Tanuja Prabhudesai

Abstract Classics Inspirational

4  

Tanuja Prabhudesai

Abstract Classics Inspirational

शापित..

शापित..

15 mins
559


 अर्पिता. पुण्यातील मध्यमवर्गीय कुटुंबात राहणारी, स्वभावाने साधी सरळ व देखणी मुलगी. वडील विश्वासराव निवृत्त शिक्षक तर आई गृहिणी. तशी ती तीन भावंड.मोठी बहीण नमिता.नमिताने दोन वर्षांपूर्वीच पळून जाऊन लग्न केले होते. तिचा नवरा इंजिनिअर होता. पळून जाऊन लग्न केल्यामुळे अर्पिता सोडून कोणीच तिच्याशी बोलायचे नाही. मधला भाऊ सोहम. सोहमचे वर्षभरापूर्वी लग्न झाले होते. त्याची बायको शालिनी बँकेत कामाला होती. सोहमही एका कन्स्ट्रक्शन कंपनीत कामाला होता. अर्पिता तशी शांत शांत असायची. आपल्या खोलीत एकटीच बसून रहायची.

           महिन्याभरापूर्वी अर्पिताच लग्न झालं होतं. कमलेशही इंजिनिअर होता. घरदार आणि प्रॉपर्टी पण चांगली होती. चांगल्या श्रीमंत घरातलं स्थळ, उत्तम शिकलेला मुलगा त्यामुळे अर्पिताच्या घरून लगेच होकार दिला होता. अर्पिताही त्यांच्या शब्दाबाहेर नसल्याने लगेचच परंतु धुमधडाक्यात लग्न झालं होतं. मुलगा पुण्यातच राहणारा होता. लग्नानंतर अर्पिता सासरी गेली. लग्नाच्या पहिल्याच दिवशी रात्री कमलेश मित्रांसोबत पार्टी करायची म्हणून बाहेर गेला होता. घरी अर्पतासहित सर्वजण वाट पाहून कंटाळले. सकाळ होत आली तरी तो परतला नव्हता. सर्वजण वाट पाहून पाहून थकले होते. त्याचा मोबाईल ही अनरीचेबल लागत होता. त्याच्या वडिलांनी पोलिसांना फोन लावला व लवकरात लवकर तपास करायला विनंती केली. संध्याकाळ होत आली होती. अर्पिताला अचानक काही अघटित घडणार असल्याची चाहूल लागली. ती घाईघाईने देवीच्या देवळात जायचे म्हणून बाहेर जायला निघाली. पण मुलगा आधीच घरात नाही, त्यात सूनही बाहेर चालली म्हणून सासूने तिला बळेबळेच बाजूला बसवून ठेवले. सात वाजायच्या सुमाराला अर्पिताने अचानक हाताच्या मुठी वळल्या. भीती तिच्या चेहऱ्यावर दाटून आली होती. ती घामाने भिजली होती. काही तरी चुकीचं घडलंय अशी जाणीव तिच्या मनाला होत होती. घरातली सर्वजण तिला काय झाले म्हणून पाहत होते. तितक्यातच दाराची बेल वाजली. पोलीस दारात हजर होते. त्यांनी सर्वांना गाडीजवळ बोलावले. गाडीत एक मृतदेह होता. गाडीतला मृतदेह कमलेशचाच आहे ह्याची खात्री पटताच सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी अर्पिताचे सौभाग्य हरपले होते. ती मूर्च्छित होऊन पडली. तब्बल सहा तासांनी ती शुद्धीवर आली. अंत्यसंस्कार झाल्यानंतर सासुने बळेच तिला घराबाहेर काढले. तिच्या घरच्यांना बोलवून घेऊन तिला कुलनाशिनी, विषवल्ली अशी अनेक नावे ठेवून हाकलून लावले.

            आज जवळजवळ महिना होत आला होता. अर्पिता घरात आपल्या खोलीत खिडकीतून बाहेर पाहत बसली होती. ती आपल्याच खोलीत बसून असायची. जास्त बाहेर पडायची नाही. बाहेर पडल्यावर आजूबाजूचे लोक विधवा आणि शापित म्हणून तिच्याकडे कुत्सित नजरेने पाहायचे, टोमणे मारायचे. कधीतरी सहज फिरायला म्हणून बागेत जायची. ती आजही काहीतरी विचारात गुंग असल्याप्रमाणे भान हरपून बसली होती.

" अर्पिता..." विश्वासराव. 

" या ना बाबा, काही काम होतं का ?" अर्पिता.

