Anu Dessai

Romance Tragedy Others

3  

Anu Dessai

Romance Tragedy Others

गोष्ट तुझी माझी - भाग ३

गोष्ट तुझी माझी - भाग ३

27 mins
710


       म्हणता म्हणता दिवस सरत होते..तिचं एम.ए पण पुर्ण होत आलं होतं..तशी ती घरचं सांभाळून अभ्यास करत होती..त्याची आणि सर्वांची मदत होतच होती..सुट्टी दिवशी एखादा नवीन पदार्थ करून सार्‍यांना खाऊ घालायची..कधीतरी मुवी,पिकनिक असे ही प्लॅन बनायचे..विनूचा अभ्यासही तीच घ्यायची.तिचे पहिले सणवार ही छान पार पडले.दोन वर्ष सरली.ती ए.म.ए ही उत्तम रित्या उत्तीर्ण झाली..


       परिक्षा संपून दोन आठवडे झाले होते.ती ही जरा रिलॅक्स झाली होती..अशाच एका संध्याकाळी ती आणि तो आपल्या रूममध्ये बसून गप्पा मारत होते..तेवढ्यात दारावर थाप पडली."आत येऊ..??" वहिनी म्हणाल्या..दोघे हसत म्हणाले,"या ना.."..त्या आत आल्या तेव्हा तो म्हणाला, "काय वहिनी तुम्ही कधीपासून परमिशन घ्यायला लागलाय..यायचं ना बिनधास्त.." "घ्यायला लागते परमिशन भाऊजी..कारण आता तुम्ही एकटे नाही आहात की नाही.." वहिनी म्हणाल्या..."अहो हे काय वहिनी खरचं तसं काही नाहीये..तुम्ही हवं तेव्हा येऊ शकता..नाॅक करायची गरज नाही.." तिने ही त्याच्या बोलण्याला दुजोरा दिला.. "बरं ठीक आहे यापुढे नाही करणार मी नाॅक..अगं बघ मी काय सांगायला आले होते आणि काय सांगत बसले..मी आणि आई आपल्या एका नातेवाईकांकडे बारशाला चाललोय..तू पण चल ना..फ्रेश वाटेल जरा..गेले कित्येक दिवस फक्त अभ्यास आणि अभ्यासच केलायस तू..बाहेर फिरून आलीस म्हणजे बरं वाटेल.." वहिनींनी सांगितलं.."हो तुम्ही खाली थांबा मी येतेच तयार होऊन.." ती म्हणाली.."हो तू ये आवरून..भाऊजी छोटी झोपलीय रूममध्ये..जरा लक्ष द्या हं..मी दुध बिस्किटं काढून ठेवलीत किचनमध्ये..उठली तर तेवढी द्या तिला.." जाता जाता वहिनी म्हणाल्या..."हो वहिनी फिकर नाॅट..मी देईन लक्ष तुम्ही या जाऊन.." तो वहिनींच्या मागे बाहेर पडला... ती छान तयार होऊन खाली आली..


      वहिनींना ड्रायव्ह करता यायचं..आज त्या गाडी चालवत होत्या..चारच्या दरम्यान तिघी बारश्याच्या ठिकाणी पोहचल्या.आईंच्या चुलत बहिणीच्या नातवाचं बारसं होतं..त्या आत आल्या..बारसं व्यवस्थित झालं..आता सगळ्यांच्या गप्पा गोष्टी सुरू होत्या..आईंची बहिण आली आणि त्यांना म्हणाली,"चल बाई मालती..ओटी भरण्याचा पहिला मान तुझा.."असं म्हणत त्यांच्या हाताला धरून घेऊनच गेली..अनु आणि वसुधा वहिनी तिथेच गप्पा मारत बसल्या..बाजूलाच चार सहा बायका बसल्या होत्या..त्यांच्याकडे बघून काही तरी कुजबुजत होत्या..त्यांचा संवाद वहिनी आणि अनूच्या कानी पडत होता..एक दुसरीला विचारत होती,"ती वसुधा जवळ कोण आहे गं..??" दुसरी तिला सांगत होती,"अगं ती मालतीची धाकटी सून..मुकुंदची बायको.." परत त्या दुसर्‍या बाईने विचारले,"तिला काही मुलबाळ..??" ती पहिली खांदे उडवत म्हणाली," कुठे काय..शिकतेय म्हणे ती अजून दोन वर्ष झालीत लग्नाला..अजून तरी काही नाहीये.." "अगं बाई..आता काय करणार आहे एवढं शिक्षण घेऊन..शेवटी काय घरीच बसायचंय ना मुलांना आणि संसार सांभाळत..आणि मी ऐकलयं त्यांच्या वयात अंतर आहे म्हणे.." ती दुसरी बोलत होती.." "अंतर..जरा जास्तच.दहा बारा वर्षांचं आहे.."पहिली तुसडेपणाने बोलली.."अगं बाई..ही वीस पंचवीसची वाटतेय म्हणजे त्याची तर पसत्तीशी उलटली असेल नाही..आता काही होईल असं वाटत नाही.." या वाक्यावर दोघी खदाखदा हसत होत्या..


      आता अनूला ते ऐकणं असह्य होत होतं..ती उठून बाहेर आली..पाठोपाठ वहिनी सुध्दा आल्या..तिच्या पाठीवरून हळूवारपणे हात फिरवला..गालावरून ओघळणारे अश्रू तिने पटकन पुसले.दोघी आत आल्या..तोपर्यंत आईंचं सुध्दा झालंच होतं..सगळ्यांचा निरोप घेऊन तिघी गाडीत बसल्या.गाडीत कोणी बोललं नाही..अनु आणि वसुधा गप्पच होत्या आणि आईंना थकव्यामुळे झोप लागली होती..साडेसातच्या दरम्यान घरी पोहचल्या..छोटी आणि मुकुंद खेळत होते तर दादा आणि बाबा कसल्या तरी गप्पा करत होते..


     सगळ्याजणी फ्रेश होऊन आल्या..वहिनी आणि अनु स्वयंपाकाला लागल्या आणि बाकीचे बाहेर होते..अनु वहिनींना सांगत होती,"वहिनी झाला प्रकार कुणाला सांगू नका प्लीज.." "नाही गं..नाही सांगणार..तू ही जास्त विचार करत बसू नकोस त्याचा...सोडून दे लोक काय बोलतच असतात गं.." वहिनी तिला समजावत म्हणाल्या.."हो वहिनी.." ती म्हणाली..


      जेवणं उरकली..सगळे बाहेर गप्पा मारत होते..अनु मात्र वर तिच्या खोलीत बसली होती.राहून राहून तिला तोच प्रसंग आठवत होता..तिला पुन्हा पुन्हा तेच वाक्य आठवत होतं.."त्याची पसत्तीशी उलटली.." ती विचार करत होती.."आपण आपलाच विचार करत होतो.. पत्नी म्हणून आपलं काही चुकतयं का..आपण आपल्या जोडीदाराचा विचार करायला हवा होता.." तिच्या गालावरून झरझर अश्रू उतरत होते..तेवढ्यात दार वाजल्याचा आवाज आला..तिने पटकन डोळे पुसले.तो येऊन तिच्या जवळ बसला.ती त्याला बिलगली.."काय गं..काय झालं रडतेस का..??" त्याने विचारलं.."नाही काही नाही झालयं..आणि मी रडत नाहीये..." असं म्हणत तिने मिठी अजून घट्ट केली..ती कशामुळे तरी खूप दुखावलीय हे त्याला कळलं होतं कारण जेव्हा असं काही व्हायचं ती अशीच त्याला घट्ट मिठी मारायची आणि तो ही त्यावेळी तिला प्रेमाने कवटाळायचा..आता ही त्याने तेच केलं होतं..ती थोड्यावेळाने शांत झाली..त्याने तिला झोपवली. 


      हे सगळं होऊन एक आठवडा उलटला. खरंतर तिला डाॅक्टरेट करायचं होतं मराठीत पण आता तिने थांबायचा निर्णय घेतला होता..एक वर्षाची गॅप घेऊन नंतर पुन्हा सुरू करीन असं सांगायचं तिने ठरवलं होतं पण त्यामागचं खरं कारण ती कोणालाच सांगणार नव्हती...तिने सगळ्यांना आपला निर्णय सांगितला..मुकुंदला जरा धक्का बसला होता कारण पत्नी होण्याआधी ती त्याची विद्यार्थिनी होती आणि तिचं मराठी विषयावरचं प्रेम त्याला माहित होतं..त्याने पुन्हा पुन्हा खोदून खोदून विचारण्याचा प्रयत्न केला तिला समजावलं पण ती आपल्या निर्णयावर ठाम होती..शेवटी त्याने तो नाद सोडला..तिने न सांगता ही वहिनींना त्यामागचं कारण उमगलं होतं....


     आता ती विनूच्या शाळेत मराठीची शिक्षिका म्हणून काम करू लागली होती..सगळं नीट चाललं होतं.मुकंद सुध्दा थोडा वरमला होता..विनू आता पहिलीत होती..अनू सगळं अगदी तत्परतेने सांभाळत होती..आई बाबांकडे पण लक्ष देत होती कारण आता ताईचं लग्न झालं होतं त्यामुळे ते अचानक एकटे पडले होते..पण अनु आणि मुकुंद दोघे व्यवस्थित त्यांची काळजी घेत होती.आता त्यांच्या लग्नाला तीन वर्ष होत आली..


      दिवस छान जात होते.डिसेंबरचा शेवटचा आठवडा होता..शाळांना नाताळच्या सुट्ट्या लागल्या होत्या..अनु चार दिवस आईकडे गेली होती..ती सत्तावीस तारखेला संध्याकाळी परतली ती मुळी डोकं धरूनच..दारावरची बेल वाजली तेव्हा आई उठून आल्या..दारात अनु उभी होती..तिने बॅग आत नेली आणि आईंना म्हणाली,"आई थोडं लिंबू पाणी द्याल का प्लीज..डोकं गरगरतयं..काल परवापासून पोटात मळमळतयं पित्त उठलयं बहुतेक..लिंबू पाणी पिऊन जरा पडते म्हणजे बरं वाटेल.." "बरं मी आणते तू फ्रेश हो जा.."असं म्हणून आई किचनमध्ये गेल्या आणि ती वर तिच्या बेडरूममधे..थोड्या वेळाने आईंनी तिला लिंबू पाणी दिलं ते पिऊन ती जरा झोपली.उठली तेव्हा तिला जरा बरं वाटलं पण पोटात मळमळत होतंच..ती आवरून खाली आली तेव्हा आई पानं वाढत होत्या..ती म्हणाली," आई मला नकोय आज जेवायला मी नुसतं एखाद फळ खाईन."आईंनी मान डोलावली..तरी ही तिला आईंनी बळेबळे दुध पाजलं पण ते ही उलटलं..ती रात्रभर उलट्यांनी हैराण झाली होती रात्री कधीतरी उशीरा तिला झोप लागली..तिच्या सोबत मुकुंद ही जागला होता. त्याला ही बरचं जागरण झालं होतं..


      दुसर्‍या दिवशी सकाळी तिला लवकर जाग आली ते ही उलटीमुळेच ती उठली आणि आवरून किचनमध्ये आली..आई किचनमध्ये नुकत्याच आल्या होत्या त्यांनी गॅसवर चहाचं आदणं ठेवलं होतं..ती पाठीमागून आणि मिठी मारत त्यांना म्हणाली, "गुड मॉर्निंग आई..आज काय स्पेशल नाश्ता.." "अगं रात्री थोडा भात उरला होता आता तो फोडणीला टाकते तसही तुला आवडतो ना..खा मस्त काल पासुन टिकत नाहीये पोटात काही पित्तामुळे.कितींदा सांगितलयं रात्री जास्त जागू नकोस म्हणून..मग हे असं पित्त उठत.." आई रागावत बोलल्या.."शाॅली ना आई. "ती लहान मुलासारखी बोबडं बोलली आणि आई लगेच हसल्या..तिने कांदा टोमॅटो चिरायला घेतला तेवढ्यात वहिनी ही आल्या एव्हाना तिचा कांदा चिरुन झाला होता..वहिनींनी आल्यावर कांदा फोडणीला टाकला आणि तिला अगदी भडभडून आलं..ती लगेच बेसीनकडे धावली..तोंडावर पाणी मारून बाहेर आली.."काय गं ठीक आहेस ना.." वहिनींनी विचारलं.."हो वहिनी..फोडणीचा वास सहन नाही झाला मला एकदम मळमळून आलं..वाटलं पुन्हा उलटेल पण नाही नुसतचं ओकारी आल्यासारखं वाटलं.." वहिनींनी शंकेनं आईंकडे पाहिलं...दोघी खुदकन हसल्या..आईंनी तिला जवळ घेत विचारलं,"बाळा तुझी पाळी कधी होती.." "सतरा तारखेला..बापरे आज अठ्ठावीस ना..म्हणजे दहा दिवस पुढे गेली..या आधी तर असं कधी झालं नव्हतं.." ती सहज बोलून गेली आणि तिचं गुपित तिलाच उमगलं..ती लाजली..आईंनी तिच्या कानशीलाला बोट लावून आपल्या कानापाशी आणून कडकड मोडली आणि तिची दृष्ट काढली.."आई आलेच मी.." असं म्हणत ती वर आपल्या खोलीत गेली.."सांभाळून जा गं..धडपडशील.." आई म्हणाल्या..


      ती खोलीत आली..तो अजून ही झोपला होता..त्याला ही जास्तच जागरण झालं होतं म्हणुन तिने त्याला उठवलं नाही..तिने प्रेगा टेस्ट किट आधी आणून ठेवलं होतं..तिने बाथरूम मध्ये जाऊन चेक केलं..'पाॅसिटीव' होतं..तिला खूप आनंद झाला आणि नकळत हात पोटावरून फिरला..ती बाहेर आली एकवार त्याच्याकडे नजर फिरवली..ती खाली आली वहिनींना दाखवलं आणि त्यांच्या कुशीत शिरली आणि तिच्या तोंडून शब्द बाहेर पडले,"वहिनी आता तरी लोकांची तोंड बंद होतील ना हो..." "हो बाळा आता कोणी काही बोलू शकणार नाही बघ..." 


       तेवढ्यात आईंची देवघरातून हाक ऐकू आली..दोघी तिथे गेल्या..आई देवासमोर बसल्या होत्या..दोघी त्यांच्या बाजूला जाऊन बसल्या.."आई माझ्या पोरीची कुस उजवलीस..हा अनमोल ठेवा तिच्या ओटीत टाकलास..तुझे खूप खूप आभार आई.."आई देवीला सांगण करत होत्या..दोघींनी हात जोडले...आईंनी देवापुढची साखरेची वाटी उचलून चिमूटभर साखर अनुच्या तोंडात टाकली..


       आता सगळे उठले होते..बाबा वर्तमान पत्र वाचत होते आणि दादा छोटीशी खेळत होते..तो आताच बाथरूम मध्ये गेला होता..सगळे डायनिंग टेबलवर नाश्ता करत होते..वहिनी आणि अनु वाढत होत्या..तेवढ्यात तिच्या रूममधून त्याची हाक ऐकू आली,"अनु टाॅवेल...." ती ही खालून ओरडली,"आले..." आणि पटकन वर आली..त्याला टाॅवेल दिला..तो पटकन बाहेर आला."बायको केस पुसून दे ना.."असं म्हणत तो खुर्चीत बसला..तिने टाॅवेल घेतला आणि त्याचे केस पुसु लागली.."अहो, तुम्हाला काही तरी सांगायचयं.." ती म्हणाली."अगं बोल ना..." तो बोलला...ती वाकली अन् त्याच्या कानाजवळ जात बोलली, "तुम्ही की नाही बाबा होणार आहात." तो ताडकन उठून उभा राहिला..आणि तिला गदागदा हलत विचारत होता,"खरं सांगतेयस..खरचं मी.....मी बाबा होणार आहे..??" ती पुन्हा म्हणाली,"हो"..हे ऐकून त्याने चक्क तिला उचलून घेतलं..आणि फिरवू लागला..शेवटी ती म्हणाली,"अहो हळु..खाली उतरवा ना मला गरगरतयं..." "हो हो उतरवतो साॅरी.."असं म्हणत त्याने तिला उतरवून बेडवर बसवलं..आणि तिला पाणी दिलं.."साॅरी साॅरी खरचं साॅरी...तुला अजून काही हवयं का..तुझं डोकं चेपून देऊ..खरचं साॅरी पिल्लू..." तो अगदी भांबावून बोलत होता आणि ती होऊ घातलेल्या बापाची तगमग पाहून हसत होती.."तुला हसू येतयं.." तो बावकं तोंड करून बोलला.."अहो हसू नाही तर काय किती हायपर होताय..एवढं काही नाही झालयं आणि असं होतं गरोदरपणात.." ती त्याला समजावत म्हणाली.."ते काही असलं तरी तुला काही झालं तर मला नाही सहन होणार..म्हणून आजपासून तुझी काळजी मी घेणार..." "हं ठीक आहे..चला खाली जाऊया सगळे वाट बघत असतील.." दोघे खाली आले..


      "छोटी माँ मला भाऊ आणणार की बहिण.."असं म्हणत विनू तिला बिलगली...त्यावर सगळेच हसले.."अभिनंदन." दादा दोघांना म्हणाले..दोघे जोड्याने आई बाबा आणि दादा वहिनींच्या पाया पडले.तिने फोन करून आई बाबांनाही कळवलं..त्यांना सुद्धा खूप आनंद झाला..नाश्ता झाल्यावर आई

म्हणाल्या,"मुकुंदा,संध्याकाळी घेऊन जा बाबा तिला डाॅक्टरकडे..वेळेत ट्रिटमेंट सुरू झालेली बरी.."


      संध्याकाळी डाॅक्टरकडे गेले..अनुला काही प्राॅब्लम असला तर ती त्यांच्याकडेच जायची.ते स्त्री रोग तज्ज्ञ होते..डाॅक्टर अतुल कुलकर्णी...त्यांचा नंबर

येताच ते आत गेले..डाॅक्टरांनी तिला चेक केलं आणि बाहेर आले...त्यांच्या चेहर्‍यावर काहीसे गंभीर भाव होते आणि त्याच गंभीर स्वरात ते बोलले,"ती प्रेग्नंट आहे..." तो ही जरा गंभीरतेने बोलला,"डाॅक्टर काय झालयं काही सिरीयस मॅटर आहे का..ती ठीक तर आहे ना आणि बाळ..त्याला तर काही प्राॅब्लम नाहीये ना.." डाॅक्टर त्याला मध्येच थांबवत म्हणाले,"हो हो सांगतो सगळं सांगतो..जरा मन घट्ट करून ऐका.." "काही सिरीयस आहे का डाॅक्टर..प्लीज असा अंत पाहू नका...लवकर सांगा.." ती कळवळून म्हणाली.."ऐका तर..मिस्टर बर्वे.तुमचं बाळ हेल्थी आहे पण हे बाळंतपण तुमच्या पत्नीच्या जीवावर बेतेल असं माझ्या निर्दशनात येतयं..ती पुर्वीपासून माझी पेशंट आहे म्हणून मला तिच्या बाबतीतल्या काॅम्पिकेशन्स मला माहिती आहेत त्यामुळे मी सांगतोय..मी शक्य तितक्या लवकर ही प्रेग्नंसी टर्मिनेट करण्याचा आणि पुन्हा कधी ही चान्स न घेण्याचा सल्ला देईन..."असं म्हणत असताना मधेच त्यांना तोडत ती म्हणाली, "डाॅक्टर काय बोलताय हे तुम्ही..." ती गरजली..."हे बघा तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सेकंड डाॅक्टर ओपिनियन घेऊ शकता..पण मला खात्री कोणीही गायनो तुम्हाला हेच सांगेल.." डाॅक्टर शांतपणे म्हणाले.."नाही डाॅक्टर ते शक्य नाही..माझं काही ही झालं तरी चालेल मला पण मी माझ्या बाळाला जन्म देणार.." तिला अश्रू अनावर झाले.."डाॅक्टर यावर काही उपाय नाहीये का..??"तो काकुळतीला येऊन म्हणाला.."नाही.." डाॅक्टरांनी असं म्हणताच त्यांची होती नव्हती ती आशा सुध्दा मावळली.."डाॅक्टर कसं आणि कधी करायचंय अबाॅर्शन.."तो निर्विकार चेहर्‍याने म्हणाला.."अहो तुमच्या जिभेला काही हाड..मी नाही करणार आहे असं काही.."ती पुन्हा रडत म्हणाली.."हे बघ अनु भावनिक होऊन विचार नको करूस..तुम्ही आज ठरवा आणि तुमचं ठरलं की ह्या गोळ्या दिवसातून तीन वेळा घ्यायच्या तीन दिवस...अँड यू विल बी फ्रि..." डाॅक्टरांचं ऐकून ती उठून निघून आली बाहेर..."द्या त्या इथं..मी देईन तिला.." त्या गोळ्या घेऊन तो बाहेर आला...


      ती गाडीत बसली होती.."मी एवढचं सांगीन..हे प्रकरण घरच्यांकडे जाता कामा नये.."ती म्हणाली..त्याने मानेनेच होकार दिला..दोघे घरी पोहचले..आईंनी चौकशी केली त्यांनी काही तरी सांगून वेळ मारून नेली..रात्री जेवण झाल्यावर ती किचनमध्ये असताना तो आला..तिथे आई आणि वहिनी होत्या.."अनु गोळी घे.."तो म्हणाला.."घेईन मी नंतर.."ती म्हणाली..आई म्हणाल्या, "घे बाळा नंतर विसरशील.." "आई आताच उलटी झालीय मला..परत होईल ही..झोपताना घेईन आणि डाॅक्टरांनी सांगितलयं की या गोळीने झोप येईल म्हणून झोपताना घेईन.." अनु बोलली "घे गं बाई पण घे हं झोपताना न विसरता.."आईंनी समजावलं..सगळं आवरून ती रूम मध्ये आली..


      "अनु गोळी घे.."त्याने तिच्यासमोर गोळी धरली.."मी नाही घेणार..माझा निर्णय मी मघाशीच सांगितलाय.." ती झोपायला वळली त्याने तिला खेचलं आणि बोलला,"हे बघ मी मगाचपासून तुला सांगतोय..तुला काही झालं तर ते मला सहन होणार नाही..तु सोबत असशील तर आयुष्यभर वांझोटा म्हणून जगेन.." "तर मी ही तुम्हाला सांगते.जर मी प्रेग्नंट राहिले नसते तर कदाचित चान्स घेतला नसता पण आता आपल्या बाळाचं बीज माझ्या गर्भात अंकुरलयं.हे बाळ आपल्या प्रेमाचं प्रतिक आहे..आपलं आहे ना हो हे बाळ..समजून घ्या ना प्लीज.." ती पुन्हा कळवळून म्हणाली.."हे बघ न जन्माला आलेल्या बाळाचा तु एवढा विचार करतेस..आणि ज्या जिवंत माणसावर प्रेम केलस त्याचं ऐकूनही घेत नाहीस...असं का..??" "हे बघा तुमच्यासाठी जरी हे बाळ जन्माला आलं नसलं तरी माझ्यासाठी त्याचा जन्म तेव्हाच झाला जेव्हा मला त्याच्या माझ्यात असण्याची जाणीव झाली..आणि बाळाला जन्म देऊन मी एकदा मरणार होते पण बाळाला मारून मला रोज मरताना बघाल तुम्ही..आजची रात्र विचार करा..तरी ही तो नाही बदलला तर उद्या पासून गोळ्या घेईन..." एवढं सांगून ती झोपली..झोपली म्हणजे नुसती डोळे बंद करून पडून राहिली.तिला रूममध्ये हालचाल जाणवली..ती कुशीवर वळली आणि तिने डोळे उघडले..तो त्यांच्या रूमला लागून असलेल्या बाल्कनीत उभा होता...त्याच्या हातात त्या गोळ्या होत्या त्याने त्या बाहेर भिरकावल्या..तिला समाधान वाटलं..तिने डोळे मिटले..


      काही वेळ तो तिथेच येरझार्‍या मारत होता नंतर तो तिच्या जवळ येऊन बसला.ती झोपल्याची खात्री करून घेतली आणि तिच्या पोटावर हळूवारपणे हात ठेवला आणि म्हणाला, " माफ कर बाळा..तुझ्या आईवर प्रेम करता करता मी हे विसरलो की तु ही माझाच एक अंश आहेस..पण मी तरी काय करू तुझा जन्म झाला तर माझी अनु मला सोडून जाईल हे ऐकूनच मी गर्भगळीत झालो बघ..अजूनही मला तीच भिती सतावतेय..मी माझ्याकडून हर तऱ्हेने प्रयत्न करेन आता तु ही माझी मदत कर.." तो असं म्हणत असताना त्याच्या हाताला आतली हालचाल जाणवली जणू बाळाने बापाचं ऐकल्याचा तो दाखला होता..तो उठून हळुच तिच्या बाजूला झोपला...


      सकाळी ती उठली तेव्हा तो बाजूला नव्हता.ती आवरून खाली आली तेव्हा त्याला तो नाश्ता करताना दिसला..तिच्या येण्याची चाहूल लागताच तो म्हणाला, "आपल्याला डाॅक्टरकडे जायचंय तयार हो.." तिच्या पोटात पुन्हा गोळा आला.कालचा विचार बदलला की काय..??असंही तिच्या मनात क्षणभर आलं.तरीही ती यंत्रवत तयार झाली..दोघे निघाले..डाॅक्टरांकडे पोहचून नंबर घेतला आणि बाहेर बसले डाॅक्टरांना यायला अजून वेळ होता आणि यांचाच पहिला नंबर होता..कोणी कोणाशी जास्त बोललं नाही..डाॅक्टर आले आणि त्यांना आत बोलावलं..ते आत येताच डाॅक्टरांनी थेट प्रश्न केला,"काय ठरलयं तुमचं.." "डाॅक्टर आम्हाला हे मुल हवयं..तुम्ही ट्रिटमेंट सांगा आम्ही ती करू.." तो बोलला..डाॅक्टर उसासा टाकत म्हणाले,"ठिक तर मग..पण मी पुन्हा एकदा सांगतो अनु तुझ्या जगण्याचे फक्त चाळीस टक्के चान्सेस आहेत..आणि साठ टक्के धोका..तरीही जर तुम्ही ही रिस्क घेऊ इच्छित असाल तर मग ठीक मी औषधं लिहून देतो ती वेळेवर घे.." असं म्हणत डाॅक्टरांनी प्रिसक्रिपशन लिहायला घेतले..आणि इतर सल्ला ही दिला.. 


      दोघे घरी आले..तिला आराम करायला सांगून तो बाहेर गेला..ती कपडे बदलून आली..आणि बेडवर पडून विचार करू लागली की नेमकं होतयं तरी काय..तिचा निर्णय बरोबर आहे की चूक..कारण अर्धा दिवस झाला होता पण तो अजूनही तिच्याशी एक शब्द नीट बोलला नव्हता..वेलीवर फुल उमललं की ती छान फुलते तसचं अनुच्या संसार वेलीवर फुल उमलण्याच्या मार्गावर होतं पण अनु मात्र दडपणाखाली होती अपत्य सुखासाठी पती तर दुखावला जात नाहीये ना..पण तिचा हे करण्यामागचा हेतू शुद्ध होता..भारतीय स्त्री आपल्या सौभाग्याला प्राणापलिकडे जपते..आणि त्या दिवशी त्या समारंभात त्याच्या पुरूषार्थावर प्रश्न निर्माण केले जात होते मग ती शांत कशी बसणार होती..फक्त आपल्या पतीच्या सन्मानार्थ ती हे आपल्या जीवावरचं पाऊल उचलणार होती..


       दिवस सरत होते..तीन महिने होत आले होते अनु ओकार्‍यांनी बेजार झाली..कधीही रात्री अपरात्री तिला उठावं लागायचं तेव्हा तो ही उठायचा..या तिच्या स्थितीवरून ती किती नाजूक आहे आणि पुढे काय परिस्थिती ओढावणार याची त्याला कल्पना आली होती..ती खूपच अशक्त होत होती..शाळेत ही तिने कसंबसं फेब्रुवारी पर्यंत सगळं शिकवून संपवलं आणि रिजाइन केलं..आता ती घरीच असायची..तो सर्वतोपरी तिची काळजी घ्यायचा मात्र तिच्या अपरोक्ष..हो गेल्या तीन महिन्यांपासून त्यांच्यातला अबोला वाढला पण घरात त्यांनी हे जाणवू दिलं नव्हतं..


       सरप्राईजच्या नावाखाली तिला लागलेल्या डोहाळ्यांच्या वस्तू तो आईकडे देऊन जायचा..तिला काही त्रास तर होत नाहीये ना हे पाहाण्यासाठी रात्र रात्र जागायचा..मध्येच तिला उलट्या व्हायच्या तेव्हा तो कधी कधी उचलून तिला बाथरूम पर्यंत घेऊन जायचा कारण दिवसभर उलट्यांनी बेजार झालेल्या तिच्यात चालायचं त्राण उरायचं नाही..पण यातही संभाषण क्वचितच व्हायचं..तिसर्‍या महिन्यात तिची चोर ओटी भरण्याचा कार्यक्रम झाला..दोघे सोनोग्राफीसाठी डाॅक्टरांच्याकडे आले..सोनोग्राफी रूममध्ये तिच्या पोटावरून फिरणाऱ्या मशिनने समोर दिसणार्‍या स्क्रिनवर त्यांच्या बाळाची इवलीशी किर्ती दिसत होती..डाॅक्टर बाळाबद्दल सांगत होते..त्याच्या वाढीच्या प्रोसिजरस् समजावून देत होते..हे सगळं होत असताना त्याने तिचा हात हातात धरला होता.सगळं आवरल्यावर त्याने तिला गाडीकडे जायला सांगितले..


     डाॅक्टर आणि मुकुंद त्यांच्या केबिनमध्ये आले..तिच्या विषयीची माहिती घेण्यासाठी, औषधं घेण्यात काही अडलं तर ते विचारण्यासाठी म्हणून मुकुंद कित्तेक वेळा त्यांना फोन करत असे त्यामुळे त्यांची चांगली मैत्री झाली होती.तो डाॅक्टरांना म्हणाला,"डाॅक्टर काय झालं..सगळं ठीक तर आहे ना.." डाॅक्टर उसासा टाकत म्हणाले,"हे बघ मुकुंद...कूल डाऊन फस्ट आणि शांतपणे ऐक मी काय सांगतोय ते..मी तिच्या जीवाला धोका आहे हे तुला आधीच सांगितलयं आता मी दिलेल्या मेडिसिन्स मुळे आणि तू घेतलेल्या योग्य काळजीमुळे तो थोडा कमी झालाय असं आपल्याला म्हणता येईल पण अजून पूर्णपणे टळला नाहिये आणि तसं होणारही नाही..आता जरी ती ठीकठाक वाटत असली तरी नंतर काॅम्पिकेशन्स वाढतील..मी माझ्या परीने सर्वतोपरी प्रयत्न करेन पण शेवटी जे होणार आहे ते होईलच..." "पण डाॅक्टर..." तो हताशपणे बोलला.."माझा तुला डिमोटिवेट करायचा हेतू नाहीये..मी फक्त तुला अर्लट करतोय.." डाॅक्टर शांतपणे म्हणाले.."ह्म्म..ठीक आहे डाॅक्टर येतो मी.." तो उठत म्हणाला आणि दोघे घरी आले...


      चौथ्या महिन्यात उलटीचा त्रास थोडाफार कमी झाला होता...तिला वेळेवर डाॅक्टरकडे नेऊन आणणं औषध नीट देणं हे सगळं तो करत होता..खूप काही बोलायची इच्छा असूनही तोंडातून शब्दच बाहेर यायला तयार नसायचे..ती खूप वेळा तो खोलीतून बाहेर जाऊ नये म्हणून त्याला अडवायचा प्रयत्न करायची पण नेहमी दोघांचं भांडण व्हायचं आणि तो चिडचिड करत निघून जायचा आणि ती रडत बसायची..


      त्या दिवशीही असचं घडलं..तो खोलीत नव्हता..ती आताच आत आली होती तिला टेबलवर त्याची डायरी पडलेली दिसली.तो कुणाला ही तिला हात लावू देत नाही हे माहीत असूनही तिने ती उचलली आणि वाचायला सुरवात केली........


दि : 24 फेब्रुवारी 2020 


       आज अनुला तिसरा महिना लागला..खूपच अशक्त झालीय उलट्यांनी हैराण होतेय..आणि तिच्यासाठी मला काहीच करता येत नाहीये..प्रत्येक वेळी तिला होणाऱ्या ओकार्‍या तिला माझ्यापासून तोडणार आहेत ह्या जाणिवेने काळजाचं पाणी पाणी होतयं..मला बाबा म्हणून मिरवता यावं म्हणून स्वतः मरणाच्या दारात निघालीय..बाळ मला ही हवयं पण तिच्या जीवाचा सौदा करून नव्हे..हे तिला कसं समजवावं काही कळेना..तू गेलीस तर काय होईल याचा एकवेळ तरी विचार केलायस का...??.........................................'


ती वाचत असताना तो आला..डायरी हिसकावून घेत खेकसला,"तुला एकदा सांगून कळत नाही का गं..माझ्या डायरीला हात लावलेला मला आवडत नाही.."असं म्हणत त्याने डायरी हिसकावून घेतली आणि बाजूला फेकली..."माझ्या भावनांची कदरच नाहीये कुणाला..सगळे स्वार्थी झालेत..आता माझा जीव गेला तर चांगला....." असं म्हणत त्याने भिंतीवर हात आपटला..ती धावत त्याच्याकडे आली त्याच्या तोंडावर हात ठेवला आणि त्याच्या डोळ्यात डोळे घालून बघू लागली..कमरेला पडलेला त्याच्या हातांचा आवेगाने आवळलेला विळखा घट्ट होऊ लागला..तिच्या डोळ्यातून टचकन पाणी आलं..त्याने खसकन हात सोडले..तिच्या गोर्‍या कमरेवर लालेलाल वळ उठले..तो बाहेर गेला आणि एक मोठा आवाज आला त्याबरोबर ती बाहेर धावली..तो समोरच्या रूमच्या दारात उभा होता..आणि हात रक्तबंबाळ होता...वहिनी ही धावत वर आल्या..त्यांनी तिथे पाहिलं कोणीच नव्हतं..खाली जाताना त्या दोघांच्या  खोलीतला आवाज त्यांना ऐकू आला, "तुम्हाला काय वाटतं हे असं आदळआपट करून स्वतःला इजा करून घेतली म्हणजे होणारं टळणार आहे..."ती रडत म्हणाली..."नाही गं होणारं टळणार नाहीच आणि हो हे असं केल्याने माझी घुसमट कमी होते...तू तुझी मनमानी केलीस आता मी करतोय एवढचं.."असं म्हणत त्याने खाडकन दरवाजा उघडला..समोर वहिनी उभ्या होत्या.."वहिनी..या ना..काही काम होत का.." तो एकदम नाॅर्मल होत म्हणाला..अनुने पटकन डोळे पुसले.वहिनी आत आल्या.."काय झालयं अनु...त्रास होतोय का कसला..??" "अं...नाही वहिनी.."ती भांबावून म्हणाली "काय हे भाऊजी एवढं कसं लागलं..??" वहिनी बेडवरचा फस्ट ऐड बाॅक्स उघडत म्हणाल्या.."अहो वहिनी ते मी आतल्या खोलीत काही पडल्याचा आवाज आला म्हणून तिथे गेलो आत जाण्यासाठी दार उघडलं आणि मी आत जाणार एवढ्यात दार येऊन हातावर आदळलं.." "बरं या मी बॅन्डेज करते हाताला.." असं म्हणून वहिनींनी त्याच्या हाताला बॅन्डेज केलं..


      अनु किचनमध्ये आली..चहा गॅसवर ठेवला..मनात चहासारखं भावनांचं मिश्रण मनात उकळत होतं..असह्य भावना डोळ्यावाटे वाहात होत्या..तेवढ्यात आई आत आल्या.."काय गं चहा आटला बघ..कुठयं लक्ष...??" असं म्हणत त्यांनी गॅस बंद केला.."साॅरी आई.."ती डोळे पुसत म्हणाली.."काय झाल बाळा..त्रास होतोय का कसला...??" "नाही आई ठीक आहे मी.." 

असं म्हणत ती बाहेर आली..गरोदरपणात होतात मुड स्विंग्स असं वाटून आई गप्प राहिल्या..संध्याकाळ झाली होती उन्ह अस्ताकडे कलली होती..अनु झोक्यावर बसली होती..हात पोटावर होता..आतली हालचाल तिला जाणवत होती..ती विवंचनेत होती..आपल्या आत अंकुरणारा जीव सत्य आहे कि प्रॅक्टिकली विचार करत आपल्याला वाचवू पहाणारा आपला नवरा..दोन्ही तिचा जीव की प्राण होते..त्यामुळे ती जास्त गुदमरत होती..."बाईने अशा अवस्थेत जास्त विचार करू नये..बाळाच्या वाढीसाठी चांगलं नसतं ते..." असं म्हणत वहिनींनी तिला चहा दिला..चहा पिता पिता गप्पा झाल्या..


       ती मध्यंतरी एक आठवडा आईकडे आईकडे जाऊन आली सोबत तो होताच..आता तिला पाचवा लागला होता..पोट थोडसं उभर दिसत होतं.. एप्रिल महिना होता तो..फार उकडत होतं तिची तर अगदी तगमग होत होती..पण ती सारं सहन करत होती ते फक्त बाळासाठी..तो हल्ली खूप काळजी घेत होता तिची अगदी एखादीला हिचा हेवा वाटावा इतकी..सतत मागे मागे येणं..तिला भरवणं,हात धरून फिरायला नेणं... पण बोलणं क्वचितच व्हायचं..सहावा महिना सुध्दा असाच गेला...


      सातव्या महिन्यात ते पुन्हा सोनोग्राफीसाठी डाॅक्टरांच्याकडे आले..आता सोनोग्राफीत बाळाचे इवले इवले हात पाय,डोकं नीट दिसत होतं..त्याची हालचाल दिसत होती.डाॅक्टरांनी त्यांना बाळाच्या ह्रदयाचे ठोके ऐकवले..दोघे आनंदले..डॉक्टरांनी पुन्हा काळजी घेण्याबाबत सांगितले. दोघे घरी आले तेव्हा तिचे आईबाबा आलेले होते..दोघे आईबाबांना भेटले..आणि फ्रेश होण्यासाठी आपल्या खोलीत गेले..खाली आले तेव्हा घरातले सगळेच जमले होते..ती येऊन त्यांच्यात बसली तो बाहेर जाणार एवढ्यात आईने त्याला हाक दिली,"अहो चिरंजीव कुठे चाललाय..या बसा..आपल्या सौंच्या डोहाळजेवणाची तयारी चाललीय.." "डोहाळजेवण...आई नको गं हे सगळं उगीच दगदग होईल तिची..डाॅक्टरांनी आराम करायला सांगितलाय.." तो त्रासिक स्वरात म्हणाला.."अहो जावईबापू, जन रीत आहे तशी..जपायला हव्यात आपल्या चालीरीती.."तिची आई त्याला समजावत म्हणाली..."सगळ्या चालीरीती जपण्याचा आपण मक्ता घेतलाय का..पण नाही..तुम्हा सगळ्यांना माणसाच्या जीवापेक्षा...."त्याचा आवाज चढलेला सगळ्यांनी आजच अनुभवला होता...तो रागात बाहेर निघून गेला..त्याला काय झालं हे कुणालाच समजलं नव्हतं..त्याची वेदना फक्त तिच्या पर्यंत पोहचली होती..ती आलेच म्हणत त्याच्यामागे गेली..तो उगाच काहीतरी बरळला असेल असं मानून घरात सगळे पुढच्या तयारीला लागले...


      ती बाहेर आली तेव्हा तो एकटाच पावसात भिजताना दिसला..तो पाठमोरा उभा होता..ती ही तशीच त्याच्याकडे गेली..मुसळधार पावसात चिंब भिजली..त्याला तिची चाहुल लागली..ती त्याच्या पासून दोन पावले दुर असताना तिचा पाय घसरला आणि तोल गेला आता आपण पडणार असे वाटून तिने डोळे मिटले पण तिला दणकट हाताचा स्पर्श जाणवला..तो हात त्याचा होता कारण तिची चाहूल लागताच त्याने पटकन पुढे होऊन तिला सावरले होते..तिने हळु डोळे उघडले ती त्याच्या बाहूपाशात होती..त्याने तिला तशीच उचलली आणि आत आला..आत आल्यावर सगळ्यांनी प्रश्नांचा भडिमार सुरू केला..पण तो काही न बोलता आणि न थांबता तिला घेऊन पायर्‍या चढत होता..तिची नजर त्याच्या डोळ्यात होती आणि त्याची तिच्याकडे असूनही शून्यात हरवलेली...त्याने थेट तिला बाथरूम मध्ये नेलं..ओलेते कपडे काढून टाॅवेलनं अंग पुसलं आणि कपडे बदलून बेडवर बसवलं स्वतः कपडे बदलून आला आणि टाॅवेलने तिचे केस पुसू लागला...तोपर्यंत ती ही तशीच बसली होती कारण लग्नानंतर तिच्या केसांचं ऑफिशियल डिपार्टमेंट त्याच्या कडे होतं..म्हणजे किती ही घाई असली तरी तिचे केस तोच पुसणार हे ठरलेलं..तिचे लांबसडक केस पाठीवरून झर्‍यागत सोडले की थेट कमरेखाली पडायचे..मऊ ओलेते केस हातात घेऊन लाड करताना त्याला स्वर्गीय आनंद व्हायचा..


      "तुला कल्पना आहे काय झालं असतं..??जरा काळजी घेता येत नाही..??"तो रागवत म्हणाला पण आज त्याच्या आवाजात एक प्रकारची शांतता होती.."साॅरी सर.." ती अपराधी भावनेने म्हणाली.." अजून ही डाॅक्टरांनी सांगितलेल्या गोष्टी माझ्या गळ्याखाली उतरत नाहीयेत.. तु दुर जाणं..." तो बोलता बोलता थांबला..एव्हाना केस पुसून झाले होते..तो टाॅवेल बाल्कनीत वाळवायला घेऊन गेला..


