Mahendra Bagul

Inspirational

4.3  

Mahendra Bagul

Inspirational

ध्यास वृक्षमंदीराचा

ध्यास वृक्षमंदीराचा

5 mins
255


"झाडे लावा झाडे जगवा!" "पर्यावरणाचा - हास थांबवा! "अशा घोषणा, सुविचार नेहमी वाचनात येतात परंतु फार थोडेच लोकं ह्यावर गंभीरपणे अमल करताना दिसतात. यासाठी निसर्गावर प्रेम असावे लागते व पर्यावरण वाचवून समस्त मानवजात, प्राणीमात्रा तसेच भावी पिढीवर येणाऱ्या अरीष्टा पासून वाचवण्याची कळकळ असावी लागते. अशीच कळकळ व सामाजिक जाण असणारा आमचा 'टेकडी मंडळाचा'निसर्गप्पेमी ग्रुप आहे.व गेली २२ वर्षे आमचे हे काम अव्याहात पणे सुरू आहे. परमहंस नगर, पौड रोड येथील सहकार वृंद सोसायटीच्या टेकडीवर व्यायामाकरता फिरावयाला येणारे आम्ही ७-८ लोकं ह्याच निसर्ग प्रेमापोटी व पर्यावरण रक्षण ह्या समानध्येयाच्या धाग्याने २२ वर्षांपुर्वी एकत्र बांधले गेलो आणि त्यावेळी उजाड, ओसाड, ओबडधोबड, खाचखळग्यांनी युक्त असलेल्या त्या टेकडी वर मनी 'वृक्ष मंदिराचे' स्वप्न बाळगत झाडे लावण्यास सुरुवात केली, त्यासाठी आधी त्या टेकडीवरील घाण, कचरा सफाई चे काम हाती घेतले, यावेळी तेथे सकाळी प्रातर्विधी साठी येणाऱ्यांचा विरोध सहन करत व त्यांचे प्रबोधन करत हे काम मार्गी लावले त्या नंतर ओबडधोबड असलेल्या ह्या टेकडीचे नैसर्गिक रूप कायमठेवत गरज असेल तेथील सपाटीकरण करणे, अडथळा ठरणारे काही मोठे मोठे दगड काढणे, आणि नंतर ह्या खडकाळ, मुरूमाड असलेल्या जमीनीवर झाडांसाठी खोल खड्डे खोदून त्यात झाडांयोग्य माती टेकडी च्या पायथ्याला आणून नंतर ती वर नेणे, आणि मग त्यात वृक्षारोपण करणे अशी आमची कामे सुरू झाली आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे ह्या सर्व कामांसाठी आम्ही कुदळ, पहार, फावडे, घमेली विकत आणलीत व स्वतः हातात घेऊन ती (कामगार न लावता) करत होतो.

कधी कधी वरून लहान वाटणारे दगड जमीनीत खूप मोठे असत ते काढण्यात दोन ते तीन आठवडे लागत. या कामां मध्ये वय वर्षे ६० ते २५ अशा वयोगटातील कुणी निवृत्त अधिकारी, कुणी उच्च पदस्थ, कुणी शास्त्रज्ञ दर्जाचे, कुणी व्यापारी व कुणी माझ्या सारखे वैद्यकीय व्यावसायिक अशा आमच्या सहका-यांचा सहभाग असे. सुरूवातीला ह्या मुरूमाड टेकडी वरचे आमचे हे काम सुरू असताना काही कोतुकाचे, काही अविश्वासाचे,अभिप्राय ऐकायला मिळत होते तर काहींचे उपहासात्मक, वाक्ये देखील आमच्या कानी पडत, काहींनी तर आम्हाला वेडे म्हणून देखील संबोधले. 'खरोखरच ते वेडच होते आमचे! नाहीतर कोण सुखासुखी ची चाकोरीतली दिनचर्या सोडून ही अशक्यप्रायअशी कष्टाची वाट धरेल?' परंतु, " वेड्यांनीच घडवला आहे इतिहास!" ह्या लहानपणी शिकलेल्या एका कवितेतील वाक्य घोषवाक्य समजून मनात घोळत आम्ही खाली माना घालून आमची कामे करत असूत. बरे नुसती झाडे लावली म्हणजे काम संपले असे नव्हते तर त्यांना पाणी घालणे, त्यांची जोपासना करणे ही पुढील महत्वाची कामे होतीच की, त्या साठी मग आम्ही रोज घरून येताना अवजारांबरोबरच पाण्याच्या बाटल्या, पाण्याने भरलेले कॅन बरोबर आणू लागलो, आमच्या हातातील बाटल्या व कॅन बघून, "सकाळी सकाळी ××विधी साठी टेकडी वर जातात का हे लोकं?" असे शेरे देखील कानी पडत असो. अशा रितीने आम्ही झाडांना पाणी देऊ लागलो, पण पाणी धरून- न ठेवणा-या ह्या उघड्या जमीनीत तेवढे पाणी खुपच तोकडे पडत असे म्हणून आम्ही फिरायला येणाऱ्या इतर सर्वांना, 'कमीत कमी १ लिटर पाण्याची बाटली झाडांसाठी सोबत आणण्याचे' आवाहन करणे सुरू केले परंतु त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही हे मला खेदाने नमूद करावेसे वाटते, असो मग आम्ही कॅन ची संख्या वाढवली, पायथ्याशी भरून ठेवलेले कॅन वर आणण्याच्या कामात मात्र आम्हाला इतरांची मदत हळूहळू मिळू लागली व ती अजूनही मिळते आहे, हल्ली आम्ही रोज ५-५ लिटरचे ४०ते ५० कॅन, तसेच बाटल्या असे मिळून साधारण २५० लिटर पाणी वर नेतो. हळूहळू सुरूवातीला लावलेल्या १० - १५ झाडांपासून केलेली ही सुरूवात आता ८०० ते १००० झाडापर्यंत येऊन पोहोचली आहे. यात वड, पिंपळ, पिंपरी चिंच, शेवगा, हत्ती फळ, कडूनिंब, शिसम, शेवगा, आपटा, बहावा,चंदन, करंज, पळस, बेल, उंबर आंबा, जांभूळ, सिताफळ, बकूळ, जास्वंद, पारिजातक, जाई, जुई,इत्यादी अनेक प्रकारच्या झाडांचा यात समावेश आहे. शक्यतोवर देशी झाडे लावण्याचा आमचा कटाक्ष असतो.बघता बघता उजाड, ओसाड असलेल्या टेकडीवर जराशी हिरवळ दिसू लागली आणि म्हणतात ना 'कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात आधी एकट्यानेच करावी लागते नंतर ते काम चांगले आहे हे दिसू लागले की तुमच्या मदतीला अनेक लोकं येऊ लागतात, "मैं अकेला ही चला था जानिब-ए-मंज़िल मगर. लोग साथ आते गए और कारवाँ बनता गया ..!!" ह्या प्रमाणे अनेक निसर्गप्रेमी आमच्या मदतीला येऊ लागले. आणि काही महिला देखील आता यात सहभागी होत आहेत हे विशेष. आज आमचा २५ - ३० लोकांचा 'टेकडी मंडळ' परिवार आहे.पाण्याची टंचाई व मुरूमाड जमीन ह्या विपरीत परिस्थिती बरोबरच टेकडी संरक्षित नसल्याने आम्हाला जनावरांचा उपद्रव होऊ लागला त्यात बक-या, गायी इत्यादी चतुष्पाद प्राण्यांबरोबरच काही विध्वंसक द्विपाद प्राण्यांचा देखील त्रास होत होता व अजूनही होत आहे, चतुष्पादांचे समजू शकतो ती त्यांची गरज आहे पण माणसांचे काय बोलावे..! उगाचंच लावलेली झाडे उपटून टाकणे, शेंडे खुडणे,फुलझाडांची फुले ओरबाडणे, नुकसान करणे, घाण करणे, अवैध उद्योग करणे हे प्रकार सुरू झाले व अजूनही काही प्रमाणात सुरू आहे, परंतू त्या कडे दुर्लक्ष करत न डगमगता आमच्या वेड्यांनी हे काम सुरूच ठेवले आहे. गेल्या २२ वर्षांत नंतर आम्ही तेथील भुभागाची नैसर्गिकता टिकवत तेथील दगडांचा वापर करत लॅंडस्केपींग केले, काही मोठ्या झालेल्या झाडांना पार बांधून फिरावयास येणाऱ्यांना विसाव्यासाठी, बसण्याची सोय केली, पावसाच्या पाण्याचा थेंब अन थेंब जमीनीत मुरावा म्हणून चर खोदणे, दगडमातीचे बांध बांधणे झाडाभोवती काठ्या - बांबूचे कुंपण करणे (कारण लोखंडी पिंजरे चोरीला गेलीत), पावसाळ्यात नविन झाडे लावणे, औषध फवारणी करणे इत्यादी कामे स्वतः श्रमदानाने करत आहोत. व नवनिर्मितीचा परमानंद लुटत आहोत. येधील बरीचशी झाडे आता मोठी होऊन सावली, फळे, फुले देऊलागली आहेत.     

 टेकडीचे पावित्र्य टिकावे व आम्हाला व इतरांना व्यायाम तसेच काम करण्यासाठी बळ मिळावे म्हणून आम्ही तेथील एका दगडात देव बघीतला व त्याची स्थापना तेथे केली आणि आमच्यातील एक कलाकार श्री. गोरे काका ह्यांनी त्यावर , शक्तीची देवता, 'मारूती राया' आपल्या कलेने चितारला. दररोज सकाळी मारूती स्तोत्र व आरती, तसेच दर शनिवारी पुजा केली जाते. दरवर्षी येथे फिरायला येणाऱ्यांच्या उदंड प्रतिसादाने आम्ही हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करतो, त्यासाठीची रंगरंगोटी, सजावट, शुशोभीकरण देखील आमच्या टेकडी परिवारातील सदस्यच करतात, हनुमान जयंती ला सकाळी साधारण ५०० ते ६०० भक्तांची हजेरी असते.उजाड, ओसाड टेकडी चे रूपांतर आता हिरव्यागार, नियोजन बद्ध टेकडीत होते आहे व २२ वर्षांपूर्वी आमच्या मनात श्री. दंडवते काकांनी रूजवलेली, 'वृक्ष मंदिराची' संकल्पना साकार होऊ लागली आहे. ह्यात आता अनेक हात आम्हाला येऊन मिळत आहेत सगळ्यांची नावे देणे शक्य नाही परंतु.. सर्व श्री. दंडवते, अध्यापक, के. आर. पाटील, डॉ. महेन्द्र बागूल, पेशवे, मिस्त्री, कुलकर्णी, उपळेकर, फुले,देवस्थळी, तांबे ह्या माझ्या सुरूवाती पासूनच्या सहका-यांचा उल्लेख करणे मी गरजेचे समजतो. आवर्जून फिरायला येण्यासाठी चे एक रम्य निवांत व पवित्र ठिकाण म्हणून आता ह्या सहकार वृंद टेकडी ची ओळख होत आहे.मला हिंदी तील एक शेर प्रकर्षाने आठवतो तो मी येथे वेगळ्या प्रकारे मांडतो , "कौन कहता है बंजर जमीं पर नंदनवन नही होता .... जरा एक कुदल तबीयतसे तो मारो यारो!!"     आलेल्या पाहुण्यांना जेव्हा आमच्या ह्या वृक्ष मंदिरा ला कुणी घेऊन येते त्या वेळी त्या पाहुण्यांच्या , "वा..सुंदर!! अशा अभिप्रायाने यजमानांचा प्रसन्न, आनंदी चेहरा जेव्हा मी बघतो तसेच आसपासच्या शाळेतील चिमुकल्या मुलांची सहल घेऊन येथील झाडांची माहिती शिक्षीका देत असतात, आम्ही बांधलेल्या पारांवर जेव्हा थकलेले आजोबा विसावतात, येथील झाडांच्या सान्निध्यात जेव्हा चिमूकली मुले बागडत असतात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान, आनंद बघून २२ वर्षांच्या ह्या परिश्रमाचे चीज झाले असे वाटते व नकळत डोळे पाणावतात..!!


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational