वाट भाग-पहिला
वाट भाग-पहिला


भाग-पहिला
काहीतरी पडल्याचा भास झाला आणि मी झोपेतून दचकून जागा झालो. नाईट लॅम्पच्या मिणमिणत्या प्रकाशात डोळे चोळत पाहिले तर पहाटेचे सव्वा चार वाजले होते. रोज आठ नऊ वाजेपर्यंत झोपण्याची सवय असल्याने माझ्या मते दिवस उगवायला अजून बराच अवकाश होता. म्हणून मी पून्हा अंथरूणावर आडवा झालो. पण खूप प्रयत्न करूनही झोप येत नव्हती. झोप यावी म्हणून मनातल्या मनात अंक मोजायला सुरवात केली. उलट सुलट अंक शंभर वेळा म्हणून झाले. निद्रादेवी जणू आज माझ्यावर रुष्ठ झाली होती. शेवटी अंथरुणातच उठून भिंतीवरच्या घड्याळाकडे एकटक पहात बसलो. सेकंद काटा अविरत फिरत होता आणि मिनिट काटा सावकाश. तास काटा तर एकाच जागेवर बसून आहे असे वाटू लागले. घड्याळाकडे पाहतांना सहज एक विचार मनात आला. आपले जीवनही असेच आहे सेकंद काट्यासारखे. सतत धावणारं, धावूनही फारसं हाती न लागणारं. खूप धावलं तेव्हा मिनिट काट्यासारखं थोडं पुढे आल्यासारखं वाटतं. पण आपल्या सारखीच असंख्य धावणारी माणसे आपल्या आजूबाजूला पाहिली की आपण या गर्दितला अगदी शुल्लक भाग आहोत याची जाणीव पदोपदी अतृप्त मनाला होते. आपल्याला या तास काट्यासारखं स्थिर जीवन कधीतरी लाभणार का ? आपलंही आयुष्य म्हणजेच एक चक्रगती आहे. आयुष्यभर आपल्याला असंच धावावं लागणार का या गर्दितला एक भाग म्हणून. या बिनचेहऱ्यांच्या माणसांसोबत, भावनाशुन्य होऊन ! अर्थात तासकाटाही कोठे स्थिर आहे म्हणा ! त्यालाही पुढे पुढे सरकायचे असतेच . पण इतरांपेक्षा त्याची धावपळ मात्र कमीच. म्हणजे सर्वात सुखी कोण ? सेकंद काटा, मिनिट काटा की तास काटा ? म्हणजेच आपल्यासारखी धावपळ करणारी असंख्य माणसे, की त्यांच्या जीवावर धनाढ्य झालेले मुठभर धनिक. अर्थात या धनिकांना मनःशांती कोठे आहे म्हणा ! त्यांच्या मानाने माझ्या सारखे आपलं जीवन मस्त जगतात. मोठ्या आनंदात. आपल्याच मस्तीत. आजचा दिवस आपला समजून उद्याचं उद्यावर ढकलत बिनधास्त आयुष्य जगणं यातच खरी मौज आहे. जे अंधकारमय आणि पूर्णपणे अनिश्चित आहे त्या भविष्याचा विचार तरी कशाला करायचा ? माझ्या मते तर, माणसाने जास्त विचारच करू नये. नुसता विचार केला तरी तो विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी धडपडू लागतो आणि धावत सुटतो इतरांना पायदळी तुडवून. आपलं इप्सित साध्य करण्यासाठी या सेकंद काट्यासारखं ! आपण मात्र धावायचं नाही. मस्त जगायचं. आपल्याच मस्तीत, मनाला पटेल तसं, रुचेल तसं, आपल्याच धुंदित !
माझी नजर अजून घड्याळावरच होती आणि माझे मलाच हसू आले. पाच वाजले होते आणि माझ्या मनात अजून घड्याळच होते. विचार करायचा नाही असा विचार करूनही मी विचारच करत होतो. मात्र आता तो विचार जाणीवपूर्वक दूर सारुन अंथरुणातून बाहेर पडलो. गॅलरित येऊन उभा राहिलो. वाऱ्याची मंद गार झुळूक अंगाला जाणवत होती. आभाळात परतीच्या वाटेवर असणाऱ्या तुरळक चांदण्या दृष्टीस पडत होत्या. त्या थंड वाऱ्याचा स्पर्श शरिराला होताच हाताची घडी घालून शांतपणे त्या ठिकाणी दूरवर बघत उभा राहिलो. हळूहळू पूर्वेला तांबड फुटायला लागलं. आकाशात विविध रंगांची मुक्तपणे उधळण झाली. जणू काही विविध रंगांची उधळण करत निसर्गाने सुर्यदेवतेचं स्वागत केलं. पूर्वेकडून लालसर तांबूस रंगाचा गोळा हळूहळू वर येत होता. त्याचं ते आगमन मोठं मोहक होतं. त्याच्या आगमनाला भिऊन रात्रीचा अंधार कोठल्या कोठे पळाला होता. साऱ्या धरतीवर रविकिरणांचं साम्राज्य पसरलं होतं. ताजेतवाने होऊन द्विजगणांनी आपआपली घरटी सोडली होती. मोकळ्या आभाळी मस्तपैकी गात त्यांचं विहंगणं सुरू होतं. माझ्यासाठी नविन असणारं हे सारं वातावरण कसं एका क्षणात प्रसन्न झालं होतं.
तेवढ्यात टेबलावर शांतपणे विसावलेल्या टेलिफोनची रिंग शांततेचा भंग करीत कर्कशपणे वाजली. एवढ्या सकाळी कोणाचा फोन म्हणून गॅलरितून धावत आलो, रिसिव्हर उचलला.
"हॅलो ...ss हॅलो...ss कोण ?" मी विचारले.
"हॅलो... ss, मी दामू अण्णा बोलतोय."
"अण्णा तुम्ही ! आणि इतक्या सकाळी सकाळी ..... ! सगळं ठिकठाक आहे ना... !" मी घाबरून विचारलं.
"हो .... ss, हो.... ss , इकडे सारे ठिक आहे. मी आज तुझ्याकडे येतोय. रविवार असल्याने तुला सुट्टिच असेल." अण्णांनी एका दमात सांगून टाकलं.
"हो, आज सुट्टिच आहे. तुम्ही कोणत्या गाडीने येत आहात ते सांगा म्हणजे मी तुम्हाला घेण्यासाठी येतो." मी आत्मियतेनं उत्तरलो.
"नाही, नाही ! त्याची काही आवश्यकता नाही. तू घरीच थांब. मला तुझ्याशी थोडं महत्वाचं बोलायचं आहे. मी दहा वाजेपर्यंत तुझ्याकडे पोहचतो."
"महत्वाचं ? म्हणजे नेमकं कशाबद्द्ल ?"
"ते मी तेथे आल्यावर सांगतो." असं म्हणून अण्णांनी फोन डिस्कनेट केला.
हे अण्णा म्हणजे असेच ! जे काही सांगायचं ते लगेच स्पष्टपणे कधीच सांगणार नाही, सारं काही आडवाटेने. त्याच्या मनात काय चालतं याचा थांगपत्ता कोणालाच लागत नाही. काही माणसे अशी का वागतात कुणास ठाऊक. आता ते येईपर्यंत डोक्यात विविध शंका कुशंका घर करतील. कारण हे अण्णा म्हणजे काही विशेष काम असल्याशिवाय कोणाकडे जात नाहीत. आणि आज चक्क माझ्याकडे. तेही पूर्वसूचना देवून. म्हणजेच नक्की काहीतरी सिरिअस मॅटर दिसतय.. त्यांची वाट पाहण्याशिवाय गत्यंतर नव्हतं.
आज करुणाला भेटायचं ठरवलं होतं. पण या अण्णांच्या फोनमुळे जरा अस्वस्थ वाटायला लागलं. तसे दामू अण्णा कोणी जवळच्या नात्यातले नाहीत. पण वडिलांचे ते बालपणीचे मित्र. गावी आमच्या धाब्याच्या घरापासून जवळच त्यांचं टूमदार कौलारू घर होतं. घराबाहेरच्या अंगणात एका बाजूला गुलमोहराचं झाड आणि दुसऱ्या बाजूला आंब्याचं झाड त्यांच्या त्या कौलारू घराची शोभा वाढवी. ते आंब्याचं झाड त्यांनी त्यांच्या लहानपणी लावलं होतं म्हणे. त्यांचा बहूतेक वेळ घरात राहण्याऐवजी घराबाहेरच जाई. उन्हाळ्याच्या दिवसात आंब्याच्या दाट सावलीत ते व त्यांचे मित्र गप्पा मारत बसत. नाहीतर पत्यांचा डाव ते रंगवत. कोणी सोबती नसेल तर आपला मोडकी खाट आंब्याच्या झाडाखाली टाकून ते आरामात लोळत. बऱ्याचदा ते घरी नसले किंवा बाहेरगावी गेलेले असले की आम्हाला ती मोठी पर्वणीच वाटायची. आजूबाजूचे दगड घेऊन आम्ही कैऱ्या पाडायचो, नाहीतर झाडावर चढून कैऱ्या तोडायचो.
अण्णा काही दिवसांपूर्वीच माझ्याकडे येऊन गेले होते. त्यांना खोली माहीत आहे म्हणून मी निश्चिंत होतो. अर्थात मी ज्या ठिकाणी राहत होतो त्या खोल्याही अण्णांसारख्याच वयस्कर झाल्या होत्या. पण कमी भाड्यात व जरा निवांत स्थळी असल्याने त्या मला आवडल्या होत्या. खानावळही जवळच होती व घरमालकही स्वभावाने खूप चांगला होता. मी एकटाच असल्याने घरातील वस्तू देखील त्यांचे नेहमीचे स्थान सोडून आरामात इतरत्र पहूडल्या होत्या. थोडेसे घर आवरावे असे मनात आले. पण अण्णांचा फोन आल्याने ते का येत असावेत या विचाराने काहीच करावेसे वाटत नव्हते. भिंतीशी ठेवलेला जुना फिलिप्स् चा रेडीओ लावला. राजेश खन्नाच्या 'आप की कसम' मधील आनंद बक्षींचं, किशोर कुमार यांनी स्वरबद्ध केलेलं ' जिंदगी के सफर में गुजर जाते है जो मकाम, वो फीर नही आते, वो फिर नही आते हे गीत सुरू असतांनाच अंघोळीला गेलो. पण या गीतानं अण्णांचा विचार काहीसा बाजूला पडून मी माझ्या तितकासा चांगल्या नसलेल्या आवाजात पुढे गाऊ लागलो. ' 'फुल खिलते है I लोग मिलते है I मगर पतझड में जो फुल मुरझा जाते है I वो बहारो के आनेसे खिलते नही |' गात असतांनाच करूणाची परत एकदा आठवण होऊन मन उदास झाले. पटापट अंघोळ उरकली. तयार झालो. तेवढ्यात जिन्यात आवाज आला. आमच्या घराचा जीना लाकडी पण जुनाच. सागवानी असल्यानं अजूनही त्यानं आपलं अस्तित्व टिकवलं होतं. त्याच्यावरुन येतांना- जातांना आवाज येई. त्यामुळे कोणीतरी आलं हे न पाहताही कळे.
साडेदहा वाजले होते. खिडकीतून उघड्या जिन्याकडे पाहिलं तर अण्णा आपल्या डाव्या हातात धोतराचा उजवीकडचा सोगा पकडून उजव्या हाताने पिशवी व छ्त्री सांभाळीत जीना चढत होते. त्यांच्या हातातली छत्री पाहून हसू आले. कारण ऋतू कोणताही असो, अण्णांच्या हातात छत्री असायलाच हवी. सत्तरीकडे झुकलेले अण्णा अजूनही काठीचा आधार न घेता ताठ चालत. पांढरे शुभ्र धोतर, त्यावर शर्ट. बिना इस्त्रीचा पण स्वच्छ धुतलेला. गळ्यात शबनम, दात पडल्यामुळे गाल आत गेलेले, लांबसडक नाक, त्याखाली झुबकेदार पांढऱ्या मिशा, केसं नसलेलं त्यांचं गुळगुळीत टक्कल, असे गौरवर्णाचे साडे पाच, पावणेसहा फुटाचे अण्णा एक एक पायरी सावकाश चढत होते. मी दरवाजात येऊन आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे हसून त्यांचं स्वागत केलं. हातातली छत्री, पिशवी घ्यायला लागलो तेव्हा मानेनेच नाही म्हणत, दाराशी आपल्या वाहणा काढत 'राम कृष्ण हरी' म्हणत ते माझ्या आधी आत आले व संगित खर्चीमध्ये जसे पटापट खर्ची सांभाळतात त्याप्रमाणे माझ्या खोलीतल्या एकूलत्या एक खर्चीचा अण्णांनी ताबा घेतला. आपल्या हातातील ती जूनी छत्री व पिशवी खूर्चीजवळ खाली ठेवली. आपल्या गळ्यातील शबनम काढून मांडीवर घेतली. बसल्या जागेवरून एकवार खोली न्याहळली. भिंतीशी लावलेला रेडीओ सुरूच होता. मी आतल्या खोलीत जाऊन त्यांच्यासाठी एक तांब्या, ग्लास भरून थंडगार पाणी घेऊन आलो. त्यांनी आपला उजवा पाय उचलून डाव्या पायावर ठेवला. माझ्या हातून दोन्ही हातात तांब्या व ग्लास घेऊन किंचितसे वर पाहिले. मला वाटलं ते खोलीच्या छताकडे पाहत आहेत. पण एखाद्या भांड्यात वरुन पाणी ओतावं त्याप्रमाणे त्यांनी आधी ग्लास व नंतर तांब्या आपल्या घश्यात रिकामा केला. मला मात्र कधीच तसं पाणी पिता आले नाही. रिकामी झालेली भांडी माझ्या हाती देत उजव्या हाताने आपल्या धोतराचे टोक धरून त्यांनी ओठांवरून व चेहऱ्यावरुन फिरवले. माझ्याकडे पाहत किंचितसे स्मित करुन म्हणाले, "मला असं अचानक आलेलं पाहून तुला आश्चर्य वाटलं असेल ना !"
"नाही, नाही ! अचानक कसे ? तुम्ही सकाळी फोन केला होता ना ! त्यामुळे वाटच पाहत होतो." मी चाचरत म्हणालो.
त्यावर कुठलीच प्रतिक्रिया न देता ते खिडकीतून बाहेरचं दृष्य पाहत शांत बसून राहिले. मला मात्र एक एक क्षण अवघडल्यासारखं वाटत होतं. कदाचित ते शब्दांची जुळवाजुळव करत असावेत. ते चहा घेत नाहीत हे माहित असूनही ती शांतता असह्य झाल्याने मी म्हणालो, "अण्णा बसा हं ! मी आपल्यासाठी चहा आणतो."
तेवढ्यानं त्यांची तंद्री भंगली. ते माझ्याकडे न पाहताच उत्तरले, "नाही ! नको ! मी चहा घेत नाही."
मी तसाच उभा असलेला पाहून त्यांनीच बोलायला सुरवात केली, "सागर ! मी तुझ्याकडे आज आलोय ते एका वेगळ्या कारणासाठी. कदाचित तुला आवडेल की नाही सांगता येत नाही. पण मला राहवलं नाही. म्हणून इथपर्यंत आलोय."
"अण्णा, असं का म्हणता ? तुमचा माझ्यावर अधिकार आहे. माझ्या वडिलांचे तुम्ही स्नेही. माझ्या आप्पांइतकेच तुम्ही मला आदरणीय आहात. तुम्हाला जे काही सांगायचं आहे, ते मोकळेपणाने सांगा."
क्षणाक्षणाला माझी उत्कंठा वाढत होती.
क्रमशः