जन्मदाता
जन्मदाता
मे महिना प्रचंड उन्हाळा. दुपारची वेळ. आबा हॉलमध्ये टीवी पाहत होते तेव्हढ्यात टेलीफोनची रिंग वाजली आबांनी फोन उचलला आबांनी हेलो म्हणताच तिकडून आवाज आला आबा कधी येता माझ्याकडे? आबांनी काही बोलण्याच्या आतच “उद्या बसा मी येतो घ्यायला”. आबा काही बोलण्याच्या आतच तिकडून फोन कट झाला. आबा सोफ्यावर बसले. त्यांनी डोक्याला हात लावला. समोर त्यांच्या पत्नी आशाताईंचा फोटो होता. त्याचं लक्ष फोटोकडे गेल आणि ते हळू आवाजात बोलले “हाल करून गेलात ना माझे”.
दुसरयाच क्षणी ते सावध झाले. त्यांच्या लक्षात आल आपण जायला नकार दिला तर मनीष आणि नीता नाराज होतील. मनीष आबांचा लहान मुलगा आणि नीता त्यांची सून. मनीष बँकेत अधिकारी होता तर नीता गृहिणी होती. मनीष मुंबईला रहात होता. मुंबईच हवामान दमट. ते आबांना सहन होणार नव्हत पण आशाताई गेल्यानंतर आबांना जवळचा सहारा नव्हता. आबांना दोन मुली उषा आणि निशा लग्न होवून सासरी गेल्या होत्या. आबांनी तयारी सुरु केली. आता गेल्यानंतर परत घरी कधी येण होईल याची आबांना खात्री नव्हती म्हणून त्यांनी गोदरेज कपाटातून पासबुक, आशाताईचे दागिने आणि काही रोकड व आवश्यक कपडे आणि डायबीटीसच्या गोळ्या औषध ब्यागेत टाकले. रात्री गावात राहणाऱ्या लहान भावाकडे दत्ताकडे ते जेवायला गेले. आबांनी दत्ताला सांगितले की मी जाऊन येतो लवकरच मनिषकडून. दत्तानी पण होकार दिला.
आबा घरी आल्या नंतर पाणी पिवून झोपले. सकाळी पाच वाजताच ते उठले. त्यांनी आवरलं घराला कुलूप लावले. आशा ताईच्या फोटोकडे पाहून ते बोलले “येतो सांभाळा घर”. डोळ्यातलं पाणी टिपत ते रस्त्याच्या कडेला आले. रिक्षात बसून बसस्थानकावर आले. मुंबईला जाणारी बस लागलीच होती. आबा खिडकीजवळच्या जागेवर बसले. मध्ये बस थांबल्यानंतर एका ठिकाणी त्यांनी नाश्ता केला. आठ तासाच्या प्रवासानंतर ते मुंबईला पोहोचले. उतरल्यानंतर ते रिक्षाने मनीषच्या घरी पोहोचले. मनीष व नीताने त्यांच जोरात स्वागत केल. आबांच जेवण झाल्यानंतर ते विश्रांतीसाठी गेस्ट रूम मध्ये गेले.
आशाताई गेल्यानंतर आबा प्रथमच मनीषकडे आले होते. विश्रांती झाल्यावर नीताने त्यांना चहा दिला. चहा घेतल्यानंतर ते खाली गार्डनमध्ये फिरायला गेले. तिथे त्यांना समवयस्क भेटले. आबांनी त्यांच्याशी ओळख करून घेतली. फिरून आल्यानंतर आबांचे जेवण झाले. आबा झोपायला जाणार तोच मनीष म्हणाला “थांबा ना आबा थोड बोलायचं होत तुमच्याशी”. आबा थबकले आणि परत सोफ्यावर बसले. मनीष म्हणाला “आबा तुम्ही आता इकडच राहा”. आबा म्हणाले “अरे अस कस मी येत राहीन ना”. मनीषच्या डोक्यात वेगळेच विचार होते. आबा इथून गेले तर त्यांची संपत्ती ते सगळ्यांना वाटून टाकतील. मनीष आबांशी गोड बोलत म्हणाला “ठीक आहे आबा तुम्हाला जेव्हढे दिवस वाटेल तेव्हढे राहा”.
दुसऱ्या दिवशी आबा उठले. सगळ आवरून त्यांनी देवपूजा केली. मनीष आणि आबांनी एकत्र नाश्ता केला. मनीष बँकेत गेला. नीताही हॉलमध्ये येवून बसली. ती आबांना म्हणाली “आबा आई गेल्यानंतर तुम्हाला खूप एकट वाटत असेल ना”.
आबांनी मानेनेच होकार दिल्यावर ती म्हणाली “आबा आईंचे दागिने लॉकर मध्ये ठेवले असतील ना”. नीताच्या अनपेक्षित प्रश्नाने आबा गोंधळले आणि म्हणाले “नाही ग अचानक येण झाल म्हणून दागिने बरोबरच आणले”. त्याचं उत्तर ऐकून नीताला हायस वाटल. तिने मनीषला सांगितलं. त्या दोघांनी ठरवलं की आबांना इथून जाऊच द्यायचं नाही. ते दोघंही आबांशी प्रेमाने वागू लागले. आबाही खूष होते. एक दिवस मनीषने आबांना सांगितले की तुमच्याकडचे दागिने व रोकड आपण लॉकर मध्ये ठेवू या. आबांनी सर्व रोकड, दागिने व पासबुक मनीष जवळ दिले. आबांजवळ फक्त त्या महिन्याची आलेली पेन्शन शिल्लक होती. आबांना मुंबईला येवून महिना झाला होता.त्यांना घरची आठवण यायला लागली होती. एक दिवस अचानक आबांना पोटात दुखल्याचे निमित्त झाले. मनीषने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केल. डॉक्टरांनी लहान आतडयाला सूज असल्याचे सांगितले. सूज कमी होईपर्यंत आबांना हॉस्पिटल मध्ये रहाव लागणार होते. त्याच दरम्यान मुंबईत पाऊस सुरु झाला. मनीषच घर हॉस्पिटल पासून लांब होत. त्याची धावपळ होऊ लागली. पावसाचा जोर वाढू लागला तसतसे त्याला हॉस्पिटल मध्ये जाणे जमले नाही. नीता प्रेग्नंट असल्याने तिला डॉक्टरांनी जास्त हालचाल न करण्याचा सल्ला दिला. ईकडे आबांचे हाल व्हायला सुरवात झाली .त्यांना वेळेवर खायला मिळेना. तेथील नर्सच्या लक्षात आले की आबांजवळ कोणीच नाही त्या नर्सनेच मग आबांना चहा ब्रेंड द्यायला सुरवात केली पण आबांचे डोळे सतत दाराकडे लागून राहिले. त्यांना वाटत होत मनीष येईल आणि आपल्याला घरी घेवून जाईल. आबांना हॉस्पिटलमध्ये पंधरा दिवस झाले तरी मनीष तिकडे फिरकला नाही. खाणे कमी झाल्यामुळे आबांची तब्येत अशक्त झाली होती. बेडवरच असल्याने आंघोळ नाही. दाढी वाढलेली आणि अंगावर जुनेच कपडे अशा अवस्थेत आबा होते. त्यांच्या डोक्यात विचार चालू होते की आपण आपल्याजवळची सगळी रोकड, दागिने मनीषला देवून टाकले आणि आता आपला लाडका मुलगा ज्याच्यावर आपण जीवापाड प्रेम केल तो हॉस्पिटल मध्ये यायलाही तयार नाही. अशक्तपणामुळे आबा बेशुद्ध होऊ लागले. जेव्हा ते शुद्धीवर येत तेव्हा नर्स त्यांना चहा पाणी पाजत.
एक दिवस संध्याकाळी मनीष हॉस्पिटलमध्ये आला. आबांना ते जाणवलं, आबांच्या डोळ्यातून झरझर अश्रू वाहू लागले त्यांनी हातानेच मनीषला खुणावले जणू ते सांगत होते की मला घरी घेवून चाल. मनीषने फक्त त्यांना मान हलवून होकार दिला आणि तो निघून गेला. आबांना पाहायला उषा व निशा आल्या पण आबा व्यवस्थित आहेत असे म्हणून त्याने त्यांना निरोप दिला. त्याला भीती वाटत होती की आबांनी मुलीना काही सांगितले तर. नीताची डिलेव्हरी झाली. इकडे महिन्यापासून हॉस्पिटल मध्ये दाखल झालेल्या आबांची तब्येत अधिकच बिघडली ते कोणाला ओळखतही नव्हते. नीताला डिलेव्हरीचा खूप त्रास झाला. तिला गोंडस मुलगा झाला. मनीष तिच्याजवळ आला तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मनीषने तिला विचारताच ती म्हणाली “आपले आबा कुठंय”. मनीष भानावर आला तो हॉस्पिटल मध्ये पोहोचला. आबांच्या अंगावर पांढर पांघरूण टाकलेलं होत. जन्मदात्याला पाहून मनीष ढसाढसा रडू लागला. त्याच्या डोळ्यातून पश्चातापाचे अश्रू ओघळत होते.