विश्वासराव अर्पिताजवळ येऊन तिच्या शेजारी बसले. त्यांनी आपल्या मुलीकडे पाहिलं. अतिशय कृश आणि निस्तेज दिसत होती.

" बाळा, सहज म्हणून येऊ शकत नाही का मी ? " विश्वासराव.

"असं नाही बाबा. मला वाटलं काही कामाने आला असाल."अर्पिता.

"अर्पिता, मला तुझी अवस्था पाहवत नाही बाळा. जे झालं त्यात तुझी काय चूक ? तू जेमतेम बावीस वर्षाची आहेस. तुला अजूनही चांगली स्थळ येऊ शकतात. म्हणजे कोणालाही पसंत पडशील तू. " विश्वासराव.

"म्हणजे तुम्हांला काय म्हणायचंय स्पष्ट सांगा बाबा." अर्पिता काहीशी धिटाईने म्हणाली. मागून पदराला हात पुसत अर्पिताची आई उमाही खोलीत आली. अर्पिताची वहिनी शालिनी खोलीच्या बाहेरूनच ऐकत होती.
 
"म्हणजे तू पुन्हा लग्न करावसं असं आम्हाला वाटत बाळा." उमा अर्पिताच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली.

" आई, माझ्या आयुष्यात ही अशी घटना घडलीय ना, की संसार, लग्न यातून माझं मनच उडून गेलंय. मला पुन्हा लग्न करायची मनापासून इच्छा नाही आहे. " अर्पिता डोळ्यांतील अश्रू लपवत म्हणाली.

" बघ बाळा, मी सांगायचं काम केलं. बाकी तुझा निर्णय अंतिम राहिल. मला तुझ्यावर काही लादायचं नाही आहे." विश्वासराव.

तिच्या डोळ्यांतील अश्रू त्या उभयतांच्या नजरेतून सुटले नव्हते.विश्वासराव खिन्न मनाने खोलीतून बाहेर निघून गेले. मुलीवर जीवापाड प्रेम करणारे बापाचे काळीज होते ते. फुलपाखरासारख्या आपल्या मुलीला रंगहीन, कोमेजलेले पाहताना त्यांना अतीव वेदना होत होत्या.

" आई, बाबांना सांग मी उद्यापर्यंत सांगते तुम्हांला." अर्पिता मनातच काहीसा विचार करत म्हणाली.

 उमाही डोळ्यांनी तिला निश्चिंत रहायचा इशारा करत खोलीतून बाहेर निघून गेली. विश्वासरावांच्या चेहऱ्यावरचा खिन्नपणा अर्पिताच्या नजरेतून सुटला नव्हता. तरीही तिने लग्न न करण्याच्या आपल्या निर्णयावर ठाम रहायचे ठरवले. रात्री तिच्या जेवणाचे ताट घेऊन शालिनी खोलीत आली. आज कधी नव्हे ती शालिनी तिच्या बाजूला बेडवर बसली. पण ती थोडं अंतर राखूनच बसली होती. जणू अर्पिताच्या स्पर्शातून तिला विषबाधा होईल असं तिचं वागणं होतं.

"तुझ्या भल्यासाठी म्हणून सांगतेय अर्पिता, आईबाबा म्हणत आहेत तसं लग्नाला तयार हो. म्हणजे तू ही सुटशील आणि आम्हीही सुटू." शालिनी.

"म्हणजे काय म्हणायचंय वहिनी तुला ? आई बाबांना मी भार झालेय का ? बाहेर तर सगळेच घालून पाडून बोलतात. निदान तू तरी अस बोलू नको वहिनी."अर्पिता.

"आई बाबांना नाही, आम्हाला भार झाली आहेस. आधीच बरीच ओढाताण करून आयुष्य चाललंय. गरजा सतत वाढत आहेत. त्यात तू येऊन पडलीस. आई बाबांना काय ? मुलगी लक्ष्मी असेल किंवा विषवल्ली.. ते तर सांभाळणारच ना आणि मला कसले सल्ले देत्येस गं. तुझ्या कर्मांमुळेच बोलतात ना सगळे ? "शालिनी तिरस्काराने म्हणाली.

