मी अनुभवलेला पाऊस..
मी अनुभवलेला पाऊस..
आपण जीवनात अनेक पावसाळे बघतो. पावसाळ्याशी निगडित अनेक छोट्या मोठ्या, आनंदी आठवणी आपल्या मनात रुंजी घालत असतात. मात्र मला एक अनोख्या पावसाळयाबद्दल सांगायचं आहे. अनोखा का तर असा पावसाळा यापूर्वी महाराष्ट्राने आणि देशाने कधी बघितला नव्हता. २०२० चा पावसाळा. २०२०ला उष्णतेने कहर केला होता. मे महिना संपत आला तरी वळीवाची चिन्ह नव्हती. सगळीकडे लोक उष्मघाताने मरत असल्याच्या बातम्या येत होत्या. धरणं आटली होती. अक्षरशः काही बारमाही असलेल्या नद्या पार आटल्या होत्या. पावसाची तर काहीच चिन्हं दिसेनात. अशात ३० मे २०२०.. सकाळी उठून पाहावं तर आभाळ भरून आलेलं. काळ्या ढगानी आभाळात गर्दी केली होती. मी न्यूज चॅनेल सुरु केलं. न्यूजवर बळीराजाचे आभार मानले जात होते. शेतकरी ही सुखवले होते. मलाही छान वाटत होत. भयानक उष्म्यातून अचानक पावसाची चाहूल लागल्यावर कोण सुखावणार नाही ? पण ते तसं नव्हतं जसं ते दिसत होत. दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत पाऊस काही पडलाच नाही. सुटला होता तर फक्त सोसाट्याचा वारा. आता कुठलं झाड उन्मळून पडेल की काय इतका वाऱ्याचा वेग होता. हवामान खात्याने रत्नागिरी जिल्हा आणि पूर्ण कोकण किनारपट्टीला रेड अलर्ट दिला होता. काहीही घडू शकत होत. कारण केरळच्या किनारपट्टीवर 'निसर्ग' चक्रीवादळ येऊन धडकलं होत. जे केरळला उध्वस्त करत होत. कोकणात तेव्हा भीतीचं सावट पसरलं होत. कारण या चक्रीवादळाचा वेग फार जास्त होता. अरबी समुद्रात निर्माण झालेलं हे वादळ सोबत पाऊस घेऊनच रत्नागिरीच्या किनाऱ्यावर धडकलं. रत्नागिरीच्या किनाऱ्यापासून थोडं दूरच असल्यामुळे जीवितहानी मोठ्या प्रमाणात झाली नव्हती. पण तो थरार औरच होता. १ जुन २०२० ! 'निसर्ग'चा फटका रत्नागिरी जिल्ह्यालाही जाणवायला लागला. शाळा, कॉलेजेसना तर सुट्ट्या जाहीर झाल्या होत्या. तुफान वारा, मुसळधार पाऊस, कडाडणाऱ्या विजा आणि वाऱ्यांच्या व पावसाच्या प्रभावाने काही भागात कोसळलेल्या दरडी..! मी जिथे राहत होते त्या भागातील रस्ते पूर्णतः पाण्याखाली होते. त्या भागात खरं तर नदी म्हणावी अशी मोठी नदी नव्हतीच. पण छोट्या छोट्या नद्यांनी पण रौद्ररुप धारण केलं होत.
तो पावसाळा विसरता न येण्यासारखा होता. घरातून बाहेर पाऊल टाकू शकत नाही कारण संपूर्ण भाग पाण्याने भरला होता. १ जुनच्या रात्री तर घरात झोपायलाही भीती वाटत होती. वाऱ्याचा वेग इतका जास्त होता की कदाचित स्लॅप अंगावर कोसळेल एका काय अशी भीती वाटू लागली होती. रात्रभर सर्वजण जागे होतो. लाईट नाही, चार्जिंग नाही, मोबाईलला नेटवर्क नाही. दूरच्या काय बाजूच्या लोकांशीही संपर्क करायचा तर जाणार कुठून ? गुडघ्यापर्यंत पाणी भरलेलं रस्त्यावर ! १ जुनच्या संध्याकाळीच चक्रीवादळ रत्नागिरीतून उत्तरेला मुंबईच्या दिशेने सरकलं होत. पण त्याचे पडसाद पुढचे दोन दिवस अहोरात्र जाणवत होते. तिसऱ्या दिवशी वातावरण नॉर्मल झालं. पाऊस थांबला नव्हता. पण निदान वाऱ्याचा वेग ओसरला होता. लाईट आल्या होत्या. टीव्ही, मोबाईल सर्वांवर फक्त न्यूज होत्या. पूर्ण महाराष्ट्रात आणि देशात प्रचंड जीवितहानी झाली होती. जिथे जीवितहानी टळली होती तिथे लोकांची घरं उध्वस्त झाली होती. पावसाच्या वाटेकडे आशा लावून बसलेले डोळे अश्रूंनी भिजले होते. चार दिवसांत चक्रीवादळ ओसरलं. परंतु तोपर्यंत त्याच्या परिणाम मोसमी वाऱ्यांवरही झाला होता. अरबी समुद्राने भयाण रूप धारण केलं होत. पावसाचा तो थरार न विसरण्यासारखा होता. त्या नंतर आलेल्या पावसाने कहर बरसवला होता. देशभर अनेक जिल्हे, राज्य पुराच्या पाण्याखाली बुडाले होते. घर, शाळा, मोठमोठ्या बिल्डिंग्ज अक्षरशः वाहून गेल्या होत्या. जीवितहानी किती झाली याचा तर पत्ताच नव्हता. वेगवेगळी सैनिकांची पथकं हजारो लोकांचा जीव वाचवण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून अहोरात्र कार्य करत होती.
"श्रावणमासी हर्ष मानसी... " असा पाऊस अनुभवलेल्या देशाने पावसाचा अतिरौद्र कहर पाहिला होता. अनेक सुंदर आणि गोड पावसाळ्यांच्या आठवणीही असतात. मात्र हा पाऊस अविस्मरणीय आणि मनाला चटका लावून जाणारा होता. "सांग सांग भोलेनाथ पाऊस पडेल का ? " म्हणणारी आर्जवं "पावसा पावसा आता जाशील का ? " म्हणत होती. चार महिन्यांचा पावसाळा जुन ते नोव्हेंबर म्हणजे तब्बल सहा महिने अविरत पडत होता. असा पावसाळा पुन्हा नशिबी येऊ नये हिच अपेक्षा !
कहर बरसला पृथ्वीवर..
इतका का कोपला आहेस ?
डोळे अश्रूंनी भरलेले आहेत..
अविरत का बरसत आहेस ?
नकोसा वाटत आहेस तू..
आता तरी थांबशील का ?
उध्वस्त होऊन गेलेय सारे..
पावसा आता जाशील का ?
