दुष्काळ
दुष्काळ


रात्रभर माझ्या डोळ्याला डोळा लागला नाही. राहून राहून एकच विचार मनात येत होता, पोरा बाळांचं काय? आता तर पावसाळा पण पूर्णपूणे संपला. मागच्या सारखाच दुष्काळ याही वर्षी. गेल्या वर्षी निदान थोडं फार धान्य तरी पिकलं होतं. त्यावर आजपर्यंत गुजराण चालली. गावातल्या इतरांचं तेव्हाच ऐकलं असतं अन् मी पण त्यांच्या सोबत गेलो असतो तर ही वेळ आलीच नसती. पण काळ्या आई प्रमाणे मीही त्याची वाट पहात बसलो चातकागत. तो आज येईल, उद्या येईल या एकाच आशेवर. पण त्यानं झुलवत ठेवलं शेवटपर्यंत.
या रणरणत्या उन्हात झाडाचा आसरा घ्यावा तर त्याचीही पानांनी केव्हाच साथ सोडली होती. ते बिचारे तरी काय करणार ? झाड आपलं पोट भरण्यात असमर्थ आहे हे समजल्यावर एक एक करत त्याला सर्व सोडून गेले. त्यात त्या झाडाचा तरी काय दोष. बिचाऱ्याला का कोठे जाता येतं ? आणि पानानांही नाव ठेवून काय उपयोग ? ते तरी काय करणार ? त्यांची सर्व मदार फांद्यांवर, फांद्यांची झाडावर, आणि झाडाची मुळांवर. पण जामिनिच्या पोटातच पाणी नाही तर बिचाऱ्या त्या तरी काय करणार ?
बाकी दुःखात कोणी कोणाचं नसतं हे मात्र खरं. नाहीतर या झाडांवर बसणाऱ्या असंख्य चिमण्या पाहून त्यांची किलबिलाट ऐकून कसं प्रसन्न वाटायचं. पण त्यांनीही आता त्याच्याकडे पाठ फिरवली. नियतीच अशी आहे ज्याच्याकडे पाठ फिरवली त्याच्याकडे पुन्हा ढुंकूनही पहात नाही.
आता मी नाही का इतके दिवस काळ्या आईसोबत डोळ्यात प्राण आणून त्याची वाट पहातोय.तो यावा, बरसावा, साऱ्यांना त्यानं आपल्या अमृत वर्षावानं तृप्त करावं म्हणून नवस करतोय.पण नाही, आभाळी फक्त काळे ढग दाटून येतात अन् गंमत पाहतात. तो येणार येणार म्हणून आनंदाने वाट पहातो पण हळूच हुलकावणी देऊन निघून जातो. आम्ही मात्र या तळपत्या उन्हात अजूनही कपाळाला आडवा हात लाऊन त्याची वाट पहातो, याच पानगळ झालेल्या झाडाखाली बसून नशिबाला दूषण लावत.
हाताला चाळा म्हणून त्या सुकलेल्या पानांना नकळत हातात घेतलं अन् झटकन मनात विचार आला या झाडासारखं आपण येथेच थांबलो तर या पानांसारखी हालत आपल्या लेकरांची होईल अन् हे आपल्याला या पानांसारखे सोडून गेले तर !
या विचारानं जीव अगदी कासाविस झाला. असला अभद्र विचार आपल्या मनात आलाच कसा म्हणून मनाला कोसलं . पण नुकताच कात टाकलेल्या सळसळणारा नाग जसा फणा काढतो तसा तोच विचार मनात फणा काढून बराच वेळ डसत राहिला. शेवटी निश्चय करून तसाच उठलो. घरी आलो, पोरगं तापानं आजही फणफणलं होतं. मन भडभडून आलं. निश्चय पक्का केला. रखमाला सामान आवरायला सांगितलं, तिला जास्त काही सांगितलं नाही. पण तिच्या चेहऱ्यावरचं समाधान खूप काही सांगून गेलं. सुरवातीलाच तिचं ऐकलं असतं तर .... आज ही वेळ आलीच नसती. हा तिच्या मनातला भाव माझ्या मनानं अचूक टिपला.
कुठं जायायचं हे निश्चित नव्हतं. आता गाव सोडायचं हे मात्र पक्कं ठरलं होतं. गावाच्या बाहेर घेऊन जाणाऱ्या रस्त्यांनी जेथे हिरवळ असेल, जेथे हाताला काम अन् पोटाला भाकर मिळेल तेथे जाऊन राहायचं हे निश्चित झालं.
सूर्य थोडासा कलतीला आल्यावर मनामध्ये कालवा कालव सुरु झाली. ज्या काळ्या आईनं आतापर्यंत आम्हाला सांभाळलं. पोटाला अन्न दिलं. ज्या गावात खेळलो, बागडलो, लहानाचा मोठा झालो, त्या गावाला, माझ्या भूमीला सोडून जावे लागणार म्हणून अंतःकरण रडत होतं. पण नियतीला कदाचीत हेच हवं होतं. उध्वस्त झालेलं माझं सर्व विश्व अधाशासारखं डोळे भरून पाहून घेत होतो. सर्वांना नम्रतेनं हात जोडले. सोडून जातोय म्हणून त्या परिसराची, वास्तूची, वास्तूपुरुषाची, पूर्वजांची, विहिरीवरल्या म्हसोबाची अन् घरातल्या विघ्नहर्त्याची मनोमन क्षमा मागितली. डोक्यात विचारांचं काहूर आणि डोळ्यात अश्रूचे महापूर दाटले होते. या आसवांचे थेंब माझ्या धरणीमायनं अलगद टिपले. पावसाने नाही पण माझ्या डोळ्यातून ओघळणाऱ्या आसवांनी ही धरणी, माझी माय भिजली. आक्रंदणारं मन थोडसं श्रांत झालं. रखमाला माझ्या मनाची घालमेल समजत होती. तिनं डोळ्यानच माझी समजूत काढली. तिच्या मनाची, घुसमटीची मलाही कल्पना होती. पण भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ होतं. पोरं तर आनंदातच होती, कोठेतरी जायायला मिळणार म्हणून. त्यांना बिचाऱ्यांना काय कल्पना असणार माझ्या अवस्थेची !
गोठ्यात गेलो. गोठा कसला ? कोंडवाडाच तो ! बैलं आणि बाजूला कोरडं वैरण तेथे होतं म्हणून त्याला गोठा म्हणायचं. त्यांचीही अवस्था वाईटच होती. एके काळी हिरव्या चाऱ्यांनं, सरकीच्या ढेपीनं, शेंगदाण्याच्या पेंडीनं , कडधान्याच्या भूशीनं अन् गोधनानं समृद्ध असणारा हा गोठा आज दुष्काळाच्या झळा भोगतोय. दुष्काळामुळे घटलेलं गोधन, खपाटीला लागलेली गोठ्यातल्या सर्जा राजाला पाहून आपण त्यांचे हाल करतोय या जाणिवेनं डोळ्यात पाणी तरळलं. आपल्या धन्याच्या डोळ्यात जमलेली आसवं पाहून त्या मुक्या जीवांच्या डोळ्यातही पाणी दाटलेलं जाणवलं. त्यांची एक एक आठवण एखाद्या चलचित्राप्रमाणे डोळ्यासमोरून सरकायला लागली . सर्जा राजा घरच्या गाईचे गोरे. अगदी लहानपणापासूनच अतिषय गोंडस अन् चपळ. शामीगोंडयात अन् कोणत्याही शर्यतीत ते पुढेच असायचे. अंगावर माशी जरी बसली तरी शरिर थरकाऊन ते तिला उडऊन देत. मारण्याची तर कधी वेळच त्यांनी येऊ दिली नाही. पोरं अगदी त्यांच्या शिंगाला धरून खेळत, त्यांच्या अंगावर बसत. सारंच त्यांनी सहन केलं आणि अजूनही करत आहेत. असंख्य अडचणीत दोघं भावडांनी सावलीसारखी साथ आम्हास दिली. त्यांच्या डोळ्यातल्या वाहणाऱ्या पाण्यामुळे त्यांचीही दया आली. एकेकाळी बाळसं धरलेल्या या सर्जा राजाची पोटं पार खपाटीला लागली होती. त्यांना इथच सोडून जाणं म्हणजे कृतघ्नपणा ठरला असता. त्यांनाही सोबत घ्यायायचं ठरवलं. त्यांचे हाल नको म्हणून. त्या ओसाड माळरानाला, दुष्काळाची अवकळा आलेल्या गावाला अन् त्या एकाकी झाडाला अखेरचं वंदन केले. नयनातून आसवांचा नकळत अभिषेक झाला.
गरजेपुरतं सामान-सुमान गाडीत टाकलं. शिल्लक असलेला कडबा गाडीत नीट रचला. वरनं एक जाडसर गोधडी अंथरली. तापानं फणफणलेलं पोरगं आता निमुट गाडीत येऊन बसलं. त्याच्या कपाळाला हात लाऊन पाहिला, ताप कमी झालेला होता. गाडी जुंपली. पुन्हा एकदा भिरभिरत्या नजरेनं परिसर डोळ्यात साठवला. रखमा अन् मोठं पोरगं त्यांचं मनही तेथेच रेंगाळत होतं. तयारी झालेली पाहून माझ्या माणसं नसलेल्या घराच्या दाराला कुलूप लाऊन न सांगता ते मुकाटयानं गाडीत येऊन बसले. निदान आपलं ओझं त्या मुक्या सर्जा राजाला नको म्हणून कासरा मोठ्या पोराच्या हातात देऊन मी सर्जा राजाला जुंपलेल्या गाडीच्या पुढे पायीच चालत निघालो. एखाद्या आज्ञाधारकाप्रमाणे मानेवर जू ठेवलेले माझे सुखदुःखातले साथीदार, जीवलग संवगडी निमूट माझ्या मागनं निघाले. त्यांच्या गळ्यातील घुंगरूंचा व लहानशा पितळी घटींचा आवाज ती स्मशान शांतता भेदत होती. एरवी मंजूळ वाटणारा तो आवाज आज मनाची घालमेल क्षणाक्षणाला वाढवत होता. बऱ्याच दिवसात चाकाला वंगण नसल्याने चाकातूनही कर्कश आवाज येत होता. मनात भीती, खिन्नता, उदासिनता या सर्वामुळे वाढत होती. गावापेक्षा शेतात थोडया फार पाण्याची सोय असल्याने गाव सोडून शेताचा आसरा घेतला होता. त्यामुळे गरिबीचा संसार पाठीवर घेऊन गाव सोडतांना कोणी पाहणारं नव्हतं. वणवण फिरतांना मायेच्या ओलाव्यानं या दुष्काळात पाझर फुटावा असं कोणी नव्हतं. कारण दुःखाची किनार जशी माझी तशी इतरांची होती.
एवढ्या वेळचा नाहिसा झालेला आमचा मोत्या. त्याची आठवणही आली नाही. पण आम्ही जातांना पाहून तो भूकंतचआमच्या मागून धावत आला आणि पायाशी लाडीगोडी करू लागला. जणू विचारत होता की कोठे निघालात सर्वजण ? मला एकट्याला टाकून ! पण त्यालाही परिस्थितीचं गांभिर्य कदाचित लक्षात आलं होतं. तो मुकाट आमच्या सोबत चालत होता. बिचारा मुका जीव. पण किती समजूतदार, एकनिष्ठ ! गावाची वेस केव्हाच ओलांडली होती. चांदणी रात्र संपून सूर्यनारायणाचं ते अपूर्व दर्शन झालं. रात्रभर किती अंतर कापलं कळलं नाही. पोरं गाडीत पेंगलेली होती. पोरानं कासरा गाडीच्या खुंटाला अडकवला होता. तरी सर्जा राजा माझ्या मागनं मुकाट दुष्काळामुळे उध्वस्त किनार लाभलेली माझी संसाराची गाडी माझ्या बायको पोरांसह ओढत होते. मोत्या माझ्यापुढं पन्नास साठ पावलांवर चालत जणू मला रस्ता दाखवत होता. माझ्या फाटक्या संसारांचं रक्षण करत होता. गावकोसात वाळल्या झाडांचे वैराणपण दुष्काळाची मरणकळा दाखवत होते. दुरवर काळे धोंडे ठिकठिकाणी पहुडले होते. त्यांच्या आसऱ्याला सुकलेलं काटेरी गवत आपल्या तुऱ्यांमध्ये बी सांभाळून वाऱ्याशी झुंजत होते. इतरत्र गवताची काडी देखील कोठे नजरेस पडत नव्हती. प्रत्येक झाडाखाली वाळल्या पानांचां खच दगड धोंडयात अडकून पडला होता. तर काहींना वाऱ्यानं दुरपर्यंत नेऊन सोडलं होतं. रात्रीचा शीतल गारवा नाहिसा होऊन हळूहळू उन्हं तापायला लागलं होतं. दूरवर पाण्याप्रमाणे भासणारे मृगजळ आमच्यावर हसत हुलकावणी देत होतं तर गाडीतल्या स्टिलच्या हंड्यातलं पाणी कच्या रस्त्यामुळे उसळ्या मारून बाहेर पडत होतं. एवढ्या दुष्काळातही कोणीतरी बांधून ठेवलेल्या हौदात पाणी भरून ठेवलं होतं. त्यातल्या शेवाळल्या पाण्यानेही गुरे आपली तहान भागवत होते. ठिकठिकाणी भेगाळलेली जमिन अमृत धारांसाठी आसुसलेली दिसत होती. या सर्व उदास आणि भकास वातावरणामुळे खिन्नता क्षणाक्षणाला वाढत होती.
तोच सर्जा एकाएकी खाली बसला अतिश्रमानं. उठवण्याचा जीवापाड प्रयत्न केला. पण.... पण सारं व्यर्थ. अन्न पाण्यावाचून पाय झाडून त्यानं जीव सोडला आपल्या धन्यासाठी. मी, पोरं आणि रखमानं धाय मोकलून रडून घेतलं त्या वैराणस्थळी. सोबतचा राजा आणि मोत्याही जणू मुकपणे दुःख पचवत होते. त्यांचे हाल नको म्हणून त्यांना सोबत घेतलं होतं. पण शेवटी हालच केले. त्यांनी केलेले उपकार कृतघ्नपणे विसरलो म्हणून लाज वाटली स्वतःची. मुठभर माती आणि ओंजळभर पाणी टाकून त्याला अखेरचा निरोप देऊन निघालो, त्याच्या साथीदाराला बैलगाडीसह तेथेच एका झोपडीत बसलेल्या म्हातारीच्या हवाली करून पायी परिवारासोबत मोत्यासह. फाटक्या गोधडीचे गाठोडे बांधून, गरिबीचा संसार पाठीवर घेऊन, माझ्या लेकरांसाठी. लेकरांच्या पोटासाठी, या दुष्काळापासून दूर. जड मनानं.... जड पावलानं....