 अर्पिताच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले होते. शालिनी तिच्याशी फारशी बोललीच नव्हती आणि आज बोलली ते ही टोचून..शालिनी उठून बाहेर निघून गेली. अर्पिता मात्र न जेवताच झोपी गेली. तिला फक्त अश्रूंचा आधार होता. दुसऱ्या दिवशी अर्पिता उठली. तिने स्वतः विश्वासरावांच्या खोलीत जाऊन लग्नाला होकार कळवला. विश्वासरावसुद्धा मुलीने स्वतःहून होकार दिलेला पाहून खूप आनंदित झाले होते. त्यांनी लगेचच स्थळे पाहायला सुरुवात केली.
_____________________
        आज सकाळपासून घरात धांदल उडाली होती. आज सकाळी अर्पिताला बघायला स्थळ येणार होते. सकाळपासून घरात तयारी चालू होती. शालिनी अर्पिताला तयार करत होती. तयार करता करता टोमणे मारत तिने अर्पिताला नकोसे करून सोडले होते. अर्पिता निळ्या रंगाची तलम साडी नेसून तयार झाली होती. गळ्यात नाजूकसा हार आणि कपाळाला छोटी लाल टिकली एवढाच काय तो साजशृंगार. अपार कष्टाने रोखून ठेवलेल्या अश्रूंनी डोळ्यांच्या कडा मात्र पाणावलेल्याच होत्या.
        सव्वा दहाच्या सुमाराला पाहुणे आले. चांगली उच्चभ्रू मंडळी होती. आई, वडील मुलगा आणि सोबत दहा बारा वर्षाची मुलगी. मुलाची माहिती जाणून घेत असताना कळलं की त्याचंही पहिलं लग्न झालं होतं आणि त्याला एक मुलगीही होती. हे कळताच विश्वासराव भडकले. पण शालिनी आणि सोहमनेच समजावले.अर्पिताचेही दुसरेच लग्न आहे. मग काय हरकत आहे ? बाबांनी अर्पिताकडे पाहत तिला विचारले,

" तुझे काय मत आहे बेटा, तुला पसंत आहे का ?" विश्वासराव.

           अर्पिताच्या ओठांवर नकार आला होता ; पण तितक्यातच तिला कालचे शालिनीचे बोल आठवले आणि पुढचा मागचा विचार न करता तिने मानेनेच होकार दिला. यज्ञेशसोबत पुढच्या आठवड्यात तिचे लग्न ठरले होते. यज्ञेशसुद्धा सोहमसोबतच कामाला होता. त्यामुळे अर्पिताच्या आधीच्या लग्नाबद्दलही त्याला सर्व माहिती होती. लग्नाला आदल्या दिवशी अर्पिता घरातून बाहेर पडली व घराजवळील देवीच्या देवळात गेली.

"आई, मागच्या वेळेस जे झालं ते विसरून माझा संसार नव्याने सुखाने थाटला जावा असा आशीर्वाद दे. एकवेळ माझं काही बरं वाईट झालं तरी चालेल यज्ञेशला काहीही होऊ दे नको. " अर्पिता.
 
           दुसऱ्या दिवशी अर्पिताच लग्न झालं आणि ती तिच्या नव्या सासरी आली. सासर म्हणजे केवढं.थ्री बीएचकेचा फ्लॅट होता. यज्ञेशने अर्पिताला स्वरूपाच्या रूममध्ये झोपायला सांगितले. अर्पिता ते ऐकून अवाकच झाली. यज्ञेशच्या आई वडिलांनी त्याला खूप समजवायचा प्रयत्न केला. पण केवळ आई बाबा सतत आजारी आणि स्वरूपाची काळजी घ्यायला कोणी नाही म्हणून लग्न केल्याचे स्पष्ट करून यज्ञेश आपल्या खोलीत निघून गेला. अर्पिताची स्वप्ने फुलण्याआधीच कोमेजली होती. तरी हसरा चेहरा ठेवून ती स्वरूपाच्या खोलीत गेली. लग्नाची नवीन स्वप्ने पाहण्याचा आपल्याला अधिकार नाही हे स्वतःच्या मनाला तिने समजावले होते. दुसऱ्या दिवशीपासून अर्पिताचा दिनक्रम सुरू झाला होता. ती पूर्णत: सासुसासऱ्यांची सेवा आणि स्वरूपाची काळजी ह्यातच व्यस्त राहू लागली. सासुसासऱ्यांच्या छोट्या छोट्या सवयी, त्यांच्या औषधांच्या वेळा यापासून ते स्वरूपाचा अभ्यास, आवडीनिवडी इथपर्यंत सर्व तिने मनापासून शिकून घेतलं. यज्ञेशच्या नकळत त्याच्या आवडीनिवडीही ती जपत होती.
        एकदा दुपारच्या वेळेस तिचे सासुसासरे हॉलमध्ये बसून गप्पा मारत होते. तेव्हा अचानक फ्लॅट ची बेल वाजली. अर्पिताने पुढे होऊन दार उघडले. समोरची माणसे पाहून ती अवाक झाली. ते कमलेशचे आई बाबा होते.

