Amruta Gadekar

Classics Inspirational Children

5.0  

Amruta Gadekar

Classics Inspirational Children

*आईचे डोळे.....!*

*आईचे डोळे.....!*

5 mins
900


गुणवत्ता यादीत चमकलेल्या रामकृष्णाच अभिनंदन करण्यासाठी मी फुलांचा गुच्छ घेऊन त्याचं घर शोधत गेले. घर शोधता शोधता प्रश्न पडला- 'अशा झोपडपट्टीत राहतो रामकृष्ण ? पण राहतो किती नीटनेटका.' त्याच्या व्यक्तीमत्वातील टापटिपीवरून त्याच्या घराचा बांधलेला अंदाज साफ कोसळला होता. गटारांची अनेक जाळी धडपडत ओलांडत एका फळकुटाच्या झोपडीजवळ गेले. 'इथंच तो राहतो', म्हणून कुणीतरी सांगितलं.

 

   काळोखातून प्रकाश बाहेर यावा तसा सलील माझ्या आवाजानंच बाहेर आला. "आत गेले. "अभिनंदन!" गुच्छ देत म्हटलं. मला जायला तसा तीन-चार दिवस उशीरच झाला होता. अभिनंदनाची पहिली वर्दळ थांबून आता रूटिन सुरू झालं होतं. गुणवत्ता यादीत आलेल्या मुलाचं हे असं घर ?रामकुष्णं अभ्यास कुठे केला असेल ? बाजूच्या रेल्वे आणि लाऊडस्पीकरच्या सततच्या गदारोळात त्याने अभ्यास कसा केला असेल ? त्याचं पुन:पुन्हा अभिनंदन करताना मनातल्या मनात ते काळोखे कोपरे पाहत स्वतःलाच विचारीत होते.

   "खूप खूप बरं वाटलं, खरं तर तुम्ही घरी आलायत, हे खरंच वाटत नाहीये. सावरलेलो नाहीये मी. तुमच्यासाठी चहा करतो," म्हणत तो स्टोव्हला पंप मारू लागला. 

   "रामकृष्ण, राहू दे. आपण बाहेर घेऊ,"

   "तुम्ही काळजी करू नका, मी उत्तम चहा करतो. कोळसेवाडीत कॅन्टीन चालवतो. फक्त चहाचं." चहाच्या वाफांनी वातावरण भारलं. 

   ''घरात दुसरं कुणी ?"

   "ताई आहे. टायपिंगच्या क्लासला गेलीय. वडील किराणा दुकानात हमाल आहेत."

     "आई... ?"

"आई नाही." रेंगाळलेली स्तब्धता कशी प्रवाही करावी या विचारानं मी गोंधळले. चहा त्यानं खरंच उत्कृष्ट केला होता. अगदी जीव ओतून !

   "रामकृष्ण, तू मार्गदर्शन व्याख्यानमालेत येत होतास. भेटत होतास. उत्तरपत्रिका पुन:पुन्हा तपासून घेत होतास. पण तेव्हा तुझ्याकडे पाहून...."

   " माणसाची परिस्थिती दिसलीच पाहिजे का ? आपले कष्ट, आपलं जगणं बघून कृणीतरी 'अरेरे' करून म्हणणं... यानं काय साध्य होतं? आतासुद्धा मला खूप बक्षिसं मिळालीत. पण ती कायम पुरणार आहेत का ? पुढचं शिकायला कष्ट करावेच लागणार. टीव्हीवाले आले, निघून गेले. एका मोठ्या क्लबचे अध्यक्ष आणि आमदार खासदार गाडी आत येत नाही म्हणून उतरून आतही आले नाहीत. परिस्थिती माणसाला त्यापेक्षा मोठं करते."

    रामकृष्णाची चमक गुणवत्ता यादीपुरती उरली नव्हती. ती वाक्या- वाक्यातून, डोळ्यातून चमकत होती. "कुठून शिकलास हे सगळं ?"

  "सभोवतीच्या मुलांकडून,"

   "म्हणजे ?"

