Anu Dessai

Romance Tragedy Others

4.0  

Anu Dessai

Romance Tragedy Others

शेवटची भेट...

शेवटची भेट...

15 mins
471


   "थांब ना अजून थोडा वेळ... "त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत ती म्हणाली..तिला हाताला धरून अलगद उठवत तो म्हणाला, " थोडा वेळ थोडा वेळ करत सुर्यास्त होत आला बघ..चल लवकर घरी पळ बघू..वाट बघत असतील सगळे.. "ती त्याच्या कुशीत शिरत म्हणाली, " राहू दे ना असचं.. "तिच्या त्या बालीश विनंतीला तो नकार देऊ शकला नाही.. पण त्याला स्वतःला आवरायला हवं होतं..त्याने तिला मिठीतून दुर केलं आणि नेहमीप्रमाणे घरामागच्या वडाकडे सोडून आज तो एकदा ही मागे न वळता निघून गेला... 


     ती मागल्या दाराने आत आली आणि सरळ माडीवर गेली तिथे आई घाबरीघुबरी तिचीच वाट बघत होती..ती येताच आईचा जीव भांड्यात पडला "अगं किती वेळ.. आबांना दोन वेळा थांबवलयं मी वर येता येता...चल पटकन तयार हो.." आई एवढं सांगेस्तोवर खालून आबासाहेबांची हाक वजा आज्ञा आली, "सरिता, आटोपलं की नाही तुमचं या लवकर खाली सुमेधाला घेऊन...पाहुणेमंडळी खोळंबलीत.. मुहुर्ताची वेळ टळून चाललीय.. " "हो हो आलेच.."आईनी त्यांच्या हाकेला प्रतिसाद दिला आणि पटकन सुमेधाला तयार केलं आणि खाली हळदीच्या मांडवात घेऊन आल्या...तिला अविनाशची उष्टी हळद लागली...सुमी यंत्रवत खोटं हसू घेऊन नवरी म्हणून सजून बसली होती..एक एक विधी पार पडत होता...तेवढ्यात तिने अंगणाच्या कोपऱ्यात तिला हालचाल जाणवली.. इतक्या लग्नाच्या धामधुमीत फक्त तिलाच तिथं त्याचं अस्तित्व जाणवलं.. तिने मान वर केली आणि लहानपणी तिने हौशीने लावलेल्या बहरलेल्या रातराणीच्या झाडाशेजारी उभ्या असलेल्या त्याच्या नजरेला थेट नजर भिडली...तिच्या डोळ्यात केविलवाणी आर्जव होती तर त्याची नजर तितकीच थंड होती..ऐरवी अशा वेळी तिला हळुवार कुशीत घेऊन समजावणारा तो आज तिला डोळ्यांनीच धीर देत होता..इथे सगळे विधी झाल्यावर ओटी भरण्याचा कार्यक्रम सुरू झाला आणि तिच्या समोर झालेल्या बायकांच्या गर्दीत तो तिच्या डोळ्याआड झाला तो कायमचाच... 


     हळदीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर नाही म्हटलं तरी दुसऱ्या दिवशी लग्न मंडपात न्यायच्या सामानाची, नवरीच्या साजश्रृंगाराचं सामान वेगळं ठेवण्याची त्यात तिचं सासरी पाठवायचं सामान या साऱ्याची बांधाबांध करता करता तशी अर्धी रात्र सरलीच होती... घरच्यांसहीत पाहुणे मंडळी सुध्दा कामात व्यस्त होती...सगळे खूष होते, बोलण्या आवाज, हास्यफवारे सुमीच्या वरच्या खोलीपर्यंत पोहचत होते पण खोलीत मात्र भयाण शांतता होती आणि काळाकुट्ट दाट अंधार पण समोर असलेल्या त्या एकमेव खिडकीतून येणारी चंद्र किरणं अंधाराचा भेद करीत खोलीत शिरत होती..त्यामुळे जरा कुठे खोली उजळू पाहात होती तोच सुमेधाने पडदा ओढून पुन्हा खोलीत अंधार केला.. तेवढ्यात जिन्यात पावलं वाजली, कांकण देखील किणकिणली.. "यावेळी कोण...?? आई किंवा वहिनी असेल मी झोपले की नाही ते पाहायला आली असेल.. " असा विचार करत सुमी लगबगीने येऊन पलंगावर पहुडली आणि तिने पांघरूण डोक्यावर ओढून घेतलं...खोलीचं दार उघडून कोणतरी आत डोकावलं, "आई, वन्स झोपल्या." वहिनीचा आवाज सुमीच्या कानावर पडला... पाठोपाठ दार ढकलण्याचाही आवाज आला सुमेधाला वाटलं वहिनी निघून गेली म्हणून तिने डोक्यावरचं पांघरूण दुर सारलं... तर समोर आई आणि वहिनी दोघी तिच्याकडे भरल्या डोळ्यांनी बघत उभ्या होत्या..वहिनी बाजूला येऊन बसली आणि आई उशाशी..सुमीनं अलगद आईच्या मांडीवर डोकं ठेवलं.. वहिनी तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवत उद्गारली, "माफ कर बाळा, तुझं प्रेम नाही मिळवून देऊ शकलो आम्ही...पण प्रयत्न करत होतो गं दोघी... " "वहिनी,तुम्ही तुमच्या परीने सारं केलतं..आता प्रयत्नांचा काळ सरला...झालं गेलं विसरून जा सारं.. "ती तितक्याच शांततेत म्हणाली.."शेवटचं रडून घे पोरी... "आई केविलवाण्या नजरेनं तिच्याकडे बघत म्हणाली.. " नाही गं आई..रडायचं तोवर रडले आता नाही रडू येत...असो आणि म्हटलं ना मी विसरा मागचं सगळं..चला सकाळी लवकर उठायचयं आणि हसा आता लग्न आहे उद्या माझं... "हे सांगताना तिची नजर निर्विकार होती आणि आवज खोल गेला होता.. आता यावर बोलणार तरी काय..त्या दोघी निमुट तिथून उठून गेल्या... 


      लग्न झालं...सुर्य अस्ताला चालला होता..लग्न समारंभ आटपून सगळ्यांचा निरोप घेऊन आज वऱ्हाडी मंडळी अविनाशच्या गावी त्याच्या घरी रहाणार होती आणि काही दिवसांनी मग अविनाश आणि सुमेधा मुंबईला निघणार होते की मग या गावाशी....माणसांशी संबंध संपला..तो ही कदाचित....कायमचाच...!!! जाता जाता सगळे काहीबाही सांगत होते..आई पोरीला सांभाळा म्हणत रडत होती..वहिनी जप जीवाला म्हणत होती..दादाला या दोघींना आवरता आवरता पुरेवाट झाली होती.आणि आबा...ते दुर उभे राहून आसवं टिपत होते..पण गाडी वळसा घेईपर्यंत तिची नजर मात्र त्या वडामागे उभ्या असलेल्या त्याच्यावर खिळली होती...गाडी वळण घेऊन मुख्य रस्त्याला लागली आणि गाडीत तिच्या नणंदेची थट्टा मस्करी सुरू झाली ती ही त्याला वरवर प्रतिसाद देत होती पण मन मात्र अलगद त्याच्या ओंजळीत ठेवून आली होती.. नुसत्या शरीराने ती त्यांच्यात वावरत होती..शेवटी सगळे विधी व्यवस्थित पार पडले आणि अविनाश बरोबर ती मुंबईला आली..आठवडाभर सगळं उसवत,लावत सेट करत वेळ गेला..हळूहळू स्थिरस्थावर झालं, अशीच एका रात्री ती बेडरूममध्ये आली...अविनाश शांत झोपला होता..खिडकीतून चंद्र प्रकाश त्याच्या चेहऱ्यावर पडत होता, निरागस भाव त्याच्या तोंडावर पसरला होता..तिने क्षणभर त्याला न्याहाळलं आणि ती रूमला लागून असलेल्या बाल्कनीमध्ये उभी राहिली..खाली रस्त्यावर गाड्यांची ये-जा सुरू होती, रस्त्यालागतचे दिवे चकाकत होते, मंद वाऱ्याच्या झुळूकेने पडदे हलत होते, दुर दूरपर्यंत मुंबई नगरी लकाकत होती..पण तिच्यापुढे मात्र तरळत होता भुतकाळ अगदी काल परवा घडून गेल्या सारखा... 


    सुमेधा सर्जेराव शिर्के...डोरली गावाचे सर्वेसर्वा सर्जेराव शिर्क्यांची लेक..सरिताबाई आणि सर्जेरावांचं धाकलं कन्यारत्न..मोठे चिरंजीव संग्रामराव आणि त्यांच्या सौभाग्यवती सुरेखा..असं सुखवस्तू कुटुंब..सर्जेरावांचा साखर कारखान्यांचा व्यवसाय होता..त्याचे हिशोबाचे कामकाज पाहाणारे रामजी नाडकर्णी..कारखान्यात आणि घरी ही येणे-जाणे असायचे..तसे त्यांचे घर ही सर्जेरावांचा वाड्याच्या मागच्या बाजूला होते..त्यांचा एकुलता एक लेक संजीव...संजीव आणि सुमेधा एकाच वयाचे..सोबतच लहानाचे मोठे झाले..लहानपणी हातात हात गुंफून गावभर फिरायचे..नदीकाठी भातुकली मांडायचे...राजा राणी बनुन खरे नवरा बायको असल्यासारखे वागायचे एकमेकांशी...सुमी संजूला खोटं खोटं जेवण करून वाढायची, संजू कामाला शेतात जायचा..ती शेतात शिदोरी घेऊन जायची..दोघे आंब्याच्या झाडाखाली एकमेकांना घास भरवायचे आणि खेळून झाल्यावर नदीच्या काठावर पाण्यात पाय टाकून दोघे झाडांच्या सावलीत बसायचे आणि संजू त्याची बासरी वाजवायचा आणि सुमी मुग्ध होऊन जायचे...कधीकधी दोघांच्यात कट्टी फू व्हायची मग संजू मुरमुरे शेव देऊन मनवायचा आणि सुमी खुदकन हसायची आणि दोघांची पुन्हा गट्टी व्हायची..त्यांची जोडगोळी पाहून गावतली माणसं त्यांना राधाकृष्ण म्हणायची..पुढे बालपण सरलं..शालेय शिक्षण झाल्यावर सर्जेरावांनी काॅलेजच्या शिक्षणासाठी सुमीला तिच्या मामाकडे पुण्याला पाठवून दिलं..संजू गावातच राहिला..तो तालुक्याच्या ठिकाणी काॅलेजला जायला लागला..काही काळापुरता दोघांच्यात दुरावा आला..जाते वेळी संजूने दिलेलं मोरपंख जपत त्यांच्या आठवणीत सुमी दिवस ढकलत होती आणि संजू तिच्या आठवणीत संध्याकाळी नदीकाठी बासरी वाजवायचा..ते दिनवाणे सुर ऐकून ऐकणाऱ्याला अगदी गलबलून यायचं..


    तीन वर्षांचा काळ लोटला..दोघे ग्रॅज्युएट झाले...हळूहळू संजू वडिलांना कामकाजात मदत करू लागला..सोमवारचा दिवस होता, आज सुमी गावाकडे परतणार होती...कायमची..आज संजूचा आनंद गगनात मावत नव्हता..तो शंभू महादेवाला गेला होता..सुमी आली...दुपारी आईच्या हातचे गरमागरम दोन घास पोटात गेले आणि ती विसावली..संध्याकाळी ती स्वयंपाक घरात आली..आई ओट्यापाशी काहीतरी करत होती.. "आई गं, संजू कुठे असतो गं..भेटीन म्हणते त्याला.. " ती पाठून आईच्या गळ्यात हात घालत म्हणाली.."संजू ना..तु झोपली होतीस तेव्हा येऊन गेला..आलीस का म्हणून विचारत होता..आता उन्हं कलली म्हणजे तो असेल त्याच्या नेहमीच्या ठिकाणी..त्याच्या प्रेयसी सोबत..नदीकाठी.." "प्रेयसी...?? " तो शब्द ऐकताच सुमीचा चेहरा खर्रकन उतरला.."अगं प्रेयसी म्हणजे त्याची ती जीवलग बासरी.. "आई हसत म्हणाली आणि तिने निश्वास सोडला आणि येते गं म्हणत बाहेर पडली..फिरकी घेताना लेकीच्या मनातलं तिला न उमगलेलं गुपित आईच्या नजरेने अचूक टिपलं होतं..त्याच्यासाठी आणलेल्या शर्टाची पिशवी घेऊन ती बाहेर पडली आणि नदीच्या दिशेने चालू लागली..आता नदी नजरेच्या टप्प्यात आली होती..तो नदीच्या पाण्यात पाय घालून बसला होता आणि बासरी वाजवत होता..तिचे सुर तिच्यापर्यंत पोहचत होते आणि ती अनामिक ओढीने त्याच्याकडे ओढली जात होती..


     ती झपझप पावले टाकत त्याच्या दिशेने निघाली..तितक्यात तिला ठेच लागली आणि हातातली पिशवी खाली पडली..ती उचलून पुन्हा ती त्याच्या दिशेने वळणार तोच तिने पाहिलं तो तिथे नव्हता..ती धावतच तिथे पोहचली तिने त्याला सगळीकडे शोधलं,पण तो कुठेच दिसला नाही.. "अरे आताच तर इथे होता.. कुठे गेला..?? " ती स्वतःशीच पुटपुटली तोच पाठून त्याने तिचे डोळे धरले..त्याचा हात सोडवत ती लटक्याने त्याला मारत रागवली.. "हे काही वागणं झालं का..एकतर इतक्या दिवसांनी भेटतोय आणि अशी मस्करी करतंं का कोणी..?? " असं म्हणत ती आंब्याच्या सावलीत जाऊन बसली.. "अरे अशी रागवतेस का..गंमत केली मी..आणि मी गेलो नसतो तर हे कसं आणलं असतं तुझ्यासाठी..."असं म्हणत त्याने सुरंगीचा गजरा तिच्यापुढे धरला.. "अय्या सुरंगी..तुला अजूनही आठवतं मला ही आवडते ते.."असं म्हणत तिने ओंजळीत धरून वास घेतला आणि त्याने तो अलगद तिच्या केसात माळला..तिचा रूसवा क्षणात मावळला..तिने खास त्याच्यासाठी आणलेला शर्ट त्याच्यापुढे धरला त्याने तो बाहेर काढून पाहिला आणि तो खूप खुष झाला..त्याच्या राधेचा इवला देह आता रेखीव बांधा झाला होता,केस रेशमी लांबसडक वेणी जमिनीवर पडली होती,गोरा वर्ण खुलला होता त्यात गालावरची खळी खोल पडु लागली होती..तिचा श्याम सुध्दा रांगडा गडी झाला होता,लहानपणीचे कोवळे हात तिला संकटापासून वाचवण्याइतके समर्थ झाले होते..त्यांनी तीन वर्षांच्या राहिलेल्या मनसोक्त गप्पा मारल्या आणि तास दोन तासांनी आपापल्या घरी परतले..