"या, या.. सारे परक्यासारखे बाहेर का बरं उभे घरात या." मोहन.

 अर्पिताच्या सासऱ्यानी त्यांना आत बोलावले. अर्पिता त्यांच्यासाठी चहा करायला म्हणून निघून गेली. ते अत्यंत जुने मित्र असल्याने त्यांच्यात मनसोक्त गप्पा चालू होत्या. अर्पिता सर्वांसाठी चहा घेऊन बाहेर आली.

"सुधाकरा, ही आमची सून अर्पिता. महिन्याभरापूर्वीच लग्न झालं." मोहन.

" ठीक आहे. "सुधाकर.

 सुधाकरची तिच्याबद्दलची नाराजी पाहून मोहन काहीसे साशंक झाले. अर्पिता आत गेल्यावर त्यांनी सुधाकरला विचारले.

"काय झालं सुधाकर, तू अशी प्रतिक्रिया का दिलीस ? " मोहन.

"मित्रा, तू मित्र आहेस म्हणून सांगतो. तू या विषवल्लीशी यज्ञेश च लग्न लावलंस हे चांगलं नाही झालं. ही माझ्या घरात आली होती लग्न करून. माझ्या कुळाचा नाश करून गेली. आता यज्ञेशच काही बरेवाईट होऊ नये म्हणजे झालं." सुधाकर.

"म्हणजे अर्पिताच पहिलं लग्न कमलेशसोबत.." मोहन.

 मोहन आणि मधुरा त्या धक्क्यातून सावरले नव्हते. बराच वेळ गप्पा मारून झाल्यावर सुधाकर आणि त्यांची पत्नी घरी निघून गेले. त्यांचं बोलणं अर्पिताने आतून ऐकलं होतं. ती स्फुंदून स्फुंदून रडत होती. थोड्या वेळाने स्वतःला सावरत ती परत कामाला लागली. मधुरा मात्र आता सतत तिला साशंक नजरेने पाहत होती. संध्याकाळी स्वरूपा घरी आली.

"मम्मा...मला कॉफी देशील का प्लिज ? " स्वरूपा.

"हो सोन्या, आणते हं..." अर्पिता.

  मधुरा मात्र आज दिवसभर तिच्या मागून मागून फिरत होती. संशयाचं भूत तिच्या डोक्यावर स्वार झालं होतं. रात्री यज्ञेश खूप लेट घरी आला. मधुराने त्याला हट्टाने स्वतःजवळ बसवलं व त्याला दुपारचं सर्व सांगितल. पाहू नंतर म्हणून त्यानेही ते टाळलं ; पण सर्वांच्या मनात संशयाचं बीज पेरलं गेलं होतं. अर्पिताच्याही नशिबात जणू शापित आयुष्य होतं. दुसऱ्या दिवशी स्वरूपा तापाने फणफणली. तिचा ताप काही केल्या उतरेना. ताप हळूहळू तिच्या डोक्यात चढत होता. तिला हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केलं होतं. अर्पिताच मन स्वरूपाजवळ जाण्यास बेचैन होत होतं. पण तिला कोणी जाऊ दिलं नाही. थोड्या वेळाने डॉक्टर बाहेर आले. त्यांनी स्वरूपा कोमात गेल्याचे सांगितले. तिला कधी शुद्ध येईल हे काही निश्चित नसल्याचे सांगितले. ते पाहून मधुराचा पारा सुटला. ती अर्पिताला फरपटत घरी घेऊन आली व तिला घालून पाडून बोलायला लागली.

"सुधाकर दादा म्हणत होते तेच खरं निघालं. विषवल्ली आहेस तू.. शापित आहेस. एका घराचा नाश करून आता माझ्या घराचा नाश करायला आली आहेस. मी हे होऊ देणार नाही. माझ्या स्वराला काही झालं ना तर मी जीव घेईन तुझा..आताच्या आता माझ्या घरातून चालती हो." मधुरा.

 अर्पिताचे डोळे पाणावले होते. तिने शेवटची आशा म्हणून यज्ञेशकडे पाहिले. पण त्यानेही मधुराच्या बोलण्याला समर्थन दिले. पुन्हा एकदा अर्पिता घरी आली. काही दिवसांनी यज्ञेशने अर्पिताला डिओर्सचे पेपर्स पाठवले. अर्पितानेही आता आपले शापित आयुष्य स्वीकारले होते. सोहम आणि शालिनी मात्र अर्पिताला घरात पाहून नाखूष होते. शालिनीही आता गर्भवती होती. तिला आपल्यावर आणि आपल्या बाळावर तिची विषारी सावली नको होती. अर्पिता घरात आली तेव्हा तिची आई उमाही हिवतापने आजारी होती. अर्पिता घरी आल्यावर दोन तीन दिवसातच तिच्या आईचा मृत्यू झाला. शालिनीने याचंही खापर अर्पिताच्या माथ्यावर फोडलं. दुरदूरचे नातेवाईक, सगेसोयरे आले होते. त्यांच्यासमोर अर्पिताचा अपमान केला की निदान शरमेने तरी ती या घरातून निघून जाईल अशी अपेक्षा शालिनीला होती.

"हो, अगदी खरं सांगते हो तुम्हांला. शापित आयुष्य घेऊनच जन्माला आली आहे जणू.हिच्या जन्मानंतर हिच्या आयुष्यात आलेल्या प्रत्येकाच काही न काही अघटितच घडलंय. पहिले नवऱ्याचा मृत्यू, मग दुसऱ्या लग्नानंतर दुसऱ्या नवऱ्याची मुलगीही कोमात गेली आणि आता आई. चांगल्या भरल्या घराला उतरती कळा लावली हो हिने." शालिनी.

  शालिनी डोळे पुसत म्हणत होती. सगळी मंडळी साशंक नजरेने अर्पिताकडे पाहू लागले. आपली चूक नाही हे माहीत असतानाही अर्पिताची नजर खाली झुकली. आता मात्र विश्वासरावांचा संयम संपला.

" गप्प बस शालिनी.माझ्या सोन्यासारख्या मुलीची काहीही चुक नाही त्यात आणि तिच्या जन्मापासून उमा तिच्यासोबतच आहे. तिला तेव्हा मृत्यू नाही आला ना ? मग आता आला त्याला कारणीभूत माझी मुलगी कशी काय ? उलट तू आल्यापासून हे चालू झालंय किंवा तुझ्या पायगुणामुळे माझ्या मुलीचा संसार उध्वस्त झाला असं मी म्हटलं तर कसं वाटेल तुला ? सोहम, तुलाही लाज वाटत नाही आपल्या बहिणीबद्दल ऐकून घ्यायला ? खुप झालं आता. खूप छळ केलात तुम्ही माझ्या सोनपरीचा.. ताबडतोब गाशा गुंडाळून चालते व्हा माझ्या घरातून.. आणि राहायचं असेल तर तिच्या आज्ञेतच रहायचं आता. चल बाळा अर्पिता.." विश्वासराव.

           विश्वासराव अर्पिताला घेऊन आत निघून गेले. दुसरे दिवशी सकाळी शालिनी आणि सोहम घराबाहेर पडले. आलेले नातेवाईक ही निघून गेले. आता घरात विश्वासराव व अर्पिता दोघेच होते. विश्वासरावांच्या ओळखीने अर्पिताला जवळच्याच महिलाश्रमात नोकरी लागली. ती तिथल्या मुलींना शिकवू लागली.

एके दिवशी धावतच घरी येत अर्पिताने विश्वासरावना हाक मारायला सुरुवात केली.

"बाबा, बाबा..." अर्पिता.

" अगं हो बाळा काय झालं ?" विश्वासराव.

" बाबा, महिलाश्रमात काम करण्याबरोबरच मला समाजसेवा करायची ही इच्छा आहे. 'संजीवनी' या समाजसेवी संस्थेकडून मला काम करायचं आहे. ते गरजूंना मदत करतात. अपयशी झालेल्याना पुन्हा नव्याने उभं रहायला मदत करतात. बाबा, मी ही करू ते काम ? " अर्पिताने आशेने विश्वासरावांच्या चेहऱ्याकडे पाहत विचारलं.

"निर्धास्तपणे कर बाळा. पण तू माझी परवानगी का मागते आहेस ?" विश्वासराव.

"बाबा, त.. ती संस्था ओंकार जीजू चालवतात. नुसते इंजिनिअर नसून ते खुप उत्तम समाजसेवक आहेत. बाबा, मी काम करते ना, त्या महिलाश्रमाला सर्वात मोठी देणगी त्यांच्याकडूनच येते. बाबा, आपण बोलूया ना त्यांच्याशी.. काय गुन्हा केलाय त्यांनी आणि ताईने ? प्लिज बाबा. " अर्पिता केविलवाण्या स्वरात म्हणाली.

