आर्ट गॅलरी
आर्ट गॅलरी


भूत प्रेत, मांत्रिक, तांत्रिक, भयंकर वाढलेल्या माणसांच्या गर्दीत, जणू या लोकांना काही जागाच राहिली नाही. त्यामुळे भुता प्रेतांनी आता बहुतेक नवीन शक्कल शोधून काढली आहे. सगळीकडे माणसंच माणसं, भुतांनादेखील शांतपणे राहायला जागा उरली नाही. ड्रॅक्युला चेहरादेखील आता जुना झाला, जुनी मोडकळीला आलेले वाडे पाडून आकाशाला भेटतील अशा इमारती निर्माण झाल्या आहेत. भयानक जंगल, एकाकी घर, जुने कारखाने, जुन्या चाळीदेखील नाहीशा झाल्यात. जंगले सपाट झाल्यामुळे, भुतांना तिकडेदेखील शांतता मिळत नाही. स्मशानाच्या आजूबाजूलादेखील इमारती उभ्या राहिल्यात, त्यामुळे मोक्षप्राप्ती थोडीशी अवघड होऊन बसली आहे.
मंत्र-तंत्र जाणून, एखाद्या झपाटलेल्या भुताला पळवून लावणारे मंत्रिक फार थोडे उरलेत. सच्चा दिलाने सेवा करणारे लोकपण गायब झालेत. अशा वेळेला एखाद्यावर संकट आल्यावर काय करणार? पोलीस डिपार्टमेंट, गुप्तहेर संघटना, हे मनुष्य शोधतील, पण त्यांना, अतृप्त आत्म्याच्या मागण्या मान्य करता येतील? किंवा एखाद्या दुखावलेल्या आत्म्याने जर काही गुन्हा केला तर त्याला काय शिक्षा करता येईल? सगळं काही अवघडच आहे. पण एखादा चित्रकार जेव्हा चित्र काढतो, या चित्रामध्ये तो आपल्यात तन-मन, धन ही ओतून पंचप्राण फुंकत असतो.
अशा एखाद्या चित्राची जर विटंबना झाली तर काय होत असेल?
मुंबईतली इंदिरा आर्ट गॅलरी फेमस होती, अतिशय उत्तम नावाजलेल्या चित्रकारांची चित्र तिथे प्रदर्शित केली जायची. इंदिरा गॅलरीमध्ये आलेली चित्र अतिशय महागड्या किमतीला विकलीपण जायची. गॅलरी बघण्यासाठी जरी सर्व लोकांसाठी खुली असली तरी वरच्या मजल्यावर मात्र काही खास लोकांसाठी प्रवेश होता. पावसाळ्याच्या दिवसात प्रदर्शन बघायला फार कमी लोक यायचे म्हणून वरचा मजलादेखील शनिवार-रविवार उघडला होता.
वरच्या मजल्यावर न्यूड पेंटिंग लावलेले होते. 18 वर्षांखालील मुलांना तिथे प्रवेश नव्हता पण काही चहाटळ मुले आणि काही विक्षिप्त मुली त्यांना बघायचं होतं की न्यूड पेंटिंग म्हणजे काय.
रविवारचा शांत दिवस, दुपारच्या वेळेस वॉचमनशिवाय इंदिरा गॅलरीमध्ये कोणीच नव्हता, वॉचमन नैसर्गिक कृत्यासाठी बाजूला झाला, तो क्षण साधून राज, अनिकेत, आशिष, नवनीत, अनोखी, बिंदू, शायना, यांनी तिथे गुपचूप प्रवेश मिळवला. नुकतेच अकरावीला प्रवेश मिळवलेली आणि काही फारच बाबतीमध्ये इंटरेस्ट असलेली ही चहाटळ मुले होती. अनोखी, बिंदू आणि शायना या पण काही कमी नव्हत्या.
वरच्या मजल्यावरसुद्धा एक वॉचमन होता, नेमका तो जेवण्यासाठी गेला होता. रविवारचा शांत वेळ, सामान्य नागरिक जेवण करून दुपारची वामकुक्षी घेणार, प्रदर्शन बघायला कोण येणार म्हणून वॉचमनदेखील आरामात होते. तसा सीसीटीव्ही कॅमेरा चालू होता. न्यूड पेंटिंगच्या एरियामध्ये आल्यावर प्रत्येकाला आनंद घ्यायचा होता म्हणून त्यांनी सगळ्यांनी वेगवेगळ्या बाजूला जायचे ठरवले.
कुठल्याही चित्राला हात लावू नका, शिक्षा होईल, असा नेहमीसारखाच फलक तिथे लावला होता. जे दर्दी रसिक होते, सूचनांचे पालन करायचे, आणि कलाकारास प्रोत्साहन द्यायचे. पहिले चित्र एका पाठमोऱ्या उघड्या बाईचं (कोळीण) होतं, जणूकाही ती बाई समोरच बसली आहे, बाईच्या शेजारी माशांची टोपली होती, कुठल्याशा बेटावरचे दृश्य वाटत होतं. चित्रातल्या बाईचा सावळा रंग, बारीक कंबर, भरगच्च केसांचा अंबाडा, अतिशय आकर्षक दिसत होता. कोणी नाहीसं बघून नवनीतने तिच्या कमरेस हळूच स्पर्श केला, आणि जणू काही तो तिला वळवतोय असा जोर लावला... बाई खरोखरच वळली, आणि समोरचे दृश्य बघून नवनीत त्या चित्रावर कोसळला.
राज आणि बिंदू हातात हात घालून भविष्याची स्वप्न बघत चित्र बघत होती, समोरचे चित्र पाठमोरा पुरुष आणि त्याने कवटाळलेली स्त्री असं होतं. चित्र एकदम जिवंत होतं, स्त्रीचा चेहरा पुरुषाच्या छातीमध्ये लपला होता, पण तिच्या हातावरून, कंबरेवरून ती अतिशय नाजूक आणि सुरेख असणार असा भास होत होता, पुरुष एकदम बलदंड, त्याच्या हाताचे आणि पायाचे स्नायू तो अतिशय ताकदवर असल्याचे दाखवत होता. चित्रातले स्त्री-पुरुष पुराणकाळातील वाटत होते. पुरुषाच्या कमरेस वाघाचे कातडे होते, तर स्त्रीच्या कमरेस हरणाचे कातडे होते. पुरुषाच्या पाठीचे स्नायू कसदार, जणू काही एखादा योद्धा. त्याच्या कमरेस लावलेली धारदार तलवार आणि खांद्यावरती अडकवलेला धनुष्यबाण याची साक्ष देत होता. त्याच्या मनगटावर कातडी पट्टे होते, आणि दंडामध्ये रुद्राक्ष लपेटला होता. पुरुषाचा रंग तेजस्वी सावळा, स्त्री नाजूक, गोरीपान, नितंबापर्यंत येणारे रेशमी केस जणू वाऱ्यावर उडणारे. स्त्रीच्या हातामध्ये, अतिशय नाजूक विणलेले मोत्यांचे दागिने होते.
राजने बिंदूकडे बघितले, त्या दोघांनीपण सेम पोज घेतली, सेल्फी काढणे मना होतं तरीदेखील राज मागे वळला, त्याने बिंदूला तसेच कवेत धरले आणि सेल्फीसाठी मोबाईल उंचावला. हे करताना चुकून त्याचा हात त्या योद्ध्याच्या हातास लागला आणि विजेचा झटका बसावा असा भास राजला झाला, तो बलदंड पुरुष वळला, त्याचा एकाच बाजूला चेहरा रंगवलेला होता, आणि दुसरी बाजू नव्हती, कारण चित्र एकाच बाजूचं होतं, त्याने एक झापड राजच्या थोबाडीत मारली आणि खसकन बिंदूला चित्रामध्ये ओढले.
डोळ्यापुढे काजवे चमकत असतानादेखील राजने डोळे ताणून बघितले तर त्या सुरेख बाईच्या जागी बिंदू उभी होती. त्याने बिंदूला परत ओढण्याचा प्रयत्न केला, पण निष्फळ ठरला, बिंदूचा चेहरा पण दिसत नव्हता, त्याने स्वतःच्या बाजूला बघितले, तर चित्रातली बाई त्याच्या बाजूला उभी होती, तिचा चेहरा केसांनी झाकला होता. राजला वाटले, बिंदूच आहे, म्हणून त्याने तिचे केस बाजूला केले, चेहरा म्हणून तिथे काहीच नव्हतं, कारण चित्रामध्ये चेहरा काढलेला नव्हता. एक जबरदस्त किंकाळी फोडून राज बेशुद्ध पडला. बिनचेहऱ्याच्या बाईने राजलादेखील चित्रात ओढले, दोघांच्या झटापटीमध्ये राज खाली पडला, पडला तर योद्ध्याच्या पायापाशी, योध्याने त्याच्या पाठीवरती आपला डावा पाय रुतवला, आणि त्याला तिथेच पकडून ठेवले. आता त्या चित्रामध्ये राज, तो बलदंड माणूस, त्याच्याबरोबरची स्त्री, बिंदू एवढे जण दिसत होते, राज आणि बिंदूचे कपडे चित्राच्या खाली पडले होते.
आशिष आणि अनोखी हेदेखील हातात हात घालून बरोबरच हिंडत मजेमजेत प्रदर्शन बघत होते, गॅलरी सुनसान असल्यामुळे त्यांच्या पण रोमान्सला पण बहर आला होता. एका चित्रासमोर दोघेही थांबले, चित्र एका दरवाजाचं होतं, तो दरवाजा पारदर्शक होता. दरवाज्याच्या मागे एका मोठ्या पलंगावर एका कामातूर स्त्रीचं चित्र होतं, स्त्रीला वारा घालणारी सेविका तिच्या बाजूला उभी होती, पारदर्शक दरवाजाच्या बाहेर एक सुरेखशी घंटा काढण्यात आली होती, रेशमी दोर जणूकाही खाली लोंबत होता. आशिषने अनोखीकडे बघितले आणि पलंगाकडे दृष्टिक्षेप केला, अनोखी हसली आणि त्याला बिलगली, गाल त्याच्या छातीवर घासून तिने हो म्हटले.
ते दोघेही चित्राच्या जवळ सरकले, आणि अनोखीने दरवाजा उघडण्यासाठी दरवाज्याच्या हँडलवर हात ठेवला. आणि सहजच म्हणून अनोखीने घंटेच्या रेशमी दोराला हात लावला, मंजुळ स्वरात कुठेतरी घंटा वाजली, अनोखीने हात ठेवल्याक्षणी, पलंगावरची बाई उठली, दासीने पुढे येऊन दार उघडले, तिने अनोखीला बाजूला ढकलून आशिषला ओढले. आशिषला पलंगावर ढकलून, तिने आपल्या मालकीण आणि आशिषवर पांघरूण घातले, पारदर्शक दरवाजा खाडकन बंद करून, त्याच्यावर पडदा ओढलI. हे सगळे काही क्षणातच घडले. अनोखी ने दरवाजा वाजवायचा भरपूर प्रयत्न केला, खाडखाड, ती दरवाजावर हात मारत राहिली, तिचा आवाज ऐकून शायना तिकडे धावत आली.
"अगं भिंतीवर काय हात मारतेस?" शायनाने विचारले
"तिने आशिषला आत ओढले ग. त्याला बाहेर काढ."
"काय बोलतेस अनोखी? इथे तर कोणीच नाही आणि तू तर भींतीवर हात मारतेस. आशिष कुठे गेला? असेल इथेच कुठेतरी! चल आपण दोघी शोधू या."
"नाही गं, माझ्यासमोर त्या बाईने आशिषला आत ओढले." अनोखीला आता वेड लागायची पाळी आली होती.
तेवढ्यात अनिकेत तिथे आला,"अरेच्या तुम्ही दोघी इथे आहात! गॅलरीच्या त्या बाजूला काही मॉडेल न्यूड होऊन बसले आहेत बघायला फार मजा येते तिकडे." शायना आणि अनोखी आता काहीही बघण्याच्या मनःस्थितीतच नव्हत्या, तरीपण अनिकेत त्या दोघींना ओढून घेऊन गेला. त्या बाजूला काही विद्यार्थी पेंटिंग करत बसले होते, कोणाचे चेहरे दरवाजाकडे नव्हते त्याच्यामुळे या तिघांना आत काय चाललंय ते स्पष्ट दिसत होतं.
"आमचे मॉडेल बनणार का " एक भारी भक्कम आवाज आला.
"न नाही"
"मग चोरून काय बघताय?"
"च...चुकून आलो"
"इथे कोणालाही प्रवेश नाही, तरीदेखील तुम्ही इथे आलात आता तुमची सुटका नाही."
तिथून पळण्याचा प्रयत्न केला, तर मागे मोठमोठे कॅनव्हास त्यांची वाट अडवून उभे होते. शायना आणि अनोखीने कॅनव्हास फाडून पाडायचा प्रयत्न केला, पण त्या दोघी त्याला चिटकल्या. त्यांना तिथून ओढून काढण्यासाठी अनिकेत त्यांचा हात धरून ओढायला लागला तर फक्त त्या दोघींचे कपडे बाहेर आले. शरमेने त्या दोघींनी मान वळवली. त्यांचा हात ओढत असताना अनिकेत मागच्या कॅनव्हासवर पडला. अनिकेतपण तिथेच चिकटला. तो जेवढी धडपड करत होता तेवढे त्याचे कपडे फक्त बाहेर पडत होते. पेंटिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आता मागे वळून त्या तिघांकडे बघितले, तर त्यांचे चेहरेच नव्हते.
दुपारी दोन वाजता वॉचमन नेहमीप्रमाणे एक चक्कर मारायला आला, तर त्याला काही मुलांचे कपडे तिथे पडलेले दिसले, आश्चर्य वाटून त्याने कपडे गोळा केले आणि ऑफिसमध्ये घेऊन गेला. रविवार पूर्ण शांततेतच गेला. इकडे मुलांचे पालक फार चिंतातूर झाले, प्रदर्शनाला गेलेली मुले घरी परतली नव्हती. तरुण मुले... असतील कुठे हिंडत, म्हणून सुरवातीला पालकांनी दुर्लक्ष केलं, पण जसजशी रात्र व्हायला लागली, तसे सगळ्या मित्र-मैत्रिणींना फोन करायला लागले. प्रदर्शनाला जाणार हे बऱ्याच जणांना माहीत होते पण त्याच्यानंतर कुठे जाणार हे कोणालाच माहिती नव्हते.
डीएसपी अजिंक्य इनामदार, इंदिरा गॅलरीच्या ऑफिसमध्ये येऊन बसले होते. स्वतः डीएसपी आल्यामुळे गॅलरीचे आयोजकदेखील तिथेच बसले होते. वॉचमनने मुलांचे कपडे इनामदार यांना दाखवले, पालकांनी आपापल्या मुलांचे कपडे ओळखले, पण कपडे बदलून मुले कुठे गेली असतील हे काही त्यांना समजेना. सीसीटीव्ही कॅमेरा चेक केला तेव्हा सगळी मुलं गॅलरीमध्ये आत येताना अगदी स्पष्ट दिसत होती, पण कोणीही गॅलरीतून बाहेर पडलं नव्हतं. काही दगाफटका झाला नसेल, इंदिरा गॅलरी तर खूपच फेमस होती आणि गॅलरीत काही होण्याची शक्यताच नव्हती. मुलांचे कपडे पण तिथे सापडले होते. एका मोठ्या प्रश्नचिन्हासकट पालकांनी गॅलरी शोधून काढली, पोलिसांनीदेखील दोन दिवस गॅलरी बंद ठेवून, अक्षरशः कानाकोपरा शोधून काढला. तरी मुलांचा कुठेच पत्ता नव्हता.
मागच्या वर्कशॉपमध्ये तीन पूर्ण झालेले न्यूड पेंटिंग होते, आणि काही अर्धवट झालेले. गॅलरीच्या संयोजकांना प्रश्न पडला हे तीन नवीन पेंटिंग्स कुठून आले. पण त्यांनी गप्प बसणेच योग्य समजलं. अजिंक्य इनामदार यांनादेखील नवीन पेंटिंग्सबद्दल गूढ वाटत होतं, त्या पेंटिंग्सची रजिस्टरमध्ये काहीही नोंद नव्हती. सगळ्या पालकांना विश्वासात घेऊन, एकेका पालकाला त्याने नवीन चित्र बघून यायला सांगितले. चित्रामध्ये मान वळलेली होती, पण शरीर स्पष्ट दिसत होतं. चित्रातला रंग ओला होता, चित्राचा कॅनव्हास गरम लागत होता. मुलांच्या अंगकाठीवरून पालकांना ओळखीचं काहीतरी वाटत होतं, पण प्रश्न तोच! मुलं गेली कुठे? गॅलरीच्या वॉचमनच्या नोंदीनुसार रविवारी तिथे कुठलंही वर्कशॉप भरलं नव्हतं किंवा कुठलंही नवीन पेंटिंग गॅलरीमध्ये आलं नव्हतं. अजिंक्य इनामदारांचं डोकं चक्रावून गेलं. वरच्या गॅलरीतली पेंटिंग काही ठराविक चित्रकारांची होती, त्या सगळ्यांना पोलीस डिपार्टमेंटकडून बोलावले गेले.
ज्या पेंटिंगच्या समोर मुलांचे कपडे पडले होते ती सगळी पेंटिंग्स शार्दूल गंगाधरची आणि श्रीरंग मुजुमदार यांची होती. दोघेजण स्वतःच्या चित्राची एक सॉफ्ट कॉपी जवळ ठेवत, शार्दूल आणि श्रीरंगला आश्चर्याचा धक्काच बसला. शार्दूलकडे कायम स्वतःच्या पेंटिंगची एक सॉफ्टकॉपी असायची. कुठे चोरी व्हायला नको, कुठेही प्रतिलिपी व्हायला नको, म्हणून शार्दूल अतिशय काळजीपूर्वक आपले पेंटिंग सांभाळायचे. शार्दूल आणि श्रीरंगला आश्चर्याचा धक्काच बसला की त्यांच्या चित्रांमध्ये अजूनही काही माणसं आलेली होती जी त्यांनी काढलीच नव्हती. आता मात्र इनामदार यांनादेखील वेड लागण्याची पाळी आली होती, कारण श्रीरंग आणि शार्दूलच्या चित्राव्यतिरिक्त त्याच्या चित्रांमध्ये अजून जास्त न्यूड फिगर्स दिसत होत्या. शार्दूलच्या सॉफ्ट कॉपीबरोबर गॅलरीमधली चित्र मॅच करत नव्हती, अजून काही माणसे चित्रामध्ये आली होती.
वर्कशॉपमधल्या चित्रांच्याकडे जेव्हा अनिकेत, आणि अनोखीचे पालक गेले, तेव्हा त्या मुलीच्या हातातील तुटलेले ब्रेसलेट अनोखीच्या आईने ओळखलं. उघड्या छातीवरच्या आडव्या झालेल्या हातामधलं ब्रेसलेट असं तुटलं होतं की आता गळून खाली पडेल. हातामधलं ब्रेसलेट जणूकाही ओढाओढीमध्ये तुटले होते. शरमेमुळे तोंडावर धरलेल्या हाताच्या पंजातली, तिसऱ्या बोटातली अंगठीदेखील अनोखीच्या आईने ओळखली. चित्राच्या डोळ्यातून आलेला पाण्याचा थेंब गालावरती थांबला होता, जणू आत्ता खाली पडेल. चित्र अतिशय सुंदर होतं, जिवंत होतं, पण मुलीचा चेहरा पूर्ण दिसत नसल्यामुळे, काही सांगता येत नव्हतं.
शायनीच्या चित्रापाशी वेगळेच दृश्य होते, अर्धवट झाकलेली छाती, आणि मुलीने कमरेपाशी दोन्ही हाताने गच्च धरलेली झिरझिरीत ओढणी, खाली वाकल्यामुळे झाकला गेलेला चेहरा, चित्र एकदम बोलके होते, पण चेहरा दिसत नसल्यामुळे परत तीच स्थिती. तिसऱ्या कॅनव्हासमधील मुलगा पाठमोरा होता, त्याच्यापण अंगावर कपडे नव्हते, जणूकाही तो एखाद्या चौकटीला धरून पुढे पडण्यापासून स्वतःला वाचवत होता. त्याचे केस वाऱ्यावरती मागच्या बाजूला उडालेले होते, त्याच्या अंगातलं बळ त्याच्या पायात आणि हातात दिसत होतं, जणू काही त्याला कोणी विरुद्ध बाजूला ओढत होतं आणि जणूकाही तो स्वतःला तो बळ लावून थांबवण्याचा प्रयत्न करत होता.
इनामदारांनी चौकशी केली तेव्हा त्यांच्या आश्चर्याला पारावर उरला नाही, वर्कशॉपमधल्या तीन चित्रांचे चित्रकारच कोणाला माहीत नव्हते. जरी देहयष्टीवरून आई-वडिलांना आपल्या मुलांसारखी चित्रं दिसत होती तरीपण मुलांचा मात्र पत्ता नव्हता, मुलींच्या आईच्या मते, मुली इतक्याही पुढारलेल्या नव्हत्या की स्वतःचे न्यूड चित्र काढतील. नवनीतचापण काहीच पत्ता नव्हता, संपूर्ण पोलीस, गुप्तहेर मुलांच्या शोधार्थ जीवाचे रान करत होते. इंदिरा आर्ट गॅलरीचे वरच्या मजल्यावरील दालन कायमचे बंद केले होते. पोलिसांनी दोन्ही चित्रकारांना ताब्यात घेतलं होतं, दोघांच्याही कारखान्यात जाऊन त्यांनी त्यांची चित्रे पाहिली होती, दोघांच्याकडे सांगण्यासारखं काहीच नव्हतं, हाडाचे चित्रकार होते. बघताबघता तीन वर्षे गेली. मुलांचे पालक मुलांना शोधून अक्षरशः थकून गेले. पोलिसांनी" बेपत्ता" असं लिहून फाईल बंद केली.
नवीन असलेल्या तीन चित्रांची कलाकृती एवढी उत्कृष्ट होती की त्याच्यासाठी बरेच ग्राहक जमा झाले. एका सुप्रसिद्ध शिपिंग कंपनीने तिन्ही चित्रं विकत घेतली, चित्र इटलीला पाठवण्यात आली, त्यांचे प्रदर्शन मांडण्यात आले. काही भविष्य सांगणाऱ्यांनी, मुलांचा अकाली मृत्यू झाला असेल, असे सांगितले, तर काही निष्णात टॅरो कार्ड वाचणाऱ्यांनी, मुले कुठेतरी सपाट जागेत अडकली आहेत असं सांगितलं. मंत्रतंत्र, बुवा, साधू, बैरागी, सगळ्यांना प्रश्न टाकून झाले. फक्त एका बैरागीने सांगितले की मुलं कुठेतरी त्रिशंकू अवस्थेत अडकलेली आहेत, ना त्यांच्यापाशी जन्म आहे ना मृत्य. जर त्यांच्यावर ते अग्निसंस्कार झाले तरच त्यांची मुक्ती आहे.
पालकांच्या पुढे प्रश्न पडला, अग्निसंस्कार कशावर करायचे? इटलीच्या प्रचंड सभागृहांमध्ये अनेक चित्रांचे प्रदर्शन होतं ज्याच्यामध्ये तीन चित्रं होती. कोणीतरी पेटवलेल्या सिगारेटमुळे, अचानक सभागृहाच्या एका बाजूस आग लागली, बरीच धावाधाव करताना, बरीच चित्रं वाचवली गेली, परंतु तीन चित्रं मात्र तिथेच राहिली. आगीमध्ये जीवितहानी काही झाली नव्हती, पोलिसांनी सगळ्या पाहुण्यांना बाहेर काढलं होतं, परत परत त्यांनी खात्री केली होती की आतमध्ये कोणीही माणूस नाही, तरीदेखील आग विझल्यानंतर त्यांना तीन मुलांचे मृतदेह मिळाले त्यापैकी दोन मुली होत्या.
पोलिसांनी फोटो सगळीकडे पाठवले पण कोणीही त्या तीन मुलांना ओळखले नाही. श्रीरंग आणि शार्दूलपण प्रदर्शनामध्ये सहभागी होण्यासाठी इटलीला आले होते. का कोणास ठाऊक पण ती मुले ओळखीची वाटत होती. मुलांचे फोटो त्यांनी हरवलेल्या मुलांच्या पालकांकडे पाठवले. अनोखीच्या आईने तिचं ब्रेसलेट ओळखलं आणि सगळा उलगडा झाला. एखाद्या कलाकृतीला छेडले तर काय होऊ शकते हा धडा पुढील पिढ्यांसाठी त्या चित्रातील मुलांनी मागे सोडला. अजूनही बाकीची मुलं मिळालेली नाहीत...
वाट बघतायेत अजून, मुक्तीची...