Mahendra Bagul

Others

3  

Mahendra Bagul

Others

अवरोध

अवरोध

7 mins
222


नुकताच व्हाट्सप वर एका वृद्ध आईचा व तिच्या मध्यम वयीन मुलाचा व्हिडिओ बघीतला, ज्यात ती आई सामोसा खाण्यासाठी कश्या क्लुप्त्या करते हे दाखवले होते, हा व्हिडीओ पाहून , मला माझ्या क्लिनीक मधे पुर्वी(२० वर्षे) काम करणाऱ्या मधू नानांची आठवण झाली, क्लिनीक मधे येणाऱ्या पेशंट्स चे नंबर लावण्याचे काम ते करायचे,ह्या कामाकरता त्यांची नेमणूक कशी झाली हा महत्त्वाचा किस्सा, तुमच्या बरोबर शेअर करतोय, नाना वय वर्षे ६५, तसे तब्येतीने काटक होते,पायी चालण्याची प्रचंड क्षमता, टूव्हिलर त्यांना चालवता येत नसे आणि बस, रिक्षा चा वापर ते अपवादात्मक परिस्थितीत करत बॅंकेतून रिटायर्ड झाले होते. मधू नानांना वडापाव, सामोसे फार आवडत, आणि ह्या बाहेरच्या खाण्यामूळे त्यांना सतत पोटाच्या तक्रारी उद्भवत असत,त्यांचे त्याबद्दल चेक-अप देखील झाले होते व आतड्यांची पचन क्षमता कमकुवत झाली असल्याचे कळले होते. त्यांचा माझा परिचय ह्याच तक्रारींमुळे झाला होता, सुरूवातीला दर पंधरा दिवसांनी, नंतर आठवड्याने नानांची स्वारी दवाखान्यात हजर व्हायला लागली, मी दर वेळी औषध देतांना त्यांना बाहेर काही खाल्ले का विचारायचो, आधी ते खरे सांगत पण नंतर नंतर मी रागावेल म्हणून , "काही नाही हो" अस खोटे बोलत, पण एव्हाना मला त्यांच्या सवयी बद्दल घरच्यांकडून कळाले होते, घरचे देखील त्यांच्या ह्या गोष्टीला कंटाळले होते, व वैतागले होते,


एकदा तर माझ्या समोरच त्यांच्या मुलाने त्यांचा पाणउतारा केला होता, व, "डॉ. ह्यांना तुम्ही अजिबात औषध देत जाऊ नका, मी पैसे देणार नाही, ऐकायचेच नाही त्यांना तर मरू देत तसेच" असे म्हटल्याचे आठवते. मला मुलाची बाजू पटत होती व नानांबद्दल वाईट वाटत असले तरी थोडा राग ही आला होता. व त्यांना मी रागाऊन म्हणालो होतो की, "नाना तुम्हाला ऐकायचे नसेल तर मी ओषधं देणार नाही," नंतर मी, ही गोष्ट विसरून गेलो, पण पुन्हा ३-४ दिवसांनी नाना माझ्या पुढे हजर, तोच अपराधी, थोडा केविलवाणा चेहरा, व पोटावर हात ठेवून तक्रार सांगणे, तेच माझे प्रश्न, तेच त्यांचे उत्तर, मग रागाऊन मी त्यांना खर सांगा म्हटल्यावर, "हो खाल्ला एक वडापाव काल" हे उत्तर, व काकुळतीला येऊन त्यांचे म्हणणे की परत नाही खाणार बाहेरचे एवढ्या वेळी द्या, औषध, व पैसे कमी आहेत उद्या देतो असे संवाद आठवड्यातून १वेळा होऊ लागले. पण एक दिवस मी त्यांना उशिरा रात्री १० वाजता या दवाखाना बंद करण्याच्या वेळेला म्हणून परत पाठवले, आणि ते देखिल आलेत, मी त्यांना म्हणालो, "नाना का नाही ऐकत तुम्ही, का पथ्य पाळत नाही, अहो मी काय किंवा घरचे काय तुमच्या भल्यासाठीच सांगतोना ऐका जरा माझे, का शरीराला त्रास देता? 


त्यावेळी नाना जे बोलले ते ऐकून मी विचारात पडलो व जरा वाईट ही वाटले, ते म्हणाले, " डाॅक्टर मला सगळ कळतं हो, पण एक सांगू का माझे लहानपण गरिबीत गेले, कधीही कुठली गोष्ट मना प्रमाणे करता आली नाही, खाण्याच्या खूपशा पदार्थांसाठी तरसलोय मी, नंतर प्रापंचिक जबाबदारी अंगावर पडली पैसा येत होता पण गरजांपुढे पुरत नव्हता म्हणून इच्छा पुन्हा दाबून टाकत असे की, "बघू जरा स्थिरस्थावर झाल्यावर वागू मना सारखे, पण बघू पूढे म्हणेस्तोवर रिटायरमेंट आली, आॅफीस मधे असताना मला वडापाव, भजी, मिसळ कधी कधी खायला मिळे, मला ह्या गोष्टी खूप आवडतात,म्हणून मी खातो, पण आता तब्येत साथ देत नाही, जेव्हा दात होते तेव्हा चणे नव्हते, आणि आता चणे आहेत तर दात नाहीत "एवढ बोलून नाना कसनुस हसले, त्यांच्या डोळ्यात तरळलेले पाणी माझ्या नजरेतून सुटले नाही. नाना पुढे म्हणाले डॉक्टर आता कितीसे दिवस राहीलेत हो आमचे, कधी मना सारखे जगायचेच नाही का आम्ही, मला कुठलेही व्यसन नाही, किंवा ते करणे मला परवडण्यासारखेही नव्हते, कारण ते करून मला कुटुंबाची परवड करायची नव्हती, मग निदान हा स्वस्तातील षौक तरी आयुष्याच्या सुर्यास्ताला पूर्ण करू देत, आणि मरण कुणाला चुकलय का? मग का उरलेले दिवस मन मारत जगू,? आणि डॉक्टर हे म्हातारपण अगदी लहान पणा सारखे असते हो, हट्टी, जिद्दी, तेवढेच हळवे, फरक एवढाच की तो उगवणारा सुर्य असतो आमचा मावळणारा, मला मुलाचा, सुनेचा तुमचा अजिबात राग येत नाही कारण मला माहीतीये तुम्ही माझ्या काळजी पोटी हे बोलता आहात, पण... असो हे त्यांना आज नाही कळणार माझ्या वयाचे झाले की आपोआप उलगडा होईल, तेव्हा मी नसेल त्यांना ह्याची जाणीव करून द्यायला! तुमचा खूप वेळ घेतला, निघतो मी! मला ही हे कुठे तरी बोलायचे होते, आता खूप हलकं वाटतय, पण हो अस समजू नका बर की मी माझी सवय सोडेल, नाही मी तुमच्या कडे येत रहाणारच...! जाता जाता एक वडिलकीचा सल्ला तुम्हाला, तुम्ही नाही म्हणाल तरी देतो. डाॅक्टर तुम्ही लहान आहात आयुष्यात त्या त्या वेळी ते ते वाटेल ना ते करा, पण मर्यादेत राहून,... बघू पुढे अस म्हणून टाळू नका, कारण हा पुढे नेहमी पुढे पुढेच जात रहाणार, त्यामुळे आयुष्याचा तो तो क्षण त्या त्या वेळीच जगा, Life is like an ice cream, taste it before it melts "असे म्हणून नाना निघून गेले,.. 


        मी सुन्न होऊन विचार करू लागलो, केवढा मोलाचा सल्ला नाना देऊन गेले, खरेच ते पुर्ण पणे चुकीचे वागत होते का? आपण डाॅक्टर लोकं सल्ला देऊन मोकळे होतो (अर्थात आपले ते कर्तव्य च आहे) व तो नाही पाळला की पेशंट वर खापर फोडून मोकळे होतो त्याच्यावर चिडतो (त्याच्या भल्या करताच) पण त्याने तसे वागण्यामागे काय कारणं आहेत हा विचार आपण किती वेळा करतो? अर्थात काही आडमुठे पेशंटही असतात, "डॉक्टर काय सांगतच असतात"असे म्हणणारे असो.            


तिसऱ्या दिवशी नाना परत आले तिच तक्रार,... ह्या वेळी मी त्यांना नेहमीप्रमाणे काही विचारले नाही, विचारून उपयोग ही नव्हता आणि मला विचारावे असे वाटले ही नाही, त्यांना काही औषधे मी दिली , मी ठरवले होते इथून पुढे शक्यतोवर कमी साईड इफेक्ट होणाऱ्या व त्यातही आयुर्वेदिक, व कधी होमिओपथीक औषधे नानांना द्यायची व कघी कधी केवळ त्यांच्या समाधानासाठी प्लासीबो (कुठलेही औषध नसलेल्या गोळ्या) द्यायच्या जेव्हा त्यांना औषधा ची गरज नाही असे वाटेल तेव्हा,  त्यानी काही पैसे देऊ केले व तुमचे मागचे पैसे पेंशन आली की देतो म्हणाले. मी मनात ठरवले होते त्या प्रमाणे . नानांपुढे एक पर्याय मांडला म्हणालो, "नाना तुम्ही रिटायर्ड झाला आहात, तर तुम्ही माझ्या कडे सकाळी व संध्याकाळी १-१ तास पेशंट्स चे नावे लिहीण्याचे काम कराल का? (खरे तर मला तशी गरज नव्हती पण मला इथून पुढे नानांकडून पैसे घ्यायचे नव्हते व मी तुम्हाला फुकट ट्रिटमेंट देईन, हे सांगणे त्यांना आवडले नसते) त्या बदल्यात मी काही रक्कम तुम्हाला देईन "थोडा विचार करून ते म्हणाले डाॅक्टर असे करता येईल का? की तुम्ही मला काही पैसे देऊ नका, मी येईन कामाला त्या बदल्यात तुम्ही मला ट्रिटमेंट, देत जा! नाही मला माहीत आहे, तुमच्या ट्रिटमेंट चे पैसे जास्तच होतील पण घ्या सांभाळून!" मी त्वरित त्यांची मागणी मान्य केली, त्या वेळेचा त्यांच्या चेह-यावरचा आनंद मला आजही आठवतो. अशा रितीने नाना माझ्या कडे कामाला लागले, व पुढे आश्चर्य म्हणजे त्यांच्या तक्रारींची वारंवारता पहिल्या पेक्षा खूप कमी झाली कधी कधी तर नुसत्या प्लासीबो ने त्यांना बरे वाटे, ते जास्त हेल्दी वाटू लागले, ह्याचे कारण मला लक्षात आले की त्यांची मानसिक इनसिक्यूरीटी कमी झाली होती, व आपणही काम करतो व तेही दवाखान्यात, त्यामुळे तब्येतीची आता काही काळजी नाही हे समाधान, हा बदल घडवण्यास कारणीभूत होता. ते तर आता पूर्ण वेळ दवाखान्यात थांबू लागले होते. आणि हो त्यांचे बाहेरचे अपथ्थाचे खाणे मात्र व्यवस्थित सुरू होते बर का! कधी कधी मीच त्यांना पैसे देई व "जा नाना वडापाव खा" असे त्यांना सांगितले की ते तोंडाच्या दात नसलेल्या बोळक्यात छान हसायचे. नानांमधील बदल आश्चर्य कारक च होता. नाना पाच वर्षे माझ्याकडे होते, नंतर त्यांच्या मुलाने दुसरी कडे जरा लांब फ्लॅट घेतला त्यामुळे अनिच्छेने नानांना तिकडे जावे लागले,


नंतर नाना अधूनमधून माझ्या कडे येत असत, नंतर खूप कमी झाले. पुढे साधारण एक बर्षानंतर नाना मला येऊन भेटून गेले, वडापावखायचा का? विचारले तर म्हणाले की "मी खाऊन आलो येताना" आणि काय म्हणावे ह्याला कळत नाही पण २ च दिवसांनी त्याच्या नातेवाईकां कडून कळले की नाना काल रात्री झोपेतच गेले, हार्ट अ‍ॅटॅक ने. खूप वाईट वाटले. पण पुन्हा विचार आला की किती शांत पणे, कुणालाही त्रास न देता नाना गेले, त्यांना दोनच दिवसांपूर्वी मला भेटावे का वाटले? त्या वेळी मी त्यांच्या आवडीची गोष्ट खा म्हणण्याची आॅफर नाकारताना त्यांच्या चेहऱ्यावर कृतार्थता मला दिसली होती, का.? . का? मित्रांनो आपल्या आजूबाजूला, परिचयात, घरात असे बरेच नाना /नानी आपण बघतो, त्यांचे म्हातारपणातील- बालपण, हट्ट, ईच्छा, त्यांची घुसमट, इ. इ. आपण बघत असतो, मला येथे अजिबात म्हणायचे नाहीये की त्यांच्या वर्ज्य असलेल्या, अपथ्थ्याच्या सर्वच मागण्या तुम्ही पूर्ण करा, ते ज्याचे त्याने ठरवावे,असे मी म्हणेन. नानां ची बाजू ऐकल्यावर मी त्यांच्या घरच्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न देखील केला नाही, कारण ते लोकं त्यांच्या जागी बरोबर होते . फक्त मला असे वाटते अशा नाना /नानींना समजून घ्या,त्यांना व्यक्त होऊ द्या, लहान मुलांची समजुत काढताना जसा पेशन्स ठेवून मध्यम मार्ग आपण काढतो तसाच मार्ग, तसाच पेशन्स ह्यांच्या बाबतीत ही ठेवण्याचा प्रयत्न करा. हे लिहीत असताना मला, 'पिकू' सिनेमातील अमिताभजींनी साकारलेली बॅनर्जीची भूमिका आठवली          


काही शारीरिक अवरोध हे मानसिक अवरोधांमुळे देखील असतात, ते दूर करण्याचा प्रयत्न करता आला तर करावा, कारण नानांच्या भाषेत, "पिकलं पान कधीही गळून पडेल पण त्याचे गळणे देखील समाधानाने असावे" 


Rate this content
Log in