"नक्कीच बाळा.. पून्हा एकदा तू बापाच्या काळीजाला साद घातली आहेस. उद्याच त्यांना घरी बोलाव. खरं तर आपल्यालाही आधाराची गरज आहे. पण त्यांना मी नाकारलं होतं. ते येतील का मला माहित नाही. पण शक्य असेल तर ओंकाररावांना सामानासहीत यायला सांग. त्यांच्या जीवनातील आई वडिलांची आणि माझ्या जीवनातील मुलाची कसर भरून निघेल." विश्वासराव.

 विश्वासराव डोळ्यांतील पाणी टिपत आत गेले. अर्पिताच्या डोळ्यांत ही पाणी दाटले होते. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे देवपूजा झाल्यावर सुर्यवंदनासाठी विश्वासराव अंगणात आले. अंगणात एक टॅक्सी उभी होती व त्यातून सामान उतरवले जात होते. ओंकार आणि नमिता आणि त्यांच्यासोबत एक लहानगी परी विश्वासरावांच्या दिशेने चालत येत होते. बराच वेळ सगळे पाणावल्या डोळ्यांनी एकमेकांकडे पाहत उभे होते. इतक्यात घरातून अर्पिता बाहेर आली. तिने सर्वांना आत बोलावून घेतले. नमिता आणि ओंकारने विश्वासरावांना वाकून नमस्कार केला.

"बाबा, तब्येत कशी आहे तुमची ? आणि अर्पिता काम काय म्हणतंय तुझं ? आजपासून आणखी एका नवीन कामाला तयार ना ?" ओंकार हसत म्हणाला.

"हो जीजू, एकदम रेडी." अर्पिताही उत्साहात म्हणाली.

"बाबा, बोलणार नाही का आमच्याशी ?" नमिता.

"काय बोलू मुली ? माफ कर मला. पोटचा मुलगा जेव्हा वैरी ठरला, तेव्हाही हा मुलगा माझ्याशी इतका प्रेमाने वागतोय. मी त्याला झिडकारल, संबंध तोडले. तरीही मला बाबा म्हणताय तुम्ही. आज लाज वाटते ग स्वतःची.." विश्वासराव मान खाली घालत, हात जोडून म्हणाली. 

"काहीतरीच काय बोलता बाबा ? तुमचे हात कायम आशीर्वाद देण्यासाठी उचला. माफी मागण्यासाठी नाही. हे काय संजू, तू आजोबांना नमस्कार नाही केलास अजून ?" ओंकार.

          संजीवनीने पटकन पुढे होत विश्वासरावांना नमस्कार केला. त्यांनीही मायेने तिला उचलून घेतलं. आज शांत शांत ते घर हसण्याने, प्रेमाने गजबजलं होतं. बोलता बोलता अनेक विषय निघाले. अर्पिताबद्दल घडलेलं सर्व ऐकून ओंकार आणि नमिता दोघांचेही डोळे पाणावले होते.

" नाही ग सोने, सगळ्यांच्या आयुष्यात आनंद भरायची इच्छा व्यक्त करणारी, मला बाबांचे छत्र परत मिळवून देणारी आणि स्वतः अमाप दुःखातून गेलेली असताना सतत दुःख हसतमुख चेहऱ्यामागे दडवून वावरणारी माझी अर्पिता शापित असूच शकत नाही." नमिता अश्रू पुसत म्हणाली.

"उलट हे तर देवीचे उपकार आहेत अर्पिता की तिने तुला अशा माणसांपासून दूर केलं ज्यांचं तुझ्या आयुष्यात काहीच स्थान नाही. आज आपल्या आई असत्या तर त्यांनीही हेच म्हटलं असतं की तू विषवल्ली नाही आहेस." ओंकार.

"हो, पण तू सगळ्यांना सिद्ध करून दाखव की तू अमृतवेल आहेस.. शापित नाही दैवी वरदान घेऊन आलेली आहेस.. सगळ्यांच्या आयुष्याचे रंग भरताना तुझ्या आयुष्याचेही रंग खुलतील अर्पिता.." नमिता.

          मोठ्या बहिणीकडे व जिजूकडे आळीपाळीने पाहत तिने बाबांकडे पाहिले. त्यांच्या डोळ्यांत तिला आज समाधान दिसत होतं. आश्वस्त भाव दिसत होता. दुसऱ्या दिवशीपासून अर्पिताने 'संजीवनी' साठी काम करायला सुरुवात केली. ओंकारने आज अर्पिताला एका घराचा पत्ता दिला. त्यांची मुलगी अत्यंत उदास उदास रहायची म्हणून त्यांनी 'संजीवनी' शी कॉन्टॅक्ट केला होता. अनेकांच्या आयुष्यात पुन्हा रंग भरायला निघालेली अर्पिताही लगेच तयार झाली. ती दिलेल्या पत्त्यावर पोहोचली. तो एक सुंदर बंगला होता. ती फाटक उघडून आत आली व तिने दारावरची बेल वाजवली. कोणा बाईने दार उघडले व तिला आत घेतले. तिथे एक माणूस पाठमोरा काहीतरी शोधत उभा होता.

