सूर्योदय
सूर्योदय
सूर्योदय.
रात्रीची निरव शांतता संपून विविध पक्ष्यांच्या सुमधुर, सुगम किलबिलाटानं सारी सृष्टी जागी होते. आजूबाजूची टेहळणी करत सूर्योदय होण्यापूर्वी ब्राह्ममुहूर्तावर डोक्यावरचा सरळ, उभा लालभडक तुरा सांभाळत व टोकदार चोचीखालचा तसाच लालबुंद कल्ला हलवत कुकूऽऽऽचकू करत कोंबडा मोठ्या दिमाखात खुबीने बांग देतो, आरवतो. त्याने बांग देताच साऱ्या सृष्टीला प्रकाशमय करण्यासाठी उदयाचळी मित्र जणू लगबग करू लागतो. डोंगरा आडून लाल सोनेरी आभा उधळत रवीरायाचे रम्य आगमन होते. पाठोपाठ चिमणी, कावळा, पोपट, पारवा, कबूतर, कोकीळ, पावश्या, सुगरण, साळुंकी यासारखे अनेक नित्य परिचयाचे आणि तेवढेच अपरिचित असणारे
लहान मोठे काळे, पांढरे, हिरवे, तपकिरी, राखाडी अशा विविध रंगांनी सजलेले, नटलेले नानाविध पक्षी आपल्या सुस्राव्य, सुमधुर, सुस्वरांची एक विशिष्ट तान छेडून आपल्याच धुंदीत बेधुंद होऊन गात असतात, नाचत असतात, बागडत असतात. त्यांचे हे त्यांच्यासाठीच दंग होऊन चाललेले कर्णमधुर संगीत प्राकृतिक, नैसर्गिक, स्वाभाविक असते. आपापल्या सख्यासोबत्यांसह या झाडावरून त्या झाडांवर किलबिलाट करत शिवाशिवचा, पाठशिवणीचा खेळ खेळण्यात तल्लीन असतानाही ते सदा सजग, जागृत असतात. आपल्या चिमण्या पिलांना वाळलेलेे गवत, काटक्या, कापूस, पाने, पिसे यापासून बनवलेल्या विविध प्रकारच्या, आकाराच्या आपापल्या काळीकबरी सुबक घरट्यात, खोप्यात सुरक्षित ठेवून आपआपल्या गणगोतासह आपल्या पंखातील बळाच्या भरोशावर एका शिस्तीत उत्तुंग उंच भराऱ्या स्वच्छंदपणे नभांगणी सारे द्विज घेत असतात. निषेच्या अंगणात आभाळभर पसरलेल्या आणि रात्रभर लुकलुकणाऱ्या चांदण्या हळूहळू विरळ होत जाऊन रात्रभराचा शिणवटा घालवण्यासाठी जणू हलकेच चांदोमामाच्या सोबतीने लुप्त होतात. पाठोपाठ वटवाघुळे, घुबडासारखे निशाचर पाणथळ जागेत उंच वाढलेल्या वृक्षाच्या दाट पानांच्या आड, झाडाच्या ढोलीत किंवा मिळेल त्या नेहमीच्या, हक्काच्या निवांत अंधाऱ्या जागी सुरक्षितपणे विसावतात. पूर्वेकडून सावकाश सूर्य डोकवायला लागतो. त्या वेळी पूर्वदिशेला आभाळात होणारी विविध रंगांची उधळण एक वेगळीच नजाकत आणते. लाल, पिवळ्या, तांबड्या, केसरी रंगात सारा आसमंत न्हावून निघतो, चिंब होतो. अशा विविध रंगांनी न्हावून निघालेल्या आसमंतास आपल्या अंगा खांद्यावर तसलीच बहुरंगी, बहुढंगी फुले फुलवून, उमलवून विविध वृक्षलता तेजोमय भास्कराच्या या इंद्रधनु रंगांना जणू सकारात्मक प्रतिसादच देत असतात. जाई, जुई, चमेली, लिली, अबोली, मधुमालती, केवड़ा, मोगरा, चांदणी, तगर, जास्वंद, शेवंती, गोकर्ण, कर्दळ, झेंडू, गुलाब, बकुळ, चाफा, सोनचाफा, बोगनवेल, या सारखी नानाविध फुले सकाळ मंगलमय बनवत असतात. या मंगलमय वातावरणात आपल्या परीमलाने साऱ्यांना मोहित करत असतात. मंद धुंद सुगंध उधळत असतात. रात्रीच्या अंधारातच आपल्या सुगंधाने वेड लावणारी रातराणी, निशिगंध, रात्रीच बहरून पहाटे पहाटे आपल्या देठासह धरणीमातेच्या कुशीत मूकपणे विसावणारा केसरी देठाचा, पाच पांढऱ्या नाजूक पाकळींचा प्राजक्त आपल्या परिमलाने साऱ्यांना मोहित करून संपूर्ण वातावरण मंगलमय करत असतो. रात्रीच्या वेळी दूर कुठेतरी पडलेल्या पावसाच्या हलक्याशा सरींमुळे ओलावलेल्या मातीचा अनमोल परिमळ निवांतपणे वाहत असलेला वारा अविरत सर्वांपर्यंत पोहोचवतो. शेतातल्या, डोंगरदर्यातल्या नागमोडी पायवाटेवरील, माळरानावर पसरलेल्या हिरव्यागच्च तृणपात्यांवर रानफुलांसोबत तोल सांभाळून विराजलेल्या दवबिंदूंवर उगवत्या सूर्यदेवाची लाल तांबूस कोवळी किरणे पडताच नाजूक, इवलाले दवबिंदू क्षणभर मोहक मोत्यांचे विलोभनीय रूप धारण करतात. हलक्याशा स्पर्शाने तृणपात्यांवरून घरंगळत जाऊन आपले अस्तित्व रवी किरणांच्या चरणांशी अर्पण करून जणू क्षणभंगुर आयुष्यातही अति उच्च स्थान दिल्याबद्दल कृतकृत्य होऊन कृतज्ञता व्यक्त करतात आणि अलगद धरणीे मातेच्या कुशीत जाऊन विलीन होतात. जलाशयाजवळ वाढलेले गगनचुंबी वृक्ष आणि त्यास बिलगलेल्या नाजूक साजूक सुंदर लता आपले रूप सूर्यकिरणांमुळे चकाकणाऱ्या नितळ जळात न्याहळताना वाऱ्यासंगे फेर धरत जळास पुष्पे अर्पितात. तरुताटव्या वरील एखादं अवखळ, खट्याळ पाखरू विशाल जळाकडे झेपावून पाण्याला स्पर्शून जणू सूचिर्भूत होतं. वळणावळणांवरून वाहत, धावत, फेसाळत येत उंच कडेकपारी वरून स्वतःला झोकून देताना विलग झालेले असंख्य तुषार सूर्यकिरणांना सामावून घेत सप्तरंगात न्हाऊन जाताना आजूबाजूच्या वृक्षवेलींना मनसोक्त चिंब भिजवत एक अतुच्च संगीत बहाल करतात. मात्र हे संगीत ऐकण्यासाठी, परिमल अनुभवण्यासाठी, सौंदर्य टिपण्यासाठी पंचज्ञानेंद्रियांना सदैव जागृत ठेवून निसर्गाशी नातं जोडता आलं पाहिजे. प्रकृतीशी एकरूप होऊन प्रकृतीचं मंगलमय मांगल्य जपता आलं पाहिजे, जपलं पाहिजे. मांगल्य जपताजपता निसर्गाशी एकरूप होत जगता आलं पाहिजे.
