BIPIN SANGLE

Tragedy

3  

BIPIN SANGLE

Tragedy

ऊब

ऊब

8 mins
772


सूर्याची किरणं धुक्याच्या हातात हात गुंफून हळूहळू खाली उतरत होती. थंडीचे दिवस होते. असह्य, बोचरी थंडी होती. नकोशी ! हाडं गोठवून टाकणारी.

त्याने डोळे उघडले. थंडीच्या कडाक्याने त्याला रात्रभर झोप नव्हती. एक चादर -कितीशी पुरणार ? त्याचा आत्ताच कुठे पहाटे डोळा लागला होता. तो फुटपाथवर उठून बसला. त्याने कराकरा एकदा डोकं खाजवलं आणि अंगावरची चादर बाजूला केली.

तो एक भिकारी होता !

त्या फुटपाथवरच राहणारा. त्या फुटपाथचा राजाच जसा ! तो त्याचाच होता जणू. त्याने मस्तपैकी विडी शिलगावली. तो धूर छातीत भरून घेत , बाहेर सोडत त्याने नजर वळवली , आणि ?-

त्याचे डोळे रागाने विस्फारले . पलीकडच्या लाईटच्या खांबावर एका कुत्र्याने पाय वर केला होता . त्याची जागा घाण केलेली त्याला अजिबात खपत नसे. स्वतः अस्वच्छ असला तरी त्याची जागा स्वछ ठेवण्याचं त्याला वेडच होतं . एक चाळाच होता.  तिरमिरीत त्याने शेजारची काठी त्या दिशेला भिरकावली. कुत्रं पळून गेलं. विडीही विझली.

तो भिकारी असला तरी तरुण होता, धडधाकट होता. तो चांगलाही दिसला असता- जर त्याचे केस अस्ताव्यस्त नसते, जर त्याची दाढी वेडीवाकडी नसती, जर त्याचे कपडे अजागळ , मळकट - कळकट  नसते , जर त्याच्या अंगाला , कपड्यांना घाण वास येत नसता - तर !

त्याने तण्णावून आळस दिला. अंगावरचा फाटका,मळकट काळा कोट झटकला. परत विडी पेटवून तो टपरीवर चहा प्यायला निघाला. टपरीवर मॉर्निंग वॉकवाल्या, हास्यक्लबवाल्या ज्येष्ठांची गर्दी होती. जोडीला तरुण पोरापोरींचीही.  फुटपाथच्या मागेच एक मोठी बाग होती. पहाटेपासूनच तिथे लगबग सुरु होत असे . अगदी भर थंडीतही .

गुलमोहोराच्या पानांतून खाली झिरपणारं ऊन अंगावर घेत, वाफाळणारा चहा पिणं फारच भारी होतं.गरमागरम चहातल्या आलं -वेलचीचा वास घेत, भिकारी मजेने चहा पित होता. थंडीमुळे तोंडातून निघणाऱ्या वाफा अन चहाच्या वाफा एकच झाल्या होत्या .

तो जेव्हा परत आला ,त्याचे डोळे रागाने विस्फारले - त्याच्या पलीकडच्या लाईटच्या खांबापाशी एक भिकारीण बसलेली होती. तिला पाहिल्यावर त्याचं डोकंच फिरलं. तिने  त्याच्या जागेवर अतिक्रमण केलं होतं. तो संपूर्ण फुटपाथ त्याचा होता, जणू त्याचा एकट्याचा.

तो त्याच्या जागेवर गेला. त्याने विडी शिलगावली व मोठा धूर सोडत तो तिच्याकडे रागाने पाहू लागला. तिने ते पाहिलं. ती गप्प बसून राहिली.

“ अवदसा ! आली कुटनं ?... सालीला दुसरीकडं जागा नाय घावली. माज्याच फुटपाथवर उलथली.” तो स्वतःशीच धुसफुसत बोलला.

मग त्याने रागाने हातातली विडी जोरात भिंतीवर फेकली . ती विडी भिंतीला धडकून त्याच्या जागेतच पडली. त्याची जागा अस्वछ झाली. पण आता त्याचं त्याकडे लक्ष नव्हतं.त्याने अर्वाच्य शिव्या द्यायला सुरवात केली. आरडाओरड सुरु केली, पण ती- ढिम्म ! तो उचकला. तरातरा तिच्याकडे गेला. तिने त्याच्याकडे पाहिलं . तिच्या डोळ्यांत दुःख होतं आणि वात्सल्यदेखील .

तो तिच्याकडे एकटक पाहत राहिला. तिच्या अंगावर एक सुती, मूळ रंग ओळखू न येणारी, मळकट साडी होती. ती पाय पोटापाशी घेऊन बसलेली होती . पदराखाली बोचकं. केस पिंजारलेले. काळसर वर्णाची. पण नाजूक  चेहऱ्याची. छोट्या चणीची . तिचा चेहरा ,चेहऱ्यावरचे भाव पाहून कोणालाही तिची दया आली असती.

पण तो भडकलाच. त्याची चादर तिच्या अंगाखाली होती. फुटपाथचा थंडपणा सहन होईना, म्हणून तिने त्याची चादर घेतली होती. तो नसताना. आधी जागा, आता चादर !.... तो चादर ओढायला खाली वाकला, तोच साडीखालचं तिचं ते बोचकं रडायला लागलं ... तिचं बाळ !                        

ती ओली बाळंतीण होती ! …

त्या आवाजाने तो दचकला. मागे फिरला. पण शिव्या देत.

“साली भिकारी ! पोरं काढायची कशापायी ? स्वतःची पोट भरायची मुश्किल आन वर हे . कोणाच्या खाली झोपायचं कशापायी ? रांड साली ! पोरालाबी भोग.”

मग तुटक्या खराट्याने खराखरा आवाज करत त्याने झाडायची सुरुवात केली .पानगळ सुरु झाल्यानं बागेतली अशोकाची पानं सारखी गळत रहात . बागेच्या आत -बाहेर .त्याला टाईमपास देत. 

एक नवमाता तिच्या तान्हुल्याला घेऊन डॉक्टरांकडे चालली होती . दुपट्यात घट्ट गुंडाळून . महागड्या कारमध्ये. तिने त्या भिकारणीकडे पाहिलं आणि ती विचारच करत राहिली - ही बाई या थंडीमध्ये, तेही उघड्यावर पोराची काळजी कशी घेत असेल ?... तिने गाडीची काच वर केली . ते दृश्य झाकून टाकत. स्वतःच्या बाळाला छातीशी आणखीच घट्ट धरत.

येणाऱ्या -जाणाऱ्या आयाबाया तिच्याकडे पाहून चुकचुकायच्या , हळहळायच्या . अन पुढे चालू लागायच्या .

दिवसभर तो तिला काहीबाही शिव्या देत होता. दुपारी त्याने पाहिलं . ती पोराला पदराखाली पाजत होती आणि कोणी तरी तिला दिलेल्या वडापावावर अधाश्यासारखी तुटून पडलेली होती. चव न घेता. खळगी पडलेलं पोट फक्त भरण्यासाठी जणू.... तिच्याकडे काही म्हणजे काही नव्हतं . ना एखादी पिशवी ना एखादी पाण्याची बाटली . पण तिच्याकडे बाळ होतं अन त्याच्यासाठी पान्हा !

“ साली ! कूटनं आलीस गं तू ? रातीला गार वारं सुटलं ना तर मरून जाशील कुत्रे .आन तुज पोरगंबी. माजी च्यादर घेतली....! “

तो ओरडून दमला. त्याचा घसा सुकला. तो उठला व चहा पिऊन आला. येताना त्याच्या हातामध्ये एक पिशवी होती. कोणी काही खायला दिलेली ‘ भरपेट ‘ असं नाव छापलेली कॅरीबॅग. पण आतमध्ये जे काही खायला होतं त्याने अर्धं पोटही मुश्किलीने भरलं असतं.

तो ती पिशवी मुद्दाम तिच्यासमोरून हालवत आला. ती त्याच्याकडे आशाळभूतपणे पाहत होती. पण त्याने तिला फक्त एक कचकचीत शिवी काय ती दिली. तिच्याकडे पाहत पाहत तो चवीचवीने अर्धेमुर्धे सँडविच खाऊ लागला .

दुष्काळात ती आणि तिचा नवरा गावाकडून आले होते . आधीच मरणाची गरिबी. त्यात दुष्काळ . शेवटी त्यांनी शहराची वाट धरली . पोट भरायला . शहरातील चकचकाट पाहून त्यांचे डोळेच दिपले होते . फुटपाथवरच त्यांनी संसार थाटला होता .

शहरात त्यांना बरं वाटलं . निदान दोन टेम खायला तर मिळत होतं . तर कधी गोडधोड .

नवरा गावाकडे दारू प्यायचाच ; पण शहरात मोलमजुरी करून , मिळेल ते काम करून दोन पैसे मिळायला लागले तसं त्याचं पिणं वाढलं . ही गरोदर राहिली आणि एके दिवशी ‘ खोपडी ‘ पिऊन त्याचा घात झाला. त्या हलक्या प्रतीच्या दारूने इतर अनेक जणांबरोबर त्याचाही जीवच गेला. हिची तर पार वाताहत झाली. घर नाही ,नवरा नाही, त्यात बाळंतपण. कामही जमेना . शेवटी ती भिकेलाच लागली . मिळेल ते खात- पित ती कशीबशी जगत राहिली . पुढे एका सत्शील डॉक्टरीणबाईने हिची प्रसूती केली . सांभाळलं . पण किती दिवस ? शेवटी ती अन तिचं नशीब अन …तिचं पोर . 

भिकारी असली तरी तिला पोराची माया होती, एका आईला वाटणारी नैसर्गिक काळजी होती. दुसरी कोणी असती तर ?- कदाचित , कचराकुंडीत फेकूनही दिलं असतं तिने ते पोर!... जिथे स्वतःच्या जगण्याचेच वांधे तिथे ते पोर वाढवायचं कसं ?

एका दुकानाच्या आडोशाला ती रात्री थांबली होती .सकाळ झाली .दुकान उघडलं आणि त्या मालकाने हिला हाणून- मारून हाकलून दिलं होतं . ती तिथून आडोसा सोडून जाईना म्हणून . एका बाईची , एका बाळंतीणीचीही दया आली नव्हती त्या पशूला . ती तिथून निघाली, ती बागेपाशी येऊन थांबली होती , त्याच्या जागेत

हळूहळू सांज बागेवर उतरू लागली. उंच झाडांचे शेंडेच काय ते सोनेरी दिसू लागले. घरट्याकडे परतलेल्या पाखरांचा कलकलाट बागेत सुरु झाला होता आणि - घरट्याबाहेर पडलेल्या पाखरांचा कुजबुजाट बागेत सुरु झाला होता !

बागेमध्ये शांत ठिकाण पाहून प्रेमी पाखरं बसत होती. सांज अंधारात विरघळून जाण्याची वाट पाहत...  

हळूहळू थंडी आणि अंधार एकमेकांच्या मिठीत सामावून गेले. तसे प्रेमी जीवही त्या अंधारात हरवून गेले. एकमेकांच्या देहाच्या उबेचा त्या थंडीत आनंद लुटू लागले.

भिकाऱ्याच्या दगडी भिंतीमागे, बागेत एक जोडी बसलेली होती. तिने स्वतःची  गुलाबी , नाजूक नक्षी विणलेली पश्मिना शाल दोघांभोवती पांघरून घेतली होती. दोघे एकमेकांच्या उबदारपणात सामावले. आणि नंतर - ती शाल खाली पडल्याचंही भान त्यांना राहिलं नाही.

बाग बंद करण्यासाठी गार्डची शिट्टी वाजली. ती जोडी उठली . एकमेकांच्या कंबरेत हात घालून. मंद चालत धुंद बोलत. भिकारी कम्पाउंडवर चढला. त्याची बाग बंद होतानाची ती रोजची सवय होती. कोणाचं काही खाण्या-पिण्याचं विसरलंय का ते पाहण्यासाठी. क्वचित काही मिळे.पण ती त्याची सवयच.

त्याला ती बाकाखाली पडलेली शाल दिसली. त्याचे डोळे लकाकले. त्याचं तर जणू नशीबच उघडलं. पटकन खाली उतरून तो शाल घेऊन बाहेर गेला.

उबदार शाल मिळाली म्हणून भिकारी खूष झाला. कारण त्याची चादर तर ‘ तिच्याकडे ‘ होती.

ती गुलाबी रंगाची शाल त्याने हावरटासारखी अंगावर पांघरली. तिला येणारा खास ‘ बायकी ‘ डीओचा वास त्याला मस्त वाटला. हवाहवासा.  आतमध्ये काहीतरी ‘ जागं’ करणारा. थंडीमुळे वास अधिकच वेगळा वाटणारा. थंडीमुळे वास उडून न गेलेला , हवेत दबलेला . तो पुनःपुन्हा तो वास घेत राहिला , नाकात भरून घेत मजेत बसून राहिला.

रात्र वाढली. समोरच्या दुकानांचे झळझळणारे लाल-निळे निऑन साईन्स थंडावले. वर्दळ मंदावली. चहा- वडापावच्या टपऱ्या बंद झाल्या. अंधार चिरणाऱ्या म्युन्सिपाल्टीच्या दिव्यांचा किरकोळ प्रकाश काय तो उरला. गजबज मंदावत गेली . सारं शांत झालं. गारव्यामुळे लोक लवकरच आपापल्या घरांच्या उबेला पळाले होते.

रात्रीचा प्रहर वाढला आणि थंडीचा कहर !

थंडीने जणू रात्र कवटाळून घेतली आणि भिकारणीने तिच्या तान्हुल्याला ! ती हुडहुडत होती, कुडकुडत होती. तिचे दात कडाकडा वाजत होते. पण ती गप्प बसून होती. दिवसभर बसली होती तशीच. तिच्या अंगावरचे माराचे वण आता ठसठसत होते.

आता पूर्ण शांत झालं होत. माणसं त्यांच्या त्यांच्या दुलयांमध्ये, गोधडीत,   ब्लॅंकेटमध्ये शिरली होती. पोरं आयांच्या तर माणसं बायांच्या कुशीत शिरली होती. ‘ घरातल्या ‘ माणसांसाठी ती थंडी गुलाबी होती कदाचित . पण इथे बागेपासल्या फुटपाथवर.... जीवघेणी !

पण भिकाऱ्याला थंडीचं काही नव्हतं. शाल होती ना ! अन ती चांगलीच उबदार होती . ती अंगाभोवती लपेटून तो मजेत विडी ओढत होता. त्याचाही विडीचा ठराविक ब्रँड होता. गार रात्र लवकर सरणार नव्हती , तसा तो धूरही . थंडीमुळे धूर पटपट विरत नव्हता .

अचानक त्याच्या त्या आनंदाला तडा गेला... भिकारणीचं पोरगं रडायला लागलं. तिने त्याला छातीशी घेतलं. ते शांत झालं. पण पुन्हा रडायला लागलं. भूक भागली , तरी ऊब भागली नव्हती.

भिकारी चिडला. अद्वातद्वा बोलायला लागला.  आधी त्याच्या जागेवर अतिक्रमण,   मग त्याच्या चादरीवर आणि आता त्याच्या राज्यातील शांततेवरही ?-

पोरगं शांत व्हायचं, रडायचं. सारखं हेच चालू होतं. मध्यरात्र झाली. बोचरं वारं बोचकारु लागलं.

पोरगं रडायला लागलं. ते थांबेचना. भिकारी तिरमिरीत उठला. त्याने कुत्र्याला हुसकवायची काठी उचलली व तो तरातरा तिच्याकडे गेला. आता तिची खैर नव्हती की तिला वाचवायला, मध्ये पडायला कोणी नव्हतं…

“ साली रांड ! “ म्हणत त्याने त्वेषाने काठी उचलली.

पोरगं तर रडतच होतं....आणि आता तीही रडू लागली. मोठमोठ्याने. हुंदके देत. स्वतःची कीव येत, स्वतःच्या असहाय्यतेचा राग येत . पोराच्या काळजीने, थंडीने, भुकेने, अंगात मुरलेल्या वेदनेने !...

तिचे अश्रू , तिचं रडणं पाहिलं मात्र - त्याचा हात थांबला. त्याने वेड्यासारखी मान इकडे - तिकडे फिरवली . त्याला काही सुचेना. मग त्याच्या हातातली काठी खाली पडली.

मग - त्याने स्वतःच्या अंगावरची शाल काढून तिच्यावर फेकली. तिने ती मऊसूत शाल स्वतःभोवती घाईने लपेटली.  थंडी घालवत, स्वतःचं दुःख शालीच्या आत कोंडत !,,, त्याच्याकडे स्नेहार्द्र नजरेने पाहत.

मग तो तसाच तरातरा जाऊन त्याची खाण्याची पिशवी घेऊन आला. ती त्याने संध्याकाळी कुठून पैदा केली होती. ती त्याने तिच्यापुढे आपटली. ती फुटली. आतला, काजू घातलेला शिळा पुलाव फुटपाथवर सांडला. तो भातही गार अन खालचे ते पेव्हर ब्लॉक्सही … तिने एकवार त्याच्याकडे पाहिलं व पटापट तो भात ती गिळू लागली… तसल्या थंडीत, गार वाऱ्यात, तो तसला गारढोण, आंबूस , बेचव झालेला भात.

तो त्याच्या जागेवर गेला. आता त्याला झोप लागणं अशक्य होतं. थंडी होतीच की जोडीला. त्याने विडी पेटवली व तिचे झुरके घेत तिची उष्णता शरीरामध्ये शोषण्याचा निष्फळ प्रयत्न तो करू लागला.

विडी संपल्यावर मागे डोकं टेकवून, डोळे मिटून तो बसून राहिला. अगदी शांत. त्याच्या वाढलेल्या दाढीच्या जंजाळाखालीही त्याच्या चेहऱ्यावरचं समाधान मात्र लपत नव्हतं. तोही अशाच कुठल्या तरी परिस्थितीमुळे गावाकडून शहराकडे ढकलला गेला होता . स्थलांतरित . नाईलाजाने. गाव सोडून शहराची लोकसंख्या वाढवायला . शहराच्या आश्रयाला . शहराच्या पायाशी येऊन बसला तरी माणूसपण तो विसरला नव्हता . शहरी झाला नव्हता . त्याला पुन्हा माणूस झाल्यासारखं वाटत होतं !...

कधीतरी त्याला बसल्या बसल्या डुलका लागला अन तो झोपेत हसला . त्याला स्वप्न पडलं होतं ... त्याच्या आईचं ... गेलेल्या आईचं … गालावरून निबर हात मऊपणाने फिरवणारी, प्रेमाने जवळ घेणारी आई. थंडीत त्याच्या अंगावरून सरकलेली प्रेमळ गोधडी सारखी करणारी आई...

तो आईला बिलगला, तिच्या मायेच्या ऊबदारपणात शिरला …

खरंतर- फाटक्या, काळ्या कोटातले हात पोटाशी घट्ट आवळून , आखडून , जालीम थंडीला थोपवत .

त्याच्या जागेवर ते पोरगंही झोपलं होतं . शांत , त्याच्या आईच्या उबेत .


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy