Mahendra Bagul

Inspirational

4.4  

Mahendra Bagul

Inspirational

शरमिंदा...!

शरमिंदा...!

6 mins
1.7K


साधारण १९८८-८९ ची घटना आहे ही, मी एका हाॅस्पिटल मधे मेडिकल आॅफिसर म्हणून काम करत होतो. रात्री अकरा - बाराची वेळ असेल, नुकताच आय. सी. यू. मधील पेशंटचा राऊंड घेऊन मी रुममध्ये आलो होतो, व काॅटवर पाठ टेकवली होती, तेवढ्यात दरवाजावर टकटक करून वाॅर्डबाॅय, बोलवायला आला,म्हणाला की, "सर एक सिरीयस पेशंट आला आहे, पाॅईझनींग चे वाटते आहे" सिस्टर ने ताबडतोब बोलावलं आहे",... अशा पाॅईझनींग, भाजलेल्या केसेस, बहुत करून माझ्या कारकिर्दीतीतच रात्रीच्यावेळी जास्त येतात की काय असे वाटण्यासारखे झाले होते, सिस्टर्स, वाॅर्डबाॅय तर तसे म्हणतंदेखील, असो. दिवसभर जास्त धावपळ झाली असल्याने जरा त्रासिक मनानेच त्याला म्हणालो, "चल बाबा आलोच" असे म्हणून त्याच्या पाठोपाठ खाली गेलो. नेहमीप्रमाणे सिरीयस पेशंट आल्यावर कॅज्युअलटीमधे जसा माहोल असतो की पेशंटबरोबर खूप लोकांची गर्दी असते (यात नात्याचे, प्रेमाचे कमी पण बघेच जास्त असत)तसे चित्र होते, तरी मध्यरात्र असल्याने तुलनेने कमी गर्दी होती, रडारड, गोंधळ वगैरे वगैरे तसा होता, पेशंट म्हणजे एक २२-२३ वर्षाचा तरूण मुलगा होता, त्याने कीटकनाशक प्यायले होते, उलट्या केल्या असल्याने त्याचा उग्र वास प्रकर्षाने जाणवत होता, मुलगा बेशुद्ध होता, त्याला तपासून गॅस्ट्रीक लवाज (म्हणजे नाकातून नळी पोटात टाकून विष बाहेर काढायचे व शुद्ध पाण्याने पोट धुवून काढायचे) ची व इतर तयारी नर्सना करण्यास सांगून पेशंटच्या नातेवाईकांना सर्व गोष्टींची कल्पना द्यायला मी बाहेर आलो. 


हे लोक जवळच्या खेड्यातून आले होते, व एकंदरीत त्यांच्या पेहराव, कपडे यावरून गरीब वाटत होते, आणि अशा केसेसला आय. सी. यू. मधे ठेवावे लागते, रिकव्हरी किती दिवसात होईल, सांगता येत नाही व हाॅस्पिटलमधे बरेच दिवस रहावे लागू शकते, शिवाय औषधे वगैरे चा खर्च वेगळा, थोडक्यात काय तर खर्च जास्त येतो असे मला म्हणायचेय, आणि पोलीस केस ही करावी लागते, तो भाग वेगळाच असो, हे सगळे त्यांना सांगणे गरजेचे असते कारण नंतर वादावादीचे प्रसंग उद्भवलेले आम्ही बघितलेले होते. त्यांच्याकडे बघून मला वाटत नव्हते की एवढा खर्च त्यांना झेपेल, ही सर्व कल्पना त्यांना देणे भाग होते, तसे सिस्टरने त्यातील दोघांना माझ्यासमोर सांगितले, ते म्हणाले, "तुम्ही काळजी करू नका हो, कितीही पैसे लागू द्या, ट्रिटमेंट सुरू करा" मी म्हणालो, "ट्रिटमेंट तर आम्ही लगेचच करतोच आहोत, त्याबद्दल वाद नाही, पण केस सीरियस आहे, आय. सी. यू. मधे ठेवाव लागेल, खर्च जास्त येईल, तुम्हाला झेपणार नाही, त्यामुळे मला असे वाटते की प्राथमिक उपचार झाल्यावर तुम्ही पेशंटला सरकारी हाॅस्पिटलमधे हलवलेल बरं, तिथे खूप कमी पैशात काम होईल."      


ते दोघे विचारात पडले, व जिन्याच्या पायरीवर बसलेल्या एका ५५-५७ वर्षे वयाच्या पोक्त गृहस्थाकडे बघू लागले, लाल रंगाचा कळकट फेटा किंवा मुंडासे डोक्यावर गुंडाळलेला, अंगात आखूड झब्बा, धोतर जे कधी काळी पांढऱ्या रंगाचे असतील असे दर्शवणाऱ्या खुणा त्यावर होत्या, उन्हात रापून काळवंडलेला चेहरा, झुपकेदार पांढरट मिशी जी त्या गृहस्थाच्या चेहऱ्यावर शोभून दिसतेय असे त्यावेळी मला जाणवले, पांढरट वाढलेले दाढीचे खुंट, तांबट - पिवळसर डोळे ज्यात भरलेली चिंता काळजी मला स्पष्ट दिसत होती. एवढावेळ हा गृहस्थ आमचे बोलणे शांतपणे ऐकत होता, तो त्या विषप्राशन केलेल्या मुलाचा बाप होता हे मला लवकरच कळले... जेव्हा माझ्याशी बोलणाऱ्या त्या दोघांनी त्याच्याकडे बघितले तेव्हा तो जागेवरून शांतपणे उठला, व आमच्या दिशेने येऊन हात जोडून आर्जवाच्या सुरात मला म्हणाला, "डाक्टर म्या बा हाय त्याचा, काय बी करा पन माह्य लेकरू वाचवा, तुमच्या पाया पडतो" अस म्हणून तो वाकू लागला तेवढ्यात मी त्याच्या खांद्याला धरून,(जरा संकोचातच) त्याला उठवत म्हणालो "बाबा काळजी करू नका, तुमचा मुलगा बरा होईल, आत ट्रिटमेंट सुरू पण झाली आहे, पण फक्त नंतरचा खर्च...." माझे वाक्य मधेच तोडत तो म्हणाला, "त्याची काय बी काळजी करू नगा तुमी, काय लागल तो पैका लावा पन पोर वाचलं पाह्यजे" त्याच्यातील आगतीक बाप बोलत होता. मी म्हणालो, "बरोबर आहे तुमचं पण बाबा सरकारी हाॅस्पिटलमधे कमी पैशात होईल ना पुढचा इलाज, इथे नाही झेपणार तुम्हाला!"


मी असे म्हणत, ज्युनियर डाॅक्टरला कुठल्या सलाईन व इंजेक्शन्सचे डोस द्यायचे ते सागितले, व नर्स ला लवाज चालू ठेवायला सांगून त्या गृहस्थाकडे वळलो, त्याने हात धरून ठामपणे मला टेबलाजवळ नेले व म्हणाला, "किती पैकं लागतील?" असं म्हणत त्याने त्याचा फेटा काढून त्याच बोचक टेबलावर ठेवून ते मोकळ करू लागला, मला व इतर स्टाफला आश्चर्याचा धक्काच बसला.. कारण त्यातून शंभर- शंभर च्या नोटांची ७-८ बंडलं टेबलवर पडली, "येव्हड बास का..." असे म्हणून त्याने त्याच्या कळकट झब्ब्याच्या आतील कोपरी च्या खिशातून ५०, २० व १० ची अशी सर्व मिळून ५-७ बंडलं काढली व म्हणाला, "डाक्टर साहेब येवढं जमा करा, उद्या दुपारपातूर आजून आणतो म्या,.. पन पोर वाचवा!" मित्रांनो माझी व इतर स्टाफची काय अवस्था झाली असेल, प्रसंग डोळ्यासमोर आणून कल्पना करा.. (आता एवढे पैसे त्याच्याकडे कसे? कोण होता तो ह्या विस्तारात मी जात नाही) मी एक मिनिट निःशब्द होतो, काय बोलावे कसे रिअॅक्ट करावे मला काही कळेना, एक क्षण नजर पैशावर व दुसऱ्या क्षणी त्या पित्याच्या चेहर्‍यावर वळली, पण त्याच्या चेहऱ्यावर किंवा डोळ्यात मला कुठलाही बडेजाव, अथवा पैशाचा माज दिसत नव्हता, त्यावर तेच सुरूवातीला होते तसेच भाव होते. 


आता माझी मलाच शरम वाटत होती, आत्मग्लानीने मी पश्चातापदग्ध झालो होतो, की अरे आपण काय केले? केवळ त्यांचे बाह्यरूप, कळकट कपडेच आपण बघितले, त्याच्या आत असलेला प्रेमळ, मुलासाठी सर्वस्व लुटवणारा बाप का नाही दिसला आपल्याला. व्यवहाराच्या जगात एवढ्या का बोथट होत चालल्या आहेत आपल्या भावना, माणुसकी लोप पावत चालली आहे म्हणतात ते हेच का? अश्या प्रश्नांचे काहूर माझ्या डोक्यात उठले होते, व त्याची उत्तरे मी शोधण्याचा प्रयत्न करत होतो, अस्वस्थ होतो.. तेवढ्यात, "डाक्टर साहेब.." असे त्या गृहस्थाच्या आवाजाने मी भानावर आलो, व स्वत:ला सावरत म्हणालो, "ठिक आहे बाबा, हे पैसे परत नीट ठेवा व सकाळी बिलींग सेक्शनला जावून अ‍ॅडव्हान्स सांगतील तेवढे भरा", "पन माझ पोर... "तो म्हणाला. "काही काळजी करु नका सगळ व्यवस्थित होईल, देवावर भरोसा ठेवा" मी म्हणालो, "आता आमच्यासाठी तुमीच देवा हाय बगा" ते ऐकून मला कसेसेच वाटले, मी कुठला देव मी तर माझा डाॅक्टर पेशाचा धर्म निभावतोय, देव कधी पैसा, राहणीमान, कपडे, श्रीमंती, शिक्षण असा भेदभाव करून का आशिर्वाद देतो, तो तर तुमच्यातील खरेपणा, भक्ती, निरागसता हेच बघतो असे ऐकत आलो आहे. पण सध्याच्या व्यावहारिक जगाने, त्याला पैशाच्या, सोने, चांदी, हिरे इ. च्या आमिषाने आपल्या कडे वळवण्याचा व्यर्थ प्रयत्न चालवलाय,आणि देव फक्त भावाचा भुकेला असतो ह्याचा विसर पडतोय लोकांना असो       


"बाबा मला माफ करा हं, मी तुम्हाला समजण्यात चूक केली, माझा हेतु तुम्हाला दुखावण्याचा नव्हता, मला वाटले तुम्हाला त्रास होऊ नये, तुमची पैशाची जमवाजमव करायला ओढाताण होऊ नये म्हणून मी तसा सल्ला तुम्हाला देत होतो... आणि काय आहे, हाॅस्पिटल च्या नियमांना मी पण बांधील आहे ना! तुम्ही राग मानू नका "मी त्यांना म्हणालो. " ह्यात राग येन्यासारखं काही बी न्हाई डाक्टर सायेब , आवो जमानाच लय बेरकी झालाया, त्यात तुमची काय बी चुक न्हाय बघा! लोक पैक्यापाई काय काय सोंग वठवत्यात, रडत्यात, कुढत्यात, नाटकं करत्यात,काही काही चांगल्या घरची दिसनारी, सुशिक्षित माणसं काय.. आन गरीब अडाणी काय! काम सरलं की पैसं देन्याच्या वक्ताला लय काच कुच करत्यात, डॉक्टरवर, हॉस्पिटला वर न्हाय न्हाय ते आरोप करत्यात, राडाबी करत्यात. .. आन त्या वक्ताला ते इसरत्यात की आरं ह्या मानसांनी, रात पाहिली नाई, दिस पाहिला नाई , तहान, भुक पाहिली नाही आन आपला जीव वाचवला, त्याच देवमानसांवर तुमी असे सापा परमाने उलटत्यात का रे बाबा हो! जाऊ द्या सायब हेच तर कलयुग हाय,.... पण समदे तसे नसत्यात बरं! आन सायेब एक गोष्ट म्या तुम्हासनी लहान तोंडी मोठा घास घेऊन सांगू का,... सायेब कुणाच्या बी बाहेरच्या

दिखाऊपनावर, इश्र्वास नका ठेऊ आन वंगाळ दिसन्यावर लगीचच शक बी नका करू सायेब! , पन तुमी नगा मनाला लावून घेऊ."


त्या अशिक्षित माणसाने केवढा समजूतदारपणा दाखवला होता, हे तो कुठल्या शाळेत नसेल शिकला पण ह्याच व्यवहारी जगाच्या अनुभवाच्या शाळेत जे उन्हाळे-पावसाळे त्याने पाहिले होते, त्यातच तो हे शिकला होता व आज ते ज्ञानामृत त्याने मला पाजले होते. त्याचे बोलणे ऐकून, संत गाडगेबाबांचे त्याच्याच भाषेत वंगाळ रूप माझ्या डोळ्यासमोर आले. मी मनोमन खजील होऊन त्या दिवशी मनाशी ठरवले की पूर्ण जाणून घेतल्याशिवाय, केवळ बाह्यरूप बघून कुणाबद्दल ही मत बनवायचे नाही.       


"सर पेशंट इज क्वाईट बेटर नाऊ, रिस्पाॅंडींग टू ट्रिटमेंट" ज्युनियर डाॅक्टरच्या आवाजाने माझी विचारांची माळ तुटली... "दॅट्स गुड!.. बाबा धोका टळलाय "त्यांच्या खांद्यावर हात ठेवून मी म्हणालो आता मला त्या कळकट कपड्यांवर हात ठेवायला कुठलाही संकोच वाटत नव्हता. त्याच्या चेहऱ्यावर पसरलेले समाधान मला खूप सुखावून गेले. मी आत पेशंट बघायला गेलो, पण आज अपरिहार्यता म्हणा की जाणतेपणाने म्हणा, जे माझ्याकडून झाले

त्याने माझ्या कानात संत कबीरांचा दोहा मात्र ऐकू येऊ लागला...

बुरा जो देखन मै चला, बुरा न मिलिया कोय |

जो दिल खोजा आपना, मुझसे बुरा न कोय |


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational