सुखाची ओंजळ...
सुखाची ओंजळ...
"आप्पा मला भूक लागलीय ओ...मला भूक लागलीय....मला काहीतरी खायला द्या ना... द्या ना आप्पा... " असं भुकेलेल्या आणि रडक्या स्वरात म्हणत रमेशचा मुलगा राहुल शेवटी पाय पोटाशी घेऊन झोपी गेला. भुकेपोटी राहुलची झालेली ती अवस्था पाहून रमेशच्या डोळ्यात पाणी आलं...त्याच अवस्थेत बाजूला बसलेल्या त्याच्या बायकोकडे त्याने एक नजर टाकली, तिच्याही डोळ्यात पाणी तराळलेलं होतं... शेवटी तिथून उठून जावं असा विचार करत तो घरातून बाहेर पडला...
काय करणार बिचारा? रमेश एक गवंडी माणूस होता. कुठेही चालू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी तो कामाला जात असे आणि रोजच्या मिळालेल्या कमाईवर तो घर भागवत असे. पण, सध्याच्या परिस्थितीमुळे त्याला कुठे कामही मिळत नव्हतं आणि कमाई तर होणं शक्यच नव्हतं. त्याच्या घरचं सगळं धान्य संपलं होतं. शेवटी काहीतरी केलचं पाहिजे असा विचार करत डोळ्यांच्या कड्यावरचं पाणी पुसत रमेश चालत चालत चौकाच्या जवळ आला.चौकात पोलिस उभे होते.अशा या कडक उन्हात, निर्जन रस्त्यावर कोणीतरी एक माणूस चालत येतोय,हे पोलिसांच्या लक्षात आलं. रमेश चालत चालत चौकात आला. पोलिसांनी त्याला आडवलं,तितक्यात एक पोलीस समोर येत रमेशला म्हणाला "काय रे? का रस्त्याने फिरतोयस? लाॅकडाऊन चालूय माहिती नाही का?"त्यावर रमेश खालावलेल्या स्वरात म्हणाला " माहिती हाय साहेब." माहित असूनही रम
ेश रस्त्यावर फिरतोय हे ऐकताच तो पोलीस मात्र रागाला आला आणि त्याच्यावर चिडत म्हणाला "काय रे? माहिती असूनही फिरतोयस बाहेर, काही कामधंदा नाहीये का तुला? चल जा घरी परत, आणि हो लस घेतलीस का? नसली घेतलीस तर जा जवळच्या शासकीय रुग्णालयात आणि घे" पोलिसाचं हे बोलणं ऐकून रमेश लटकं हासत पोलिसांना म्हणाला, "घरी पोरगं रडत हाय साहेब, भूक लागलीया त्याला ,पण काय करू आमच्या घरचं समदं धान्य संपलया ,भूक लागणार नाय असली कोणती लस हाय का साहेब? असलं तर सांगा आम्हासनी,आम्ही समंदे घेतो,म्हंजी कोरोना जाईस्तवर आम्हाला भूक लागणार नाय " आणि तो तिथून निघून गेला .
त्याच ते बोलणं ऎकून पोलिसाचे डोळे पाणावले आणि त्याने त्याला परत बोलावलं,त्याच्या घरचा पत्ता विचारून घेतला आणि पुढच्या दोन तासात त्याला महिनाभर लागेल एवढं धान्य त्याच्या घरी घेऊन गेला. त्या पोलीसाने आणलेलं धान्य पाहून रमेशचे डोळे पाणावले आणि हात जोडत त्यांने पोलिसाचे आभार मानले.पोलिसांने देखील राहुलच्या डोक्यावरून हात फिरवला आणि तेथून चालू लागला... तेथून निघताना त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता... एक वेगळचं समाधान त्याला जाणवत होतं...आनंदाने गहिवरून तो मनोमन विचार करू लागला ."खरंच आपली ओंजळ सुखाने भरलेली असताना ती सांडायच्या आत इतरांना त्यातलं देता आलं तर त्याच्या इतकं समाधान आणि त्यातून मिळालेला आनंद हा कशातचं मोजता येतं नाही "