   "ती नुसताच टाइमपास करतात. बहुतेक नापास होतात. मग रात्री जुगार ! चोरी, लुबाडी हा त्यांचा उत्पन्नाचा मार्ग. पितात, भांडतात ! तेव्हा ठरवलं- आपण तसं व्हायचं नाही. याच वर्षी नाही: सातवीतच ठरवलं. सातवीतच माझी आई गेली. इथल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये. साध्या न्यूमोनियानं."

    "बदलेल सारं...."

    "बदलतंच आहे, सर. गरिबीचा विचार करायला वेळच कुठे आहे ?" तसे आपले डोळे क्वचितच भरून येतात. काळजाशी दडलेले अश्रू क्वचितच पापणीच्या काठावर येतात. माझ्या आणि अनेक कॉलेजांच्या भोवती चकाट्या पिटत वेळेचा कचरा करणारी असंख्य मुलं आठवली. रानगेंड्याप्रमाणे फटफट्या घेऊन उधळणारी, देणग्या, फी देऊन प्रवेश घेणारी, तरीही वर्गात बसणं 'पाप' मानणारी असंख्य मुलं ! त्यांच्याच वयाचा रामकुष्ण!

असेही अनेक चेहरे डोळ्यांपुढून झरकन् तरळून गेले.

    "रामकृष्ण, एकदा माझ्या वर्गात ये... मुलांशी गप्पा मारायला."

    "एवढं मोठं करू नका मला. असे काबाडकष्ट करून शिकणारे माझ्यासारखे अनेक आहेत. मनातला वॉचमन जागा असला की कुणी सांगावं लागत नाही. आपण कुठल्या परिस्थितीत जगतो, आपले पालक रक्ताचं पाणी करून आपल्याला कसं शिकवतात, याची आठवण सतत जागी असेल ना, तर शाळेच्या वर्गातल्या अभ्यासानंही मार्क्स मिळतात. क्लासेस बिसेसची चैन झोपाळू मुलांसाठी.!"

   रिक्षापर्यंत रामकृष्णबरोबर आले. तिथेही बोलत राहिले बराच बेळ. बोलता बोलता तो चटकन बोलून गेला. "भोवतीची मुलं पाहुन केव्हातरी मलाही थोडी झापड आल्यासारखं होतं."

    "मग, अशा वेळी...?"

   "मी... मी फक्त आईचे डोळे आठवतो."

    "आई ?"

    "राब राब राबायची ती.... कागदाच्या पिशव्या करीत. गोंद-कात्र्या घेऊन आम्ही तिच्याभोवती बसून तिला मदत करायचो. वडिलांची गिरणी संपानंतर बंदच पडली. त्यानंतर वनवास मागे लागला. शेवटी ती बोलायची, 'मी काही आता जगत नाही; पण तुझ्याकडे माझे डोळे कायमचे असतील. तू कसा शिकतोस, मोठा होतोस, ते पाहण्यासाठी.' ते डोळे आठवतात. हो!"

   रिक्षात बसलो तेव्हा हेच आठवत राहिलं. सतत कुणीतरी आपल्याला सांगावंच का लागावं ? 'अभ्यास करा, लवकर उठा, पालक किती मरमर मरतात आपल्यासाठी याची आतून जाण असणारा असा एखाद् दुसराच.!"

   परवा एक शिक्षिका असलेली पालक आई स्टाफरूममध्ये विषण्ण चेहऱ्याने आली, "मुलगा सकाळी उठतच नाही हो. सातचं लेक्चर नेहमी बुडवतो. ऐकतच नाही. आता म्हणतो, शिकायचं नाही. काही करायचं नाही. कुणाचं मुळी ऐकतच नाही." फक्त रडायची बाकी होती ती बाई. खूप काही सुंदर घडविण्याचा तारुण्याचा ऋतू संपून गेल्यावर कितीतरी विद्यार्थी जागे होतात, तेव्हा उशीर झालेला असतो. एक भकास दुपार... आणि निराश संध्याकाळ!

सकाळी उठण्यासाठी 'जबरदस्ती,' कॉलेजला जाण्यासाठी 'जबरदस्ती', मग शिकण्यासाठी.. परीक्षेसाठी.. त्याआधी वर्गात हजर राहण्यासाठी 'जबरदस्ती.!'


   जबरदस्तीनं कधी फूल उमलतं का ? रोपानं स्वत:हूनच आतून ठरवलेलं असतं. विद्यार्थ्यानंही असं आतूनच ठरवायला हवं. आईचे, बाबांचे डोळे आठवण्यासाठी ते प्रत्यक्ष मरायलाच हवेत का ? आपण वर्गात गुंडगिरी करताना किंवा वाह्यात वेळ घालवताना, चाचणीत शून्य मार्क मिळवताना, बसमधून/ लोकलमधून लोंबकळत येणारे आई-वडील आठवत नाहीत ? मुलांसाठीच पैसे जमा करायला सारखे वेगवेगळ्या ठिकाणी कंपनीच्या कामासाठी वाऱ्या करणारे थकलेले बाबा आठवत नाहीत ? घरात आपण लहान असू, पण जाणीवेनं थोडं समजूतदार झालं, तर पालकांच्या घामाचं गुलाबपाणी होऊ शकतं. यशाची राइसप्लेट रेडीमेड मिळत नाही, हे आत्ताच कळायला हवं. यश शिजत ठेवावं लागतं. परिस्थितीच्या धगीनं. कधी महत्त्वाकांक्षेच्या इंधनानं आयुष्य उकळत ठेवावं लागतं. हे केव्हा कळणार ? चाळीसाव्या वर्षी ?


     एस.एस.सी. ला फॉर्म भरायला पैसे नव्हते ते रामकृष्णकडे पाहताना आठवून गेलं. आईच्या हातातली शेवटची सोन्याची बांगडी गहाण टाकण्यासाठी (तीही कधीच न मिळण्यासाठी) निघालेले माझे वडील आठवले.

          आई म्हणाली- "ही शेवटची. पुढे काय? अजूनही घरातले ते क्षण आठवताहेत. नातेवाईकांनी केलेली उपेक्षा आठवते. निष्कांचन आईला पुढे येऊ न देणारे नातेवाईक आठवले. कुणाच्या तरी लग्नात "माझी बोरमाळ तू घाल थोडा वेळ, अगदीच काळी पोत बरी दिसत नाही," असं आईला म्हटल्यावर, 

"माझी लाज वाटत असेल तर मी येणार नाही. आले तर जशी आहे, तश्शीच येईन." हे बाणेदारपणे सुनावणारी आई आठवली आणि नंतर ती म्हणाली होती- "माझा दागिना बघायचा असेल तर माझा मुलगा पाहा." त्या वाक्याने केवढी जबाबदारी टाकली आपल्यावर, ते आठवलं.


     असे प्रसंगच झपाटून शिकणाऱ्या मुलांच्या आयुष्यात निरांजन होऊन येतात. दारिद्र्य माणसाला संपवू शकत नाही. पण आळस, उदासीनता, ध्येयशून्यता पार नेस्तनाबूत करते माणसाला.! मला दिलेल्या एका मुलाखतीतलं आशा भोसले यांचं वाक्य आठवलं, "सुखी माणूस कधी कलावंत होऊच शकत नाही."


    खूप काही प्रेरणा देणारी ही रसरसलेली आयुष्यं तेव्हाच घडतात, आकाराला येतात, जेव्हा जगाच्या पाठीवर आपण कुठेही असलो तरी आपल्याला आठवत असतात कष्टाळू, अपार विश्वासाने कर्तृत्व गाजविण्यासाठी जगात ज्यांनी आपल्याला पाठविलं आहे असे आपल्यासाठी स्वप्न पाहणारे आईचे डोळे! आपल्या आईचे डोळे...!!!


Rate this content
Log in

Similar marathi story from Classics