प्रेमबंधन
प्रेमबंधन


प्रेमबंधन
सांजवेळ झाली होती सूर्य अस्ताला गेला होता पण त्याच्या तांबूस कडा डोंगराआडून दिसत होत्या. सकाळपासून बाहेर पडलेली सागर आणि भक्ती समुद्र किनार्यावर पाण्यात पाय सोडून बसली होती सगळीकडे निशब्द शांतता पसरली होती. भक्ती आता वैतागली ती ताडकन उठली आणि सागरला म्हणाली “चल आपली कोणीतरी घरी वाट पहातंय”. सागरही वैतागला, “अग काय तुझ बैस निवांत”. भक्ती म्हणाली, “इथे बसून प्रश्न मिटणार आहे का”. सागरने भक्तीला जवळ ओढल आणि तिला मिठीत घेत तो म्हणाला, “सांग आता परत कधी भेटशील”?
सागर आणि भक्ती एक वर्षापूर्वीच लोकल मध्ये भेटली होती सागर सिविल इंजिनीयर होता तर भक्ती एका खाजगी कंपनीत क्लार्क म्हणून नोकरीला होती सागर एका मध्यम वर्गातील तर भक्ती एका गरीब घरातील होती. सागर च्या निळ्या डोळ्यांनी भक्तीला आकर्षित केल तर भक्तीच्या रेखीव आणि हसऱ्या चेहर्या ने सागर मोहित झाला होता. दररोज सकाळी दहा च्या लोकल ने ते बरोबर जात होते. सकाळी लोकलला गर्दी असायची. बर्याच वेळेला ते दोघ सोबत असायचे पण संध्याकाळी परत येताना मात्र दोघांची चुकामूक व्हायची. सागर आणि भक्तीची ज्या दिवशी भेट झाली तेव्हा सागर सूटबुटात होता गडद जांभळ्या रंगाच्या कोटात त्याच व्यक्तिमत्व खुलून दिसत होत डोळ्यावर निळ्या रंगाचा गॉगल ही त्याने घातला होता त्या दिवशी एका मोठ्या कंपनीत त्याला मुलाखतीसाठी बोलवलं होत म्हणून लोकल मध्ये बसल्यानंतरही तो फाईल उघडून बसला होता. त्या दिवशी लोकललाही खूप गर्दी होती भक्तीही घाईघाईनेच लोकल मध्ये चढली गर्दीत तिचा पाय सागरच्या पायावर पडला तसा तो ओरडला ती सॉरी म्हणणार तेव्हडयात त्याने गॉगल बाजूला केला त्याचे निळे डोळे पाहून भक्ती क्षणभर त्याच्याकडे पहातच राहिली सागर म्हणाला, “अहो तुमच लक्ष कुठे आहे”? तेव्हा ती भानावर आली सागर ने तिच्याकडे क्षणभर पाहिलं अन परत तो फाईल उघडून वाचू लागला. पुढे दोघही एकमेकाशी न बोलता लोकल मधून उतरली आणि आपआपल्या दिशेने निघून गेली.
सागर कंपनीत पोहोचला. मुलाखतीला अजून दहा मिनिटे वेळ होता तेव्हढ्यात सागर अशी हाक त्याच्या कानावर आली तो पटकन उठला केबिन जवळ पोहोचला दारावर नॉक करून त्याने “मे आय कम इन सर”, असे विचारलं आतून “यस कम इन” असा आवाज आल्यावर तो आत गेला मुलाखतीला सुरवात झाली एकामागोमाग एक प्रश्न त्याच्या कानावर पडत होते आणि मोठ्या आत्मविश्वासाने तो उत्तर देत होता कधी न वाचलेल्या प्रश्नांची उत्तरही त्याने दिली. मुलाखत घेणाऱ्या जोशी साहेबांनी त्याला सांगितले की सागर उद्यापासून तू आमच्या कंपनीत जॉइन कर. सागर आनंदाने जोशी साहेबांचे आभार मानत बाहेर पडला. बाहेरच्या सोफ्यावर तो बसला त्याला अचानक भक्तीचा चेहरा आठवला त्या हसऱ्या चेहऱ्याने त्याला धीर दिला होता.
दुसऱ्या दिवशी सागर त्याच लोकल ने बसला आणि गर्दीत तो भक्तीला शोधू लागला भक्ती लोकल मध्ये एका कोपऱ्यात बसली होती त्याला भक्ती दिसली आणि गर्दीला बाजूला सरत तो तिच्याजवळ पोहोचला त्याने गुलाबाचे फुल भक्तीसमोर धरले ती क्षणभर भांबावली तिला काय करावे सुचत नव्हते पण सागरने नजरेनेच तिला खुणावले तिने लाजतच फूल घेतले तो तिच्याशेजारी जाऊन बसला आणि म्हणाला तुमचे आभार कसे मानू भक्तीला काही कळत नव्हते पण सागर मुलाखतीत तो कसा तिच्यामुळे यशस्वी झाला ते सांगत होता. भक्तीलाही तिने काही विशेष केले नाही असे वाटत होते पण सागर च्या नजरेत भक्तीचा हसरा चेहरा भरून राहिला होता. लोकलमधून उतरताना सागरने तिचा हात हातात घेतला आणि तो म्हणाला, “परत भेटशील ना”, तिने होकार दिला आणि तेव्हापासून दोघही बरोबर जाऊ लागली. तसे दोघही एकमेकांपासून दूर राहत होते पण दोघ एकाच लोकल ने ठरवून निघत होते. सागर दररोज एक गुलाबाचे फुल तिला देत होता भक्ती पण ते आनंदाने घेत होती.
भक्तीला आता वाटू लागले की असे आता किती दिवस चालायचे म्हणून तिने सागर ला समुद्र किनाऱ्यावर बोलावले होते. तिला सागर कडून लग्नाचा होकार पाहिजे होता जेव्हा तिने सागरला विचारले तेव्हा सागर म्हणाला “अग एव्हढी काय घाई”. भक्तीला त्याच अस बोलणं आवडल नाही तेव्हा सागर ने त्याच्या घरची कहाणी सांगायला सुरवात केली. सागरची आई आजारी होती तर वडीलांची देखील हार्टसर्जरी झाली होती सागरच्या तिन्ही बहिणींचे लग्न बाकी होते आणि ती जबाबदारी सोडून तो लग्नाला तयार नव्हता. अशा परीस्थितीत तो भाक्तीलाही सोडायला तयार नव्हता त्याची विवंचना पाहून भक्तीने त्याला मदत करण्याचे आश्वासन दिले सागरच्या तिन्ही बहिणींचे लग्न भक्तीने घडवून आणले फावल्या वेळात ती सागरच्या घरी जावून त्याच्या आईची मदतही करू लागली सागरला जणू देवदूत भेटल्या सारखेच वाटू लागले त्याची आई बरी झाली हे सर्व घडून आले होते भक्तीच्या सकारात्मक भूमिकेतून. सागर भक्तिमय झाला होता आणि भक्तीही सागरात अथांग बुडून गेली होती. आता दोघानाही अडवणारे कोणी नव्हत सागर आणि भक्तीच्या आईवडिलांची मूक संमती मिळाली आणि मोठ्या आनंदाने दोघही विवाहबद्ध झाले सागर भक्तीत तल्लीन झाला होता. दोघही प्रेमबंधनात अडकले होते.