BIPIN SANGLE

Romance Tragedy Others

3.5  

BIPIN SANGLE

Romance Tragedy Others

अल्याड पल्याडच्या वेणा

अल्याड पल्याडच्या वेणा

13 mins
2.1K


अपूर्वा कळवळून किंचाळली ...

तिच्या पोटात भयंकर कळ आली होती. अगदी असह्य ! ती कळवळली.               

ती आता लेबर रूममध्ये होती. तिला मधूनच कळा येत होत्या. कमी होत होत्या. अशा कळा की जगात त्यावाचून दुसरं काहीच नाहीये !

               बाळंतपणाच्या कळा ! सगळ्यात असह्य. एखादा बॉम्ब फुटून त्याचे धातूचे तुकडे प्रचंड वेगाने शरीरात शिरल्यानंतर जेवढ्या वेदना होतात, त्याही पेक्षा जास्त. तरीही प्रत्येक स्त्रीला हव्याहव्याशा वाटणाऱ्या वेणा !

पण कळांमध्ये सातत्य नव्हतं. त्या आतल्या जिवाचा जीव बहुतेक अजून आतच रमला होता.

कळा हळूहळू कमी होत गेल्या. तिचं कण्हणं कमी होत गेलं .अपूर्वा थकून शांत पडून राहिली. तिच्या अंगातलं त्राण आत्ताच गेलं होतं. झोप येणं शक्यच नव्हतं .

              त्या वेदनांमध्येही तिला मजा वाटली. तिची चार दिवसात ॲडमिट व्हायची दुसरी वेळ होती. दोन दिवसांपूर्वी असंच पोटात दुखतंय म्हणून ॲडमिट केलेलं. मग पुन्हा घरी रवानगी. नुसतीच ये-जा .

              ढगांनी भरलेल्या पण पाऊस न पडणाऱ्या काळपट आभाळासारखं.

              दोन दिवसांपूर्वी घरी जाताना आई म्हणाली होती, “ अपू ,सीझर करू या का ? उगा तुला त्रास नको. नाहीतरी तुझ्या नवऱ्यालाही मुहूर्तावर सीझरच करायचं होतं . म्हणजे मुलगा सुलक्षणी होईल, भाग्यवान होईल.”

               त्यावर अपूर्वा म्हणाली होती, “ हे बरंय ! मूल जन्माला घालायचं मी आणि ते कसं घालायचं हे बाकीचेच लोक ठरवणार. माझा काहीच निर्णय नाही का ?... मला नॉर्मलच हवीय.”

               त्यावर अपूर्वाची आई तिच्याकडे पहातच राहिली. त्यांना वाटलं – ‘ काय ही मुलगी ! आताशा सगळ्या मुली सीझर करा म्हणतात. डोक्याला त्रास नको,’ त्यांना मध्येच हसू आलं ,’ अन कशालाच त्रास नको. हिला नॉर्मल हवीय शहाणीला.

              ज्याला आपण जन्म दिला तो जीव आता एक नवीन जीव जन्माला घालण्याच्या प्रतीक्षेत आहे. पोरगी कित्ती मोठी झाली...स्वतंत्र विचार....स्वतःचे निर्णय. आपल्यासारखं नाही. आपल्यावेळी सारं काही सासूबाईंच्या मनाप्रमाणे.’

सासूबाई !... तो शब्द आठवताच त्यांना अपूच्या सासूबाई आठवल्या. ‘त्यांना मुलगाच हवाय . कारण भल्या मोठ्या इस्टेटीला वारस हवा ना.’

त्यांना थोडी काळजी वाटली.

‘कधी होते पोरीची सुटका कोणास ठाऊक ? अन काय होणार ? कोणास ठाऊक ?- ही एक गंमतच असते. डिलिव्हरी कोणाचीही असो, घालमेल ही प्रत्येक क्षणालाच. नीट होईल ना ? काय होईल ?- मुलगा की मुलगी ?... असं उत्कंठा वाढवणारं, सरप्राईझच.

ही म्हणालीये, काही होऊ दे.मला चालेल. आणि अमेयलादेखील तसं सांगितलंय. त्यालाही अपूचं म्हणणं मान्य आहे. म्हणते कशी - जे व्हायचंय ते आमचं आम्ही बघू. सासूबाईना काय घेणं पडलंय ?

अमेय म्हणाला होता - चेक करायचं आहे का ? पण ही नाही म्हणाली. आपल्याला म्हणाली होती, कशासाठी करायचं गर्भलिंगनिदान ? ह्याला काय ? ह्याला वाटतं, पैसे फेकून कुठलंही काम करून घेता येतं. त्याच्या शंभर ओळखी आहेत. पण कशासाठी ?

 तर तो मुहूर्त काढून सीझर करू या म्हणाला होता. त्यावरही ही म्हणाली होती, जेव्हा त्याची वेळ असेल तेव्हा येईल जन्माला. त्याचं जसं नशीब असेल ते घेऊनच तो जन्माला येईल.’

अपूर्वाला पुन्हा तिच्या रूममध्ये आणण्यात आलं. ती बेडवर शांत पडून राहिली.

बाहेर घुसमटीसारखी हवा होती. पण रूममध्ये छान होतं.

नसायला काय ? प्रायव्हेट एसी रूम होती. टापटीप. अमेयच्या डामडौलाला साजेशी. छान फिकट गुलाबी भिंती. समोर भिंतीवर टीव्ही. एका बाजूला खिडकी. खिडकीला फुलांच्या नक्षीचा गुलाबीच पडदा. थोडासा सरकलेला . त्यातून बाहेरचा दिसणारा लाल गुलमोहर.मागे चुकून थोडंसं निळं दिसणारं आभाळ. बाकी ढग भरून आलेले. पावसाचे दिवस होते. पण तो बेटा कुठे दडी मारून बसलेला.

त्या चकाचक रूममध्येही औषधांचा वास पूर्ण लपत नव्हता. पुन्हा तिला त्या कळा आठवल्या.

              ‘कित्ती एकटं वाटलं त्यावेळी कळा देताना. समोरची नर्स तर परकीच. पण बाहेर असलेली आईही परकी वाटायला लागली होती.

काही क्षण कसे असतात ना ...खूप एकटं वाटायला लागतं... तसा तो क्षण. नकोसा वाटणारा .  

त्यावेळी आपल्याला फक्त आपली जाणीव...त्यावेळी सोबत, फक्त त्या जीवघेण्या कळांची.’

              तिचा चेहरा सुकल्यासारखा, ओढल्यासारखा दिसत होता. थकवा आणि शारीरिक ताणाने तिचं मूळचं सौंदर्य कुठे झाकलं गेलं होतं. केसांच्या बटा-बटा. जे केस तिने स्वतःच थोड्या वेळांपूर्वी ओढले होते. कळा सहन करताना.वेदना सहन न होऊन.

अपूर्वा तिच्या आईवर गेली होती. गोरीपान, गोल चेहऱ्याची, आनंदी, हसऱ्या ओठांची. बघता क्षणी कोणीही प्रेमात पडेल अशी. म्हणून तर अमेयचं स्थळ चालून आलं होतं. त्यांच्याकडे पैशाला तोटा नव्हता. त्यामुळे त्यांना ‘सुंदरच’ मुलगी हवी होती.

अपूर्वाच्या डोळ्यांसमोर उगा चित्र-विचित्र प्रतिमा येऊ लागल्या.

              ती वेदनेच्या स्वरात पुटपुटली,” आई “.

              “ हो गं राणी.”

              अपूर्वाने आईचा हात धरला. आईने तिच्या अंगावरचा वर सरकलेला गुलाबी गाऊन खाली केला. तोही खोलीला साजेसा,रंगसंगती साधणारा.

“अपू, झोपू नकोस. नर्सने सांगितलंय ना .!”

रात्रीपासूनच झोप कशी ती नव्हती. पण अनुभवी नर्सने सांगितलं होतं. बजावलं होतं, झोपायचं नाही म्हणून.

“ आई, माझा हात सोडू नकोस ना गं .”

              “ नाही गं सोडत.”

              अपूला ग्लानी आली.

 ----------

              “ ए, माझा हात सोडू नकोस ना,” अपू म्हणाली.

“ नाही गं सोडत,” विक्रम म्हणाला. वाढवलेले केस मागे सारत,

 विक्रमच्या डोळ्यांत पाहत अपू त्याला म्हणाली, “ विकी, कधीच नाही ना रे सोडणार ?”

कधीच म्हणजे कध्धीच नाही,” तो म्हणाला. त्यांचे हात एकमेकांच्या हातात होते . ओलेपणाने ते निसटत होते .

              असेच पावसाळ्याचे दिवस होते. पण पाऊस पडत नव्हता. राखाडी रंग आभाळभर भरून राहिला होता.

              आधी तो मुसळधार बरसला होता. दोन दिवसांपूर्वी त्याचा जोर ओसरला होता. धरणं तुडुंब भरलेली होती.

              विक्रम आणि अपूर्वाची जोडी, लोणावळ्याच्या भुशी डॅमच्या पायऱ्यांवर होती. मागून येणाऱ्या खळाळत्या पाण्यात भिजत बसलेली. दोघेही पूर्ण भिजलेले. त्याच्या पांढऱ्या, अंगाला चिकटलेल्या शर्टमधून त्याचं पुरुषी सौंदर्य दिसत होतं. आकाशी रंगाच्या टॉपवर तिने त्याचं काळं जॅकेट घातलं होतं .

कॉलेज बुडवून पावसाच्या संगतीने धमाल चालली होती. मोठं रोमँटिक वातावरण होतं.

              त्याने केसांमध्ये बोटं गुंफली. केस वर केले. त्याच्या मानेवर डावीकडे, मागच्या बाजूला एक तीळ होता. अपूर्वा तो पाहत राहिली. तिने आज तो पहिल्यांदाच पहिला होता.

“ विकी, काय छान दिसतोयंस तू अशा भिजलेल्या अवस्थेत.”

              “ छे ! माझ्यापेक्षा जास्त तर तू दिसतेयस ! ब्युटीफुल !”

              “ बरं मग ?”

               “ कॅडबरी चाखावंस वाटतंय .”

               “ देते हं बाळा. नंतर तुला घेऊन देते.”

              “अंहं ! ते नाही वेडू . तुझ्या गालांचं....”

                त्यावर अपूर्वाच्या गालांच्या कॅडबरीचं रूपांतर लाल स्ट्रॉबेरीमध्ये झालं ...

----------

                मध्येच आईने अपूच्या हातातून स्वतःचा हात सोडवून घ्यायचा प्रयत्न केला . अपूची विचारधारा त्यामुळे तुटली आणि तिला वाटलं ...

              विक्रमचा हात सुटलाय आणि तो पाण्यात वाहून जाऊ लागलाय ...लांब ...आपल्यापासून खूप लांब !...

              अपूर्वा ‘विकी ‘ म्हणून किंचाळणार होती. तोच, तिने डोळे उघडले. तिला लक्षात आलं की ती आत्ता दवाखान्यात आहे.

              आईने तिचा हात धरलेला होता व ती वाकून, काळजीने अपूच्या चेहऱ्याकडे पाहत होती.

              “ अपू, जागी राहा.त्रास होतोय का ?”

              “नाही “

              तिने डोळे मिटले. तिच्या नजरेसमोर पुन्हा विकी आला.

मऊ रेशमाची लड उलगडावी तसा आठवणींचा पट पुन्हा नाजूकपणे उलगडत जाऊ लागला .

----------

विक्रम- सावळा, उंच, तरतरीत ,स्मार्ट. कमावलेल्या तब्येतीचा. अफाट वागणारा पण तितकाच प्रेमळ.

               एकाच कॉलेजमध्ये ते दोघं. तिथेच जमलेलं त्यांचं प्रेम.

              पहला नशा, पहला खुमार !....

              तो तिला सिनियर होता .विक्रमचं कॉलेज संपलं. अचानक त्याची आई गेली. तो सैरभैर झाला. त्याचा आईवर खूप जीव होता. त्यावेळी अपूचा आधार होता म्हणून तो सावरला. अन ही गोष्ट तो अपूला वारंवार सांगायचा.

              त्याची आयुष्याची जणू दिशाच बदलली. पुढे तो सैन्यात गेला .अपू त्याला नको म्हणत असताना. वारंवार नको म्हणत असताना. अन दोन वेडे जीव उगा दुरावले. दोघांचे इगो आड आले. दरी वाढतच गेली.

              त्यानंतरही त्यांचा संपर्क होता. पण स्वर नुसतेच उमटायचे. त्यांचं मधुर संगीतात रूपांतर व्हायचंच नाही. मेलडी जमून यायची नाही.

त्यावेळी अपूला अमेयचं स्थळ चालून आलं. त्यांचा कंस्ट्रक्शनचा खानदानी बिझनेस होता. बड्या बिल्डरचं पैसेवालं स्थळ .

              अमेय थोडा स्थूल होता . पैशाची ऊब शरीरात मुरलेला वाटणारा , बेरकी . पण तिच्या आई-वडलांना ते स्थळ पसंत पडलं, यात काही आश्चर्य नव्हतं.

अमेयच्या घरच्यांच्या काही अटी नव्हत्या. एक सोडली तर- त्यांना सून सुंदरच हवी होती.

              अपूर्वा देखणी होती. त्यांच्या अटीत बसणारी.

पण तरी, स्थळ आवडलं तरी - अपूच्या,मनात खुटखुट होतीच...विक्रमची.

              त्यावेळी तिने आईला पहिल्यांदा त्याच्याबद्दल सांगितलं.

              “ अपू, अगं काय बोलतेस हे ? अन कुठल्या वेळेला ? एवढं चांगलं स्थळ आलंय. नशीब उघडलंय तुझं. तुला काही कमी पडणार नाही.

              अन तो विक्रम, तो सैन्यात. आज इथे तर उद्या तिथे बदली. तुझं कसं होणार ? आणि सैन्यातील नोकरी- कधी कानावर काय वाईट ऐकायला मिळेल त्याचा नेम नाही .कधी जीवावर बेतेल सांगता येत नाही...”

              अपूर्वाची स्थिती दोलायमान झाली होती. शेवटी तिने निर्णय घेतला . नाहीतरी आता दोघांमध्ये एक अदृश्य दरी होतीच.

              तिने व्यावहारिकतेला झुकतं माप दिलं आणि ती अमेयच्या घराचं माप लवंडून त्याची गृहस्वामिनी झाली.

लग्न झटपट आटपलं होतं. अपूने विक्रमला लग्नाचं कळवलं नव्हतं. पण शेवटी, दोन दिवस आधी तिने त्याला कळवलं . काय सांगावं, कसं सांगावं हे तिला कळत नव्हतं .

                तिने त्याला मेसेज पाठवला -” विकी सॉरी ! पण पुढे कधीही मला मेसेज पाठवू नकोस. दोन दिवसांनी माझं लग्न आहे. पण तू कायम माझ्या मनात राहशील. ऑल द बेस्ट . टेक केअर .”

               तिचा हा असा मेसेज पाहून विक्रम सटपटलाच. दिवसभर रडतच राहिला. त्याचे जे साथी होते त्यांना त्याचं काहीतरी बिनसलंय हे कळलं ; पण तो त्यांनाही काही बोलला नाही .

पण तो एक सच्चा सैनिक होता. दुसऱ्या दिवशी तो सावरला. पण त्याला कळलं, तिने नुसता मेसेज असा शब्द वापरला तरी त्याचा अर्थ स्पष्ट होता…

....पण सैनिक असला तरी शेवटी माणूसच होता. लढताना जखमा झाल्या तरी सैनिक दुर्लक्ष करून लढत रहातो. पण जखमा ? - त्या तर असतातच. ठसठसणाऱ्या ! एकदा आई गेली तेव्हा आणि आता पुन्हा ही जीवघेणी जखम !

              थोड्या थोड्या वेळाने तो अपूचा मेसेज वाचे. तिला फोन करायला त्याचे हात शिवशिवत. पण तो थांबे. बंदूक हातात असतानाही ‘ सीझ फायर ‘ ची ऑर्डर असल्यासारखा.

              त्याचं मन मूकपणे रडत राहिलं. ते आतल्या आत धुमसत राहिलं. ते धुमसणं साठत राहिलं.

               काही क्षण कसे असतात ना. खूप एकटं वाटायला लागतं... तसा तो क्षण. नकोसा वाटणारा.

---------- 

पहिली रात्र होती.

लग्नानंतरची पहिली रात्र.

              अमेयचं प्रशस्त घर. त्याची स्वतंत्र , मोठी बेडरूम. श्रीमंती ओथंबून वाहणारी ती बेडरूम त्याच्या मित्रांनी छान सजवली होती. आणि बेडसुद्धा , संगमरवरी नक्षीच्या सॅटिनच्या पांढऱ्या बेडशीटने. पांढऱ्या फुलांच्या माळा, पांढऱ्या फुलांच्या पाकळ्या. अन लाल गुलाबांचा मंद सुवास.

              तशीच - अपूपण सजली होती. केशरी रंगाच्या अस्सल रेशमी साडीत. एखाद्या जाहिरातीसाठी परिपूर्ण सजवलेल्या मॉडेलसारखी!

              अमेयचे मित्र घरातून निघेचनात. त्याची आई ओरडली तेव्हा ते खिदळत बाहेर पडले.

              अमेय आत आला. त्याने दाराला कडी घातली. तो अपूजवळ आला. बसला, त्याने तिचा चेहरा हातात धरला. तिच्या डोळ्यांमध्ये तो पाहत राहिला प्रेमाने. अपूर्वाची नजर स्त्रीसुलभ लज्जेने खाली झुकली.

              मग तिने नजर वर उचलली.

              ती त्याच्या डोळ्यांमध्ये बुडाली. मग शरीरांनी निसर्गाला प्रतिसाद दिला व तिने त्याला.

---------- 

जवानांनी हुकमाला प्रतिसाद दिला-

“ येस्सर !”

स्थळ काश्मीर. पाम्पोर.

रात्रीची वेळ. मिलिटरी बेसवर अतिरेक्यांचा हल्ला झाला होता.

जेव्हा अमेय अपूच्या कुशीत शिरत होता, तेव्हा जवानांच्या शरीरात अतिरेक्यांच्या गोळ्या शिरत होत्या .

रात्रीच्या अंधारात किती अतिरेकी होते, कळत नव्हतं. त्यांनी अगोदर योग्य पोझिशन्स घेतल्या होत्या. त्यामुळे ते टिपून टिपून जवान मारत होते. दहा जवान धराशायी झाले. गोळ्या सणसणत होत्या . जळालेल्या दारूचा वास सुटला होता.

एका अतिरेक्याची गन अचूकपणे धडधडत होती. ती थांबवणं आवश्यक होतं. त्याला टिपणं आवश्यक होतं. पण तो मोक्याच्या जागेवर होता.            

विक्रमने त्याची गन सावरली. तो जमिनीवर झोपून पोझिशन घेऊन होता. तो उठला. त्याचा सहकारी दबक्या स्वरात ओरडला, “ ए पागल, नीचे झुक ! “...

पण विक्रमने ऐकलं नाही. तो दुसऱ्या बाजूने योग्य टप्प्यात पोचला. त्याला तरीही तो अतिरेकी दिसत नव्हता. त्यासाठी उघड्यावरच जावं लागणार होतं. तो पुढे सरसावला. जे अतिशय धोक्याचं होतं. पण तो विक्रम होता. त्याने ते जिवावरचं धाडस केलंच.

पुन्हा सहकाऱ्याची आरोळी आली, “ विकी, रुक .”

त्या आवाजाने अतिरेक्याची बंदूक थांबली. तो अंदाज घेत होता.

तो एक क्षण !.....विक्रमने पुढे झेप घेतली. त्याची बंदूक धडधडली- त्वेषाने, संतापाने, दुःखाने...

जणू समोर तो अतिरेकी नव्हताच....

‘काय होतं ?- काय नव्हतं ?’ विक्रमचं सारं धुमसणं, ते आत साठून राहिलेलं सारं कडवटपण, गेल्या दोर-चार दिवसांचं, ते सारं त्या गोळ्यांमधून बाहेर पडत होतं !

समोरचा तो उग्रट अतिरेकी ढेर झाला.

दुसऱ्या क्षणाला दुसऱ्या अतिरेक्याची बंदूक कडाडली- विक्रमच्या दिशेने. त्याला गोळ्या लागल्या,

चार-पाच तरी अन एक तर वर्मी !

पण विक्रमने त्याकडे दुर्लक्ष करत, खाली कोसळण्यापूर्वी त्याला टिपलं.

              विक्रम खाली कोसळला . त्याची बंदूक हातातून निसटली. त्याचा हात छातीकडे गेला. त्याची छाती, त्याचा युनिफॉर्म आणि त्याचा हात रक्ताने भरला. त्याच्या युनिफॉर्मवरचा खिसा छिन्न विछिन्न झाला होता.... आणि अपूचा फोटोही . त्या खिशात अपूचा फोटो होता. त्याच्या हृदयाजवळ… तोही फाटलेला, जळालेला,रक्ताळलेला.

              मृत्यूने त्याचा पंजा पूर्ण आवळण्याआधी त्याच्या मनात विचार होते, ‘ माझा हात सोडू नको म्हणायचीस ना तू अपू....पण... आता तर मी आयुष्याचाच हात सोडलाय. आता ?- खरं प्रेम केलं तुझ्यावर . आय डोन्ट वॉन्ट टू मिस यू ... नेव्हर ! ‘

              तो कायमचा शांत झाला, मृत्यूच्या मिठीत !

----------

              तेव्हा त्या क्षणाला अपू आनंदात, धुंदीत, थकून शांत झोपली होती. अमेयच्या मिठीत .

              दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व पेपर्समध्ये, पहिल्या पानावर त्या हल्ल्याची बातमी होती. चौकटीत महाराष्ट्राचा सुपुत्र शहीद झाल्याची बातमी होती. त्याच्या शौर्याचं वर्णन होतं.

              त्याच्यामुळे चार अतिरेक्यांचा खातमा करण्यात यश आलं होतं .त्यातले दोन तर त्यानेच टिपले होते. त्यामुळे प्राणहानी कमी झाली होती. त्याने लवकर बाजी पलटवली होती. आणि त्यामुळेच तर, तो धारातीर्थी पडला होता.

              अपूने केलेल्या गरमागरम चहाचा घोट घेत अमेय पेपर वाचत होता. त्याने हेडलाईन वाचली तोच त्याचा मोबाईल वाजला. त्याने तो घेतला. पलीकडे त्याचा लेबर कॉन्ट्रॅक्टर होता.

              अपूही शेजारी बसून चहा पीत होती.

              “ नमस्ते साब.”

              “ हां बोलो हरीराम, अभी तो शादी हो गयी और तू मुझे अभी खाली छोडता नहीं क्या रे ? अमेय हसत म्हणाला .

              “ सॉरी साब. लेकिन बातही ऐसी है. साइटपे बहोत सारा मटेरिअल आया है .....”

              “हां ! आया है , दसवाँ स्लॅब चढाने.”

              “ क्या ? हरीराम आश्चर्याने किंचाळला.

              “ अरे, शादी हो गयी तो आदमीका खर्चापानी बढ जाता है .... है क्या नहीं ?”

              “ हां साब . लेकिन हमारा परमिसन तो नौं का है ना . आगे लफडा हो गया तो ?....”

              “ कुछ नहीं होता रे . वो सब पहलेसे संभाल लिया है मैने .तू काम चालू कर . लफडा हो गया तो देख लुंगा मैं.”

              अपू ऐकत होती. अमेयची ही बाजू तिला नवीन होती. बिझनेस आणि त्यातून कंस्ट्रक्शन लाईन म्हणल्यावर हे होतंच ;पण सरळ एक अख्खा मजला ?.... तिला धक्काच बसला.

              तिचा चहा झाला. ती कपबश्या उचलायला गेली ,तेव्हा तिचं लक्ष पेपरकडे गेलं . त्या बातमीकडे गेलं ... शेजारी चौकटीत फोटो होता-विक्रमचा !...

              ती कपबश्या उचलून आत पळाली. मग बाथरूममध्ये . फुल शॉवर सोडून त्या पाण्याच्या आवाजात ती रडू लागली. बाहेर आवाज जाऊ नये म्हणून . अपराधी भावनेने ... विकी आता लांब गेला होता. आयुष्यातूनही आणि जगातूनही . खूप लांब . कायमचा . कुठल्या तरी अज्ञात प्रदेशाच्या बॉर्डरवर !

----------

              अमेय चांगला होता. तो एक चांगला बिझनेसमन होता. आणि तो एक चांगला नवराही होता. पण ? - त्याचं आयुष्य पैशाभोवती एकवटलेलं होतं. त्याची पैशाची हाव न संपणारी होती. अपूवर त्याचं प्रेम होतं. पण तिला वाटत रहायचं की त्याने त्याच्या पैश्याच्या बदल्यात, आपलं सौन्दर्य विकत घेतलंय ! पण- अगदीच तसं नव्हतं .

              ती अगदी लगेच प्रेग्नन्ट राहिली. तर अमेयने तिचे कित्ती लाड पुरवले. कोडकौतुक केलं. तिचे डोहाळे पुरवले. तिला काही म्हणजे काही कमी पडू दिलं नाही. तिला जपलं. तिचं मन जपलं.

              अपू सुखावली. अन ते सुख तिच्या अंगावर दिसामासी वाढू लागलं. गर्भारपणाचं तेज तिच्या चेहऱ्यावर -देहावर झळकू लागलं .

              अमेय त्याच्या वेगवेगळ्या प्रोजेक्ट्समध्ये बिझी होत गेला. त्याला वाटत राहिलं- पोराचा पायगुण. अजून या जगात बेट्याचं पाऊल पडायचंय. तरी त्याआधीच आपली यशाची घोडदौड चालू झालीये .

त्याचे उलटे-सीधे व्यवहार वाढत चालले होते. तो पैश्याच्या मागे धावतच होता.

              अपू खुश होती. मनाने आणि शरीराने. ती सगळे बदल, सगळे त्रास टिपत होती, अनुभवत होती , आनंदत होती . एक अमेयचं पैसा पैसा करणं सोडलं तर, त्याचे बेकायदा व्यवहार सोडले तर. ते तिला आवडत नव्हतं.

              ती एकच तर गोष्ट तिला सलायची. त्यावेळी तिला विकीची आठवण यायची. त्याच्या वागण्याची, त्याच्या संस्कारांची आठवण यायची .

              आता तर तो या जगातच नव्हता. पण जर तो असता ? तिला वाटायचं- जर त्याच्याशी लग्न झालं असतं तर- आज आपण एक वीरपत्नी असतो. एका शहीद वीराची पत्नी. देशासाठी बलिदान केलेल्या, शौर्य गाजवलेल्या वीराची पत्नी ... आणि आपल्या पोटात, त्याचा अंकुर आकार घेत असता. आपल्याला त्याच्या बाळाची आई व्हायला आवडलं असतं ?...असतं ! पण मग आज तो नसता... तरी, त्याचं नाव तर अभिमानानेच घेतलं गेलं असतं.

----------

              “ अपू, जागी रहा पोरी,” आईची हाक आली.

तिच्या आठवणींची ती मालिका आईच्या त्या काळजीच्या हाकेने तुटली .

              “ आई, मी जागीच.....”

              अनुभवी नर्स मध्येच येऊन ओरडून गेली, “ जागं रहा. झोपायचं नाही अजिबात.”

              आणि पुन्हा कळा सुरु झाल्या. त्या वाढत गेल्या. अनुभवी नर्सने ओळखलं, वेळ जवळ आलीये. अपूला लेबर रूममध्ये नेण्यात आलं.नर्सने डॉक्टरांना फोन केला. त्या दुसऱ्या दवाखान्यात होत्या.

              त्याचवेळी बाहेर पाऊस सुरु झाला. आधी रिमझिम मग धोधो.

              जणू ढगांनाही पोटातलं ओझं जड झालं होतं. त्यांनाही मोकळं व्हावंसं वाटत होतं.

              त्या पावसाने लगेच ट्रॅफिक जॅम झालं. रस्त्यांच्या नद्या झाल्या .डॉक्टर त्यामध्ये अडकल्या. तिकडे नर्स म्हणाली,” घे देवाचं नाव अन दे बाई - जोरात कळा दे ,श्वास खाली सोड. एकतर पावसाला याड लागलंय”

तिच्या डोळ्यांपुढे क्षणार्ध विक्रम आला. मग तिने श्वास खाली सोडला .सगळ्या वेदना, सगळं ओझं

खाली सोडलं. मनातल्या अन शरीरातल्या सगळ्या ठसठसणाऱ्या वेदना खाली सोडल्या.

              डॉक्टर आल्या. अपूला ते कळलंही नाही.

              एक क्षण - ती कुठे तादात्म्य पावली होती ,कोणास ठाऊक ? तो एक क्षण- निर्विकार ! - अन तिची प्रसूती झाली.

              डॉक्टर आणि नर्स समाधानाने हसल्या,’ आणखी एक प्रसूती,’ असं असलं तरी शेवटी नावीन्यच ते. वेदनांचा क्षण आणि आनंदाचाही क्षण. स्त्रीत्व सफल झाल्याचा सोहळा !

              डॉक्टरांनी त्या गुलाबी नाजूक, नवजात बाळाला उलटं धरलं . “ मुलगा झालाय गं ,” त्या ओरडल्या व त्यांनी बाळाला थापट्या मारल्या. ते बाळ ‘टयँहयँ ‘ करत रडायला लागलं.

              तिथली आया मोठी प्रेमळ आणि बडबडी होती. तिला प्रत्येक बाळाचं कौतुक. ती त्या बाळाला स्वच्छ करायला घेऊन गेली. तिने त्याला स्वच्छ केलं.

              बाळाला एका स्वच्छ पांढऱ्या दुपट्यात गुंडाळून ती बाहेर आली . अपूला म्हणाली, “ पाज बाई आता.” अन पुढे ऐकून माहित झालेल्या इंग्लिशमध्ये म्हणाली , " युअर बंडल ऑफ जाय !"

              तिचं इंग्लिश ऐकून हसू आलेल्या अपूने बाळाला जवळ घेतलं. तिने त्याच्या इवल्याश्या नाजूक बोटांत बोट दिलं तर त्याने ते धरूनच ठेवलं. ती म्हणाली, “गुंड्या, मी तुझा हात कध्धीच नाही सोडणार बरं. असा घाबरू नकोस. बोट धरून ठेवलंय माझं . शहाणा कुठचा !”

              त्यावर आया ओरडली, “ अगं- बोलत काय बसलीस , बाई?”

              अपूने बोट सोडवलं. त्याला जवळ घेतलं अन तिने पाहिलं ... त्याच्या मानेवर, डाव्या बाजूला मागे एक तीळ होता. ती तो पहातच राहिली…

              तिने त्याला छातीशी घट्ट धरलं. मग त्या वेगळ्या आनंदात ती हरवूनच गेली.

              बाहेर , पाऊस ही शांत झाला होता .Rate this content
Log in

Similar marathi story from Romance