेयसला मुलाखती परत चालू करण्यास सांगितले. त्यानंतर अनेक तरुण तरुणी मुलाखतीला येवून गेले पण श्रेयस ने दोन दोन मिनिटात त्यांच्या मुलाखती घेतल्या. मुलाखती संपल्या होत्या. आता रिझल्टची वेळ होती. श्रेयसने बेल वाजवून शिपायाला आत बोलावले आणि श्रावणीला आत पाठवण्यास सांगितले. बाकीचे तरुण तरुणी एकमेकांकडे पाहून कुजबुजू लागले. श्रावणी क्षणभर भांबावली पण लगेच सावरली आणि केबिन मध्ये गेली. श्रेयस म्हणाला, “या मिस श्रावणी, प्लीज बसा”. श्रावणी काही म्हणायच्या आतच श्रेयस म्हणाला, “मिस तुमच या जॉब साठी सिलेक्शन झाल आहे”. आणि श्रावणीच्या हात हातात घेत तो म्हणाला, “अभिनंदन”. श्रावणी म्हणाली, “खूप खूप आभारी आहे सर” तेव्हढ्यात श्रेयस म्हणाला, “मिस सर म्हणू नका मला, श्रेयस नाव आहे माझ”. श्रावणी म्हणाली, “ओके” तेव्हढ्यात श्रेयसने टेबल वरचे गुलाबाचे फूल उचलले आणि श्रावणीच्या हातात देत तो म्हणाला, “बेस्ट विशेष”. श्रावणीने फूल घेतले आणि ती पाठमोरी झाली तोच श्रेयस म्हणाला, पुन्हा भेटशील का? श्रावणी केबिनच्या बाहेर आली मुलाखतीसाठी आलेले बरेच जण तोपर्यंत निघून गेले होते. काही वेळातच श्रेयसने देशपांडे साहेबाना मुलाखतीचा रिपोर्ट दिला. त्यांनाही खूप आनंद झाला त्यांनी श्रावणीला आत बोलावून घेतले आणि ते श्रावणीला म्हणाले, “बघा मिस श्रावणी ह्या श्रेयसने तुमच सिलेक्शन केल आहे, तुम्ही उद्यापासून जॉबला या सकाळी १० वाजता”. देशपांडे साहेबांच्या शेजारी बसलेल्या श्रेयसकडे तिने पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर स्मित हास्य होत क्षणभर त्या दोघांची नजर एक झाली आणि लगेच ती देशपांडे साहेबांना म्हणाली, “हो साहेब मी तुमची खूप आभारी आहे, तुम्ही माझ्यावर जो विश्वास ठेवला आहे तो मी सार्थ करून दाखवील”. श्रावणीची मधुर वाणी ऐकून साहेबही अचंबित झाले. श्रावणी अदबीने दोघानाही हात जोडून नमस्कार केला व देशपांडे साहेबाना ती म्हणाली, “येते साहेब”.
संध्याकाळ झाली होती. ती घाईघाईने निघाली तिला सातची लोकल पकडायची होती तेव्हड्यात हॉर्न वाजला तिने मागे वळून पाहिलं एक स्विफ्ट कार तिच्या जवळ थांबली कारचा दरवाजा उघडत श्रेयस तिला म्हणाला, “मिस श्रावणी तुमची काही हरकत नसेल तर मी तुम्हाला घरी सोडतो”. श्रावणी गोंधळलेल्या अवस्थेतच म्हणाली, “अहो नको ना, मी जाईन”. श्रेयस म्हणाला, “आता एव्हड्यात पाऊस येईल बसा प्लीज”. त्याचा आग्रह पाहून श्रावणी ड्राईविंग सीट जवळ बसली. कार मध्ये बसतांना नकळत तिची ओढणी सरकली. पण तिला त्याच भान नव्हत. श्रेयस ची नजर मात्र तिला न्याहळत होती. श्रेयस हळुवार ड्राईविंग करत होता कार मध्ये हळू आवाजात गाण चालू होत तुमसे मिलके ऐसा लगा तुमसे मिलके अरमा हुये पुरे दिलके. सुमधुर गाण्यांच्या तालावर श्रावणीचे बोटही ताल धरत होते. श्रेयस म्हणाला, मिस श्रावणी कुठे रहाता तुम्ही? श्रावणी म्हणाली, “कल्याणला”, तेव्हा श्रेयस म्हणाला, अहो आपण तर जवळच रहातो. थोड्या वेळातच कार एका जुन्या इमारती समोर थांबली. श्रेयसने दरवाजा उघडला आणि श्रावणी खाली उतरली तिने श्रेयसला बाय केल श्रेयसने पण बाय केल आणि तो म्हणाला, “पुन्हा भेटशील ना”. श्रेयसने घराच्या दिशेने कार वळवली. तो घराच्या दरवाजातूनच ओरडला, “आई मी आलोय ग, वाढ जेवायला”. श्रेयसने फ्रेश होवून जेवण केल आणि तो लगेचच त्याच्या रूम मध्ये झोपण्यासाठी गेला. सकाळी त्याला लवकर ऑफीसला जायचं होत पण त्याला झोप येत नव्हती त्याला वाटत होते की श्रावणी उद्या भेटेल की नाही मनाशी निश्चय करून तो झोपला. श्रावणीने घरी नाना माईना जॉब मिळाल्याची आनंदाची बातमी सांगितली तेव्हा दोघांच्याही डोळ्यातून अश्रू वाहत होते तिने वाकून दोघांचाही नमस्कार केला माई म्हणाली, “बेटा श्रावणी दमली असशील, जेवण कर आणि झोप”. पण श्रावणी मुलाखतीला गेल्यापासून तर मुलाखत कशी झाली हे सगळ सांगत होती आणि नाना आणि माई ही कौतुकाने सर्व काही ऐकत होते. श्रावणीची अवस्थाही श्रेयस पेक्षा वेगळी नव्हती. तिच्या कानावर तेच शब्द पडत होते पुन्हा भेटशील ना!
श्रेयस सकाळी लवकरच उठला त्याने ठरवलं की श्रावणीला घेवूनच ऑफिस कडे जायचं पूर्वी फार्माज पासून काही अंतरावरच त्याच ऑफिस होत. श्रावणीचा जॉबचा पहिलाच दिवस होता म्हणून ती घाईनेच लोकलने निघून गेली होती. श्रेयस तिच्या घराजवळ येवून पोहोचला त्याच्याजवळ तिचा मोबाईल नंबर नव्हता. त्याने वाट पहिली तो तिच्या ऑफीस जवळ आला व तिची वाट पाहू लागला काही वेळातच श्रावणी आली तो पुढे येवून तिला म्हणाला, “छान दिसतेस, आज तुझ्या जॉबचा पहिला दिवस”. श्रावणी काही बोलायच्या आतच तो बोलला, “संध्याकाळी भेटू पुन्हा”. श्रावणीला काही सुचत नव्हते पण ती लगेचच पूर्वी फार्माज मध्ये गेली आणि कामाला लागली. कामात केव्हा सहा वाजले ते तिला कळलेच नाही कंपनीतले बरेच कर्मचारी निघून गेले होते ती ही लगबगीने निघाली खाली श्रेयस तिची वाट पहात होता. ती कार मध्ये बसली श्रेयस तिला म्हणाला, “काय कसा होता जॉबचा अनुभव”. श्रावणीने सांगायला सुरवात केली. श्रेयस मन लावून ऐकत होता. नकळतच तिच्या हाताचा स्पर्श त्याला झाला तिने हळूच हात मागे घेतला पण तरी तिचा हात हातात घेवून तो म्हणाला, “एव्हढा छान जॉब मिळाला पण तू त्याबद्दल काही पार्टी दिली नाही”. श्रावणी म्हणाली, “चला करू की आज सेलीब्रेट”. तिचा होकार मिळाल्यावर श्रेयसने कार जुहू बीच कडे वळवली.
सूर्य अस्ताला जात होता पण त्याचे प्रतिबिंब सागराच्या पाण्यात पडले होते. जुहू बीच वर मिळणाऱ्या पदार्थांचा आस्वाद त्यांनी घेतला. आता घरी जायची वेळ झाली होती. श्रावणी म्हणाली, “आता निघायला हव. श्रेयसने नकळत तिला जवळ ओढल आणि तिला मिठीत घेत तो म्हणाला, पुन्हा भेटशील ना! कार मध्ये बसल्यावर मात्र दोघही निशब्द झाले होते. असेच बरेच दिवस चालू राहिले. दिवसेंदिवस त्या दोघांमध्ये आकर्षण वाढू लागल. ते दोघही एकमेकांना वेळ देवू लागले. त्यांना घरी जायला ही उशीर होवू लागला. नाना आणि माईही चिंता करू लागले. श्रावणीला वाटू लागल की गतकाळात घडलेल्या घटना श्रेयसला सांगाव्या आणि मग श्रेयस कडून होकार आल्यावरच नाना माईला सांगावे.
नेहमीप्रमाणे संध्याकाळी ते दोघ जुहू बीचवर आले किनाऱ्यावर बसल्यानंतर श्रावणीने श्रेयसचा हात हातात घेतला आणि ती श्रेयसला सांगू लागली की, “आमची पिढीजात श्रीमंती होती. कल्याणला एका मोठ्या बंगल्यात आम्ही रहात होतो. आजोबांनी भरपूर संपत्ती कमावली पण वडील आणि तिन्ही काकांना ती सांभाळता आली नाही. जुगारात सारी संपत्ती ते हरले आणि बंगल्याची निलामी झाली. त्याचा धक्का आजोबाना बसला आणि त्याचं निधन झाल. माईच्या डोक्यावरही परिणाम झाला कसबस सावरत नानांनी माईचा इलाज केला.बंगला आणि संपत्ती गेली आणि आता या भाड्याच्या घरात आम्ही रहात आहोत. नाना मोलमजुरी करतात तर माई चार घरचे धुणीभांडी करते. आम्ही चार बहिणी आणि एक भाऊ. तिघी बहिणी आणि भाऊ जिल्हा परिषदेच्या शाळेत जातात. घराला आधार देणारी मीच मोठी आहे.” हे सांगत असताना तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते तिचे डोळे पुसत श्रेयस म्हणाला, “अग वेडे परिस्थिती बदलत असते, ती क्षमता तुझ्यात आहे आणि माझी तुला पूर्ण साथ राहील”. त्याच्या आश्वासनाने श्रावणीला हायस वाटल तिला मिठीत ओढत तो म्हणाला, “आता मला सोडून जाऊ नकोस”.
श्रावणीने घरी श्रेयस बद्दल सर्व सांगितले श्रावणीला जॉब मिळाल्यामुळे घरची परिस्थिती आता बरी झाली होती एक दिवस नाना आणि माई श्रेयसच्या घरी आमंत्रण देण्यासाठी गेले. श्रेयसच्या आईवडिलांनीही संमती दिली काही दिवसातच ते दोघ विवाहबद्ध होणार होते. श्रेयस आणि श्रावणी दररोज भेटत होते तरी दररोज निरोप घेताना श्रेयस म्हणंत होता पुन्हा भेटशील ना!