Chitra Nanivadekar

Tragedy

4  

Chitra Nanivadekar

Tragedy

सखे कृष्णे…

सखे कृष्णे…

8 mins
1.3K


 तुझ्या अंगाखांद्यावर खेळत वाढलो की ग आम्ही. कालपर्यंत सुखदुःख च्या गोष्टी करत आम्ही सासुरवाशीण आमच्या मनातील सल तुझ्या काठी मोकळे करत असू. एक वेगळा हक्क असायचा तुझ्या वर. तुझ्या पाण्यात कित्येकदा आमच्या डोळ्यातले खारट पाणी मिसळले. माहेरचा घाट सोडून कृष्णेच्या काठावर आलो. प्रथम 'ह्यांनी' फिरायला म्हणून तुझ्या किनार्‍यावर आणले… आणि तुझ्या साक्षीनेच लाजाळू स्पर्शात एकमेकांना समजून घेतले. 

   वाड्यातील समदुःखी सासुरवाशीण कपडे धुण्यासाठी, धान्य सुकवायला म्हणा तुझ्या काठावर यायचे बहाणे शोधत असू… कोणी पाहुणे आले की कौतुकाने आमच्या गाव चे कृष्ण वैभव दाखवायला घेऊन येतो. छोट्या मल्हार च्या वेळी संध्याकाळी तुझ्या काठावर फिरायचे जणू डोहाळे लागले होते. हे चेष्टेने म्हणायचे "काय ग माहेरी बरोबर कृष्णेचे पाणी नेतीस होय?" आमच्या दुष्काळी भागात कोरड्या ठक्क नद्यांच्या समोर तुझे दुथडी भरून वाहत असणे मला कित्ती आवडत असे हे काय ह्यांना सांगणार. तुझे असणे हा आमच्या जगण्याचा भाग. आमच्या भागाची शान. सार्थ अभिमान. तुझ्या पाण्यावर वाढलेले धान्य, भाजीपाल्याची चव चाखली आणि दुनियेतील सगळ्या चवी तुच्छ वाटत असत. 

   …. आणि परवा च्या कडेलोट पाण्याचे तुझे रुद्र रूप बघितले. आधी घरातील सगळ्या माणसांनी एकमेकांना धीर देत पाऊस थांबण्याची वाट पाहिली. सकाळी अंगणात पाहिले तर तू आमच्या भेटीला पायरी पर्यंत आलीस. नेहमी आम्ही तुला भेटायला येतो आज तू आमच्या दारी आलीस. तुझ्या काठी आलो की आम्हाला पाहून तूला आनंद वाटतो. पण आमच्या मात्र उरात धडकी भरली. अग आमच्या घरातील एकेक वस्तू तुझ्या उदरात गडप व्हायला लागल्या.एका फटकारा सरशी काडी काडी जमवलेला आमचा संसार अक्षरशः रस्त्यावर आला. माझ्या मल्हार च्या शाळेचं दप्तर, सासूबाईंच्या बेगमी च्या वस्तू, सासर्‍यांच्या शेतीची अवजारे ह्यांच्या कामाची कागदपत्रे आणि भावजीं च्या कॉलेज ची बुके, सगळे डोळ्यासमोर वाहून जाताना पाहिले. दोन माणसानी उचलू म्हणता उचलता येत नसलेलं सामान तुझ्या एका फटक्यात वाहत जाताना बघत होतो आम्ही. माझ्या भिशी च्या पैशातून घेतलेला फ्रीज जातांना बघून मी वेड लागल्या सारखी मागे धावले. ह्यांनी अडवून म्हटले "खुळी झाली ? आपल्या जिवा परीस फ्रीज मोठा असतय होय? " असा जीव जळला. 

   आमच्या डोळ्यातील पाण्याला खीळ नव्हता आणि तू मात्र "जटा पिंजून ह्या लाटा" प्रमाणे सगळ गिळंकृत करत होतीस. कसला एवढा राग तुझ्या मनात खदखदत होता. आम्ही तरणी माणसं मुलांना आणि म्हातार्‍या माणसांना सावरत होतो. पण आमच्या पाठीवर कोण हात ठेवणारे ? बाहेरची पूरस्थिती समजून कमांडोज येऊन एकेकाला स्थलांतरित करत होते. 

