डॉ. मुक्ता बोरकर - आगाशे

Fantasy

3  

डॉ. मुक्ता बोरकर - आगाशे

Fantasy

एलियन

एलियन

4 mins
235


मनू आणि तिचे मित्र मैत्रिणी मोकळ्या माळरानावर खेळत होते.खेळता खेळता संध्याकाळ सुद्धा झाली अंधारू लागलं पण ते आपल्याच तालात, कारण उन्हाळ्याच्या सुट्या होत्या ना !

     

      अचानक एक गोल गोल असणारं मोठं यानासारखं काहीतरी आकाशातून लाईट मिचकावत खाली उतरलं.त्याच्या आवाजाने आणि त्या प्रकाशाने बिचकून सारे खेळता खेळता स्तब्ध झाले.


त्याचा अतिशय झगमगाट बघून त्याच्या जवळ जायची हिम्मत काही कुणाची झाली नव्हती , दुरूनच सगळे तिकडे बघत बसले पण खूप वेळ झाला तरी काहीच हालचाल नव्हती तिथे म्हणून मग कंटाळून सारे घराकडे परतले. परततांना मात्र इशाऱ्याताच त्यांनी रात्री एकमेकांना जेवणानंतर तिथे जमायची सूचना केली.


रात्री जेवणं उरकली अन् मनु,बबलू,पक्या, विक्या, परश्या अन् बबली असे पाचसहा जण घरी काहीतरी बहाणे सांगून पुन्हा एकत्र आले आणि पुन्हा मिशन यान...


सगळे जण पुन्हा तिकडे गेले. यावेळी मात्र दुरूनच त्यांच्यावर पाळत ठेवायचं असं त्यांनी ठरवलं अन् मग मोठे दगड अन् झुडूपाच्या आडोशाने त्यांनी त्यांच्यावर नजर ठेवणे सुरू केले.



मघाशी अगदीच काहीच हालचाल नसणारे ते यान पण आता मात्र तिथे लगबग हालचाल दिसत होती.


काही व्यक्ती बाहेर येत होते अन् काही आत जात होते.दुरून फक्त त्यांना हलणाऱ्या आकृतीच दिसत होत्या म्हणून त्यांनी अजून थोडं समोर जायचं ठरवलं मग लपत छपत जात त्यांनी एका मोठ्या दगडाचा आसरा घेतला आता चित्र स्पष्ट होतं.


तितक्यात यानातून एक जण बाहेर येतांना दिसला. सगळे आता लक्ष देऊन बघू लागले एक बोडख्या डोक्याची काटकुळी आकृती बाहेर पडताना दिसली. ना माणूस ना भूत अशी ती विचित्र आकृती पाहून सारे हबकले....

"अरे पळा,भूत भूत ..."त्यांच्यापैकी एकजण म्हणाला. 

ती आकृती तिकडेच येत होती अन् त्याच्या हातातल्या मोबाईल सारख्या गॅजेट वर काही तरी बोलत होती. पण त्याची भाषा मात्र अगदीच विचित्र होती.


थोडे बोलून तो परत फिरला आणि सगळ्यांनी सुटकेचा श्वास सोडला. 

"अरे हे भूत नाही हे एलियन आहेत एलियन,परग्रहावरील माणसे!!!

 मी ऐकलं आहे यांच्याबद्दल. अरे पण आपल्याला आता सगळ्यांना सावध करायला हवं. ही इथे कां आली असतील? यांचा वेगळा काही उद्देश तर नाही ना? सगळी माहिती काढून घ्यायला हवी"


"अरे पण आपण हे सगळं सांगायला जाऊ न तर सगळे आपल्यालाच ओरडतील आणि आपलीच खरडपट्टी काढतील. वरून शिक्षा देतील ती वेगळीच...!" पक्या म्हणाला.


' हो रे खरं आहे पक्याचं, चला परतूया आता अन् चुपचाप जाऊन झोपूया. सकाळी उठल्यावर सांगू सगळ्यांना." बबलू बोलला. यावर सगळ्यांचे एकमत झाले आणि ते तिथून घरी वापस आले.



दुसऱ्या दिवशी सकाळी सगळ्यांना सांगायचा त्यांचा विचार तसाच राहिला कारण सकाळी फिरायला गेलेल्या कुणाला तरी तिथे काहीतरी चमकताना दिसलं. मग गावात एकच चर्चा. पण काही वेळातच यानाचे लाईट बंद झाले. उजाडताच गावातल्या सगळ्यांनी तिथे जाऊन पाहिलं पण सगळं अगदी सामसूम होतं.काहीच हालचाल तिथे नव्हती. पण उगीच रिस्क नको म्हणून कुणीच त्याच्या अगदी जवळ नाही गेलं.गावात मात्र तीच चर्चा...! 



आता मात्र या सर्वांनी रात्री पाहिलेलं सगळं सांगितलं. सगळ्यांनी त्यांना आधी शिव्या घातल्या पण सगळ्यांनी पुन्हा सावधगिरी बाळगायचा सल्ला दिला. आज रात्री पुन्हा पाळत ठेवायची अन् मग त्याचा काय बंदोबस्त करायचा ते बघू असं ठरलं अन् सगळे आपल्या कामाला लागले.



सगळे तर आपापल्या कामात गढले पण चुपचाप बसणारे हे टोळके नव्हते. घरी सगळे दुपारची झोप घेत असताना नजर चुकवून हे सगळे तिकडे पोचले.


तिथे आता मात्र अतिशय सामसूम होती. अगदी चिटपाखरू सुद्धा तिकडे फिरकले नव्हते. ते अजून जवळ गेले यानातून अजिबात काहीच हालचाल किंवा आवाज जाणवत नव्हते.आता मात्र यांची उत्सुकता शिगेला पोचली होती. बाहेर अतिशय रणरणते उन होते. पण यांचे कुतूहल काही संपेचना. शेवटी या अतिशय साहसी इब्लीस टोळक्याने आत जाऊन बघायचा निर्णय घेतला.



एकामागोमाग एक ते आत घुसले. दरवाज्यावर एक जण होता काल पाहिलेल्या सारखाच पण अगदीच निपचित पडलेला अन् निर्जीव...! मग ते थोडे अजून आत गेले. जागोजागी सगळे असे निपचित पडले होते. जिकडे तिकडे मोठे मॉनिटर होते. आत एक मोठी लॅब होती .पण आत मात्र किचन अजिबात नव्हते. 


" हे खात काय असतील??" एकाचा प्रश्न


तेवढ्यात एकाला एका शेल्फ मधे विविध आकार आणि प्रकारचे मोठमोठ्या गोळ्यांचे पाकीट दिसले. तेच खाऊन हे राहत असावेत असा अंदाज सगळ्यांना मग बांधला. आतूनच एक जिना वरवर जात होता. सगळे मग वर आले तर जिकडे तिकडे सोलर पॅनल लागले होते. एका जागी बॅटरी इंडिकेटर दिसत होता. तो अर्ध्याच्या थोडा समोर होता.6मधात एक टॉवर सारखं काही तरी होतं तिथून कदाचित सिग्नल्स येत होते.पुन्हा सगळे खाली आले.


तिथला काना न कोपरा अगदी त्यांनी नजरेखालून घातला. ही अनोखी दुनिया अन् अनोखी माणसे पाहून त्यांना मजा वाटत होती. बराच वेळ झाला आता समोरचे मॉनिटर अन् की बोर्ड त्यांना खुणावू लागले अन् परिणामाची पर्वा न करता त्यांनी की बोर्ड वर बोटं फिरवणे सुरू केले. 


अन् मॉनिटर स्क्रीन वर काही मेसेज दिसू लागले. चार्जिंग बॅटरी सुद्धा आता नव्वद च्या वर इंडिकेट करू लागली अन् त्या शांततेचा भंग करत सायरन वाजू लागला....., आत मधल्या लोकांच्या शरीराची थोडी थोडी हालचाल सुद्धा सुरू झाली अन् आता मात्र ही सगळी कार्टी घाबरली...!


सगळ्यांनी बाहेरच्या दिशेने धूम ठोकली . एकापाठोपाठ एक सगळ्यांनी उड्या मारल्या खाली पण शेवटी असलेली मनु मात्र पुरती अडकली. दारा वरच्या गार्ड ने तिला पकडले होते. अचानक तिथले सगळे लाईट सुरू होऊन यान उडण्याच्या तयारी ला लागले.आता मात्र मनु जिवाच्या आकांताने "सोडा मला, सोडा मला" म्हणून रडू लागली.


"मनु ये मनु झोपेत रडतेस काय बेटा अशी?? उठ सकाळ झाली म्हणत आई तिच्याजवळ येऊन बसली.


आपल्याला पडले ते एक स्वप्न होते हे बघून तिला हायसे वाटले...


" काय झालं ग कशाला ओरडत होती? भयानक स्वप्न पाहिले का???"


" हो आई " म्हणत मनु नी तिला पडलेले एलियन चे स्वप्न आईला सांगितले.


आई मात्र हसली आणि म्हणाली " काल रात्री तू टी वी वर तो सिनेमा पहिला ना ऋतिक रोशन चा त्याचाच प्रभाव तुझ्यावर पडला वाटते. चल उठ आता निघ स्वप्नाच्या दुनियेतून बाहेर...."


" अरे असं आहे होय." म्हणत मनु पण हसायला लागली.



Rate this content
Log in

Similar marathi story from Fantasy