Shubham Kadam

Horror Others

4.1  

Shubham Kadam

Horror Others

धड़पड

धड़पड

4 mins
27.4K


"दादा चल ना रे लवकर घरी, आई वाट पाहत असेल आपली",हातातली कुल्फी संपवत मनोज़ म्हणाला.

"अरे हो मनु,थोडचं सामान घ्यायचं बाकी आहे मग आपण घरीच जाऊ", मनोजचा मोठा भाऊ अतुल हातातल्या पिशव्या सावरत म्हणाला.

अतुल आणि मनोज़ दोघे सख्खे भाऊ, आज दसऱ्याची खरेदी करायला आले होते.अतुल तसा वयाने अठरा वर्षाचा मुलगा,नुकताच बी.ए. ला एड्मिशन घेतलेला, परंतु वयाच्या बाराव्या वर्षीच आपल्या वडीलांना गमावल्यामुळे वयापेक्षा लवकर मोठा झालेला.आईला होईल त्या परीने मदत करून त्याने आतापर्यंतचे शिक्षण पुर्ण केले होते.आपल्यावर आईसोबत आपला लहान भाऊ मनोज़चीही जबाबदारी आहे याची पूर्ण जाणीव त्याला होती.म्हणुन तर बी.ए. साठी मुक्त विद्यापीठात प्रवेश घेऊन तो एका कूरियर कंपनीमध्ये पार्ट टाइम जॉब करत होता.आज नाईट शिफ्ट असल्यामुळे, तो सकाळीच दसऱ्याची खरेदी करायला बाहेर पड़ला.आईने दिलेल्या लिस्ट नुसार तो सामान घेत होता आणी सोबतच आपल्या लहान भावाला बाजाराची सैर घडवत होता.

मनोज़ दहा वर्षांचा एक गोंडस मुलगा.सावळा रंग,टपोरे डोळे,बाहेर जाणार म्हणुन आईने विंचरुन दिलेल्या केसांवरुन सतत हात फिरवित,आपल्या भावासोबत बाजारातील विविध घड़ामोडींचे निरीक्षण करत चालला होता.बाजारतल्या वर्दळीचा त्याला खुप हेवा वाटत होता.पण चालून चालून तो इवलासा जीव मात्र थकून गेला होता.तेवढ्यात त्याची नजर खेळणीच्या दुकानातल्या एका ट्रेन वर गेली.रिमोट कंट्रोलवर चालणारी ती बुलेट ट्रेन त्याला खुप आवडली आणी त्याने दादाकडे ट्रेनसाठी हट्ट धरला.

दीड हज़ार रुपये एका खेळण्यासाठी मोजणे, अतुलच्या मनाला पटत नव्हतं, पण आपल्या लहान भावाला नाही म्हणणेही त्याला जमतं नव्हतं."मनु,आपण नंतर घेऊ ना ही ट्रेन,आता मी तुला दुसरं काहीतरी घेऊन देऊ का?",अतुल मनोज़ची समजूत काढ़त म्हणाला.मनोज़ला सुद्धा आपल्या भावाची परिस्तिथी कळत होती,पण बालमन शेवटी,मित्रांकडे जे असेल ते आपल्याकड़ेही असायला हवे हे वाटणे स्वाभाविक होतं.

खुप समजूत घातल्या नंतर मनोजने आपला हट्ट सोडला,पण थोड्या उदास मनानेच.अतुलला ते बघवलं नाही, तो मनोजला घेऊन पुढच्या दुकानात गेला आणी त्याने एक साधी ट्रेन मनोजला घेऊन दिली.पूर्णपणे तर नाही परंतु थोड्या प्रमाणात का होईना त्याने मनोजचा उदासीपणा दूर केला.

खरेदी संपवून दोघेही जवळच्या लोकल स्टेशन वर पोहोचले.दादर जाणारी लोकल यायला अजून दहा मिनिटे शिल्लक होती.पलीकडच्या प्लेटफॉर्म वर जाण्यासाठी दोघेही त्या पैदल पुलावर चढ़ले आणी चालू लागले.अतुलने मनोजचा हात घट्ट पकड़ला होता.त्याच्या मनात विचारांची गर्दी झाली होती.आपल्या पुढच्या वाटचालीची तो मनातल्या मनात आखणी करत होता.मनोज मात्र दुपारी शाळेत गेल्यावर मित्रांना बाजारतल्या गोष्टी कशा सांगायच्या याचा विचार करत होता.दोघेही आपापल्या विचारात गुंग होते.अचानक पावसाची रिमझिम चालू झाली आणी बघता बघता दोनच मिनिटात पावसाचा जोर वाढला.दोघेही भानावर आले.अतुलला जाणवले की लोकांची गर्दी अचानकपणे वाढली आहे.लोक पुलावरून चालत नसून धावत आहेत.पावसापासून बचावासाठी लोक पुलावर जमा होत होते.पुलाच्या दोन्ही बाजूने लोकं जमा झाली होती.अतूलने मनोजचा हात अजून घट्ट धरला.मनोजसुद्धा थोड़ा घाबरला.पुलावर आता लोकांची गर्दी एवढी वाढली होती की, पाय ठेवायलासुद्धा जागा नव्हती राहिली.मुंबईकरांना ही गर्दी काय नवीन नव्हती परंतु पुढे जे काही घड़णार होते,त्याची कल्पना मात्र त्यांनी कधी केली नसावी.पाऊस चालूच होता तेवढ्यात एका आवाजाने सगळ्यांच लक्ष वेधलं.काहीतरी पडल्याचा तो आवाज,पूल पडल्याच्या अफवेत परिवर्तित झाला आणी इथून सुरूवात झाली प्रत्येकाच्या धड़पडीची.धड़पड,आपला जीव वाचवण्यासाठी.लोकं कशाचीही पर्वा न करता आपला जीव वाचवत पुलावरुन खाली जाण्यासाठी प्रयत्न करीत होते.आता मात्र ,अतुल पूर्णपणे भानावर आला.त्याने मनोजला जवळ घेतले आणी तो गर्दीतून वाट काढ़त काढ़त पुढे जात होता.परंतु गर्दी आता एवढी वाढली होती की लोकं एकमेकांना तुड़वत तुड़वत पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते.तेवढ्यात अतुलच्या हातून मनोजचा हात सुटला.लोकांच्या लोंढ्याने दोघांनाही एका क्षणात एकमेकांपासून दूर केले."मनू..... मनू....... मनू......."जीवाच्या आकांताने अतुल ओरडत होता.

"दादा......दादा........"रडक्या स्वरात मनू आपल्या भावाला हाक मारत होता.सगळीकडे हेच चित्र होतं.काही मिनिटांपूर्वी शांत असलेला तो पूल ,लोकांनी आणि त्यांच्या आक्रोशाने भरला होता.पुलाच्या अरूंदीपणामुळे आणी ऑफिसला जाण्याची वेळ असल्या कारणामुळे,जाणारे-येणारे दोन्ही लोकं आज त्या पुलावर अडकले होते.

आता मात्र परिस्थितीचे रूपांतर चेंगराचेंगरी मध्ये झाले.पावसानेही विक्राळ रूप धारण केले.जणू काही खूप दिवसाचा कोंडून ठेवलेला राग आज बाहेर निघत होता.सगळीकडे एका काळसर वातावरणाने आपलं राज्य पसरवलं होतं.त्या वातावरणात दूर झालेले ते दोघे भाऊ मात्र एकमेकांना भेटन्यासाठी धड़पडत होते.अतुल मनोजला हाका मारून आता थकला होता.आतापर्यंत येणारी 'दादा'ची हाक आता बंद झाली कारण नियती तिचं काम करून गेली होती.तो इवलासा जीव तरी किती वेळ दमकोंडी सहन करणार?त्याचा तो निष्पाप देह निपचित पडला होता.कित्येक जणांच्या पायाने तुड़वला गेला होता.अतुलला कळून चुकले,त्याचेही अवसाण गळाले. त्याच्या समोर मनोजचा तो गोंडस चेहरा येत होता,थोड्यावेळापूर्वी आपल्याकडे हट्ट धरणारा आपला लहान भाऊ आता या जगात नाहीये याच्यावर त्याचा विश्वास बसेना. त्याला आईची आठवण आली, त्याच्या डोळ्यात अश्रू येणार तेवढ्यात त्याच्यावरुन दोन-तीन माणसे त्याला तुडवून गेली आणी त्यानेही आपला शेवटचा श्वास घेतला.तोही आता मनोजप्रमाने निपचित पडला होता.एकाच क्षणात सगळ काही संपल.

थोड्यावेळात रेस्क्यू टीमच्या आगमनानंतर सगळी परिस्थिती आटोक्यात आली.आता त्या पुलावर जे राहिले होते ते म्हणजे २२ मृतदेह आणी काही जख्मी लोकं. त्या मृतदेहांमध्ये एका दहा वर्षाच्या मुलाचा मृतदेह आणी त्याच्या हातात असलेली(रक्ताने माखलेली) ट्रेन पाहून रेस्क्यू टीम मधल्या सदस्यांनाही आपले अश्रु अनावर झाले. शेवटी,अतुल आणी मनोज दोघांचेही मृतदेह असणारी एम्बुलेंस सरकारी दवाखान्याकड़े रवाना झाली.

किती विसंगती आहे बघा ना,ज्या शहरात बुलेट ट्रेन येणार त्याच शहरात सामान्य माणसाला मूलभूत सोयींसाठीसुद्धा रोज़ संघर्ष करावा लागतो.मुंबईच्या लोकलने प्रवास म्हणजे नवीन माणसाला धड़कीच भरते.मुंबईकरही त्रस्त आहेतच.परंतु,जगण्यासाठीची ही धडपड आता त्यांच्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक बनून गेली आहे.एल्फिंस्टोन रोड वर घड़लेली ही चेंगराचेंगरी खूप अगोदरच ठरलेली होती.रोज लोंढेच्या लोंढे मुंबईत दाखल होतात.ती बिचारी किती सहन करणार?तिची आणी मनोजची परिस्तिथी एकच आहे,मनोजने तर दम सोडला,तो दिवस दूर नाही जेव्हा मुंबई सुद्धा आपला जीव सोडून म्हणेल,"बास आता.......".

एक मात्र खरं आहे, कितीही वाईट परिस्तिथी असो,मुंबई तिच्यावर मात करीत परत उभा राहून आपल्या कामाला लागते.आशा करतो, एलफिंस्टन रोड वरील घटनेनंतर सद्य परिस्तिथीत सुधारणा होईल,नाहीतर या घटनेची पुनरावृत्ती व्हायला वेळ लागणार नाही.

ता.क.-वरील घटनेतील पात्र काल्पनीक आहेत,ती काल्पनिक असली तरीही कथेचा आशय समजून घ्यावा हीच वाचकांना विनंती.


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror