Anu Dessai

Romance Others

3.9  

Anu Dessai

Romance Others

ती ओली सांजवेळ...

ती ओली सांजवेळ...

14 mins
13.6K


     दुपारचे तीन वाजून गेले होते.."मॅडम, जेवून घ्या...तीन वाजून गेले... ताट वाढायला घेऊ...?? " दारात उभी राहून शारदेची मुलगी कांता तिला विचारत होती.."नको गं राहू दे.. तसंही वेळ टळूनच गेलीये..बरं तु जेवलीस का..?? उपाशी असलीस तर जा तू जेवून घे बाळ...माझा हा कामाचा रगाडा कधी संपायचा नाही.. तू माझ्यासाठी थांबत जाऊ नकोस.." ती हातातला कागद बाजूला ठेवत म्हणाली.. "हो माहितीये ते मला आणि मी जेवले मगाशीच..हे नेहमीच झालयं तुमचं.. वेळ टळून गेली म्हणता आणि उपाशी राहाता.. आज मी तुमचं काहीही ऐकून घ्यायची नाही..आणतेच कशी मी ताट वाढून... " असं म्हणत कांता दुडूदुडू पायऱ्या उतरली सुध्दा.."ही पोर काही ऐकायची नाही.. "स्वतःशीच पुटपुटत ती खुर्चीतून उठली आणि तिने खिडकीचा पडदा सरकवला..समोरचा अथांग सागर पाहून आज नेहमी प्रमाणं प्रसन्न वाटण्याऐवजी तिला भरून आलं.. किती वादळं पोटात ठेवतो हा तरीही लाटांच्या सान्निध्यात सुखाची गाज देतो..सहज मनात विचार डोकावून गेला...भुतकाळातलं वादळ पुन्हा तिच्या आयुष्यात घोंघावत होतं...ती त्याच विचारात गुंतली होती... 


     "मॅडम,घ्या जेवून घ्या.." कांताच्या आवाजाने तिची विचारांची तंद्री भंगली..कांताचा मान ठेवण्यासाठी तिने ताट हातात घेतलं...पहिला घास तोंडातून पोटात पोहचला असेल नसेल तोच कांता दारातून येताना दिसली तिच्या हातात बाॅक्स होतं आणि त्यावर असलेल्या मोगऱ्याच्या सुगंधाने पुर्ण खोली क्षणात भरली..पण तिच्या हातातल्या टपोऱ्या गुलाबाने तिचं लक्ष वेधून घेतलं.."मॅडम,आताच हे पार्सल आलंय..टेबलवर ठेवतेय नंतर पाहून घ्या.. "असं म्हणून ती खाली गेली..तिने कसेबसे दोन घास पोटात धकलले..पटकन ताट खाली ठेवून आली आणि पार्सल फोडलं.. त्यात एक साडीचं बाॅक्स होतं तिने बाॅक्स उघडलं त्यात मऊशार मोरपिशी रंगाची पैठणी होती..आणि त्यावर होतं एक पत्र...तिने बाॅक्स मांडीवर ठेवून पत्र उघडलं, 


"प्रिय वसु, 

  

आवडली ना..?? मला माहितीये तुला आज ही किरमिजी रंग आवडतो..पण ही माझी आवड.. पंचवीस वर्षापुर्वी ह्याच रंगाने मला भुल पाडली होती..!! असो, जास्त काही इथे लिहित नाही..तुला फक्त एवढचं कळवायला हे लिहिलंय की माझ्याकडे फार थोडा वेळ राहिलाय..तु आल्याशिवाय माझा प्राण काही जायचा नाही म्हणून तुला एवढी विनंती करतोय एकदा येऊन जा...आणि हो एक शेवटचं ती साडी नेसून आणि तो गजरा माळून आलीस तर आवडेल मला... 


वसंता"


    अशा आशयाचं ते पत्र वाचून तिला अगदी कसनुसं झालं..जावं तरी संकट न जावं तर...ती पुन्हा विचारांच्या फेऱ्यात अडकली..शेवटी जाणाऱ्या जीवाचे तळतळाट नकोत म्हणून मनाचा हिय्या करून उठली...छान पैठणी नेसून.. केसभर गजरा माळून तयार झाली आणि खाली आली... खोलीतून येताना ते टपोरं गुलाब फुलदाणीत ठेवून यायला नाही विसरली..खाली येताच तिने कांताला हाक मारली..तशी कांता धावत पळत ओढणीला हात पुसत स्वयंपाक घरातून बाहेर आली आणि क्षणभर तिला पाहातच राहिली... "काय सुंदर दिसताय मॅडम.. माझीच मेलीची दृष्ट लागायची... " असं म्हणत तिने वसुच्या कानामागे काजळाचा तीट लावला...तिला नाराज करावसं वाटलं नाही म्हणून ती ही हसत म्हणाली, "हं.. कांता बाई आमच्यावर सुस्ती सुमने उधळून झाली असतील तर ऐका आता...एक तातडीचं काम आलयं..रात्री उशीर होईल..तेव्हा आज घरी जाऊ नकोस.. आईला आताच जेवण पोहचतं करून ये म्हणावं रात्री येणार नाही मॅडमनी बंगल्यावर रहायला सांगितलयं आणि भिती वाटत असेल तर शेजारच्या सुमीला बोलावून घे सोबतीला..आणि हो पाऊस सतत पडतोय त्यामुळे गारवा आहे हवेत तर खाली झोपू नकोस आतल्या खोलीत पलंगावर झोपलीस तरी चालेल...झोपताना दार खिडक्या नीट लावून घे.. वरची खिडकी जोराने ओढून मग तिची कडी लाव नाहीतर वाऱ्याने उघडते ती, टेबलवर काही महत्वाचे कागद आहेत भिजतील... आलयं ना सगळं नीट लक्षात.. " कांता हुं हुं करत सगळं ऐकत होती... शेवटी येते गं म्हणत वसुनं घराचा उंबरठा ओलांडला... 

    

बाहेर गाडी तयारच होती.. ती आत बसली आणि दार ओढलं.. "कुठे जायचयं मॅडम..?? " ड्रायव्हरनं विचारलं.."केळशीला... "तिने सांगितलं आणि ड्रायव्हरला जुन्या कागदावर लिहिलेला पत्ता दिला..तो जुनाट कागद पाहून ड्रायव्हर म्हणाला, " जुना पत्ता दिसतोय..लांबचा पल्ला आहे मॅडम जाऊन येऊन आठ दहा तास लागतील..आता सांज सरतेय त्यात पाऊस धोधो कोसळतोय.. अजून वेळ जाईल..सकाळी गेलो तर नाही का चालणार..?? " "नाही काका,जाणं गरजेचं आहे..जावंच लागेल..हळूहळू गेलो तरी चालेल पण आताच जायला हवं.. " ती म्हणाली.. "बरं बरं.. जाऊ मग सावकाशीने.. " असं म्हणत ड्रायव्हरने गाडी सुरू केली...गाडी गेट बाहेर आली आणि केळशीच्या दिशेने धावू लागली..तिच्या मनातले विचार गाडीच्या दुप्पट वेगाने धावत होते..गाडीत बसून ती शरीराने त्याच्या जवळ जात होती पण तिचं मन कधीच पंचवीस वर्षांपूर्वी घडलेल्या त्या घटनेपाशी जाऊन पोहचलं होतं..खिडकीच्या काचेवर ताड ताड आपटणाऱ्या थेंबांकडे पाहत ती पोहचली होती पंचवीस वर्ष मागे...

    

पूर्वाश्रमीची वसुधा मुजूमदार आज देशमुखांची सून म्हणून त्या संध्याकाळी केळशीच्या देशमुख वाड्यात गृहप्रवेश करत होती..सारा गाव नव्या सूनबाईंना पाहायला ओसरीवर जमला होता..ऐन जानेराच्या गुलाबी थंडीत आभाळ भरून आलं होतं आणि बरोबर तिनं मापटं लवंडून आत पाऊल टाकलं न टाकलं तोच पाऊस शिवारायला सुरवात झाली आणि गर्दीतून कोणीतरी म्हणालं, "चांगल्या पायगुणाची आहे सुनबाई...घरात भरभरून सुख येईल... " ते ऐकून तिला समाधान वाटलं..नवी स्वप्न उराशी बाळगून तिने या घरात प्रवेश केला होता..श्रीधर तिचा नवरा..मुंबईला होता..चांगली नोकरी होती..गावाकडे घर, शेती..घरची माणसं सगळी मायाळू..सगळं अगदी मनासारखं होतं म्हणून वसूधेच्या बाबांनी लग्न ठरवलं आणि महिना दोन महिन्यात झालं सुध्दा...वसुधा सुध्दा सुंदर होती दिसायला..चांगल्या संस्कारात वाढलेली..बी.ए करून ग्रॅज्युएट झालेली.. तिचं माहेर दापोलीत..घरचं दुध दुभतं..झाड माड.. थोडक्यात हिरवाईच्या कुशीत वाढलेली..लग्नाचे सगळे विधी आटोपले.. आठवडा सरला आणि सातव्या दिवशी श्रीधर जायला निघाला..आता तो एकटाच जाणार होता आणि एकदा नीट जम बसला की तो वसुधाला घेऊन जाणार होता..आदल्या रात्री तिची समजूत घातली होती त्याने..तिनंही मनसोक्त त्याच्या कुशीत रडून घेतलं होतं..

     

श्रीधर सकाळीच मुंबईला गेला आणि त्या भरभक्कम वाड्यात राहिले वसुधा, तिचे सासू सासरे, धाकटी नणंद रेश्मा आणि श्रीधरचा धाकटा भाऊ वसंता..वसंता वसुधाचा नात्याने धाकटा दीर होता पण वयाने चार पाच वर्षांनी मोठा होता...शेतीधंद्यात रमलेला, पिळदार शरीरयष्टी कमावलेला, स्वभावाने अगदी मनमिळाऊ सतत हसरा हसवणारा असा हा भरदार रांगडा गडी सहज कुणाच्याही मनात भरावा असाच होता..श्रीधर गेल्यापासून वसूने स्वतःला सासू सासऱ्यांच्या सेवेत वाहून घेतलं..नणंद वहिनीचं सूत देखील चांगलचं जुळलं होतं..पण अवघ्या सात दिवसात नवलाई संपुष्टात आलेली वसु आतून पार एकटी पडली होती..दिवसभर घरात राबली तरी रात्री देहाची होणारी आग ती तगमग सहन न होऊन ती घरामागच्या विहिरीचं गार पाणी सर्वांगावरून ओतून घ्यायची...तो आवाज साऱ्यांनीच ऐकला होता.तिचं हे एकटेपणं सगळ्यांना समजत होतं म्हणून सगळेच सांभाळून घेत होते....जेवताना वसंता हसवायचा प्रयत्न करायचा पण ती नुसती वरवर हसायची पण तिची म्हणावी तशी कळी खुलत नव्हती..महिने सरत होते..मध्यंतरी ती माहेरी जाऊन आली...

      

हा हा म्हणता सहा महिने सरले...जून उजाडला...वरूणराजाच्या दमदार आगमनानं लावणीच्या कामाला जोर आला होता...त्या दिवशी देखील असाच पाऊस सकाळपासून धो धो कोसळत होता..वसंता चहा न्याहारी आटपून लवकरच शेतावर वर गेला..सासूबाईंच्या बहिणीच्या नातवाचं बारसं होतं त्या सकाळीच रेश्माला घेऊन शेजारच्या गावात गेल्या होत्या रात्री येणार नाही असं सांगून गेलेल्या...सासरे गेला महिनाभर काही कामानिमित्त त्यांच्या मित्राकडे गेले होते..सकाळपासून वसु घरी एकटीच होती...दुपारचा स्वयंपाक झाला होता आताच शेजारच्या काकी येऊन गेल्या होत्या..त्यांनी भरली वांगी दिली होती.. वसंताला भारी आवडायची..भरल्या वांग्याचा वाडगा स्वयंपाक घरात ठेवून वसु बाहेर येणार तोच मागल्या दारातून वसंताची हाक आली, "वसु,जेवायला वाढ गं लवकर...पटकन परत शेतात जायचयं.. " वसंता तिच्यापेक्षा मोठा म्हणून तो तिला नावानेच हाक मारीत असे..."होय भाऊजी, जेवाण तयार आहे हात पाय धुवून या मी लगेच ताट वाढते.. "तिने प्रतिसाद दिला आणि ताट वाढायला घेतलं..तो पाटावर येऊन बसला..तिने ताट त्याच्यापुढे ठेवलं आणि बाजूला उभी राहिली..तो घासागणिक तिचं कौतुक करत होता..तशी तिच्या हाताला चांगली चव होती..ती ही हसून त्याला प्रतिसाद देत होती..भरली वांगी तर त्याने खूपच आवडीने खाल्ली..त्याचं जेवण पटकन आटोपलं..तो पानावरून उठला..हातावर पाणी टाकून बाहेर ओसरीवर आला.. तो वाडा म्हणजे मुख्य दरवाज्यातून आत आलं की राजांगण आणि चहुबाजूंनी खोल्या आणि वर माडीवर दोन खोल्या मधे छानसं तुळशी वृंदावन...तो बाहेरच्या खुर्चीवर बसला होता..बसल्या बसल्या त्याचा डोळा लागला..वसुनं आपलं जेवण आटोपलं..भांडी घासली आणि स्वयंपाक घरात झाकपाक केली आणि ती आपल्या खोलीच्या दिशेने निघाली..तो ही एव्हाना उठला आणि शेतावर निघाला तिला साद घालून आपण शेतावर जात असल्याचं सांगितलं आणि तो शेताच्या दिशेने निघाला..


     वसु आपल्या खोलीत होती..तिनं झोपण्याचा प्रयत्न केला पण खिडकीबाहेर दिसणाऱ्या कोसळत्या पावसाच्या सरी तिला बैचेन करत होत्या..शेवटी न राहून ती माडीवरून खाली आली आणि स्वतःला राजांगणात कोसळणाऱ्या वरूणराजाच्या स्वाधीन केलं...ती क्षणार्धात चिंब झाली..इतक्यात मागल्या दारातून पाळुली विसरलेला वसंता ती घ्यायला आला..मुख्य दरवाजा बंद होता..वसु स्वयंपाकघरात दिसली नाही म्हणून तो ओसरीवर आला आणि समोरचं दृश्य पाहून क्षणभर थबकला..त्याची नजर तिच्यावर स्थिरावली..समोर होती 'ती'....डोळे बंद करून मनसोक्त सरींनी भिजणारी..किरमिजी रंगाची साडी चोळी अंगाशी चिकटून लगट करू पाहत होती...अर्धवट सुटलेल्या आंबोड्यातून निथळणारं पाणी..गोऱ्या कोमल कांतीवर आभाळातून उतरणारे थेंब तिला विचलित करत होते...हातांनी ती स्वतःला मिठीत घेत होती पण स्वतःचा स्पर्श कुठवर तरी तिची तहान क्षमवणार होता..पण हे पाहून वसंता मात्र आता बेभान झाला..त्याचं रक्त गरम झालं..शिरा ताठरल्या आणि तो तिरासारखा तिच्या जवळ पोहचला..तिला आपल्या पिळदार बाहूमध्ये सामावून घेतलं..बेसावध असलेली ती स्वतःभोवती पडलेल्या दणकट बाहूंच्या विळख्याने क्षणभरासाठी भांबावली खरी परंतु पुरूष स्पर्शासाठी आसुसलेल्या तिच्या देहाचा प्रतिकार क्षणात मावळला आणि ती त्याच्या मिठीत विरघळली...त्याच्या देहाचा गावरान गंध तिला वेडावून गेला..एकमेकांच्या श्वासोश्वासांनी दोघे उत्तेजित होत होते.कितीतरी वेळ ते दोघे एकमेकांच्या बाहुपाशात सामावले होते...वरूणवृष्टीपेक्षा दोघांची चुंबन वर्षा मुसळधार होती..ती त्या असंख्य पाऊस धारांमध्ये त्याच्या रांगड्या स्पर्शाने न्हाऊन निघत होती...त्याने तिला फुलासारखी अलगद उचलून आतल्या खोलीत नेलं..ओली वस्त्रे दोघांच्या देहापासून कधीच दुरावली होती...दोघे विवस्त्र पलंगावर एकमेकांत विलीन झाले होते...दोघांच्या मिलनाला रत्नाकराचं उधाण आलं होतं...पुर्ण सांज सरली...बाहेर पावसाचा जोर कमी झाला होता..इथे दोघे तृप्त होऊन एकमेकांच्या बाहुपाशात पहुडले होते..आजच्या वसंत मिलनाने वसुधा तृप्त झाली खरी पण अंधारून येता येता दोघे भानावर आले...वसंता तिच्यापासून दुर झाला त्याने पटकन खाली पडलेले कपडे घातले तिने ही चादर अंगाभोवती लपेटली. ती ही झाल्या प्रकाराने बिथरली होती..हे त्याच्या लक्षात येताच तो सौम्यपणे म्हणाला, "जे झालं ते अनावधानाने झालं...पाप तुझ्या ही मनात नव्हतं आणि माझ्या ही..आपण परिस्थिती पुढे झुकलो. यात आपल्या दोघांचा दोष नाही..मी बेभान झालो होतो...माझा स्वतःवरचा संयम सुटला..मला माफ कर पण कुठेतरी तुझी इतक्या दिवसांची तगमग पाहावेना म्हणून माझ्या हातून हे घडलं...चुक झाली खरी..पुन्हा एकदा तुझी माफी मागतो झालं गेलं विसरून जा.. जे झालं ते आपल्यातच राहील हा माझा शब्द आहे..."असा म्हणून तो शेवटचा तिच्या जवळ गेला आणि तिच्या माथ्यावर ओठ टेकले आणि मऊशार केसांवरून हात फिरवून तिथून निघून गेला..ती ही तशीच पलंगावर पडून राहिली..

     

दुसऱ्या दिवशी सासुबाई आणि रेश्मा परतल्या..वसुची खुललेली कळी पाहून त्यांना देखील आनंद झाला पण त्या मागचं कारण मात्र त्यांना माहीत नव्हतं...त्यात दुपारी श्रीधरचं पत्र आलं..त्यात येतोय असं लिहिलं होतं..त्याचमुळे ती खुश असावी असा सगळ्यांचा समज झाला...ठरल्या दिवशी श्रीधर आला..मुंबईत आता त्याने चांगलं बस्तान बसवलं होतं या खेपेला तो वसुला न्यायला आला होता..महिनाभर राहून वसुधा आणि श्रीधर मुंबईला रवाना झाले..दोघे तिथे पोहचतात न पोहचतात तोच महिन्या दिड महिन्यात वसुला दिवस गेल्याची गोड बातमी आली..सगळ्यांना खूप आनंद झाला..श्रीधरनं वसुची नीट काळजी घेतली आणि नऊ महिन्यांनी वसुच्या कुशीत तिची परीराणी विभा अवतरली..वसुनं सुटकेचा निश्वास सोडला आणि त्यानंतर काही न काही कारण काढून ती गावाकडे जायचं टाळत राहिली..मध्यंतरी वसंताचं लग्न झालं.. श्रीधर विभाला घेऊन जाऊन आला पण वसुनं त्या ही वेळी जायचं टाळलं आणि आज थेट पंचवीस वर्षांनी ती तिथे जात होती..

     

"मॅडम, केळशी आलं..इथून पुढे कसं जायचं..?? " ड्रायव्हरच्या प्रश्नाने ती तंद्रीतून बाहेर आली.. "देवळाच्या इथे गाडी थांबवा..मी आलेच जाऊन.. " असं सांगून ती गाडीतून उतरली.. पाऊस खूप पडत होता...त्यामुळे कदाचित दिवे गेले असावेत..तिने वाड्यात प्रवेश केला आणि तिला परत सारं आठवलं...आता मात्र वाडा भकास दिसत होता..पूर्वीसारखी आता त्याची माणसांची सवय मोडली होती म्हणून असेल कदाचित...तिने विचारलं, "कोणी आहे का..?? " तिच्या आवाजाने एक बाई बाहेर आल्या..साधारण तिच्याच वयाच्या.. एक दोन वर्षांचा फरक असेल फार फार..ती वसंताची बायको असावी असा तिने अंदाज बांधला..."वसंता आहे का..??"तिने त्या बाईला विचारलं..."हो आहेत ना.. आत झोपलेत.. या मी दाखवते तुम्हाला त्यांची खोली..माझ्या मागून सावकाश या...धडपडाल..हे दिवे पण आताच जायला हवे होते... "असं म्हणत ती पुढे गेली.." मी इथेच तर धडपडले होते.. "वसु पुटपुटली.. " काही म्हणालात..!? "तिने विचारलं.. " नाही नाही.. मी काही नाही म्हटलं.. "वसुने वेळ मारून नेली...तिने वसुला त्याच्या खोलीत नेलं.." अहो, बघा तुम्हाला भेटायला कुणीतरी बाई आल्या आहेत.. " दुमडून कपाळावरचा हात बाजूला सारत तो क्षीण स्वरात उद्गारला, "वसु, आलीस का गं...??" "हूं... " वसु हुंकार देत आत आली..तिचं पाऊल पडताच गेलेले दिवे आले आणि खोली प्रकाशाने उजळून निघाली..आणि त्याच्या सुरकुतल्या चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटली..."ही माझी बायको सुनंदा आणि ही वसुधा..आपल्या मोठ्या वहिनी श्रीधर दादाची बायको.."त्याने धावती ओळख करून दिली..दोघींनी एकमेकींकडे पाहत स्मितहास्य करत ओळख स्विकारली.."सुनंदे, तु बाहेर जा..मला ह्यांच्याशी महत्त्वाचं बोलायचयं.."सुनंदाने पुढचं काही विचारण्याआधीच तिला तिथून बाहेर पाठवलं..ती निमुट खोलीतून बाहेर गेली.. वसुनं दरवाजा लावून घेतला..

    

ख्यालीखुशाली विचारून झाल्यावर वसंतानं मुळ मुद्याला हात घातला..कित्येक वर्षांपासून मनात साठवून ठेवलेलं सत्य वसंतानं वसुपुढे ठेवलं आणि शांत झाला... आज त्याला सुखाची झोप लागणार होती..तिची झोप मात्र उडाली होती कायमचीच...तास दोन तासाचा संवाद संपल्यानंतर ती त्याचा निरोप घेऊन परत निघाली..खोली बाहेर आली तेव्हा दाराच्या कडेला ओल्या डोळ्यांनी तिला पाहत सुनंदा उभी होती...गाडीत बसली..गाडी परतीच्या वाटेला लागली...ती डोळे मिटून बसली होती...दहाच्या दरम्यान निघालेली ती घरी पोहचली तेव्हा एक वाजला होता.. चावी देऊन ड्रायव्हर निघून गेला..तिने स्वतः कडे असलेल्या चावीने दरवाजा उघडला आणि आत आली.. दरवाजा लावला आणि आपल्या खोलीकडे वळणार इतक्यात तिला कांताची आठवण झाली ती आतल्या खोलीत डोकावली.. कांता आणि शेजारची सुमी गाढ झोपल्या होत्या.. क्षणभर तिला हेवा वाटला त्या पोरींचा.. कसल्याच चिंतेविना गाढ झोप लागली होती त्यांना..विचारांच्या गुंगीतच ती वर आली..तशीच खुर्चीत बसून राहिली... रात्रभर..त्या विचारांच्या गराड्यात कधीतरी पहाटे तिला झोप लागली...कांता झाडलोट करायला आली तेव्हा तिला उठवलं.. ती पुर्ण अवघडली होती.. केसातला गजरा विस्कटला होता.. साडी चुरगळली होती..ती उठली आणि आवरलं..

     

हे सगळं झाल्यानंतर.. आठवड्याभरानं भर दुपारी तिला पत्र मिळालं वसंता गेल्याचं आणि त्या सोबत कागदपत्र होती शेतीची, जमीनजुमल्याची...वसंतानं सगळं विभाच्या नावावर केलं होतं फक्त राहतं घर सोडून..ते त्यानं सुनंदेसाठी ठेवलं होतं..खरं तर या सगळ्याची वसुधाला गरजच नव्हती कारण ते गाव सोडल्यानंतर तिचं आयुष्य पंचवीस वर्षांत खूप बदललं होतं...मुंबईत आल्यावर तिने श्रीधरला पुरेपूर साथ दिली...तो नोकरीत वरचा हुद्दा मिळवेपर्यंत छोट्या दोन खोल्यांच्या घरात राहिली..मुलीला योग्य संस्कार दिले तिला वाढवलं...तिच्या शिक्षणाकडे पुरेपूर लक्ष दिलं..त्याचबरोबरीने तिनं स्वतः पोस्ट ग्रॅज्युएट झाली..काही दिवस नोकरी देखील केली..पण त्याचवेळी श्रीधरला प्रमोशन मिळालं म्हणून तिला नोकरी सोडावी लागली..त्यानंतर ते फ्लॅटवर रहायला आले..तिथे असतानाच विभाचं ग्रॅज्युएशन पुर्ण झालं आणि तिला पुढल्या शिक्षणासाठी परदेशात जायची फेलोशिप मिळाली..विभा परदेशी गेल्यावर ते दोघेच मुंबईत राहिले..तिची इच्छा होती की समुद्र किनारी घर असावं म्हणून अलिबागला समुद्रकिनारी हा बंगला त्याने तिच्यासाठी घेतला..ते इथे राहायला आले.. ती छान रमली मात्र श्रीधरचं मन काही रमेना म्हणून तो परत मुंबईतल्या फ्लॅटवर राहायला गेला.. आणि इथल्या या मोठ्या एैसपैस असंख्य खोल्यांच्या घरात ती एकटीच उरली..पण तिच्याकडे कामाला येणाऱ्या बाईची मुलगी तिची आई आजारी असल्यामुळे झाडलोट आणि इतर कामाला येत होती..ती विभाच्या वयाची आणि त्यात खूप बोलकी असल्यामुळे तिला तिचा लळा लागला होता..तिची तिला चांगली सोबत होत होती...

     

सगळी कागदपत्रे अस्ताव्यस्त पडली होती तिच्या हातात ते पत्र होतं..तशीच सांजेची वेळ..रिपरिपणारा पाऊस अन् समोरच्या खिडकीतून दिसत होता अस्ताला जाणारा सूर्य...वसुनं उभ्या पंचवीस वर्षांत त्या प्रसंगाचे पडसाद श्रीधर किंवा विभा दोघांच्या आयुष्यावर कधीही उमटू दिले नाही..तिने एक कर्तव्यदक्ष पत्नी,आई या दोन्ही भुमिका योग्य रीतीने पार पाडल्या..पण तिच्या मनात खोलवर त्या अपराधाबद्दलचं शल्य आजही भळभळत होतं..तरीही पती आणि मुलीचं सुख पाहून ती समाधानी होती मात्र त्या दिवशी वसंता आणि तिची भेट त्यावेळी त्याने सांगितलेली ती गोष्ट.. त्यामुळे तिचं विश्व पुन्हा ढवळून निघालं होत..आणि आज तो आपलं मन तिच्याकडे रितं करून कायमचा निघून गेला होता पण तिचं काय ती कोणाकडे मन मोकळं करणार होती..तिला आठवत होता त्यांच्यातला तो शेवटचा संवाद... 

      

"वसु, कशी आहेस...??" त्यानं विचारलं.. "ठीक आहे..काय बोलायचयं तुम्हाला आता पंचवीस वर्षांनंतर...?? "ती निर्विकारपणे म्हणाली.. " हो..सांगतो..आधी मला सांग कशी आहे आपली लेक विभा.. " या प्रश्नाने जणू तिच्या पायाखालची जमीन सरकायची बाकी राहिली होती.."हे काय बोलताय तुम्ही..विभा माझी आणि श्रीधरची... "बोलताना तिचे शब्द जड झाले..ती जीवाच्या आकांताने प्रयत्न करत होती की वसंताचं म्हणणं खोटं ठरावं पण वसंता पुरव्यासहित तिचे प्रश्न हाणून पाडीत होता.." मला माहीत होतं तु सहजपणे हे मान्य करणार नाहीस..पण हे त्याचं आणखीन एक प्रमाण..हे बघ माझ्या दंडावरची ही खूण..विभाच्या दंडावर जशास तशी उमटली आहे.. लहानपणी माझ्या लग्नाला आली होती तेव्हा खेळता खेळता मला ती दिसली होती...तु आई आहेस तिची.. तुला तर जन्म झाल्या झाल्या दिसली असेल ना.. "असं म्हणत त्याने दंड दाखवला..त्याचं खरं होतं तीच खुण विभाच्या दंडावर होती.." पण गरजेचं नाही की जन्मखूण फक्त वडिलांचीच असावी..एका खुणेने हे सिद्ध नाही होतं की ती... "ती पुन्हा कळवळून बोलली.." ठिक..जरा बुध्दीला ताण देऊन विचार करून सांग विभा अपुऱ्या दिवसांची जन्मली होती का...?? " "नाही..ती पुर्ण नऊ महिन्यांनी जन्मली होती.. "मग तुला आठवत असेल तर दादा इथे महिनाभर राहिला होता त्यानंतर तुम्ही मुंबईला गेलात पण तो येण्याच्या आठवडाभर आधी तुझी पाळी चुकली होती..पण तु हे कोणाला बोलली नाहीस...आणि मुंबईला गेल्यावर दिवस गेल्याचं कळवलसं आणि बरोबर आठ महिन्यांनी विभा जन्मली...तु जर म्हणतेस की ती पुऱ्या दिवसांची आहे तर मग.... "


"तसं काही नाही होतं असं कधी कधी येते उशीराने पाळी...पण तुम्ही त्यावेळी माझ्या पाळीवर पाळत ठेवून होतात...शोभतं का तुम्हाला हे.. "ती रागाने म्हणाली... " नाही वसु गैरसमज करून घेऊ नकोस..तुझी पाळी चुकली आणि दोन दिवसांनी आईला मी शेजारच्या काकींना सांगताना ऐकलं..परवाचे दिवसची होती वसुची पाळी अजून आली नाही..यायला हवी होती एव्हाना..आणि हे ऐकून मी सुद्धा भ्यालो..मग मी रोज वाट पाहू लागलो पण शेवटी तुम्ही गेल्यावर मला आईने थेट गोड बातमी आहे म्हणून सांगितलं..मी ही माझ्या मनाचं वेगळं समाधान करून घेतलं पण दादा इथे आला तेव्हा हाच प्रश्न मी त्याला विचारला तो ही म्हणाला ती पुर्ण नऊ महिन्यांनी जन्मली मग मी नीट आराखडा बांधला त्यावर वारंवार हेच सिध्द झालयं की विभा माझी मुलगी आहे...आणि हेच सत्य आहे तू कितीही नाकारलसं तरी.."त्याने उसासा टाकला... "नाही... नाही हे खोटं आहे.. " वसु ओरडली... "वसु, माझ्या हातून जे झालं तो अक्षम्य गुन्हा होता...मी मान्य करतो..पण जे झालं ते अनावधानानं झालं....आणि आजवर मी त्याची पुरेपूर शिक्षा भोगतोय...मी माझं पौरुषत्व पुर्णपणे तुला अर्पण केलं..जरी ती वासना असली तरी त्यात समर्पणाची भावना द्रुढ होती म्हणून की काय मी माझ्या स्वतःच्या पत्नीला कधी समाधानी करू शकलो नाही तिला पुर्ण समर्पित होऊ शकलो नाही..ज्यामुळेच की काय माझ्या पापांचं फलित म्हणून तिच्या माझ्यात कोणाही मध्ये दोष नसताना गेली पंचवीस वर्ष आम्हाला संतती लाभ झालाच नाही...खरंतर मी हे कुणालाच सांगणार नव्हतो अगदी तुलाही पण आता जायची वेळ आली.. राहावेनासं झालं म्हणून कसाबसा तुझा नवीन पत्ता मिळवून तुला पत्र पाठवलं...


"तो थोडा थांबला..त्याला दम लागला होता.. तिने त्याला बाजूच्या माठातलं पाणी पाजलं आणि म्हणाली, " ते काही असलं तरी विभा माझी आणि श्रीधरचीच मुलगी आहे.. आणि हेच अटळ सत्य आहे...तो तिच्या डोळ्यात पाहत क्षीण हसला आणि म्हणाला, "तू म्हणतेस तसं असेल तर चांगलचं आहे...तुझ्या आणि दादाच्या संसारात ढवळाढवळ किंवा उलथापालथ करायची माझी बिलकुल इच्छा नाहीये... पण एकच शेवटचा प्रश्न...नीट विचार करून उत्तर दे हो...विभाच्या जन्मानंतर तुला पुन्हा कधीच दिवस का गेले नाहीत..तू पुन्हा कधीच आई का झाली नाहीस..??? "कानात शिस्याचा रस ओतल्यासारखा तो प्रश्न तिच्या कानात घुसला..ती काही बोलणार इतक्यात तो म्हणाला, " ह्याचं उत्तर मला नाही दिलं तरी चालेल पण स्वतःच्या मनाला नक्की दे..एवढचं सांगायचं होतं मला.. सुखी रहा... "एवढं बोलून तो पाठमोरा झाला आणि ती ही खोलीबाहेर आली...तिथे सुनंदा मुसमुसत उभी होती..तिनं सारं ऐकलं होतं...तिच्याकडे एकवार पाहिलं आणि ती निघून आली...आज वसंताचा तोच प्रश्न तिच्यासमोर आली वासून उभा होता..ते शब्द खोलीभर घुमत होते आणि त्याचं उत्तर खोल मनाच्या डोहात कुठेतरी दडलेलं होतं जे न बोलता तिने स्विकारलं होतं...तो प्रश्न होता, " तू पुन्हा कधीच आई का झाली नाहीस...??? "आणि आज तिचं उध्वस्त मन आक्रंदून आक्रंदून परत परत तेच सांगत होतं, " होय....वसंता, विभा तुमची मुलगी आहे... मी मान्य करते ती तुमची मुलगी आहे... "त्या ओल्या सांजवेळी हातून अनावधानाने घडलेली चूक आज तिच्या मुलीच्या अस्तित्वावर असंख्य प्रश्न उभे करीत होती आणि त्यांची उत्तरं आता तिच्या मनाच्या चोरकप्प्यात स्थिरावली होती कायमची...!!! 


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance