अजूनही शिल्लक आहे.
अजूनही शिल्लक आहे.


घरात सुभान्या दारू पिऊन गोंधळ घालत होता. तुळजेने शांतपणे, भाजी भाकरी ताटात त्याच्या पुढ्यात सरकवले.
"मायला, पुन्ना मेथीचं गरगट अन् भाकरच? तुला अंड्याची पोळी कराया संगतीला व्हती!" तारवटलेले डोळ्याने ताटातल्या भाजीकडं पहात तो बरळला. बोलताना त्याची जीभ अडखळत होती.
"कोंबड्याच्या रोग गावात पसरतुया. कोंबड्या मरु घातल्यात. अंडी नाय भेटली. तवा हाय ते खावा. अन झोपा!" आपल्या रागावर नियंत्रण करत ती म्हणाली.
हे सुभान्याच रोजचंच होत. शेतीत लक्ष नव्हते. पण राजकारणात मोठ्या हिरीरीने भाग घ्यायचा. शेतीतून चावल्या -पावल्या गाठीला लावत कष्ट करण्यापेक्षा, एखाद पद, नसता एखादा सरकारी ठेका घ्यायचा आणि लाखात कमवायचं. हे खूळ त्याच्या डोक्यात शिरलं होत. आता 'खूळ' तरी कस म्हणायचं? आसपासची पाचपन्नास उदाहरण त्याच्या पहाण्यात होती. सुरवातीला त्यानं शेती करून पहिली. नवेनवे बेणे, खत, काय, काय करून पाहिलं. पीक भरगोस आलं, का भाव कमी यायचा. कधी गारपीट, अवकाळी पाऊस, हातातोंडाशी आलेला घास, नासून टाकायचा. एक वर्ष ठिबक मारून ऊस केला, त कारखाना नेईना. दादापुता करून उसतोडी टोळी पाठवली. तर बँकवाल्याने बाकी टाकली कारखान्याच्या रजिस्टरात! चारसहा हजार हाती आले. तो वैतागून गेला.
मग एका साली नुसतंच कर्ज उचलून घरगाडा हाकला. शेती पडली उतानी! दारू -मटणाचा ऊत आला. मग दरवर्षी पीककर्ज नवं-जुनं करायचा सपाटा लावला! (नवीन जास्तीचे कर्ज मंजूर करून, त्यातून जुने कर्ज वसूल करण्याची बँकेत एक पळवाट चोखाळली जाते, असे ऐकिवात आहे. नक्की माहित नाही! त्याला 'नवं -जुनं' म्हणतात म्हणे.) गेल्या वर्षीपासून ते त्याच्या गळ्याशी आलं. जमिनीच्या प्रमाणापेक्षा जादा कर्ज मिळेना! आणि असलेल्या कर्जाच्या वसुलीचा तगादा सुरु झाला! खाजगी सावकारी उचल तर, त्याची त्यालाही आठवत नव्हती! त्यामुळे हल्ली तो बेताल झाला होता.
"कोंबडी नाय! अंडी नाय! त मग मटण कराच! ही बुळी भाजी ह्यो सुभान्या, नाय खात!" समोरचे ताट उधळून, तो डुलतडुलत घराबाहेर पडला. पुन्हा एक क्वाटर मारायला!
अंगणात म्हातारा तुका बिड्या पीत बसला होता. त्याला बिलगून सुभान्याच चारवर्षांच पोर, कृष्णा, बसला होता.
"आबा, बापू दारू कावून पितो? तो पिऊन आला का मले भ्या वाटत! माईला मारतुं, तस मलापन एखान दिशी हानीन!"
"किस्न्या! आर तो बा हाय तुजा! नाय मारायचा. अन मी हाय की खंबीर! तेला मारू देनार नाय! मी तेचा बा हाय नव्ह? तू भिवू नगंस!" म्हाताऱ्यानं कृष्णाची समजूत घातली. म्हतारा थकला, तसा सुभान्याच्या हाती कारभार गेला. लवकरच सुभान्याची लक्षण, म्हाताऱ्याच्या लक्षात येऊ लागली. शेती सुभान्याच्या हाती सुरक्षित रहाणं आवघड होत. खातेफोड करून शेती नावावर कर म्हणून सुभान्या म्हाताऱ्याच्या पाठी लागला होता.
"जीवात जीव हाय तवर, असू दे मज्याच नावानं!" एक दिवस म्हाताऱ्याने आपला निर्णय सांगितला.
"आता कवर, जळूगत चिटकून ऱ्हातूस त्या जमिलीला? तुज्या मरनाची म्या काय वाट बगत बसनार नाय! काय ते घे समजून!" सुभान्याने म्हाताऱ्याला ढोस दिला.
'हो-ना' करता म्हाताऱ्याने पडत घेतलं. फक्त पाच एकराचा एक तुकडा किस्न्यासाठी म्हणून स्वतःकडे ठेवून, बाकी रान सुभान्याला देऊन टाकलं.
०००
सुभान्या रानातल्या खोपटात बसून होता. सोबत फुल खंबा होता. गेल्या आठवड्यातच बँकेनं वकीलाची नोटीस पाठवली होती. सगळी जमीन विकावी लागणार होती. आता अडचणीत आलेल्या माणसाला जमीन विकायची, म्हणजे लोक पाडूनच मागणार. शेती गेली की गावातली इज्जत गेली! शेतमजूर म्हणून राबावं लागणार होत! घरी बायका-पोरांच्या आणि बाहेर ओळखीच्या लोकांच्या नजरेतून पार उतरून जाणार होता. त्यानं जवळची बाटली तोंडाला लावली. दोन घोट घास चरचरत पोटात गेले. विचारचक्र जोरात फिरू लागलं.
शेतकऱ्यांचे हाल कुत्र खात नाही. काय करावं? बी-बियाणं-खत-याला पैसा लागतो. म्हणून कर्ज काढलं. तयार मालाला, बाजारभाव-मिळणार उत्पन्न परस्थितीवर अवलूंबून असतं, हाती नाही. हाती काय? तर फक्त मरमर! आजवर खोटंनाटं करत ओढलं. आन गेल्यावर्षी पासून गाड फसलं. बर, इकडं-तिकडं हात मारून पहिले. बाबूशेटच्या झेंड्याखाली, कार्यकर्ता म्हणून राबून झालं. सगळंच फोल! पाहणाऱ्याला काय? सुभान्या वाया गेला वाटतो! बेन रात्रंदिवस दारू पितं! हेच बोलतात! अरे, मला काय कळत नाही? तुळजाला म्हणावं तस सुख, नाही देऊ शकलो. किशन्या, गोड पोरग, त्याची कधी हौस मौज करता आली नाही. बापाला काय, पोरगं बरं निघाल्याचं समाधान देता आलं नाही. म्हातारा बोलत नाही पण वाटंकडं डोळे लावून बसलेला असतो! शेती खातेफोड करायला लावली ते शेतसाऱ्याचे चार पैसे वाचावेत म्हणून. दर कर्जाच्या वेळेस, त्याच्या बँकेत नेण्याच्या चकरा वाचाव्यात म्हणून! पण या सुभान्याची तगमग कोणाला कळणार?
आता काय करावं? यातून बाहेर कस पडायचं? काहीच मार्ग नाही का?
नाही कसा? मार्ग होता!
सुभान्यान हुडकून काढलेला!
सहा महिन्याखाली भग्या मेला. कर्ज टकुऱ्यावर घेऊन मेला. त्याच्या बायकुला सरकारनं पाच लाखाचा चेक दिला होता. बँकेनं कर्ज विचारलं नाही! सावकाराची खिटखिट संपली. पाचर मारल्यागत सावकार तोंड मिटून बसला. गावभराची सहानभूती त्याच्या बायकोला मिळाली. पेपरात त्याचा फोटो छापून आला! 'कर्जाला कंटाळून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या!' सुभान्याच्या डोक्यात हाच मार्ग गेल्या काही दिवसापासून घोळत होता. आत्महत्या भ्याडपणाचं लक्षण आहे. भ्याड-तर-भ्याड! नाहीतरी, अशी काय मर्दुमकी करणार आहोत जगून? चार दिवसांपासून तो 'कर्जाला कंटाळून मरण जवळ केलंय!' म्हणून चिठ्ठी खिशात घालून फिरत होता!
त्याने खोपटाच्या कोपऱ्यातली कीटकनाशकाच्या बाटलीतला द्रव बाटलीतल्या दारूत ओतला. बाटलीच्या तोंडावर आंगठा धरून ती बाटली खसखस हलवली. बाटलीत बुडबुड्यांचा डोंब उसळला. मागचा पुढचा विचार न करता, बाटली तोंडाला लावली! गट -गट-गट- तीन घोट मोठ्या मुश्किलीने घश्याखाली गेले असतील. दारू घशाची चरचर करत पोटात जायची. हे कॉकटेल आग लावत गेलं! पोटात आग भडकतच राहिली! त्याच्या डोळ्यासमोर अंधारी घिरट्या मारू लागली, मधेच आपल्या आईच्या मागे लपून, 'बापू! बापू!' म्हणून टपोऱ्या डोळ्यांनी बोलावत असणारा किस्न्या तरळून गेला! तुळजा, 'धनी, येताव नव्हं घरला?!' हे डोळ्यांनीच विचारत होती! म्हातारा 'सुभान्या! कवाधरुन वाट बगतुय! ये की लवकर!' म्हणत होता!
"नायी! नायी! मला मरायचं नाय! मला जगायचंय! वाचवा! वाचवा!! अरे कुणी आसन जवळ तर..." सुभान्याच्या हा टाहो त्याच्याच घश्यात विरून गेला! आवाज बाहेर निघालाच नाही! आणि तसेही त्या खोपटाच्या आसपास होतेच कोण, त्याची हाक ऐकायला? कीटकनाशकानी आपले काम इमानेइतबारे केले!
०००
सुभान्याला जाऊन तीन महिने उलटून गेले होते. पेपरात 'अजून एका शेतकऱ्याची कर्जाला कंटाळून आत्महत्या' या बातमीवर राख जमली होती. सुभान्याच्या खिशातली ती चिठ्ठी पोलीस घेऊन गेले होते. सुभान्या 'दारू पिऊन मेलाय!' असा अहवाल पोस्टमॉर्टमच्या डॉक्टरांनी दिला. त्यामुळे सरकारी मदत मिळालीच नाही! कर्ता पोरगा, हकनाक मेला! घरबार उघड्यावर आलं. सगळंच संपलं होतं! सगळंच संपलं होत! म्हाताऱ्या तुक्याच्या डोक्यात घुमत राहिले.
एक दिवस म्हातारा तुक्या हातात टिकाव अन् खोर घेऊन घरा बाहेर पडला.
"बाबा! कुठं जाताव?" तुळजेने विचारले. तिच्या स्वरात काळजी ठासून भरली होती.
"काळजी करू नगस पोरी. रानात जाऊन येतो. किसन्याच्या तुकड्यात चार आंब्याची झाड लावतो. पाटलाला कलम रोप, रत्नागिरीतून आणाया सांगितली व्हती. आता असं हातपाय गाळून कसं भागायचं? काय तं करावं लागलंच की! बारक्या किस्न्यासाठी."
"खरं हाय. मी बी रामकाकाला इचारलंय. एक दिस ट्याक्टर देतो बोललेत! मकाबिका कायतरी लावूत. पाऊसकाळ जवळ येतुया."
"तुळजे! वा! याला म्हणत्यात हिम्मत! मी बगतो, काय बेण्याचा जुगाड होतो का ते!" म्हातारा खेटरात पाय सारत म्हणाला.
"आबा! मी बी येतो, तुज्या सांग!" किस्न्या हातात प्लास्टिक घमेलं घेऊन तुळजेमागून म्हणाला.
म्हाताऱ्याच्या डोळ्यात कौतुक मावत नव्हते. कारण,
'अजूनही सगळं संपलं नव्हतं... खूप शिल्लक होत...
आनंदाचा सूर्य, आशेचे किरण पाठवत होता...