Anu Dessai

Romance Others

4.0  

Anu Dessai

Romance Others

गोष्ट तुझी माझी - भाग २

गोष्ट तुझी माझी - भाग २

17 mins
703


   साखरपुडा व्यवस्थित पार पडला होता.आता सगळ्यांनी सुटकेचे निश्वास सोडले होते कारण दोन वर्षे तरी धावपळ नव्हती पण तिला आता दुहेरी आव्हानाला सामोरं जायचं होतं.तिला आता आपला अभ्यास सांभाळून त्यालाही वेळ द्यावा लागणार होता पण यात त्याने तिची दुविधा दूर केली..


   एक दिवस ते भेटले असता तो म्हणाला,"अनू आता पासून फक्त अभ्यास करायचा..काही मदत लागली तर मी आहेच..आता आपल्या भेटी जरा कमी करायला हव्यात..पण काळजी करू नकोस मी रोज रात्री तुला फोन करेन.." "म्हणजे आपण अजिबात भेटणार नाही का?" तिने विचारलं."तसं नाही गं पिल्लू..भेटायचं पण महिन्यातून एक दोनदा..आणि हे तुझा अभ्यास चांगला व्हावा म्हणून ना.." त्याने तिला समजावलं.


   ती ही कसून अभ्यासाला लागली..आणि भरघोस यश मिळवत होती..त्याच्या साथीने तिचा आत्मविश्वास खूप वाढला होता.ती एकांकिका स्पर्धा लेखन स्पर्धा नाटक स्पर्धेतून झळकत होती..याचं बरचसं श्रेय ती त्याला द्यायची..कारण तिला अभ्यासाबरोबर या साऱ्या मध्ये भाग घ्यायला तो प्रोत्साहित करायचा..


   आता ती शेवटच्या वर्षाला होती.तिने सलग दुसऱ्या वर्षी पासून मराठीत गोल्ड मेडल जिंकलं होतं.या वर्षी सुध्दा ते तिला मिळावं असं वाटत होतं.तिने ही जिद्दीने अभ्यास केला होता..पेपर्स पण छान गेले होते.ती सगळ्यांच्या अपेक्षांवर खरी उतरली होती..आज पुरस्कार सोहळा होता..त्याला सगळे उपस्थित होते..तो आणि त्याचं कुटुंब आणि तिचे आईवडील आणि ताई..आणि तितक्याच अनाऊसमेंट झाली."कु. अश्लेषा गर्दे मराठी विषयात प्रथम.." ती स्टेजवर गेली तिला पदक प्रदान करण्यात आलं.तिच्या भाषणात तिने याचे सारे श्रेय आपल्या आई बाबांच्या कष्टाला आणि त्याच्या सर्पोटला दिलं..सगळे घरी आले..तिचे बाबा खूप खूष होते.कारण त्यांची इच्छा होती की तिने त्यांचं शिक्षणाचं स्वप्न पूर्ण करावं आणि आज त्यांना ते साकार होताना दिसत होतं त्यांच्या डोळ्यात आनंदश्रू होते..


    आता प्रतिक्षा संपली होती..दुसर्‍या दिवशी संध्याकाळी सर्व कुटुंबीयांची बैठक झाली ती एकुलती एक असल्यामुळे तिच्या आई बाबांनी लग्न थाटामाटात करायचे ठरवले.तसेच त्याच्या घरातील सुध्दा हे शेवटचे कार्य होते..त्यामुळे त्याच्या घरातील मंडळी या मताशी सहमत होती...लगेचच पत्रिका छापल्या..बाबा आणि दादा जाणार होते पत्रिका वाटायला..सगळ्यांना पत्रिका वाटल्या.दुरच्या नातेवाईकांना पोस्टने पत्रिका पाठवल्या होत्या....


    लग्न मे महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात ठरले.कारण जूनमध्ये त्याची हायर सेकेंडरी सुरू होणार होती आणि तिला ही पुढे शिकायची इच्छा होती त्यामुळे तिचं एम.ए चं वर्ष सुरू होणार होतं.


   लग्नाला आता अवघे दोन महिने राहिले होते..खरेदीची लगबग सुरू झाली होती..मानपानाच्या साड्या,घरच्यांसाठीचे कपडे,नवरीच्या साड्या तिचे ड्रेसस,दागदागिने सगळ्या लहान सहान गोष्टींची खरेदी सगळे आत बाहेर करत होते..पाहुणे येत होते..काका काकू, आत्या,मामा,मैत्रिणी सगळेच..घर भरलेलं होतं..रोज पंक्ती उठत होत्या सगळे आनंदी होते...तयारी वेगाने होत होती..


   तिचा रूक्वत तयारच होता कारण तिला लहानपणापासूनच विणकाम, भरतकाम, शिवण यांची आवड होती तिने किती तरी मायक्रमच्या वस्तू तिने बनवल्या होत्या..आता फक्त रूक्वताचा फराळ बनायचा बाकी होता तो शेवटच्या आठवडय़ात करायचा असे आईने ठरवले होते.


   रूक्वत म्हणजे मुळात काय तर माहेरहून बारीक सारीक तिच्या घरपयोगी गोष्टी ठेवायच्या आणि तिच्या काही आठवणी त्यात ओवायच्या..पुर्वी बाल विवाह व्हायचे आठ नऊ वर्षांची चिमुकली नवरी होवून जायची..त्यामुळे तिच्या रूक्वतात मातीची भातुकली हमखास असायची..पुढे वयोमर्यादेचा कायदा आला आणि त्या बरोबर रूक्वत ही बदलला..


   आज अनुच्या रूक्वतामध्ये तिने भरलेल्या उशाची कव्हर्स,विणलेली तोरणं, टाॅवेलस ,मायक्रमच्या केलेल्या बास्केटस्,तोरणं,वाॅल हँगिंग.फोटोफ्रेमस् आणि असं बरचं काही होतं..बाबांनी खास तिची लहानपणाची लाकडी भातुकली शोधली होती..त्यांनी तिच्यासाठी घेतलेला छोटासा फ्राॅक देखील ती ठेवणार होती.आणि लेखिका असल्यामुळे तिच्या हस्तलिखित काही कवितांच्या वह्या पण ठेवू असे बाबा म्हणत होते..त्या बरोबर फराळ होताच..


   मंगळसूत्र खरेदी करण्यासाठी सगळेच गेले होते..तिने सुंदर अशी नाजूकशी डिजाइन पसंत केली..त्याच्यासाठी चेन सुध्दा तिनेच निवडली होती..तिचे दागिने आई वहिनी ताई सगळ्यांनी मिळून निवडले होते..तिच्या साड्या बाकी बारीक सारीक गोष्टी सगळ्याची खरेदी झाली होती..


   सगळं अगदी छान चाललं होता.पण अचानक तिला त्या घरात परकेपणा जाणवायला लागला होता तिच्या हक्काच्या घरात पाहूणी झाली होती..सगळे तिची उठबस करत होते..बाबा तर पाण्यापासून ते जेवणाच्या घासापर्यंत तिला भरवत होते..वारंवार त्यांच्या तोंडून एकच वाक्य ऐकायला मिळत होतं,"आता तू दुसर्‍या घरात जाणार आहेस..तू दुसर्‍याची होणार आहेस आता त्यांचा जास्त हक्क असेल तुझ्यावर.पुन्हा कधी दोन घास भरवू शकेन असं वाटत नाही.." त्यांचे हे शब्द घणासारखे तिच्या जिव्हारी लागत होते.आज तिला वाटत होतं आपल्याला एखादा भाऊ असता तर किती छान झालं असतं आपल्या नंतर त्याने आई बाबांना सांभाळलं असतं.आता आपण इथे नसणार त्यांच कसं होईल? कोण आईची औषध देईल कोण बाबांचे पाय चेपून देईल..असे अनेक विचार तिच्या मनाला सतावत होते..


   पुन्हा पुन्हा ती घरभर फिरत होती.याच घरात तिचं वीस बावीस वर्षाचं आयुष्य गेलं होतं.कोपऱ्या कोपर्‍यातल्या तिच्या लहान लहान आठवणी जाग्या होत होत्या..घरी कधीतरी एकटीच असताना किचनमध्ये केलेले प्रयोग कधीतरी फसलेले तर कधी फक्कड झालेला बेत..लहानपणी अभ्यासासाठी पडलेला ओरडा कधीतरी पडलेला मार..आज तिला आठवत होता.रात्र रात्र बोर्डाच्या परीक्षांचा केलेला अभ्यास...बाल्कनीत मारलेल्या निकालाच्या दिवशीच्या त्या अस्वस्थ फेऱ्या..सगळचं आठवत होतं तिला.आई बाबा कुठून तरी आले होते आणि ती एकटीच होती घरी..तेव्हा बाबा म्हणाले,"अगं किती तो घरकोंबडेपणा..बाहेर येत जा की आमच्या सोबत.." तेव्हा घरच्या भिंतीला मिठी मारत ती म्हणाली होती,"मी माझ्या घराला सोडून कुठेच जाणार नाही.." आणि आज त्याच घरात ती काही दिवसांची पाहुणी म्हणून वावरत होती.रात्री आपल्या वेदनांना तिने उशीवर वाट मोकळी करून दिली...


   लग्न चार दिवसांवर आलं होतं.आज तिच्या मेहंदीचा कार्यक्रम होता.तिच्या हातावर तिची ताईच मेहंदी रेखाटणार होती. संध्याकाळ झाली मैत्रीणीं जमल्या.बायका हसत खेळत सार्‍या कार्यक्रमात वावरत होत्या..तिच्या हातावर त्याचं नाव 'मुकुंदा' असं कोरलं होतं.तिच्या ह्रदयात कोरलेलं नाव आज हातावरच्या मेहंदीत उतरलं होतं. तेवढ्यात तिचा फोन खणखणला..त्याचाच फोन होता.कोणीतरी आणून दिला.पण दोन्ही हातांना मेहंदी असल्याने ती उचलू शकत नव्हती.समोर बसलेल्या मैत्रीणींने फोन चालू करून स्पीकर वर ठेवला.आणि त्याचा आवाज आला, "राणीसरकार, आटोपली का मेहंदी..आणि हो माझं नाव कोरलयं ना त्यात नाहीतर विसराल.." ह्या त्याच्या वाक्यावर सार्‍याजणी हसल्या.तिला अगदी ओशाळल्या सारखं झालं..ती गडबडून म्हणाली,"अहो, काय हे..जरा थांबायचं म्हणून नाही. चालू आहे मेहंदी काढणं झालं की फोन करते नंतर..ठेवा आता." तेवढ्यात समोरून विश्वा बोलली,"काय हो हे सर. तुमच्या राणीसरकार आमच्या पण सखी आहेत म्हटलं जरा रमू द्या की त्यांना आमच्यात हे दोन दिवस.आणि हो तिच्या ह्रदयातच तुमचं नाव कोरलयं म्हणून मेहंदीत करण्याची मेहनत आम्ही ही घेतलीय बरं.घाबरू नका..." "सालीसाहिबा, आपली आज्ञा शिरसावंद्य बरं.दोन दिवस आमच्या राणीसरकार तुमच्या असतील..पण फक्त अठ्ठेचाळीस तास..तिसर्‍या दिवसापासून त्या कायमच्या आमच्या असतील..कबूल..??" तो मिश्कीलपणे म्हणाला.."कबूल आहे भाऊजी.."विश्वा हसत म्हणाली आणि फोन कट झाला..अर्ध्या तासाने हातांपायावरची मेहंदी पुर्ण झाली.रात्री झोपेपर्यंत मेहंदी सुकली होती.ताईने साखरेचं पाणी लावलं आणि प्लास्टिक पिशव्या बांधून तिला झोपवलं.अगदी जय्यत ताफा होता ताईचा...!!! 


    सकाळ झाली..सकाळीच तिने मेहंदी धुतली.अगदी छान रंगली होती..त्या रंगातून त्याचं स्वतः पेक्षा जास्त तिच्यावर असलेलं प्रेम प्रकट होत होतं.आज चुडा भरायचा होता. त्यानंतर दिवा लावणार होते.चार वाजेपर्यंत कासार आला होता.ते एक म्हातार बाबा होते..चहापाणी झाल्यावर त्यांनी चुडा भरायला सुरूवात केली..आपले एक एक अनुभव सांगत ते हळूवारपणे एक एक बांगडी भरत होते..तिचा चुडा भरून झाल्यावर घरातल्या इतर बायकांनी ही बांगड्या भरून घेतल्या..हा कार्यक्रम आटपेपर्यंत सहा वाजले होते..


   सात वाजता दिवा लावणार होते.तर जाणत्या बायकांच्या व्होवयांना सुरवात झाली होती.'व्होवयो' म्हणजे पाच सवाष्णींनी पाच प्रकारचं धान्य उखळीत कुटताना गायलेल्या ओव्या..सात वाजता तिने दिव्याची पूजा केली आणि दिवा दाखवला.दिवा म्हणजे पाच सवाष्णींनी आणि नवरीने मिळून त्या मांडवात दिवा दाखवायचा जिथे दुसर्‍या दिवशी हळद होणार आहे..यानंतर तिला आता कुठेही घरा बाहेर पडता येणार नव्हतं.त्याला ही ती थेट लग्न मांडवात भेटणार होती. 


   तिचं कपाट,पलंग आणि बाकी सामान त्याच्या नव्या काणक्याच्या घरी पोहचलं होतं.त्याच्या घरीसुद्धा गडबड चालू होती.त्याच्या रूममधला पलंग

खालच्या रूममध्ये शिफ्ट करण्यात आला होता..तिचं कपाट त्याच्या खोलीत ठेवलं होतं.सगळं कार्य त्याच्या मुळ जून्या घरी पार्शेला पार पडत होतं..तिथे त्याचे धाकटे काका आणि त्यांचं कुटुंब रहायचं..सगळे सण तिथेच साजरे व्हायचे.त्याच्या काकांना एक मुलगा होता.त्याचं लग्न झालं होतं..ह्याचं लग्न शेवटचं असल्याने बरीच धामधूम होती. दारात हळदीसाठी मांडव सजला होता.


   हळदीच्या दिवस उगवला तोच मुळी गडबड गोंधळ घेऊन..आज सगळे पाहुणे जमलेले.दोन रात्री जागून केलेला रूक्वताचा फराळ सगळ्या बायका पॅक करत होत्या. संध्याकाळी सात वाजता हळद सुरू होणार होती..दिवसभर बाबा सगळं नीट झालयं ना काही राहिलं तर नाही ना याची खात्री करून घेत होते..पुन्हा पुन्हा सगळ्यांना सुचना देत होते..उद्याला हाॅलवर न्यायच्या सामानाची यादी तयार करून चेक करत होते.राहिलेले सामान भरत होते.गावातले सगळेच होतेच की मदतीला.घरात बायका आणि बाहेर सारे पुरूष मिळून कामाला लागले होते..गावात हे चांगलं असतं कोणतंही कार्य असलं तर सगळे हेवेदावे विसरून आपल्याच घरातलं कार्य असल्यासारखे वावरतात.दिवस असाच गडबडीत गेला.


   सात वाजता तिच्या अंगाला हळद लागली..पिवळ्या रंगाची साडी आणि वहिनींनी स्पेशल केलेले फुलांचे दागिने घालून ती बसली होती..घरात ही एकमेकांना हळद लावली जात होती.साडेसात वाजता त्याची उष्टी हळद घेऊन त्याचा दादा आला..ती ही तिला लावण्यात आली..तिची उष्टी हळद घेऊन तिचा चुलत भाऊ त्याच्या घरी गेला. एकमेकांना एकमेकांच्या नावाची उष्टी हळद लागली..भटजींनी हळकुंड बांधले..हळद आटोपली.तिला घेऊन बायका नीम बांधलेल्या ठिकाणी घेऊन आल्या..नीम म्हणजे चौकोनी आकाराचे सूत बांधणे ज्यात हळदी नंतर वधूला आत बसवून आंघोळ घातली जाते..तिला आत बसवलं. तिची आत्या तुळशीजवळचा पुजा केलेला तांब्या घेऊन आली..त्यातलं पाणी तिच्या डोक्यावरून खाली ओघळलं आणि तिचा नीम उतरला.गोव्यात लग्नाआधी मुलीला 'निम्या' म्हणजेच कुमारी म्हटलं जातं. हळदीअगोदर विधिवत् पुजा केलेल्या या तांब्यातलं पाणी तिच्या डोक्यावरून सोडलं म्हणजे ती मुलगी बाई बनते असं मानलं जातं.ह्या विधी नंतर ती आंघोळ करून आली..सुंदर पोपटी साडी नेसून ती आली आणि ओटी भरण्याचा कार्यक्रम सुरू झाला..रात्री नऊ वाजेपर्यंत सगळं आटोपलं..पुन्हा एकदा सगळं चेक करून सगळे झोपले..


    पण तिला मात्र झोप लागत नव्हती.आजची रात्र तिची तिच्या घरातली शेवटची हक्काची रात्र होती.यानंतर ती चार दोन दिवसांसाठी माहेरवाशीण म्हणून येणार होती.पुन्हा सगळं पुर्वायुष्य आठवत तिला कधीतरी झोप लागली..


    आणि.............तो दिवस उजाडला ज्याची ते दोघे आतुरतेने वाट पाहत होते..चार वर्षानी शेवटी ते सप्तपदीच्या बंधनात अडकणार होते.तो दिवस होता...गुरुवार दि 14 मे 2018. मुहूर्त दुपारी एक दहा चा होता.. सकाळी नऊ वाजता तिच्या घरचे सगळे बोडगेश्वर संस्थान म्हापसा या हाॅल वर पोहचले होते..तिला नारंगी रंगाची नऊवारी नेसवून आणि केस नीट विंचरून हाॅलवर आणली होती..बाकी तिची तयारी ताईने तासभर लागून हाॅलच्या रूमवरच केली होती..भटजीबुवा येऊन विधींची तयारी करत होते.त्यानंतर तो व त्याचे घरचे आले..आज तो ही अगदी राजबिंडा दिसत होता..या तीन वर्षांत त्याचं सडपातळ शरीर छान भरलं होतं..त्यामुळे आज तो अगदी भरदार वाटत होता.तो पांढरा कुर्ता आणि नारंगी धोतर नेसला होता.तिच्या आईने ओवाळून त्याला आत घेतलं...जरा वेळाने विधी सुरू झाले.ती ही गौरीहार पुजायला बसली..'माझा संसार तुझ्या आर्शीवादाने सुखाचा होऊ देत.सगळ्या सुख दुखांच्या परिस्थितींना तोंड देण्याचं बळ मला दे..माझ्या घरच्या सगळ्यांना सुखी ठेव' अशी मनोमन प्रार्थना ती करत होती..


    तेवढ्यात भटजींचा आवाज आला,"वधूच्या मामांनी वधूला घेऊन या..." आणि नववधूचे तेज मुखी घेऊन,उरात होणारी अनामिक हुरहुर,तिच्या ह्रदयाची धडधड वाढली वाढली होती,नव्या उमेदीने ती बोहल्यावर चढली..समोर अंतरपाटाआड तो उभा होता..भटजी मंत्र म्हणत होते.दोघांच्या डोक्यावर अक्षता पडत होत्या.अंतरपाट हटला आणि पवित्र अग्नि समोर आणि सर्वांच्या साक्षीने दोघांनाही एकमेकांना माळा घातल्या..बाबा कन्यादानासाठी पुढे आले.तो विधी पार पडताच त्याने तिच्या भांगेत कुंकू भरले आणि गळ्यात मंगळसूत्र बांधले.तिची करवली ताई होती तर त्याची करवली वहिनी होत्या..त्यांची गाठ वहिनींनी बांधली..नंतर दोघे सप्तपदी साठी उभे राहिले.त्याने तिचा हात हातात घेतला..दोघे एकमेकांच्या साथीने सप्तपदी चालले..दोघे जन्मोजन्मीच्या नात्याच्या बंधनात बांधले गेले.त्याच्यासमोर तांदुळ भरलं ताट भटजींनी ठेवलं..त्यावर त्याने 'अनूराधा' असं नाव कोरलं..नंतर इतर विधी झाले.लग्न सुरळीत पार पडलं..आता ती चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी नसून सौभाग्यवती झाली होती..तिच्या नावापुढे आता त्याचं नाव लागणार होतं 'सौ.अनूराधा मुकुंद बर्वे'...


   दोघे कपडे बदलण्यासाठी आपापल्या खोल्यांमधे गेले कारण आता भेटवस्तू देण्याची लगबग सुरू होणार होती.तिच्यासाठी त्याने निवडलेला खास राणी रंगाचा शालू ती नेसली..ज्वेलरीचा सेट बदलला..त्यानेही सगळ्या विधींमध्ये तिला मॅचिंग केल होतं आताही तो त्याच रंगाचा कुर्ता घालून तयार झाला.दोघे पटकन बाहेर आले.दोन अडीच तासात तो ही कार्यक्रम आटोपला नंतर दोघे आणि ककुटुंबीय जेवायला बसले.त्यांनी एकमेकांना घास भरवला.जेवणे आटोपली...


    गर्दी एव्हाना कमी झाली होती.आता हाॅलवर मोजकीच माणसे होती..दोघांचे कुटुंब,काही नातेवाईक, आणि काही जवळचे मित्र-मैत्रिणी...आणि आता क्षण आला होता तो 'पाठवणीचा'.. तिच्या डोळ्यातून गंगा यमुना वाहू लागल्या होत्या...बाबांना मिठी मारून रडत होती पुन्हा स्वतःची काळजी घ्या..माझी काळजी करू नका असं सांगत होती..बाबा ही तिच्या पाठीवरून हात फिरवत होते.सगळेच हळवे झाले होते. शेवटी बाबा तिचा हात त्याच्या हातात देत म्हणाले,"जावईबापू माझी छोटीशी चिऊताई तुमच्या स्वाधीन करतोय..आजवर तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलयं तिला..काळजी घ्या तिची.काही चूकभूल झाली तर पोटात घ्या..एकमेकांची साथ कधी सोडू नका..सुखाने संसार करा.."एवढं बोलून बाबांनी डोळे पुसले.तो बाबांना आश्वासक स्वरात म्हणाला,"बाबा काळजी करू नका..आजपासून तिची आणि तुमची जबाबदारी माझी..कारण तिचे आईबाबा आणि माझे आईबाबा असा फरक मी करणार नाही.आजपासून मीच तुमचा मुलगा.काही लागलं तर अर्ध्या रात्री सुध्दा मला फोन करा.....आणि हो मलाच करा कारण आमच्या सौभाग्यवतीनी एकदा का बेडवर पाठ टेकली म्हणजे तिला थेट दुसर्‍या दिवशी सकाळी गजराच्या आवाजाने जाग येते हे माहितीये बरं मला...."वातावरण हलकं करण्यासाठी त्याने विनोद केला..सगळ्यांच्या तोंडावर हास्याची लकेर उमटली...एव्हाना सगळे सामान टेम्पोमध्ये भरले होते..सगळे हाॅल बाहेर आले..दोघे गाडीत बसले.सगळ्या गाड्या एकमेकांच्या विरूद्ध दिशांना निघून गेल्या....


    हा होता त्यांचा लग्नानंतरचा पहिला प्रवास...आई आणि वहिनी दोन्ही बाजूंनी बसल्या होत्या आणि हे दोघे मध्ये बसले होते.आई आणि वहिनी पुढच्या विधींच्या विषयी बोलत होत्या तर तो तिचा हात हातात घेऊ पाहत होता आणि ती पुन्हा पुन्हा हात सोडवून घेत होती..तेवढ्यात खोटं खोटं खाकरत वहिनी म्हणाल्या, " आम्हाला पण कळतं हं जाऊबाई काय चाललंय ते..बांगड्यांची किणकिण आमच्या पण कानी येते म्हटलं,काय ओ भाऊजी.."वहिनींनी असं म्हणताच तिला जरा लाजल्यासारखं झालं "काय रे मुकुंदा किती तो उतावीळपणा..बसू दे ना बिचारीला स्वस्थ जरा..थकलीय बघ किती ती..ते नाही तुझं आपलं काही तरी वेगळचं.." असं म्हणत आईंनी दुजोरा दिला..तसा तो जरासा खट्टू झाला "बरं आई..साॅरी..." असं म्हणत त्याने मान सीटवर रेलत डोळे मिटले.."गंमत केली भाऊजी..मनावर नका घेऊ.." वहिनी हसत म्हणाल्य..त्याने नुसता हुंकार दिला.."राग नाकाच्या शेंड्यावर आहे नुसता" असं म्हणत आईने त्याचं नाक ओढलं..तिला ही कळलं होतं की त्याला राग आलाय म्हणून..


    अर्ध्या पाऊण तासात गाडी गावातल्या देवळासमोर थांबली..त्यांनी आत जाऊन देवीचं दर्शन घेतलं.आणि देवळापासून ते घरापर्यंत वाजत -गाजत वरात निघाली..घरी पोहचले तोपर्यंत आई आणि वहिनींनी गृहप्रवेशाची सगळी तयारी करुन ठेवली होती.तांदुळ भरून माप उंबरठ्यावर ठेवलं होतं.ते दोघे दारासमोर उभे होते..आईनी ओवाळलं आणि तिला माप ओलांडून आत यायला सांगत होत्या तेवढ्यात मागून आवाज आला "उखाणा घ्यायला सांगा आधी.." "अनू घे बाई उखाणा.." आई म्हणाल्या."चंद्र सूर्याच्या गावी नव्हते दिवे

पती म्हणून जन्मोजन्मी मला मुकुंदरावच हवे.." असा सुंदर उखाणा तिने घेतला आणि माप ओलांडून आत आली..


   त्याचं घर माणसांनी गजबजलेलं होतं..सगळे फ्रेश होऊन आल्यावर ओळखी झाल्या..थोरा-मोठांच्या पाया पडून झालं..तिने आई बाबांना फोन करून सुखरूप पोहचल्याचं कळवलं..तिचं सामान परस्पर नव्या घरी गेलं होतं.सोबत त्याचा दादा गेला होता..त्या रात्री 'धयामेळा' म्हणजेच वराच्या घरी लग्नादिवशी घालण्यात येणारं गावजेवण होतं.सगळं उरकता उरकता उशीर झाला.झोपायला एक वाजला..आज ती आई आणि वहिनींकडे झोपणार होती..तिला साडीत झोपणं जरा अवघड जात होतं आईनी तशी तिला सूट दिली होती की तिला हवं तर ती ड्रेस घालून झोपू शकते पण तिच नको म्हणाली..मध्यरात्री कधी तरी तिला झोप लागली..


    दुसर्‍या दिवशी सकाळी तिला लवकर जाग आली..अनोळखी जागा होती ना त्यामुळे..ती उठली फ्रेश झाली..आंघोळ करून किचनमध्ये आली..सगळ्या बायका नाश्त्याची तयारी करत होत्या.ती कामाला हात घालणार एवढ्यात काकी म्हणाल्या,"बाय नको तू नको करू काही तशी प्रथा आहे..नव्या नवरीने पाच दिवस काम करायचं नसतं.." मग ती गप्पच बसली.आईंना तिची व्यथा कळाली त्या हसत म्हणाल्या," आमच्या सुनबाईंना स्वस्थ बसवत नाही.." तिच्या हातात चहाचा कप देत म्हणाल्या,"घ्या आज आपल्या पतीदेवांना आपणच चहा देऊन या.."तिने खोली विचारून घेतली आणि जायला वळली.."चहा द्या पण दुरूनच हो..पुजा व्हायची आहे अजून.." मागून कुणीतरी खट्याळपणे म्हणालं.


   तिने खोली शोधून काढली आणि आत आली..तो अजून झोपलाच होता.दादा नुकताच उठला होता..तिला बघताच तो बाहेर निघून गेला आणि दार ओढून घेतलं.तिने चहाचा कप टेबलवर ठेवला आणि त्याला उठण्यासाठी त्याच्या जवळ गेली.तो झोपेत एखाद्या लहान मुलासारखा दिसत होता.तिने आपल्या ओल्या केसांचं पाणी त्याच्यावर शिंपडलं आणि कानापाशी बांगड्या वाजवल्या..त्याने डोळे उघडले आणि क्षणभर तिला पाहतच राहिला..साडी नेसलेली,चुडा भरल्या हातानी ओलेते केस पुसणारी,त्याच्या नावाचं कुंकू लावलेली,हातावर त्याच्या नावाची मेहंदी रेखाटलेली आणि गळ्यात त्याच्या नावाचं मंगळसूत्र घालून आज त्याची प्रेयसी त्याच्या पत्नीच्या रूपात उभी होती..


   "काय बघताय असे..अहो उठा आता.चहा आणलाय पिऊन घ्या गार होईल नाहीतर.."ती चादरीची घडी घालत बोलत होती..तरी तो ढिम्म जागचा हलला नाही..तसाच झोपून म्हणाला,"ए बायको हात दे ना.." तिने हात पुढे केला आणि तिला त्याने खेचलं..बेसावध ती त्याच्यावर कोसळली.."अहो काय हा बालिशपणा..तुम्ही पण ना अगदी लहान मुलासारखं करता.."असं म्हणत ती कशी बशी उठून बसली..ह्या गडबडीत तिचा पदर घसरून त्याच्या अंगाखाली गेला होता..ती तो सावरण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत होती..पण हा उठायला काही तयार नव्हता.."असं काय करताय..उठा ना..तोंड धुवून घ्या आणि चहा प्या..सोडा ना पदर प्लीज.." ती गयावया करत होती..तो हसत म्हणाला,"हा कालचा गाडीमधला बदला आहे..कळलं..???"असं म्हणत त्याने अजून अंगाभोवती तो पदर गुंडाळला.शेवटी तिने खेचून पदर घेतला.तो तोंड धुवून आला."अहो, चहा गार झालाय मी गरम करून आणते.." असं म्हणत ती कप घेणार तेवढ्यात त्याने तिला पाठून मिठी मारली "नको ना तू जाऊस बाहेर..आजच्या दिवशी चालेल मला थंड चहा."असं म्हणत त्याने एका घोटात चहा संपवला..तो तिचा मुका घेणार ऐवढ्यात ती त्याच्या हातातला कप घेऊन त्याच्या मिठीतून निसटली.ती थेट किचनमध्ये आली..तिचा तो अवतार पाहून सगळ्याच हसू लागल्या."भावजींचा चहा जरा जास्तच गोड झालेला दिसतोय.." वहिनी तिला चिडवत म्हणाल्या..तिने कप तिथेच ठेवला आणि आणि लाजून आतल्या खोलीत पळाली..


     नाश्ता झाल्यावर तुळशीसमोर हळकुंड सोडण्याचा विधी झाला..संध्याकाळची सत्यनारायणाची पुजा देखील निर्विघ्न पार पडली.मधले चार दिवस एका घरात असून देखील तिला स्पर्श करणं सोडाच भेटणंही शक्य झालं नाही त्याला.जेव्हा जेव्हा तो तसा प्रयत्न करायचा तेव्हा तिला ती बायकांच्या गराड्यात सापडायची आणि त्याला काही करता येत नसायचं...पाच दिवसांनी 'पाचपरतावन' म्हणजे वधूच्या घरी वराच्या घरच्यांना आणि वधूच्या गावातल्यांना घालण्यात येणारं जेवणं..तो विधी ही व्यवस्थित पार पडला...आणि त्यांचं कुटुंब म्हापशाच्या घरी परतलं...


   तो दिवस सगळं आवरण्यात आणि साफसफाई करण्यात गेला..संध्याकाळपर्यंत सगळे स्थिरावले.दादा आणि वहिनींनी त्यांची खोली छान मोगर्‍याच्या फुलांनी सजवली होती..कारण आज त्यांची पहिली रात्र होती.गप्पा मारत संध्याकाळी सरली..रात्र झाली...सगळेच थकले होते त्यामुळे लवकरच आपापल्या रूममध्ये गेले..


   तो आधीच रूममध्ये गेला होता.ती दार उघडून आली आणि दार लावून घेतलं तिच्या पायातल्याची रूणझूण ऐकून तो कुशीवर वळला..ती ड्रेसिंग टेबल समोर बसून सगळे दागिने काढून ठेवत होती आणि तो तिला न्याहाळत होता.दागिने कपटात ठेवण्यासाठी ती वळली तेव्हा तिची नजर त्याच्या कडे गेली.."अय्या सर तुम्ही जागे आहात मला वाटलं झोपलात.." असं म्हणत तिने दागिने कपाटात ठेवले आणि ती बेडवर येऊन बसली.हातात चुडा,नेसलेली साडी आणि गळ्यातलं मंगळसूत्र एवढचं होतं तिच्या अंगावर..त्याने लाईट मालवली.आणि छोटा निळा बल्ब पेटवला त्याचा मंद प्रकाश खोलीत पसरला.ती ही बाजूला झोपली..पण दोघे अंतर राखून झोपले होते..कारण एकमेकांच्या इतक्या जवळ येण्याची ही पहिलीच वेळ.दोघांच्या मनात अनेक विचार येऊन जात होते.एकमेकांच्या ह्रदयाचे ठोके एकमेकांना ऐकू जातील का याचाच जणू दोघे विचार करत होते..ऐरवी कितींदा तरी स्पर्श झाला होता त्यांचा एकमेकांना पण आजचा स्पर्श विशेष होता..


    साधारण अर्ध्या तासाने त्याच्या लक्षात आलं की ती पुन्हा पुन्हा कूस बदलतेय.त्याने न राहून विचारलं,"काही प्राॅब्लम आहे का?" ती उठून बसत म्हणाली, "मला साडीत झोपायची सवय नाहीये ना..त्यामुळे झोप येत नाहीये."असं म्हणून ती उठली आणि तिने सेफ्टी पिनस् काढून ठेवल्या.साडी जराशी सैल व्हावी म्हणून....ती झोपणार एवढ्यात तो समोर उभा राहिला..तिने नजर चोरली.त्याने थेट पदराला हात घातला.ती पदर पकडत पटकन पाठमोरी वळली..त्याने हळू तिला जवळ ओढलं..ओठांवर ओठ टेकले आणि दिर्घ चुंबन घेतलं.हळू हळू वस्त्रे अंगावरून विलग होत गेली.दोघे उत्तेजित झाले..शरीराचा रोम रोम फुलला.दोघे आता वस्त्र विरहित पलंगावर होते.ती डोळे मिटून पडून राहिली.तो बेभान झाला होता.रात्र धुंद होत होती..दोघे एक होत होते..चार वर्ष ठेवलेला संयम आज उत्तेजनातून निघत होता..दोघांचे श्वास एकमेकांत मिसळत होते..वेदनेबरोबर तिच्या तोंडून निघणाऱे हुंकार हवेत विरून जात होते.शेवटी तो शांत झाला..ती उठून कशी बशी बाथरूम मध्ये शिरली आणि शाॅवर चालू केला..मांड्या विलग होताच तिला जोराची कळ आली ती अगदी डोक्यात गेली.त्याबरोबर ती अगदी कळवळली.पाण्याबरोबर खाली ठिबकणारं रक्त तिचं कौमार्य भंग झाल्याची साक्ष देत होतं...ती हळू चालत बाथरूम बाहेर आली आणि तसचं तिने बेडवर अंग टाकलं..थकव्यामुळे आणि वेदनेने तिला लगेच झोप लागली...


    दुसर्‍या दिवशी वहिनींच्या हाकेने त्यांना जाग आली.दोघे एकमेकांच्या बाहूपाशात होते.तिने आतूनच "येते " असं सांगितलं..चादर बाजूला सारून ती बाथरूम मध्ये आंघोळीसाठी गेली आणि आवरून खाली आली..तिला चालायला जरासा त्रास होत होता..संध्याकाळी वहिनींनी तिला त्यावरचा उपाय सांगितला.गरमीमुळे त्याने अंगावरचं टीशर्ट काढलं तेव्हा ती लाजूनच आत गेली सगळे गालातल्या गालात हसत होते..त्याच्या नंतर लक्षात आलं रात्रीच्या घायाळ जखमाचं सगळ्यांना दर्शन होत होतं..त्याने लगेच टीशर्ट अंगात चढवलं आणि तो ही तिच्या मागोमाग आत गेला.ती पॅकिंग करत होती.तो ही तिला मदत करू लागला..रात्री पर्यंत त्याच्या मदतीने तिने सारं पॅकिंग केलं..दोन दिवसांनी ते पेहलगामला हनीमूनसाठी निघणार होते..


   पेहलगाम कश्मीर मधलं थंड हवेचं ठिकाण होतं.बर्फाच्छादित पर्वतरांगामध्ये वसलेलं गाव..तिथल्या टूरिस्टसाठी असलेल्या खास बंगलो क्वार्टर्स मधून बाहेरचं छान विहंगम दृश्य दिसायचं.दोघे दहा दिवस तिथे रहाणार होते..दोघांनी दुपारीच तिथल्या बुक केलेल्या बंगलो मध्ये चेक इन केलं..जेवणं करून जरा आराम केला आणि संध्याकाळी चारच्या आसपास भटकायला बाहेर पडले आणि थेट रात्री हाॅटेलवर परतले.


    ते दहा दिवस त्यांनी खूप धमाल केली..खूप फिरले.सगळ्यांसाठी काही ना काही घेतलं.त्याला ट्रेकिंगचा नाद होता..त्यांनी ट्रेकिंग ही केलं..तिथल्या बर्फात लोळले,खेळले..सगळ्या गमतीजमती कॅमेरात बंद करायला ते विसरले नाहीत.आणि रात्री त्यांच्या एकमेकांच्या बाहूपाशात रंगत होत्या..दोघे एकमेकांचा सहवास एन्जॉय करत होते..दहा दिवस कसे गेले दोघांनाही कळलं नाही..


    घरी आल्यावर सगळ्यांना गिफ्ट्स दिले.ती माहेरीही दोन दिवस राहून आली..बाबांसाठी तिने शाल तर आईला छान पर्स आणली होती.सहा जूनला त्याची हायर सेकेंडरी सुरू होणार होती..तिचं काॅलेज जरा उशीराने म्हणजे अठराला सुरू होणार होतं.ती आता घरी रूळत होती.छोटी विनया आता तीन वर्षाची झाली होती . दिवसभर तिच्या भोवती फिरत असायची..ती अनूला छोटी माँ म्हणायची.आणि वहिनींनी मम्मा म्हणायची..दादांना पप्पा तर मुकुंदाला अण्णा म्हणायची...दिवसभर छोटी माँ हे असं का ते तसं का असे प्रश्न विचारून भंडावून सोडायची..तिच्या प्रश्नांची उत्तरे देता देता तिच्या मागे विनू विनू करून धावता धावता तिला भरवताना झोपवताना दिवस कसा सरायचा तिचं तिला ही कळायचं नाही.तिचं ही सिनीयर केजी वीसला सुरू होणार होतं..


   एक दिवस ती रूम आवरत होती..आणि तेवढ्यात तो आला.."अगं ए ठेव ना ते जरा बाजूला..." असं म्हणत बाजूला बसला.."अहो, तुम्हाला चहा हवा असेल तर वहिनींना सांगा ना प्लीज..खूप मुश्किलीने कपडे सुकलेत.विनू झोपलीय तोपर्यंत घड्या घालून ठेवते नंतर फुरसत नाही मिळायची मला..." ती म्हणाली.."अनू, हल्ली तू अगदी टिपिकल बायको सारखी वागायला लागलीयेस हं..सकाळी उठल्यापासून आई वहिनींसोबत काम काम..उरलेला वेळ विनूच्या मागे..राहिलाच वेळ तर बाबा आणि दादाची कामं.रात्र सोडून माझ्या वाटेला तू कधी येतच नाहीस..हल्ली पूर्वी सारख्या गप्पा पण होत नाहीत आपल्या..नवीन लग्न झालयं ना गं आपलं.."तो थोडासा वैतागून रागातच म्हणाला..तिने हातातला कपडा बाजूला तिने ठेवून त्याचा हात हातात घेतला," अहो, हे बघा तुम्ही तुमच्याच प्रश्नात सारी उत्तर दिलीत की आता आपलं लग्न झालयं..आई आणि वहिनी काम करत असताना मी कशी बसून राहू..??विनूचं म्हणाल तर एवढूसं पोर ते तिचं मन मायेकडे ओढ घेतं ती माया तिला माझ्यात दिसते तर ती येते आणि त्यात राहिले दादा आणि बाबा..तर मला सांगा वहिनी आणि आई नाही का तुमची काळजी घेत..त्यामुळे बाबांची मुलगी आणि दादांची बहिण बनून मला त्यांची काळजी घ्यायला हवी..लग्नापुर्वी माझं जग तुमच्या पुरतं मर्यादित होतं पण आता तसं नाहीये की नाही आता आपल्या कुटुंबाकडे लक्ष देऊन सगळ्यांची काळजी मला घ्यायला नको का?..आणि हो तुमच्या कडे थोडं दुर्लक्ष होतयं माझं त्यासाठी साॅरी.."ती त्याला समजावत म्हणाली आणि तिने कान पकडले.."समजावण्यात मात्र तू वस्ताद आहेस बघ..ते राहू दे.मी बघ तुझ्यासाठी काय आणलयं.."असं म्हणत त्याने तिच्या हातात काही वस्तू दिल्या..तिने पेटी उघडली..त्यात सुंदर अशी चेन होती..अगदी नाजूकशी होती...तिच्या लाॅकेटवर सोन्याचा मोर होता आणि बारकाईने पाहिले तर त्याचा पिसारा मंगळसूत्राच्या काळ्या मण्यांनी सजला होता आणि त्यावर 'म' हे अक्षर कोरलेलं होतं.अगदी युनिक डिजाइन होतं ते.दुसर्‍या बाॅक्स मध्ये एक जाडजूड हिरव्या रंगाचं काचेचं एकच कांकण होतं.आणि शेवटी एक बाॅक्स होता त्यात छान असं घड्याळ होतं..तिने सारं बघून त्याच्याकडे एक प्रश्नार्थक कटाक्ष टाकला..त्याने तिला त्याच्याकडे पाठ करून बसण्याची खूण केली..ती पाठमोरी बसली तशी त्याने तिचं मंगळसूत्र काढून घेतलं आणि ती चेन तिच्या गळ्यात घातली..त्यावर तिची प्रतिक्रिया आली,"अहो काय हे मंगळसूत्र का काढलतं.?" त्यावर तो म्हणाला,"आजपासून हे तुझं मंगळसूत्र..आणि नंतर ही हिरव्या बांगड्या काढून ठेव आणि हे एकच कांकण घाल.." "पण का??" ती गोंधळून म्हणाली..."हे बघ परवापासून तुझं काॅलेज सुरू होतयं..जर तू हिरवा चुडा आणि नाॅर्मल मंगळसूत्र घालून गेलीस तर तिथली मुलं-मुली तुला नावं ठेवतील..कदाचित त्यांच्यात घेणार नाहीत.उगाच तुझं रॅगिंग होईल.मग तुझं लक्ष लागणार नाही..तू तासन् तास रडशील याचा परिणाम तुझ्या अभ्यासावर होईल..मला असं व्हायला नकोय आणि घरच्यांना पण यावर आक्षेप नसावा..कारण वेगळ्या डिजाइचं आहे पण माझ्या नावाचं मंगळसूत्र आहे ते आणि हे हिरवं काकण जाडजूड अशासाठी करून घेतलयं की हातात काकणं राहिल आणि तुला ही ऑकवर्ड वाटणार नाही.." तो अगदी छान समजावून तिला सांगत होता आणि ती एकटक त्याच्या कडे पाहात होती.ती त्याला बिलगली,"किती विचार करता माझा...थँक्यू कुंदा.." तिने ठेवलेलं नवीन नाव त्याला आवडलं..आई आणि वहिनींना पण हि आयडिया आवडली होती..


    सगळ्यांच्या शाळा काॅलेजस् सुरू झाल्या..त्यांचं रूटीन बसलं होतं तो तिला म्हापसा बस स्टँडवर सोडून पुढे जायचा आणि ती बसने पणजीला काॅलेजला जायची.तो दुपारी तीनच्या दरम्यान घरी पोहचायचा ती ही साडेतीन चार वाजता पोहचायची..तिची ताई तिच्या मामांची मुलगी होती तिला काॅलेजला जायला अनुच्या घरून जवळ पडायचं म्हणून ती त्यांच्याकडे रहायची.आठवड्यातून एकदा ती आणि एकदा तो असे आठवड्यातून दोनदा ते तिच्या घरी जाऊन यायचे.तो त्यांना सगळं हवं नको ते बघायचा..चेक अप साठी घेऊन जायचा.त्याने आपल्या शब्द पाळला होता...

दोघे सुखी संसार करत होते..त्यामुळे घरचेही समाधानी होते...

(क्रमशः)


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance