निवडणुकीचे वारे
निवडणुकीचे वारे
निवडणुकीचे वारे बाळासाहेब नेहमी म्हणायचे "राजकारण आणि गजकरण" एकदा झाले की जाता जात नाहीत. तद्वत परिस्थिती आताची आहे. टीव्हीवर एकेकाचे फ्री मध्ये शो बघायला मिळतात. कोणी डोळे मोठे करत फिट येऊन पडतंय, कोणी एखादं घरच मेल्यासारखं लोळून लोळून रडतंय, तर कोण दुसऱ्याचा एबी फॉर्म खाऊन टाकतय. अरे काय म्हणाव या वृत्तीला प्रत्येकाला फक्त पद पाहिजे, सत्ता सुंदरीशी जवळीक पाहिजे, कार्यकर्ता कोणालाच व्हायचं नाही. निरपेक्ष वृत्तीने जनसेवा किंवा पक्षाचे काम या तर स्वप्नातल्या गोष्टी राहिल्या. आताशा अचानक कोणाचे पोस्टर ,मग ते वाढदिवसाचे असो, नाहीतर कुठल्या कामाचे असो, असे भूछत्रासारखे दिसू लागले की समजायचं काही दिवसांनी साहेबांना नगरसेवक होण्याची स्वप्न पडत आहेत. वरून साळसूदपणा असा असतो! की मला जनतेची सेवा करायची आहे माझ्यासाठी काही नको. अरे तुझ्यासाठी नको ना? मग पद नसताना पण तू जनतेची सेवा करू शकतोस. महिला आणि पुरुष यात असा काही भेदभावच नाही महिला तर पुरुषांच्या दोन पावलं पुढे आहेत डायरेक्ट पक्षप्रमुखाच्या ऑफिसवर मोर्चा घेऊन जातात, रडून रडून गोंधळ घालतात पुरुष असता तर दोन धक्के मारून बाहेर काढता येतो पण या बायकांपुढे पक्षप्रमुख देखील हतबल होतात. खरोखर पाच वर्षांमध्ये जशी काय यांच्याकडे नोटा छापायची मशीन मिळालेली आहे, किंवा यांना अल्लाउद्दीन चा दिवा मिळाला आहे, यांच्यावर जिन प्रसन्न आहे, अशा पद्धतीने यांच्या संपत्तीत वाढ होते . भारी भारीतल्या चार चाकी गाड्या येतात, मोठे मोठे फ्लॅट होतात, हॉटेल होतात, रिसॉर्ट होतात, हे सारे कुठून येते? अजून एक पद्धत म्हणजे यांना मिळालेल्या निधीतून हे प्रभागासाठी खर्च करणार, उगाच एखादा कोपरा शोभिवंत करणार आणि फोटो आणि नाव मात्र स्वतःचे टाकणार ,हे अमुक काम मिस्टर अमुक तमुक यांच्या निधीतून झाले आहे. अरे तो निधी मिस्टर अमुक तमुक यांच्या खिशातून गेलेला नसतो, तर तो सरकारी खर्चातून प्रभागात खर्च करण्यासाठी आलेला असतो. दिवसेंदिवस इतके स्वार्थाचे आणि गलिच्छ राजकारण चालू आहे की 90% कावळे आता कुंपणावर बसलेले आहेत ,आणि "सरशी तिकडे पारशी" या न्यायाने उडी मारण्याचे तयारीत असतात. शिवाय "पैसा बोलता है" हे तर आहेच. कधी कधी पक्षातील जुन्या लोकांचा उद्रेक होतो. तो काही चुकीचा नाही काल कोणीतरी अचानक पक्ष बदल करून इकडे येते, आणि आल्या आल्या त्याला रेड कार्पेट अंथरले जाते, आणि त्याला तिकीट दिले जाते तुम्ही आपले त्याच्या मागे फिरा आणि प्रचार करा. शिवाय आजकाल कोणत्या पक्षाला पक्की विचारधारा राहिलेलीच नाही एखादा पक्ष अपवाद वगळता. कोणीही कोणाशीही युती करताय कोणीही कोणाबरोबरही जातंय, अगदी वाईट भाषेत सांगायचं म्हटलं तरी ,आपला नवरा सोडून दुसऱ्या बरोबर पाट लावतय. मागच्यावेळी हे कोणत्या विचार धारेबरोबर होते ,आणि आता कोणाची भलावण करतात त्याचे काही ताळतंत्र राहिले नाही, आणि यांचे जुने व्हिडिओ काढून व्हायरल केले तरी त्यांना काही लाज वाटत नाही. मग कार्यकर्त्यांना असं होतं की, मागच्या वेळी हातात दगड घेऊन ज्यांची डोकी फोडली, आता तेच येऊन डोक्यावर बसलेत आणि त्यांचा प्रचार आम्ही करायचा. त्यामुळे क्वचित निष्ठावान असणारी कार्यकर्ता नावाची जमात देखील आता नष्ट होऊ लागली आहे. कार्यकर्ते पैशावर मिळू लागले आहेत. सकाळी एका मोर्चाला जातील त्याचा जय जयकार करतील तर संध्याकाळी त्याच्याच विरोधकाच्या मोर्चाला जाऊन त्याचा जय जयकार करतील. आणि उरता उरले जनता जनार्दन, तेही आता साधे राहिले नाहीत फक्त आश्वासनावर त्यांचे भागत नाही आज आत्ता ताबडतोब काय देता? हा सवाल ते विचारतात. बर तुमच्यापर्यंत अगदी लक्ष्मी चालत आली किंवा चालवत आणली तरी त्याच व्यक्तीला मत देतील याची खात्री नाही. इलेक्शनच्या काळात तर असं ऐकलं की काही लोकांच्या रूमच्या रूम नोटांच्या थप्प्याने भरलेल्या असत, लोकांना रात्री वाटण्यासाठी, अशा किती आणि काय काय सुरस कथा ऐकायला मिळतात. आपल्यासारख्या मध्यमवर्गीय सर्वसामान्य माणसाला फक्त डोळ्याने पाहत राहणे आणि ऐकत राहणे एवढेच हाती उरते. अर्थात आपले मत ही आपली मोठी ताकद आहे पण उडदा माजी काळे गोरे काय निवडावे निवडणारे अशी परिस्थिती कधी कधी होते. त्यात पण दगडापेक्षा विट मऊ असे म्हणून मतदान करायचे. एकही उल्लू काफी है बरबाद ये गुलिस्ता करने को हर शाक पे उल्लू बैठा है अंजाम ए गुलीस्ता क्या होगा.