    आम्ही मात्र, सगळ्या घराचा कानाकोपरा गुंडाळून घ्यायच्या नादात सगळेच हरवून बसलो. गावच्या हद्दीतील शाळेत रात्र काढली. कोणी कोणी पाकिटातून पाठवलेले अन्न खाऊन पाणी उतरण्याची वाट पहात एकमेकांना धीर देत होतो. अंगावर गच्च भिजलेल्या कपड्यात बाहेरच्या वार्‍याने कुडीत नुसती हुडहुडी भरली होती. पण लेकरांना उराशी धरून बसलो. कंदिलाच्या उजेडात भकास चेहर्‍याने एकमेकांच्या नजरा चुकवत वावरत होतो. बाया माणसांना साडी काडी भाकर तुकडा ह्याची खंत होती. आणि बापयां गड्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते. 

    किराणा भुसारी वाला चंदू शेठ, चंपक लाल सोनार, लड्डू परीट, भाजीवाली शांताबाई , रामा दूधवाला, शेत मजुरी करणारे सगळे एकत्र जमून कोरड्या नजरेने कृष्णे तुझ्याकडे पहात एकमेकांना सांगत होते की "आपण पार तीन वर्षे मागे गेलो की… सण उत्सव तोंडावर आलेत म्हणून सगळा माल भरला होता. आधीच धंदा मंदी मधी चालतोय त्यात हे अस्मानी संकट… कोणाला सांगणार? " खरच!! पहाडा सारखी माणस मातीच्या ढिगळा प्रमाणे ढेपाळली होती. 

    कृष्णे एक मात्र नक्की कळलं जगातल्या कानाकोपऱ्यातून लाखो हात मदतीसाठी पुढे आले. जात, धर्म, पंथ, पक्ष, नेते, राजकारणी ह्या सगळ्या भिंती कोसळल्या आणि निव्वळ माणुसकीचे दर्शन झाले. 

सखे!!! तूला हेच तर अभिप्रेत नव्हते ना? कारण आजकाल अत्यंत व्यावहारिक, स्वकेंद्रित, आपल्या पुरते बघणारा, पैशाचा माज आलेला. असा समाज फोफावला आहे. हे खटकले का तुला? माणसातली माणुसकी जागी करण्या साठी तू असे भयानक रूप घेतलेस का ग? शहरातील माणसे टीव्ही तील दृश्य बघून गावच्या मदतीला धावले. मेडिसिन म्हणू नकोस, अंथरुण पांघरूण म्हणू नकोस अगदी स्त्रियांची लाज राखणारी अंतर्वस्त्रे, पॅड्स सुद्धा पुरवले… आम्ही लाज विसरून हात पुढे केले. सरकार सुद्धा पुढे सरसावले. तेवढ्यात ब्रह्मनाळ ची बातमी आली. माणसांनी भरलेली बोट तूझ्या पाण्यात उलटली. माझ्या काळजात लक्क झालं. आमच्या सासूबाईंच माहेर. त्यांचे म्हातारा म्हातारी ऐकलेच राहतात. आम्ही कित्ती सांगतो आमच्यात रहावं. पण त्यांना सगे सोबती गावकरी ह्यांना सोडू वाटत न्हाई. आई म्हणतात "स्वतः चा अभिमान सोडायला तयार नाहीत ते. जुनी माणसं एकवेळ मरण पत्करतील पण जावयाच्या दारात पडणार न्हाई." मला ब्रह्मनाळ चं ऐकून खूप धाकधूक लागली होती. हे आणि भाऊजी दिवस रात्र गावात फिरून बातम्या काढत होते. मी सासूबाई जवळ बसून राहिले. छोटा मल्हार थोड्याच वेळात आजूबाजूच्या मुलांमध्ये खेळात रमला. किती निरागस असतात मुलं? आपल्या विश्वात दंग. मी मात्र मनोमन आई अंबाबाई ला साकडं घालत होते अरिष्ट टळू दे… आमच्या वर कृपा दृष्टी ठेव. माये अष्टमीला अनवाणी पायाने येऊन तूझ्या गाभाऱ्यात नाक घासीन. खणा नारळाची ओटी भरीन. त्या कोपऱ्यात एका सतरंजी वर सासरे आडवे झाले पण फक्त पाठीला आधार. झोप तर कोणालाच येत नव्हती. दारात ह्यांना येताना बघून मी हळूच सासूबाई जवळून उठले. 

"काय हो? आज्जी आबा बरे आहेत ना? काही समजल? "अधीरतेने विचारलं. 

