कम्फर्ट झोन
कम्फर्ट झोन
काही दिवसांपुर्वीची गोष्ट आहे,मुंबईला जॉबसाठी शिफ्ट होऊन एक-दीड महीना झाला असेल.
आज ऑफिसमधून लवकरच निघालो.मूड ऑफच होता(का?ते महत्वाच नाहीये..)..असो.
मूड फ्रेश करण्यासाठी,मूवी पहायचं ठरवलं.रात्रीचे जेवण उरकून ऑफिस शेजारी असलेल्या थिएटरमध्ये गेलो.
'लपाछपी' तसा चांगला चित्रपट आहे, पण इथे मी त्याच्याबद्दल नाही बोलणार.त्यासाठी,आपण जेव्हा भेटू तेव्हा निवांत गप्पा मारु.
रात्रीच्या ९:०० च्या शो साठी गर्दी कमी होती.मी तिकिट काढले आणी माझ्या जागेवर जाऊन बसलो.चित्रपट चालू व्हायला अजून १५ मिनिटे शिल्लक होती.माझ्या रो मध्ये एक दोघे आणि पूर्ण थिएटर मध्ये मिळून,२५-३० जण असतील.एक तर भयपट आणि त्यात पण एवढी कमी गर्दी,माझ्यासारख्या भयकथांचे वेड असलेल्या व्यक्ती साठी ही एक पर्वणीच होती.मी चित्रपट सुरु होण्याची वाट पाहत होतो.
तेवढ्यात एका वृद्ध जोडप्याने चित्रपटगृहात प्रवेश केला.सगळीकडे नजर फिरवल्यानंतर त्यांनी मी बसलेल्या रांगेत बसायचा निर्णय घेतला.दोघांनीही वयाची साठी गाठलेली दिसत होती.आजोबा आजीचा हात पकडून हळूहळू माझ्या रांगेच्या दिशेने येऊ लागले.एक एक सीट पार करत,ते दोघे माझ्या शेजारी येऊन बसले.माझ्यासाठी सिचुएशन थोड़ी ऑक्वर्ड झाली(त्या वेळी कुणासाठीही झाली असती).मनात खुप सारे प्रश्न आले,'या वयात भयपट का पाहावा वाटला असेल यांना?', 'हे दोघेच आहेत, यांच्या घरचे का नसतील आले?', 'माझ्या बाजूला का बसले?', 'खोकुन खोकुन डिस्टर्ब नाही केलं म्हणजे झाल'.शेवटी "काही नाही होत शुभम,उगाच काहीही विचार नको करू",अस म्हणत मी स्क्रीन वरील तम्बाखू निषेध ची जाहिरात लक्ष देऊन ऐकू लागलो(उगाच म्हणजे....).
चित्रपटाला सुरुवात झाली एकदाची.पाऊण तासाने चित्रपटाचा एक इंटेंस सीन सुरु असताना मला शेजारुन हुंदक्यांचा आवाज आला.आजी रडत होत्या आणी आजोबा तिला समजावून सांगत होते.मला डिस्टर्ब होत असल्यामुळे मी मनातच म्हटलं,"काय यार,दुसरीकडे बसले असते तर बरं झालं असतं, उगाच चांगल्या सीन दरम्यान डिस्टर्बेंस".विचार करतानाच नकळत माझ्या तोंडून निराशाजनक सुस्कारा निघाला.आजोबाने माझ्याकडे पाहिले.त्यांच्या चेहऱ्यावर वेगळेच भाव होते, जसे की काय त्यांनी माझ्या मनातले सगळे काही ऐकले होते.
मला थोड़े वाईट वाटले,आपण अस वागायला नको होतो.
हाच विचार मनात फिरत असताना, इंटरवल कधी झाली कळलचं नाही.
मी बाहेर आलो आणी एका पोस्टर शेजारी येऊन उभा राहिलो.तेवढ्यात आजोबा बाहेर येताना दिसले.मी त्यांच्या जवळ गेलो."सॉरी आजोबा",माझे शब्द ऐकून ते हसले."तुम्हाला राग आला असेल न माझा?",मी मान ख़ाली करून विचारले."अरे,नाही रे बाळा.तुझी काय चूक?उलट,आमच्या हिच्या मुळे तुला डिस्टर्ब झाला,म्हणुन मीच सॉरी".आजोबांचे हे शब्द अजुन जास्त जिव्हारी लागले."अहो आजोबा अस नाहीये,खरचं माझ्याकडून चुकून झाल ते"."ठीक आहे रे,तुझी चूक नाहीये.
सध्याचा काळच असा आहे.प्रत्येक जण आपल्या आपल्या आयुष्यात व्यस्
त आहे.प्रत्येकाला त्यांचा त्यांचा कम्फर्ट झोन हवाय.त्या कम्फर्ट झोन साठी रोज धड़पडत असतात. यात काही चूक नाहीये,प्रत्येकाचा हक़्क आहे तो."
"पण जेव्हा त्या कम्फर्ट झोन मध्ये तुमचे आई-वडील नकोसे वाटतात तेव्हा........."
आजोबा स्वत:शीच बोलता बोलता थांबले.त्यांच्या डोळ्यातील अश्रू ते लपवू शकले नाही.स्वतःला सावरत ते म्हणाले,"अरे चल येतो,आमची श्रीमती वाट पाहत असेल",अस म्हणत ते आत मध्ये निघुन गेले.काही क्षणासाठी मी तिथेच उभा राहिलो,आजोबांच्या त्या वाक्यावर मी माझे अंदाज बांधू लागलो.काही न बोलता ते भरपूर काही बोलून गेले.आता एक वेगळीच भावना माझ्या मनात निर्माण झाली.अचानक त्यांच्या बद्दल मला आपुलकी वाटू लागली.मी माझ्या जागेवर येऊन बसलो.आता माझ लक्ष फक्त त्या दोघांकडे होतं.
"घरी फ़ोन केला ना तुम्ही?,काळजी करतील मुले उगाच",आजीने विचारले.
"कोणी वाट पाहत नाहीये तुझी,आनंदी असतील सगळे,थोड्या वेळासाठी का होईना,त्यांच्यावरचा ताण कमी झाला असेल ना",आजोबा थोड़े मिश्किल हसत म्हणाले.
"जाऊ द्या हो,तुम्ही नका मनाला लावून घेऊ,रागाच्या भरात बोलला तो","त्याच्या मनात काही नाहीये".
"ह्म्म्म..."
आजोबांचा नकारार्थी होकार आजीला कळला.
"मनात नसलेले जेव्हा जिभेवर येते तेव्हा काही गोष्टी आपणच समजून घ्यायला हव्यात"
त्यांच्या शब्दांमध्ये एक प्रकारची तक्रार होती.आजीला ती जाणवली.दोघेही शांत झाले.चित्रपट संपला.सगळे बाहेर निघू लागले.निघतानाही आजोबाने आजीचा हात घट्ट पकड़ला होता.मी त्यांच्या सोबतच चालत होतो.आमच्यात जास्त काही बोलणही नव्हतं झाल,मला अस वाटतं होत की ते माझ्या ओळखीचे आहेत.बाहेर आल्यानंतर,मी त्यांचा निरोप घेत म्हणालो,"येऊ का आजोबा?".दोघेही मागे वळले.आजीच्या चेहऱ्यावर थोड़ आश्चर्य होत. आजोबा हसत म्हणाले,"हो हो,आरामाने जा",आणि पुढे गेले.ऑटो मध्ये बसेपर्यंत मी त्यांनाच पाहत होतो.दोघांनी एकमेकांचा हात अजूनही सोडला नव्हता.दोघे ऑटोत बसले.ऑटो माझ्या समोरून गेला तेव्हा आमची नजरानजर झाली.थोड्या वेळासाठी सगळ काही स्तब्ध झाले. दोघेही माझ्याकडे एका आशेने पाहत होते.मला कळलं त्यांना काय म्हणायच होत.मी पण त्यांना हसून एक प्रकारची हमी दिली आणि रूमकडे वळलो.
आई-वडिलांची ही कैफ़ियत काही नवीन नाहीये,पण ती अजुनही तेवढीच तीव्र आहे याचेच दुःख जास्त आहे.मला कुणाला उपदेश नाही द्यायचा. पण आपल्या कम्फर्ट झोन मुळे आपल्या आई -वडिलांना त्रास होईल अस कधी वागू नका.नाहीतर अस नको व्हायला की, त्यांच्या कम्फर्ट झोन मध्ये तुम्हीच एक अडचण बनून जाल.मी आनंदी आहे की,माझ्या कम्फर्ट झोन मध्ये अजूनही माझे आई-पप्पा आहेत.तणाव प्रत्येक नात्यात निर्माण होतो पण आपण सैल दिली तरच नातं टिकून राहील.नाहीतर नातं तुटायाला वेळ नाही लागत.
विचार करा.
एका छोट्याश्या घटनेने मला विचार करायला भाग पाडले. हे सगळ लिहीण्याचं कारण म्हणजे एकच,
'हा विषय विचार करण्यासारखा आहे.'