"एक्सक्युज मी, मी संजीवनी संस्थेकडून आलेय. " अर्पिता.

तो माणूस मागे वळला. ती दोघेही एकमेकांना बघून अवाक झाली होती.

"अर्पिता...तू..?" यज्ञेश.

थोड्या वेळेत शुद्धीत येत यज्ञेशने तिला बसायची विनंती केली. समोरील सोफ्यावर बसत अर्पिताने कामावर लक्ष केंद्रित केलं.

"तू गेल्यापासून पंधरा वीस दिवसांनी स्वरूपा शुद्धीवर आली. पण तेव्हापासून ती दिवसरात्र तुझ्याच नावाचा जप करत असते. मम्मा अशी आहे आणि तशी आहे... दिवसरात्र ती तुझ्यातच हरवून गेली आहे. माझ्याही नकळत तू तिला इतकं आपलंसं केलंस हे खुप उशिरा कळलं मला." यज्ञेश.

"क..कुठे आहे स्वरा ?" अर्पिता.

स्वरूपाची हालत ऐकून तिचं हृदय कळवळलं. यज्ञेश तिला स्वरूपाच्या खोलीत घेऊन गेला. ती हातात अर्पिताची फोटो फ्रेम घेऊन ती निरखत होती.

"स्वरा बेटा कोण आलंय बघ बरं !" यज्ञेश.

(मागेही न पाहता) "डॅड, मम्मा कधी येणार ?" स्वरूपा.

"अरे माझ्या सोन्या, मीच आलेय. माझ्या सोन्याने खुप मिस केलं ना मला.." अर्पिता.

स्वरूपाचे डोळे भरून आले होते. बारा वर्षांची ती छोटी परी अर्पिताला घट्ट बिलगली. अर्पिताच्या डोळ्यांत अश्रू दाटले होते.

"मम्मा, तू मला सोडून नको ना जाऊ ग.. डॅडला तुझ्यासारखी कॉफी नाही बनवता येत. आणि आता माझा स्टडी पण खूप वाढेल. डॅड तर सारखा बिजी असतो. त्याला माझ्याशी बोलायला वेळच नाही. तू नाही ना ग जाणार मला सोडून ? "स्वरूपा.

"हो, झोप हा आता. किती थकल्यासारखी वाटतेय ना माझी स्वरा..थोड्या वेळाने बोलू हा आपण.. " अर्पिता.

          अर्पिता स्वरूपाला थोपटत होती. पाहता पाहता तिला झोप लागली. यज्ञेश खोलीच्या एका कोपऱ्यात उभा राहून हे पाहत होता. स्वरूपा झोपलेली पाहून अर्पिता तिच्या खोलीतून बाहेर आली व यज्ञेशसमोर येऊन उभी राहिली.

"मि. यज्ञेश, तिची तब्येत एकदम ठीक आहे. फक्त ती कुठेतरी एकटी पडलीय. तिच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवा. तिची तब्येत आपोआप सुधारेल. " अर्पिता.

"आणि तू.. " यज्ञेश.

"माझं काय ?" अर्पिता.

"तू नाही का राहणार आमच्यासोबत ? " यज्ञेश.

"नाही." अर्पिता.

          तिने सोसलेला सगळा त्रास तिच्या नकारातून उचंबळून आला होता. त्यामुळे ती ठामपणे नाही म्हणाली व निघून आली. तिला घरी यायला संध्याकाळ झाली होती. घरी आल्यावर ती नेहमीप्रमाणे बाबा आणि ताईला हाक न मारता थेट आपल्या खोलीत गेली. ते पाहून विश्वासराव आणि नमिता तिच्या मागोमाग तिच्या खोलीत गेले.

"बाळा, काय झालं गं ? आज अशी उदास का वाटत आहेस ?" नमिता.

"काय गरज आहे सर्वांना माझ्या आयुष्याशी खेळ खेळायची. अगदी नियती पण खेळवतेय मला. आज कित्येक दिवसांनी सगळं विसरून स्वतःच्या पायावर समर्थपणे उभं रहात मी काहीतरी काम चालू केलं. आणि आजच नियतीने परत यज्ञेशला आणून उभं केलंय..."अर्पिता.

"यज्ञेश ? तो कशाला आला होता ?" विश्वासराव.

"तो आला नव्हता, मी गेले होते. 'संजीवनी' कडून दिलेल्या एका अड्रेसवर.. त्यांच्या मानसिक आजारी मुलीला मोटिव्हेट करायला. पण ते यज्ञेशच घर होत बाबा. मला माझ्या स्वराची अवस्था पाहवली नाही हो.. मम्मा मम्मा करत रडत होती बिचारी. पण या माणसांकडे आणि मला शापित म्हणणाऱ्या विषारी मनोवृत्तिच्या लोकांकडे मला जावसं वाटत नाही आहे. पण स्वरासाठी माझा जीव तीळ तीळ तुटतोय." अर्पिता.

          विश्वासराव आणि नमिता तिची ही हालत पाहून चिंतेने ग्रासले होते. तेवढ्यातच घरात आणि तिच्या रूममध्ये येणाऱ्या ओंकारनेही सगळं ऐकलं होतं. आपण पत्त्यावरील नाव वगैरे चौकशी न करता हिला पाठवल्याचे त्यालाही गिल्ट वाटू लागले.

"विश्वासराव घरात आहेत का ?" मोहन.

"कोण आहे बरं ?येतो हं !" विश्वासराव.

"नमस्कार.." मधुरा.

मधुरा आणि मोहन आत यात म्हणाले. मात्र विश्वासराव दारावरच आडवे उभे राहून चिडून त्यांच्याकडे पाहत होते.

"तुम्ही ? तुम्ही का आला आहात इथे ? माझ्या तोंडातून काही अपमानकारक शब्द बाहेर पडायच्या आत तुम्ही इथून जाल तर बरं होईल." विश्वासराव.

"आमचं ऐकून घ्या विश्वासराव.. अर्पिताला आम्ही नाही नाही ते बोललो. शापित, विषवल्ली बोलून अपमानित करून घरातून हाकलून दिले. पण आता आम्हांला मनापासून पश्चाताप होत आहे." मोहन.

"हो, मी माफ मागते तुमची. मी खूप हाल केले अर्पिताचे. पण त्याची शिक्षाही आम्ही भोगतोय हो. आमची छोटी परी स्वरूपा आता आमच्या कोणाशीच बोलत नाही. नुसता अर्पिताच्या नावाचा जप करत असते आणि आम्हीही आता म्हातारे झाले आहोत. गोळ्यांच्या वेळा लक्षात राहत नसल्याने आता अर्पिताच्या असण्याचं महत्त्व कळतंय." मधुरा.

"नमस्कार करतो बाबा. बाबा खरंच माफ करा. मी आणि माझ्या घरातील कोणीही अर्पिताशिवाय राहू शकत नाही. " यज्ञेश.

          अर्पिता आतून हे सगळं ऐकत होती. पण ती अजूनही द्विधा मनस्थितीत होती. तेवढ्यात तिच्या कानावर आवाज ऐकू आला.

"मम्मा, मम्मा कुठे आहेस तू ? ये ना गं बाहेर .." स्वरूपा.

          स्वरूपाचा आवाज ऐकताच मात्र अर्पिता धावतच बाहेर आली. तिने पाहिलं तर काय.. स्वरूपाच्या चेहऱ्यावरचं हसू परत आलं होतं. मम्माला भेटायचं म्हणून ती छान तयार होऊन आली होती. तिला पाहून अर्पिताचे डोळे भरून आले. किती गोड दिसत होती तिची परी हे न्याहाळत ती उभी होती.
__________________________


           हिरव्या रंगाचा काठपदरी शालू नेसून अर्पिता दारात उभी होती. मधुरानेही लगबगीने माप ठेवले होते. अर्पिताने माप ओलांडले. ज्या घरातून शापित म्हणून तिला बाहेर काढण्यात आलं होतं , त्याच घरात ती लक्ष्मी म्हणून परत येत होती. अर्पिताच पुन्हा एकदा एक नवं विश्व तयार झालं होतं. बाबा, सासू सासरे, यज्ञेश, ताई आणि जीजू, स्वरूपा आणि अगदी दादा आणि शालिनी वहिनी सुद्धा. दादा आणि वहिनीही आपली चूक समजल्यामुळे परत आले होते आणि अर्पिताने हट्टाने विश्वासरावांना त्या दोघांना माफ ही करायला लावले.
           यापुढची प्रत्येक सकाळ तिच्या आयुष्यात आनंदाचा ठेवा घेऊन येणार होती. आणि तिला शापित ठरवणाऱ्या अनेकांसाठी ती संजीवनी बनून पून्हा नव्याने उभी रहाणार होती.
         



Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract