Mahendra Bagul

Tragedy

4.3  

Mahendra Bagul

Tragedy

एकटी...!

एकटी...!

6 mins
493


मोबाईल खणखणला, पेशंट तपासत असल्याने मी फोन काही घेतला नाही..... एप्रिल महिन्यातील ते करोनाच्या साथीच्या उद्रेकाचे दिवस होते. आम्हा डॉक्टर लोकांवरचा पेशंटच्या संख्येचा ताण खुप वाढला होता. काही अपवाद वगळल्यास येणारा जवळपास प्रत्येक रुग्ण कोव्हीड सस्पेक्ट प्रकारातील होता. आणि एक गोष्ट त्या वेळी प्रकर्षाने लक्षात येत होती की अनेक रुग्णांचा कल भितीमुळे आपली लक्षणे व तक्रारी लपवण्याकडे होता. उदाहरणार्थ, "काही नाही जरासे डोकं दुखतय... गळून गेल्यासारखे वाटतेय किरकोळ आहे!" वगैरे वगैरे. त्यांना कदाचित भिती होती की आपण खरे सांगीतले तर डॉक्टर आपल्याला करोना झाला सांगतील का? किंवा तपासणी करायला सांगितले तर..? आणि जर ती पॉझिटिव्ह आली तर आपल्याला कॉर्पोरेशन वाले घेऊन जातील किंवा आपल्याला अ‍ॅडमिट व्हावे लागेल. मग पुढे काय..?? त्यावेळेसची परिस्थितीच अशी होती की सगळेच मानसिक दडपणाखाली होते.. त्यातून आम्ही डॉक्टर मंडळी सर्वसामान्यांसारख्यांच्या ह्या दडपणा बरोबरच रुग्ण सेवा करताना स्वत: इन्फेकट होण्याच्या अधीकच्या दडपणात होतो. असो.परंतू लक्षणं लपवली तरी तपासतांना ती उघडी पडतच होती हा भाग वेगळा सांगायला नको.


जरा वेळाने पुन्हा फोन ची रिंग वाजली त्याचाच म्हणजे निलेश चाच फोन होता ज्याने आधी फोन केला होता. निलेश अगदी लहान असल्यापासून म्हणजे गेले ३०-३१ वर्षांपासून त्याचे कुटुंबीय माझ्याकडे औषध पाण्यासाठी येतात. "बोल निलेश.." मी फोन घेतला"सर वेळ आहे का बोलायला..? महत्त्वाचे बोलायचे आहे!" तो म्हणाला."खूप अर्जंट काही आहे का? नाहीतर नंतर बोलू" मी घाईत म्हणालो, व फोन बंद करणारच होतो तेवढ्यात तो म्हणाला " सर अजय..!""वाईट बातमी आहे का?" फोन सुरु ठेवत मी म्हणालो.अजय.. डॉ. अजय म्हणजे निलेश चा साडू (त्याच्या बायकोच्या बहिणी चा नवरा) साधारण निलेश च्या च म्हणजे ३८-३९ वर्षाचा, बॉडी बिल्डर म्हणतात तशी देहयष्टी स्वतः पेशाने डॉक्टर. निलेश मुळे अजय ची व माझी एक दोन वेळा भेट झाली होती.तोच अजय गेले १५ दिवस करोना व त्यामुळे होणाऱ्या कॉम्ल्पिकेशन्स मुळे हॉस्पिटल मध्ये जीवन मरणाची लढाई लढत होता. त्यामुळे त्याचे नाव ऐकताच माझ्या मनातील शंका मी बोलून दाखवली कारण त्या दिवसांत रोजच अशा वाईट बातम्या कानावर येत होत्या. मनाला दु:ख होत असे आणि हताशा व आगतीकता दाटून रहात असे, पण 'शो मस्ट गो अॉन ' म्हणत करोनाशी व साथीशी लढण्यासाठी पेशंट्सला मदत करणे आणि ट्रिटमेंट बरोबरच धीर देणे सुरू होते."सर हॉस्पिटल मधून फोन होता की त्याची कंडीशन आज अत्यंत क्रिटीकल आहे काहीही होऊ शकते..!"मी काहीच बोललो नाही.. काय बोलणार? कारण बोलण्यासारखं काही नव्हतेच. मात्र पुढे तो जे म्हणाला ते ऐकून मात्र मनात नक्कीच खोलवर खूप ढवळल्या सारखे वाटले.


आणि नियती कधी कधी कृर खेळ खेळत समोरच्याला हरवून किती भेसूर हसत असते याचा प्रत्यय आला. तसे रोजच पेशंट्सच्या त्यांच्या नातेवाईकांच्या अवस्थे बद्दलच्या सारख्याच बातम्या कळून मन निर्विकार पाषाण होतेय की काय अशी भीती वाटायला लागली होती. ज्यांच्या प्रिय जनांचा करोना मुळे मृत्यू झालाय ते त्यांना फोनवरून कळल्या पासून ते त्या दिवंगताच्या अंत्यसंस्काराचा सोपस्काराची पद्धत लांबूनच बघताना त्यांची मानसिक अवस्था काय होत असेल याचा विचार सुरुवातीला  मला अस्वस्थ करत असे. पण आता ती अस्वस्थता कमी व्हायला लागली आहे, मला मनाचे हे पाषाणा कडे होणारे स्थित्यंतर खटकत होते.. मला ते होणे नको होते! पण...."सर केव्हाही वाईट बातमी येऊ शकते!" तो म्हणाला."मला कळतेय रे.. पण ईश्वर ईच्छा म्हणायचे तू धीर धर..!" माझेच हे शब्द मला औपचारिक आणि कोरडे भासत होते."हो सर पण.. माझी समस्या वेगळीच आहे.. की ती बातमी मी अनीता ला कशी सांगू..?"अनीता म्हणजे डॉ. अजय ची पत्नी ती देखील स्वतः डॉक्टर आणि स्वतः करोना पॉझिटिव्ह असल्याने गेले दहा दिवस होम क्वारंटाईन होती, दोन लहान मुली नशीबाने करोना निगेटिव्ह होत्या,त्यांना तिने निलेश कडे पाठवले होते, तिचे आई - वडील काही वर्षांपुर्वीच एका अपघातात वारले होते. एक मोठा अविवाहित भाऊ होता तो गेल्या वर्षीच्या करोना लाटेत बळी पडलेला.सख्खे असे एकच नाते निलेश ची पत्नी अस्मिता ही एकच बहीण. अजय शी लग्न झाले तो देखील एकूलता एक त्याच्या आईचे यांच्या लग्ना आधी च निधन झाले होते. घरात वयोवृद्ध सासरे होते. ह्या लाटेत करोना ने तिच्या घरात प्रवेश केला तो सास-यांच्या द्वारे. ते पॉझिटिव्ह आले. स्वत: डॉक्टर असल्याने त्यांना औषध व उपचार अजयच करत होता.नंतर त्यांना हॉस्पिटल मधे भरती करावे लागले. दुर्दैवाने अजयला डायबेटिस असल्याने तो करोनाच्या संसंर्गा साठी हायरिस्क कॅटेगरीत होता आणि हे स्वतः डॉक्टर असल्याने त्याला चांगले कळत होते.


परंतु वडीलांसाठीचे कर्तव्य त्याला करणे भाग होते आणि मी एवढा तंदुरुस्त आहे मला काही होणार नाही ह्या अनाठायी विश्वासाने तो जरा बेफिकीर राहीला आणि तिच वेळ या संधीसाधू आजाराने गाठली आणि अजय करोना ग्रस्त झाला व त्यालाही हॉस्पिटलाईज करावे लागले.अनीता आता घरात एकटीच होती क्वारंटाईन असल्याने तिला बाहेरच काय पण अजय करता हॉस्पिटल मधे देखिल जाता येत नव्हते, सर्व फॉलोअप तिला फोनवरच बहिण व निलेश कडून मिळत होते, तिलाही ताप, खोकला, अशक्तपणा होता पण तरीही स्वतः पेक्षा तिचे लक्ष अजय व सास-यांच्या तब्ब्येतीकडेच जास्त होते.त्यात मुली देखील जवळ नव्हत्या घरातील एकटेपणा तिला असह्य होत होता. मोठ्या प्रेमाने सजवलेले घर तिला खायला उठत होते. अशा परिस्थितीत तिची मानसिकता काय असेल ही कल्पना न केलेलीच बरी. त्यात एक दिवस सास-यांची तब्येत जास्त बिघडली आणि ते गेले. या वेळी अजय बेशुद्ध अवस्थेत होता. सास-यांच्या बातमी नंतर मात्र तिच्या मनाचा धीर सुटला. "मला अजय कडे घेऊन चला.. मला त्याला भेटायचे! त्याला एकदा बघायचे आहे..!! " असा धोशा तिने लावला. "नकोअगं काळजी करु.. डॉक्टर असून घाबरतेस काय वेडाबाई ? अगं दोन दिवसात बरा होऊन घरी येतो की नाही बघ.. आणि हो तू स्वतः ची काळजी घे..!!" अॅडमीट व्हायला जातानाचे अजय चे हे शब्द तिला सतत कानी ऐकू येऊ लागले .. त्याचा तो थकलेला पण काही न झाल्याचे भाव आणणारा चेहरा तिच्या डोळ्यासमोर येत होता. आणि तिचे डोळे भरुन येत होते.. मनातील वाढणारी बैचेनी व अस्वस्थता बाहेर काढायला, कुणाच्या खांद्यावर डोके ठेवून मनसोक्त रडायला जवळ कुणीही नव्हते. नियतीने खेळाचा सारीपाट तिच्या पुढे मांडला होता आणि दानाच्या कवड्या मात्र स्वत:च्या हातात ठेवून ती अनिताला खेळायला भाग पाडत होती.


"सर.. सांगा ना प्लीज मी काय करू?" फोन वरील त्याच्या आवाजाने मी भानावर आलो. "सर तिला जर अजय विषयी बरी - वाईट बातमी सांगितली.. (हे बोलताना निलेशचा गळा भरुन आल्याचे जाणवले) आणि ती सहन न होऊन तिला भोवळ आली तर.. तिला खाली पडताना सावरायला.. कुणी तरी धरायला हवे ना..!! आणि त्यात ती करोना पेशंट आहे त्यामुळे भितीने कुणीही मदतीला येणार नाही.. कोण करेल हे काम? अस्मिता (निलेश ची पत्नी) प्रेग्नंट आहे त्या मुळे तीला तर शक्यच नाही.. मलाच करायला हवे,.. काय करावे मी? या साठी तुमचा सल्ला हवाय!! "निलेश ची समस्या अगदी रास्त होती. माझ्या आजपर्यंतच्या मेडिकल प्रॅक्टिस मध्ये अशी समस्या मी पहिल्यांदा बघत होतो. रस्त्यावर जरी एखादी अनोळखी व्यक्ती चक्कर येऊन पडत असेल तर अनेक अनोळखी हात तिला सावरायला सरसावतात कारण फक्त माणुसकीचे नाते..! आणि इथे मात्र आपले, रक्ताचे असून देखील असहाय्य होते. हा आजार नाते - संबंध, आपले - परके, जगणे - मरणे, भावनांचा कोंडमारा.. असहायता , संवेदना, निष्ठूरता इ. सारे सारे मिथ्या ठरवू पहात होता.की या सा-यांचा एकाच वेळी परिचय करून देत होता? आपल्याच हातात दानाच्या कवड्या घेऊन बसलेल्या नियतीशी सारीपाट खेळणा-या अनेक अभाग्यांची येथे अनिता प्रतिनिधित्व करतेय असे मला वाटून गेले. मी क्षणभर विचार केला आणि त्याला म्हणालो, "ठिकं आहे काळजी करु नकोस.. मी तुला पी. पी. ई. किट देतो ते ठेव तुझ्या जवळ, अगदी तशी वेळ आली तर किट घालून जा. आणि तिला तसा काही त्रास वाटला तर मला फोन कर.. करेन मी ट्रिटमेंट ची व्यवस्था, किंवा स्वतः येईल. टेंशन घेऊ नको.मला खात्री आहे आल्या परिस्थितीला तोंड देशील तू, आणि हो मला अनीताचा नंबर दे मी बोलतो तिच्याशी! "        


पेशंट्स संपल्यावर मी अनीताला फोन केला दरम्यान निलेश येऊन पी. पी. ई. किट घेऊन गेला. बोलताना मी अनीताच्या मनाचा अंदाज घेतला.. तिला अजय च्या कंडीशन बद्दल माहिती होती हे कळल्यावर मी तिला ती डॉक्टर असल्याने याचे प्रोग्नोसीस (निष्कर्ष) काय होऊ शकतो हे तू जाणतेस असे म्हणालो आणि तू पत्नी आहेस पण एक डॉक्टर आहेस आणि सगळ्यात महत्वाचे दोन चिमुकल्या जिवांची आई आहेस.. त्यांच्या साठी.. अजय च्या ह्या दोन ठेवींच्या जपणूकी साठी तुला खंबीर होऊन येणाऱ्या परिस्थितीला सामोरे जायचेय...!! "इत्यादी संवादातून जरा बौद्धिक घेतले. मनातून मला तिच्या बद्दल वाईट वाटत होते.एखाद्याच्या वाटेला नशीब लिहीताना विधाता.. नातेवाईक, आप्त जन देण्यात एवढी कंजूषी का करतो..? आणि तेवढेच नाही, तर जोडलेली नाती पण हिरावून जाण्याची तजवीज का करुन ठेवतो? एवढी निष्ठूरता... का..? का? का?.... 

(*स्व-अनुभवावर आधारित) 


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy