Jyoti gosavi

Abstract

2.5  

Jyoti gosavi

Abstract

मी एक मूर्ख श्रोता

मी एक मूर्ख श्रोता

5 mins
1.0K


आता, तुम्ही असं म्हणाल की श्रोता असण त्यात एवढं काय मोठं, आणि त्यात वाईट काय आहे? सारेजण कधीनाकधी श्रोत्याच्या भूमिकेत असतात. त्यातूनच कोण्या महाभागाने म्हटलं ना! की आधी उत्तम श्रोता बना ,तरच उत्तम वक्ता बनवता येईल.


पण माझं असं झालंय की लोकांना मी एक मूर्ख श्रोता वाटते का? असा मला प्रश्न पडतो. म्हणजे कोणीही यावं आणि मला काहीही सांगावं ?काहीही थापा माराव्या? की त्या मला पटल्याच पाहिजेत. अगदी शालेय जीवनात सुद्धा असंच होतं. माझं शिक्षण झालं एका खेडेगावात, ज्या काळात मुलींचं शाळेतील प्रमाण अत्यंत कमी त्यातूनही वर्गामध्ये सर्व मुलींमध्ये मी लहान. सातवी-आठवीत असताना जेव्हा बाकीच्या मुली पंधरा-सोळा वर्षे वयाच्या होत्या तेव्हा मी बारा वर्षाची होते त्यामुळे त्यांची सारी गुपीते मला येऊन सांगत असत .कोणाला कोण आवडतो आणि कोण आज तिच्याकडे बघून हसला वगैरे, कारण त्या काळात इतपतच मर्यादा होती .कदाचित मी लहान आणि याबाबतीत निरूपद्रवी त्यामुळे त्या बिनधास्तपणे त्यांच्या सार्‍या गोष्टी मला येऊन सांगत व अशी त्या काळापासून माझ्याकडे श्रोत्याची भूमिका आपोआप आली.


त्याच्या आधीच्या वयात अनेक मैत्रिणी, माझा मामा कसा सिनेमाचा हिरो आहे या गोष्टींपासून ते माझ्या मामाने चंद्रावर बंगला बांधलाय व आम्ही त्यात जाऊन आलो इथपर्यंत साऱ्या गोष्टी चढाओढीने सांगत व ती कशी खोटी मी कशी खरी हे देखील पटवून देत व मी देखील त्यांचे म्हणणे शंभर टक्के मला पटल्याचा व ते खरे असल्याचा निर्वाळा मान हलवून देत असे. खरेतर तो माझ्या अभिनयाचा भाग असावा, मनातच आणले असते ना! तर श्रीदेवी, रेखा, हेमा यानंतर माझाच नंबर लागला असता. पण मी तो विचार स्थगीत केल्याने देश एका महान अभिनेत्रीला मुकला.


कॉलेजमध्ये गेल्यावर माझ्या एका मैत्रिणीचे अफेअर तुटले, तिचा जो बॉयफ्रेंड होता ना! त्याला मी चांगल्यापैकी ओळखत होते त्याचे आजोळ आमच्या गावातच होते . एकदा कुठे त्याला सहानुभूती दाखवली आणि मी स्वतःचे हात दाखवून अवलक्षण केले. तो जो त्याची दर्दभरी कहाणी मला ऐकवत राहिला ती तब्बल तीन वर्षे. प्रथम भेटेल तेव्हा सांगू लागला त्यानंतर नोकरी निमित्ताने मी दुसऱ्या गावी गेले तर मला पत्राने कळवत राहिला. दर दोन दिवसांनी त्याचा बंद लिफाफा हजर, वाचून वाचून मी पार कंटाळले शेवटी तर मला असे वाटू लागले की त्याला डच्चू देण्याचा गुन्हा माझ्या मैत्रिणीने केला नसून मीच केला आहे. मी स्वतःला दोषी मानू लागले की देवा या दोघांबरोबर मी मैत्री कशाला केली? वरून दर दोन दिवसांनी लिफाफा पाहून कामावरचे सहकारी गालातल्या गालात हसू लागले. त्यांचा गैरसमज झाल्याचे माझ्या लक्षात आल्याबरोबर मी ते पत्र सर्वांना उघडून दाखवले. नंतर आम्ही त्याचे सामुदायिक वाचन करू लागलो. शेवटी माझ्या एका दुसऱ्या मैत्रिणीने सल्ला दिला प्रथम त्याला उत्तरे देणे बंद कर त्याची येणारी पत्रे वाचू नकोस तशीच फाडून फेकून दे, त्याप्रमाणे मी वागल्यानंतर तीन वर्षांनी त्याच्या दर्दभऱ्या कहाणीतून माझी सुटका झाली.


अशी मी लहानपणापासून बळीचा बकरा बनत आलेली आहे. माझ्या बहिणी सुद्धा खुशालीच्या वेळी, आनंदासाठी फोन करणार नाहीत. माझ्या सुखा दुखात देखील फोन करणार नाहीत. पण त्यांच्या मुलांनी त्यांच्या दृष्टीने काहीतरी भयंकर केले मग मात्र मी श्रोता. माझ्या एका बहिणीच्या मुलीने पर जातीमध्ये पळून जाऊन लग्न केले मग त्या बहिणीने रडून-रडून तेच ते मला सहा महिने ऐकवले. नंतर त्या मायलेकी गोड झाल्या आणि मग मात्र, मावशीचं असं म्हणाली मावशीच तसं म्हणाली असं करून फोन, संभाषण सारे बंद .आता केव्हाही बहिणीकडून फोन आला की तिच्या मुलाने, सुनेने काहीतरी केलंल असतं व त्याचे रडगाणे सांगायला तिला श्रोता हवा आहे हे मला समजतं .मात्र मी तितक्याच आपलेपणाने ही श्रोत्याची भूमिका आजही बजावत असते


इतरांचं कमी झाले म्हणून की काय माझी कामवाली बाई ती पण तीचा दुखडा, तिला सुट्टीदिवशी मी घरी सापडले की मला ऐकवत असते.

तिचा नवरा दारू पितो, मारतो, तिची मुलगी कशी एका रिक्षावाल्या बरोबर पळून गेली इथपर्यंत ठीक होतं .पण आता तिच्या दहावी नापास, मामाच्या हाताखाली सुतार काम करणाऱ्या, स्वतःचे घरदार नसलेल्या मुलाला ग्रॅज्युएट आणि बँकेत काम करणारी मुलगी सांगून आली आहे. तिचा मुलगा काळा बेंद्रा, पण मुलगी मात्र गोरी पान आहे मोटरसायकल, वरून दोन लाख हुंडा वगैरे. अगं हो! हो !थापा तरी किती मारशील? आणि स्त्री जातीचे किती अवमूल्यन करायचं.


माझी अजून एक मैत्रीण आहे तिचा मुलगा फॉरेन ला गेला ,सहा महिन्यात मॅनेजर देखील झाला मी पण लगेच तिला भविष्यात त्याला संचालक पदावर घेऊ दे असे म्हणत शुभेच्छा दिल्या .जेव्हा युतीचं सरकार होतं तेव्हा तिच्या नवऱ्याची बाळासाहेबांशी खासम खास असल्याबाबत सांगितलं, जेव्हा पुन्हा पाच वर्षांनी काँग्रेस सरकार आलं तेव्हा तिची एक फॉरेन मधली भाची डायरेक्ट सोनिया गांधीच्या नात्यांमध्ये निघाली. तिचा डॉक्टर नवरा खरेतर साधा एमबीबीएस डॉक्टर, पण अख्खे आरोग्य खाते त्याच्या शब्दावर चालते, तो खात्याचा सर्वासर्वो असल्याबाबत ठाम विश्वास आहे. महाराष्ट्राचे काय साऱ्या देशाचे आरोग्य खाते त्याच्या शब्दावर चालते असे ती विश्‍वासाने सांगते. कोणाची बदली होणार असेल तर ते तिला सर्वात आधी माहित पडते व माझ्या नवऱ्याला भेटा तो तुमची बदली कॅन्सल करून देईल, असे ती सांगते. मात्र, तिची स्वतःची बदली एका भागात झाली ती तो रोखू शकला नाही. तिचे प्रमोशन तो करू शकत नाही हे धादांत सत्य मी डोळ्याआड करते.


माझी एक नणंद एकदा सांगत होती कि तिची लहान बहीण ट्रेकिंगला जाते. इथपर्यंत ठीक, पण एका महिलादिनी सीएसटी स्टेशनचे जे वरती कळस आहेत त्याला रस्सी बांधून माझी नणंद या टोकापासून त्या टोकापर्यंत गेली तेव्हा माझ्या डोळ्यासमोर डोंबाऱ्याचा खेळ आला. बरं सीएसटी स्टेशन हे नॅशनल हेरिटेज म्हणून घोषित आहे तिथे हिला कसे काय रश्शा बांधून चालायला देतील? आणि ट्रेकिंग करणे म्हणजे काय डोंबाऱ्याच्या खेळा सारखं या रश्शां वरून चालायचं थोडं असतं? माझ्या डोळ्यासमोर तसं दृश्य आलं आणि मी स्वतःशीच हसू लागले. बरं ! ती स्वतः डोंबिवलीमध्ये वन रूम किचन मध्ये राहते म्हणजे एक बेडरूम सुद्धा नाही. आणि ती पार्ल्याला टू बीएचके चे दोन दोन फ्लॅट असल्याचे सांगते तेव्हा मला तिची कीव करावीशी वाटते. पण तरीही मी श्रोत्याची भूमिका उत्तम पार पडते.


अशी कितीतरी थापेबाज मंडळी आयुष्यात भेटतात ज्यांचे नवरे /मुलगे प्रायव्हेट कंपनीत ऑफिसरच असतात. त्यामुळे कंपनीमध्ये वर्कर म्हणून कोणी असतो की नाही याबद्दल मला शंका येते. कित्येकांची मुले नातेवाईक फक्त अमेरिकेत असतात मग त्यांना दुबई ,जपान फ्रान्स, ऑस्ट्रेलिया हे देश वर्ज्य आहेत का? शिवाय सगळ्यांच्या मुलांना दहावी-बारावीला नव्वद- पंच्याण्णव टक्क्याच्या वरच मार्क मिळतात. कोणाची कधी नापास होतच नाहीत आणि कमी मार्क देखील मिळत नाहीत मग बोर्ड जे एवढी नापासांची यादी सांगते किंवा कमी टक्के वाले असतात ते कोठून येतात? मुंबई चाळीत राहणाऱ्या लोकांची गावी खूप मोठी शेतीवाडी असते खरंतर त्यांना या नोकरीची गरज नसते पण उगाच मुंबईच्या कल्याणासाठी हे लोक मुंबईत राहतात अशा थापा मारणारे भैया बहुसंख्य आणि मराठी माणूस देखील मागे नसतो .


 या सार्‍या गोष्टी मला कळून ही न कळल्या प्रमाणे दाखवते जाऊदे तेवढेच बिचार्‍यांना समाधान प्रत्येक श्रीमंत-गरीब उच्च स्वप्ने बघत असतो आणि ती अशी दिवास्वप्ने कधीतरी कोणाला तरी ऐकवायची असतात कोणाला आपल्या मनात खदखदणारे कुठेतरी ओकायचे असते कुठेतरी मनाचा निचरा करायचा असतो. व्हेंटिलेट व्हायचे असते बोलू देत बिचार्‍यांना. त्यातून मी असा प्रोफेशन स्वीकारलेला आहे की जेथे ऐकून घेणे फारच गरजेचे असते ते म्हणजे मी आहे मनोविकृती तज्ञ परिचारिका त्यामुळे ऐकायचा आणि ऐकून घेण्याचा शांतपणा आपोआप आला त्याची एका समंजस श्रोत्याची भूमिका आपोआप वाट्याला आली आता एवढा सारं रामायण वाचल्यानंतर कोणाला आपला दुखडा ऐकवायचा असेल तर या बापडे! अल्वेज वेल्कम आणि तुमचे गुपित गुपितच राहील याची खात्री बाळगा बरं!


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract