Dilip Yashwant Jane

Romance Tragedy Others

4.9  

Dilip Yashwant Jane

Romance Tragedy Others

रेशिम बंध

रेशिम बंध

13 mins
2.2K


'सुरेखा' किती गोड नाव! नावासारखीच सुरेख ! लांब सडक काळेभोर केस, चाफेकळीसारखं नाक, एखाद्या चंचल हरिणीसारखे टपोरे डोळे, रंग सावळाच पण हसतांना तिच्या गालावर पडणारी खळी आणि पांढरेशुभ्र मोत्यासारखे दात पाहिले की असं वाटायचं जणू काही स्वर्गातली अप्सराच या भूतलावर अवतरली की काय? एकूणच तिचं सौंदर्य कोणालाही भूरळ पाडेल असंच. तिच्या या एकूणच बाह्य रूपड्यावर मी भाळलो आणि आता वाटतंय पुरता फसलो.

    

  आमच्या लग्नाला दोघांच्या घरनं विरोध असला तरी आम्ही घरच्यांची समज काढून होकार मिळवलाआणि लग्न केलेच. पण आज प्रचंड त्रास व मनस्ताप सहन करावा लागतोय या सुरेख अशा सुरेखामुळेच. कधी काळी वाटायचं ' सुरेखा ' चं नाव सुरेखा नको तर ' मोहिनी ' हवं होतं. कारण.....? असो. आज सांगण्यासारखं काही उरलच नाही. कारण तिच्यातली मोहिनी संपल्यागत वाटतेय आणि तिच्यात सुरेख असं काही आहे असं आज मुळीच वाटत नाही.

    

  तसं पाहिलं तर काल-परवापर्यंत आमचं सर्व कसं ठिकठाक सुरू होतं. मी संध्याकाळी ऑफीस सुटल्यानंतर, तिला आवडतो म्हणून मोगऱ्याचा गजरा तिच्या लांबसडक, काळ्याभोर वेणीत माळण्यासाठी आठवणीने बऱ्याचदा आणायचो. मी आणलेला तो सुंगधी गजरा माझ्या हातानं ती माळायला सांगायची. तरीही प्रत्येक वेळी गजऱ्याचा तो पुडा तिच्या हातात मी देत असे. तिही मोठ्या लाडिकपणे जवळ येऊन पुड्यातला गजरा काढून माझ्या हाती देत नाजूकसं हसायची आणि त्यावेळी तिच्या गालावर पडणारी खळी हळूच मला खुणवायची. गालावरल्या त्या मोहक खळीला माझे ओठ अलगद स्पर्श करायचे. अन् मग मी वेणीत गजरा माळायचो. कधी कधी आवडली म्हणून एखादी साडी आणून दिली की बाईसाहेब खूष! मी घेतलेली साडी तिला हमखास आवडायची. माझी निवड किती सुंदर असते असे मला नेहमी म्हणायची. कधीतरी गणपती बाप्पाच्या नाहीतर गुरुदत्तांच्या मंदिरात आम्ही जोडीने दर्शनास जाऊन येतांना हमखास खरेदी करत असायचो. अशा आमच्या या सुखी संसाराला दृष्ट लागली. कोणाची ते सुरवातीला कळलेच नाही. कारण गेल्या काही दिवसापासून माझे अन् सुरेखाचे वरचेवर खटके उडत होते. ऑफिसमधून घरी आलो की मी आणलेला गजरा ती हातात घेऊन बाजूला ठेवत होती नाहीतर स्वतःच्या हाताने माळत होती. तिचं खळखळून हसणंच नव्हे तर स्मितहास्य देखिल दुर्लभ होत चालले होते. आणलेली साडी पाहून चेहऱ्यावरचे भाव बदलत होते. कोठे फिरायला जाऊ म्हटलं की पूर्वी पाचच मिनिटात तयारी करणारी ती सुरेखा आता नकार द्यायला शिकली होती. बोलायचं म्हटलं तरी मोकळी बोलत नव्हती. आम्ही घरात इनमिन दोन जण. पण दोन टोकं बनलो होतो. माहेरी जाऊन ये म्हटलं तर त्यासाठी ही तयार नव्हती. आणि अचानक एक दिवस मला शोध लागला तिच्या या विचित्र वागण्याचा. 

      

मी ऑफिसला गेलो म्हणजे तिची ती एक मैत्रिण घरी येत असे आणि माझ्या लाडक्या सौभाग्यवतीचे कान फुंकत असे. मला वाटायला लागले कोठून तिची ती अवदसा मैत्रिण आली अन् आमच्या सुखी संसाराला नजर लाऊन गेली ? आता म्हणे हिला तिच्यासारख्या जरतारी, भरदार, बेलबुट्टीची नक्षी असलेली पैठणी हवी पदरावर नाचरे मोर असलेली. फिरायला चार चाकी गाडी हवी. घरात घरकामाला एखादी बाई हवी ती ही वयस्कर. चारचौघीत मिरवायला वेगवेगळ्या प्रकारचे दागिने हवेत. घरातले दागिने जुन्या पद्धतीचे. ते घातले म्हणजे अगदी काकुबाई दिसते. असं आमच्या हिचं मत. तसं तेही तिच्या त्या मैत्रिणीनेच सांगितलं म्हणे. परवा पासून माझ्याशी बोलणं पूर्णपणे बंद केलेलं. घेऊ हळूहळू सर्वच म्हटलं तर ते तिला आत्ताच पाहिजे. आता काय पैसे झाडाला लागतात का ? लगेच सर्व वस्तू आणायला.


       मी तिची समजूत काढून थकलो. शेवटी नाद सोडला. माझ्याशी बोलणं आणि माझ्याकडे पाहणं सोडून तिचे सर्व दैनंदिन कार्यक्रम अगदी व्यवस्थित सुरू होते. त्या सुरेख अशा सुरेखावर माझं भलतच प्रेम. तिचा राग कमी व्हावा म्हणून छानसी पैठणी घेऊन घरी गेलो. दारावरची बेल वाजवली. तिनं दरवाजा उघडताच मी हातातली पिशवी नेहमीप्रमाणे तिच्याकडे दिली. यांत्रिकपणे तिने ती पिशवी घेतली व दूर भिरकावून दिली. ते पाहून माझाही संताप अनावर झाला अन् त्या संतापातच दिल्या दोन मुस्कटात लगावून. त्याचही इतकं भांडवल झालं की रात्री उपाशीच झोपावं लागलं. झोप कशी ? रात्रभर विचार करून डोकं बधिर होण्याची वेळ आली. रात्रभर पंखासुद्धा आवाज न करता फिरत होता पण माझा मेंदू त्या पंख्यापेक्षा वेगाने फिरत होता . वेगवेगळ्या विचारांच वादळ मनामध्ये घोंगावत होते. घरच्यांचा विरोध पत्करून आपण हिच्याशी लग्न केलं पण तिला आपली कदरच नाही. अशा बाईसोबत संसार करणं अवघड नव्हे तर अशक्यच आहे. तिला उद्दल घडवलीच पाहिजे. पण कशी ? उद्वीग्न झालेल्या मनास प्रश्न पडला. तिला धडा शिकवण्या साठी आपण स्वतःलाच संपवल पाहिजे असं वाटायला लागलं. जेणेकरून आपण गेल्यानंतर आपलं महत्व या बिनडोक बाईला समजेल आणि आयुष्यभर आपल्या आठवणीत झुरेल.


   खूप विचार करून निर्णय पक्का केला. स्वतः ब्रह्मदेवाने येऊन जरी समज काढली तरी आता निर्णय बदलायचा नाही असा मनाशी ठाम निश्चय केला. आता तिच्या संतापाकडे, रागाकडे मुळीच लक्ष द्यायचं नाही हे ठरवलं. आजचा दिवस आपला. आपल्या मनाप्रमाणे जगण्याचा शेवटचा दिवस. उद्यापासून आपण या जगात असणार नाही. ज्यांना आज आपलं महत्व वाटत नाही उद्या त्यांचं महत्व आपल्याला वाटणार नाही. आपलं महत्व, आपलं नसणं, आपली उणीव क्षणोक्षणी सुरेखाला जाणवल्यावाचून राहणार नाही याचा असूरी आनंद त्या अवस्थेतही झाला. अन् त्या आनंदात मनावरचं एक दडपण, मोठं ओझं हलकं झाल्यासारखं वाटलं. मोठ्या तुच्छतेने शेजारी झोपलेल्या तिच्याकडे पाहिलं, आणि कुस वळवली. पाठीवर सरळ झोपून वेगाने गरगर फिरणाऱ्या त्या छतावरच्या पंख्याचे नाईट लॅम्पच्या अंधूकशा प्रकाशात निरिक्षण करता करता केव्हा डोळा लागला ते समजलच नाही.


       सकाळी जाग आली ती किचनमधल्या भांड्यांच्या आवाजानं. डोळे किलकिले करून तिकडे बघितलं तर पार उडालोच. काल मोठ्या हौसेनं आणलेली आणि तेवढ्याच संतापाने तिने भिरकावलेली पैठणी तिच्या अंगावर खूलून दिसत होती. मी न सांगताही आज तिने ती पैठणी परिधान केली होती. या पैठणीत तू काय सुरेख दिसतेस असं सुरेखाला सांगावसं वाटलं क्षणभर. पण एवढ्याने आपला आत्महत्येचा निर्णय डळमळीत होईल असं वाटल्याने मी काहिही न बोलता तसाच कॉटवर पडून राहिलो. मी जागा झालेला पाहून ती ही आमच्या कॉटजवळ असलेल्या एकूलत्या एक गोजरेज कपाटाच्या आरशासमोर येऊन आपले ओले केस टॉवेलने कोरडे करत होती. केस झटकतांना त्या लांबसडक काळ्याभोर केसात अडकून राहिलेलं पाणी माझ्या अंगावर उडत होतं. शेवटी मी कूस बदलली. पण ती सारखी माझ्या पुढेपुढे करत होती. पण मी मोठा मानी. माझा आत्मसन्मान दुखावला गेला होता. मी तिच्याशी बोलावं असं कदाचित तिला वाटत असावं. हवेत गारवा असतानाही ' आज काय उकडतंय' असं म्हणत मी आणलेल्या पैठणीचा पदर हलवून स्वतःशीच म्हणत होती. पण मी ऐकलच नाही असं दर्शवलं, बाथरूमला जाऊन पटकन अंघोळ आटोपली. माझ्या हातानेच चहाही बनवला. अधूनमधून मी चहा बनवत असल्याने सुरेखाला विशेष काही जाणवलं नसणार. चहाचा वाफाळलेला कप घेऊन व्हरांड्यातल्या खूर्चीत येऊन बसलो. आज आत्महत्याच करायची असल्यानं ऑफिसला दांडीच मारायची होती. उद्या आपल्याला कोणत्याच प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार नाहीत म्हणून रजेचा अर्जही पाठवायचा नव्हता. तसं पाहिलं तर ऐनवेळी आमच्या ऑफिसात रजा टाकण्याची प्रथाच नव्हती. आदल्या दिवशीच आम्हाला साहेबांकडून रजा मंजूर करून घ्यावी लागे आणि समजा ऐनवेळी दांडी पडलीच तर दुसऱ्या दिवशी साहेबांकडून सर्वांसमक्ष चांगलीच हजामत होई. त्यामुळे दांडी मारण्याची हिंमत सहजासहजी कोणी करत नसे . त्यामुळे मी अर्ज न पाठवता किंवा रजा मंजूर करुन न घेता दांडी मारल्याने ऑफिसात निरनिराळ्या चर्चेला उधाण येईल याचा विचार मनात आला. काही जण याची हिमंत वाढल्याचे म्हणतील, तर काही जण माझी नाहक हजामत होईल म्हणून किव करतील . पण उद्या मी नसल्याचं जेव्हा त्यांना कळेल तेव्हा सारेच हळहळतील, म्हणतील बिचारा चांगला होता. माणसाचं महत्व नाहितरी तो जीवंत असे पर्यंत कोणाला वाटत नाही पण एकदा का तो हे जग सोडून गेला तर सगळ्यांना काही काळापुरतं आपलं महत्व वाटतं. बराच वेळ मनाशी हे संवाद सुरु होते. शेवटी उठलो. कपाटातून एक कडक इस्त्री केलेला ड्रेस काढला, आरशाच पाहिले, तेल चोपडून मस्तपैकी केस विंचरले. माझा आवडता शर्ट मी आज घातला. सहजच बाकी इस्त्री करुन ठेवलेल्या कपड्यांकडे लक्ष गेलं. उद्यापासून यांना वापरणारं कोणी नसणार म्हणून थोडसं वाईट वाटलं. तसाच बाहेर पडलो, चालत राहिलो. अचानक लक्षात आलं की कपाटाच्या चाव्या माझ्या सोबतच राहिल्या. विनाकारण सुरेखाची गैरसोय नको म्हणून चाव्या देण्यासाठी पुन्हा घराकडे वळलो.

        

 घराच्या दरवाजाजवळ येऊन पोचण्याआधीच तिच्या हातच्या स्वयपांकाचा सुंगधानं माझं स्वागत केलं. माझ्या आवडीची मसाल्याची भरली वांगी तिनं बनवली होती. तिच्या हातचं तर खायचंच नव्हतं, पण त्या वाग्यांच्या भाजीच्या खमंग वासाने तोंडाला पाणी सुटले होते. तिने जरी भाजी बनवली असली तरी वांगी माझ्याच पैशाने मी स्वतः विकत आणली होती. आता मरतांना आपण आपली भरली वांगी खाण्याची इच्छा अपूर्ण ठेवली तर आपला अतृप्त आत्मा याच घराभोवती घुटमळेल व आपणास मुक्ती मिळणार नाही हा विचार डोक्यात आला. आतापर्यंत हे आपणास कसं सुचलं नाही याचाही संताप आला. स्वयपांक घरात जाऊन माझ्या हातानं वाढून घेऊन भरल्या वांग्यांवर मनसोक्त ताव मारला.

    

 शेवटच्या क्षणी आपल्यामुळे तीला त्रास नको म्हणून जेवणाचे ताट स्वतः धूवून जागेवर ठेवलं. ती एका बाजूला बसून माझ्या सर्व हालचाली पेपर डोळ्यासमोर ठेवून न्याहळत होती. हे सर्व प्रकार पाहून ती माझ्यावर हसतेय जाणवलं, त्यामुळे माझा संताप वाढत होता व आत्महत्येचा निर्णय क्षणाक्षणाला दृढ होत होता.

      

घराबाहेर पडलो, जवळच रेल्वेस्टेशन होतं. घडयाळात पाहिलं दुपारचे चार वाजले होते. नेहमीची गाडी येण्याची वेळ झाली होती, स्टेशनवर उडी टाकता येणार नाही म्हणून स्टेशनपासून लांब आलो. रूळाशेजारी पडलेल्या खडीवर बसलो. बराच वेळ थांबलो पण अजून गाडी येत नव्हती. त्यामुळे मन अस्वस्थ झालं. गाडी आज लेट आहे का ? असं स्टेशनवर फोन करून विचारावं म्हणून खिशाकडे हात गेला. पण आज खिशात माझा मोबाईल नव्हता. स्वतःच्या विसराळूपणाचा राग आला. पण तोही क्षणभरच. कारण आज जर तो माझ्या सोबत असता तर मी मेल्यानंतर तो कोणीतरी चोरून नेला असता किंवा माझ्या सोबत त्याचाही रेल्वेच्या चाकाखाली चुराडा झाला असता , म्हणजे शेवटी माझंच नुकसान झालं असतं, निदान तेवढं नुकसान होणार नाही म्हणून मोबाईल घरी विसरलो ते एका अर्थाने बरेच झाले असे वाटून समाधानाचा एक सुस्कारा सोडला आणि माझ्या विसराळूपणाचा राग येण्याऐवजी कौतुक वाटायला लागलं.

    

   बराच वेळ झाला गाडी येत नव्हती. सूर्य माझ्यासारखाच परतीच्या प्रवासाला निघाला होता पण त्याचा प्रवास तात्पुरता तर माझा कायमचा होता. हाताला चाळा म्हणून तेथे असलेला एक एक छोटा दगडाचा खडा नेम धरुन रुळांवर फेकू लागलो. पण तो खडा काही केल्या रूळावर पडेना ! कधी तो रुळाच्या या बाजूला पडे तर कधी त्या बाजूला. आपल्याला आता योग्य निशाणा साधता येत नाही हे तेव्हाच लक्षात आलं. मन एकाग्र करुन पुन्हा तो खेळ खेळू लागलो. थोडा मोठा दगड घेतला आणि दोनदा प्रयत्न केल्यानंतर तिसऱ्यांदा बरोबर एक दगड रुळावर जाऊन आदळला आणि त्याचे तुकडे झाले. ते पाहून मनाची चलबिचल सुरू झाली. आपल्या डोक्याचीही अशिच अवस्था झाली तर ! आपला चेहरा कोणालाच ओळखता आला नाही तर ...? या विचारानं मन सुन्न झालं आणि एवढ्या अवजड गाडी खाली आपण स्वतःला झोकून द्यायचं म्हणजे जरा अवघडच वाटायला लागलं. या मार्गापेक्षा दुसरा मार्ग परवडला . परत एकदा घड्याळाकडे पाहिले रात्रीचे साडेआठ वाजले होते. पण दुसरा कोणता मार्ग निवडायचा ते सुचत नव्हते. मन म्हणत होतं की तो विचार घरी गेल्यावरच केलेला बरा. नाहितरी आता बराच वेळ झालेला होता. भूकपण लागली होती. थोडसं खाऊन घेतलं तर समाधानानं मरता तरी येईल , पण पुन्हा घरी जायचं म्हणजे ! त्यापेक्षा छानशा हॉटेलात जाऊन मस्तपैकी आपल्या आवडीचे भरपूर पदार्थ तरी खाता येतील. म्हणून जवळच असलेल्या हॉटेल अमरकडे मोर्चा वळवला. हॉटेल अमर काय सुंदर नाव आहे! 'अमर' ज्याला मरण नाही असा, पण जगात अमर असा कोणी आहे का? सर्वच मर्त्य, तरी या मुर्खानं आपल्या हॉटेलचं नाव ठेवलं अमर. जाऊ दे आपल्याला काय त्याचं.

   

   हॉटेलात अनेक पदार्थांचा सुगंध दरवळत होता. तेथेच कोपऱ्यातल्या एका खुर्चीवर जाऊन बसलो. आता संपूर्ण हॉटेल माझ्या नजरेच्या टप्यात होतं. पांढराशुभ्र नेहरू शर्ट घातलेला, कपाळाला गंध लाऊन आपलं भलं मोठ्ठ पोट त्या खूर्चीत सांभाळून बसलेला तो मालक पाहून त्याही स्थितीत हसायला आलं. तेवढ्यात हॉटेलातला वेटर ऑर्डर घेण्यासाठी मोठ्या अदबिनं टेबला जवळ येऊन उभा राहिला. कोणत्या पदार्थाची ऑर्डर द्यावी हा प्रश्न पडला. लवकर काही सुचेना. मी लवकर सांगत नाही ते पाहून तोच म्हणाला, " बाबुजी, क्या लाऊ ! "


    एखादा पदार्थ खाऊन पोट भरण्यापेक्षा हॉटेलातले सर्व पदार्थ खाऊन तृप्त व्हावे असा एक विचार मनात आला. पण पोटाचं काय? एवढे पदार्थ पोटात टाकण्यासाठी देवानं त्या शेटजीएवढं भल मोठ्ठं पोट थोडच दिलं होतं. टेबलावरचं मेन्यू कार्ड उचललं आणि चांगल्या पाच सात पदार्थांची ऑर्डर दिली. त्या वेटरनं 

ऑर्डर ऐकली व मोठ्या चमत्कारिक नजरेंन माझ्याकडे असं पाहिलं की, वाटलं दोन ठेवून द्याव्यात त्याच्या मुस्कटात. पण देवाघरी जातांना पाप नको म्हणून आलेला राग मोठ्या मुश्किलीनं गिळला. थोड्याच वेळात त्याने आणलेल्या सर्व पदार्थांवर मनसोक्त ताव मारला अन् तृप्तीचा ढेकर दिला. बरेच पदार्थ उरले होते. वेटरने आणलेल्या बिलाचा आकडा पाहून तर घेरीच आल्यासारखे वाटले, पण सावरले स्वतःला. बिल दिले आणि मुठभर बडीशेप घेऊन हॉटेलच्या बाहेर पडलो. आता परत आत्महत्येचा विचार करु लागलो. कोणता मार्ग आधिक सुकर राहिल याचाच विचार करत चालत होतो. उंच टेकडीवरुन उडी मारण्याचा पर्याय सूचला, पण परवाच पेपरमध्ये वाचलं होतं की एका उंच टेकड्यावरुन स्वतःला झोकून देऊन एका इसमाने आत्महत्या केली पण त्याचे प्रेत कपारीत एका झाडाला अडकल्याने काढताच येत नव्हते. म्हणजे उंच कड्यावरुन जरी स्वतःला झोकून दिले तरी काम होईल पण जर आपलेही प्रेत कपारीत झाडाला अडकले तर किंवा प्रेतच सापडले नाही तर, आत्महत्या केली हे लोकांना कसे समजेल? त्यापेक्षा घरी जाऊन पंख्याला दोर लाऊन गळफास घेतला तर! म्हणजे मेल्यानंतर प्रेत घरातच असेल. सुरेखालाही अद्दल घडवल्यासारखे होईल आणि मृत्यूनंतर हेळसांडही होणार नाही. मग नाईलाजाने नव्हे तर जाणिवपूर्वक घरी जाण्याचा निर्णय घेतला. घरी दोरी लवकर सापडणार नाही म्हणून एका बंद होत असलेल्या दुकानदाराला विनंती करुन एक नविन दोरी विकत घेतली. गळ्याला फारसा त्रास होऊ नये म्हणून सूताची व मऊसर दोरी होती ती! आता माझ्या दृष्टीनं सर्व तयारी झाली होती. मनावरचं मोठ्ठं ओझं दूर झाल्यासारखं वाटत होतं. 


     आता एक शेवटची गोष्ट राहिली होती ते म्हणजे पत्र, शेवटचं पत्र, तेही बायकोला. दुकानातून चांगले डझनभर कागद घेतले. लाईट असलेल्या एका निवांत जागी बसून पत्र लिहीलं. अगदी सुरवातीपासून तर शेवटपर्यंत तिच्या सोबत घालवलेले क्षण. त्या क्षणांतून बहरलेलं प्रेम. त्या प्रेमाला लागलेली दृष्ट. सारं काही मोठ्या अलंकारिक भाषेत, काव्यात्मक रचनेत. मनाला जे जे वाटलं ते सारं काही त्या कागदावर उतरवलं, मन मोकळं झाल्यासारखं वाटलं. शेवटची नजर पुन्हा त्या पत्रावर फिरवली. माझे मलाच आश्चर्य वाटले, मी एवढं चांगलं लिहू शकतो याचं. हे पत्र जर जसेच्या तसे वर्तमानपत्रांनी छापले तर किती लोक हळहळतील एक चांगला लेखक गेला म्हणून. माझे मलाच हसायला आले. पत्राच्या शेवटी दोन महत्वाच्या ओळी लिहिल्या, " माझ्या मृत्यूबद्दल कोणालाही जबाबदार धरू नये. सर्वांना अखेरचा नमस्कार! " पत्राची व्यवस्थित घडी करून खिशात ठेवले. घड्याळात पाहिले रात्रीचे सव्वा दहा वाजले होते. मध्यरात्र होण्यास अजून अवकाश होता. तसाच उठलो. चालायला लागलो. चालता चालता एका ठिकाणी भाषणाचा आवाज ऐकायला आला. त्या दिशेने वळलो. व्यासपीठावर एका वक्त्याचं भाषण सुरू होतं.


      "...... फुल मग ते कुठलंही असो. उमलणं, फुलणं आणि आपला सुगंध दरवळत राहणं हा त्याला गुणधर्म. त्याचं आयुष्य तरी असं कितीसं. पण या अत्यंत क्षणभंगूर मिळालेल्या या आयुष्याचा ते कसं उपयोग करुन घेतं हे त्याच्याकडून शिकलं पाहिजे. मिळालेलं जीवन थोडं असलं तरी त्याचं दुःख करत बसण्यापेक्षा त्या थोड्याशा जीवनात जास्तीत जास्त आनंदी बनण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. या फुलांप्रमाणेच आपण आनंदी राहून इतरांचे जीवन फुलवले पाहिजे."

        

"पण फारच कमी माणसे या विचाराने वागतात. बऱ्याचजणांना तर आपले जीवन रूक्ष, अडचणीचे व कटकटिचे वाटत असते. असे लोक स्वतःलाच आनंद देऊ शकत नाही तर ते इतरांना सुख, आनंद देऊन दुसऱ्याच्या जीवनात , मनात सुगंध तरी कसा पेरतील ? हे लोक आपल्या ' स्व' ला, अगदी किरकोळ दुःखालाही इतके कवटाळून बसतात की मग त्यांना आपलं दुःख फार फार मोठ्ठं वाटू लागतं. आणि आपलं दुःख मोठं वाटू लागल्यावर इतरांचं दुःख त्यांना कवडीमोल वाटू लागतं यात शंकाच नाही. "

   

 त्या व्याख्यानमालेचं पहिलंच पुष्प आज व्याख्याता गुंफत होता. सर्व श्रोते त्याचा शब्द न् शब्द कानांनी टिपून घेत होते. वक्ता पुढे बोलत होता पण आता त्याकडे माझे लक्ष नव्हते. हवेतला गारवा जाणवत होता. डोक्यात विचारांचं काहूर माजलं होतं. वक्त्याच्या भाषणातला शब्द न् शब्द खरा होता. किती गहन अर्थ दडलेला आहे त्यांच्या भाषणात. मी विचार करत होतो. विचारांची दिशा भाषणामुळे बदलत होती. फुलाला मिळालेलं आयुष्य खरच किती क्षणभंगूर ! तरिही ते मिळालेल्या आयुष्याचा कसा उपभोग घेतं. आपण मात्र मिळालेलं चांगलं आयुष्य एका शुल्लक कारणासाठी वाया घालवतो आहे, ते सुद्धा आपल्याच माणसांना दुःखात टाकून. एका अघोरी विचारानं, सुरेखाच्या थोड्याशा अशा वागण्यानं आपला 'स्व' दुखावला गेला आणि केवढा मोठा अविचार आपलं मन करायला लागलं. मिळालेलं सोन्यासारखं जीवन आपण असं मातीमोल करायला निघालो.

       मन सुन्न झालं. पावलं नकळत घराकडे वळाली. बरीच रात्र झाली होती. दुरुनच घरासमोर जमलेली गर्दी दिसली. गर्दी पाहून मनात विविध शंकांच काहूर माजलं. मनात नानाविध विचारांची गर्दी झाली. आपण जो विचार करत होतो तोच विचार सुरेखाने तर केला नाही ना अशा कुशंका मनात यायला लागल्या. कारण मी जसा माझ्या अंहकाराला कवटाळून बसलो होतो तशी सुरेखाही तिच्या अंहकाराला.....

       

मला सुरेखाचा चेहरा डोळ्यासमोर दिसू लागला. तिचं माझ्यावरचं प्रेम आठवायला लागलं. तिनं असा अविचार नको करायला पाहिजे होता असं वाटायला लागलं. मी तिच्या जवळ पोहचण्याआधीच माझं मन जाऊन पोहचलं. हृदयाची स्पंदनं वाढली. डोळ्याच्या कडा ओलावल्या. घशाला कोरड सुटली. रात्रीच्या थंड वातावरणातही कपाळावर घामाने गर्दी केली. पावलांचा वेग वाढला. अश्रू अनावर झाले. मधला रस्ता गळून पडला. सुरेखाचा निश्चल देह दिसू लागला. मनाचं आक्रदंणं सुरू झालं. शर्टच्या बाह्यानांच डोळ्यातून बाहेर पडणारे अश्रू पुसले. कंपाऊंडच्या आत पोचलो. शेजारीपाजारी व मित्र मंडळी सर्वच जमा झालेले होते. माझ्याकडे आणि माझ्या अवताराकडे बघत होते. त्यांच्या नजरेवरनं मी काय समजायचो ते समजलो. सुरेखाच्या मृत्यूला आपणच जबाबदार आहोत. आपल्यामुळेच तिच्यावर ही वेळ आली. आपण तिच्याशी फार दुष्टपणाने वागलो. मला आणि माझ्या त्रासाला कंटाळून तिने आपलं जीवन संपवलं. असा अविचार तिनं कसा केला ?

        

मनात विचारांचे ढग दाटून आले. डोळ्यातून पुन्हा अश्रूंचा लोट आला. अंगातला त्राण संपला. मी तेथेच फतकल मारून बसलो. काय होत आहे अन् आता काय करायचं समजत नव्हतं. तेवढ्यात माझ्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला. मी वर बघितले तर तो रमेश होता. माझ्या ऑफिसातला माझा जीवलग सहकारी. त्याला पाहून रडू कोसळलं, सारं धुसर व्हायला लागलं. त्याने माझ्या डाव्या खांद्यावर ठेवलेल्या हातावर माझा उजवा हात ठेवत मी रडू लागलो. तो माझ्या समोर आला. दोन्ही तळव्यांवर उकिडवा बसून उजवा खांदाही थोपटू लागला. तोपर्यंत बाजूला उभे असलेले सारेजण माझ्याजवळ जमा झाले. एकाने माझ्या उजव्या दंडाला धरून मला उभे केले आणि कोणीतरी हात धरून घरात नेऊ लागले. मी जड अंतःकरणाने एक एक पाऊल टाकत हळूवार माजघरात जाऊ लागलो. शेजारच्या स्त्रिया शेजारधर्म निभवायला घरी जमल्या होत्या. मला पाहून त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत होते. तीरस्कार, हास्य, चीड, स्मीत, आश्चर्य असे विविध भावभावनांचे मिश्रण त्या चेहऱ्यांवर मला दिसत होते.


      आणि.... आणि अचानक ' ती ' समोरच भिंतीला पाठ टेकून बसलेली दिसली. रडूनरडून तिचे डोळे सुजले होते. मी आणलेल्या पैठणीच्या पदराने ती सारखी डोळे पुसत होती. अद्यापही तीचं माझ्याकडे लक्ष नव्हते. पण शेजारच्या मंदाकाकूंनी खुणावून जेव्हा माझ्याकडे बोट दाखवलं तेव्हा मला पाहिल्याबरोबर धावतच माझ्याकडे आली एखाद्या लहान लेकरासारखी. लख्ख अंधारात एखादी विज चमकावी आणि क्षणार्धात लुप्त व्हावी इतक्या वेगाने येत ती माझ्या बाहूपाशात स्थिरावली. आणि कोठे गेला होतात काहीही न सांगता सकाळपासून. एवढं विचारून हमसून हमसून रडायला लागली. मग मीही तिचं मस्तक छातीला टेकवून रडू दिलं तिला मनसोक्त. तिच्या त्या लांबसडक काळ्याभोर केसात प्रेमाने हात फिरवत जमलेल्या गर्दीला विसरून. तिचं माझ्यावरचं प्रेम पाहून सुखावत होतं माझंच मन आतल्या आत. आत्महत्येच्या विचारांचा निखारा मात्र तिनं पूर्णपणे विझवला होता आपल्या उष्ण श्वासात.


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance