Anu Dessai

Horror Tragedy Crime

4.5  

Anu Dessai

Horror Tragedy Crime

मुक्ती..!!

मुक्ती..!!

11 mins
677


     त्याने करकचून ब्रेक दाबला..सीटबेल्ट होता म्हणून नाहीतर स्टेरिंगवर आदळला असता...रात्रीचे साडे अकरा वाजून गेलेले, त्यात आॅफिस पासून ते घरापर्यंतचा दिड दोन तासाचा तो रस्ता अगदीच एकाकी..आडवळणाचा...दिवसा तुरळक रहदारी आणि रात्री तर अगदीच सामसूम..गर्द हिरव्या झाडाच्या दाटीने सजलेला तिन्ही त्रिकाळ शीतल रस्ता होता तो..कितीही प्रखर ऊन असलं तरी या रस्त्यावर मात्र सतत सावली..आज तर अमावस्या..सगळीकडे काळाकुट्ट अंधार ऐरवी फांद्याआडून चांदणं कधीतरी डोकावत असे..खरं तर त्याच्या घराकडून दुसऱ्या बाजूला एक हायवे सुध्दा होता पण तिथून त्याच्या आॅफिसला पोहचायला तीन साडेतीन तास लागायचे दिड तास वाचवण्यासाठी तो या आडरस्त्याने जायचा..पाचला आॅफिसमधून सुटला की संथपणे सात वाजेपर्यंत घरी पोहचायचा, कधी उशीर झालाच तर नऊ फार तर फार साडेनऊ दहा..नोकरी नवीन होती,आठ नऊ महिनेच झाले होते त्याला जाॅईन होऊन..इतक्या महिन्यात त्याने पहिल्यांदाच सुट्टी टाकली होती दोन दिवस म्हणून त्या दोन दिवसांचं काम उरकताना त्याला वेळ लागला..तसा त्याला रस्ता सवयीचा होता पण आज घाईघाईत जास्तच उशीर झालेला म्हणून त्याने घरी कळवलेलं म्हणजे सगळे निवांत झोपले असते तसंही त्याच्याजवळ घराच्या ड्युप्लिकेट चाव्या होत्याच.. 

     अजिंक्य पाठक, वय वर्षे अठ्ठावीस..उंचपुरा,गवाळ वर्णाचा..स्वभावाने लाघवी होता.त्याचं राहातं घर पुण्यापासून काही अंतरावर होतं..तसं त्याचं मुळगाव रत्नागिरी..पण त्याच्या जन्माआधीच वडिलांची बदली झाल्यामुळे त्याचं पुर्ण आयुष्य इथेच गेलं होतं..शिक्षण पुण्यात झालं यथावकाश नोकरी लागली पण तिथे एक वर्ष काम केल्यानंतर काही कारणास्तव ती नोकरी सोडावी लागली होती त्याला..ही नवीन नोकरी लागल्यानंतर तीन महिन्यांनी स्थळ आलं त्याला अंजलीचं..अंजली बापट त्याला साजेशी होती..नाकीडोळी नीटस, सगळ्यांशी मिळून मिसळून बोलणारी.ती ही खाजगी कंपनीत जाॅब करत होती..स्थळ आल्यानंतर दोघे भेटले, बोलून एकमेकांना जाणून घेतलं आणि दोघांनी होकर दिला आणि काही दिवसात लग्नसुध्दा धुमधडाक्यात पार पडलं,अंजली त्याच्यासाठी लकी होती लग्नाच्या आठव्या दिवशी त्याच्या हातात बढती मिळाल्याचं पत्र पडलं होतं..त्यामुळे त्याला तातडीने कामावर हजर राहावं लागलं होतं आणि नवीन जबाबदारी आल्यामुळे अंजलीला बाहेर घेऊन जाण्याचं लांबणीवर पडलं होतं त्यामुळे आज त्याने खास करून वेळ काढून सुट्टी टाकली होती.. 

     याविषयी त्याने अंजलीला काही सांगितलं नव्हतं, त्याला तिला सरप्राईज द्यायचं होतं आणि भराभर काम आटपून तो निघाला होता, गाडीत बसल्यापासून तो त्याच विचारात गुरफटला होता आणि घरी अंजली आणि आई बाबा काळजी करत असतील म्हणून गाडीचा स्पीड थोडा वाढवला होता आणि अचानक समोर काहीतरी आल्यामुळे त्याने ब्रेक मारला होता..गाडीसमोर एक मुलगी आली होती, तिने काचेवर टकटक केलं..अजिंक्यने काच खाली केली..गाडीतल्या उजेडात तिचा चेहरा अंधुकसा दिसला..ती कुठून तरी धावत आल्यासारखी वाटत होती आणि तिला धाप लागली होती तरी ही ती कशीबशी बोलली, "दादा, प्लीज...प्लीज....मला इथून...इथून घेऊन चला... ते...ते मला सोडणार नाहीत.. प्लीज... " अजिंक्यने बाहेर नजर फिरवली पण तिथे कोणी नव्हतं,पण तिची परिस्थिती पाहून विश्वास ठेवणं भाग होतं आणि जरी कोणी दिसत नसलं तरी एका मुलीला अशा सुनसान ठिकाणी सोडून जाणं योग्य नव्हतं...म्हणून तो म्हणाला, "हो ताई.. या बसा.. " असं म्हणत त्याने दार उघडलं..ती पटकन येऊन बसली...अजिंक्यने गाडी सुरू केली..अजिंक्यने तिला आता नीट न्याहाळलं..गोरीपान, साधरण पाच फुट उंचीची लांबसडक केसांची, हातात पर्स मनगटी घड्याळ..तशी दिसायला सुंदर पण आता पार अवतार झाला होता तिचा..केस विसकटले होते, पुर्ण घामेजली होती, तिचा उर धपापत होता..कुर्ता आणि लेगिन्स असा पेहराव होता तिचा..पण तिचा कुर्ता छातीवर जरा आॅडली फाटला होता त्यामुळे ती कशीबशी झाकण्याचा प्रयत्न करत होती..हे लक्षात येताच त्याने मागच्या सीटवरचा कोट तिला दिला, तिनेही तो निमुट घातला आणि त्याने दिलेलं पाणी प्यायली...

     ती थोडीशी स्थिर झाली आणि तिने आपली छोटी पर्स मागच्या सीटवर ठेवली तसं अजिंक्यने तिला विचारलं, "ताई बरं वाटतयं का..??" "हो" ती.."मला सांगा तुम्ही इतक्या रात्री अशा आड रस्त्यावर काय करत होता आणि कोण होतं तुमच्या मागे..?? "अजिंक्य.." त्याचं काय आहे ना, मी इथेच मेश्राम एंटरप्राइजेज मध्ये काम करते..आज मला निघायला उशीर झाला आणि लवकर पोहचावं म्हणून मी हा शाॅटकर्ट घेतला तर रस्त्यात माझी गाडी बंद पडली म्हणून मी समोरून येणाऱ्या गाडीकडे लिफ्ट मागितली..त्यांनी गाडी थांबवली..मी ही गाडी लाॅक करून बाजूला पार्क केली आणि गाडीत बसले..ते दोघेजण होते..चाळीशीच्या आसपासचे असावेत..थोडं पुढे गेल्यावर अचानक त्यांनी गाडी थांबवली आणि मागचा दरवाजा उघडून अचानक आत आले..मला काही कळण्याआधीच पकडलं आणि

मी पुर्ण प्रतिकार केला, त्यातच माझे कपडे फाटले, मला एकाची पकड जरा ढिली जाणवली म्हणून मी त्याला ढकलून पळत सुटले, आणि तुमच्या गाडी समोर आले..." तिने घडलेला सगळा वृतांत सांगितला..."ओके, रिलॅक्स व्हा ताई माझ्यासोबत तुम्ही सेफ आहात..तुम्ही कुठे राहाता म्हणजे मी तुम्हाला तुमच्या घरी ड्राॅप करेन.." अजिंक्यने तिला धीर दिला.. "अजून वीसेक मिनीटांनी जो पहिला राईट लागेल तिथून वळून थोडं पुढे पोस्ट ऑफिसकडून चौथी बिल्डींग क्षितीज अपार्टमेंटस्..." अरेच्चा..!! म्हणजे आॅन द वे...तुमच्या घरापासून पुढे अर्ध्या तासात माझं घर सुपर मार्केटच्या समोरची बिल्डिंग मैत्र अपार्टमेंटस्...कधी तिकडे चक्कर असली तर या घरी चहाला.. " या वाक्यावर दोघे हसले, ती खूप वेळाने हसत होती..आता ती बरीचशी सावरली होती,पुढे इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या,तिचं नाव कस्तुरी कामत होतं..तिच्या घरी तिचे आई, बाबा आणि लहान भाऊ किरण असल्याचं समजलं तो काॅलेजमध्ये शिकत होता, बाबा नुकतेच बँकेतून रिटायर्ड झाले होते आणि आई घरीच असायची आणि हि डिग्री पुर्ण करून आताशी नोकरीला लागली होती,कामाचं ठिकाण दुरचं म्हणून बाबांनी गाडी घेतलेली..त्याने ही आपल्या घरच्यांविषयी सांगितलं..

    तेवढ्यात तिने गाडी थांबवायला सांगितली.."थांबा दादा, मी उतरते इथेच.." "अहो पण ताई तुमचं घर तर पुढे आहे ना.." अजिंक्यने विचारलं.."हो पण इथे शेजारच्या मैत्रिणीकडून ड्रेसची पिशवी आणायची होती,तिने गॅलरीच्या खुर्चीत ठेवली असेल पावसाने भिजेल त्यामुळे आताच घरी घेऊन जाते,थँक्यू हं.."असं म्हणून ती उतरली सुध्दा..अजिंक्यने तिला बाय केलं आणि मागच्या सीटवरची पाण्याची बाटली घ्यायला मागे वळला तिथे तिची छोटी बॅग होती, त्याने पटकन ती बॅग उचलली आणि तो खाली उतरला आणि ती गेल्या दिशेला पाहून हाक मारू लागला पण त्याला काही प्रतिसाद मिळाला नाही म्हणून तो चालत मागे गेला पण तिथल्या घरांसमोर अंधारच दिसत होता,ती एवढ्या लवकर कुठे गायब झाली हेच त्याला कळेना पण मग पाठीमागून एखादी वाट असेल तिथून गेली असेल असा अंदाज बांधून तो पुढे आला आणि त्याने तिची बिल्डिंग गाठली..तिथला वाॅचमेन पेंगत होता..सगळं वातावरण अगदी सामसूम होतं तिथे कोणी आल्या गेल्याच्या खुणा सुध्दा नव्हत्या..ती गाडीतून उतरून अवघी काही मिनिटं लोटली होती तरीही एवढ्या वेगाने ती कशी कुठे गेली हा विचार करतच त्याला सोसायटीची सदस्य यादी असलेला फलक दिसला त्यावर सुदैवाने त्यांच्या नावापुढे फ्लॅट नंबर दिले होते त्याने केदार कामत नाव असलेल्या गृहस्थांचा फ्लॅट नंबर पाहिला,तिथे त्या आडनावाचे एकच गृहस्थ होते ते कदाचित कस्तुरीचे बाबा असावेत असं त्याला वाटलं..बी विंग तिसरा मजला, फ्लॅट नंबर ३०३ असा तिचा पत्ता होता एवढ्या रात्री लिफ्ट नको म्हणून तो पायऱ्या चढून वर गेला तिथे ही फक्त काॅरीडोरचे दिवे जळत होते पण एवढ्यात कोणी आल्याची काहीच हालचाल जाणवत नव्हतं..सुरूवातीला तो थोडावेळ दाराबाहेर घुटमळला पण घड्याळात पाहिलं एक वाजत आला होता म्हणून घाई केली आणि दाराची बेल वाजवली..आतून काही प्रतिसाद न आल्यामुळे त्याने पुन्हा एकदा बेल वाजवली आणि काही क्षणात आतून कडी उघडल्याचा आवाज आला.. 

      "कोण आपण..?? एवढ्या रात्री इथे काय करताय..??" समोरून एक साठीचे गृहस्थ त्याला विचारत होते."काका,मी अजिंक्य पाठक, आताच तुमच्या मुलीला कस्तुरीला मी तुमच्या बिल्डिंगच्या अलिकडे सोडलं, त्यांची ही पर्स माझ्या गाडीत राहिली ती द्यायला आलोय..ही घ्या.." त्यांच्या चेहऱ्यावर एक कोडं उमटलं,थोडावेळ ते काही बोलले नाहीत पण लगेच सावरून म्हणाले, "तुम्ही थोडावेळ आत या..बोलायचं आहे.." त्यांनी त्याला आत नेलं आणि बसवलं..त्याच्यासाठी पाणी आणायला आत जाताना त्यांनी हाॅलमधला लाईट लावला, तो घर न्याहाळू लागला तेव्हा त्याची नजर समोरच्या भिंतीवर नजर पडली तिथे कस्तुरीचा फोटो होता आणि त्याला चंदनाचा हार घातलेला होता, ते पाहून तो क्षणभर थबकलाच..त्यांनी पाण्याचा ग्लास समोर धरला.."हे घ्या, गरज आहे तुम्हाला.." ते म्हणाले..त्याने तो ग्लास घेतला आणि क्षणात रिकामा केला तो धक्काच तसा जबर होता..तो थोडासा स्थिरावल्यावर त्यांनी बोलायला सुरुवात केली,"अजिंक्य,मी केदार कामत..ही माझी मुलगी कस्तुरी,दोन वर्षापुर्वी तिचं ग्रॅज्युएशन पुर्ण झालं, लगेचच चांगली नोकरी ही लागली...आम्ही सगळे खुश होतो,फक्त तिला प्रवास जरासा झेपत नव्हता..कधी बस, टॅक्सी,रिक्षा असं करता करता जीव मेटाकुटीला यायचा तिचा म्हणून आम्ही तिला सरप्राईज द्यायचं ठरवलं..तिचा पहिला पगार तिने माझ्या हातावर ठेवला आणि मी तिच्या हातावर नवीन गाडीची किल्ली..काय खुश झाली पोर त्यादिवशी..लवकरच लायसन्स वगैरेच्या फाॅरमॅलीटीज् पार पडल्या आणि ती गाडी घेऊन जाऊ लागली,घरी लवकर येता यावं म्हणून ती नेहमी तो भामीण फाट्यावरचा सामसूम रस्ता घ्यायची..ती घरी पोहचेपर्यंत माझ्या मनात नेहमी धाकधूक असायची पण अमंळ सात वाजेपर्यंत ती घरी पोहचायची तोपर्यंत तसा उजेड आणि थोडीफार रहदारी तिथं असायची म्हणून काळजी थोडी कमी होती..

     शेवटी तो काळा दिवस उगवलाच, त्या दिवशी अमावस्या होती..ती नेहमीप्रमाणे बाहेर पडली..दिवस रोजच्या सारखा गेला आणि चोर पावलांनी त्या काळरात्रीने आमच्या सर्वांच्या आयुष्यात शिरकाव केला..संध्याकाळी तिचा मला मेसेज आला की तिला उशीर होईल म्हणून आम्ही निवांत होतो..पण दहा वाजता आले तरी ती घरी पोहचली नव्हती, फोन लागत नव्हता.पोरीला काय झालं ते कळायला मार्ग नव्हता..शेवटी मी सोसायटीतल्या मित्राला घेऊन तिच्या कामाच्या ठिकाणी जायचं ठरवलं आणि घराबाहेर पडण्याच्या तयारीतच होतो की दारावरची बेल वाजली..मी दार उघडलं आणि पाय जागेवरच गोठले समोर पोलीस होते,पुढे तर त्यांचे शब्द ऐकून त्राणच गेलं अंगातलं ते म्हणाले,"नमस्कार साहेब, मी सबइन्सपेक्टर श्रीकांत शिंदे..आम्हाला कोणीतरी फोन केला की भामीण फाट्यावर एक स्कुटी रस्त्याच्या कडेला लावलेली आहे आणि तिथून काही अंतरावर एक मुलगी अत्यवस्थ स्थितीत पडली आहे..आम्ही तिथे गेलो तेव्हा ती शुध्दीवर नव्हती पण तिच्याजवळ सापडलेल्या पर्समधून हा पत्ता मिळाला,तिला हाॅस्पीटलमध्ये दाखल केलयं काही वेळापूर्वी तिला शुद्ध आली तेव्हापासून तिने तुमच्या नावाचा धोशा लावला आहे ती अजून कोणत्याही गोष्टीला प्रतिसाद देत नाहीये..तुम्हाला माझ्यासोबत हाॅस्पीटलमध्ये यावं लागेल.." हे ऐकून मी उभ्या जागी मटकन् खाली बसलो.."मी तुमची स्थिती समजू शकतो सर पण वेळ कमी आहे आपल्याजवळ प्लिज लवकर चला.."असं म्हणत त्यांनी मला उठवलं मी ग्लासभर पाणी प्यायलो आणि त्यांच्यासोबत हाॅस्पीटलमध्ये गेलो..त्या तिथे आयसीयु मध्ये माझ्या काळजाचा तुकडा..माझी कस्तुरी नळ्या,सुयांमध्ये गुरफटून जीवनमरणाशी झुंजत होती..मी डाॅक्टरांच्या परवानगीने आत गेलो..मी तिच्या डोक्यावर हात ठेवला तिने मोठ्या कष्टाने डोळे उघडले..त्या डोळ्यांमध्ये करूणा ओसंडून वाहत होती.."बा..बा..माझं का...य चुक..लं होतं ओ..त्या नरा..धमानी मला फा..डून खाल्लं.." तिच्या या प्रश्नावर मी निरुत्तर होतो.."बाळा, तू आता काहीही विचार करू नकोस बरं..शांत पडून रहा,तुला लवकर बरं व्हायचयं.."मी तिला समजावण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होतो मी.."नाही बाबा..माझ्या..कडे वेळ खू..प कमी आहे..पण मी त्यां..ना आणि त्यांच्या.. सारख्या सैतानांना सोड...णार नाही..मी बदला जरूर घे..ई..न..येते बाबा..." म्हणत तिने माझ्या कुशीत प्राण सोडला आणि मी काहीही करू शकलो नाही,ते नराधम पुराव्याअभावी मोकाट सुटले होते पण मला राहून राहून तिचे ते शब्द आठवत होते, "मी बदला घेईन, मी त्यांना आणि त्यांच्यासारख्या सैतानांना सोडणार नाही.."

     एवढं बोलून ते उसासा घेत थोडावेळ थांबले आणि पुढे सांगु लागले,"तिच्या मृत्यूनंतर आमच्या घरावर जणू अवकळा पसरली होती पण तिच्या क्रियाक्रर्मावेळी, दिवस कार्य करताना तिच्या पिंडाला कावळा शिवला नव्हता, खूप विनवण्या केल्या,शपथा घातल्या तरी शेवटपर्यंत ती आलीच नाही तेव्हा गुरूजी सांगून गेले होते,महिन्याच्या दर अमावस्येला तिच्या नावाने जवळच्या पिंपळाच्या पारावर दिवा लावत जा ती अकस्मात गेली आहे तिच्या आत्म्याला मुक्तीचा मार्ग लवकरात लवकर मिळावा म्हणून ही तजवीज..तो ज्यादिवशी मिळेल तेव्हा तुम्हाला संकेत नक्की मिळेल आणि तेव्हा तुम्ही दिवा लावणं थांबवू शकता..त्यानंतर सुरू झाली मालिका बदल्याची...ती गेल्यानंतर पहिल्या अमावस्येला आम्ही दिवा लावला आणि मागे फिरलो,फाटकातून आत येताना सहज तिकडे नजर गेली तर दिवा विझला होता,वाटलं वाऱ्याने विझला असेल म्हणून पुन्हा लावून आलो तर पुन्हा तेच मग मात्र दुर्लक्ष करून आत आलो..पण का कोण जाणे मनाला चुटपूट लागून राहिली होती आणि सकाळी उठलो तेव्हा वर्तमानपत्रात बातमी वाचली..."भामीण फाट्यावर xxx गाडीला भीषण अपघात,xxx जागीच ठार..." उगाच मला दिव्याची आठवण झाली पण मग मी मनाला समजावलं की कदाचित योगायोग असावा..पण मग हे पुढे सुरूच राहिलं दर अमावस्येला इथे दिवा विझायचा आणि तिथे कुणाचा तरी बळी हा ठरलेलाच असायचा..कालांतराने लोक तिथे भुताटकी असल्याचं बोलु लागले,पोलिसांनी ही शोध घेण्याचा प्रयत्न केला पण तिथे त्यांना संशयास्पद असे काही आढळले नाही..दरवेळी गाडीचा ब्रेक फेल असायचा,ड्रायव्हरचं गाडीवरचं नियंत्रण सुटलेलं असायचं तर कोणी अचानक हार्ट अटॅकने गेलेला म्हणजे सगळं नैसर्गिकच,अनैसर्गिक असं काही वाटतच नव्हतं तिथे..तरी लोकं बोलायची,कुणी मुलगी मदतीसाठी गाडी थांबवते आणि जो गाडी थांबवतो तो संपतो..पण तिथे नेमकं काय घडायचं आजवर कुणालाच कळलं नाही..पण मग आजही अमावस्याच आणि तुमच्या म्हणण्यानुसार जर तुम्हाला कस्तुरी भेटली तर तुम्ही जीवंत कसे..??" असं म्हणत ते विचारत पडले.."कदाचित त्याचं उत्तर या बॅगमध्ये असेल.." म्हणत अजिंक्यने ती बॅग उघडली त्यात एक पत्र होतं त्याने ते उघडलं आणि वाचायला सुरुवात केली, 


प्रिय अजिंक्य दादा, 


मी कस्तुरी..तुम्ही आता बाबांकडून जे ऐकलतं ते खरं आहे.मी आज जीवंत नाही,आपण भेटलो आणि एक दुष्टचक्र संपलं..त्या दिवशी त्या नराधमांच्या तावडीत धडपडत असताना जीवाच्या आकांताने मदतीसाठी ओरडत होते पण कोणीही आलं नाही नव्हे थांबलं नाही..त्यावेळी जेव्हा माझा प्राण डोळ्यात उतरला होता पण कोणीही साधी बघण्याचीही तसदी घेतली नाही, मला त्या नराधमांनी फाडली..माझी काहीही चूक नसताना आणि माझी शुद्ध हरपली..जेव्हा मी डोळे उघडले तेव्हा समोर बाबा होते,पण माझ्याकडे वेळ कमी होता आणि माझ्या मनात सुडाची भावना निर्माण झाली होती मी जीव सोडते वेळी ती तशीच राहिली त्यामुळे मी प्राण सोडल्यावर ही मी भटकत राहिले..पण सुडाने तळपणारा माझा आत्मा दर अमावस्येला सुड उगवत राहिला..मी मदतीला म्हणून गाडी थांबवायचे आणि हमखास माणसामधला सैतान जागा व्हायचा अन् मी त्याचा जीव घ्यायचे,मला एक नराधम संपवल्याचं समाधान मिळायचं पण आज मात्र तुम्ही भेटलात तुमच्या परोपकारी वृत्तीमुळे माझ्याकडून तुम्हाला काही इजा झाली नाही..तुम्ही खरोखर माझ्याकडे बहिणीच्या नजरेने पाहिलंत शक्य तितकी मदत केलीत,भांबावलेल्या जीवाला मायेचा आधार दिलात,माझा सूड संपला आणि मी त्या भटकंतीतून मुक्त झाले..मला मुक्ती मिळाली.गेली दोन वर्ष हा मृत्यू तांडव सुरू होता जो आज तुमच्या सदसद्विवेकबुद्धीमुळे संपुष्टात आला...माझ्या नव्या प्रवासाला तुमच्या चांगल्या वृत्तीमुळे सुरूवात झाली त्याबद्दल मनापासून तुमचे आभार..बाबा,मला न्याय मिळाला..या जन्मात मुलगी म्हणून तुमचे ऋण फेडू शकले नाही पण पुढच्या जन्मी ते फेडण्यासाठी नक्की परत तुमच्या पोटी जन्म घेईन,तोवर काळजी घ्या स्वतःची,आईची आणि किरणची...येते मी..


तुमचीच

कस्तुरी


    खरतरं यावर विश्वास ठेवणं जड जात होतं पण पत्ररूपी पुरावा समोर होता आणि त्यातून सगळ्या गोष्टींचा उलगडा झाला होता..थोडावेळ ते दोघे शांत होते पण वेळ लक्षात घेता अजिंक्य तिच्या बाबांचा निरोप घेत जायला उठला,ते ही त्याला सोडायला खाली फाटकापर्यंत आले..अजिंक्य निघाला तसे ते जायला वळले तेव्हा त्यांना पारावरचा दिवा तेवताना दिसला, त्याला पाहून त्यांनी त्याला मनोभावे हात जोडले त्यांच्या निरागस मुलीचा चेहरा एक क्षण त्यांच्या नजरेसमोर तरळला आणि ते घरात आले तेव्हा त्यांनी कस्तुरीच्या फोटोकडे पाहिलं, त्यांना मनोमन आज ती समाधानाने स्मितहास्य करत आहे असं वाटलं ते ही प्रसन्न मनाने झोपायला गेले...या घटनेला आता वर्ष लोटलं होतं पण अजिंक्यचं कस्तुरीच्या घरी येणंजाणं कायम राहिलं..त्यांच्यात छान सलोख्याचे संबंध निर्माण झाले.. रात्रीचे बारा वाजल्याचे टोले घड्याळात पडले आणि कोजागिरी पौर्णिमेला सुरूवात झाली,अजिंक्य अस्वस्थ होऊन हाॅस्पीटलच्या वरांड्यात ऐरझाऱ्या घालत होता, त्याचे आई बाबा, कामत कुटूंबीय त्याला धीर देत होते आणि इतक्यात बाळाचं ट्यॅहा हाॅस्पीटलभर घुमलं आणि थोड्यावेळाने नर्स बाळाला घेऊन बाहेर आली आणि म्हणाली,"अभिनंदन..!!तुम्हाला मुलगी झालीये.." अजिंक्यने तिला हातात घेतलं आणि त्याच्या तोंडी शब्द उमटले,"कस्तुरी..!!"


वाचक हो,दिर्घकाळानंतर तुमच्यासाठी ही कथा घेऊन आलेय..ही कथा तुम्हाला कशी वाटली प्रतिक्रियांमधून नक्की कळवा..तुमच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत..


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror