Unmask a web of secrets & mystery with our new release, "The Heel" which stands at 7th place on Amazon's Hot new Releases! Grab your copy NOW!
Unmask a web of secrets & mystery with our new release, "The Heel" which stands at 7th place on Amazon's Hot new Releases! Grab your copy NOW!

Shubham Kadam

Inspirational Others

3.6  

Shubham Kadam

Inspirational Others

गारवा

गारवा

3 mins
16.8K


मे महिन्यातील दुपार, कड़क उन पडलेलं,घराबाहेर निघालं की घामाने आंघोळ व्हावी अशी परिस्तिथी. तरीसुद्धा आज आठवडा बाजारातील गर्दी काही कमी होत नव्हती.

बाजारात वेगवेगळ्या ठेल्यांची रांगच लागली होती.कुठे दालचिनीच्या काड्यांचा वास दरवळत होता तर कुठे आताच तेेलातून काढलेल्या खमंग शेवचा सुगंध उदरपूजेच आमंत्रण देत होता.त्यापैकी एका ठेल्यावर,तापत्या उन्हात पाण्याचे तुषार झेलत मेथी,कोथिम्बीर, पालक ,चुका टवटवीत चेहर्याने बाजारातील गर्दी कड़े कुतुहुलाने पाहत होत्या.तर शेजारी शेजारी असलेल्या बटाटे आणि कांद्यांचे आपापसात भावयुद्ध चालू होते.

"नाय ओ ताई.....आलूचा भावच त्यो हाय आज बाजारात...२० रु मागे आम्हाला तीन रुपये पडतात...१५ ला कशी देउ?",रमा समोरच्या बाईला आपली हलाखीची जीवनकहाणी मोजक्या शब्दात सांगण्याचा प्रयत्न करीत होती.

"काय बाई,लयच महाग हाय आज माळवं",असं म्हणत हातातली वीसची नोट देत ती बाई पुढच्या आइस्क्रीम शॉप मध्ये बसलेल्या आपल्या नातीकडे निघून गेली.

आजचा बाजार काही रमाला चांगला नव्हता लागला.दिनूच्या शाळेची फी,आठवडाभराचं तेल-मीठ,नवऱ्याचं काही उसनं,कपड़े-लत्ते.... सगळ्यांच गणित तिच्या डोक्यात चालू होतं.हवा तसा गल्ला न जमल्याने आज तिचा चेहरा सुकला होता.त्यात एवढ्या उन्हात भाजी विकायला बसायचं म्हणजे अंगाची लाही लाही होत.तरीही,तीस-बत्तीस वर्षाची रमा तेवढया उन्हात तग धरून होती.

"बाईमाणसानं आपल्या घरासाठी खंबीर उभा राहायचं असतं बाई...तीने जर ठरीवलं तर ती मोडकळीला आलेला संसार पण नव्याने उभा करू शकते",आपल्या आईची हीच शिकवण तीने इतक्या वर्ष पाळली म्हणून आज दिनू चांगल्या शाळेत शिकत होता. दोन खोल्या का होईना पण ती आता स्वतःच्या घरात राहत होती. नवऱ्याला जबाबदारीचं ओझं होऊ नये म्हणून ती सुद्धा छोटे-मोठे कामं करायची आणि आता हे दर शनिवारी तालुक्याच्या बाजारात येऊन घरचा भाजीपाला विकणे,आपल्या परिवारासाठीच्या धड़पडीचाच एक भाग.

आतापर्यंत घामाने ती ओली झाली होती.साडीच्या पदराने घाम पुसत ती भाज्यांवर पाणी मारत होती.दोन वाजत आले होते,आता गर्दी अजुन वाढत चालली होती.एकदाच तीन चार ग्राहक आले आणि रमाची तारांबळ उडाली.तहान लागली होती,पण पाणी प्यायला जायचं म्हणलं तर ठेला कोण सांभाळणार?मागून रसवंती मधल्या घुंगरांचा आवाज येत होता.उसाचा थंड रस प्यायचा म्हटलं तरीही खर्च आला.तिने लगेच तो विचार मनातून काढून टाकला.एवढे गिर्हाइक संपवून पाणी प्यायला जाऊ, मनातल्या मनात तिने ठरविले.

तेवढ्यात हातात रसाचा ग्लास घेऊन दिनू तीच्या बाजूला उभा येऊन राहिला.ती त्याच्याकडे पाहतच राहिली. आपल्या आईला उन्हात असं झुजतना त्याला पाहवलं नाही.एवढ्या वेळ सावलीत बसलेलं ते नऊ-दहा वर्षाचं पोर,आईला तहान लागली असेल म्हणून,आज बाजारात चिवड़यासाठी दिलेल्या पैशातून उसाचा रस घेऊन आलं.

तो हसत हसत तिला रस प्यायला सांगत होता.तहान मिटवण्यासाठी तिने दोन घोट घेतले.उन्हामुळे त्यालाही घाम फुटला.आपल्या मुलाचं किती कौतुक करावं आणि किती नाही,असा प्रश्न त्या आईला पडला.डोळ्यातले पाणी लपवत तिने त्याला जवळ घेतले,आपल्या पदराने त्याचा घाम पुसला आणि उरलेला रस त्याला प्यायला सांगितला. त्याने खूश होऊन रस पीला आणि परत सावलीत जाऊन बसला.छोटासा का होईना, पण एका आईच्या आयुष्यातला तो एक सुखद क्षण होता.रखरखत्या उन्हात तापत असताना एखादी थंड झूळूक मनाला जो गारवा देते असा तो क्षण होता.

आज त्या माऊलीचं मन तृप्त झाले होते. त्याच्यापुढे, ही रखरख काहीच नव्हती. स्वतःला सावरत तिने कमरेला पदर खोसला आणि परत आपल्या कामाला लागली. संध्याकाळ झाली, सगळा बाजार उठत आला होता. रमानेही आपले बस्तान बांधले आणि दिनूला घेऊन चिवड़याच्या दुकानावर गेली. त्याच्या आवडीचा चिवड़ा घेतला आणि दोघे माय-लेकरु आपल्या गावाच्या दिशेने निघाले.


Rate this content
Log in