      डोहाळजेवण जूनच्या तिसर्‍या आठवड्यात ठरले..फक्त दोन आठवडे राहिले होते..आई आणि वहिनींनी हौशीने सारं केलं होतं.तिची आई ही होतीच मदतीला..दिवस भरभर गेले आणि शुक्रवारची सकाळ उगवली लगबग आणि घरात नवचैतन्य घेऊनच...सगळं घर फुलांनी सजलं होतं..सगळी तयारी झाली होती..घरच्यापुढे असलेल्या अंगणातल्या हिरवळीवर फुलांनी सजलेला झोपाळा ठेवला होता..लाॅन असल्यामुळे वर स्लॅब होता..त्यामुळे पावसाचा प्राॅब्लम येणार नव्हता..संध्याकाळी चारच्या दरम्यान पाहुणे यायला सुरवात झाली होती..सातला कार्यक्रम सुरू होणार होता कारण आईंना तिचं बागेतलं तर वहिनींना चांदण्यातलं डोहाळजेवण करायचं होतं म्हणून दादाने हा तोडगा शोधून काढला होता आणि घरातल्या समोरच्या बागेत रात्रीच्या वेळी करा डोहाळजेवण असं त्यांनी सुचवलं होतं..आणि सगळ्यांना हा तोडगा पटला होता..


      सहा वाजेपर्यंत वहिनी, ताई आणि तिच्या मैत्रीणींनी तिला छान तयार केलं होतं...तो काही तरी घ्यायला रूममध्ये आला..मैत्रीणींच्या घोळक्यात आरश्यासमोर बसलेल्या तिला पाहून क्षणभर थबकला..तिच्या बाजूला उभ्या असलेल्या विश्वाला तो म्हणाला, "विश्वा प्लीज.." गालातल्या गालात हसत तिने सगळ्यांना बाहेर नेलं..तो अनुच्या जवळ गेला..तिला हात देऊन उठवलं आणि तिला एकवार न्याहाळलं..तिला त्या नजरेत खूप दिवसांनी तिचा पुर्वीचा मुकुंद भेटल्यासारखं वाटलं...हिरवी नऊवारी नेसून, फुलांची वाडी लेवून नटलेली अन् गर्भारपणाचं तेज तोंडावरून उजळून निघालेली त्याची अनु त्याच्यासमोर उभी होती..त्याचे डोळे भरून आले.."अहो, काय बघताय असे..बोला ना काहीतरी..." "काही नाही गं..बघतोय माझ्या लेकीची आई कशी सुंदर दिसतेय.." ती अवाक् होत म्हणाली,"काय म्हणालात..लेकीची आई..म्हणजे तुम्ही मान्य केलयं ना आपल्या बाळाचं अस्तित्व.."तिच्या आवाजात तिला झालेला आनंद झळकत होता "अगं बाळ माझंही असणार आहे..माझा सुद्धा अंश आहे तो..मग मी कसं नाकारेन त्याचं अस्तित्व..." तो हळवा होत म्हणाला.."हो....मला हिच काळजी सतावत होती..आता मला काही झालं तरी तुम्ही आपल्या बाळाला अंतर देणार नाही याची खात्री पटली मला.."ती म्हणाली..."अनु आजच्या दिवशी तरी नको ना ते.."तो काकुळतीला येऊन म्हणाला.."अं..असं कस..आता मी नसण्याची सवय व्हायला हवी अहो तुम्हाला..पण घाबरू नका आपली लेक नाही भासू देणार तुम्हाला उणीव माझी..." असं म्हणत असताना तिने पोटावर हात ठेवला.."काय झालं..??"त्यानं विचारलं.."लाथ मारतेय.."ती हसत म्हणाली.."पंचवीस.."तो हळुच म्हणाला.."काय पंचवीस.."तिनं कुतूहलाने विचारलं "पंचवीसावी लाथ आहे ही..लबाड आहे चिऊताई.."तो पाठमोरा होत म्हणाला."सर..."ती पुढे काही बोलण्याआधी तो रूममधून बाहेर पडला आणि ती त्याच्या पाठमोऱ्या आकृती कडे पाहातच राहिली..


      लगेचच तिच्या मैत्रिणी आत आल्या आणि तिला अंगणात घेऊन गेल्या..सवाष्णींनी ओट्या भरल्या...मैत्रीणींनी गिफ्ट्स दिल्या..आणि आता होती कार्यक्रमातली गंमत..विश्वाने तिच्यापुढे दोन वाट्या धरल्या..एकात पेढा होता जे मुलाचं प्रतिक होतं आणि एकात बर्फी होती जे मुलीचं प्रतिक होतं..आणि अनूने एका वाटीला हात लावला..त्यात बर्फी होती..तिने त्याच्या कडे पाहिले..त्याच्या तोंडावर समाधान होते कारण त्याला ही मुलगीच हवी होती...त्यानंतर फोटोस् झाले..आता सेकंड हाफ होता म्हणजे वहिनींची हौस..चांदण्यातलं डोहाळजेवण..त्यासाठी त्यांनी तिच्यासाठी खास वेस्टर्न आउटफिट आणला होता..व्हाईट गाऊन आणि मॅचिंग असा व्हाईट पल ज्वेलरी सेट..ती आली तेव्हा तो दुरूनच तिला पाहत होता...तेव्हा तिथे विश्वा आली.."जिजू इथूनच काय बघताय..चला..तुमच्या सौ ना झोका द्यायचाय तुम्हाला.." यावर त्याची काही रिएक्शन नाहीये हे पाहून ती ओढूनच त्याला झोपाळ्याच्या ठिकाणी घेऊन आली आणि सगळ्यांच्या आग्रहाखातर त्याने थोडावेळ झोका दिला..नंतर तो तिथून बाजूला सरकला..


      नऊ वाजेपर्यंत सगळं आटोपलं..पाहुणे पांगले..घरातले सुध्दा कपडे बदलून आले..तेव्हा सगळ्यांच्या लक्षात आलं की तो बर्‍याच वेळापासून घरी नाहीये..अनु सैरभैर झाली होती..परत परत मित्रमैत्रिणींना काॅल करून विचारत होती..पण कुणाला ही माहिती नव्हतं तो कुठं आहे..रडून रडून तिचे डोळे सुजून लाल झाले होते..घरातल्या सगळ्यांना तिला आवरताना नाकीनऊ येत होते...शेवटी ती दाराबाहेर आली..रात्रीचे दहा वाजले होते..सगळे तिच्यामागे धावले..तेव्हाच तो आत येताना दिसला..घरच्यांनी तिला आत नेलं पाठोपाठ तो ही आला..


      तो चिंब भिजला होता..सगळे त्याला एकच विचारत होते की तो कुठे होता..पण तो उत्तर द्यायचं टाळत होता म्हणून सगळ्यांनी दुर्लक्ष केलं..त्याने कपडे बदलले आणि जेवला..झोपण्यासाठी खोलीचं दार उघडून आत आला..अनु दिसली नाही..त्याने बाथरूम मध्ये चेक केलं तिथंही ती नव्हती..तो खाली आला..तिथे ही कुठे ती नव्हती..तो बाहेर आला..ती झोपाळ्यावर बसलेली त्याला दिसली..सोसाट्याचा वारा सुटला होता..पावसाची जोरदार धडक येणार असं वाटत होतं..तो तिच्या जवळ जाऊन बसला तशी ती त्याला बिलगली आणि डोकं त्याच्या छातीवर ठेवलं.."काय झाल..बरं वाटत नाहीये का..??" तो मृदू आवाजातले तिला विचारत होता.."मी बरी आहे हो..पण मला राहून राहून एकच चिंता सतावतेय.." "आणि ती कोणती..??" "मी गेल्यावर आपल्या बाळाचं कसं होईल??" "हे बघ तु आधी हा विचार मनातून काढून टाक..डाॅक्टर काही ही सांगू देत मला माहित आहे ना तुला काही होणार नाही..तू स्वतःला सांभाळ..बाळाकडे लक्ष द्यायला मी आहे वहिनी, आई आम्ही सगळेच आहोत..तू स्वतःला जप.."तो कसाबसा बोलत होता..त्याने तिच्या मांडीवर डोकं ठेवलं.."मुकुंदा....." तिने आर्ततेने त्याला हाक मारली.."बोल ना.."त्याचाही आवाज खोल वाटत होता."माफ करा मला..तुमची राधा आयुष्याची चार पावलं तुमच्या सोबत चालण्यास असमर्थ झालीय..सप्तपदी सोबत चालले खरी..पण त्यामुळे तुमचं आणि ह्या येणाऱ्या जीवाचं आयुष्य मी दावणीला जुंपल्यागत वाटतयं..." ती म्हणाली..."असं नाहीये गं.."असं म्हणून तिला समजवताना त्याच्या अश्रूंचा बांध फुटला..आणि तो तिच्या कमरेभोवती हात घालून रडू लागला...आता तिला ही रडू आवरत नव्हतं..तिचे ही डोळे ओसंडून वाहत होते.."मी खूप प्रयत्न केला स्वतःला समजवण्याचा..पण तुझ्या शिवाय माझं आयुष्य शुन्य आहे अनु..मी नाही करू शकणार हे दिव्य तुझ्याशिवाय पार..प्लीज..."असं म्हणत तो रडत होता..ती त्याला धीर देण्याचा प्रयत्न करत होती..दादा आणि वहिनी सहज बाहेर आले तेव्हा त्यांना हे दोघं दिसले..जवळ गेल्यावर त्याने दादाला मिठी मारली आणि तिने वहिनींना...त्या दोघांना समजत नव्हतं नक्की काय झालंय..आधी दोघांना त्यांनी घरात आणलं..दोघांना पाणी दिलं..शांत झाल्यावर तो सांगण्याच्या बेतात होता पण ती त्याला अडवत होती..पण शेवटी त्याने सगळं सांगितल...हा खरंतर सगळ्यांसाठी खूपच मोठा धक्का होता..सगळेच त्यामुळे चिंतातुर झाले..आता रागवून फायदा नव्हता..सगळे हतबल होते..आता तिची नीट काळजी घेणं हेच त्यांच्या हातात उरलं होतं..


     आठव्या महिन्यात तर तिला चालायला सुध्दा त्रास होत होता..बाळाच्या हालचालीमुळे रात्र रात्र तिला झोप लागायची नाही..पहाटे कधीतरी डोळा लागायचा...औषध आराम सगळं व्यवस्थित चालू होतं..सगळे होईल तेवढा जीवाचा आटापिटा करून तिची काळजी घेत होते...त्याला ही जागरण व्हायची..काम आणि ती दोघांना सांभाळताना त्याला तारेवरची कसरत करावी लागायची..पायर्‍या चढायला त्रास नको म्हणून तिला खालच्या खोलीत शिफ्ट केलं होतं..तिथून आईंची खोली ही जवळच होती...तिचे आई बाबा तिला त्यांच्या कडे घेऊन जायचं म्हणत होते..पण त्याचा त्याला नकार होता..पण त्याचा हट्ट रास्त होता कारण तिच्या आईला एकटीला सारं झेपलं नसतं..इथे आई आणि वहिनी दोघी होत्या मदतीला..आणि त्याने आग्रह करून तिच्या आईबाबांना तिथेच ठेवून घेतलं..


      नववा महिना लागला होता . आता ती खूप थकली होती..चेहरा मलूल वाटत होता.तो जास्तीत जास्त वेळ तिच्या जवळ असायचा..डाॅक्टरांनी तिसर्‍या आठवड्यातली तारीख दिली होती..त्याने एका महिन्याची आगाऊ सुट्टी काढली होती..आणि ती रात्र शेवटी आलीच..दिलेल्या तारखेच्या एक आठवडा आधी...रात्री दहाच्या सुमारास तिला कळा सुरू झाल्या..सगळे तसे जागेच होते..घाई केली आणि तिला हाॅस्पीटल मध्ये अ‍ॅडमिट केलं...तिचं बिपी शुट झालं होतं..डाॅक्टर बोलले लगेच डिलीव्हरी व्हायला हवी..नाॅर्मल झाली तर ठीकच नाही तर सिझेरियन करावं लागेल..मुकुंद बोलला,"काही ही करा डाॅक्टर पण माझ्या अनुला आणि बाळाला वाचवा.." "आम्ही आमचे प्रयत्न करतोच आहोत बाकी सगळं परमेश्वराच्या हाती आहे.चल माझ्या सोबत आपल्याला फाॅरमॅलिटीस् पुर्ण कराव्या लागतील.." डाॅक्टर पाठ थोपटून धीर देत म्हणाले..त्याच्या समोर कागदपत्रे आली..आई किंवा बाळ कोणा एकाला वाचवायचे हमी पत्र होते ते..थरथरत्या हाताने त्याने सही केली.."डाॅक्टर मी लेबर रूममध्ये थांबलो तर चालेल का प्लीज..??" तो थरथरत बोलला.."हो ठीक आहे.."डाॅक्टरांनी परमिशन दिली...त्याने बाहेर आईला सांगितले आणि तो आत गेला..


      अनु वेदनेने कण्हत होती..त्याला पाहून तिला धीर आला..तो तिच्या जवळ गेला...तिला सलाईन लावलं होतं..एरवी साध्या इंजेक्शनला घाबरणारी अनु आज इतक्या वेदना फक्त आपल्या बाळासाठी आणि त्याच्या सन्मानासाठी सहन करत होती..कळ आली की ती अगदी कळवळायची की बघणाऱ्याच्या डोळ्यात सुध्दा पाणी येईल.."खूप दुखतंय का गं...??" त्याने हळू तिचा हात हातात घेत विचारलं...."हो..."ती मलुल आवाजात म्हणाली.."काही हवयं का...पाणी पितेस का थोडं..बरं वाटेल.." "नको सर..तुम्ही फक्त जवळ रहा..हात सोडू नका माझा..खूप भिती वाटतेय मला...आई गं..." "जरा सहन कर.. मी तुझ्या वेदना नाही गं वाटून घेऊ शकत.. "तो ही कळवळत होता.. तिला त्रास असह्य होत होता.. " वहिनी सांभाळतील ना हो आपल्या बाळाला देतील ना आईची माया..पण त्यांना विनु आहे..मग आपल्या बाळाचं कसं होईल... कोणी नसेल तरी चालेल पण..


आई....................तुम्ही तिला अंतर देऊ नका... " ती कशीबशी बोलत होती.. "तू बोलू नकोस शांत रहा.आणि आता कसलाच विचार नको करूस... " "नाही मी न बोलून कसं चालेल.. कसं करणार आहात सगळं माझ्या मागे.. " "शांत रहा.. तुला काही होऊ नाही देणार मी.. " तो ताडकन उभा राहिला.. खिडकी पाशी जाऊन बाहेर बराच वेळ बघत होता. रात्रीचे तीन वाजत आले होते तरी तिची सुटका होण्याची चिन्हे दिसत नव्हती.. बाहेर आणि आत सगळ्यांचा जीव टांगणीला लागला होता.. तिचा आवाज तिथल्या प्रत्येकाचं काळीज पिळवटून टाकीत होता. डाॅक्टर आॅपरेशनचं मनावर घेत नव्हते कारण त्यात जास्त धोका होता.. सगळे शर्तीचे प्रयत्न करत होते..तो हताशपणे जवळ उभा राहून तळमळणाऱ्या अनुकडे पाहत होता.. 


        आणि शेवटी सकाळी सहा वाजता "मुकुंदा.................... " अशी तिची किंकाळी सगळ्यांच्या कानावर पडली.. आणि मागोमाग बाळाच्या रडण्याचा आवाज आला.. सगळे आनंदले पण क्षणभरच.. कारण अजून अनुची काही बातमी आली नव्हती.. "मुलगी झाली.. " नर्सने येऊन सांगितलं.. "अनु ठीक आहे ना..?? " बाबांनी धीर करून विचारलं.. "ते डाॅक्टर सांगतील" असं सांगून ती निघून गेली.. आत अनु घामाघूम झालेली.. उशी आवळलेल्या मुठी सैल झाल्या.. "डाॅक्टर माझं बाळ कसं आहे.. " "अगदी तुझ्यासारखं गोंडस आहे बघ..मुलगी झालीय तुला.. " असं म्हणत डाॅक्टरांनी बाळाला तिच्या छातीवर ठेवलं.. तो निष्पाप जीव तिला बिलगला आणि आई समजून घेण्याचा प्रयत्न करू लागला.. तो जवळच उभा होता त्याचा हात हातात घेत ती म्हणाली,"मुकुंदा... बाबा झालात तुम्ही.. लेक दिली मी तुम्हांला.. सांभाळा तिला.. " असं म्हणता म्हणता तिची शुद्ध हरपली.. डाॅक्टरांनी बाळाला नर्सकडे दिलं.. अनुला चेक केलं आणि मुकुंद सोबत बाहेर आले.. सगळे डोळ्यात प्राण आणून वाट बघत होते.. डाॅक्टर उसासा टाकत म्हणाले, "अनु कोमामध्ये आहे.. अजून तिच्यवरचा धोका टळलेला नाही.. " डाॅक्टर ती शुद्धीवर कधी येईल..?? " वहिनी विचारत होत्या.. "ते आताच नाही सांगू शकत..काही टेस्ट कराव्या लागतील..उद्या रिपोर्टस् आल्यावर समजेल.. "डाॅक्टर म्हणाले.."आणि बाळ..?? " आईंनी विचारलं.. "बाळ अगदी हेल्दी आहे थोड्या वेळाने तिला भेटू शकता..नर्स घेऊन जाईल तुम्हाला.. " 


      तीन दिवस झाले तो हाॅस्पिटलमध्येच तिच्या जवळ बसून होता.. शेवटी दादाने त्याला कन्वेंस केलं आणि घरी पाठवलं.. तो थेट रूममध्ये आला.. दरवाजा लावून घेतला आणि तो कोसळलाच.. पुर्ण रूमभर तिच्या आठवणी पसरल्या होत्या.. त्याच्या मनातली अनु आता त्याच्या डायरीतून त्याच्याशी संवाद साधत होती.. सगळे लहान लहान सगळे प्रसंग डोळ्यासमोरून जात होते.. तिथेच आणखीन एक डायरी पडलेली दिसली.. पण ती त्याची नव्हती हे त्याला कळलं होतं.. त्याने ती उचलली आणि पहिलं पान उघडलं आणि त्याची नजर अक्षरावरून फिरली... ती अनुने लिहिली आहे हे कळायला त्याला वेळ लागला नाही.. तिची सुरूवात ही अशी होती.................... "प्रिय मुकुंदा... 


       लग्नानंतर लिखाण सुटलं असं नाही म्हणणार पण काही कारणास्तव राहून गेलं.. पण आज वाटलं की लिहावंसं वाटतयं.. तुमच्या साठी आणि आपल्या पिल्लूसाठी.. आपल्या बाळाची बातमी जेव्हा आली तेव्हाचा तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि त्यानंतर डाॅक्टरांनी केलेल्या स्टेटमेंट नंतरचा तणाव आणि टेंशन मला जाणवत होतं पण मी तरी काय करणार.. तेव्हा मी फक्त तुमची अनु नव्हते आपल्या येणाऱ्या चिऊची आई सुध्दा होते.. मी घेतला एक निर्णय.. माझ्या प्रत्येक निर्णयाला तुमचा पाठिंबा होता आणि या ही निर्णयाला तो आहे हे मला त्याच रात्री कळलं होतं आणि मी निर्धास्त झाले होते.. आठवतं का..?? रात्रीच्या चांदण्यात मला नीट झोप लागली की नाही याची खात्री करून अलगद माझ्या पोटावर हात ठेवून बाळाशी साधलेला पहिला वहिला संवाद आठवतोय का..................................... "


       आणि अशा अनेक आठवणी तिने टिपून ठेवल्या होत्या.. बाळाच्या हालचाली, पोटात मारलेली पहिली लाथ, त्या दोघांचा अबोला, त्यानी मूकपणे पण अगदी तत्परतेने घेतलेली काळजी.. आणि त्याची रोजची होणारी तगमग सुध्दा तिने अचूक टिपली होती.. शेवटचं पान डोहाळजेवणा दिवशीचं होतं त्यानंतर डायरी कोरी होती.. कारण त्या दिवसानंतर ती त्याला खचलेला पाहून दिवसेंदिवस मलूल होत गेली आणि शेवटी अंथरूणात होती..तो बराच वेळ ती डायरी उराशी कवटाळून बसला होता... 


       आज आठवडा उलटला होता.. तो हाॅस्पिटलमध्ये तिच्या जवळ बसून होता.. डाॅक्टर नुकतेच येऊन गेले होते.. आठवडाभर त्याचं स्वत: कडे अजिबात लक्ष नव्हतं.. दादा जेवणाचा डब्बा घेऊन यायचे पुन्हा सकाळी डबा परत न्यायला आले असता रात्रीचं जेवणं तसचं पडलेलं असायचं..पण त्याच्या दिनवाण्या अवस्थेकडे पाहता त्यांना धड रागवता सुध्दा यायचं नाही..जबरदस्ती घरी पाठवलं तरी तिथेही काही वेगळी परिस्थिती नसायची..तो स्वत:ला रूममध्ये कोंडून घ्यायचा आणि अनुच्या वस्तू घेऊन न्याहाळत बसायचा..रात्र रात्र त्याच्या डोळ्याला डोळा नसायचा सतत त्याला बेडवर निपचित पडलेली त्याची अनु दिसायची.. नीट न खाल्यामुळे त्याची ही प्रकृती धासळत होती.. दाढीचे खुंट वाढलेले, रडून रडून सुजलेले डोळे जागरणामुळे खोल गेलेले.. 


      आजही तो हाॅस्पिटलच्या रूममध्ये तिच्या उशाशी बसून होता..आॅगस्टचा पहिला आठवडा होता तरी बाहेर मुसळधार पाऊस कोसळत होता वारा सुध्दा सोसाट्याचा वाहत होता.. तेवढ्यात शेजारच्या वाॅर्डमधून त्याला बाळाच्या रडण्याचा आवाज आला.. तो उठून बाहेर त्या वाॅर्डजवळ आला आणि आत डोकावला.. त्याचीच मुलगी रडत होती आणि नर्स तिला चमच्याने दुध पाजण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती.. पण ती कशीच ते दुध तोंडात घेईना..आई आणि वहिनी दिवसांतून एकदा तिला बघून जात असत.. त्यांना जास्त वेळ थांबणे शक्य नव्हते कारण विनुची शाळा, दादांचं ऑफिस सगळ्यांचा स्वयंपाक हाॅस्पिटल मधला डब्बा सगळ्याची जबाबदारी वहिनींच्यावर येऊन पडली होती.. आई जमेल तशी मदत करत पण त्यांना ही आता जमत नव्हते.. बाबा ही मध्यंतरी येऊन गेले.. एक दोन नातेवाईक ही आले होते.. विनुला ही आणली होती.. पण छोटी माँ आपल्याशी बोलली नाही तिने आपल्याला जवळ घेतलं नाही म्हणून नाराज होती.तीन साडेतीन वर्षाची पोर ती सांगून तरी काय समजणार होते तिला...तिची समजूत घालता घालता सगळ्यांच्या नाकीनऊ आले होते.. अनुला बरं नाही हे सांगितल्यावर जरा वरमली होती.."द्या तिला माझ्याकडे.. " दरवाजात उभं राहून तो म्हणाली.. आवाजासरशी नर्सने मागे वळून पाहिलं.. तिने पाळण्यातून बाळाला उचललं आणि त्याच्या कडे दिलं.. तिला उराशी कवटाळून तो तिच्या रूमच्या दिशेने गेला..तिचं रडणं सुरूच होतं. त्याने अलगद अनुच्या कुशीत ठेवले.. ती बिलगून आणखीनच रडू लागली..


तो अनुला बघत बोलू लागला, "काय गं... ए आता का झोपून राहिलीस..हिच्यासाठी मरणाच्या दारात गेलीस ना.. मग आता तुझ्या ह्रदयापर्यंत तिचा टाहो ऐकू जात नाहीये का..? उठ की एकवार बघ ना तिच्याकडे घे ना तिला कुशीत.. बघ तुझ्या प्रेमाला भुकेलयं ते लेकरू.. आणि मी.. माझं काय प्रेम केलसं माझ्यावर.. साथ दिलीस मग आजच का... ए बायको ये ना गं परत माझ्यासाठी आपल्या बाळासाठी.. ये ना.. नाही गं आता सहन होत.. "असं म्हणत तो गुडघ्यावर बसून चेहरा हातात लपवून रडू लागला.. एवढ्यात बाळाचं रडणं बंद झाल्याचं त्याच्या लक्षात आलं आणि हुंकार त्याच्या कानी पडला त्यांनी वर पाहिलं.. अनु खालचा ओठ दातांखाली दाबत अश्रू भरल्या बंद डोळ्यांनी बाळाला कुशीत घेऊन पाजत होती.. तिला पान्हा फुटला होता.. " अनु................. " तो आनंदाने जवळ जवळ ओरडलाच.. "पिल्लू पाहिलं का आपले बाबा कसं मुळुमुळ रडतात ते.." असं म्हणत ती गालातल्या गालात हसू लागली.. तिला हसताना पाहून तो मनोमन सुखावला..त्याची अनु मरणाच्या दारातून परत आली होती.. तिच्या जवळ जात त्याने तिच्या कपाळावर आपले ओठ टेकले.. आणि डाॅक्टरांना बोलवायला गेला.. फोन करून घरच्यांना बोलावून घेतले..सगळे येताच डाॅक्टरांनी तिच्या जीवावरचा धोका टळला असल्याची खुशखबर दिली.. दुसऱ्या दिवशी डिसचार्ज घेऊन तिला आणि बाळाला घरी आणलं.. बाराव्या दिवशी धुमधडाक्यात बारसं पार पडलं.. आणि नाव ठेवलं "मीरा" मुकुंद राधाची मीरा...

(क्रमशः)


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance