STORYMIRROR

vinit Dhanawade

Romance Fantasy

2.5  

vinit Dhanawade

Romance Fantasy

" धुक्यातलं चांदणं "( भाग 3)

" धुक्यातलं चांदणं "( भाग 3)

34 mins
1.7K


      पाऊस थांबायचं नाव घेत नव्हता. विवेक आणि मानसी एकमेकांसमोर तसेच उभे होते. मानसी त्याला बघून हसली. पण ते हसणं वेगळं होतं, तूच्छतेने भरलेलं. विवेकने ओळखलं." अजून तुझी सवय गेली नाही वाटते.… पावसात भिजण्याची. अजूनही कॉलेजमध्ये आहेस वाटते… " विवेकच्या मनाला लागलं कुठेतरी. मान खाली घालून तो तसाच उभा होता. थोड्यावेळाने त्याने मानसीला विचारलं,

" कशी आहेस ?",

" मजेत आहे, आनंदात आहे.",

" छान आहे.",

"तुझं काय चालू आहे… जॉबला आहेस का ?… कि फक्त कथा-कविता लिहिण्यात वेळ घालवतोस अजून. " जणू काही मानसी त्याचा अपमान करायलाच आली होती.विवेकला पुन्हा वाईट वाटलं. एकेकाळी त्याच्या कवितांवर वेडी होणारी, आज त्याला त्यावरच बोलून दाखवत होती. 

" जॉबला आहे मी आणि कधीतरी लिखाण करतो. तुझं काय चालू आहे ?",

" माझं… हे हॉटेल आहे ना, ते माझ्या होणाऱ्या नवऱ्याच आहे. " विवेकच्या मनात झालं काहीतरी. तो काही बोलला नाही त्यावर. 

" congratulations !! , चल मी निघतो. ", म्हणत विवेक निघाला.

" मी आहे मुंबईत, हा महिनाभर. नंतर नाशिकला रहायला जाणार आहे. आलास तर ये कधीतरी. बोलायचं आहे तुझ्याबरोबर. " विवेक ते ऐकत होता. होकारार्थी मान हलवली आणि स्टेशनच्या दिशेने निघाला. 


      पूजा आज वेगळ्याच आनंदात होती. प्रेमात पडली होती ना ती विवेकच्या. त्यात पाऊस, romantic वातावरण अगदी. पूजा घरी आली. तिला तर भानचं नव्हतं. घराबाहेर सुद्धा ती थोडीशी भिजली. " पूजा…. ये पूजा… " त्या आवाजाने ती जागी झाली. तिच्या आईचा आवाज होता तो. घाबरून गेली ती. तशीच हळू पावलांनी पूजा वर आली. वडील समोरच बसले होते.

" काय गं… कूठे भटकत होतीस ? "वडिलांनी पेपरातून डोक वर न काढताच विचारलं. 

" Friend कडे गेली होती." पूजा दबक्या आवाजात म्हणाली.

" आणि भिजलीस कशी ?" आईने प्रश्न केला तसं वडिलांची नजर पूजावर गेली. 

" काय ग… छत्री होती ना.",

" sorry बाबा… विसरली मी, घरीच. ",ते उत्तर ऐकून वडिलांचा पारा चढला.

" अक्कल आहे का जरा, असेल तर वापरा ती. लहान नाहीस तू… सकाळपासून पाऊस धरलेला. आणि छत्री न घेताच बाहेर गेलीस. पण मी म्हणतो , पावसाचं बाहेर जायचेच कशाला… एवढं काय काम होतं महत्वाचं मैत्रिणीकडे ?" पूजा गप्पच उभी होती. 

" आणि तुझं लक्ष कूठे असते गं. आपली मुलगी कशी वागते, काय करते … जरा लक्ष नको का तिच्यावर." वडील आता आईला ओरडत होते. आईसुद्धा निमुटपणे ते ऐकत होती.

" आता काय इथेच सुंभासारखी उभी राहणार का ?… जा आत आणि कपडे बदल… तिकडे सगळं पाणी गळते आहे कपड्यातून… जा आत. " तशी पूजा आत पळाली. 


थोडयावेळाने पूजा बाहेर हॉलमधे आली. आई कपड्यातून गळलेले पाणी पुसत होती. पाऊस एव्हाना होता. वडील नव्हते हॉलमधे. 

" आई, बाबा कूठे गेले ?",

"ते ना… आताच बाहेर गेले, पाऊस होता ना सकाळपासून म्हणून थांबलेले. कमी झाला तसे गेले ते, काही काम होतं त्यांचं." पूजा आईजवळ आली.

"Sorry आई… " पूजाने आईला मिठी मारली.

" अगं… लादी तर पुसू दे. आणि sorry कशाला ?",

"बाबा ओरडले ना माझ्यामुळे तुला…sorry.",

"वेडी गं वेडी… आईला कोणी sorry बोलते का आणि त्यांचा स्वभाव माहित आहे ना तुला. मग छत्री कशी विसरलीस.",

"विसरली नाही गं… मुद्दाम भिजायला गेली होती.",

"लबाड… ",म्हणत आईने पूजाच्या गालावर चापटी मारली.

" आणि कूठल्या मैत्रिणीकडे गेली होतीस ?" तशी पूजा गप्प झाली. 

" काय झालं गं ?",

"मैत्रीण नाही.",

"मग कोणाकडे… ",

" Friend आहे माझा."आईच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह.

"Boy-Friend ? ",

"नाही गं , आई. मित्र आहे फक्त.",

"ठीक आहे, पण यांना कळू देऊ नकोस हा. चहा देऊ का तुला… भिजून आलीस ना, बरं वाटेल तुला.",

"Thanks आई." पूजा आईला म्हणाली. तेवढयात वडील आले. 

"श्शी !!! काय हा पाऊस… थांबतच नाही." पूजाकडे नजर गेली. " काय madam… भिजून झालं ना… आता कूठे जायचे आहे पुन्हा." तिने नकारार्थी मान हलवली. 


"ठीक आहे… आणि उद्या बँकमधून सुट्टी घे.",

"का बाबा?",

"उद्या तुला बघायला येणार आहेत." पूजाला धक्का बसला.

"पण बाबा… मला नाही करायचं लग्न एवढयात… " ते ऐकून वडिलांना अजून राग आला.

" मग काय म्हातारपणी लग्न करणार का. ते काही नाही, उद्या सुट्टी घे आणि तयारीत रहा. चांगलं स्थळ आहे. मुलगा अमेरिकेला जॉबला असतो. मुंबईचाच आहे. कळलं.",

"पण बाबा !!!",

"बस्स झालं… विषय संपला. आणि चहा दे मला करून. "आई चहा करायला आत गेली, पूजा पुन्हा तशीच उभी पुन्हा.

" आता जरा चांगल्या मैत्रिणीची संगत ठेव. लग्न होणार आहे तुझं आता. गचाळपणा करू नकोस. "पूजा चुपचाप स्वतःच्या रूम मधे आली. बाल्कनीत येऊन उभी राहिली. पावसाचा जोर कमी झाला होता. मागोमाग आई चहा घेऊन आली."पूजा… बाळा, घे चहा." पूजाने नाही म्हणून मान हलवली.आईला जरा वाईट वाटलं. तिच्या बाजूला येऊन उभी राहिली. दोघीही पावसाकडे पाहत होत्या.


"मलाही पाऊस आवडायचा पहिला. खूप आवडायचा. दरवर्षी येणाऱ्या पावसात भिजण्याचा मी आनंद घ्यायची आणि वेड्यासारखी भिजायची. लग्न झालं, सगळं बंद झालं. तुझ्या बाबांना आवडत नाही म्हणून मी सोडून दिलं पावसात भिजणं. आताही मन होते पण नाही जाऊ शकत." पूजाच्या डोळ्यात पाणी आलं. 

" पण आई, मला एवढ्यात नाही करायचं लग्न. बाबांना सांग ना प्लीज…आणि मी तर आज पहिल्यांदा भिजली पावसात, त्यातला आनंद अनुभवला आज मी. आणि लगेच सोडून देऊ भिजणं. त्या विवेकला काय वाटेल मग.",

"कोण विवेक ",तशी पूजा बोलायची थांबली.

" कोण विवेक… पूजा ",

" माझा friend , त्याच्या सोबत मी फिरायला जाते. ",

"म्हणजे रोज जातेस का ? ",

"रोज नाही, सुट्टी असली कि",

" बरं ठीक आहे.",

"तो खूप चांगला आहे गं, लेखक आहे, चांगला जॉबला आहे. त्यानेच शिकवलं मला, बाहेर मोकळेपणाने फिरायला. शिवाय मनाने सुद्धा चांगला आहे तो.",

"बरं मग… ",

"अगं आता तर आमची मैत्री झाली आहे आणि लगेच बाबांनी लग्न ठरवलं. नको आहे मला."आई पूजाकडे पाहत म्हणाली.

"पूजा… तुझ्यात आणि विवेकमधे काही आहे का…? असेल तर मनातून काढून टाक. तुझ्या बाबांना आवडणार नाही ते.",

"अगं… मला आवडतो फक्त तो, मैत्री आहे.",

" आणि मैत्रीचं राहू दे. तुझ्या बाबांना हे कळू देऊ नकोस. उद्या सुट्टी घेतेस ना… ",

"पुन्हा तेच आई… मला नाही करायचं आहे लग्न एवढयात.",

"अशी का वागतेस तू… ते लगेच लग्न कर असं नाही सांगत आहेत. फक्त बघ. चांगला मुलगा आहे तो… एकदा बघून तर घे." पूजा तरी गप्पच. 


"हे बघ बाळा… तू तरी ऐक माझं, ते तर माझं कधीच ऐकत नाहीत.निदान तू तरी ऐक ना… ",

"अगं… पण आई." पूजाच्या आईने हात जोडले तिच्यासमोर,

"प्लीज म्हणते तुला… तुम्हा दोघांमध्ये मी अगदी दमून जाते. ते ऐकत नाहीत आणि तू रागावून बसतेस.काय करू मी आता." पूजाला गहिवरून आलं.

"नको आई… हात नको जोडूस… घेते उद्या सुट्टी मी."ते ऐकून आईला आनंद झाला.

 "thanks पूजा… आणि एक गोष्ट,प्रॉमिस कर… चुकीचा कोणताच निर्णय घेऊ नकोस घाईने." पूजाने आईच्या हातातलं चहाचा कप घेतला आणि बाल्कनीत उभी राहून बाहेर पाहत उभी राहिली.छान वातावरण जमलेलं बाहेर. अनेक couple's बाहेर आले होते आता. त्यांना बघून विवेकची आठवण झाली. नाही… विवेक बद्दल विचार नाही करायचा. तिने स्वतःच्या मनाला सांगितलं. आईला प्रॉमिस केलं आहे ना… विवेक पासून दूर राहायला पाहिजे आता. 


        Next day, विवेक नेहमीप्रमाणे ऑफिसला आला. आल्या आल्या सवयीप्रमाणे,त्याने पूजाला call लावला. खूप वेळ रिंग वाजत होती. दुसऱ्यांदा call लावला. यावेळी तिने cut केला. पुन्हा लावला, पुन्हा cut केला. " झालंय काय हिला… ?",विवेक विचारात गढून गेला. सुवर्णा आली तितक्यात. विवेकला बघितल्यावर कालची आठवण झाली तिला. जरा वाईट वाटलं. पण ते सगळं विसरून, काही झालंच नाही या अविर्भावात त्याच्या समोर येऊन बसली. 

" काय झालं रे, सकाळी सकाळी चेहरा का पडलेला. ?",

"पुजू call नाही उचलत… असं करत नाही कधी ती.",

"असं का… अरे तिला काम असेल काहीतरी म्हणून उचलत नसेल. "विवेकला पटलं ते. मग तो कामाला लागला. सुवर्णाने सुद्धा कामाला सुरुवात केली. दिवसातून,अधूनमधून तो पूजाला call करत राहिला. एकदाही तिने call उचलला नाही. विवेकचा मूड खराब झाला होता. धड जेवलाही नाही. सुवर्णाला ते कळत होतं. खरंच, विवेकला पूजाची सवय झाली आहे आता. आपण त्यांच्यापासून वेगळं राहिलेलं बरं. पण आपण मैत्री तर ठेवू शकतो ना विवेक बरोबर. Friendship च बरी. 


       ऑफिस सुटल्यावर सुद्धा, विवेक आणि सुवर्णा तिची बाहेर वाट बघत राहिले. पूजा आलीच नाही. एक तास उलटला तेव्हा सुवर्णानेच विवेकला कसंबसं स्टेशनला आणलं. तरी तो घरी निघायच्या तयारीत नव्हता.

"अरे… असं का करतोस तू … ती आली नसेल आज बँकमधे.",

"मग call का नाही उचलत ?",

"ते मला कसं माहित असेल?.",

"तू लाव ना call मग… ",

"विवेक… माझ्याकडे तिचा नंबर नाही आहे.",

"मग आपण तिच्या घरी जाऊया का बघायला तिला?",

"विवेक !! काय झालंय तुला… एक दिवस तर नाही आली ना ती. एक दिवस तरी आराम करू दे… " तसा विवेक शांत झाला. 

"चल… आता घरी जा सरळ… समजलं ना.",

"मी थांबतो थोडावेळ… ",

"कशाला ?",

"असंच… निघतो थोडयावेळाने.",

"OK, ठीक आहे… पण नक्की जा लवकर."म्हणत सुवर्णाने ट्रेन पकडली. विवेक स्टेशनवरच बसून राहिला. 


       तिकडे पूजाच्या घरी, तिला "बघण्याचा" सोहळा पार पडला. जरा नाखुशीनेच पूजा थांबली होती घरी. सकाळपासून विवेकने १५-१६ call केले होते. एकदाही call उचलला नाही तिने. त्या मुलाला आणि त्याच्या कुटुंबाला पूजा आवडली होती. पुजाकडे सुद्धा स्थळ पसंत होतं. फक्त त्याला ३ वर्षानंतर लग्न करायचे होते, काही कारणास्तव. बाकी सगळे गुण जुळत होते. पूजाला ते सगळं नको होते एवढयात. पाहुणे गेल्यावर तिच्या वडिलांनी आईकडे विषय काढला.

"स्थळ चांगलं आहे. लग्नाला कशाला पाहिजे एवढी वर्ष, ३ वर्षांनी लग्न… मला नाही पटत ते. त्यापेक्षा आपण दुसरं स्थळ शोधू. यावर्षीच लग्न उरकून टाकू.", ते ऐकून पूजा बोलली. 

"बाबा !! मला नाही करायचं एवढयात लग्न… तुम्हाला काल बोलले ना मी.",

"गप्प बस… आजकाल जास्त तोंड चालायला लागलं आहे तुझं. तुझ्यात खूप बदल झाला आहे. पहिली कधी तोंड वर करून बोलली नाहीस, आता लगेच उलट उत्तर देतेस. सुट्टीच्या दिवशी बाहेर असतेस हल्ली. बँक मधून सुद्धा उशिरा येतेस आजकाल. तुझ्या त्या मैत्रिणीला भेटलं पाहिजे एकदा. कशी आहे ते बघूया." पूजा गप्प.

" आता काय झालं, गप्प झालीस. तुला सांगतो आता, मला हे आवडत नाही. खूप दिवस बघतो आहे मी तुला. उद्या पासून घरी वेळेवर येत जा. आणि बाहेर फिरणं सोडून दे आता. नाहीतर असं कर, मैत्रीणच सोडून दे ती. काय… कळलं ना." म्हणत पूजाचे वडील उठले आणि बाहेर गेले. पूजा आईकडे बघत राहिली.

" मला वाटते, तू विवेक बरोबर जाणं , आता सोडून दिलं पाहिजेस. नाहीतर अशीच भांडणं होतं राहतील घरात. तुला लग्न नाही करायचं ना एवढयात. ते बघते मी. पण ते सांगतात तास तरी वागशील ना. शहाणी हो गं बाळा आता. "पूजाच्या डोक्यावरून हात फिरवला आईने आणि ती आत निघून गेली. पूजा नाराज होती. काय ना…. पहिल्यांदा प्रेम झालं कुणावर तरी आणि लगेच विसरायचं सुद्धा… कसं विसरू विवेकला.


         पुढच्या दिवशी सुद्धा तेच झालं. विवेक पूजाला call लावायचा आणि ती कट्ट करायची. शिवाय पूजाने ३ दिवसांची सुट्टी घेतली होती. त्यामुळे ऑफिस सुटल्यावर ती विवेकला भेटलीच नाही. ३ दिवस असचं सुरु होते . सुवर्णा काहीच बोलली नाही त्यावर विवेकला. चौथ्या दिवशी, पूजाने call उचलला.

"Hello… बोल.",

"अगं पुजू… आहेस कूठे तू… किती दिवस call करतो आहे तुला. काय झालं… बोलायचे नाही का माझ्याशी ? माझी काही चूक झाली का… ",

"नाही रे विवेक… तब्बेत ठीक नव्हती म्हणून.",

"मग call तरी उचलायचा ना, call का नाही उचलत होतीस ?",

"असंच.",

"सांग तरी.",

"माझ्या घरी आवडत नाही माहित आहे ना तुला.",

"OK , sorry … मग आता तरी बरं वाटते आहे ना तुला… ",

"हो… आता बरी आहे मी.",

"ठीक आहे… संध्याकाळी भेटूया मग. ",

"बघू… खूप काम आहे.",

"मग निघालीस कि call कर.",

"नको… तू नको थांबूस. मला माहित नाही मी कधी निघणार ते. आणि आता खूप काम आहे, नंतर बोलूया… Bye " आणि पूजाने call कट्ट केला. अरे !! काय झालंय हिला… पहिली अशी कधी वागली नाही हि. विवेक विचार करू लागला. 


पूजा बोलल्याप्रमाणे,ती संध्याकाळी आलीच नाही. विवेक नाराज झाला,

"चल रे विवेक… अजून किती वेळ थांबणार. तिला नाही भेटायचं असेल. काम असेल काही. " विवेकने मान हलवली.

"ठीक आहे मग,तू जा… ",

"कूठे निघालास ?",

"मी ?, जातो इकडेच.",

"इकडेच कूठे ? का थांबणार आहेस अजून." विवेकचं उत्तर नाही. 

"सांगतोस का आता… ",

"मानसीकडे चाललो आहे."सुवर्णाला शॉक बसला.

"काय ?",

"मानसीकडे चाललो आहे."सुवर्णाला राग आला.

"तुला काय वेडं-बिड लागलं आहे का. काय बोलतोस तुला तरी समजते का… ",

"हो. ",

"काय हो… आणि ती सुरतला गेली आहे ना रहायला. तिकडे जाणार का तू आता. ",

"नाही. ती आली आहे मुंबईला.",

"आणि तुला कसं माहित हे.",

"मला भेटली होती ती.",

"अरे !! तुला भेटली होती ती आणि तू मला आता सांगतो आहेस हे…कमाल आहे तुझी, इकडे कशाला आली परत ती.",

"तिचं लग्न आहे इकडे मुंबईत म्हणून आली आहे ती, महिन्याभरासाठी. तीच बोलली भेटायला ये एकदा.",

"तिने बोलावलं आणि तू चाललास.",

"ती माझी Friend होती ना म्हणून. अभिनंदन करायला चाललो आहे. तू येतेस का.?","तूच जा.",

"ठीक आहे. तुही भेटून ये तिला. तुझी सुद्धा मैत्रीण होती ना ती. घर तर माहित आहे तुला.",

"हो माहित आहे घर तिचं मला,पण एक सांगू का विवेक तुला.",

"बोल.",

"आज नको जाऊस.",

"का गं ?",

"पूजा नाही आहे तर तुझा मूड खराब आहे. कामात किती चुका झाल्या तुझ्या, सर तुला नाही बोलले काही,पण मला सांगितलं त्यांनी. असं कधी झालं नव्हतं आधी तुझ्या कडून. जेवताना सुद्धा कुठे लक्ष असते तुझं. धड जेवत नाहीस. त्यात मानसीला भेटायला चालला आहेस. काय चाललंय तुमचं, मला कळत नाही अगदी.",

"काही नाही. तू Tension घेऊ नकोस. चल , मी निघतो. उद्या भेटू ऑफिसला. "म्हणत विवेक निघून गेला. सुवर्णा त्याच्याचं विचारात गढून गेली. 


       विवेक आला मानसीकडे. ओळखीचं घर. पहिला तो कितीवेळा इकडे यायचा. आठवणी ताज्या झाल्या एकदम. कॉलेजमधून सरळ ते इकडेच यायचे कधी कधी.दुपारी आला कि रात्रीचं जेवण करूनच विवेक निघायचा घरी. मानसीच्या आई-वडिलांना त्या दोघांची मैत्री माहित होती. ते दिवस किती छान होते ना, किती धम्माल करायचो आम्ही. उगाचचं हसायला आलं त्याला. त्याने दारावरची बेल वाजवली. कोणीच दरवाजा उघडला नाही. "बहुतेक कोणी नसेल घरात."स्वतःशीच म्हणत विवेक निघाला. तेव्हा मागून एक कार येताना दिसली तसा तो थांबला.कार मधून मानसी बाहेर आली.

"Hi विवेक, कधी आलास?",मानसीने आल्याआल्या विचारलं.

"आत्ताच आलो , घरात कोणी नाही म्हणून निघालो परत.",

"हो… रे, जरा बाहेर गेली होती, call करायचा ना मला येत होतास तर. नंबर आहे कि Delete केलास?", विवेकने उत्तर नाही दिलं. मानसीने दरवाजा उघडला आणि विवेक सोबत आत आली. घर कसं अजून टापटीप होतं.

"मम्मी-पप्पा बाहेर गेलेत का ?", विवेकचा पहिला प्रश्न.

" ते नाही आले मुंबईला.ते नंतर येतील, सध्यातरी मी एकटीच आहे." विवेक खुर्चीवर बसता बसता थांबला.

" मी निघतो मग.",

"कशाला… बस ना.",

"नाही तुझे मम्मी-पप्पा नाहीत ना.",

"मग… पहिला तर ते नसतानाच जास्त यायचास इथे.",

"तेव्हा गोष्ट वेगळी होती. ",

"बर… काही थंड घेणार का… का तुझी स्पेशल कॉफी ?" विवेक ते ऐकून चपापला.

"तुझ्या लक्षात आहे अजून.",

"हो… १० मिनिट थांब. कॉफी घेऊन येते.","OK." विवेक जरा विरंगुळा म्हणून घरात फेरफटका मारू लागला.


      ओळखीचं घर, मोठ्ठ घर. फिरता फिरता तिच्या बेडरूम जवळ आला तो. दरवाजा उघडाच. त्याला आठवलं, त्या दरवाजाचा lock तेव्हाही बिघडलेलाचं होता. अजून तसाच होता तो. आत गेला विवेक. ओळखीचीच रूम. इकडेच बसून किती मज्जा , मस्करी करायचो. अभ्यास तेवढाच, मजाही तेवढीच. किती plan's केले होते त्यांनी, या बेडवर बसून. भिंतीवर त्यांचे ग्रुप photo's,दोघांचे photo's,शिवाय विवेकने काढलेले मानसीचे फोटो… अजून तसेच होते. त्यावरून विवेक हात फिरवत होता, तेव्हा मानसी कॉफी घेऊन आत आली. 


"मला माहित होतं, तू इकडेच येणार ते.",

"हा… तो दरवाजाचा lock अजून तसाच आहे.",

"हो रे, नंतर मी लक्षच दिलं नाही.",

"आणि हे फोटो… ",

"आम्ही लगेच गेलो ना सुरतला. शिवाय इकडे कोणी येणार नव्हतं. म्हणून काढले नाहीत फोटो." विवेकने कॉफीचा एक घोट घेतला.

"अजूनही चव तशीच आहे कॉफीची, विसरली नाहीस तू.",

"कशी विसरणार… बरं ते सोड, त्या दिवशी जास्त बोलणं झालं नाही आपलं. खरं सांगायचं तर तुला त्यादिवशी बघितलं तेव्हा राग आला होता मला. म्हणून तेव्हा तशी बोलली मी. आता नाही आहे राग.",

"ठीक आहे, चालते.",

"मग काय चालू आहे सध्या.?",बोलत बोलत बाल्कनीमधे आले दोघे.

" तेच ते रुटीन. तोच जॉब आहे. फक्त पोस्ट वाढली आहे.",

" अभिनंदन, प्रगती आहे.",

"आणि तुझं… तू जॉब नाही केलास का ?",

"नाही. पप्पा नको बोलले. म्हणून घरीच होते. आणि आता लग्न ठरलं आहे, छान आहे तो. इकडे मुंबईत २ हॉटेल आहेत,सुरतला सुद्धा ४ हॉटेल्स आहेत. लग्न मुंबईत करायचे म्हणून इथे आले. नंतर नाशिकला राहायला जाणार आहे. तिकडे नवीन हॉटेल सुरु करायचे आहे म्हणून.",

"छान… खूप छान, चांगला जोडीदार मिळाला तुला… माझ्यापेक्षा चांगला." विवेक बोलता बोलता बोलून गेला.

"Sorry !!",

"It's OK. लग्नाला येशील ना. ",

"माहित नाही. काम खूप असते ना." विवेकला वाईट वाटत होतं. 


"तुला यावंच लागेल… तुझ्या Friend च्या लग्नाला नाही येणार का ?.",

"Try करीन. चल मी निघतो आता, बरं वाटलं भेटून." विवेक निघाला. 

" थांब विवेक… " विवेकला थांबवलं मानसीने.

"विवेक… वाईट वाटलं ना तुला. अरे, पण कधी ना कधी माझं लग्न होणारंच होतं ना. एकटी थोडीना राहणार होती मी. आणि आता तू सुद्धा लग्न कर एकटा नको राहूस." तरीही विवेक शांतच.

"तुझा प्रोब्लेम काय आहे, माहित आहे तुला.",मानसी बोलली.

"प्रोब्लेम हा आहे कि तुला कोणी विसरूच शकत नाही. कितीही प्रयत्न केला तरी." विवेकने तिच्या डोळ्यात पाहिलं. ती मनापासून बोलत होती.

"हो विवेक. तुझ्यापासून दूर गेली. पण माझं मन इथेच राहिलं. किती प्रयत्न केला मी तुला विसरायचा, शक्यच नव्हतं ते. तुला मघाशी खोटं बोलले,कि photo's काढायला वेळ नाही मिळाला. वेळ तर खूप होता,पण मन तयार होतं नव्हतं. आपल्या आठवणी आहेत या. पप्पा बोलत होते,हे घर विकूया. मीच थांबवलं त्यांना. माझ्यासाठी ठेवलं आहे हे घर मी.",

"Thanks मानसी. ",

"माझं ऐकशील, एकटा नको राहूस आता. लग्न कर. कोणी आवडत असेल ना." विवेकच्या चेहऱ्यावर हलकंसं हास्य आलं. 

"हं… कोणी आहे वाटते. लवकर विचार तिला. मनातलं सांगितलं नाहीस तर कसं कळणार लोकांना. बरोबर ना." विवेकला पटलं ते. 

"चल. मी निघतो आता. आणि Thanks For Coffee." मानसी त्याला दरवाजा पर्यंत सोडायला आली.

" विवेक… " विवेकला मानसीने पुन्हा हाक मारली." तुझा ब्लॉग अजून वाचते मी. मराठी जास्त कळत नसलं तरी." विवेकला आवडलं ते. हाताने " BYE" ची खूण केली आणि विवेक निघाला आनंदात. 


         सुवर्णा सकाळी ऑफिसला आली तीच tension मध्ये. काय बोलणं झालं असेल दोघांमध्ये. बघते तर विवेक छान हसत होता, बोलत होता आजूबाजूच्या मित्रासोबत. Tension गेलं एकदम सुवर्णाचा. 

"काय रे…. छान मूड मध्ये आहेस खूप दिवसांनी.",

"हो गं… असंच. Fresh वाटते आहे.",

"मानसी काय बोलली?",

"काही नाही एवढं, सांगत होती लग्नाला ये. ",

"बस्स … एवढंच ?",

"हो … आणि आता कामाला लागूया आपण." विवेक छान बोलत होता, सुवर्णा खुश एकदम. दोघेही कामाला लागले. विवेकने हळूच पूजाला call लावला.तिने कट्ट केला. पुन्हा लावला नाही त्याने call तिला. कामात गढून गेला. आज lunch हि चांगला झाला. खूप दिवसांनी विवेक पोटभर जेवला. सुवर्णाचंही पोट भरलं मग. छान गप्पा-गोष्टी करत दिवस संपला. संध्याकाळी निघताना त्याने पूजाला call लावला. 

" Hello पुजू….",

"हा बोल.",

"काय झालं… हल्ली फोन नाही उचलत माझा.",

"बिझी होते.",

"OK. निघालीस का बँक मधून.",

"हो.",

"थांब मग. आम्ही दोघे येतो आहे.",

"मी स्टेशनला पोहोचले आहे आता.",विवेकला आश्चर्य वाटलं. 

" अरे !!! call तरी करायचा ना… किती दिवस भेटलो नाही आपण.",

"मला घाई होती जरा. ",

"ठीक आहे. मग उद्या भेटूया.",

"बघू… " पुढे काही reply नाही.

" अशी का बोलते आहेस तुटकं-तुटकं… बोलायचे नाही का माझ्याशी.",

"असं काही नाही. Bye."म्हणत तिने call कट्ट केला. 


काय झालंय पूजाला, विवेक विचारात पडला. सुवर्णाला ते कळलं लगेच. " काय झालं विवेक ?",

"पूजाला काय झालं ते कळत नाही मला. वेगळीच वागते. फोन तर उचलत नाही, उचलला तरी नीट बोलत नाही. भेटूया म्हणल तरी टाळाटाळ करते." सुवर्णाला काय बोलावं ते कळत नव्हतं.

" मला कसं कळणार ते, तिला काय झालं ते. चल ,घरी निघूया. मूड खराब नको करूस." म्हणत ते दोघे निघाले. बाहेर आभाळ काळवंडलेलं.

" पाऊस येणार बहुतेक." सुवर्णा रिक्षातून बाहेर पाहत म्हणाली. विवेक कसल्याशा विचारात. 

" काय रे विवेक… काय बोलते आहे मी. ",

" हा… हं, बोल काय बोलतेस?",

"अरे… पाऊस… बाहेर." त्याने बाहेर पाहिलं. 

" पावसाची शक्यता कमीच आहे. आभाळ भरून राहिलं असंच." विवेक पुटपुटला. सुवर्णा फक्त त्याचं मन वळवण्याचा प्रयत्न करत होती, निष्फळ प्रयत्न. 


पुढच्या दिवशी, विवेक ठरवूनच आलेला, आज पूजाला भेटायचचं. तो लवकर येऊन उभा राहिला, गेटबाहेरच. सुवर्णाने त्याला पाहिलं.

" ये… तू बाहेर का उभा आहेस,चल ना ऑफिसमधे.",

"जा तू… मी येतो नंतर… ",

"काय करतो आहेस बाहेर उभा राहून, पाऊस बघ किती धरला आहे.",

"पूजाला काहीही करून आज भेटणारच मी." सुवर्णा गप्प.

"तिला विचारायचे आहे काहीतरी.",

"OK, पण लवकर ये आत. खूप पाऊस आहे बघ." म्हणत सुवर्णा ऑफिसमधे आली. पण सगळं लक्ष विवेककडे होतं तिचं. 


       विवेक पूजाच्या बँक बाहेर येऊन उभा राहिला. १० मिनिटांनी पूजा आली आणि त्याला बघून जागच्या जागी थांबली. विवेकने पुढे येऊन पूजाचा हात धरला आणि ओढत ओढत तिला पुढे घेऊन आला. 

" हात सोड विवेक… " पूजा ओरडली त्याला. हात झटकला तिने.

" काय झालंय पूजा. का अशी वागतेस ?",

"काही नाही." म्हणत ती जाऊ लागली. तसा विवेकने तिचा रस्ता अडवला. 

"नाही. काहीतरी आहे नक्की." पूजाने काही उत्तर नाही दिलं. 

" बोल ना काहीतरी.",

"काय बोलू ?",

"फोन का उचलत नाहीस?",

"तुला माहित आहे, काम खूप असते.",

"ठीक आहे. ऑफिस सुटल्यावर भेटत का नाहीस?", पूजा शांत.

"बोल !!",

"तुला काय सगळं सांगायला पाहिजे का आणि माझ्या वडिलांना आवडत नाही, कोणाला भेटलेलं." विवेकला आश्चर्य वाटलं.

" हो का… ठीक आहे, मला काहीतरी सांगायचे आहे तुला. ",

" बोल लवकर, उशीर होतो आहे मला." मोठा pause घेऊन विवेक बोलला. 

" माझं प्रेम आहे तुझ्यावर. लग्न करशील माझ्याबरोबर. " आणि पावसाला सुरुवात झाली. पूजाच्या मनात घालमेल सुरु झाली. वडील डोळ्यासमोर उभे राहिले, आईला केलेलं प्रॉमिस आठवलं. निदान आईसाठी तरी हे करावंच लागेल. एव्हाना पावसाचा जोर वाढला होता.

" नाही." पूजा धाडस करून बोलली. अनपेक्षित होतं विवेकला. 

" का … नाही.",

" माझा प्रश्न आहे तो.",

"हे उत्तर नाही आहे." दोघेही भिजत होते.

" हे बघ विवेक. कोणाला हो म्हणावं आणि कोणाला नाही, याचा मी स्वतंत्र निर्णय घेऊ शकते. आणि पहिलंच सांगितलेले, कि माझ्या घरचे ठरवणार आहेत लग्न माझं.",

"मग मी येऊन भेटतो त्यांना.",

"नको …. अजिबात नको. आपण फक्त मित्र आहोत विवेक, प्रेम वगैरे काय… ",

"झालं प्रेम… काय करू… ",

"हे बघ… तुला शेवटचं सांगते. आपण फक्त मित्र आहोत. प्रेमात पडलास हि तुझी चूक आहे. काय म्हणायचास, प्रेमात नाही पडणार कूणाच्या, मनावर कंट्रोल आहे. आता काय झालं मग. ३ महिन्यांची तर मैत्री आहे आपली. एकमेकांना ओळखत सुद्धा नाही इतकेशे. आणि लग्न… ? खूप लांब राहिलं ते. ",

"मग माझ्यासोबत फिरायचीस ती.",

" अरे, एक-दोनदा फिरायला काय आले, लगेच तू लग्नापर्यंत पोहोचलास. तशी मी सगळ्यासोबत हसत असते, बोलत असते. याचा अर्थ असा नाही कि सगळ्याशी लग्न करू. " विवेकच्या मनावर ते शब्द टोचत होते. 

" शिवाय माझ्या घरी, माझ्या लग्नाची तयारी सुरु केली आहे. त्यामुळे आपण आता नकोच भेटूया. call पण नको करुस. मी वेळ मिळेल तेव्हा करीन call. असं प्रेम होतं नाही रे आणि प्रेमावर माझा विश्वास नाही. आपण 'Friend' च ठीक आहोत." पूजा निघून गेली.

विवेक तसाच स्तब्ध उभा, पावसात. खूप वेदना होतं होत्या त्याला. पावसाचे थेंब नसून असंख्य टाचण्या त्याच्या शरीरावर कोसळत होत्या. एका गाडीच्या हॉर्नच्या, मोठ्या आवाजाने तो भानावर आला आणि ऑफिसकडे निघाला.  


         पूजा बँकमधे पोहोचली. तशीच ती washroom मधे गेली. मनसोक्त रडली. स्वतः वरच ओरडत होती, आरशासमोर उभी राहून. खूप रडली. वाटतं होतं,तसंच जाऊन विवेकला मिठी मारावी. मनातलं सगळं सांगावं, कि माझंही प्रेम आहे तुझ्यावर. फक्त आईला प्रॉमिस केलं म्हणून. तशीच रडत राहिली ती. विवेक ऑफिसच्या बाहेर येऊन पावसात उभा होता. Reception वर असलेल्या watchman ने सुवर्णाला call करून बाहेर बोलावले. सुवर्णा धावतच बाहेर गेली आणि त्याला आत घेऊन आली. सगळं ऑफिस त्या दोघांकडे पाहत होतं. " काही नाही, बसा सगळे खाली. नेहमीचच आहे ना त्याचं… काय बघता सगळे. "सुवर्णा सगळ्यांना ओरडली." विवेक !! आधी कपडे बदलून ये. पटकन जा." १० मिनिटांनी विवेक जागेवर आला. त्याचा चेहरा बघूनच काहीतरी गडबड आहे, याची जाणीव सुवर्णाला झाली. सुवर्णाने एकाला टॉवेल आणि चहा घेऊन यायला सांगितलं. डोक्यावरचे केस अजून ओलेच." चहा घे गरमा-गरम " आणि तिनेच त्याचे केस पुसायला सुरुवात केली." काय झालं विवेक?:"सुवर्णाने टॉवेल बाजूला ठेवत म्हटलं. विवेक तर चहा सुद्धा पीत नव्हता. 


थोडयावेळाने बोलला,"नाही म्हणाली मला ती.",

"कोण?",

"पूजा",

"काय विचारलंसं?",

"लग्नाचं…. ", सुवर्णा ऐकत राहिली. वाईटही वाटलं तिला. अश्रू आवरत ती म्हणाली,

"का नाही बोलली.",

"तिच्या घरी चालत नाही." एवढंचं बोलून तो शांत बसला. 

"मी इतका वाईट आहे का ",

" नाही रे… तिचा काहीतरी प्रोब्लेम असेल.",

"मीच बरोबर नसेन कदाचित.",

"असं काही नाही … तीच वाईट असेल.",

"नाही. ती खूप चांगली आहे. मीच मैत्रीला प्रेम समजून बसलो. माझाच कंट्रोल गेला मनावरचा. कदाचित मला ना सवय झाली आहे आता, लोकांना गमावून बसण्याची. पहिली मानसी आणि आता पूजा." विवेकच्या डोळ्यातून पाणी आलं. मग सुवर्णाही स्वतःला थांबवू शकली नाही. तिलाही रडू आलं. 

"हे बघ विवेक … वाईट वाटून घेऊ नकोस. तुझं प्रेम आहे ना पूजावर… आपण तिला जाब विचारू मग हा … एवढया छान मुलाला नाही कशी बोलली ती.",

" जाऊ दे गं… नको, वेगळं बोलू काहीतरी." विवेक डोळे पुसत म्हणाला. सुवर्णा ऐकत होती फक्त.

" अनोळखी बोलली मला. बोलते,ओळखत नाही आपण एकमेकांना… जाऊ दे गं… , वेगळं बोलू काहीतरी.….घरच्यांना पसंत नाही अनोळखी व्यक्ती सोबत बोललेलं,भेटलेलं… जाऊ दे गं… , वेगळं बोलू काहीतरी.….बोलते, एक-दोनदा फिरायला आले, हसले म्हणजे प्रेम नसते,फक्त friendship असते… जाऊ दे गं… , वेगळं बोलू काहीतरी.…..प्रेमात पडणार नव्हतो पुन्हा कधी,पूजाने वेडं लावलं, प्रेम वाईट असते… जाऊ दे गं… , वेगळं बोलू काहीतरी.…." आणि विवेक पुन्हा रडायला लागला. त्याची ती अवस्था सुवर्णाला बघवत नव्हती.

" बरं… डोळे पूस आता." विवेक ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. सुवर्णाने स्वतःच्या ओढणीने त्याचे डोळे पुसले, चेहरा पुसला. 

" गप्प… आता बस झालं,रडायचे नाही आता. आपण तिला ओरडूया.… माझ्या best friend ला रडवलं तिने. बघतेच तिला आता. तू नको वाईट वाटून घेऊस. तुला आवडते ना ती … पुजू.… मी बोलते तिच्याशी. ठीक आहे ना, रडू नकोस आता." त्याला सांगता सांगता तिच रडत होती. 


       थोडयावेळाने विवेक शांत झाला. सुवर्णा त्याच्या शेजारीच बसून होती. " विवेक, आज तू घरी जा… शांतपणे. सरांना मी सांगते,तुझी तब्येत ठीक नाही ते. तू घरी जाऊन आराम कर." विवेक शून्यात पाहत होता कूठेतरी. सुवर्णाने सरांची परमिशन काढली आणि विवेकला बाहेर रिक्षापर्यंत सोडायला आली. पाऊस थांबलेला पूर्णप

णे. बोचरा वारा वाहत होता." विवेक…. घरीच जा… दुसरीकडे कूठे नको जाऊस. आणि उद्या ऑफिसला ये, फ्रेश होऊन… कळलं ना. " विवेकने मान हलवली. हरवलेला कूठेतरी, रिक्षा निघाली. सुवर्णा जाणाऱ्या रिक्षाकडे दूर पर्यंत पाहत होती. खूप काम आहे,नाहीतर मीच गेली असती त्याला सोडायला घरी. काय अवस्था झाली आहे त्याची,त्या पुजामुळे. का आली ती याच्या जीवनात… किती छान चालू होतं, पूजाचा राग आला तिला. तिला call सुद्धा करू शकत नाही. नंबर घेतला पाहिजे होता तिचा,विवेक कडून. संध्याकाळी सुद्धा तिला लवकर निघता आलं नाही. पूजा गेली असेल एव्हाना. नाहीतरी ती थांबलीच नसती. उद्या भेटूया तिला,म्हणत ती घरी निघाली. 


        तिकडे पूजाने स्वतःला पूर्ण बदललं होतं. एक महिना झाला होता, विवेक बरोबर शेवटचं बोलून,भेटून. तिला त्याची आठवण यायची,प्रत्येक वेळेस त्याला call करायची इच्छा व्हायची. पण आईकडे बघून ती गप्प रहायची. महिन्याभरात अजून ३ "बघण्याचे" कार्यक्रम झाले होते. एकही स्थळ तिच्या वडिलांना पसंत नव्हते. पूजाला त्या सगळ्यांचा कंटाळा आला होता आता. १ महिन्यापूर्वी मी कशी होते आणि आता कशी आहे. मे महिन्यात विवेकसोबत मैत्री झाली आणि ऑगस्टमध्ये तुटली सुद्धा. काय काय बोललो त्याला आपण. नको होतं तसं बोलायला. कसा असेल तो, काय करत असेल. भेटूया का एकदा त्याला,निदान एक call तरी. नको…. नकोच… का असं प्रॉमिस केलं मी आईला. पूजा गच्चीवर येऊन विचार करत होती. आता ती सुट्टीच्या दिवशी फिरायला जात नव्हती,घरीच असायची. soft music,songs ऐकण तिने सोडून दिलं होतं. सकाळी बँक आणि संध्याकाळी बँकमधून थेट घरी, हाच तिचा दिनक्रम झाला होता. कोणाशी बोलणं नाही,हसणं नाही, कोणाला फोन नाही. सगळं सगळं बंद. स्वतःलाच शिक्षा देत होती ती. थंड वारा आला तसं तिने वर आभाळात पाहिलं.पोर्णिमा होती आज, चंद्र छान दिसत होता. थंड वारा कूठून येतो मग. पाऊस तर नाही. विवेक असता तर लगेच त्याने सांगितलं असते पावसाबद्दल. किती छान दिवस होते ते. फिरायला जायचो आम्ही. तो निसर्ग, समुद्र, पाऊस. तो फोटो काढायचा माझे आणि मी त्याचे. गप्पा-गोष्टी चालायच्या,मस्करी,हसणं, खिदळणं. मज्जा असायची. डोळ्यात पाणी जमा झालं तिच्या. शिवाय विवेकपासून दूर झाल्यापासून पावसाने सुद्धा दडी मारली होती. त्याच्यासोबतच गेला वाटते तो दूर, माझ्यापासून. त्यानेही पुन्हा call लावला नाही मला, वाटते विवेक आणि पाऊस, दोघांना माझा राग आला असेल. Sorry विवेक…. miss you गोलू… गच्चीवर एकटीच रडत होती पूजा, सोबतीला होता पौर्णिमेचा पूर्ण चंद्र. 


      दिवस असेच जात होते. पावसाळा संपत आला होता. विवेकला भेटून दीड महिना झाला होता. आणि तेव्हापासून पावसाने एकदाही तोंड दाखवलं नव्हतं. पूजा सकाळी बँकमधे जाण्यासाठी निघाली.विवेक आणि सुवर्णाची भेट न व्हावी म्हणून ती बँकमध्ये लवकर जात असे आणि लवकर निघत असे. तिच्या चेहऱ्यावरच तेज पूर्णपणे झाकोळलं गेलेलं, घरातून निघणार तेव्हाचं वडिलांनी थांबवलं."लवकर ये घरी… तुला बघायला येणार आहेत." तेव्हा तर तिला रागच आला." मी येणार नाही आणि मला लग्नही करायचे नाही. या सगळ्यांचा वैताग आला आहे मला. जीव घुसमटतो इथे माझा." म्हणत ती धावतच खाली आली. तशीच ट्रेन पकडून ती स्टेशनला उतरली. बँकमध्ये जाण्याचा बिलकुल मूड नव्हता. खूप दिवसांनी आभाळ भरून आलेलं. स्टेशनच्या बाजूलाच असलेल्या coffee shop मध्ये जाऊन बसली. ५-१० मिनिटांत पावसाला सुरुवात झाली. दीड महिन्यानंतर पाऊस पडत होता. पूजाला बरं वाटलं पावसाला पाहून. कॉफी पीत पीत बाहेरचं द्रुश्य पाहू लागली. थोड्याच अंतरावर एक मुलगा पावसात हात पसरून उभा होता. विवेक !!! पाठमोरा उभा होता तो. चेहरा दिसत नव्हता.तिचं उंची, तसंच हात पसरून उभं राहणं पावसात. हा विवेकच आहे. म्हणत ती लगबगीने छत्री घेऊन shop च्या बाहेर आली. काही झालं तरी त्याला सांगूया. मला माफ कर, माझही प्रेम आहे तुझ्यावर. 


त्याला ती लांबूनच हाक मारत होती. त्याचं लक्ष नव्हतं. आनंदात,धावत,छत्री सावरत ती त्याच्याजवळ पोहोचली. खांद्यावर हात ठेवताच त्याने वळून पाहिलं, " sorry… मला वाटलं माझा friend आहे." विवेक नव्हताच.तिला तिची चूक समजली.आपल्याला विवेकला भेटायलाच पाहिजे. coffee shop मधून,सामान घेतलं, तशीच विवेकच्या ऑफिसमधे पोहोचली. Reception वर विवेकबद्दल विचारलं,

"ते सर नाही आले.",

"आणि सुवर्णा… ?",

"हो…. त्या madam आहेत. बोलावू का त्यांना… ?",

"हो…",

"नाव काय तुमचे… ? त्यांना सांगावे लागेल ना.",

"पूजा आली आहे सांगा." त्याने आतमध्ये call करून सुवर्णाला बाहेर बोलावलं. सुवर्णा आली बाहेर. पूजाकडे पाहिलं तिने. निर्विकार चेहऱ्याने. 

"Hi सुवर्णा… ",

"Hi… बोल काय काम होतं ?",

"कशी आहेस?",

" ठीक आहे… कामाचं बोल.",

"विवेकला भेटायचं होतं.", ते ऐकून सुवर्णाने तिचा हात पकडला आणि ऑफिसच्या बाहेर घेऊन आली.

" कशाला भेटायचं आहे त्याला… आणि कोण लागतो तुझा तो…",

"असं का बोलतेस सुवर्णा… माझा friend आहे तो.",

" Friend ?… काय बोललीस त्याला… अनोळखी ना. मग कशाला आलीस इथे.",

"त्याला भेटायला… काळजी वाटते म्हणून.",

"काळजी आणि त्याची…?… हं…. काळजी असती ना तर आधीच आली असतीस भेटायला. तुला माहित नसेलच, गेला दीड महिना… विवेक ऑफिसला आलाच नाही. तुमचं बोलणं झालं आणि दुसऱ्या दिवसापासून तो गायब झाला.",

"म्हणजे?",

"विवेक बेपत्ता आहे.",

" काय !!!",

" हो… तो आलाच नाही पुन्हा ऑफिसला. call केला तर सुरुवातीला एक-दोन दिवस लागला,पण त्याने उचलला नाही. नंतर call हि लागेनासे झाले. त्याचं घर माहित नाही मला, तसा कधी प्रश्नच आला नाही त्याच्या घरी जाण्याचा. कूठे शोधायचं त्याला … सांग… सांग ना." सुवर्णाच्या डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या. तोंड फिरवून तिने डोळे पुसले. 


" Sorry सुवर्णा … मला माहित नव्हतं असं होईल ते." पूजाने तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हटलं. खांदा झटकला तिने.

"तुला माहित आहे, त्याला किती शोधायचा प्रयत्न केला मी.त्याच्या घरी कधी गेलेच नाही मी आणि कोणी मित्र देखील माहित नाही मला त्याचा. कोण सांगणार पत्ता. रोज त्या दादर स्टेशनला जाऊन उभी राहते तासनतास, ऑफिसमधून निघाली कि. नजरेस पडला तर कदाचित. ते नाही तर दादर मधले सगळे समुद्र किनारे पालथे घातले. त्याला सवय होती ना समुद्रकिनारी विचार करत बसायची. दीड महिना हेच चालू आहे माझं. सकाळी ऑफिस,नंतर दादर स्टेशन,तिथून एखादा समुद्र किनारा.… रोज घरी पोहोचायला रात्रीचे ११-११.३० होतात. पण एकदाही तो दिसला नाही… एवढचं करू शकते मी… मलाही त्याला शोधायचं आहे, पण माझं घर माझ्यावर चालते. म्हणून जॉब सोडू शकत नाही. नाहीतर त्याच्यामागून गेले असते मी." सुवर्णा रडत रडत सांगत होती. पूजाला खूप वाईट वाटलं. एकही शब्द बोलली नाही ती. सुवर्णाचं बोलली,

"तरी तुला सांगत होते, त्याचं मन खूप हळवं आहे. तो नाही सहन करू शकत काही. मी तुला जबाबदार नाही धरत,पण तुझं प्रेम नव्हतं तर त्याला पहिलंच सांगायचे होतेस तसं. आधी ती मानसी काय बोलली त्याला ते माहित नाही मला, तेव्हा खूप आनंदात होता. नंतर तू…रडत होता त्यादिवशी विवेक. एक दिवशी खूप आनंद आणि लगेच खूप दुःख. काय झालं असेल त्याच्या मनावर. तुमच्यामुळे…मी माझ्या Best Friend ला हरवून बसले." 



         थोडावेळ कोणीच काही बोललं नाही. खरंच… सुवर्णाच किती प्रेम आहे विवेकवर. आपलंच चुकलं, दोघांमध्ये येऊन. पण विवेकला आता शोधू कूठे.त्याला सांगायला हवं,सुवर्णा वाट बघते आहे तुझी. पूजा धीर करून बोलली. 

"सुवर्णा… खरंच मला माफ कर… मी नाही ओळखू शकले त्याला आणि तुला सुद्धा. तो एवढं मनाला लावून घेईल,असं वाटलं नव्हतं मला. फक्त त्याला माझ्यात गुंतण्यापासून वाचवायचे होते मला. माझी चूक कळली आहे मला.",

"पण त्याला तर हरवून बसले ना मी. विवेकला परत आणू शकशील तू… ?",

"हो… मी शोधीन त्याला. काहीही झालं तरी." सुवर्णाने डोळे पुसले. 

"पण तो भेटेल तुला?",

"हो, मी त्याला परत आणीन.",

"तो कूठे गेला ते कसं कळेल पण.",

"त्याच्या घरी गेलो तर कळेल.",

"नाही माहित मला घर त्याचं.",

"तू कधीच गेली नाहीस का घरी विवेकच्या.",

"नाही ना… तसं कधी वाटलंच नाही,दिवसभर ऑफिसमध्ये असायचो आम्ही,परत घरी कशाला जायचे मग. त्यानेही कधी बोलावलं नाही घरी.",

"कोणाला तरी माहित असेल घर त्याचं,तुमच्या ऑफिसमधे.",

"नाही.",

"मग काय करायचं आता?",दोघी विचार करू लागल्या.

"मानसीला माहित आहे त्याचं घर.",

"मानसी?",

"तुला मी सांगितलं होतं मानसी बद्दल, ती मानसी. तिला माहित आहे विवेकचं घर.",

"पण ती इकडे नसते ना, मघाशी तू बोललीस,ती विवेकला काहीतरी बोलली,ती इकडे आली आहे का?",

"हो… विवेक बोललेला कि तिचं लग्न आहे म्हणून आली आहे मुंबईला. फक्त एक महिना, गेली असेल आता ती.",

"तिचं घर माहित आहे का तुला?",

"हो.",

"चल जाऊया आता तिथे.",

"मी इच्छ्या असून सुद्धा येऊ शकत नाही. तिच्यासमोर जाऊ शकत नाही. खूप काही बोलली होती मी तिला. तुला पत्ता देते मी, ती इकडे असेल तर भेटेल तुला."सुवर्णाने पटापट पत्ता लिहून दिला तिला.

" आणि हो…. मला प्लीज सांग. काय झालं ते. प्लीज.",

"हो… हो, नक्की."म्हणत पूजा पळतच गेली. रिक्षा पकडून तिने मानसीचं घर गाठलं. दारावरची बेल वाजवली. बेल सुरु आहे म्हणजे कोणीतरी राहते घरात. दरवाजा उघडला,मानसीच्या आईने.

" नमस्कार… मी पूजा… मानसी आहे का ?",

"नाही. तिचं लग्न झालं ना, ती नाही राहत इथे."पूजा नाराज झाली.

"मग ती मुंबईत आहे का अजून?",

"हो,पण ती जाणार उद्या नाशिकला.",

"मी तिची friend आहे,लग्नाला आली नाही म्हणून आली भेटायला.",

"हो का… मग पत्ता देते तिथे जा. नवऱ्याच्या घरी, आजचं जा पण. ",पूजाने पत्ता घेतला आणि निघाली.


त्या घरी पोहोचली तेव्हा lock होतं. "काय करायचं?",तिथेच बसून राहिली ती. १ तासाने मानसी आली.

"excuse me… कोण हवं आहे तुम्हाला?",

"मानसी… ?",

"हो, मीच मानसी आहे. तुम्ही कोण ? मी ओळखलं नाही तुम्हाला.",

"मी पूजा… विवेकची friend.", विवेकचं नावं ऐकलं आणि मानसीच्या चेहऱ्यावरचं प्रश्नचिन्ह मिटलं.

" ये…घरात ये… बाहेर गेलेली मी."म्हणत मानसीने पूजाला घरात घेतलं.

" मग इकडे काय काम होतं तुझं?",

"तुला विवेकचा पत्ता माहित आहे का घराचा?",पूजाने उलट-सुलट न विचारता direct विचारलं. तसं मानसीने लगेच वळून पाहिलं. 

"त्याचा पत्ता ?… तू नक्की त्याची friend आहेस ना.",

"हो… हो.",

"मग address कसा माहित नाही.",

"जास्त ओळखत नाही आम्ही एकमेकांना,म्हणून." पूजा चाचपडत बोलली. 

"मग , मी त्याला ओळखते आणि मला त्याचा address माहित आहे हे तुला कसं माहित.", आता सांगण्यावाचून पर्याय नव्हता.

" सुवर्णाने सांगितलं." तिचे नाव ऐकताच मानसी गप्प झाली.

" सांगते त्याचा address मी." खुर्चीवर बसत म्हणाली ती. 

"पण त्याचा address कशाला पाहिजे. तिला तर माहित असेल ना, शिवाय विवेक तर आहे ना सोबत तिच्या. मग , तरीही address.",

"Actually, विवेक दीड महिन्यापासून बेपत्ता आहे म्हणून त्याचा address… ",

"What ?", मानसीला धक्का बसला. "कूठे गेला तो?",

"माहित नाही. त्याच्या घरून काहीतरी कळेल म्हणून पत्ता मागायला आले मी इथे." मानसीने पटकन एका कागदावर पत्ता लिहून दिला.

" आणि हा माझा नंबर, त्याच्या बद्दल काहीही कळलं तरी लगेच सांग मला.",

"OK",

"पण आता जाऊ नकोस… आता घरी कोणी भेटणार नाही त्यांच्या. सगळे कामाला असतात.बसं जरा. तुझ्यासाठी कॉफी बनवते. किती दमलेली वाटतेस." पूजाही बसली. खरंच ती दमली होती,धावून धावून. 


       मानसी कॉफी घेऊन आली. पूजाने निरखून पाहिलं मानसीकडे. छान जोडी वाटत असेल दोघांची तेव्हा. मग नाही का म्हणाली असेल हि विवेकला. विचारू का… नको. मनात म्हणत पूजा कॉफी पिऊन निघाली.

" Thanks, address दिल्याबद्दल.",

"आणि नक्की सांग मला , नाहीतर काळजी वाटत राहिलं मला त्याची." ते ऐकून पूजा चमकली. जाता जाता थांबली. 

"एक विचारू मानसी.",

"विचार.",

"तुझं लग्न झालं आहे आताच, विवेकची काळजीही वाटते अजून. मग त्याला नकार का दिलास ?",

"तो माझा personal matter आहे.",मानसी रागात म्हणाली.पूजा पुन्हा घरात आली तिच्या. 

" सांग मला. तुझ्यामुळे तो depression मधे गेला होता. का केलंस असं तू.",

"त्याची काळजी वाटते कारण अजून माझं प्रेम आहे विवेकवर.",पूजा हबकली उत्तर ऐकून. 

" खूप प्रेम होतं त्याच्यावर, अजून आहे. मलाही एक family बनवायची होती त्याच्यासोबत. पण ज्याची स्वतःची family नाही, तो दुसऱ्यांची family कशी बनवणार ना.",

"म्हणजे ?",

"त्याने फक्त मला सांगितलं होतं ते,आज तुला सांगते आहे.","विवेक अनाथ आहे.",

"बापरे!!! " पूजाला चक्कर यायची बाकी होती.

"हि गोष्ट कधीच,कूणाला सांगू नकोस. सुवर्णाला सुद्धा नाही." पूजाने होकारार्थी मान हलवली.

"तो राहतो ते सुद्धा भाड्याचे घर आहे. मग मला सांग,माझ्या घरचे कसे तयार होतील लग्नाला. एवढं सगळं असताना,त्याने मला लग्नाची मागणी घातल्यानंतर सांगितलं होतं सगळं. प्लीज, कोणाला सांगू नकोस हे. आणि त्याच्या घरी जाऊन चौकशी कर. तो कूठे आहे,याची चिंता लागून राहिली आहे मला.",

"कस शक्य आहे… विवेक अनाथ कसा?",

"ते माहित नाही मला.मलाही सुरुवातीला ते घर त्याचं आहे असं वाटायचं. खूप नंतर कळलं मला ते. ते जाऊ दे आता. लगेच घरी जा. बघ जरा आहे का तिथे तो. आणि लगेच कळव मला " पूजा निघाली. काहीतरी विचित्र आहे ना. आता जे ऐकलं ते खरं आहे का. विचार करत करत पूजा त्या ठिकाणी निघाली. 


जरा आतच होती ती जागा. पोहोचेपर्यंत रात्रीचे ८ वाजले. पोहोचली एकदाची. दारावरची कडी वाजवली तिने. दरवाजा उघडताच पूजाने लागोलाग विचारलं,

" विवेक… इथेच राहतो ना.",

"पूजा …. पूजा नाव आहे ना तुझं.",दारात उभ्या असलेल्या बाईने तिला विचारलं.

"हो… पण तुम्हाला कसं माहित?",

"आत ये आधी." पूजा आत गेली. बऱ्यापैकी मोठ्ठ घर होतं.

" विवेक तुझ्याबद्दल सांगत असायचा नेहमी. तुझा फोटोसुद्धा दाखवला होता त्याने.",

"हो, मी पूजाच आहे,पण विवेक कूठे आहे ?",

"तुला सांगून नाही गेला तो.",

"नाही",त्या बाई विचारात पडल्या. पूजालाही काही समजत नव्हतं.

"तुम्हाला काही विचारू का काकी?",

"हो… विचार ना.",

"विवेक अनाथ आहे का?",

"असं का विचारते आहेस तू… तुला माहित नाही हे.",

"नाही… मला काही बोलला नाही तो.",

"हो… तो अनाथ आहे… एकटाच आहे बिचारा.",

"मग तो बोलायचं कधीतरी कि, माझी आई असं बोलते,तसं बोलते… त्या कोण मग?",

"अगं… मलाच आई बोलतो तो आणि यांना बाबा." पूजा अचंबित झाली." आणि सुवर्णाला सुद्धा ओळखते मी.",

"कसं काय? ती तर कधीच आली नाही ना इथे?",

"चल."म्हणत त्या पूजाला एका खोलीत घेऊन आल्या. 

"हि विवेकची रूम… आणि हे बघ." पूजाने पाहिलं. एका भिंतीवर सुवर्णाचे फोटो लावले होते, या family सोबतचे फोटो होते आणि स्वतःचे फोटोसुद्धा होते.

" तो ना सगळ्याचे फोटो लावून ठेवायचा, वेडा होता अगदी.",

"तो अनाथ आहे ना,मग तुमची कशी ओळख?",

"आम्ही पेपरात जाहिरात दिली होती,रूम भाड्याने द्यायचे आहे. हाच पहिला आलेला.शिकण्यासाठी आलेला मुंबईला. ठेवून घेतलं त्याला,नंतर त्यानेच आम्हाला जिंकून घेतलं. अगदी माझ्या लहान मुलासारखा राहिला तो इकडे एवढी वर्ष. तुझं तर किती कौतुक करायचा." पूजाने स्वतःचा फोटो पाहिला." Greatest Friend Ever… " असं लिहिलं होतं विवेकने फोटोखाली. 


"मग आता कुठे आहे तो?",

"माहित नाही,मला वाटलं होते कि तुम्हाला माहित असेल.",

"तरीसुद्धा काही बोलला असेल ना निघताना… काहीतरी.",

"हो… माझ्या घरी जातो म्हणाला परत.",

"त्याचं तर घर नाही ना.",

"मग तो त्याच्या अनाथाश्रमात गेला असेल. तो तिथेच वाढला ना… तिथे गेला असेल तो.",

"कोणते ?, माहित आहे का तुम्हाला.",

" तितकं माहित नाही,पण माथेरानला आहे असं म्हणायचा…इकडच काम संपलं म्हणून निघतो असा म्हणाला जाताना…. तो परत येईल म्हणून हि रूम बंद करून ठेवली आम्ही, त्याच्यासाठी." पूजा अजूनही फोटो पाहत होती. त्यांचे किती फोटो होते तिथे. पावसात भिजताना, समुद्रकिनारी निवांत क्षण, निसर्गात रमलेले क्षण. त्यांच्या आठवणी होत्या त्या. वाईट वाटलं तिला."चला काकी, मी निघते , तो जर परत आला तर मला कळवा."पूजाने मोबाईल नंबर दिला आणि निघाली.


       विवेक कधी बोलला नाही… सुवर्णा मला बोलली होती एकदा,कि त्याला अजूनही नीटसं ओळखत नाही. तिच्यापासून लपवून ठेवलं तिने. तरीसुद्धा त्याला परत आणलं पाहिजे,निदान सुवर्णासाठी तरी. तिचं जास्त प्रेम आहे विवेकवर,माझ्याहीपेक्षा जास्त. मला जावेचं लागेल माथेरानला. पूजा रात्री उशिरा घरी आली. लगेच तिने bag भरायला घेतली." कूठे चाललीस गं bag भरून.","ऑफिसचं काम आहे. पळून जात नाही. आणि आता निघत नाही,सकाळी निघणार.","ठीक आहे."म्हणत आई झोपायला निघून गेली. 


      रात्री पूजाने माथेरानची माहिती search केली, इंटरनेटवर. चार अनाथाश्रम होती तिथे. चारही ठिकाणाचे नाव आणि पत्ते लिहून घेतले तिने. सकाळीच निघाली पूजा. मजल-दरमजल करत पूजा पोहोचली माथेरानला. तेव्हा सकाळचे १० वाजले होते. माथेरानला उतरली आणि थंड हवा आली. अजूनही रस्त्यावर धुकं होतं. आभाळ भरलेलं,सोबत वाराही होता. कुंद वातावरण, मनाला हवंहवंसं वाटणारं. पूजा हरखून गेली. पहिल्यांदा आली होती ती इथे. विवेकचा विचार आला आणि ती भानावर आली. पहिला पत्ता काढला आणि विचारत विचारत ती पोहोचली तिथे. विवेकचा फोटो घेतला होता तिने मोबाईल मध्ये. त्या अनाथाश्रमात गेल्या गेल्या तिने, तिथे काम करणाऱ्या एका माणसाला विचारलं,

"याला पाहिलं आहे का तुम्ही इथे?", त्याने निरखून पाहिलं.

"विवेकसाहेब ना हे… ",पूजाला आनंद झाला.

"हा … हो, तुम्ही बघितलं का इथे त्याला,आता आहे का तो इथे?",

"आता नाही,पण हे साहेब येतात कधीतरी इकडे.शहरात राहतात ना हे." पूजा निराश झाली.

"हा… पण ते कूठे थांबतात ते आमच्या सरांना माहित आहे. ते सांगतील तुम्हाला." त्याने पूजाला ऑफिसमधे आणून सोडलं.

"excuse me sir… ",

"yes!!",

" सर, तुम्ही विवेकला ओळखता का?", फोटो दाखवत पूजाने विचारलं.

"हो… विवेकला लहान असल्यापासून ओळखतो मी.",

"तो इकडे होता का राहायला?",

"नाही. पण पुढे अजून एक असं आश्रम आहे तिथे होता तो. लहानपणापासून धडपड्या होता, शिवाय छान स्वभाव म्हणून तो सगळ्यांना आवडायचा. म्हणून त्याला ओळखतो मी. आणि आता तो तिथेच असेल कदाचित आताही.",

"Thanks sir" म्हणत पूजा बाहेर पडली.तिथला address तर होताच, त्यामुळे तिला जास्त वेळ नाही लागला शोधायला. 



       ती गेट जवळ आली आणि पावसाला सुरुवात झाली. पूजा आडोशाला उभी राहिली. समोरचे दृश्य किती मनमोहक होतं. पाऊस रिमझिम पडत होता. अजूनही धुकं होतं. सूर्याची किरणं झाडांच्या पानांवर पडून चमकत होती. सकाळच होती ना ती, पक्षांची किलबिल सुरु होती.पूजा सर्वत्र नजर फिरवत होती. नजरेसमोरचा सर्व परिसर जणू सोन्याने न्हावून निघत होता,त्या कोवळ्या उन्हामध्ये. आणि एका कोपऱ्यात तिला विवेक उभा असलेला दिसला. हो… तो विवेकचं आहे. दीड महिन्यांनी त्याला पाहत होती ती. पाऊस जसा आला तसा लगेच गेला.विवेक तिथेच येत होता. पूजाकडे लक्ष गेलं तसा तो जागीच थांबला. पूजा पुढे झाली. विवेकची नजर गोठलेली तिच्यावर." विवेक… " पूजाने हाक मारली त्याला. फक्त जरासं उसन हसू त्याने चेहऱ्यावर आणलं. " कसा आहेस ?","ठीक आहे. तू इथे कशी ?", विवेकने विचारलं. इतक्यात तिथली लहान मुलं धावत आली आणि " विवेक दादा… विवेक दादा." करत त्याच्या भोवती जमा झाली. " तू सकाळी कुठे गेलास रे दादा… खेळायला नाही आलास…" एक लहान मुलगा रागात विवेकला बोलला. विवेक सगळ्यांना घेऊन आत आला. सोबत पूजा होतीच. विवेक त्याच्यासोबत खेळू लागला. पूजाला गंमत वाटली. तिलाही सामील करून घेतलं त्या मुलांनी खेळामध्ये. सकाळची दुपार आणि दुपारची संध्याकाळ कधी झाली ते कळलंच नाही पूजाला. छान दिवस गेला. विवेकसुद्धा भेटला होता. परंतु त्याच्यासोबत बोलणं झालचं नाही तिचं. 


संध्याकाळ झाली तशी विवेक तिला सांगायला आला.

"आता जाऊ नकोस, रात्र झाली आहे. थांब इथेच. उद्या सकाळी निघ." विवेक जाऊ लागला तसा तिने त्याचा हात पकडला. 

"थांब विवेक, मला बोलायचे आहे तुझाशी." विवेक थांबला, तिच्या नजरेत न पाहता बाहेर पाहत राहिला कुठेतरी. 

" का आलास इथे… तेही न सांगता.",

"असचं… ",

"आणि एवढी मोठी गोष्ट लपवून ठेवलीस… माझ्यापासून, सुवर्णापासून.",

"तुला आईने पाठवलं वाटते इथे.",

" हो… आणि तिकडे कुठे पाहत आहेस… माझ्याकडे बघ ना…",

"नको…",

"का… ", विवेक बाजूला जाऊन उभा राहिला.

" माझी हिंमत होतं नाही, तुझ्या डोळ्यात पहायची.",

"असं काय केलं रे मी, कि सगळं सोडून आलास. ते सुद्धा तुझं कुटुंब होतं ना… मग… त्या सुवर्णाचा तरी विचार करायचा ना एकदा… " विवेक अजूनही बाहेर पाहत होता. खुप वेळानंतर बोलला,

" कसं असते ना पूजा… प्रत्येक वेळेस, आपल्याला सगळ्याच गोष्टी मिळतील असं नसते ना. शिवाय दुसऱ्यांचा खूप विचार केला मी, माझ्या मनाचा कोणी विचार नाही केला… कधीही." पूजा ते ऐकून गप्प झाली.


" अरे… पण सुवर्णाला तरी सांगायची होती ती गोष्ट. मी सोड, पण सुवर्णा…. ती तर तुझी एवढी best friend होती ना… मग.",

" ती खूप हळवी आहे माझ्यासाठी, तिला सांगितलं असतं आणि तीसुद्धा दूर झाली असती तर मी काय केलं असतं.आणि तिला आताही नाही कळलं पाहिजे हे. तुला माझी शप्पत आहे." पूजाला ऐकावचं लागलं. 

" ठीक आहे मग, चल परत तिथे शहरात. तुझ्या त्या घरी… उद्या निघू आपण." विवेकने नकारार्थी मान हलवली. 

" तिथलं वातावरण आता पहिल्यासारखं नाही राहिलं. जीव घुसमटतो माझा शहरात.",

" असं का बोलतोस तू… तुला घेऊन जायला आले मी.",

"का आलीस?",

" कारण माझं प्रेम…. " बोलता बोलता पूजा थांबली. विवेकने ऐकलं ते पण काही बोलला नाही.

" हे… प्रेम वगैरे काही नसते. काल्पनिक गोष्ट आहे ती.",

" मग ती मानसी, अजून का काळजी करते तुझी…सुवर्णा, तू गेल्यापासून रोज दादर स्टेशनला जाऊन उभी राहते,तुझ्यासाठी.…तू भेटावंसं म्हणून. मीही आले नसते मग इथे." विवेक काही बोलला नाही त्यावर. 

" हि लहान मुलं… त्यांचं किती प्रेम आहे तुझ्यावर.",

" या सगळ्याला प्रेम नाही म्हणत…. 'ओढ' असते ती मनाची फक्त,बाकी काही नाही. मानसीचं प्रेम असतं तर मला तिने खरी गोष्ट समजल्यावर सुद्धा एकट सोडलं नसतं. सुवर्णाचं प्रेम असतं तर तिने ते आधीचं सांगायला पाहिजे होते. आणि तुही…. मला अनोळखी बोलली नसतीस मग…. बरोबर ना. सगळं कसं छान असते आपल्या आयुष्यात. फक्त आपल्याला आपला "तारा" शोधायचा असतो. मुंबईत कुठे आभाळ clear असते. मग कसा दिसणार माझा तारा मला. काय ना…. मलाही सुखी व्हायचे आहे आता." पूजाच्या डोळ्यात पाणी आलं.


"प्रेम जर असतं ना, तर माझ्या आई-वडीलांनी मला असंच सोडून दिले नसतं ना. इथल्या ma'am नी सांगितलं, कि माझ्या आई-वडिलांनी मी एक वर्षाचा होतो तेव्हा इकडे आणून सोडलं. का ते माहित नाही. पुन्हा कधी आलेच नाही ते. लहानपणापासून मी माझ्या माणसांना शोधत आलो. कधी त्या आईत, मानसीमध्ये, कधी सुवर्णा नंतर तुझ्यात. प्रत्येकात गुंतत गेलो. हाती काय आलं माझ्या.",

"प्रेम…. प्रेम भेटलं ना तुला.",

"प्रेम नको होतं मला… माझी माणस पाहिजे होती मला. ती कधीच भेटली नाही मला. आईने माया लावली मला, तरी प्रत्येक वेळेस मला ' अनाथ' असल्याची जाणीव व्हायची. तुमच्याबद्दल मी काहीच बोलू शकत नाही. जाऊ दे, मी पण काय एवढ्या रात्रीचा बोलत राहिलो. तू आत जा. पाऊस सुरु होईल आता.",

"पावसात भिजला नाहीस सकाळी.",

"सोडून दिलं आहे आता. भीती वाटते पावसाची. त्या आठवणी नको वाटतात मला, पुन्हा." पूजाच्या डोळ्यात अजूनही पाणी होतं.


" एखादी कविता ऐकवतोस…. खूप दिवस झाले ना, नवीन काही लिहिलंस कि नाही.",

"विचार येतंच नाहीत हल्ली डोक्यात,मग कसं लिहू." तेवढ्यात आतून विवेकच्या ma'am आल्या.

" अरे विवेक… चल जेवायला आणि तुझ्या मैत्रिणीला सुद्धा घेऊन ये.",

"ma'am हि आज इथेच राहणार आहे. हिची व्यवस्था होईल का?",

"हो ना… मी सांगते कोणाला तरी." विवेक आत जाण्यासाठी निघाला तसं पुन्हा पूजाने त्याचा हात पकडला,

"तुला उद्या माझ्या सोबतच निघावं लागेल. माझी शप्पत आहे तुला विवेक… ", विवेक त्यावर काही बोलला नाही. 


        पूजा रात्री विवेकचा विचार करत करत कधी झोपली ते कळलंचं नाही. सकाळी जाग आली तेव्हा ९ वाजले होते. लवकर लवकर तयार झाली पूजा आणि विवेकला शोधू लागली. भेटलाचं नाही तिला. त्या कालच्या ma'am दिसल्या तिला,

" ma'am…. विवेक कुठे आहे.…. कूठे पाहिलंत का त्याला?",

"हो… तो तर निघून गेला, कुठे ते माहित नाही.",

"मग तो किती वेळात परत येईल तो?",

"तुला कळलं नाही, मी काय बोलले ते. तो त्याचं सामान घेऊन निघून गेला.",

"काय ?",पूजाला काय बोलावं ते कळत नव्हतं.

" कधी गेला ? काही सांगून गेला का तो ?",

"पहाटे ५ वाजताच गेला आणि त्याने तुझ्यासाठी एक चिट्टी ठेवली आहे.",

"मग तुम्ही थांबवलं का नाही त्याला.",त्यावर त्या ma'am हसल्या,

"हि जागा त्याचीच आहे. इतर मुलंही मोठी झाली कि निघून जातात इथून. पुन्हा येतात कधी कधी भेटायला पण पाहुणे म्हणून. विवेक सुद्धा तसाच आलेला आणि आता गेला निघून. मी कशी थांबवणार कुणाला?" त्यांनी ती चिट्टी पूजाच्या हातात दिली आणि आत निघून गेल्या. 


चिट्टी वाचायला सुरुवात केली तिने. "Hi पूजा… माफ कर मला. पुन्हा न सांगता जात आहे. पण आता कायमचा जात आहे. प्लीज… शोधायचा प्रयत्न करू नकोस. सुवर्णाला सांग, विवेक भेटलाच नाही म्हणून. माझासाठी तुला हे करावंच लागेल. खरी गोष्ट आहे कि मला प्रेम आणि मैत्री यातला फरक कधी कळलाच नाही. त्या दोन्ही गोष्टी माझ्या नशिबात नव्हत्या. मानसी तिचं आयुष्य जगत आहे, सुवर्णानेही तसच करावं. तुम्ही तुमचं आयुष्य माझ्यासाठी खराब करू नका. तस माझ्याजवळ काही नाही तुम्हाला द्यायला. Specially, सुवर्णाची काळजी घे. खूप केलं तिने माझ्यासाठी. मीच समजू शकलो नाही तुम्हाला. मनावर कंट्रोल आहे असं बोलायचो, नाही राहिला कधी कंट्रोल. लोकांनीही कधी समजून घेतलं नाही. दमलो आहे आता मी दुसऱ्यासाठी जगून, आता आराम करावा म्हणतो. मी सुद्धा खूप प्रयत्न केला, माणसं जोडायचा…. कधी जमलंच नाही मला. शिवाय इकडचं वातावरणही ढगाळ होऊ लागलं आहे. माझा तारा शोधायचा आहे ना मला. लहानपणापासून शोधतो आहे.… बघू… दुसरीकडे गेल्यावर माझं नशीब खुलते का ते. आणि हो… पावसात भिजणं सोडू नकोस, छान असतो तो पाऊस. भिजताना माझी आठवण काढू नकोस कधी, त्रास होतो आठवणी आल्या कि. चल, तुला 'येतो' असही म्हणू शकत नाही. कारण पुन्हा आपली भेट होईल असं वाटत नाही. निघतो मी आणि हो…. तू काल बोलत होतीस ना… कविता ऐकव एखादी….लिहिली आहे बघ. तू म्हणायचीच ना, कि मी सर्वात मोठी fan आहे तुझी. तुला कसं नाराज करीन मी. शेवटची कविता… तुझ्यासाठी… Bye पुजू… miss you always… 


आजकाल..... आजकाल, पौर्णिमेला सुद्धा चंद्र पूर्ण दिसत नाही. 

कदाचित मला बघून तोंड फिरवून घेत असेल. 

मीही सांगतो मग त्याला, ठीक आहे रे. नको बघूस माझ्याकडे. 

नाहीतरी तू काहीच नव्हताच "तिच्या" समोर पहिल्यापासून. 


आजकाल……. आजकाल, मी मनाचं आणि मन माझं ऐकतंच नाही. 

कदाचित तुझचं ऐकण्याची सवय झाली आहे त्याला, 

मीही सांगतो मग त्याला, माझे ऐकत नाहीस ते ठीक आहे. 

पण तुझा मनाचे तरी ऐकत जा कधीतरी. 


आजकाल……. आजकाल,पाऊससुद्धा कोरडा कोरडाच असतो. 

जणू काही, त्यातला ओलावा तुझ्यासोबतच निघून गेला. 

मीही सांगतो मग पावसाला, उगाचच भरून येत जाऊ नकोस. 

तू आलास, तर डोळ्यातल्या आभाळाच काय करायचं. 


आजकाल……. आजकाल,कळ्या माझाशी बोलत नाहीत. 

तुझ्या वळणावर गेल्या आहेत कदाचित. 

मीही सांगतो मग त्यांना,फुलू नका कधीच,उमलू नका. 

पुन्हा कोणी प्रेमात पडायला नको तुमच्या. 


आजकाल……. आजकाल, उन्हात देखील सावली नसते सोबतीला. 

कदाचित, तीसुद्धा वैतागली असेल माझ्यासोबत राहून. 

मीही सांगतो मग तिला, तुला सांगणारच होतो निघून जा म्हणून. 

एकट रहायची आता "सवय" करून घ्यायची आहे मला.  


पूजा कविता वाचता वाचता बाहेर आली. डोळ्यात पाणी, काय केलं आपण ,एका मनमोकळ्या पाखराला. कूठे गेला असेल तो. सकाळचे ९ वाजले तरी अजून धुकं होते बाहेर. पावसाने हळूच सुरुवात केली होती. विवेकची आठवण झाली… पावसात हात पसरून भिजणारा विवेक आठवला तिला. खरंच, प्रेम नसते का…विवेक बोलायचा ते बरोबर, खरं प्रेम असंच असते, समोर असते तेव्हा दिसत नाही आणि जाणीव होते तेव्हा खूप दूर गेलेलं असते. आपला तारा आपल्या समोरच होता. त्याला ओळखूचं शकलो नाही आपण. खरंच, माझा तारा आता कायमचा दूर गेला माझ्यापासून…. त्या स्वप्नातल्या धुक्यात हरवून गेला… आता तो कधीच दिसणार नाही मला… पुन्हा एकदा धुक्यातलं चांदणं…..  



Rate this content
Log in

Similar marathi story from Romance