"व्हय !!नशिबाने वाचलं दोगं… पर.. !!"

"पण काय? अहो इकडे घेऊन या त्यांना आपल्यात राहतील इथून पुढं… त्यांच्या अभिमानाचे काय लोणचं घालायचं? उद्याच्याला निघा आणि दोघांना हिकडे आणा. "

"सरू.. !अग कस सांगू तूला? म्हातारं जणू भ्रमिष्ट झालंय.. खुळ्या वाणी करतंय.. त्याची रोकड, दागिना, जिमिनी ची कागद पत्र सगळं एका गाठोड्यात ठिवलं होतं आन ते उराशी धरून त्यो म्हणे घराच्या ओसरी वर बसूनच होता. आज्जी नं किती इनवण्या केल्या पण घर सोडायला तयारच न्हवता. शेवटी सोपा पार करून खाटलं तरंगू लागलं तेव्हा कूट बोटीत बसायला तयार झालं. तीच बोट उलटली. "

माझ्या छातीत धडकी भरली. सत्तर पंच्यात्तर वय दोघांचं. 

"मग हो? बरे आहेत ना दोगं? "

"व्हय.. आज्या पट्टीचा पोहणारा त्यो पोहत किनाऱ्यावर पोचला आन आक्रोश करकरून त्याने कमांडो ना आज्जी ला हुडकून काढलं… "

"नशीब !!!...मी काय म्हणते हिकडे भाऊजी बघतील सगळं. आपण जाऊ ब्रह्मनाळ कड आणि दोघांना घेऊन येऊ. माजा जीव थाऱ्यावर नाही. "

"येडी का खुळी तू? बशी पाण्यात बुडाल्या, रस्ता म्हणजे जणू नदी झालंय आपला जीव धोक्यात टाकण्याची रिस्क घ्यायची? "

एका परीनं त्यांचं पण बरोबर होतं. रात्रभर आम्ही तिघे मी, हे आणि भावजी व्हरांड्यात जागत, चर्चा करत बसलो. सकाळी पाऊस थांबला. अंगावरची कापडं थोडी सुकली. मी हळूच सासूबाईंना उठवून बाहेर बोलावलं आन आबा आजी बद्दल सांगितलं. त्यांच्या डोळ्याला धारा लागल्या. म्हण मला आत्ताच्या आत्ता घिऊन चला वसगड्याला मला डोळ्यांनी बघू दे त्यान्ला. . त्यांना कसबसं शांत केलं. पण आम्ही दोघांनी जायचं ठरवलं. 

  ब्रह्मनाळ ला जाणारं एखाद वाहन मिळेल म्हणून आम्ही दोघ रस्त्यावर ठाण मांडून बसलो. दुपारी एक बस आली. पलूस ला जाणार होती. वसगडा ला पोहचलो तेंव्हा सांज उतरली होती. आमच्या पायाखालची वाट पण आज चारही दिशांनी निस्ता राडा कालवल्यागत चिखल आणि प्लास्टिक चा खच पडला होता. गावावर अवकळा पसरली होती. आमच्या गावा पेक्षा भयानक परिस्थिती होती. चालीस माणसं घेऊन येणारी बोट उलटली, कोणाच्या लेकरांचा पत्ता नाही तर कोणी मायबापाला हुडकत फिरत होती. सगळीकडे अश्राप जनावरे मरून पडलेली दिसत होती. कित्तीतरी जनावर उघड्या डोळ्यातून आपल्याला ला कोणी वाचवेल ह्या अपेक्षेने जणू वाट बघता बघताच प्राण गमवून बसले होते. कोण कोणाची समजूत घालणार? 

त्या सगळ्या राड्या कडे बघून लक्षात येत होतं हळूहळू की आम्ही माणसं कित्ती अनावश्यक प्लास्टिक वापरत असतो. 

आबांच्या शेजारच्या घरात सहा महिन्याचे लेकरू होते. त्या सोनुली ला घेऊन आमची आजी नुसता आक्रोश करत बसली होती. येणाऱ्या प्रत्येकाला विचारत होती "ह्या लेकराची माय हुडकली का वं? "आणि प्रत्येक जण तिचा डोळा चुकवून पुढं जात असत. मला तेव्हाच कळून चुकलं सोनुली ला पोरके करून तिची माय येश्वदा गेली असणार. वसगड च्या शाळेत सगळ्या पूरग्रस्त नागरिकांना ठेवलं होतं. बाहेरून कोणी कपडे, कोणी बिस्कीट पाठवत. आमच्या आज्जेला मात्र नऊवारी लुगडं कोणीच दिलं नाही. ती कोपऱ्यात छोट्या सोनी ला कुशीत घेऊन बसली होती. आबा स्वतःचे किडुक मिडूक शोधायच्या मागे लागलं होतं. त्यांना पण धोतर कोणीच दिलं नव्हतं. मी येताना मला मिळालेल्या एक इरकल आणलं ते आजी ला बळ नेसायला लावली. ह्यांना बाजूला घेऊन म्हटलं सोनू ची आई बोटीत बुडाली बहुतेक पण राजा भाऊ कुटं कोणाला दिसलं का विचारा जरा. एकदा का त्यांच्या स्वाधीन सोनू ला केलं का आपण ह्या दोघांना घिऊन जाऊ. तंवर मी आजी चे मन वाळवते. 

   आजी कोरड्या ठक्क डोळ्यांनी मला सांगू लागली. कसं पाणी हाहा म्हणता चौफेर वाढू लागलं. मला माझ्या पेक्षा ह्या लेकरा ची आणि तिच्या आईची यशवंदे ची काळजी होती. बिचारी आई बापा विना पारखी पोर. बाळंतपणात मला दहा येळा विचारू विचारू सगळं करायची. ती माझी आणि म्हाताऱ्या ची लई काळजी घ्यायची. पोस्टात जाऊन पत्र आणायची, भाजी म्हणू नकोस, वाळवंण म्हणू नकोस सगळं करायची नऊ महिन्याचे पोट घेऊन अशी भिंगरी वाणी फिरायची तुझं आज्ज काल बोटीत बसायला तयारच न्हवता पण राजा ने आणि तिने दादा आता आला नाहीत तर आम्हाला जित्त बघणार नाही बुवा असा दम भरला तेव्हा कुटं तयार झालं. आधी आज्जा ला बसिवल मग मला.. माझ्या मांडीत ह्या लेकराला घातलं आन तेवढ्यात शिर्के कडचं पाहुनी आली. त्यांना बसिवल. अजून एका दोघांना बसवलं. माझ्या कडे येश्वदे नं दुधाची बाटली देत म्हटली आई मी आहे मागे. तुमच्यकडे राहूदे सोनू की देता? म्या म्हटली अग झोपलीये माझ्या मांडीवर. हा काय शाळेचा झेंडा दिसतोय. अर्ध्या तासात पोहचू तू उगा चालत्या नावेत इकडे तिकडे करू नकोस आत्ता पोहचू…. आणि सरू काय सांगू तूला मध्यावर उलटली ग नाव… बोलता बोलता.. आजी चे डोळे वाहू लागले. 

मी सोनू ला माझ्या कवेत घेतली आन आज्जे ला म्हटलं "चला घरला जाऊ. हिच्या आई बापाला शोधून आणू आपण . सासूबाई तुमच्या वाट कड डोळे लावून बसल्याती. "

  पण म्हातारीनं अजूनच सोनू ला छातीशी कवटाळत माझा हात हासडत म्हटलं "मोठी आलीये मला न्यायला. आदी हिची माय हुडक मगच मी येईल "

तिकडं आबा केस पिंजारू पिंजारू आक्रोश करत होते. आम्ही रात्रभर त्यांची समजूत काढत घालवली. 

   सकाळी मी पावडर चे दुध सोनू ला पाजलं. पोर पावसानं, रडण्या मुळे तापली होती. ह्यांनी एका ट्रॅक्टर वाल्याला गळ घातली तो आमच्या गावचाच होता. पण आबा हट्टी पणा सोडत नव्हतं. मी सोनी ला माझ्या मल्हार बरोबर ठेवीन. असे कबूल केले तेव्हाच आजी यायला तयार झाली. आपसूक आबा सुद्धा आले. 

  सखे !!!चार दिवसा च्या रुद्र अवतारातून आता तू थोडी शांत झालीस पण माझ्या अख्ख्या संसाराची तू दशदिशा केलीस. हरकत नाही… 

कृष्णे सावरतोय हळूहळू. 

    

   एकमेकांना म्हणतोय "भिंत खचली चूल विझली… मोडला नाही कणा…iपैसे नको सर फक्त लढ म्हणा!!!" 


Rate this content
Log in

More marathi story from Chitra Nanivadekar

Similar marathi story from Tragedy