gurunathterwankar

Abstract Inspirational

3.8  

gurunathterwankar

Abstract Inspirational

शेपलेस

शेपलेस

12 mins
884


  रोजच्या प्रमाणे मावशी ने चहाचा कप आणि ब्रेकफास्ट रिया समोर ठेवला आणि नेहमीचच काहीतरी पुटपुटली. रिया मात्र न्युजपेपरमध्ये डोक खुपसून काहीतरी वाचण्यात दंग होती. तिने मावशीकडे पाहिलं सुद्धा नाही. मावशीला ही त्याच काहीच वाटलं नाही. ती बाजूच्या टेबलावर ठेवलेली फिश फूड ची बरणी घेऊन फिश टॅंक जवळ गेली. हल्ली रिया च्या ह्या फिश टॅंक ची सगळी देखभाल मावशीच ठेवत होती, ते रंगबेरंगी वेगवेगळ्या आकाराचे मासे मावशीचे मित्र झाले होते, मावशीला त्या माश्यांच्या प्रजाती बिजातीची कुठलीच माहिती नव्हती, तिने त्यांच्या रंगावरुन आणि आकारावरून त्यांना तिला हवी तशी वेगळी वेगळी नाव ठेवली होती. कुणाला काळ्या म्हणी तर कुणाला पांढऱ्या, कुणाला चपट्याच म्हणी तर कुणाला ढोल्या आणि वेगवेगळ्या अंगाढंगाचे ते जलचर जीव ही बहुतेक मावशीला आता ओळखू लागले होते. सकाळी मावशी ने रिया समोर चहा ठेवला की ह्यांना फिशफूड ची चाहूल लागे. असेल कदाचित, माणसांपेक्षा लवकर प्राण्यांनाच माणसांचा लळा लागतो. 


     आज रिया पेपर वाचण्यात जरा जास्तच गुंगून गेली. मावशी कधी निघून गेली, वाफाळलेला चहा कधी गार झाला आणि मावशीच्या हातच्या शिऱ्याची चव किती माश्या चाखून गेल्या ह्या कशाचाच तिला थांगपत्ता नव्हता. अचानक पेपर बाजूला ठेवून ती मग बेड शेजारच्या दिवाणासमोर जाऊन उभी राहिली, आरशात स्वताला पाहू लागली, वरून खाली.. खालून वर, दोनदा तीनदा ..पुन्हापुन्हा.. अनेकदा अस न्याहाळून झालं, चेहर्यावर एक प्रकारची चीड होती आणि अगतिकता ही. रिया लहानपणा पासून जराशी लठ्ठच होती, खरतर जराशी लठ्ठ म्हणणं हे अंडरस्टेटमेंट केल्या सारखच आहे. अगदी सुरुवातीला गुडगुडीत बाहुली म्हणून सगळ्यांनी खूप लाड केले, पण वाढत्या वयाबरोबर लठ्ठपणा वाढतच गेला. तशी नाकीडोळी नीटस, गोरा वर्ण, अभ्यासात ही रिया बर्यापैकी हुशार. सुंदर चित्र काढायची, ओरिगामी ची कला शिकलेली ,त्याच्या शिकवण्या घ्यायची, स्वभाव ही सहज सरळ, त्यामुळे रिया चा मित्र परिवार ही खूप मोठा होता, कधी एकटी वगैरे नव्हती ती, लठ्ठपणा वरून कोणी काही बोलल तरी ती अगदी स्पोर्टिंगली घ्यायची. बरं लठ्ठपणा कमी करण्यासाठी तिने बरेच प्रयत्न केले होते, सुरुवातीला कडक डाएट फॉलो केलं, जिम झाली, डॉक्टर्स झाले काही एक्स्पर्टस च्या ट्रीटमेंट घेऊन झाल्या पण लठ्ठपणाने तिची साथ काही सोडली नाही. कधी कधी काहीजणांना जेनेटिकली च लठ्ठपणाची देणगी मिळते. रिया ही त्यातलीच एक असावी.


 गेल्या काही दिवसांपासून रिया थोडी उदास आणि एकटीएकटी राहू लागली होती. कॉलेज वरून लवकर घरी यायची, घरी आल्यावर पण मावशीशी पूर्वी सारख्या गप्पा नाहीत, कॉलेजातील गमती तिच्याशी शेअर करन नाही, सतत काहीतरी वाचत राहायच किंवा लॅपटॉप समोर ठेऊन उगाच काहीतरी रँडम सर्फिंग. माहीत नाही आज अचानक पेपरमध्ये अस तिला काय दिसल ज्याने ती एवढी अस्वस्थ झाली. पेपरच्या तिसऱ्या चौथ्या पानावर कुठेतरी तिने एक जाहिरात वाचली, चाळीस दिवसांत दहा किलो वजन कमी करा... सोबत तज्ञ सल्लागारांच्या काही मोजक्या टिप्स आणि यशस्वीतांच्या टेस्टीमोनिज. अर्थात रिया अश्या जाहिरातींना बळी पडणारी मुलगी कधीच नव्हती. कोणत्याही गोष्टीचा नीट विचार करून मग निर्णय घेण्याच शहाणपण तिच्यात होत. मग नेमक आज अश्या कागदी जाहिरातीने एवढं बैचेन होण्याच कारण काय होत.


    विवेक रियाचा शाळेपासूनचा मित्र, दोघांनीही एकाच कॉलेजला ऍडमिशन घेतले आणि आता फायनल इयर ला दोघांनीही झूलॉजि मेजर सब्जेक्ट ठेवला होता, दोघांच्या हॉबीज जरी भिन्न असल्या तरी दोघांचे स्वभाव हे एकमेकांना पूरक, रिया अभ्यासाकडे झुकणारी, चित्रकला, हस्तकला अश्या विषयांमध्ये रमणारी. विवेक शाळेपासून मैदानी खेळात हुशार, अथेलेटिक मध्ये राष्ट्रीय स्पर्धांमध्ये बक्षीस मिळवलेला, स्पोर्ट्स सायन्स मध्ये त्याला स्पेशलायजेशन करायचं होतं. दोघेही खूप छान मित्र. एकमेकांच्या आवडीनिवडी समजून घ्यायचे एकमेकांना नेहमी प्रोत्साहीत करायचे. आयुष्याच्या ह्या वळणावर रियाला तिच्या आयुष्यातला सर्वात जवळचा मित्र विवेक वाटू लागला होता आणि दोघांच्याही नात्यात खरच तेवढी सहजता ही होती. रिया चे आई बाबा ती खूप लहान असताना अपघातात गेले. त्यानंतर मावशींने स्वतःच्या संसाराचे स्वप्न बाजूला ठेवून लहानग्या रियाला आईच्या ममतेने सांभाळले, मोठे केले. मावशी, कॉलनी आणि शाळा कॉलेजातील मित्रमंडळी हीच रियाची दुनिया होती आणि ह्याच दुनियेतील विवेकपाशी येऊन रियाला हल्ली सर्व प्रश्नांची उत्तरे मिळत, स्वप्नांना उभारी मिळे, कल्पनांना प्रोत्साहन मिळे, एक उत्साह, स्फूर्ती .... किंवा त्याहून वेगळी अशी एक ऊर्जा तिच्यात प्रवाही होई. ह्यालाच बहुदा प्रेम म्हणत असावे अशी तिची खात्री ही झाली. फर्स्ट सेमिस्टरच्या लास्ट पेपरला ती विवेक ला भेटली. कॉलेज कॅन्टीनच्या मागच्या कट्ट्यावर बसून तिने विवेक ला आपल्या भावना सांगितल्या, बर तिला कुठल्याही उत्तराची अपेक्षा नव्हती, तिला फक्त हृदयात साचलेल्या ह्या भावनांना प्रवाही करायचं होतं. विवेक ने ही शांतपणे सगळं ऐकून घेतलं.. त्याच्या चेहर्यावर कुठलीच प्रतिक्रिया नव्हती.. "इट्स नेचरल, होत अस" एवढं बोलून तो हसला आणि मग दोघेही घरी निघाले. 


    पण त्या दिवसानंतर त्याच्या वागण्यातला बदल रियाला जाणवू लागला. बोलणं कमी झालं, भेटीगाठी कमी झाल्या, कॉलेजात अगदी समोरासमोर आले तर जुजबी बोलण. रियाला ह्यात विवेक च काही चुकत आहे असं नाही वाटल.. उलट तो खूप मॅचुरीटिने रीऍक्ट झालाय अस तीने स्वताला कनविन्स केल. राहून राहून तिला एकच वाटत राहील की विवेक आणि तिच्या मध्ये कदाचित.....कदाचित नव्हे नक्कीच तिचा लठ्ठपणा आला होता. आयुष्यात पहिल्यांदाच रियाला आपल्या ह्या लठ्ठपणाची चीड आली होती. आपणच का? असा प्रश्न ती सारखा स्वताला विचारत होती. हे असं बेडभ शरीर कशाला कोणाला आवडेल? सध्याच्या वेल प्लॅनड दुनियेमध्ये अश्या शेपलेस माणसांना कोण कशाला ऍक्सेपट करेल? आणि आपण तरी स्वताला का दुसर्यावर लादाव ? असे अनेक प्रश्न रियाच्या मनाला टोचत होते, काही प्रश्न वास्तववादी होते ही ...पण बरेच प्रश्न असे होते जे ती मुद्दाम स्वतःच्या मनाला घायाळ करण्यासाठी विचारात होती. आयुष्यात एवढी निराशा तिने कधीच अनुभवली नव्हती. पहिल्या प्रेमात मिळालेल्या नकाराने तिला तिच्या लठ्ठपणाची जाणीव करून दिली होती का? तर तस नव्हतं ... समज यायला लागल्यापासून रिया ला ह्या लठ्ठपणाची जाणीव होत होती.. पण तिच्या सहज सरळ अश्या फ्रेंडली नेचर मुळे तिच्याशी जोडली गेलेली मित्र मंडळी तिच्यापासून कधीच दूर गेली नव्हती. त्यामुळे आपण आहोत तसे सगळे आपल्याला स्वीकारतात असेच तिला वाटत होते आणि त्यातल्याच एका सगळ्यात जवळच्या मित्रामध्ये तिच्या नकळत तिचे मन गुंतले. पण ह्या भावनेला एखाद मूर्त रूप देण्याची आता कुठलीच शक्यता उरली नव्हती. जी मैत्री होती त्यात देखील अंतरे आली. आपल्या मध्ये अशी काय कमी आहे ? हा प्रश्न जेव्हा ती आरश्यासमोर उभी राहून स्वताला विचारे, तेव्हा तिची नजर तिला तिचे ते बेढब, शेपलेस शरीर दाखवी. आजही ती त्याच आरश्यासमोर उभी होती, आज ही मनात ते सगळे प्रश्न तसेच होते ,पण आज मनात ह्या लठ्ठपणाबद्दल नुसती चीड नव्हती.... तर आज तिच्या चेहर्यावर एक निश्चयाची झलक दिसून येत होती, आज तिने निर्धार केलेला दिसत होता लढण्याचा... ह्या लठ्ठपणाशी .. आणि त्याला काही करून हरवण्याचा..


  रिया ने जाहिरातीत दिलेली वेबसाईट लॅपटॉप वर ओपन केली. लक्षपूर्वक एक एक कॉलम वाचत गेली. आवश्यक ती माहिती तिने आपल्या डायरी मध्ये लिहून घेतली. थोड्यावेळाने जाहिरातीत दिलेला कॉन्टॅक्ट नंबर डायल करून तिने सविस्तर माहिती मिळवली. संध्याकाळची अँपॉइंटमेंट ठरवली. संध्याकाळची अपॉइंटमेंट उरकून रिया रात्री घरी आली ती बरचस सामान घेऊन. आता हे काय आणि नवीन खूळ ! ह्याच आविर्भावात मावशीने तिच्याकडे पाहिले. पण ती काहीच बोलली नाही, जेवणार आहेस ना? एवढा एकच प्रश्न तिने विचारला... तोपर्यंत रिया दोन हातात दोनदोन अश्या चार पिशव्या घेऊन कीचन मध्ये गेली.. चाळीस दिवसाच्या प्लानिंग मध्ये लागणार डाएट रिया बहुतेक एकदमच घेऊन आली होती. जणू चाळीस दिवस रिया घराबाहेर पडणारच नव्हती. डायट कंट्रोल प्लस फिजिकल एक्सरसाईज असा एकंदर चाळीस दिवसांचा कार्यक्रम होता. दहा किलो वजन कमी होण्याची खात्री.. रिया ला हा वेट लॉस प्रोग्राम पटला होता... तिला पटला होता म्हणण्यापेक्षा तिला तिच्या लठ्ठपणाशी लढण्यासाठी अश्या कुठल्या तरी नियोजित दिनचर्येची गरज होती. रात्री झोपण्यापूर्वी तिने हॉल मध्ये लावलेले एक कॅलेंडर काढून स्वताच्या बेडरूम मध्ये आणून लावले. उद्यापासून पुढे असे चाळीस दिवस मोजून त्या तारखे भोवती मार्कर ने एक वर्तुळ काढले. "ह्या तारखेला माझं जास्तीत जास्त वजन कमी झालेल असेल" असच काहीतरी ती तेव्हा मनाशी पुटपुटली असेल. बाजूच्या टेबल क्लॉक मध्ये पहाटे पाचचा अलार्म सेट केला, नेहमी प्रमाणे आपली उशी उभी करून मध्ये दुमडली आणि मानेखाली घेतली आणि पडल्या पडल्या बाजूचे स्विच ऑफ करून दिवे घालवले. उद्यापासून चाळीस दिवस ती खूप मेहनत घेणार होती आणि आपल्या ध्येयापर्यंत काहीही करून पोहचणार होती.


     सकाळी पाचचा अलार्म होण्याआधीच रिया ला जाग आली होती. पटापट तिने आवरलं आणि शेड्युल मध्ये दिलेल्या स्ट्रेचिंग एक्सरसाईज घरीच उरकून घेतल्या मग मॉर्निंग वॉक ला बाहेर पडली, भराभर पावलं उचलत ती घरासमोरच्या रस्त्याने शक्य होईल तितक्या वेगात पार्कच्या दिशेने निघाली. पार्क मध्ये पोहचेपर्यंतच ती घामाने भिजून गेली होती. पार्कच्या एका बेंचवर ती थोडावेळ बसली, हातातल्या फिटनेस बँड वर तिने किती स्टेप्स झाल्या, किती कॅलरी बर्न झाल्या ह्याची सहज माहिती घेतली, तीन चार दीर्घ श्वास घेतले आणि पुन्हा वॉक चालू केला. ठरवून दिलेल्या वेळेमध्ये वेगानं चालणं अपेक्षित होत आणि रिया ही तिची सर्व शक्ती पणाला लावणार होती. चाळीस मिनिट्स वेगाने चालणं, पार्कच्या जवळ जवळ पंधरा वीस फेऱ्या नक्कीच होणार होत्या. कपाळावरून ओघळणार्या घामाच्या धारा डोळ्यामध्ये जात होत्या, मध्येच दृष्टी अंधुक झाल्यागत वाटे, पण चालणं काही थांबत नव्हत, हातातल्या नॅपकिन ने तोंड पुसून रिया रस्ता तुडवत होती. वॉक झाल्यावर ती एका बाकावर शांत बसली, डोळे मिटून ...काही मिनिटे कसलासा विचार करत. घरी आल्यावर तिने डायट मध्ये लिहून दिल्या प्रमाणे स्वतःसाठी ज्युस आणि ब्रेकफास्ट रेडी केला, कॉलेज साठी घेऊन जायचा टिफिन ही स्वताच तयार केला.. मावशी ने दोनदा तीनदा किचन मध्ये डोकावून पाहिलं, पण रिया ला काही विचारण्याची तिची हिम्मत झाली नाही.


कसल्याश्या विचारामध्येच मावशीला बाय करून रिया कॉलेजसाठी बाहेर पडली. सकाळ च्या एक्सरसाईज चा क्षीण तिच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. बसमध्ये पाच दहा मिनिटांसाठी तिचा डोळा ही लागला, पण चाळीस दिवसांनंतर ची तारीख तिच्या डोळ्यासमोर आल्या सारखी ती दचकून उठली. कॉलेजातील लेक्चर आटपून ती सरळ त्या जिम मध्ये जाणार होती. तिथे तिचा चाळीस दिवसांचा वर्क आऊट प्रोग्राम तिची वाट बघत होता. कॉलेजातून रिया थेट जिम मध्ये गेली. पहिल्या आठवड्यात कार्डीओ मग वेट एक्सरसाईज आणि शेवटी स्ट्रेचिंग हा शेड्युल ठरला होता. एकही रिपिटेशन न चुकवता रिया ने सगळ्या एक्सरसाईज पूर्ण केल्या. थोडी दमछाक झाली तिची, पण ती गिव्ह अप करणार नव्हती, ती थांबणार नव्हती. मावशी घरी रियाची वाटच बघत होती, रिया आल्या आल्या तिने तिला काही विचारले नाही. पण रियाने जेव्हा मावशीला सांगितल की, "मी आज रात्री फक्त वेजीटेबल सूप पिणार आहे", तेव्हा न राहवून मावशीने विचारलच," रिया ! हा सगळा नक्की काय प्रकार चालू आहे". रिया ने ही जास्त खोलात न जाता, "अग, वेट लॉस प्रोग्राम फॉलो करतेय", एवढंच सांगितल. दिवसभरातल्या व्यायाम प्रकारांनी रियाच अंग आता चांगलच थकून गेल होत. टाचा आणि पोटऱ्या चांगल्याच गच्च झाल्या होत्या. शरीराच्या सर्व स्नायूंवर एक ताण जाणवत होता.पण सोबत आजचा दिवस सार्थकी लावल्याच एक समाधान ही होत. आजच्या दिवसात किमान एखाद किलो वजन नक्कीच कमी झालं असेल असदेखील तिच्या मनात येऊन गेल. सूप पिऊन रिया बेडरूम मध्ये आली कॅलेंडर मधल्या आजच्या तारखेवर तिने फुल्ली मारली. घड्याळात पाचचा अलार्म सेट केला, उशी नेहमी सारखी तिला हवी तशी दुमडली आणि मानेखाली घेतली, पडल्या पडल्या बाजूचे स्वीच बंद केले आणि झोपून गेली.

     आदल्या दिवशीच्या शारीरिक श्रमांमुळे आज अलार्म होण्यापुर्वीच रियाला जाग आली नाही. पण अलार्म च्या दुसऱ्या तिसऱ्या रिंग सरशी ती उठली, आणि आदल्या दिवशी प्रमाणेच सगळी चक्र पुन्हा चालू झाली. स्ट्रेचिंग, वॉक मग ज्युस, टिफिन, बस, कॉलेज, जिम. शरीर कुरकुर करत होते, श्वास जड होत होते, पण मध्ये थोडा दम खाऊन का होईना रिया प्रत्येक एक्सरसाईज आजही पूर्ण करत होती. रात्रीचा सूप झाला, कॅलेंडर वरची तारीख खोडून झाली. घड्याळात सकाळी पाचचा अलार्म सेट केला. नेहमी प्रमाणे पुन्हा उशीचा हवा तसा आकार करून मानेखाली घेतली. पडल्या पडल्या लाईट्स ऑफ केल्या आणि झोपी गेली. नवीन दिवशी पुन्हा तोच क्रम, तीच दिनचर्या. रियाचा ही तोच उत्साह आणि तीच जिद्द, प्रयत्नात कुठे ही कमी पडायचं नाही हळू हळू शरीराला ही आता सवय होऊ लागली, रिया चा आत्मविश्वास ही वाढत होता, आतून तिला हलकं हलकं वाटत होतं, वजन फारस कमी झालं नसेल ही पण मनावरचा ताण हळू हळू कमी होऊ लागला. ह्या व्यस्त दिनचर्येसोबत मावशीला आता पूर्वीची रिया समोर दिसू लागली. तिला ही बरं वाटलं, तिने ही मग रियाला उत्स्फूर्त पाठिंबा दिला, डायटची बाजू मावशी सांभाळू लागली. दहा एक दिवस होऊन गेले होते, सकाळ पासून रात्री पर्यंत स्ट्रेचिंग, मॉर्निंग वॉक, ब्रेकफास्ट, बस, कॉलेज, जिम, घर हा क्रम न चुकता न थकता चालू होता, रात्री बेडवर जाण्यापूर्वी न चुकता कॅलेंडरची तारीख कट करणे, अलार्म सेट करणे, मग उशीला हवे तसे वेटोळे देऊन ती मानेखाली घेणे आणि मग लाईट्स ऑफ. दिवस पुढे पुढे सरकत होते. कुठे ही खंड पडू न देता रिया तिचे हंडरेड पेरसेन्ट एफर्ट देत होती. बदलेले व्यायाम प्रकार ही ती सहज शिकून घेत होती आणि न चुकता रोज करत होती.


प्रचंड निश्चयाने तिने स्वतःच्या शरीराला ह्या अग्निदिव्यासाठी तयार केले होते. जवळ जवळ पंचवीस एक दिवस होऊन गेले होते. एकंदर दिसण्यावरून, चेहरेपट्टीवरून तिच्या वजनात घट झाली असेल हे दिसून येत होते. पण रिया त्यात समाधानी नव्हती तिला ह्या लठ्ठपणाचा कायमचा बंदोबस्त करायचा होता. त्याच जोमाने, त्याच निग्रहाने, एक ही दिवस सुट्टी न घेता रिया लढत होती. रोज रात्री कॅलेंडर वरील तारीख खोडताना तिच्या चेहर्यावर समाधानाची एक झलक दिसे आणि पुन्हा ती घड्याळात सकाळी पाचचा अलार्म सेट करी, तिची आवडती उशी तिला हवी तशी दुमडून मानेखाली घेई आणि लाइट बंद करून झोपून जाई.


   आज मावशीने ही बऱ्याच दिवसानंतर रियाच्या रूम ची साफसफाई केली. फिशटॅन्क साफ केला. रियाचा स्टडी टेबल नीट लावून ठेवला. तिचा बेड आवरला, बेडशीट बदलली, उशीचे कव्हर काढायला गेली, पण त्या उशीच्या बदलेल्या आकाराकडे पाहून तिला नवीन उशीच आणून ठेवावी असे वाटले, आणि ते खरे ही होते, रिया झोपताना मानेखाली ती उशी ज्या पद्धतीने घ्यायची त्याने तिला एक वेगळाच आकार प्राप्त झाला होता. तिचा आकार बघून ती उशी कोणी वापरत असेल असे कोणालाही वाटले नसते. संध्याकाळी रिया जिम मधून येताना वेइंग मशीन घरी घेऊन आली.. कारण आज चाळीसावा दिवस होता... ज्या ध्येयासाठी गेले कित्येक दिवस ती प्रामाणिकपणे झटत होती... तो ध्येयपूर्तीचा दिवस... तिला आत्मविश्वास होता वजनात नक्कीच खूप फरक पडला असणार, रोज आरशात बघून तिच्या नजरेला चाळीस दिवसात हळू हळू झालेले शारीरिक बदल कदाचित टिपता आले नसतील पण हे वेइंग मशीन नक्कीच तिला अपेक्षित असलेला निकाल दाखवणार.. तिची खात्रीच होती. रात्रीच सूप संपवून रिया बेडरूममध्ये गेली, फायनली तिने त्या शेवटच्या तारखेवर फुल्ली मारली, तेव्हा पुसटसं हसू ही तिच्या चेहऱ्यावर उमटलं, आज एका मिशनची पूर्तता होत होती... मोठ्या आशेने तिने जिम मधून आणलेले वेइंग मशीन बाहेर काढले. ह्या सगळ्या कार्यक्रमाला सुरुवात होण्याआधी केलेलं वजन मनात आठवलं, स्वतःचं ते बेढब शरीर आठवलं आणि डोळे बंद करुन त्या सर्व गोष्टी पुन्हा एकदा आठवल्या ज्या तिला इथून पुढे कधीच स्मरणात ठेवायच्या नव्हत्या. डोळे उघडले, एक दीर्घ श्वास घेतला आणि पहिले पाऊल मशीनवर ठेवले, श्वास रोखून धरत दुसरे पाऊल ही टाकले.. वजन बघण्यासाठी मान खाली केली. एक दोन सेकंद काटा पाठी पुढे हलत होता, अजून ही रियाने श्वास रोखून धरला होता, शेवटी काटा स्थिरावला, आधीच्या वजनाहून एक दोन .. मे बी दोन तीन आकडे खाली .... वजनात घट झाली होती खरी, पण रिया खुश नव्हती, निराश झाली होती... एवढ्या दिवसाची तपश्चर्या तिला फळली नसल्याचे भाव तिच्या चेहऱ्यावर होते.


नाखुषीने तिने वेइंग मशीन तशीच पायाने बेड खाली ढकलली, आज तिने अलार्म बिलार्म काही सेट नाही केला, काही वेळ बेडमध्ये तोंड खुपसून पडून राहिली. मग हाताने रापत आपली उशी जवळ घेतली. पण ही तर मावशीने आणलेली नवीन उशी होती. रियाने तिला नेहमीप्रमाने दुमडून मानेखाली घ्यायचा प्रयत्न केला. पण ही नवी कोरी उशी हवी तशी दुमडून मानेखाली घेणे रियाला अजिबात जमत नव्हते. शेवटी रियाने ती उशी तिच्या नॉर्मल शेपमध्ये तशीच ठेवून मानेखाली घेतली. लाईटस ऑफ केल्या. पण आज रियाला काही केल्या झोप येत नव्हती. आधीच ती वेइंग मशीन ने दाखवलेल्या वजनावर नाखूष होती.. चाळीस दिवस एवढी मेहनत घेऊन, घाम गाळून, जिभेवर ताबा ठेवून दोन-तीन किलोंनी झालेली वजनघट रियाच्या पचनी पडत नव्हती. त्यात मावशीने आणलेल्या ह्या कोऱ्या करकरीत वेलशेप उशीचा तिला त्रास होत होता. काही करा तिला ती उशी अजिबात कम्फर्टेबल वाटत नव्हती, ह्या कुशीवरून त्या कुशीवर पन्नास वेळा वळून झालं. झोप काही येत नव्हती, बर उशी काढून ही झोपायचा प्रयत्न केला पण काहीच चालत नव्हतं, रियाची चिडचिड होत होती, झोप काही लागत नाही हे बघून रिया उठली, लाईट्स ऑन केल्या, आपला राग तिने त्या नवीन कोऱ्या उशीवर काढला, बसल्या बसल्या एक नजर बेडरूममध्ये फिरवली, चेहऱ्यावर चिडचिड होती... आणि एकक्षण तिची नजर दिवाणाबाजूच्या कोपऱ्यात स्थिरावली... अरे ही तर आपली जुनी उशी...


एक दोन क्षण रिया त्या जुन्या उशीकडे स्तब्ध होऊन पाहत राहिली ... हो.. उशीच होती ती... शेपलेस...बेढब ...आपल्यासारखीच .... रियासारखीच ... आणि आपण ही नवी कोरी वेलशेप उशी सोडून ह्या जुन्या वाकड्या तिकड्या, शेपलेस उशीला का मिस करतोय?? हा प्रश्न तिने स्वतालाच विचारला .... आणि त्या प्रश्नाचे उत्तर ही रियाला मिळाले..... बहुतेक तिला तिच्या मनातल्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरे मिळाली.. म्हणून तर रिया आता मान हलवत पुन्हा पूर्वीसारखी निखळ हसली आणि मग ती कोपर्यातली जुनी उशी नेहमीप्रमाणे हवी तशी दुमडून मानेखाली घेऊन शांत झोपली...


Rate this content
Log in

More marathi story from gurunathterwankar