Anu Dessai

Romance Tragedy Others

3  

Anu Dessai

Romance Tragedy Others

गोष्ट तुझी माझी - भाग ४

गोष्ट तुझी माझी - भाग ४

6 mins
1.1K


       "काय गं सगळ्या जुन्या डायऱ्या काढून काय शोधतीयेस..?? "मुकुंद खोलीत येत अनुला म्हणाला.. " अहो, तुम्ही एकटेच आलात वर मला हाक नाही का मारायची मी आले असते.. " अनु पसाऱ्यातून उठत म्हणाली."अगं सवय झालीय आता तु ही विसर आता ते वीस वर्षे उलटली त्या अपघाताला.. "मुकुंद काठीच्या आधाराने पुढे सरकला आणि बेडवर बसत म्हणाला.. "कशी विसरू अहो इतकी वर्ष उलटली तरी.... माझी माणसं कायमची दुरावली माझ्यापासून...तुम्हाला अपंगत्व आलं... आजही त्या आठवणी ताज्या आहेत.. आठवलं तरी वाटतं त्या दिवशी गेलो नसतो तर किती चांगलं झालं असतंं.. " अनुच्या डोळ्यातली आसवं थांबत नव्हती.. मुकुंद तिच्या डोक्यावरून हात फिरवून तिला शांत करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होता.. त्या भूतकाळातल्या त्या घटनेची झळ त्यालाच तर जास्त बसली होती... त्याच्या खुणा शरीरावर आणि अवतीभवती वीस वर्षापासून विखुरलेल्याच होत्या..दोघेही एकमेकांच्या मिठीत विसावून भुतकाळातला मुकपट आठवत होते... 


         तो दिवस होता १५ डिसेंबर .... विनुचा बारावा वाढदिवस.. वहिनी माहेरी होत्या.. त्यांना पुन्हा दिवस गेले होते..विनुचं आणि मीराचं अनु सगळं जातीने करत होती.. विनुला ही आता आईपेक्षा छोटी माँ चा लळा जास्त होता... आणि मीरा काय तिचं इवलसं खेळणं झालेली.. आपल्या या छोट्या बाहुलीला विनु जीवापाड जपे.. शाळेतून आल्या आल्या पटकन आवरून ती मीराच्या पाळण्याचा ताबा घ्यायची.. किती ही गाढ झोपेत असली तरी विनु आल्याची चाहूल मीराला बरोबर लागायची.. क्षणभर जरी विनु दिसली नाही तरी कसा कासावीस होऊन जायचा तो एवढुसा जीव..


       विनुचा तासनतास वेळ मिराशी खेळण्यातच जायचा.. विनु आल्यावर अनु मिराला जमिनीवर चटई टाकून खाली झोपवी.. मग मीरा आणि तिच्या ताईबाईच्या गप्पा.. शाळेत घडलेली प्रत्येक गोष्ट अगदी सविस्तर तशीच्या तशी रंगवून विनु मिराला सांगे.. ती ही तशी लहानच तिला वाटायचं आपली बहिण आपलं सगळं ऐकते तिला फार गंमत वाटायची त्याचं कारणंही तसंच होतं..ते म्हणजे जेव्हा जेव्हा विनु मिराला गोष्ट सांगताना रंगात येई तेव्हा मीरा खुदु-खुदु हसे जणू काही तिला सारचं कळतयं.. अनु ह्या दोघांच्या निरागस बाललिलामध्ये हरवून जायची.. असेच दिवस सरत होते.. सगळे खूष होते.. 


       आणि तो काळा दिवस उजाडला.. बरेच दिवस कुठे बाहेर गेलो नाही बाबा फिरायला जाऊया म्हणून विनूने दादांच्या मागे भुणभुण लावली होती.. शेवटी दादांनी तिच्या वाढदिवसानिमित्त सुट्टी काढली.. आणि आंबोलीला जायचे ठरले.. दादा, मुकुंद, बाबा अनु आणि विनु.. आई घरी मीरा जवळ थांबणार होत्या त्यांची तब्बेत जराशी नरम होती आणि इतक्या थंड ठिकाणी बाळाला घेऊन जायला नकोच ती राहील माझ्याकडे असे आईनी दटावले.. तसंही अनु जाणार नव्हती पण विनुला सोबत म्हणून ती तयार झाली...


       सकाळी नऊच्या दरम्यान सारे निघाले... जाताना हसत खेळत प्रवास पार पडला दोन तासात सगळे इच्छित स्थळी पोहचले.. धबधबा पाहून विनु हरखून गेली.. मुकुंद आणि अनु ही मीराच्या जन्मानंतर पहिल्यांदाच बाहेर आलेले.. त्यांनी ही एकमेकांसोबत छान वेळ घालवला.. दुर कोण्या खडकावर पाय पाण्यात बुडवून बसले होते.. तिचं डोकं त्याच्या खांद्यावर होतं हात हातात होता.. पाणी संथ गतीने वाहत होतं.. मधेच पाय हलवून अनु पाण्यात तरंग तयार करू इच्छित होती..वेळ असाच गेला...संध्याकाळी निघायला जरा उशीरच झाला.. रस्ता एकाकी होता पण एखाद दुसरा ट्रक दिसायचा.. विनु अनुच्या मांडीवर शांत झोपी गेलेली.. दादा गाडी चालवत होते.. बाबांना ही झोप लागली होती.. मागे मुकुंद आणि अनु ही झोपाळलेले होते..दादा गाडी हळू हळू चालवत होते.. या घाटाला वळण फार होती..हे वळण काढून गाडी मुख्य रस्त्याला लागणार होती.. तेवढ्यात गाडीला जोरदार गचका बसला.. काही करण्याआधीच सारे बेशुद्ध झाले...


      गाडी वळणावरून पुढे सरकत असताना समोरून येणाऱ्या ट्रकच्या लाईटमुळे दादांचा तोल गेला आणि गाडी खाली घसरत झाडावर धडकून पलटली..तो ट्रकवाला पुढे जाऊन थांबला आणि या सर्वांना हाॅस्पिटलमध्ये दाखल केलं.. अनुचा फोन पर्समध्ये होता म्हणून त्याला काही झालं नव्हतं त्यावरून नंबर घेऊन तिच्या घरी तिच्या आईवडिलांना आणि काही मित्रमैत्रिणींना सांगितलं.. सगळेच तातडीने हाॅस्पीटलमध्ये आले.. मुकुंदच्या घरी त्याची आई एकटी होती येताना अनुची आई त्यांच्याकडे गेली.. इकडे अनुचे बाबा आणि मित्र मैत्रीणी हाॅस्पीटलच्या काॅरीडोरमध्ये धावपळ करत होते.. बाबा आणि विनु किरकोळ जखमी झाले होते पण अजून शुद्ध आली नव्हती त्यांना.. मुकुंदचा एक पाय गेला होता पण त्याच्यावरचा धोका मात्र टळला होता तो ही बेशुद्ध होता.. दादा मात्र क्रिटिकल होते.. त्यांना आयसीयू मध्ये ठेवलं होतं..


अनु शुध्दीवर आली तेव्हा हाॅस्पीटलच्या काॅटवर होती.. तिला बरचं लागलं होतं.. डाॅक्टर चेकिंग करायला आले तेव्हा तिने इतरांची चौकशी केली.. सगळे ठीक आहेत म्हणून गेले डाॅक्टर कारण आता तिला काही सांगण्यासारखी परिस्थिती नव्हती.. ती अगदी जायबंदी झाली होती.. लहान लहान पण बऱ्याच जखमा झाल्या होत्या..वहिनींना काही कळवलं नव्हतं.. कारण त्यांची परिस्थिती ही नाजूक होती.. ती रात्र तशीच धावपळीत गेली..महिना सरला.. हळूहळू सगळं स्थिरावत होतं.. मुकुंद, बाबा, विनु आणि अनु घरी आले होते... दादांच्या प्रकृतीत अजून काही सुधार नव्हता.. या सगळ्यात त्यांचे मित्र मात्र खंबीरपणे सोबत होते..वहिनींना नववा लागला होता.. रोज त्यांचा फोन यायचा त्यांना लपवता नाकीनऊ यायचे सगळ्यांना.. पण ते गरजेचं होतं.. अजून सगळे धक्क्यातून सावरत होते.. विनु शांत झाली होती.. बाबा आई मनातून खचले होते.. मुकुंद आतल्या आत गुदमरत होता त्याला आपलं अधुपण स्वीकारणं जड जात होतं... 


      दुखऱ्या देहाने अनु आपल्या विस्कळीत झालेल्या घराला सावरण्याची केविलवाणी धडपड करत होती.. सोबतीला आई बाबा आणि हाकेला पावणारे मित्र म्हणून निभावलं जातं होतं सारं.. काही दिवसांनी वहिनींना हाॅस्पीटलमध्ये नेल्याची बातमी आली.. अनु तशीच तिकडे धावली... सकाळी मुलगा झाल्याची बातमी आली आणि तेवढीच मनातून सुखावून गोड बातमी कळवायला घरी फोन केला समोरून बाबांचा जड सुर उमटला..दादा गेल्याची बातमी सांगितली आणि फोन ठेवून दिला... अनुच्या पायाखालची जमीन सरकली आता नेमकं काय करायचं तिला सुधरत नव्हतं.. वहिनींचा निष्पाप चेहरा आठवून एकदम गलबलून आलं आणि नजरेआड असलेल्या त्या इवल्याशा जीवाचं तर ज्याला या जगात येऊन अवघे तास ही उलटले नव्हते आणि त्याचं पितृछत्र हरपलं होतं.. आत गेल्यावर त्यांना कसं सामोरं जायचं हाच विचार तिच्या डोक्यात राहून राहून येत होता... मन घट्ट करून वहिनींना सामोरी गेली.. आसवं दडवत कसंतरी काही तरी बोलली..मात्र त्यांच्या नजरेला नजर नाही देऊ शकली.. 


     घरी आली..दादांचं कलेवर समोर ठेवलं होतं.. साऱ्यांचा एकच आक्रोश ऐकून सुन्न झाली होती.. तिला बघताच विनुने बिलगून बाबा का उठत नाहीत माझ्याशी का बोलत नाहीत म्हणून प्रश्नांचा मारा सुरू केला..पण अनुच्या तोंडून हुंदक्यावाचून काही निघालं नाही.. संध्याकाळपर्यंत दादांचा अत्यंविधी आटोपला... घरात आता भयाण शांतता पसरली होती.. विनु रडून रडून झोपली होती...दिवस लोटले.. वहिनींना घरी आणलं तेव्हा दादांच्या फोटो वरचा हार पाहून त्यांची किंकाळी घरात घुमली अन् त्यांना भोवळ आली... शुद्ध आली तेव्हा त्यांचा चेहरा अगदी निर्विकार होता त्या काही बोलत नव्हत्या नजर मात्र भिरभिरत होती.. डाॅक्टर येऊन गेले त्यांनी त्यांना मानसिक धक्का बसल्याचं सांगितलं... 


      त्या रात्री तिला ठरवून झोपायचं होतं.. आज वादळाने उध्वस्त केलेल्या तिच्या घरकुलाला तिला पुन्हा उभारायचं होतं, प्रवास नक्कीच खडतर होता पण ती आता डगमगणार नव्हती.. तिने या दिशेने वाटचाल सुरू करत एका काॅलेज मध्ये प्राध्यापिकेच्या जागेसाठी अर्ज केला.. तिला ती नोकरी मिळाली, ती खंबीरपणे पुर्ण घर एकटीने सांभाळत होती, मुलांचं शिक्षण, आई बाबा सासू सासरे वहिनी सगळ्यांना सावरत होती, मुकुंदला पुन्हा धीराने उभं करत होती.. या सगळ्यात कितीतरी काळ लोटला.. मुकुंद पुन्हा आपल्या हायसेकंडरीमध्ये रूजू झाला हळूहळू रूळला... विनु डाॅक्टर झाली होती, विनीत एक उत्तम चित्रकार म्हणून प्रसिद्ध होता आणि मीरा आईवडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून एक उत्तम प्राध्यापिका बनली होती.. तिन्ही मुलं लग्न करून वेल सेटल झाली होती...आई बाबा बरेच सावरले होते.. वहिनी शांत झाल्या होत्या...


      कालच अनु काॅलेजच्या प्राचार्य पदावरून निवृत्त झाली होती आणि आज मुकुंद अनुच्या लग्नाचा २५ वा वाढदिवस होता.. त्या निमित्ताने सारे जमले होते तिची पिल्लं घरट्यात परतली होती... तिच्या जीवनपटाच्या साक्षीदार या सगळ्या डायऱ्या होत्या त्यात तिने प्रत्येक क्षण टिपला होता जरासं भुतकाळात डोकवावं म्हणून तिने त्या काढल्या होत्या पण मुकुंदच्या कुशीतच साऱ्या भुतकाळाची उजळणी झाली होती...आज तिच्या आनंदवनात आनंद ओसंडून वाहत होता... आज दोघे समाधानाने एकमेकांच्या बाहुपाशात विसावले होते कारण आता मुकुंद फक्त त्याच्या राधेचा होता आणि राधा फक्त शामरंगी रंगली होती...


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance