BIPIN SANGLE

Others


3  

BIPIN SANGLE

Others


बोर्डाची परीक्षा

बोर्डाची परीक्षा

4 mins 1.2K 4 mins 1.2K

    मँगो मस्तानी पिताना माझ्या डोळ्यांत पाणीच आलं !...

         तुम्ही म्हणाल कसं काय ? मँगो मस्तानी तिखट होती का तिचा घोट घेताना ठसका लागतो ?

         थांबा , तुम्हाला अख्खी स्टोरीच सांगतो.

         दहावीची प्रिलिम झाली , रिझल्ट लागला आणि मी स्वतःच दचकलो. मला पासष्ठ टक्के पडले होते. फक्त. तसे ऐंशीपर्यंत पडायला हवे होते. तेवढा मी आहे बरं का ! हे झालं माझं . पण आमचे बापूसाहेब ! त्यांना वाटतं की मी बोर्डात नव्वद टक्क्यांच्यावर मार्क्स पाडावेत.

         पण सगळी वाट लागली होती. कारण ? - पव्या !

         हा पव्या कोण, तेही सांगायला पाहिजे ना. हा पव्या म्हणजे तुमच्या आजूबाजूला असा एखादा पोरगा असतो तोच. तो पव्याच असतो असं नाही. तो अव्या असू शकतो किंवा देव्याही असू शकतो. नाव वेगळं असलं तरी ही अशी मुलं वागायला मात्र सेमच असतात.

        माझा मित्र पव्या हा अंगाने दांडगट. केस चित्रविचित्र, पंक स्टाईल ठेवलेला. दहावीत चार वेळा गटांगळ्या खाल्लेला .अन मग शाळाच सोडलेला. शिक्षण नाही तर दुसरं काहीतरी करायला पाहिजे ना. पण नाही, तो तसं काहीच करत नाही.तो छान- छान कपडे घालून शायनिंग मारतो. मोबाईलवर गेम्स खेळतो. दुसऱ्यांच्या गाड्या घेऊन फिरवतो. तो ' भारी ' वाटतो . त्याच्या बरोबर राहिलं की भारी वाटतं. त्याच्यासारखं रहावंसं वाटतं, वागावंसं वाटतं. तो डेअरिंगबाज आहे, त्याचं आकर्षण वाटतं.

      त्याची संगत लागली आणि माझा टीपी सुरु झाला. परिणाम ? - प्रिलिमचा निकाल.

      तुम्हाला काय वाटतं - मी काय केलं असेल ? अशा वेळी तुम्ही जे करता तेच... मी घरी रिझल्ट सांगितलाच नाही.     

    पण आमचे बापूसाहेब ! ते काय गप बसतात होय.

         आमच्या शाळेतले एक सर त्यांची गाडी बापूंकडेच टाकतात. बापू एकदम भारी मेकॅनिक आहेत. ते सर आले तेव्हा बापूंनी विचारलं, " सर, रिझल्ट लागला का हो ? "

         " हो. कधीच . का ? अक्षयने सांगितला नाही का ? "

         " नाही. मीच विचारलं नाही. मध्ये काम खूप होतं ना," बापू खोटं बोलले.

         जेव्हा बापू घरी आले, तेव्हा त्यांनी मला रिझल्ट विचारला ...

         " अक्षय, मला ही अपेक्षा नव्हती. मला वाटलं दहावी आहे , तू नव्वदच्या पुढे जाशील. तुझ्याकडे ती क्षमता आहे. जर नसती - तर शिक्षण सोड म्हणलो असतो, गॅरेज मध्ये चल म्हणलो असतो ..."

         माझं तर डोकंच फिरलं. मला एकदम पव्याचं वागणं आठवलं. तो त्याच्या आई-वडिलांना उलटं बोलतो, काहीपण बोलतो.

         मीही म्हणालो, " बापू, तुम्हीतर दहावीतच शाळा सोडली. पुढे शिकला नाही आणि पोरांनी मात्र भरपूर मार्क्स पडायचे होय ?"

         बापूंचा चेहराच उतरला. आईचाही.

         त्यांनी माझ्याशी बोलणंच बंद केलं. दोन दिवस वाईट वाटलं . नंतर नाही. पव्या होता ना -आदर्श !

         त्यानंतर दोन दिवस आई काहीतरी शोधत होती. तिला ते सापडत नव्हतं. खूप अस्वस्थ होती. मी तिला विचारलं, मी मदत करू का ? नको म्हणाली.

         आणि तिला ते सापडलं. काय असावं ?...

         ते बापूंचं प्रगतीपुस्तक होतं. जुनं, रंग गेलेल्या हिरव्या कागदाचं. जीर्ण झालेलं, कडा फाटलेलं. बापू नववीत होते - तेव्हाचं !

         आणि - मी उडालोच ! बापूंना नववीमध्ये अठ्ठ्याऐंशी टक्के मार्क्स होते !

         मग आईने मला सांगितलं, " बापू खूप हुषार होते. त्यांना खूप शिकायचं होतं. पण ते दहावीत गेले आणि त्यांचे वडील देवाघरी गेले. घराची जबाबदारी बापूंवर आली . मग त्यांनी शाळा सोडली व गॅरेजमध्ये नोकरी धरली.नाईलाजाने ! म्हणून त्यांना वाटतं, आपल्या मुलाने खूप शिकावं. त्यासाठी ते किती कष्ट करतात, हे तुला कळणार नाही. तर तू ? तू अभ्यास करत नाहीस. त्या पव्याबरोबर सारखा बिनकामाचा हिंडतोस. आत्ताच मागे पडलास .मग बोर्डाच्या परीक्षेला काय करणार तू ?

         वर - आणि वर उलटं बोललास त्यांना - तुम्ही शिकला नाहीत म्हणून ?"

         आईचा आवाज चढला.

         आई रागावली की कसंतरी होतं. माझ्या मनाला काटा टोचल्यासारखं झालं. टोचला काय, मनात रूतूनच बसला जणू !

         गेम्समध्ये पळणाऱ्या कारसारखे माझे विचार पळत होते. ते बाजूला ठेवले. आणि पहिलं काम केलं, पव्याची मैत्री सोडली. माझ्यामुळे त्याला काही फरक पडला नाही. त्याला त्याच्यासारखे खूप मित्र होते. त्यामुळे माझे डोळे उघडले. दुसरं काम केलं - बापूंच्या प्रगतीपुस्तकाला लॅमिनेशन करून आणलं.

         आणि ते समोर ठेवून अभ्यासाला सुरुवात केली. देवाचा फोटो असल्यासारखं. अर्थात बापूंना मी ते कधीच दिसू दिलं नाही. हातामध्ये वेळ थोडा होता.पण ठरवलं तर जमतं हां मित्रांनो . बोर्डाची परीक्षा म्हणलं तर तेवढी कठीण नक्कीच नसते .

         - आणि बोर्डाच्या परीक्षेत मला ब्याण्णव टक्के पडले.

         मी गॅरेजवर गेलो. बापूंनी माझी पाठ दणादणा थोपटली आणि म्हणाले, " अभिनंदन ! पोरा येस्स ! " त्यांचा चेहरा आनंदाने उजळला होता.

         बापू शिकले नाहीत. पण ते काही कमी नाहीत. त्यांनी इंटरनेटवर स्वतः - स्वतः माझा रिझल्ट, माझ्याआधी पाहिला होता. ते माझी वाटच पहात होते.

         त्यांनी माझ्याशी असलेला त्यांचा अबोला सोडला. ते मला मँगो मस्तानी प्यायला घेऊन गेले. अगदी लगेच. मला ती आवडते हे त्यांना माहितीये.

         मस्तानी पिताना ते म्हणाले, " थँक्स पोरा."

         " कशासाठी बापू ? थँक्स काय ? "

         " अरे. तू शेवटी करून दाखवलंस ! आणि - माझ्या प्रगतिपुस्तकाला तू लॅमिनेशन केलंस ना... मला सगळं माहितीये. मी काही विसरलेलो नाहीये..."

         आता त्यांच्यासमोर बसणं, बोर्डाच्या परीक्षेला बसण्यापेक्षा जास्त अवघड वाटू लागलं.

         "...पण तू यश मिळवलंस. मला आता काही म्हणायचं नाही. तुला काय हवं ते...." त्यांना पुढे काही बोलताच येईना. डोळे पाण्याने डबडबले.

         मग मँगो मस्तानी समोर असली तरी माझ्याही डोळ्यांत पाणी येणारच ना ! 


ही कथा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांशी शेअर करावी ही नम्र विनंती. विशेषतः जी मुलं काही कारणाने, परिस्थितीमुळे मागे पडतात .

ही कथा इतर बऱ्याच पालक आणि मुलांपर्यंतही पोचावी , असं मला वाटतं. ही कथा वाचून मुलांनी अभ्यासात उभारी आणि यशात भरारी घ्यावी ही सदिच्छा !

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या अंतिम परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा !

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------Rate this content
Log in