  

   काही महिन्यांनी तिच्या दादाचं लग्न ठरलं..सगळीकडे आनंदी वातावरण होतं..लग्नसराईत सगळे सामील झाले..तो सुध्दा घरचं कार्य असल्यासारखा राबला..पाहुण्यांनी घर गजबजलं आणि लग्न व्यवस्थित पार पडलं..वहिनी घरात आली आणि तिला खूश ठेवण्याची जबाबदारी दादाने सुमीला दिली आणि सुमीने ही ती आनंदाने स्विकारली..तिची वहिनी जवळपास तिच्याच वयाची असल्याने त्यांचं लगेच सुत जुळलं आणि दोघी एकमेकींच्या जीवलग झाल्या इतक्या की एकमेकींशिवाय त्यांचं पान सुध्दा हलत नव्हतं..काही काळ लोटला..संजू सुमीचं नातं ही खेळीमेळीने घट्ट होत होतं आणि एक दिवस संजूने सुमी जवळ आपल्या प्रेमाची कबुली दिली, तिने ही लगेच होकार दिला..सुमीने घरी आई आणि वहिनीला याची कल्पना दिली त्या दोघींना संजू पसंत होता वहिनीने दादाला सांगितलं त्याला ही बहिणीची निवड आवडली..पण प्रश्न होता आबांचा..ते काय म्हणतील, होतील का तयार..??पण ते सगळं भविष्याच्या गर्भात दडलं होतं..एक दिवस अशीच संजूच्या खांद्यावर डोकं ठेवून नदीकाठी बसलेली असताना आबांनी तिला पाहिली आणि त्यांच्या रागाचा पारा चढला...कधी साधं नख सुध्दा न ओरबाडलेल्या त्या फुलासारख्या आपल्या लेकीला त्या दिवशी त्यांनी चक्क चाबकाने फटकावून काढलं शेवटी दादाने तिला काढून घेतलं आणि वहिनी तिला घेऊन तिच्या रूममध्ये गेली...आई आणि दादाने बोलण्याचा प्रयत्न केला त्यांना खूप समजावलं पण ते तयार झाले नाहीत..आपल्या हाताखाली काम करणाऱ्याच्या मुलाशी आपल्या मुलीने लग्न करणं त्यांना पसंत नव्हतं...आपली प्रतिष्ठा त्यांना प्राणापलिकडे प्रिय होती.. 

    दुसऱ्या दिवशीपासून सगळं वातावरण बदललं,सर्जेरावांनी सुमीला खोलीत कोंडलं वहिनी आणि आई जायच्या तिला जेवण द्यायला..तिच्या सुकुमार देहावरच्या जखमा अजून भरल्या नव्हत्या.. संजूला ही एव्हाना सगळं कळलं होतं त्याच्या घरी सुध्दा त्यांच्या नात्याबद्दल माहित होतं म्हणून झाल्या प्रकाराने सारे हळहळत होते..रामजीनी सर्जेरावांचे पाय धरले आणि जुना जाणता विश्वासू माणूस म्हणून त्यांची नोकरी वाचली..आठवडा सरला..घरात तणाव कायम होता..संजू येऊन काम करून जात होता, वहिनी कधी तरी संधी साधून पाच दोन मिनटं त्या दोघांना भेटवत होती..एक दिवस सर्जेराव पुण्याला गेले होते,संधी पाहून वहिनी आणि आईने सुमीला खोलीतून बाहेर काढलं संजूला निरोप धाडला..दोघे भेटले नदीकाठी..तिच्या हातात बॅग आणि त्याच्या हातात चाफ्याचं रोप..ते पाहून ती अगदी चक्रावली.."संजू काय हे..?? आबा घरी नाहीत चल जाऊ इथून दूर जिथे कोणीही आपल्या प्रेमाच्याआड येणार नाही..तू नेशील तिथे येईन मी..चल.. "ती कळवळून म्हणाली..हातातलं रोप खाली ठेवून तो तिच्या जवळ आला, खाली झुकलेला तिचा चेहरा अलगद हनुवटीला धरून वर उचलला आणि म्हणाला, "आता बस्स...आपली भातुकली इथेच पुरे..आपला प्रवास इथपर्यंतच होता..बघ पिल्लू समजून घे, आपल्या माणसापासून दुर, त्यांच्या आर्शिवादाविना आपला संसार सुखाचा होणार आहे का..?? तुझ्या आणि माझ्या घरच्यांची जपलेली प्रतिष्ठा धुळीस मिळेल, त्यात आबांना एक अटॅक येऊन गेलाय हा धक्का ते सहन करू शकणार नाही ते आणि मानी आहेत ते नाही स्विकारणार आपलं नातं...विसर मला आणि आबा सांगतील त्या मुलाशी लग्न करून सुखी हो..." हे बोलताना त्याला अनंत यातना होत होत्या.."माझी एक शेवटची मागणी ऐकशील, तुला फुलं खूप आवडतात म्हणून हा आणला होता मी..चाफा..चल सोबत लावू आणि आपल्या गोड प्रेमाच्या प्रवासाचा सुगंधी शेवट करू.. "असं म्हणत तिच्या हातून आणि भरल्या डोळ्यांनी दोघांनी चाफा नदीकाठी लावला आणि दोघे एकत्र घरांच्या दिशेने वळले, तिला वडा जवळ सोडलं आणि तो मागच्या बाजूने घरी गेला.. 

 

   सर्जेराव पुण्याहून परतले ते सुमीचं लग्न ठरवून..तिच्या मामांच्या मित्राचा मुलगा अविनाश भोसले..उंच,देखणा मुलगा..भरीव देहयष्टी असलेला,हसरा प्रसन्न चेहरा..कुणाच्या ही सहज पसंतीस पडावा असा...ती तिथे काॅलेजला असताना तो आणि त्याचे बाबा घरी आलेले तेव्हा जुजबी ओळख झाली होती आणि तेव्हाच ती त्यांच्या मनात भरली होती..आज सर्जेरावांनी भेट घेऊन रितसर बोलणी केली होती..घरात येऊन सगळ्यांना याबाबत सांगितलं थोडक्यात तंबी दिली..महिन्याभरात दारी मांडव सजला आणि हा हा म्हणता हळदीचा दिवस उजाडला..सकाळी चुडा भरण्याचा कार्यक्रम झाला आणि सुमी वर आपल्या खोलीत गेली..तिथं कितीतरी वेळ खिडकीबाहेर बघत बसली होती..नदीचं पात्र दुर नजरेच्या टप्प्यात येत होतं..तिथली हिरवाई कधीतरी तिने मांडलेली भातुकली, तिच्या करपलेल्या प्रेमाच्या आठवणी तिला अस्वस्थ करीत होत्या..ती विचारात असताना आई तिथं आली, लेकीची अवस्था पाहावत नव्हती पण तिचा सुध्दा नाईलाज होता, लेकीसाठी अक्षरशः सर्जेरावांचे पाय धरले होते तिने पण ते काही वधले नाहीत..आईच्या डोळ्यात पाणी आलं ती परत जायला वळणार तोच सुमीनं तिला हाक मारली, "आई गं... " "काय गं, काही हवयं का बाळा..?? " आईनं विचारलं.."मला भेटायचयं त्याला शेवटचं.. "ती म्हणाली.. " काय..??पण..आता ते कसं शक्य आहे..इतकी मंडळी आहेत घरात आणि यांना कळलं तर उभं चिरतील तुला नि मला..नको बाळा.." "आई, एक शेवटची भेट..गेल्या पावली परतेन..हात जोडते..जाऊ दे मला.." ती कळवळून म्हणाली..तिची तगमग पहावेना म्हणून शेवटी आईने परवानगी दिली..


     हळदीचा संध्याकाळी सातचा मुहुर्त होता..ती पाचला मागच्या बाजूने बाहेर पडली, वहिनीकरवी संजूला आधीच निरोप पोहचला होता..तो नेहमीसारखा तिच्या आधीच पोहचला होता.. "संजू ही शेवटची संधी आहे रे,चल मला घेऊन चल..सगळं सोडून आलेय फक्त तुझ्यासाठी.. " ती जीवाच्या आकांताने सांगत होती त्याला.."नाही..आज ही माझं तेच म्हणणं आहे..आपल्या माणसांना दुखवून सुखी नाही व्हायचो आपण आणि आता तर समजावण्याची वेळ सुध्दा टळून गेली..तुझ्या हातावर दुसऱ्या कोणाची तरी मेहंदी रंगलीय,त्यांच्या नावाच्या बांगड्या किणकिणतायेत, आज उष्टी हळद लागेल आणि उद्या त्याच्या नावाचं डोरलं गळ्यात पडेल, कपाळावर कुंकू तो लावेल आणि सात जन्म सोबत राहिन असं वचन द्यायचयं सप्तपदी चालून..तनानेच नाही तर मनाने ही तुला त्याचं व्हायचयं सुमे..आपली साथ आज इथे संपली, तुझ्या ह्रदयातला संजू इथेच ठेवून जा..विसर मला..सुखी हो.. " तो तिला डोळ्यात डोळे घालून सांगत होता..यावर ती काय बोलणार होती..एकदा शेवटची त्याच्या मिठीत विसावून ती निघाली नव्या आयुष्याची सुरुवात करायला..त्याने एकदा शेवटचं तिला वडाकडे सोडलं आणि नेहमी वळून पुन्हा भेटू म्हणणारा तो आज मागे न बघता निघून गेला... 


     "काय गं अजून जागी..?? बरं वाटत नाहीये का..?? " मागे उभं राहून अविनाश तिला विचारत होता..त्याच्या आवाजाने ती भानावर आली..."नाही हो ठिक आहे मी..झोप येत नव्हती म्हणून इथे आले उठून.. " "हम्म, असं आहे तर आमच्या राणी सरकारांना झोप येत नाहीये, मग आम्ही काय करू सांगा..गीत गाऊ कि वारा घालू..काय सेवा करू, आज्ञा करावी राणी सरकार.. " तो म्हणाला..तेव्हा ती त्याच्या समाधानासाठी खळखळून हसली आणि त्याची कळी खुलली...अविनाश बाहेरून एकदम कणखर होता, व्यवहार दक्ष होता..तितकाच मनाने सौम्य आणि निरागस होता..त्याने क्षणात तिला जिंकलं होतं आणि ती ही पुर्वायुष्य मनाच्या कुपीत बंद करून त्याच्या सुख दुखात सामिल झाली..कधी कधी तिला वाटे की त्याला सारा भुतकाळ सांगून टाकावा..मग आपल्या भुतकाळाचं सावट त्याच्या सुखी आनंदी जीवनावर नको असा वाटून ती तो विचार दुर सारायची..काळ सरला...कालांतराने त्यांच्या संसार वेलीवर दोन गोड फुलं उमलली..मुलीच्या वेळी पहिल्या बाळंतपणासाठी माहेरी गेली तेव्हा समजलं तिच्या लग्नाच्या दुसऱ्या दिवशी संजूने तो गाव सोडला होता आणि तो कुठे गेला कुणालाही ठाऊक नव्हतं, त्याचे बाबा अजूनही त्यांच्या घरीच काम करीत होते, आई बिचारी त्याच्या येण्याकडे डोळे लावून बसली होती..पुन्हा तिच्या जीवनात खळबळ उडाली..कुठे गेला असेल, त्याने जीवाचं काही बरं वाईट तर करून घेतलं नसेल ना एक ना हजार प्रश्न तिच्या मनात उमटले पण ते पुसून टाकण्या पलिकडे ती काय करू शकत होती..तिच्या मुलीचा जन्म झाला,त्यानंतर तीन महिने राहून ती मुंबईला परतली..मुलाच्या वेळी तर सासुबाई मुंबईला येऊन राहिल्या त्यानंतर मुलांसोबत कधीतरी सुट्टीत तिथे जाण्याचा योग असे पण मुलं मोठी झाल्यावर अविनाश त्यांना सोडून यायचा...त्यानंतर तिचं तिथं जाणं जवळ जवळ बंदच झालं..नवऱ्याचं आॅफिस, मुलांची शाळा-काॅलेज या सगळ्या संसाराच्या व्यापात ती पुरती गुरफटली..


     संसाराचा गाडा हाकता हाकता कधी पंचवीस वर्ष सरली कळलचं नाही..तारूण्य सरलं,केसांत वृध्दत्वाच्या चंदेरी खूणा उमटू लागल्या,चेहऱ्यावर चार दोन चुकार सुरकुत्या ही दिसू लागल्या...दोन वर्षांपूर्वी मुलीचं लग्न झालं आणि आठवडाभरापुर्वी मुलाचे सुध्दा दोनाचे चार हात केले..सगळ्या विधी आटपून मुलगा आणि सुन सकाळीच हनीमूनला गेले...घरात अविनाश आणि सुमेधा दोघेच होते..दुपारचं जेवण आटपून अविनाश रूममध्ये वर्तमानपत्र वाचत होता..सुमेधा स्वयंपाक घरातलं आटपून आली.."अहो,ऐका ना..मला बोलायचयं तुमच्याशी... " ती धीर गोळा करत म्हणाली.. "हो बोल ना..." पेपर बाजूला टाकत म्हणाला.."आधी वचन द्या, मी जे काही सांगेन ते शांतपणे ऐकून घ्याल आणि माझी साथ नाही सोडणार..प्लीज.. "मी घाबरून म्हणाली.. " असं काय सांगणार आहेस..नाही सोडणार तुझी साथ, वचन देतो.. "तिचा हात हातात घेत तो म्हणाला..तिला थोडासा धीर आला आणि तिने अतं पासून इतिपर्यंत सारा वृतांत त्याला कथन केला..त्याने थंडपणे सारं ऐकून घेतलं..काही क्षण तिथे शांतता पसरली..तिच्या गालावरून अश्रू खाली ओघळणार तोच त्याने हाताने अलगद तो टिपला आणि मंद हसत म्हणाला, " हे बघ सुमेधा, ज्याक्षणी माझ्या हातात विश्वासाने हात दिलास त्याक्षणी तू माझी झालीस..आणि माझा तुझ्यावर पुर्ण विश्वास आहे..जे घडलं त्यात तुझा किंवा संजूचा कुणाचा ही दोष नव्हता, ती परिस्थिती तशी होती..लग्न झाल्यापासून ते आजपर्यंत तु माझ्याशी निष्ठेने वागलीस..माझा संसार फुलवलास..जरी तुमच्याविषयी हे मला लग्नाच्या पहिल्या रात्री सांगितलं असतसं तरी मी तुला माझी अर्धांगिनी म्हणून स्विकारलं असतं आणि लग्नाच्या काही काळ आधी कळलं असतं तर कदाचित मीच तुझ्या वडिलांना समजावून तुम्हाला एकत्र आणलं असतं..पण..असो..जे घडून गेलं त्याबद्दल चर्चा करण्यात काही फायदा नाही..तर मी तुला सांगु इच्छितो माझ्या मनात तुझ्याबद्दल कोणतीही अडी नाही..त्यामुळे झालं गेलं विसरून जा आणि खुष रहा... " "आज खूप हलकं वाटतयं..माझी एक इच्छा आहे..सांगु का..?? "ती त्याच्या मिठीत विसावत म्हणाली.. " हो, बोल ना.. "तो म्हणाला.. " मला एकदा संजूला भेटायचयं..पण जर तुमची परवानगी असेल तरच..."ती दबकत म्हणाली.. "अरे हो हो..त्यात परवानगी कसली आणि मला सुध्दा पहायचयं त्याला ज्याच्या समजावण्यामुळे माझी राणी मला भेटली...अगं पण तू तर म्हणालीस की आपल्या लग्नाच्या दुसऱ्या दिवशी त्याने गाव सोडला म्हणून..मग आता कुठे भेटेल तो आपल्याला..?? " तो उत्साहाने म्हणाला.. "अहो, काही दिवसांपूर्वी वहिनीचा फोन आला होता संजू गावी परत आलाय म्हणून.." तिने सांगितलं.. "ठिक तर मग,उद्याच निघू..जा तयारी कर.. " तो म्हणाला...ती संध्याकाळ तशीच सरली... 


      दुसऱ्या दिवशी दुपारी बाराला जेवण करून निघाले..चार तासांचा प्रवास करून गावात पोहचले तेव्हा संध्याकाळचे चार वाजले होते..गाव बरचं बदललं होतं नदीच्या वरच्या बाजूने जाणाऱ्या पायवाटचे रूपांतर पक्क्या रस्त्यात झाले होते..नदीच्या काठावरची हिरवळ अजून तशीच अजूनही टिकून होती. अविनाशने बाजूला कार पार्क केली आणि ते दोघे उतरून खाली आले..तिथे बरीच झाडे बहरली होती त्यात तिथला डवरलेला चाफा उठून दिसत होता..आता तिथे बाक होते,चारचा सुमार होता तरी तिथे जास्त कोणीच नव्हतं..मात्र त्या झाडाखाली एक इसम बसला होता बहुदा तो बासरी वाजवत असावा, तिचे मंत्रमुग्ध सुर दुरवर पसरले होते...तिने क्षणार्धात त्याला ओळखलं..तो संजू होता..दोघे तिथे पोहचले..ते त्याच्या मागे पोहोचताच त्याने बासरी वादन थांबवलं.."आलीस सुमी..ये तुझीच वाट पाहत होतो...!!! " तो उठून मागे वळत म्हणाला..वृध्दत्व त्याच्याही देहावर खुणा दाखवत होतं पण त्याचं हसरं मुख सारं लपवत होतं.."कसं रे न बघताच ओळखतोस दरवेळी.. " ती ओघाने बोलून गेली पण सोबत अविनाश आहे हे लक्षात येताच ती जरा मागे सरकली..संजू त्यांच्या जवळ आला तेव्हा तिच्या गळ्यातल्या मंगळसुत्रावर त्याने एक कटाक्ष टाकला हे तिच्या नजरेतून सुटलं नव्हतं.. "संजू हे अविनाश..माझे..माझे..." तिची जीभ वळत नव्हती, ती फार अडखळत होती..तिची अवस्था अविनाशने ओळखली आणि तोच पुढाकार घेत म्हणाला, "मी अविनाश..सुमेधाचा पती..मला तुमचे आभार मानायचेत..त्यादिवशी जर तुम्ही तिला समजावलं नसतं तर कदाचित आज आमचा हा यशस्वी संसार झाला नसता..म्हणून थँक्यू... " यावर तो फक्त हसला.."तुम्ही बोला, मी आहेच.. "असं म्हणत अविनाश जायला वळला तेव्हा त्याच्या हातात एक पुस्तक देत तो म्हणाला, " आमचं बोलणं होईपर्यंत हे वाचा म्हणजे बोर व्हायचं नाही.. " अविनाशने हसत ते पुस्तक घेतलं आणि निघून गेला...दोघे बाकावर बसले, अगदी सगळं विसरून पुन्हा दोघे चिरतरुण झाले..ती पुन्हा त्याची राणी आणि तो पुन्हा तिचा राजा झाला होता..हातात हात गुंफून आणि त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून ती विसावली होती..गप्पा झाल्या आणि तो बासरी वाजवू लागला,कितीतरी दिवसांनी तो तिची आवडती धुन वाजवत होता..


     इकडे अविनाशने ते पुस्तक उघडलं, त्यात कागद होता..तो उघडून पाहिला, ते पत्र होतं..संजूने अविनाश साठी ठेवलेलं..तो वाचू लागला... 


अविनाश, 


नमस्कार,मी संजू..माझ्याबद्दल सुमीने तुम्हाला सगळं सांगितलचं असेल..कधीकाळी आम्ही सोबत मांडलेली भातुकली सत्यात उतरवण्याची स्वप्नं पाहिली होती, पण ते काही होऊ शकलं नाही..पण तुम्ही माझ्या प्रेमाला सांभाळलतं, तिला माझ्या पेक्षा कित्येक पटीने जास्त प्रेम, सुख दिलतं त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार..सुमी सुध्दा समोरच्या व्यक्तीला प्राणापलिकडे जपते..तिने ही निष्ठेने तुमच्याशी संसार केला..या जन्मी काळजावर दगड ठेवून माझ्या राणीचा हात मी तुमच्या हाती दिला होता..पण पुढच्या जन्मी मात्र माझी सुमी फक्त माझी असेल..तोवर तिची काळजी घ्या..येतो...


संजू


हे वाचून काही तरी अनिष्ट घडेल असं वाटून अविनाश गाडीतून उतरून धावत त्यांच्या जवळ आला पण तिथे तसं काहीच नव्हतं..त्याला पाहून सुमी बावरून संजू पासून दुर झाली.."अहो साहेब, थोडा वेळ सुध्दा विरह सहन होत नाही होय...जा जा तुमच्या बायकोला घेऊन जा..आपल्या शेवटच्या भेटीची वेळ संपली सुमे..जा प्रिये दिल्या घरी तु सुखी रहा..."संजू म्हणाला..ते दोघे भरल्या डोळ्यांनी वळले तोच मागून त्याचा आवाज आला.. "पदराआड लपवलेलं मंगळसुत्र घालून जा..तुझा हा जन्म त्याच्या नावे आहे.. " तिने मागे वळून पाहिलं तेव्हा तो हसत बाकावर लवंडला होता आणि तोंडातून फेस येत होता..ती त्याच्या दिशेने धावणार इतक्यात तो होती नव्हती ताकद एकटावून ओरडला, "मागे फिर सुमे...आपल्या भेटीची वेळ संपली..अविनाश घेऊन जा तिला...!!! जा, लवकर निघा..." आजवर त्याचा प्रत्येक शब्द पाळला होता तिने हा तरी कसा मोडणार होती, ती मागे फिरली..जाता जाता तिच्या कानी शब्द पडले, "योग्य वेळी हाकेला धावून आलास मित्रा..तुझे आभार..."


     अविनाशने तिला गाडीत बसवून पाणी दिलं आणि ती शांत झाली तशी गाडी तिच्या माहेरच्या घराच्या दिशेने वळवली..वहिनी आणि दादा घरीच होते...त्यांचा लेक आणि सुनबाई शेतावर गेले होते आणि आई देवळात तर आबा गावात फेरफटका मारायला गेले होते..जरा इकडच्या तिकडच्या गप्पा करत सगळे ओसरीवर बसले होते, इतक्यात वाड्यावर काम करणारा धोंडू गडी आला.. "दादा, नाडकर्ण्यांचे संजू दादा गेले जी...!! " हे ऐकून अविनाश सुमेधाच्या पोटात धस्स झालं दोघांनी एकमेकांकडे पाहिलं..त्याने तिला शांत राहाण्याची खूण केली.."अरे केव्हा घडलं हे..??? कशानं गेला..?? " दादाने त्याला विचारलं.. "कवा गेले ते काय म्हाईत न्हाई जी,त्यो चाफ्यावरला नाग डसला त्यास्नी.. झाडाखालच्या बाकावर निपचित पडले हुते.." एवढं सांगून तो आपल्या मार्गाने गेला.. "अगं ऐकलसं का..मी जाऊन येतो..सुमे बस तु..आलोच मी.. " असं म्हणत दादा त्याच्या मागोमाग गेला..."रोज त्यांच्या बासरीवर डुलणारा नाग..नेमका आज त्यांना कसा काय डसला..काही कळेना..शेवटी सापाची जात ती..."वहिनी आत जाता जाता म्हणाली आणि तिला संजूचे शेवटचे शब्द आठवले... " योग्य वेळी हाकेला धावून आलास मित्रा...!!!"


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance