STORYMIRROR

डॉ. मुक्ता बोरकर - आगाशे

Abstract

4.6  

डॉ. मुक्ता बोरकर - आगाशे

Abstract

# नियतीही तिच्यापुढे झुकली

# नियतीही तिच्यापुढे झुकली

4 mins
1.0K


"अहो उठा ना...! बघा मुलगी तिकडे मुकाश्रू गाळतेय आणि तुम्ही इथे निवांत झोपलाय!" माधुरी च्या आवाजाने अगदी खडबडून उठला तो! काय झाले असेल श्रेया ला ? जाऊनच बघतो तिच्या रूम मधे.


तिथे बघतो तर काय श्रेया मुळूमुळू अश्रू गाळत बसलेली!

बाजूलाच लाल डाग पडलेली चादर सगळं सांगून गेली त्याला! त्याने मायेने तिच्या केसांवरून हात फिरवला.लेक अगदी पोटाशी बिलगली त्याच्या! कपाटात असलेले सॅनीटरी नॅपकिन चे पॉकिट तिला देऊन त्याने तिला अंघोळीला पाठवले......


माधुरी गेली आणि दोन्ही पोरांची ,अर्णव आणि श्रेया ची सारी जबाबदारी विवेक वर येऊन पडली होती. माधुरी असताना या सगळ्या गोष्टी कधी त्याला बघाव्याच लागल्या नव्हत्या.ह्यानी फक्त कमवून आणायचे आणि तिने घरचे बाहेरचे सारे बघायचे! अगदी न कुरकुरता करायची ती हे सगळे.पण अचानक कॅन्सर ने तिच्यावर घाला घातला आणि संपले सगळे!


किती जबाबदारी आली होती न आता त्याच्यावर,तो प्रयत्नही करत होता ती समर्थपणे पेलण्याचा!पण काही प्रसंग मात्र आजसारखे बिकट असायचे!


न कळत त्याचे मन भूतकाळात गेले होते. किती सुखाचा संसार होता ना दोघांचा,अगदी दृष्ट लागावी असा! माधुरीशी लग्न झाल्यावर त्याचे आयुष्य अगदी बहरत गेले होते.होतीच ती तशी दिसायला अगदी नक्षत्रासारखी सुंदर,तितकीच मनानेही सुंदर! अगदी नेटकेपणाने सगळ्यांचं करणारी,आपल्या सुंदर स्वभावाने सगळ्यांना जोडणारी! ती जीवनात आल्यावर त्याने अगदी मनोमन विचारच केलेला हीच्याशिवाय आयुष्यात दुसरीला स्थान नाहीच!


लग्नानंतर  अगदी सहजतेने तो उत्कर्षाच्या शिड्या चढत गेला आणि ती मनापासून त्याला साथ देत गेली! संसार वेलीवर दोन गोंडस फुलेही उगवली,अर्णव आणि श्रेया! सगळं अगदी सुरळीत सुरू असताना अचानक माधुरीला गर्भाशयाच्या कॅन्सर चे निदान झाले.आजार वाढलेल्या अवस्थेत होता,परिस्थिती पूर्ण बिकट होती.


माधुरीला स्वत:चे भविष्य आता उमगले होते.तिने खूपदा विवेक ला ती नसल्यास त्याने लग्न करावे हे सुचवत गेली पण तो त्याच्या निर्णयावर ठाम होता.तो माधुरीला कसेही करून जगवेल याच आशेवर तो होता.

परंतु माधुरीला आता पूर्ण कल्पना आली होती किशोरवयीन असलेल्या तिच्या मुलांची चिंता तिला आता सतावत होती, खास करून श्रेयाची.12 -13 वर्षाच्या श्रेयाला आताच खरी आईची गरज होती आणि नेमकी तेव्हाच ती नसणार होती...!


खूप तुटायचं तिचं मन आतून पण काही उपाय नव्हता...! अखेर माधुरी गेली.., पोरांच्या विवंचनेत च गेली.!


माधुरी गेली आणि विवेक चा संसार उघडा पडला. पण माधुरीने पोरांना इतके उत्तम संस्कार दिले होते की मुले अतिशय संस्कारी आणि स्वयंपूर्ण होती . मुळातच शहाणी असलेली ती बाळे आल्या प्रसंगा

ने अजूनच समजदार झाली होती .

सगळ्यांनी त्याला दुसऱ्या लग्नाविषयी सुचवले पण त्याच्या निर्णयावर तो अगदीच ठाम होता.माधुरी त्याच्यात पूर्ण भिनली होती आणि त्या अद्वैताचा अपमान करणे त्याला शक्य नव्हते. त्या दिवसापासूनच तो पोरांचा आई आणि बाबा दोन्ही झाला होता.

पण आजची परिस्थिती पाहिल्यावर घरात त्याला श्रेया ला समजून घेणाऱ्या एखाद्या स्त्री ची गरज भासू लागली आणि त्या विचारातच तो झोपी गेला. दुसऱ्या दिवशीही तेच विचार त्याला पोखरू लागले त्याचं तंद्रीत तो पुन्हा निद्राधीन झाला!


आज पुन्हा माधुरी त्याच्या स्वप्नात आली . "अहो ऐकलं का, श्रेया ला ना आता थोडी आईच्या उबेची गरज आहे,तुम्ही असे करा ना उद्याच गावाकडे जा आणि आई आणि बाबांना घेऊन या."


" मला माहिती आहे की तुम्ही म्हणाल की ,आपण त्यांच्यासाठी स्वतंत्र रूम बांधूनही ते आले नव्हते मागे ,मग आता येणार का?"

"अहो माझे मन सांगते येतील ते ! तुम्ही जा बघू उद्याच!"  

अगदी खडबडून उठला तो! किती सहजपणे तिने त्याचा प्रश्न सोडवला होता ना? अलीकडे असेच व्हायचे तो विचारांच्या तंद्रीत,चिंतेत झोपी जायचा आणि ती त्याच्या स्वप्नात येऊन त्याच्या चिंतेचे निवारण करायची. अगदी असेच सगळे चाललेले.


दुसऱ्या दिवशी रविवार होता .सकाळीच त्याने पोरांना गावाकडे जाण्याचा बेत सांगितला.मुलेही आजोबा आजीच्या भेटीला आतुर झाली. 

घरी जाताच विवेक ने आईला येण्याचे प्रयोजन सांगितले आणि त्या लगेच तयार झाल्या यायला! नेहमीच आढेवेढे घेणाऱ्या आईची ती तत्परता बघून त्याला आश्चर्य वाटले!  

त्याच बोलू लागल्या मग, अरे काल माधुरी माझ्या स्वप्नात आली आणि बोलली  " आई कशा हो तुम्ही? पोरांना आता गरज आहे हो तुमची,खास करून श्रेया ला,तरी तुम्ही इथेच!" तेव्हाच विचार केला की आता तुझ्याकडे जायचं तर तूच आलास बघ....! तो विचारच करत राहिला......


माधुरी गेली होती पण तिच्यातील आई मात्र गेली नव्हती! ती तिथेच रेंगाळत राहिली होती तिच्या मुलांची .काळजी करत. नियतीने डाव साधला होता पण ती तिलाही पुरून उरली होती. विवेक च्या स्वप्नात येऊन त्याच्याशी हितगुज करून ती अजूनही तिच्या मुलांचं हवं नको ते बघत होती. नियतीही तिच्यापुढे झुकली होती.

आता आई बाबा दोघेही आले होते.विवेक सोबतच ,त्यांच्याही मायेची ऊब पोरांना मिळणार होती. त्याची बरीचशी चिंता आता मिटली होती. आणि मुख्य म्हणजे त्याची माधुरी ,त्याच्या पोरांची आई ,होती ना त्यांचं हवं नको ते बघायला त्याच्या स्वप्नात येऊन सांगायला...!


आई मरते पण तिच्यातील आईपण आणि पालकत्व कधीच मरत नसते.ते कोणत्या ना कोणत्या रूपात पोरांच्या मदतीला नेहमीच धावून येत असते!


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract